Jump to content

चित्रा नि चारू/चित्राचा शोध

विकिस्रोत कडून
चि त्रा चा
शो ध
'
♣ * * * * * * ♣








 चारूची आई दुस-याच दिवशी एकदम घरी गोडगावला जायला निघाली. माहेरी चित्राचा काटा काढायलाच ती गेली होती. ते काम झाले. इकडे चारूला कळवणे जरूर होते. त्याने डोक्यात राख घालू नये म्हणून त्याची समजूत घालणे आवश्यक होते.

 एके दिवशी अकस्मात चारूची आई घरी आली. परंतु बरोबर चित्रा नव्हती. " आई, तू एकटींशी आलीस ? चित्र कोठे आहे ? तिचे दोन दिवसापूर्वीच पत्र आले, की 'न्यायला या' म्हणून आणि आज तू एकटी कशी आलीस ? चित्रा कोठे आहे ? बरी आहे ना माझी चित्रा ? खुशाल आहे ना ? आई. सांग लवकर. मला धीर नाही निघत."

 "बाळ, चित्रा गेली."

 " काय ? चित्र गेली ? काय झाले तिला ? आई, एकदम कशी गेली ? अरेरे !”

 "रडू नकोस. चित्रा गेली म्हणजे जगातून नाही गेली. ती मेली नाही. मरती तरी बरे. परंतु तोंडाला काळे फासून गेली. कोण रंगेलाचा हात धरून गेली, कोणी तरी तिला दिली पट्टी. गेली त्याच्याबरोबर. मला पहिल्यापासूनच असे वाटत होते. मुसलमानांशी हिची मैत्री आणि मुलगीही निर्लज्ज. पहिल्या भेटीलाच मळ्यात लागली तुझ्याजवळ हसायला, बोलायला. तू तेव्हाच पारख केली पाहिजे होतीस. आम्ही बांयका शितावरून भाताची परीक्षा करतो. तू ऐकले नाहीस आता भोगा फळे."

 "आई, काय तू बोलतेस ?"
"आई, तू एकटीशी आलीस ?"

 खरे ते बोलते. मला खोटे सांगून काय करायचे आहे ? तुझा आनंद तो माझा. आमचा एकुलता एक मुलगा तू. तुझे वाईट व्हावे असे का तुझ्या आईला वाटेल ? मी इतकी का नीच असेन ? चित्राविषयीचा तिटकारा मी जिंकला. तुला ती आवडते म्हणून शेवटी तिच्यावर मी प्रेम करू लागल्ये. तिला माझ्या माहेरी नेले.परंतु तेथे तिने हा चावटपणा केला. कशी मी तेथे राहू? कसे त्या गावात तोंड बाहेर काढू ? चारू, मला देवाचेचं काही हेतू दिसतात. चित्राजवळ लग्न होऊन इतके दिवस झाले. तुला मूलबाळही झाले नाही. तीही आता बाहेर पडली. तिच्याशी तुझा नकोच संबंध, तिच्या द्वारा नको आपला वंशतंतू राह्यला, असे देवाच्या मनात असावे. मी सांगू का, ती माझ्या मैत्रिणीची मुलगी अद्याप लग्नाची आहे. जणू तुझ्यासाठीच देवाने तिला अद्याप अविवाहित ठेवले आहे. काहीतरी अडचण येते व तिचे लग्न मोडते. तुझीच ती आहे. लहानपणापासून तुझ्या आईने जे योजले, तीच जणू देवाचीही योजना होती. तू माझे ऐक. जाऊ दे ती चित्रा चुलीत. तिच्या बापाला एक पत्र टाक. मोकळा हो. दुसरे लग्न लाव. संसार कर. माझ्या मांडीवर नातवंड दे हो चारू.

