Jump to content

चित्रा नि चारू/चित्रेच्या वडिलांना वेड लागते

विकिस्रोत कडून
चि त्रा च्या
व डि लां ना
वे ड ला ग ते

♣ * * * * * * ♣







 बळवंतरावांनी सर्वत्र शोध केला, परंतु चित्राचा पत्ता नाही. त्यांची रजाही संपली, अधिक रजा मिळणे शक्य नव्हते. ते परत आले. कामावर रुजू झाले. परंतु त्यांचे कशात लक्ष लागेना. कामातही लक्ष लागेना.

 बळवंतरावांना एकदम मामलेदारी मिळाली होती. त्याचे काहीना वैषम्य वाटत होते. बळवंतरावांचा मत्सर करणारे लोक होते. खुद्द त्यांच्याच कचेरीत असे लोक होते. बळवंतराव अलीकडे कामाविषयी जरा बेफिकीर होते. ते काही गावांना न जाताच त्या गावी जाऊन आलो म्हणून कामाच्या डायरीत लिहीत. त्यांच्या आता लक्षातही फारसे राहात नसे. त्यांचा मेंदू काम देईनासा झाला.

 या संधीचा दुष्टांनी फायदा घेतला, कलेक्टरकडे निनावी पत्रे गेलं.मामलेदारसाहेब न हिंडताफिरताच डायरी वगैरे भरतात असे कळवले गेले. कलेक्टर जरा कडवा होता. तो अकस्मात् एके दिवशी येऊन दाखल झाला. चौकशी करू लागला. कामाची डायरी पाहू लागला.

 "या गावांना गेले होतेत का तुम्ही ? नोंद तर आहे. गेले होते का ? " कलेक्टरने विचारले.

 "मला आठवत नाही."

 "सरकारी काम म्हणजे का हजामती ? आठवत काय नाही ? बिनआठवणीचा अधिकारी काय कामाचा ? येथे गावांची नावे भराभर लिहायला बरी आठवली !"

 "गेलो असेन मी." बळवंतराव म्हणाले.  "शिपाई. त्या गावांचे पाटील बाहेर आले आहेत, त्या सर्वांना बोलवा आत.' साहेबांचा हुकूम झाला.

 ते पाटील आत येऊन उभे राहिले.

 "हे तुमच्या गावांना गेल्या आठपंधरा दिवसांत आले होते का ?"

 " नाही आले. आम्ही बोलावले होते. लोक आणेवारीची तक्रार करीत आहेत."

 " काय हो, हे पाटील काय म्हणतात ?"

 "मला काही कळत नाही."

 "ठीक, तुम्हाला कळेल असे करतो हां, जा."

 बळवंतराव खरेच निघून गेले. ते बाहेर जाऊन बसले. थोड्या वेळाने घरीच निघून गेले. कलेक्टरने कडक रिपोर्ट वर केला. बळवंतरावांना नालायक ठरवण्यात आले. परंतु सरकारने, त्यांनी सक्तीची काही महिने रजा घ्यावी असे सांगितले. जर पुढे कार्यक्षम दिसले तर पुन्हा कामावर घेण्यात येईल असे कळविले.

 बळवंतरावांना हा मोठाच धक्का होता. सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने ही बेअब्रू होती. तिकडे मुलीचा पत्ता नाही. इकडे नोकरीवरून बडतर्फ. पुन्हा कामाला नालायक हा शिक्का ! सरकारदरबारी बेअब्रू. बळवंतराव खोलीत सचित होऊन बसले. काय करावे ते त्यांना सुचेना.

 " भोजू , " त्यांनी हाक मारली.

 " काय साहेब ? "

 "चित्रा आली का ? "

 "नाही साहेब. कोठून येणार ? "

 "तू म्हणाला होतास ना, की येईल म्हणून ?"

 "अजूनसुद्धा म्हणतो. धनी, घोर नका करू. सारे चांगले होईल. देव सत्त्व पाहातो आहे."

