पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/256

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुकानाचे दार फुटल्यानंतर लुटालूट करणारे हे कसले लोक? या प्रश्नांची उत्तरे फ्लोराफाऊंटनच्या आसपास असेपर्यंत मला मिळाली नव्हती.

 मग एकदम कोठून विधानसभेतून भाई एस. एम. जोशी बाहेर आले. एवढासा किरकोळ शरीरयष्टीचा माणूस, पण सगळ्या जनसमूहाचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याने हात वर केला आणि जादूची कांडी फिरावी तसे सर्वत्र शांत शांत झाले. त्यांनी खूण केली पुढे चला आणि सारे लोक त्यांच्या मागे चालू लागले. मुरलीवाल्याने मुरली वाजवताच सारे उंदीर त्याच्या मागून चालू लागावे तसा हा प्रकार. काळे उंदीर, गोरे उंदीर, छोटे उंदीर, मोठे उंदीर, धोपटमार्गी उंदीर, लुटलेले सामान कोठेतरी तात्पुरते ठेवण्याची व्यवस्था करून आपण जणू त्या गावचेच नाही असा आव आणून चालणारे गुंड उंदीर. सारे एस. एम. जोशींच्या मागोमाग दोनतीन मैल चालत चौपाटीवर पोचले. तेथे एक जुजबी, पण मोठे व्यासपीठ आम्ही पोचेपर्यंत तयार झालेले होते.

 अर्ध्याएक तासातच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची सर्व नामांकित नेते मंडळी मंचावर जमू लागली. चौपाटीची सारी वाळू तुडूंब जनसमुदायाने भरली होती. फ्लोरा फाऊंटनच्या गोळीबारात प्रत्यक्ष हुतात्मे किती झाले याचा प्रत्यक्ष कोणालाच अंदाज नव्हता. कोणी म्हणे दहा तर गेलेच, दुसरा म्हणे दहावीस मुडदे तर मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. प्रत्यक्षातल्या आकड्याइतकी मजल कोणाच्या कल्पनेतील जात नव्हती; पण मृतांचा आणि जखमींचा नक्की आकडा माहीत नसताना काहीतरी लोकविलक्षण रौद्र घडून गेले आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत या सामूहिक जाणीवेनेच सर्वांच्या मनावर नकळत एक शिस्तीचे बंधन आले होते. धांगडधिंगा घातल्यावर वर्गात साळसूदपणे बसणाऱ्या उनाड पोरांचा नाटकीपणा त्यात काही असणार. आपल्या हातून जे काही झाले त्याच्या शोधात पोलिस आपल्यावर नजर ठेवून असणार असा धास्तीचा काही जणांच्या पोटात गोळा उठला असणार. आता घरी कसे सुखरूप पोचतो याचीही चिंता धोपटमार्ग्यांना तरी तोंड उघडू देत नसणार. लाखो माणसे, हजारो कारणे; पण, सगळी लष्कराच्या कवायतीत असल्यासारखी कडक शिस्तीत बसली होती. अंगावरचे कपडे पांढरपेशे अथवा गिरणी कामगारांचे मळके आणि फाटके. लष्करी खादीचे गणवेश असते तर शिस्तीत तरी लवमात्र न्यून कोठे दिसले नसते.

 दोन तासांपूर्वी फ्लोरा फाऊंटनच्या रणमैदानावर सुसज्ज पोलिसांच्या तुकड्यांशी गनिमी काव्याने झुंज घेऊन मुरारजींच्या फौजांना हैराण करणारा हा जमाव आता कसा शहाण्या मुलासारखा शांत शिस्तीने बसला होता!

भारतासाठी । २५६