तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. - नाहीं, काल नाहीं, संध्याकाळीं आलों होतों तें परवा. आणि सकाळचे जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. - हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली ? सारख्या मोटारी अन् गाडया येताहेत ! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे ! - केव्हं ? आतां मघाशीं सहाच्या सुमारास ? - नाहीं बोवा, तुम्ही सांगेपर्यत वार्तासुद्धां नव्हती याची मला ! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जाता - येत नाहींत, येवढें ठाऊक होतें ! पण इतक्यांतच असें कांहीं होईलसें - बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा ! - साठ कां हो ! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या ! - असो. चला ! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली ! पेशवाईनंतर महाराष्ट्रांत इतक्या योग्यतेची मला नाहीं वाटत दुसरी कोणी असेलशी ! - खरें आहे. अगदी खरें आहे ! मनुष्य आपल्यामध्यें असतें, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते ! - स्वभावानें ना ? वा ! फारच छान ! अतिशय मनमिळाऊ आणि शांत ! कटकट म्हणून नाहीं ! - हळूहळू, थोडंथोडं, पण खरोखरच मोठं कार्य केलं ! अन् फारसा गाजावाजा न करतां ! - आधींच थोरामोठ्यांतली ती ! आणि रावसाहेबांचें वळण ! मग काय विचारतां ! - बोलणें काय, चालणें काय आणि - हो ! लिहिणेंसुद्धां - तेंच म्हणतों मी - कीं, ' आठवणी ' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत ! मराठींत असें पुस्तक नाहीं आहे ! - तें काय विचारायला नको ! आज गर्दी म्हणजे - सगळा गांव लोटायचा आतां ! - मोटारी अन् गाडयांचा चालला आहे धडाका ! - काय ! खूपच लोटली आहे हो ! दर्शनाकरतां दिवाणखान्यांतच ठेवलेलें दिसतें आहे त्यांना ? - चला, येत असलांत तर .... जाऊं म्हणतों ! इतकीं माणसें जात आहेत तेव्हां - हो गर्दी तर आहेच ! - राह्यलं, तब्येत बरोबर नसली तर नाहीं गेले ! मला तरी कुठें येवढें जावेंसे वाटतें म्हणा ! कारण आतां गेले काय, अन् न गेलें काय सारखेंच ! पण बोवा ' अमूक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला ' ! तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !....

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg