सांगितले. 'शेतकऱ्यांचा मेळावा आहे' आमच्या पाहुण्यांची यादी आम्ही ठरवणार, एका पाहुण्याने दुसऱ्याचा दुस्वास करणे शिष्टाचारास सोडून आहे, वगैरे पुष्कळ समजूत घालण्याचे प्रयत्न झाले; पण शेवटी शिवसेनेशिवायच मेळावा घ्यायचे ठरले.
त्यावेळी अनिल गोटे संघटनेत होते. महिन्यापेक्षा जास्त काळ मुंबईत गोटे आणि त्यांचे सहकारी संघटनेच्या रीतीप्रमाणे अपार कष्ट करीत मेळाव्याचे काम करीत होते. भिंती रंगवण्याचे काम करणारी त्यांची टोळी एकवेळ जेवण, चहानाश्ता आणि हातामध्ये रंगाचे ब्रश, पांढरा रंग आणि जुने इंजिन ऑइल दिले, की काम करत राही. डॉक्टर सामंतांचे आणि गोटेंचे एकदम जमले. शिवाजी पार्कच्या मैदानावर स्टेज उभारायचे आणि लाऊड स्पीकरचे काम कामगार आघाडीच्या कुणी चारपाच लाख किंवा अशाच काही रकमेला ठरवले होते. गोटेंनी तीस हजारात हे काम करायचा प्रस्ताव आणला, तेव्हा डॉक्टरसाहेब त्यांच्या सहकाऱ्यांवर एकदम घसरले. डॉक्टरसाहेबांना राग आला म्हणजे त्यांच्या तोंडी शिव्यांच्या फैरीच्या फैरीची खैरात चाले. "एवढे समोरा समोर xxxxx मला गंडवता? या गोटेमुळे समजले. गेली इतकी वर्षे तुम्ही कितीला लुटले कुणास ठाऊक?" डॉक्टर सामंतांचा अनिल गोटेंवर मोठा लोभ जडला. "एवढा तुमचा कार्यकर्ता आम्हाला देऊन टाका" असा त्यांचा आग्रह कायम असे. माझ्याशी भेटणे, बोलणे त्यांना अवघड वाटे. गोटेंचे त्यांचे चांगले जमे. एका कोणा कामगार नेत्याने काहीतरी सूचना आणली आणि वर पुरवणी जोडली, "शरद जोशींच्या लक्षातसुद्धा यायचे नाही, तो आपला साधा सरळ माणूस !" डॉक्टर कडाडले, "तुम्हाला काही अकला आहेत का रे? गोटेसारखी माणसं जो जवळ बाळगतो तो काय असला साधा माणूस असणार?" गुंडगिरीच्या मोजमापात माझा भाव फुकटम्फाकटच वधारून गेला.
गोटेंनी या वेळी मोठी शक्कल लढवली. महापौर छगन भुजबळ यांच्याशी सूत जमवलं. "मुंबई शहरात एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी पहिल्यांदा येणार, त्यांच्या स्वागताला जाण्याचा मान मुंबईच्या पहिल्या नागरिकाचा- महापौरांचा आहे. शिवाजी पार्कच्या मेळाव्याला पाठिंबा असो नसो, महापौराने आपले काम केलेच पाहिजे," असा त्याने युक्तिवाद केला. छगन भुजबळांना तो पटला. त्याही वेळी शिवसेनेत त्यांचा जीव घुसमटतच होता. या निमित्ताने फारसा धोका न घेता बंडाचे निशाण उभारता येईल यांची त्यांना जाणीव झाली असावी. त्यांनी यायचे कबूल केले. मोठ्या थाटात भगवा फेटा बांधून महापौराच्या झगमगाटात ते हजर झाले. शिवाजी पार्कच्या मैदानात शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा एका प्रचंड चबुतऱ्यावर उभा आहे. पुतळ्याला शोभेसा
अंगारमळा । १०१