पान:अंगारमळा (Angarmala).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही नाशिक भागांमध्ये असं असं आंदोलन करतो आहोत; चाकणच्या आंदोलनासंबंधी तुम्ही वाचलंच असेल. ते म्हणाले, "शरदराव, आजपासून मी, माझी गाडी आणि माझी बायको तुमच्याबरोबर राहणार." आणि त्या गृहस्थाने निपाणीचं तंबाखू आंदोलन संपेपर्यंत अकरा महिने मोठ्या तपश्चर्येनं काम केलं. हे काही विनंत्या करून होणारं काम नाही. मी जो जो शब्द त्या काळात बोललोसभेमध्ये असो, खासगी बैठकीमध्ये असो- तो शब्दन् शब्द कॅसेटवर नोंद करून कागदावर उतरून काढण्याचं महान तपस्येचं काम त्यांनी केलं. त्यातूनच 'योद्धा शेतकरी' तयार झालं. मानलं पाहिजे ! मीसुद्धा बऱ्यापैकी प्रभावी गद्य लिहितो. ललित साहित्य लिहित नसलो तरी अर्थशास्त्रासारखा कठीण विषय सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांमध्ये मांडतो. पण माझ्या पुस्तकांनी शेतकरी संघटनेचा प्रचार झाला नाही तितका 'योद्धा शेतकरी'ने झाला ही गोष्ट खरी. त्यांनी निपाणीच्या आंदोलनातील रक्तकांडावरही 'रक्तसूट' नावाची लेखमालिका 'माणूस' मधून लिहिली. अंतिमत: अशी पुस्तके कितपत उपयुक्त ठरू शकतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण स्वत:हून असा उपक्रम करणारांचा उत्साहभंग मी करीत नाही. शेतकरी संघटनेवर शिंतोडे उडविणारी पुस्तकेही लिहिली गेली. किंबहुना अशी पुस्तके जाणीवपूर्वक, पैसे देऊन लिहून घेतली जातील. संघटनेचे कार्यकर्ते आनंद यादवांना विनंती करतात की 'गावा'बद्दल तुमच्या मनात सहानूभूती आहे, तेव्हा तुम्ही उभे रहा आणि काहीतरी 'गावां'तील भावांबद्दल बोला. अशी पुस्तकं येऊ लागली तर त्याची येणारी प्रतिक्रियाही लक्षात घ्यायला हवी. ज्यांच्याकडे पैसे आहेत अशी मंडळी भाडोत्री लेखक लावून हवी तशी पुस्तकं लिहून घेतील. तेव्हा, कोणताही कार्यक्रम हाती घेताना त्याला प्रतिक्रिया काय येईल हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

 चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात आम्ही एका कार्यक्रमाचा प्रस्ताव केला होता. ज्या बायांचे नवरे दारूडे असतील त्यांना गावातल्या सगळ्या बायांनी पकडून पाण्यात बुचकळावं किंवा ठोकून काढावं. आमच्या कार्यकर्त्या महिलांना खूप आनंद वाटला. महिला प्रश्नाच्या विचाराबाबतीत मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा एका महिलेने मला सांगितले की हे चूक आहे. कोणत्याही पद्धतीने महिला चळवळ हिंसाचाराच्या मार्गने नेऊ नका. जर का हिंसाचाराचा मार्ग अवलंबला तर दुसऱ्याही बाजूने हिंसाचार होईल आणि हिंसाचार वाढला म्हणजे स्त्रिया नेहमीच दोन पावले मागे हटतात. आमचा प्रस्ताव आम्ही मागे घेतला.


 

अंगारमळा । ११५