पान:अंगारमळा (Angarmala).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजू नका. शेतकरी संघटनेच्या प्रतिज्ञेत म्हटले आहे की, 'सामान्य माणसासारखं का होईना जगता यावं.' चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनातील घोषणा पत्रातही म्हटलं आहे, की आम्ही लाख लाख स्त्रिया घोषित करतो की आम्ही माणूस आहोत.' माणसाला माणूस न मानता एका समूहाचा, एका कळपाचा सदस्य करण्याचं काम शेकडो वर्षे चाललं आहे - धर्मिकांनी चालवलं, जातीच्या नावानं चालवलं आणि समाजवादाच्या नावाखालीही तेच केलं गेलं. या कळपवादातून माणसाला मोकळं करण्याचा विचार देणारी ही शेतकरी संघटना आहे.

 उदारीकरण झालं तर काय होईल? एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या माणसाला, ज्यांच्या कारखान्यामध्ये एक किलो लोखंडात एक कणभरही वाढ होऊ शकत नाही त्यांच्याकडे भीक मागायला जावं लागतं. या कोड्याचं उत्तर शोधण्याकरिता साहित्यिकांना त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. साहित्यिकांच्या दृष्टिने उदारीकरणाला काय महत्त्व आहे? समाजवादाच्या पद्धतीमध्ये राजकीय सरकारने सगळा समाज ग्रासून टाकला आहे. सरकार पाहिजे; सरकार नको असं कोणी म्हणत नाही. कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याकरिता, परकीय आक्रमणापासून देशाचं रक्षण करण्याकरिता सरकार पाहिजे, मजबूत पाहिजे; जो कोणी कायदेभंग करायला जाईल त्याला भीती वाटेल अशा तऱ्हेचं ताकदवान सरकार पाहिजे. पण, त्या सरकारची भूमिका एवढीच मर्यादित पाहिजे; अर्थकारणात सरकारला काहीही स्थान नाही. 'जिथं सरकार व्यापारी बनतं, तिथं प्रजा भिकारी बनते' अशी गुजराथीत म्हण आहे. मला आजकालच्या साहित्यिकांची, कलाकारांची, बुद्धिमंतांची मोठी कीव येते. भर्तृहरीच्या अनेक साहित्यामध्ये एका प्रसंगाचा उल्लेख येतो. एका गुरूच्या एक शिष्य राजाच्या दरबारात उभा राहून राजाला सांगतो, 'तू मोठा श्रीमंत असशील; आपल्या वैभवाचा, साम्राज्याचा तुला अभिमान असेल; पण मलासुद्धा ज्या गुरूची मी उपासना केली त्या गुरूच्या परंपरेचा अभिमान आहे. माझाही मोठा शिष्यगण आहे. माझं हे वैभव तू मानत नसशील तर मीही तुला मानत नाही; मी हा निघून चाललो.' ज्याला तुम्ही सरंजामशाही म्हणता त्या सरंजामशाहीच्या काळामध्ये, जिथे काही न्याय नाही, जिथे जुलूम होतात अशा राजाच्या दरबारमध्ये उभा राहून एक विद्वान आपल्या विद्वतेचा डौल सांगतो.

 आणि आज? आज आपल्याकडे लोकशाही आहे असं आपण म्हणतो. या लोकशाहीच्या काळात, बी. कॉमच्या परीक्षेत कॉपी करताना पकडला गेलेला मनुष्य जर मुख्यमंत्री झाला आणि तो आपल्या केबिनमध्ये येतो आहे म्हटलं तर आमच्या विद्यापीठांचे

अंगारमळा । ११३