पान:अंगारमळा (Angarmala).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुलगुरूसुद्धा उठून उभे राहतात ! हे म्हटल्यानंतर एका प्राचार्यांनी मला सांगितले की "मुख्यमंत्री कशाला, मुख्यमंत्र्याचा चपराशी येतो आहे असं कळलं तरी आम्ही उभे राहतो!"

 साहित्यिकांच्या स्वातंत्र्याला मी मानतो. पण, ते स्वातंत्र्य आपण मिरवतो आहोत, वापरतो आहोत असं साहित्यिकही मानणार नाहीत. माझं एखादं पुस्तक छापायची परवानगी कोणी मागितली तर मी एक अट घालतो- कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पुस्तक सरकारी पारितोषिकाकरिता पाठवले जाता कामा नये.

 शेतकरी संघटनेने साहित्यासाठी काही केलं का, साहित्यासंबंधी काही अभ्यास केला का असा एक प्रश्न या संमेलनात विचारला गेला. खरं म्हटलं तर मी शेतकरीही नाही. या सगळ्या हॉलमध्ये, शेतकऱ्यांच्या घरी जन्मलेला नाही असा, बहुतेक मी एकटाच आहे. त्यामुळे माझ्याकडे भूमिहीन शेतमजुराच्या किंवा शेतमालकाच्या घरी जन्मल्याचा डौल सागण्यासारखं काही नाही.

 आणि मी साहित्यिकही नाही. साहित्यिक होण्याचा माझा विचार होता. मी कॉलेजमध्ये असताना कथा लिहायला सुरवात केली होती. माझा त्यावेळेचा आवडता लेखक सॉमरसेट मॉम- आजही आवडता आहे - याच्या कथांचं भाषांतर करू लागलो. त्यावेळच्या एका प्रसिद्ध मराठी मासिकामध्ये माझी एक गोष्ट प्रसिद्ध झाली. मुंबईत लोकल गाडीखाली सापडलेल्या एका तरूणाचे प्रेत घरी आणल्यानंतर तिथे जमलेल्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या असाव्या असा त्या कथेचा विषय होता. चाळीमध्ये त्या तरूणाच्या शेजारी एक विधवा स्त्री रहात होती. तिच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला असावा याचे वर्णन करताना, मी माझ्या खवचट स्वभावाने, लिहिले होते की, 'एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर समाधान झाल्यावर व्हावा तसा तिचा चेहरा झाला होता.' माझ्या वडिलांनी ती प्रसिद्ध झालेली गोष्ट वाचली. माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीचे. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर, राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहिती नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, "मनुष्य जितका दुष्ट आहे तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही." मी मोठा पंचाईतीत सापडलो; जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय करायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर व्हायला लागलो.

 शेतकरी आंदोलन चालू झाल्यानंतर, सुदैवाने, 'योद्धा शेतकरी'चे लेखक भेटले. त्यांना सांगावं नाही लागलं की तुम्ही आमच्याबरोबर या. कुठे तरी अपघातानं गाठ पडली

अंगारमळा । ११४