पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
 

अनेक मासिकांनी, ती प्रथा उचलली. गंभीर विषयाला वाहिलेल्या नियतकालिकानाही लघुकथेखेरीज पूर्तता व समाधान वाढेना अशी स्थिती निर्माण केली ती करमणुकीनेच. प्रारंभी उपदेशपर व्याख्यान व शेवटी तात्पर्य देण्याची हरिभाऊंची पद्धत 'उलटीकडून सुरवात' या कथेत दिसते. नवकथेने हे दोन्ही गाळलेले आहे. 'गरीब बिचारी पार्वतीबाई' कर्ता माणूस कुटुंबाकडे दुर्लक्ष करून नाटकाच्या नादी लागल्यावर काय होते हे सांगणारी ही कथा हृदयद्रावक झाली आहे. दुःखान्तापेक्षा सुखान्त करण्याकडे त्यावेळच्या नाटकातील प्रघाताप्रमाणेच हरिभाऊंच्या कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. सुमारे २१ गोष्टी त्यांच्या स्फुट गोष्टींच्या संग्रहात आलेल्या आहेत. पण एकात्म एकसंघ परिणाम देण्याच्या दृष्टीने त्या कथा कमी पडतात. त्यात भावनेचे पसरलेल्या, विखरलेल्या सूर्यकिरणांप्रमाणे स्फुल्लिंग देण्याची ताकद नाही. 'दोन चित्रे' ही कथा अधीच विचित्र रंगविलेली आहे. १९१५ पूर्व लिहिलेल्या या गोष्टी म्हणजे हरिभाऊंचे स्फुट गोष्टींचे युग म्हणून संबोधिले जाते. वृत्तांतकथनपर, लघुकादंबरी सदृशवर उपदेशात्मक या कथा असत. स्फुट गोष्टी वाचकांच्या वाचनाच्या दृष्टीने विशेष सोयीच्या ठरल्या. त्यामुळे त्याची मागणी व पुरवठा वाढू लागला. या काळात प्रसिद्ध झालेल्या गोष्टींचे स्वतंत्र संग्रह झाले नाही, त्यामुळे त्या दुर्लभ मासिक पुस्तकातूनच शोधून अभ्यासाव्या लागतात. त्यातही लेखकांचे नामोल्लेख नसल्याने अनेक अनुल्लेखित राहतात. बंगाली, इंग्रजी कथेचा एक परिणामही या काळात कथांवर दिसतो. बी. सी. गुर्जरांच्या कथेवर हरिभाऊंचाच पगडा काही बाबतीत आढळतो. त्या वृत्तांत देणाऱ्या असून नीती-बोधापेक्षा मनोरंजनावर भर देणाऱ्या आहेत.

 'करमणूक' कालखंड म्हणजे मराठीतील स्वतंत्र कथा निर्मितीचा कालखंड म्हणता येईल पण असे असूनही इंदुमती शेवडे म्हणतात त्याप्रमाणे हरिभाऊंनी कथेची व्याख्या कुठेही दिलेली आढळत नाही. किंवा कथातंत्राचा जाणिवपूर्वक व मनःपूर्वक उपयोग केलेला दिसत नाही. (पान ३५) मात्र 'करमणूक' हे नाव म्हणजेच मराठी कथा विकासाचा आलेख हेही त्यांनी नमूद केलेले आहे. (पान २९) सदर बोधपर व करमणूक करणाऱ्या गोष्टी करमणूकमध्ये असतात. उदा० हरवलेली किल्ली ही गोष्ट विशेष गाजलेली आहे तर 'आगबोट बुडाली' या गोष्टीचे शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाने पठण केले पाहिजे असे सौ. काशीबाई कानेटकर यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

करमणूक : संकीर्ण लेखन-

 'करमणूक' मधून नाटके, ललितलेखन, किंवा चरित्र लेखन यापैक्षा संकीर्ण, अवांतर किंवा सामान्य ज्याला म्हणता येईल असेचं लिखाण विपुल प्रमाणात झाले