पान:अंगारमळा (Angarmala).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून कधी पाहिलं नसतं' असं म्हणणारी शेतकरी भावांची अनेक पत्रे माझ्याकडे आहेत.

 मला सार्थकतेचा आणखी एक अनुभव इथे आल्यानंतर मिळाला. रा.रं. बोराडे म्हणाले, "साहित्यिक मंडळी सहजासहजी अशी एक मंचावर जमा होत नाहीत. त्यांना बोलावणं पाठवावं लागतं, त्यांची मिनतवारी करावी लागते. हा येणार आहे का, तो येणार नाही ना असा थोडा पडताळा केला जातो. आणि यायचं मान्य केलं तरी शेवटी व्यवहाराचा भाग असतोच. येण्याजाण्याच्या खर्चाचं काय? तिथे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय कशी होणार अशी चौकशी केली जाते."

 इतर साहित्य संमेलनात अशी व्यवस्था, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या संमेलनात असू शकत नाही. पण, बोराडेंनी पुढे आणखी एक वाक्य वापरलं, "शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानं संमेलन आयोजित केलं आहे आणि शरद जोशी दोन्ही दिवस ऐकायला बसणार आहेत हे समजल्यावर आम्ही ताबडतोब यायचं ठरवलं; कोणी प्रवास खर्चाचा विषय काढला नाही, ना सोयीसुविधांचा." माझ्या सार्थकतेच्या कलमात एक कलम वाढवायला हरकत नाही. धन्य झालो.

 शेषराव मोहिते, रघुनाथदादा पाटील हे शेतकरी संघटनेचे मोठे उत्साही कार्यकर्ते आहेत. त्यांना असं वाटत की ज्यांची ज्यांची गावाबद्दल निखळ स्वच्छ भावना आहे त्यांनी त्यांनी सगळ्यांनी एकजुटीनं चालावं म्हणजे आपण हा जो यज्ञ आरंभला आहे- शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी- त्याची सांगता लवकर करता येईल आणि उत्साहाच्या भरात त्यांनी ते बोलून दाखवलं; पण त्यामुळं या साहित्य संमेलनातील परिसंवादाला एक वेगळंच स्वरूप आलं. आमची घोडी थकली आहेत तेव्हा साहित्याच्या चळवळीचं घोडं शेतकरी चळवळीच्या रथाला जोडून तो थोडा वेगाने चालता करावा अशी शेतकरी संघटनेची इच्छाविनंती पुढे मांडण्यासाठी हे साहित्य संमेलन भरवलं असावं असा समज होऊन थोडी चकमक उडाली.

 या संमेलनात एका परिसंवादाचा विषय 'उदारीकरण आणि शेतकरी' असा होता, तो केवळ तसा न ठेवता, 'उदारीकरण आणि शेतकरी व साहित्यिक' असा ठेवला असता तर या संमेलनाच्या चौकटीत चपखल बसला असताच, शिवाय वरील चकमकीत आनंद यादवांना जो मुद्दा मांडावा लागला- व्यक्तिमत्वाचा, साहित्यिकांच्या व्यक्तिमत्वाचा, कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा- ते करण्याची गरज उरली नसती. कारण हा व्यक्तिमत्वाचा मुद्दाच गृहीत धरून सारी शेतकरी चळवळ चालली आहे, आर्थिक उदारीकरणाची चळवळ चालली आहे. साहित्यिक तेवढेच काय ते स्वत:च्या वक्तिमत्वाला जोपासणारे असं

अंगारमळा । ११२