पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
करमणूक : वाङ्मयीन अभ्यास
२५
 

वातावरणाला दिलेले प्राधान्य, एकजिनसी संस्कार घडवील अशी 'काळ तर मोठा कठीण आला' यासारखी कथा त्यांनी लिहिली. ऐतिहासिक, रहस्यमय, रूपकात्मक अशी कथेची विविध दालने त्यांनीच वाचकांना पहिल्यांदा ओळखीची करून दिली. जीवन दर्शनाचा प्रयत्न घटनांचे वैशिष्ट्य, प्रसंगांना फुलविण्याची हातोटी या हरिभाऊंच्या जमेच्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी केवळ उद्ब़ोधनाचा हेतू जाणवत असूनही त्यावर कादंबरीप्रमाणेच कलावंत, कथाकाराने मात केली हेही लक्षात येते हरिभाऊंचे मोठेपण हे की त्यांनी कथेला परभृततेतुन मुक्त करून स्वतंत्र केले. त्यांचे हे ऋण मराठी कथेने सदोदित मानावे असे आहे.

 हरिभाऊंनी आपल्या लांबलचक शैलीत लिहिलेल्या या स्फुट गोष्टींचे एकूण ४ भाग आहेत. त्यातील पहिल्या दोन भागातच "स्फुट-कथा" आली आहे. हरिभाऊंची कथा आजच्यासारखी वाचनीय असण्यापेक्षा ती 'श्रवणीय' होती. कारण पाल्हाळ भरपूर असे. मात्र मराठी कथेला अद्भ़ुतरम्यता सोडून जीवनाभिमुखता हरिभाऊंनी प्राप्त करून दिली. त्यात सामाजिकता, नवा सुधारणावाद उमटला आहे.

 हरिभाऊंच्या विशेष लक्षणीय स्फुट कथा म्हणून 'कसे दिवस गेले', 'काळ तर मोठा कठिण आला', (सामाजिक दीर्घकथा), 'पाडव्याला भेट', 'थोड्या चुकीचा घोर परिणाम', 'उलटीकडून सुरवात', 'अपकाराची फेड उपकारांनीच' इत्यादी (वास्तववादी कथा) 'भूताटकीचे घर' (रहस्यकथा) तर. 'डिस्पेप्सिया', 'खाशी तोड', 'हरवलेली किल्ली' इत्यादी (विनोदी कथा). या कथांचा उल्लेख करावा लागतो. दुर्गाताईची ओवाळणी ही एक अशीच भगिनी प्रेमावरील अत्यंत हदयस्पर्शी कथा आहे. मात्र यातील पाडव्याला भेट, खरी की खोटी आणि दुर्गाताईची ओवाळणी या कथा-मासिक मनोरंजनातून प्रसिध्द झालेल्या आहेत.

 शिक्षण, मनोरंजन आणि विचारांना प्राधान्य देणान्या हरिभाऊंच्या वाङ्म़यीन व्यक्तिमत्त्वाने पुढील काळातील कथाकारांवर आपला ठसा ठामपणे उमटविला. अद्भ़ुताकडून-वास्तव चित्रणाला मराठी कथेला सामोरे जायला लावले. हरिभाऊंच्या साध्या, ओघवत्या, सुबोध शैलीमुळे त्यांची कथा स्त्रीयांनाही आवडू लागली. त्यांच्यातील गिरीजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के या लेखनप्रवृत्त झाल्या. नंतरचे सहकारी कृष्ण, ना.ह.आपटे यांनाही कथाकार म्हणून 'कथात्मकता' लाभली. 'करमणूक' पत्राच्या योजनेतच प्रत्येक अंकातून एक लहान गोष्ट देत जाण्याचा संकल्प हरिभाऊंनी केला होता. त्याप्रमाणे त्यांनी स्वत: व इतरांनी लिहिलेल्या अनेक स्फुट गोष्टी करमणूक मधून प्रसिद्ध झाल्या. लहान लहान गोष्टींचा पुरवठा नियमितपणे यावेळेपासून होऊ लागला आणि तो इतका मानवला की मनोरंजन, सरस्वती मंदिर, नवयुग, उद्यान, मकरंद, विद्या विनोद, अरविंद इत्यादी