Jump to content

नासलेलें संत्रें (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> ठरलेलेंच ! आम्ही असेंच हाल हाल होऊन - तडफडून मरायचे ! - छान झालें ! असेंच पाहिजे ! काय जोरानें त्यानें मला भिरकावून दिलें पण ! रागानें लाल झाला होता ! - अहो बरोबरच आहे ! नासलेलीं संत्रीं ! चांगल्या संत्र्यांमध्यें पाहिजे आहेत कशाला ? त्यांना असेंच झुगारुन दिलें पाहिजे ! चांगली तुडवून - डोक्यांत व अंगांत खिळे ठोकून - जाळून पोळून मारलीं पाहिजेत ! नाही तर ? अहो ही जिवंत विचारांनीं सडून - भणाणून गेलेलीं संत्री ! - जुलमी जगाला गोड मानून त्यांत आंबून - कुजून मेलेल्या संत्र्यांना आपल्यासारखींच स्वतंत्र व ईश्वरी विचारांनीं जिवंत करुन - त्यांना नाचायला लावतील ! आणि मग ? जिकडे तिकडे प्रलय होईल ! जिवंत हदयांना पिळून काढून त्यावर मस्त होऊन बसलेलें हें जुलमी जग पार उलथून पडेल ! आणि सर्वत्र ईश्वरी साम्राज्य सुरु होईल ! - पाहिलेंत ? तीं मार्केटांत डौलानें बसलेली संत्रीं माझ्याकडे पाहून कशी हंसत आहेत ! - हंसा ! खुशाल हंसा ! - मी दुर्दैवी ? तें काय म्हणून ? आणी तुम्ही काय असे मोठे सुदैवी लागून गेलां आहांत ?अरे ! जगांत येऊन फार झालें तर सात नाहीं तर आठ जिवांना तुम्ही पोसाल ! पण मी येथें एकटा हजारों जिवांना पोशीत आहें ! तुम्ही जगाचे गुलाम ! तुमच्यासारखीं लक्षावधि संत्रीं जग तेव्हांच गट्ट करुन टाकील ! - छाती नाहीं ! माझ्याकडे आ वासण्याची जगाची छाती नाहीं ! माझा प्रत्येक दाणा ईश्वरी तेजानें वळवळणारा आहे ! तुमचे सगळे दाणे - सर्व विचार - एकसारखे येथून तेथून पार मेलेले ! - ' नासलेली संत्नीं ! ' थांबा ! आम्ही नासलेलीं संत्रींच जुलमी जगाच्या पोटांत शिरुन सर्व जग लवकरच पेटवून देऊं ! - चढवा ! प्रेमानें नासलेल्या भगवान् खाइस्टला एक - नाही पन्नास वेळां क्रूसावर चढवा ! तुमचीं बिंगें बाहेर फोडणार्‍या महाकवि डँटीला खुशाल हद्दपार करा ! वाटेल तसा सैतानी धिंगाणा घाला ! पण ध्यानांत ठेवा ! लवकरच सर्व जगाला स्वातंत्र्याची - प्रेमाची - आग ! आग लागेल !! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.