जन पळभर म्हणतील, हाय हाय

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' मी जातां राहील कार्य काय।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।

मेघ वर्षतील शेतें पिकतील। गर्वानें या नद्या वाहतील।। कुणा काळजी कीं न उमटतील। पुन्हा तटावर हेच पाय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।। उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।। कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।।

अशा जगास्तव काय कुढावें । मोहिं कुणाच्या कां गुंतावें।। हरिदूता कां विन्मुख व्हावें । कां जिरवुं नये शांतींत काय।।


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.