 "भोजू , चित्रा सापडली तरच आता बरे दिवस येतील. माझे भाग्य चित्राशी जणू जोडलेले आहे. ती जन्मली व आम्हाला ऊजितकाळ आला. मुले वाचू लागली. कोठे आहे चित्रा? कधी भेटेल? आज नोकरी गेली. बेकार झालो. उद्या काय होणार ? कोठे आता थांबणार संकटांची ही गाडी ? येऊ लागली, की लागोपाठ येतात. नोकरीत आजपर्यंत कोण नाव नाही ठेवले मला ! परंतु आज मी नालायक ठरलो. लक्षच लागत नाही. आठवण राहात नाही. सुचत नाही. काय करू मी? भोजू, मला वेड लागेल असे वाटते ! सारखी चित्रा डोळ्यांसमोर येते."

 "धनी, सारे चांगले होईल. धीर नका सोडू."

 "मला वेड लागले, तर भोजू, तू या सर्वांची काळजी घे हो."

 "परंतु वेड लागणार नाही धनी."

 "परंतु मला कबूल कर, तू नाही ना सोडून जाणार ? सध्या आम्हाला साडेसाती आली आहे. तू नको हो सोडून जाऊ. भोजू, आमच्याजवळ पैसेही फार नाहीत. मी लांचलुचपत घेतली नाही. जो कोणी मदत मागेल त्याला नाही म्हटले नाही. कितीतरी शेतक-यांना मी पैसे दिले. त्यांच्या लग्नांना दिले. अरे त्यांचेच पैसे. मी उपकार केले असे नाही मी म्हणत. हिला एक चार दागिने केले तेवढेच. उद्या मी वेडा झालो तर कसे व्हायचे ? मुलांचे शिक्षण कसे व्हायचे ? भोजू, तू यांना सोडू नको हो. कबूल कर."

 " नाही हो सोडणार. काही कमी पडू देणार नाही. माझे तिकडे माझ्या मुलुखात घरदार आहे. थोडी शेती आहे. वेळ आली तर ते मी विकीन, परंतु सांभाळीन सर्वांना, तुम्ही काळजी नको करू. परंतु सारे चांगलेच होईल, काळजी नका करू. चित्राताई भेटतील, त्यांचे यजमान भेटतील"

 घरात आता आनंद नव्हता. सारी सचित होती. सोताबाई रडत बसत. बळवंतराव भ्रमिष्टासारखे करीत. श्यामू, रामू, दामू आईजवळ बसत. त्या मुलांना रडू येई.

 आई, बाबा कधी होतील बरे ? " श्यामू विचारी.

 "चित्राताई आली तर बरे होतील." ती सांगे.

 "आम्ही जाऊ शोधायला ?" ती मुले विचारीत.

 "तुम्ही लहान आहात रे." ती म्हणे,

 "सीतेला शोधायला वानरसुद्धा गेले. आम्ही तर माणसे." श्याम म्हणे.  "अरे ते वानर नव्हते. ते देव होते. मारुती म्हणजे का साधे माकड ? तुम्ही शाळेत जात जा. परीक्षेत पास व्हा हो बाळांनो. जातील हे दिवस. उगीं. रडू नका. आणि बाहेर कोणी काही विचारले तर फार बोलत नका जाऊ. समजलेत ना ? " सीताबाई सांगायच्या.

 काही दिवस असे गेले. बळवंतराव आता पूर्ण भ्रमिष्ट झाले. ते एकदम काहीतरी बोलत, जेवायसाठी पाटावर बसत. आणि 'चित्रा, आलो हो. कोण नेता तुला पळवून, बघू दे.' असे म्हणून एकदम उठून धावत. काठी घेत. घरातून बाहेर जात. भोजू त्यांना धरी. परत घरात आणी.

 ते आपल्या खोलीत बसून राहात, भोजू पहारा करी. बळवंतरावांना कधी तो कलेक्टर डोळ्यांसमोर दिसे. ते आपल्या मुठीं वळीत. ' मोठा आला कलक्टर ! थोबाडला असता त्या दिवशी. त्याची मुलगी हरवली असती तर त्याचे नसते का डोके फिरले ? आणा रे त्या कलेक्टरला धरून. कानशिलात देतो त्या गाढवाच्या. हा बळवंतराव का नालायक ? मग लायक तरी कोण ? चित्रा. जगात फक्त चित्रा लायक, कोठे आहे चित्रा ? हाका मारते वाटते ? भोजू, धाव. चित्रांच्या मदतीला धाव. दुष्ट आहे तिची सासू, दुष्ट, फार दुष्ट राक्षसीण आहे. तिनेच चित्राला नाहीसे केले. नाही नाही ते बोलते. बोलू दे.'

 '....ती बघा चित्रा ! श्यामू, रामू, दामू, आली रे तुमची ताई ! हसा. पुसा डोळ्यांचे पाणी, चित्रा, कोठे ग लपली होतीस ? दाराआड होतीस ? कोठे होतीस ? आता मी वेडा नाही. कोण म्हणते मी वेडा आहे ? मी वेडा, तर शहाणा कोण ? चित्रा, चित्रा एक शहाणी. साऱ्या जगाला ती अक्कल देईल. निष्पाप मन म्हणजेच नाही का अक्कल ! सर्वांवर विश्वास म्हणजेच नव्हे का परम ज्ञान ? हसता काय ? मूर्ख आहात सारी ! चित्राला ज्ञान आहे ते तुम्हाला शंभर जन्म तपश्चर्या करूनही मिळणार नाही.'

 '....भोजू, भोजू रे ! कोठे आहे भोजू ? तू हो सर्वांना. मी वेडा तू सांभाळ. तू आपले घरदार विकणार ? आमच्यासाठी ? तू साधा गडी, न शिकलेला. आणि असे थोर तुझे मन ! चित्रासारखाच तूही ज्ञानी आहेस.'  "....त्या कलेक्टरला जा शिकव. दे दोन थोबाडीत त्या लेकाच्या. कलेक्टरची खुर्ची मिळाली म्हणजे का अक्कल येते ? सहानुभूतीने ज्ञान ‘मिळते. नम्रपणाने ज्ञान मिळते.'

 अशी बळवंतरावांची बडबड अखंड चालू असायची. कधीकधी मुके बसले, की अखंड मौन. एक शब्द मग बोलत नसत.

 "आई, माझ्या मनात येते ते सांगू ?" भोजूने सीताबाईस विचारले.

 "काय भोजू ? "

 "आपण यांना इस्पितळात ठेवले तर? तेथे वेड जाते. काही उपाय करतात. आपण येथून सारीच जाऊ. तिकडेच राहू. ठाण्याला म्हणतात, आहे असा दवाखाना, मी येऊ का चौकशी करून? "

 " भोजू, तू सांगशील तसे. तुझ्यावर त्यांचा लोभ होता. नाथांकडे श्रीखंड्या तसा जणू तू आमच्याकडे आलास. तुझाच आता आधार आहे हो. माहेरी तरी माझे सख्खे कोण आहे ? एकदा येऊन गेले. पुन्हा कोणी आले का ? जाऊ दे. आपले नशीब नि आपण. परंतु त्या इस्पितळात खर्च द्यावा लागेल. मुलांच्या विद्या ! कसे करायचे ! ह्या पाटल्या विकाव्या. ही कुडी विकावी."

 " आई, तुम्ही काळजी नका करू. एवढ्यात अंगावरचे विकू नका. शेवटी आलीच वेळ तर विकू. मी ठाण्यास चौकशी करून येतो. येतो जाऊन."

