पान:अंगारमळा (Angarmala).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक


 शेतकरी कुटुंबाची ही बैठक आहे. एका बाजूला, कालिदासाच्या शब्दांत सांगायचं झालं तर,

निसर्गभिन्नस्पदमेकसंस्थम्
अस्मिन् द्वयम् श्रीश्च सरस्वती च ॥

 म्हणजे, ज्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे आणि श्री काही फारशी अप्रसन्न नाही अशी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला, लक्ष्मी आणि सरस्वती दोघींपासून फारकत झालेली मंडळी अशी ही एका कुटुंबातली माणसं जमली आहेत. मला जेव्हा या साहित्य संमेलनाचं निमंत्रण मिळालं तेव्हा मी फारसा काही उत्साही नव्हतो हे खरं, पण मी 'हो' म्हणालो त्याचा आज अत्यंत आनंद होतो आहे. गेली वीस वर्षे अनेक सभा केल्या. पण, तिथं पाहोचलो की कार्यकर्त्यांनी पटकन मंचावर घेऊन जायचं, बोलत्या वक्त्याला बाजूला सारून मला बोलायला उभं करायचं आणि भाषण संपलं की पुढच्या सभेची वेळ झाली म्हणून धावत पळत निघून जायचं. गेले दोन दिवस, मधे एक लहानसा प्रश्न विचारला ते सोडलं तर नुसता ऐकण्याचा आनंद घेत होतो. दोन दिवस फार आनंदात गेले याबद्दल तुम्हा सर्व साहित्यिकांना आणि संमेलनाच्या संयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो.

 दोनच दिवसांपूर्वी आंबेठाणला काही मंडळी जमली होती. सध्या आमच्या आंदोलनाचे काही फारसे चांगले दिवस नाहीत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यावेळी चर्चा निघाली की गेली २० वर्षे आपण जी काही धावपळ केली, लोकांच्या म्हणण्यानुसार, संसार उजाड करून टाकले त्याचे शेवटी काही सार्थक झाले का? हाती काही लागलं का? तेव्हा कुणीतरी म्हणाले, "नाही कसं म्हणता? शेतीमालाच्या भावाचा तुमचा सिद्धांत जगन्मान्य झाला आहे; वीस वर्षापूर्वी वि.म. दांडेकरांसारखे अर्थशास्त्रज्ञसुद्धा तो मानत नव्हते. देशात डंकेल प्रस्तावाबद्दल चर्चा चालली होती तेव्हा हिंदुस्थानातले सगळे अर्थशास्त्रज्ञ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटना अशी कुस्ती झाली आणि आपण त्यात जिंकलो. शेतकरी महिला आघाडीच्या 'लक्ष्मीमुक्ती' कार्यक्रमाने १८ महिन्यात २ लाखांच्यावर महिलांच्या नावाने जमिनी झाल्या." खरं आहे. शेतकरी संघटनेचे महिला अधिवेशन झाले नसते आणि शेतकरी महिला आघाडी तयार झाली नसती तर आम्ही आमच्या लक्ष्मीकडे कायमचं जनावर म्हणून पाहिलं असतं, माणूस

अंगारमळा । १११