पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असले धोरण राष्ट्रीय म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि भारतातील शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी इंडियाच्या स्वार्थाच्या नेहरू धोरणांबद्दल प्रेम का बाळगावे? परकीय तंत्रज्ञान आमच्याकडे सरळ येऊ द्या, वाटेत कोणी मध्यस्थ दलाल नकोत. शेतकऱ्यांचा बलुतेदारांचा संबंध तंत्रज्ञानाच्या मूळ उगमाशी येऊ द्या, शहरी विद्यापीठांच्या प्राध्यापकांच्या आणि कारखानदारांच्या ओंजळीतून नको. म्हणजे शेतकरी कष्टकरी त्यांच्या बुद्धीचे वैभव दाखवतील. जगालाही स्तिमित करणारे संशोधन करून दाखवतील. भारताचे तांत्रिक मागासलेपण दूर करण्याची शक्यता डंकेलने उपलब्ध करून दिली आहे. कोणी कितीही हंबरडा फोडो खुल्या व्यवस्थेचा सूर्य उगवणार आहे. खुल्या व्यवस्थेचे आव्हान पेलण्यास आम्ही लायक ठरलो तर धन्य होऊ आणि नालायक ठरलो तर वाईटात वाईट काय होईल? आम्ही ज्यांचे गुलाम, ते ज्यांचे गुलाम त्यांचे आम्ही परस्पर गुलाम होऊ, एवढेच ना? आज गुलामांचे गुलाम आहोत. उद्या सीधेसाधे गुलाम होऊ. एवढी बढती तर शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे.

 डंकेलविरोधी आघाडीने एक नवा बेत जाहीर केला आहे. सध्याच्या शासनाने डंकेल प्रस्ताव मान्य केला असला तरी इतर पक्षांचा त्याला विरोध आहे. हे सध्याचे सरकार बदलून त्या जागी विरोधी पक्षांपैकी कोणीही सत्तेवर आले तर डंकेल प्रस्तावाबद्दल फेरविचार करण्यात येईल अशी घोषणा सर्व विरोधी पक्षांतर्फे करवण्याचा प्रयत्न चालू आहे. विरोधी पक्षांचा करंटेपणा या थरापर्यंत जाणार नाही एवढी आशा करू या.

 नेहरू 'इंडियाचे' तर डंकेल 'भारता'चा आहे. नेहरूंपेक्षा डंकेल जास्त राष्ट्रीय आहे. सार्वभौमत्वाचा उदो उदो करायचा आणि परकियांसमोर भिकेची कटोरी पसरायची, त्यांच्या औदार्यावर जगायचे आणि त्यांच्याशीच उर्मटपणे वागायचे हे कसले नकली राष्ट्रीयत्व?


(६ जुलै १९९३)

♦♦

भारतासाठी । ८४