 "ये "

 आणि भोजू गेला. ठाण्यास येऊन त्याने सर्व चौकशी केली. त्याने बळवंतरावांसंबंधी सारी हकीगत सांगितली. डॉक्टर म्हणाले, * घेऊन या, गुण येईल." भोजूने तेथे राहायला एक चांगले घरही याहिले. नौपाड्याच्या दत्तमंदिरात खोल्या रिकाम्या होत्या. तेथून इस्पितळही जवळ होते. सीताबाईंना देवळाचाही आधार होईल. ते दत्तमंदिर सुंदर होते. केवढे थोरले आवार. बाग होती. तेथे मोफत वाचनालय होते. मोफत दवाखाना होता. रम्य, शांत ठिकाण. मुलांना शाळाही फार लांब नव्हती. तेथे सारी व्यवस्था करून भोजू आपल्या गावी गेला. त्याने आपले घरदार, शेतीवाडी विकली आणि जे काय हजारभर रुपये मिळाले ते तो घेऊन आला. आपल्या नावाने पोस्टात त्याने ते ठेवले.

 भोजू घरी आला. त्याने सीताबाईस सारे सांगितले. त्या दत्तमंदिराचे त्याने रम्य वर्णन केले. सायंकाळी सुंदर आरती होते, नगारा वाजतो. टाळ, तास वाजतात. पुजारी भक्तिभावाने गोड गाणी म्हणतो. ते इस्पितळही जवळच, वेड्यांचे डॉक्टर फार सज्जन आहेत. सारे सारे त्याने सांगितले.

 सीताबाईंनी जायचे ठरवले.

 "येता ना ठाण्यास ? " भोजूने बळवंतरावांस विचारले.

 "ठाण्यास ? "

 "तेथे कशाला ? तेथे तुरुंग आहे. वेड्यांचे इस्पितळ आहे. मला का कलेक्टर तुरुंगात घालीत आहे ! का वेड्यांच्या इस्पितळात पाठवीत आहे ?"

 "तेथे चित्रा आहे. तेथे चित्राताई भेटेल.”

 "खरेच का ? तपास लागला तिचा ? "

 "असे कळले आहे."

 "चला तर मग, करा तयारी. वा-यावर बसून जाऊ. "

 "आगगाडीने जाऊ."

 "खरेच श्यामू, रामू, दामू वा-यावरून पडतील. तीसुद्धा येणार ना ? येईलच, ती येथे एकटी थोडीच राहणार ? चला, लवकर चला म्हणजे झाले."

 सर्व मंडळी ठाण्याला आली. त्या दत्तमंदिराच्या आवारात आली. तेथील मोफत दवाखान्याचे डॉक्टर भले गृहस्थ होते. त्यांची व वेड्याच्या दवाखान्यातील डॉक्टरांची ओळख होती. त्यांनी बळवंतरावांस मोटारीतून तिकडे नेले. बरोबर भोजू व सीताबाई होत्या.

 बळवंतरावांना दवाखान्यात ठेवण्यात आले. सीताबाई व भोजू परत घरी आली. हळूहळू सारी व्यवस्था लागली. सीताबाई दत्तासमोर सारख्या बसत व प्रार्थना करीत. भोजू सर्वांना धीर देत होता.  "बरे होईल का हो वेड?" सीताबाई आशेने मंदिरातील डॉक्टरांना विचारीत.

 " होईल हो बरे. तुमची चित्रा सापडली, तर एका क्षणात वेङ जाईल." ते म्हणाले.

 "कोठे गेली चित्रा ?" सीताबाई रडू लागल्या.

 "सापडतील. दत्तराजाची कृपा होईल, ” डॉक्टरांनी धीर दिला.

 "तुमच्यासारखी चांगली माणसे भेटली ही देवाचीच दया. हा भोजूच पाहा. देवानेच जणू तो आम्हाला दिला. देव दयाळू आहे. तो आणखी थोडी दया नाही का दाखवणार ? दाखवील, दत्तगुरु सारे चांगले करतोल." असे सीताबाई आशेने परंतु स्फुंदत म्हणाल्या.