पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/257

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मंचावर अनेक वक्ते बोलले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची यथासांग मांडणी झाली. मराठी महाराष्ट्रद्रोही नेते आणि बिगरमराठी मराठ्यांचे शत्रू यांच्यावर भरपूर तोंडसुख घेतले गेले. आचार्य अत्र्यांनी अशा भयरुद्र मानसिकतेतल्या जमावालाही धो धो हसवले; शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साग्रसंगीत शिमगा झाला. लोकांच्या उत्साहाला उधाण फुटले होते.

 हे काय घडते आहे हे बहुतेकांना उमजत नव्हते; मलाही नाही. अर्वाचीन इतिहासाचे उदंड व्यासंगी आणि कामगारांचे झुंजार नेते भाई श्रीपाद अमृत डांगे बोलायला उभे राहिले. त्यांना आमच्या मनातली प्रश्नचिन्हे जाणवली असावीत. भाषणाच्या ओघात त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. 'क्रांतीकाळात उभी राहणारी शक्ती सर्वक्षम असते, ती कधी रौद्र होऊ शकते, कधी शांत, कधी प्रचंड करुणामयी. मराठी माणसांच्या मनातील आकांताने फ्लोरा फाऊंटनच्या मैदानावर दाखवली ती क्रांतीकारी बेशिस्त. चौपाटीच्या या प्रचंड मैदानावर टाचणी पडली तरी ऐकू येईल अशा शांतपणे बसलेली ही माणसे ही क्रांतीच्या उद्रेकातील क्रांतीकारी शिस्त आहे.'

 वाक्य मोठे जबरदस्त, त्यातली काव्यशक्ती, लय आणि ठेका असा की तो भेदून अर्थाच्या गाभ्याला हात घालण्याची इच्छासुद्धा होऊ नये.

 अश्रुधुराची चाहूल लागताच पाणी जमा करणारे कोण, दगडफेक करणारे कोण, मरणाला सामोरे जाणारे कोण आणि दुकानांची तावदाने फोडून माल बिनधास्तपणे पळवणारे कोण? या प्रश्नांचा काही उलगडा झाला नाही.  या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सगळ्या नोकरमान्या आयुष्यात शीतपेटीतच थंड राहिला.

 नव्या पाटीवर तोच प्रश्न

 परदेशातून परत आलो, शेतकरी बनलो, क्षणाक्षणाने आणि कणाकणाने गरीबीत पाय खचू लागल्यावर शेतकऱ्यांच्या मनात तयार होणारी वेदना अनुभवली आणि नकळत मी धोपटमार्गी अनिश्चितकालीन उपोषणाच्या, त्यावेळी तरी निश्चित वाटणाऱ्या, मृत्यूला सामोरा गेलो.

 चाकणच्या कांदा आंदोलनाच्या काळात एक गोष्ट शिकलो. 'परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम्' उभी राहणारी विश्वशक्ती कणमात्राने का होईना एका हाडामांसाच्या प्राण्यात प्रगट झाली की आजूबाजूच्या जनसमुदायात एक मोठा मानसिक बदल घडून येतो. आपला संसार, दररोजच्या काळज्या, संध्याकाळच्या

भारतासाठी । २५७