पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या स्वदेशी'चे बोलविते धनी
 या आंदोलनाचा बोलविता धनी कोण आहे हेही उघड आहे. स्वातंत्र्यापासूनच्या अर्धशतकात लायसन्स-परमिटचे डावपेच खेळून मक्तेदारी मिळविलेले कारखानदार हे या आंदोलनाचे सूत्रधार आहेत. यांनी तंत्रज्ञान आयात केले ते त्यावेळीही कालबाह्य झालेले. यंत्रसामुग्री आणली आडगिहाईकी. मालाचे नकाशे परदेशी, जुनाट. कारखान्यात काम करणारे अधिकारी काळ्या इंग्रजाच्या पिंडाचे, परभृत बुद्धीचे. त्यांचे कामगार इतके गदळ की त्यांच्या माफक रोजगारीतही महाग पडावेत. यांचा माल घेणार कोण? एतद्देशीय गिहाईकांना बिचाऱ्यांना काही पर्यायच नाही म्हणून त्यांचा माल खरीदावा लागतो. या काळ्या इंग्रजाला स्वदेशीच्या संरक्षणाची पहिल्यापासूनच गरज होती. नेहरू कालखंडात लायसन्सपरमिट पद्धतीमुळे त्यांना संरक्षण मिळाले. ती व्यवस्था कोसळल्यानंतर आता त्यांना काही नव्या सोंगाची गरज आहे. म्हणून शास्त्रविज्ञानाचा उद्घोष करणारे हे कारखानदार आता स्वदेशीची चाल खेळू लागले आहेत.
 हा सगळा प्रकार भयानक नसता तर चेष्टेचा विषय झाला असता. स्वदेशीचा कालखंड संपला. इम्पोर्टेड आणि देशीच्या जमान्यात स्वदेशी चळवळीत अर्थ असता तरी व्यवहार्यता नाही. आणि प्रत्यक्षात देशातील बहुसंख्य कष्टकरीशेतकऱ्यांच्या व्यापारावरील सर्व निर्बंध उठविण्यात पहाट आहे आणि तरीही नाकाला तिसऱ्यांदा घाण लावून घेण्याकरिता हिंदुत्ववादी सरसावले आहेत.
 त्यांच्या आंदोलनात अर्थ नाही, स्वार्थ नाही आणि स्वाभिमान किंवा निष्ठाही नाही. आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रांतील शतकाशतकांची परभृतता एकदाची संपवून टाकून स्वयंभू समाज उभा राहावा अशी यांची दृष्टी नाही. परकियांच्या विज्ञानावर, प्रतिभेवर देशी बाजारपेठेत अंमल बसविण्याची यांची क्षुद्र महत्त्वाकांक्षा आहे. यांना परदेशी माल नको, पण परदेशी तंत्रज्ञान आणि विज्ञान मात्र आयते. वाढन समोर येणे आपला हक्क आहे असे ते मानतात. बौद्धिक मालमत्तेच्या हक्कासंबंधी या 'स्वदेशी' मंडळींची जी भूमिका आहे ती पाहिली म्हणजे त्यांचे ढोंग स्पष्ट होते.
 (अपूर्ण)

(६ ऑगस्ट १९९२)

♦♦

भारतासाठी।६६