 "आई, मला जगावेसे वाटत नाही. चित्रा माझ्या जीवनाचा आधार होती. किती तिचे माझ्यावर प्रेम ! काही तरी घोटाळा आहे. आई, मनात येते, की तुझे व त्या तुझ्या मैत्रिणीचे हे कारस्थान आहे. त्या मुलीची घोरपड माझ्या गळ्यात बांधण्यासाठी तुमचे हे उद्योग आहेत. चित्राला तिकडे नेता यावे म्हणून तू एकदम खोटे वरपांगी प्रेम तिच्यावर करू लागलीस. त्या कोणा पुत्रदादेवीची कथा रचली. तिला नवस केला म्हणजे मुलगी होतो, असे त्या भोळ्याभाबड्या मुलीच्या मनात भरवलेस. आई, सारे तुझे कारस्थान. तू माझी जन्मदाती, परंतु माझ्या मनात असे येते खरे, मी जातो, चित्राचा शोध करायला जातो. तिच्या आईबापांस मी काय सांगू ? अरेरे, चित्रा, कोठे आहेस तू? आई, तिला मारलीत तर नाही ? विहिरीत तर नाही ना लोटलेत ? विष नाही ना दिलेत ? खड्यात नाही ना लोटलेत ? कड्यावरून नाहीं ना लोटलेत ? आई, माझी चित्रा दे. तू माझी चित्रा चोरली आहेस. चित्रा दे. नाहीतर तुझा मुलगा मेला समज. नको हे घर, ही जहागीर. दे, चित्रा नाही म्हणजे काही नाही. अकपट प्रेमळ मुलगी. म्हणे एकदम कशी तुझ्याजवळ बोलली ! आई, आमची जणू शतजन्मांची ओळख होती असे वाटले. माझ्या प्राणांना तोच जणू दुरून पोषीत होती आणि शेवटी मला शोधीत त्या मळ्यात आली. हृदयाची भाषा तुला काय कळे! आई, चित्राविषयी खोट्या कड्या नको उठवू. शपथ आहे तुला. मी चालता होतो. चित्रा सापडली तर घरी परत येईन, नाही तर जीव देईन. प्राण नाही देववला तर कोठे हिमालयात निघून जाईन. हा माझा शेवटचा प्रणाम. बाबाना सांग. तेही बाहेरगावी गेले आहेत. त्यांना सांग, की चारू गेला, चित्राला शोधायला गेला. माझी चित्रा मला सापडेल. तरीच बुधवारी मला सारखे रडू येत होते आणि चित्रानेही पत्रात तसेच लिहिले आहे. आमची दोघांची हृदये एक आहेत, याचा हा घे पुरावा. एकाच दिवशी आमच्या दोघांच्या हृदयांस हुरहुर लागली होती. अशी माझी चित्रा, ती का कोणाचा हात धरून जाईल? आई, केवढे कुभांड तू रचीत आहेस ? निष्पाप व निर्मल मुलीला तू कलंक लावू पाहात आहेस. आई, हे पाप, घोर पाप आहे.कोठे हे फेडशील ? अरेरे! चित्रा, कोठे असशील तू ? टाहो फोडीत असशील, रडत असशील, कोठे तुला पाहू, कोणाला विचारू, कोठे शोधू ? आई, प्रणाम. चालला हो चारू." आणि चारू खरेच घर सोडून निघून गेला. त्याने चित्राच्या वडिलांना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले-

  सेवेशी कृ. स. प्रणाम.
   चारू आज घर सोडून बाहेर पडत आहे. चित्रा कोठेतरी
  हरवली आहे. आईबरोबर ती आमच्या आजोळी गेली
  होती. परंतु एके दिवशी अकस्मात् ती हरवली. काय घोटाळा
  आहे समजत नाही. आई घरी आली ताबडतोब. मी चित्राच्या
  शोधार्थ बाहेर पडत आहे. चित्रा सापडली तरच घरी परत
  येईन. चित्रा सापडली तरच तुम्हालाही तोंड दाखवीन. मी दुःखी
  आहे. चित्रा म्हणजे माझे पंचप्राण. तिच्याशिवाय मी जगू
  शकणार नाही. देवाची इच्छा असेल तसे होईल.
      तुमचा अभागी
        चारू
 असे पत्र लिहून चारू चित्राच्या शोधार्थ जणू फकीर होऊन बाहेर पडला आणि ते पत्र चित्राच्या वडिलांना मिळाले. त्यांना धक्काच बसला. चित्राशी आपले भाग्य निगडित आहे असे त्यांना नेहमी वाटत असे. चित्रा जन्मली आणि ते एकदम मामलेदार झाले. चित्रा वाचली व पुढची मुले वाचू लागली. चित्रावर बळवंतरावांचे फार प्रेम होते. सीताबाईंचे तितके नव्हते. परंतु बळवंतरावांना चित्रा म्हणजे जणू आधार वाटे. रोज त्यांना चित्राची आठवण येई. जेवताना येई. कधी कोठे खेड्यात वनभोजन वगैरे कार्यक्रम असला म्हणजे येई. आणि आज हे पत्र. त्यांचे डोळे भरून आले. ते रडतच घरात गेले.

 "अग, आपली चित्रा हरवली. हे पत्र आले आहे." ते रडत म्हणाले.

