पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक: वाङ्म़यीन अभ्यास
२७
 

आहे. त्याचे महत्त्वाचे कारण 'करमणूक'ची प्रकृती हेच आहे. करमणूकीच्या उद्दिष्टांतच संकीर्ण लेखन 'डायजेस्ट' सारखे बसते. मनाची करमणूक करण्याच्या उद्देशाने हे पत्र निघाले होते, या पत्राचा मुख्य हेतु प्रबोधनाचाच होता. सर्वांनी वाचावे असे पत्राचे स्वरूप असल्याने त्यात बाळबोधपणाही होता. तत्कालीन राजकीय, सामाजिक, औद्योगिक चळवळीचे चित्र अल्पांशाने चित्रित करण्याचा प्रयत्न हरिभाऊंनी केला होता. थोडी नाटके, ललित लेखन, काही कविता त्याचप्रमाणे बोधप्रद छोट्या पण चटकदार गोष्टी, स्त्री पुरुषांची चरित्रे अनेकविध शास्त्रांचे मनोवेधक ज्ञान, थोडक्यात गोड अशी निवडक माहिती, पोट धरधरून हसविणारे विनोदी चुटके-किस्से, संपादकांनी हे सारे मनःपूर्वक दिले. नुसती विषयाची जंत्री तपासली किंवा अनुक्रमाणिका पाहिली तरी त्याची कल्पना येऊ शकते. आर्यभूषण प्रेसमध्ये छापून प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांवरूनही याची कल्पना येते.

 उदा. घटकाभर करमणूक (संपा.ह.ना. आपटे इ.) करमणूक मधील ' सगुणाबाईची पत्रे नव-विवाहितांनी ध्यानी घ्यावीत अशी आहेत. स्त्रियांनी अवश्य वाचण्यासारखे विषय मोठया सभ्यतेने, भारदस्तपणे लिहिलेले आहेत. तशीच 'गोविंदरावांची आपल्या मुलास पत्रे' हे सदरही उद्ब़ोधक होते. लहान मुलास, रिझविणारी आणि उपदेश करणारी ही पत्रे होती. 'संदेश' कार अच्युतरावांच्या वत्सला वहिनीसारखी ती भाष्य करणारी किंवा फारशी चिकित्सकही नव्हती.

 परीक्षेचे महत्त्व, काय साधावयाचे, स्वभाव कसा असावा? याचे मार्गदर्शन गोविंदराव आपल्या बोधपर पत्रातून करीत असत. तर सगुणाबाईंची मुलीस पत्र अशीच उपदेशपर होती. त्यांचे विषय सासरच्या माणसांची बोलणी, सूनेची घरातील मंडळींशी वागणूक, संतोषी स्वभाव, माहेरचा ठोकळा, कुचरपणा, उधळमाधळ इत्यादी असत.

1चरित्रात्मक लेखन-

 चरित्रे अगदी प्रारंभापासून देण्याचा प्रघात या करमणूक पत्राने पाडला. 'रंकाचा राजा झाला'; अथवा 'प्रेसिडेंट गार्फील्डचे चरित्र' त्यांनी १ ल्या अंकापासून सुरू केले होते. या चरित्राचा प्रारंभ लक्षणीय आहे.

  “There's a good time coming, boys A good time coming.

 The pen shall supersede the sword And Right, not might, shall be the lord, In the good time coming worth, not Birth, shall rule mankind And be acknowledged stronger."