पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरे गणराज्य की यादवी? बाबर हिंदुस्थानात आला आणि पहिल्या लढाईत दहा बारा तोफांचे आवाज काढून त्याने विजय मिळवला, तेथपासून इतिहासाचा एक नवा कालखंड सुरू झाला. योगायोग असा की, त्याच बाबराच्या नावाने उभी असलेली मशीद पडली आणि त्याबरोबरच आणखी एक कालखंड संपला आणि दुसरा नवा सुरू झाला.
 हा जो कालखंड संपला तो बाबराचा नव्हता. बाबराने सुरू केलेला कालखंड मुसलमानी बादशहीबरोबर केव्हाच संपला. त्यानंतर एक अंदाधुंदीचा कालखंड येऊन गेला. त्यानंतर इंग्रजी साम्राज्याचा आला. या साम्राज्याला विरोध करण्याठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभे राहिले, तो एक वेगळा गांधी कालखंड आणि स्वातंत्र्यानंतर गेली ४६ वर्षे चालू होता नेहरू कालखंड.
 बाबरी मशिदीबरोबर संपला तो नेहरू कालखंड. सुरू होतो तो कालखंड कुणाचा? देशातील जनतेचे दुर्भाग्य संपले असेल तर 'बळीचे राज्य' येईल आणि बळीराजाचा कालखंड चालू होईल; दुर्भाग्याचा फेरा संपला नसेल तर उभ्या देशात यादवी युद्ध माजेल आणि काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये जशी स्थिती होती तशीच साऱ्या देशभर होण्याचा धोका आहे.
 बाबरी मशिदीच्या पतनाचा एक मोठा व्यापक अर्थ आहे. तो अर्थ बहुतेकांना अजून स्पष्ट झालेला नाही. बाबरी मशिदीचा वाद म्हणजे शासन करीत असलेल्या मुसलमानांच्या अनुनयाविरुद्धची सर्वसामान्य हिंदू प्रतिक्रिया आहे असे म्हणणे अर्ध्यापेक्षाही कमी सत्य आहे. हिंदू-मुसलमानांमधील तेढ महात्मा गांधीचे रक्त वाहिले त्यामुळे थोडी शमल्यासारखी दिसली. आता हा वणवा पुन्हा एकदा पेटला आहे असा सध्याच्या घटनांचा अर्थ लावणे हे तर चतकोरसुद्धा सत्य नाही.

 बाबरी मशीद पडणे, त्यानंतर देशभर दंगली उसळणे, पाच जातीय संघटनांवर

भारतासाठी । ६७