Jump to content

परिचय/दोन शब्द

विकिस्रोत कडून


दोन शब्द


 'अभयारण्य' आणि 'अन्वय' ह्या दोन पुस्तकांच्या नंतर 'परिचय' हे तिसरे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला समाधान वाटते.
 प्रस्तुत पुस्तक हा संशोधनात्मक ग्रंथांचा 'परिचय' करून देणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. परिचय हा शब्द गुरुवर्य कुरुंदकरांनीच वापरलेला असल्यामुळे तोच शब्द ग्रंथनाम म्हणून आम्ही निश्चित केला.
 लेखांचा क्रम ठरवताना मात्र लेखांचा प्रकाशनकाल डोळ्यांसमोर ठेवलेला नाही. प्रा. दि. वि. काळे ह्यांच्या ग्रंथाचा परिचय करून देणारा लेख. सगळयात जुना आहे. कुरुंदकर गुरुजी प्राध्यापक झालेले नव्हते, प्रतिभा निकेतन विद्यालयात ते इतिहास विषय शिकवत असत, त्या वेळचा तो आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज' ह्या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.'श्रीमान योगी'ची प्रस्तावना, अमरावती येथील व्याख्यानाचे पुस्तक ही त्याची उदाहरणे होत. श्री. काळे ह्यांच्या ग्रंथावरील परीक्षण दुर्मीळ होते. ते आता वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाल ह्याकडे पाहण्याचा गुरुजींचा दृष्टिकोण समजून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांची सोय झाली. असे आम्हाला वाटते.
 अतिप्राचीन वेदपूर्व युगापासून तो १८५७ पर्यंतच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या अगर मूलगामी संशोधन करणाऱ्या ग्रंथांचा हा परिचय आहे. म्हणून लेखांचा कालानुक्रम ठरवताना सांस्कृतिक कालखंड डोळ्यांसमोर ठेवले आहेत.
 प्रस्तुत पुस्तकातील 'महानुभाव संशोधन' हा लेख मात्र स्वतंत्र आहे. तो एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देणारा लेख नव्हे. 'सोनाली' मासिकाच्या दिवाळी अंकात तो ह्यापूर्वी प्रसिद्ध झाला होता. संत वाङमय आणि महानुभाव वाङमयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी ह्या दृष्टीने तो लेख ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
 ह्यातील काही लेख परिचयात्मक म्हणून विविध नियतकालिकांत ह्यापूर्वीच येऊन गेलेले आहेत. तर काही लेख प्रस्तावनांच्या स्वरूपाचे आहेत.
 लेखांची निवड आणि वर्गवारी करण्याची जबाबदारी मी स्वत: आणि गुरुवर्य वाडीकरांनी उचलली. लेखांचे पुनर्वाचन मालतीबाई किर्लोस्कर आणि यदुनाथजी थत्ते ह्यांनी केले. ह्या पुस्तकातील लेखांची सर्व कात्रणे गुरुजींच्या घरी उपलब्ध झाली. ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची संमती श्रीमती प्रभावती कुरुंदकरांनी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
 कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्थेचे हे तिसरे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मधे वर्ष-सव्वावर्षाचा काळ उलटून गेला. त्यामुळे 'नरहर कुरुंदकर प्रकाशन संस्थे ' च्या सभासदांकडून पुढील पुस्तकाची वारंवार विचारणा होऊ लागली. १९८४ साली अस्तित्वात आलेल्या ह्या संस्थेने पाच वर्षांत पाच पुस्तके देण्याचे मान्य केले होते. तो संकल्प आम्ही आज इंद्रायणी साहित्य प्रकाशनाचे सहकार्याने एकदम तीन पुस्तके प्रसिद्ध करून तीन वर्षांच्या आतच पुरा करीत आहोत ह्याचे आम्हाला समाधान आहे.
 कागद आणि छपाई ह्याचे दिवसेंदिवस वाढत जाणारे दर समितीने गृहीत धरले होतेच, पण हे दर आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक वाढले. सभासदांना पाच पुस्तके द्यावीत ह्या वचनाला आम्ही बांधले गेलो होतो. अशा वेळी माझे मित्र इंद्रायणी साहित्याचे प्रकाशक श्री. श्याम कोपर्डेकर मदतीला धावून आले नसते तर हा संकल्प पूर्ण करणे आम्हाला केवळ अशक्य होते. नरहर कुरुंदकर साहित्य प्रकाशन संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
 ह्यानंतरही कुरुंदकर गुरुजींची चार-पाच पुस्तके निघतील एवढे त्यांचे असंग्रहित लेखन उपलब्ध झाले आहे. संस्थेने स्वत: पुस्तके प्रसिद्ध करावयाचे थांबवले असले तरी ह्यापुढे पुस्तके प्रसिद्ध होतील. ती जबाबदारी इंद्रायणी साहित्याने स्वीकारली आहे. म्हणून समितीने ह्यापुढील लेखांच्या पुस्तकरूपाने प्रकाशनाची जबाबदारी श्री. श्याम कोपर्डेकर ह्यांच्यावर सोपवली आहे.

 पुस्तक अल्पावधीत छापण्याची जबाबदारी स्मिता प्रिंटर्सचे मालक श्री. प्रमोद बापट आणि त्यांचा सेवकवर्ग ह्यांनी पार पाडली. सुबक असे मुखपृष्ठ श्री. रविमुकुल ह्यांनी दिले त्याबद्दल ह्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.


दत्ता भगत

नरहर कुरुंदकरांची साहित्य संपदा

रूपवेध
मागोवा
जागर
शिवरात्र
पायवाट
धार आणि काठ
वाटा माझ्या तुझ्या
छाया प्रकाश
यात्रा
ओळख
भजन
मनुस्मृती : एक विचार
अभयारण्य
आकलन
अन्वय
त्रिवेणी
हैद्राबाद : विमोचन आणि विसर्जन
परिचय
अभिवादन
वारसा