 "काय. चित्रा हरवली ? ” सीताबाईंनी घाबरून विचारले.

 त्यांनी पत्र वाचून दाखविले. त्यांचा गळा दाटून आला होता.

 "तुम्ही जा शोधायला. रजा घ्या. अशी कशी हरवली ? कोणी पळवली वाटते ? आणि गेली कशाला त्या दुष्ट सासूच्या माहेरी ? तुम्ही रडत नका बसु. घ्या रजा नि ताबडतोब जा."

 बळवंतराव आपल्या बैठकीच्या जागी गेले. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी तात्पुरती रजा घेऊन जास्त रजेचा अर्ज केला. ते आज जाणार होते. आधी गोडगावला जाणार होते. मग शोध करणार होते.

 " भोजू" त्यांनी गड्याला हाक मारली. भाजू फार प्रामाणिक नोकर होता. आज दोन-तीन वर्षे त्यांच्याकडे तो टिकला होता. चित्राचे लग्न झाले नि भोजू कामाला लागला. बळवंतरावांना भोजू गडी फार आवडे. त्यांचा त्याच्यावर फार विश्वास.

 "काय साहेब ? त्याने येऊन विचारले.

 "भोजू, मी गावाला जाणार आहे. आमची चित्र हरवली आहे. शोधायला जात आहे. तू घर सांभाळ. तुझ्यावर सोपवून जात आहे."

 "चित्राताई अशा कशा हरवल्या ? मी जाऊ का शोधायला ? मी आणतो त्यांना शोधून. जाऊ का ?"

 "भोजू, माझे प्रयत्न हरल्यावर तू जा."

 "सापडतील चित्राताई. माझे मन सांगते, की सापडतील."

 "तुझ्या तोंडात साखर पडो. निर्मळ व शुद्ध माणसांना सत्य कळते. माझी तयारी कर. वळकटी बांध. कपडे फार नकोत. समजलास ना ?"  भोजूने सारी तयारी केली. तो सामान घेऊन स्टेशनवर गेला. तिकीट काढून थांबला होता. रावसाहेब आले. भोजूने तिकीट दिले.

 "भोजू, सांभाळ हो सर्वांना. मी पत्र पाठवीनच. हुशारीने राहा."

 " होय साहेब. "

 गाडी सुटली व भोजू घरी आला. बळवंतराव गोडगावला गेले. अद्याप जहागीरदार घरी आले नव्हते. चारू घर सोडून गेलाच होता.

 "काय हो, काय आहे हकीगत माझ्या मुलीची ? सारे सांगा तरी एकदा." बळवंतराव दुःखाने म्हणाले.

 "माझ्या तोंडाने सांगवत नाही. पहिल्यापासून माझे मत होते, की तुमची मुलगी नको म्हणून. परंतु या सर्वांचा हट्ट. मीसुद्धा शेवटी तिच्यावर प्रेम करू लागल्ये. तिला माझ्याबरोबर नेली. म्हटले, देवीला नवस करू. पुत्र होईल. परंतु तिथे कोणाबरोबर पळून गेली. तोंडाला काळोखी फासून गेली. आमची मान खाली. सारे लोक टिंगल करीत आहेत. हा चारूही कोठे गेला. तुमच्या मुलीने सारा सत्यनाश केला आमचा. अब्रू गेली. मुलगाही कोठे गेला, पत्ता नाही. एकुलता आमचा मुलगा." असे म्हणून ती दुष्ट सासू खोटे खोटे रडू लागली.

 "तुम्ही काही म्हणा. चित्रा असे करणार नाही, कोणी तरी तिला पळवले असेल. असतात अशा टोळ्या. माझी चित्रा देवता आहे. तारणारी देवता. ती सत्यनाश करणारी नसून सर्वांचे मंगल करणारी आहे. ती जन्माला आली व मी मामलेदार झालो. तिच्या पूर्वी झालेली सारी मुले मेली. परंतु ती जगली आणि तिच्या पाठीवरचीही जगली. आमच्या घरात संतती, संपत्ती, आनंद तिच्यामुळे आला. ती प्रेमळ व निर्मळ आहे.भोळी आहे. तिला कोणाची शंका येत नाही. सर्वांवर प्रेम करील. सर्वांना जवळचे देईल. सापडेल, कोठे तरी सापडेल माझी चित्रा."

 असे म्हणून बळवंतराव बाहेर बैठकीच्या जागी गेले. जेवण करून गोडगाव सोडून तेही चित्रांच्या शोधार्थं सर्वत्र हिंडू लागले. सापडेल का चित्रा ?