पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/208

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



'स्वदेशीवाद' म्हणतो.
 लोकांनी आपणहून ठरवलं की, परदेशी माल वापरायचा म्हणून नाही, तर त्याबद्दल वाद होण्याचे काही कारणच नाही. ती उत्तमच गोष्ट आहे, अनेक देशातील लोक तसं वागतातही. इंग्लंडमध्ये मोटार गाड्यांच्या बंपर्सवर लिहिलेलं आढळतं 'Be British, Buy British' तसं, भारतातील लोकांनी 'भारतीयत्वाचा अभिमान ठेवा आणि भारतीय वस्तूच खरीदा.' अशी शिक्षणाची आणि प्रचाराची आघाडी उघडली तर त्याबद्दल वाद घालण्याचा प्रश्न येणार नाही. कायद्याने, सक्तीने किंवा आर्थिक हत्यारे वापरून जेव्हा परदेशी आयात थोपविण्याची कार्यवाही मागितली जाते तेव्हा स्वदेशीच्या एका नवीन लढाईला सुरुवात होते.

 दुसरा गमतीचा भाग असा - जी पंडळी स्वदेशी पाहिजे किंवा खुलेपणा नको, जागतिकीकरण नको, खुली बाजारपेठे नको असं म्हणतात तीच मंडळी सत्तेवर आली की चोवीस तासांच्या आत म्हणजे एकाच रात्रीनंतर त्यांचे विचार पालटतात. ही काय गंमत आहे? पहिला अनुभव आला देवेगौडांचा. त्यांच्याशी मी बोललो होतो. त्यांनी फार कडक शब्दात माझ्या, खुल्या बाजारपेठेच्या विचारांवर टीका केली होती; खुल्या व्यवस्थेत शेतकऱ्यांचं फार प्रचंड नुकसान होणार आहे असं ते त्यावेळी म्हणाले होते. आमच्या वादाचा काही निकाल नाही लागला; पण नंतर, देवेगौडा कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले आणि दुसरे दिवशी पहाटे त्यांनी लगेच खुल्या व्यवस्थेच्या फायद्यांबद्दल बोलायला सुरुवात केली. सगळे डावे पक्ष स्वदेशीच्या पुरस्कार करतात. स्वदेशीच्या मंचावर कधी न घडलेली एकी घडून येते. या मंचावर भारतीय जनता पार्टीच्या 'स्वदेशी जागरण मंच'चे लोक सापडतात, डाव्या चळवळीचेही लोक सापडतात, डाव्या चळवळीचेही लोक सापडतात आणि गांधीवादी सर्व सेवा संघाचेही लोक सापडतात; त्याचबरोबर ज्यांना दुसरं काही काम नाही असे 'हौसे नवशे गवशे' लोकही तिथं सापडतात; पण डाव्यांचा जागतिकीकरणाला किंवा खुलीकरणाला विरोध तसा नवीन आहे. जेव्हा समाजवादी रशिया जिवंत होता तेव्हा ही सर्व मंडळी 'राष्ट्र' या कल्पनेची चेष्टा करीत असत; एवढंच नव्हे तर कामगारांची आंतरराष्ट्रीय सत्ता तयार व्हावी अशी मुख्यतः त्यांची मांडणी असे. समाजवादी रशियाचा डोलारा कोसळला आणि आपल्याकडील डाव्यांच्या मनात लगेच परिवर्तन झाले आणि त्यांनी '(समाजवादी) आंतरराष्ट्रीय वाद' तात्काळ सोडून दिला; ते एकदम निष्ठावान राष्ट्रवादी बनले; 'आंतरराष्ट्रीयवाद किंवा खुलेपणा म्हणजे भांडवलदारी कारस्थान' असे घोकू लागले.

भारतासाठी । २०८