पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/255

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कसे?

 मी विद्यार्थी. जगाच्या इतिहासात झालेल्या काही नामांकित लढाया, त्यातील सेनापतींच्या व्यूहरचना, वेगवेगळ्या चाली, पुष्कळशा चुका, सर्वसाधारण जवानांचे बेछूट हौतात्म्य यांविषयी बरेच पुस्तकी वाचले होते; पण, अश्रुधूर सुटल्याचे आवाज येऊ लागले की पटकन पाणी आणण्याची बुद्धी झालेले हे कोण महाभाग?

 समूहाची मर्दुमकी

 फ्लोरा फाऊंटनला जमलेल्या लाखांच्या गर्दीत सारेच काही पांढरपेशे - धोपटमार्गाने चालणारे पांढरपेशे नव्हते. असले भद्र लोक कितीही चिडले तरी हातात दगड प्रत्यक्ष उचलून घेत नाहीत; दगड उचलावा, फेकावा अशी मनात प्रबळ ऊर्मी होते, पण गरीबांच्या मनोरथाप्रमाणे थोड्याच वेळात त्या ऊर्मी शमून जातात. उत्पयन्ते विलियन्ते दरिद्राणाम् मनोरथाः।

 आम्ही सारे धोपटमार्गी. पोटात थोडी भीती घेऊन पुढे काय होते ते जाणण्याच्या औत्सुक्यापोटी जागीच उभे होतो. काही अधिक हुशार धोपटमार्गी पाय काढता घेऊन पसार झाले होते.

 मग, पोलिसांच्या दिशेने हा दगडांचा वर्षाव कोण करत होते? पोलिसांच्या अश्रुधुराला तोंड देण्यासाठी चेहऱ्यावर ओली फडकी गुंडाळून घेऊन अश्रुधूराची नळकांडी उचलताना हात पोळत असताना पोलिसांकडे कोण भिरकावून देत होते? नंतर, गोळीबार सुरू झाल्यावरदेखील शंभरावर माणसे न हलता थांबली, हुतात्मा झाली, त्यांना हे धैर्य कोठून आले? हे कोण होते? यांची पार्श्वभूमी काय, यांचे बालपण कसे गेले, चरितार्थाचे साधन काय, कुटुंबाची परिस्थिती काय? आम्हा धोपटमार्ग्यांच्या विचारातही न येणाऱ्या गोष्टी यांच्या हातून कशा घडत होत्या?

 मग दुकाने फुटू लागली, खुलेआम दिवसाढवळ्या दुकानातल्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या चैनीच्या आकर्षक वस्तू घेऊन तुमच्या माझ्यासारखेच - कदाचित थोडे जास्त फाटके आणि मळके कपडे घातलेले लोक भराभर दुकानातून सामान उचलून पटापट गल्लीबोळात नाहीसे होत होते.

 धोपटमार्गी काही सारेच सच्छील असतात असे नाही; लपून छपून, पकडले जाण्याचा धोका फारसा नसेल तर लभ्यांश साधून घेण्याइतकी बहादुरी आम्हीही करतो. परंतु, लोक सैरावैरा धावताहेत, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज सर्वत्र भरून राहिले आहेत, मधूनच कोणाची किंकाळी ऐकू येत आहे अशा धांदलीत दगड उचलून दुकानाच्या काचेच्या तावदानावर नेमका कसा मारला जातो आणि

भारतासाठी । २५५