Jump to content

चित्रा नि चारू/आमदार हसन

विकिस्रोत कडून
आ म दा र
ह स न

♣ * * * * * * ♣








 फातमाच्या वडिलांचे नाव हसन, ते आमदार होते. स्वभावाने मोठे दिलदार व गोड. सर्वांशी त्यांचा परिचय. फातमा त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी. फातमा आजोळीच वाढली. हसन यांचा नवा दुसरा संसार भरभराटत होता. मुलेबाळे होती. मोठा पसारा होता.

 फातमाने बापाला "ताबडतोब या, महत्त्वाचे काम आहे", अशी तार केली. हसनसाहेबांना तार मिळाली, त्यांचे उत्तर आले, ' येतो ' उत्तराची तार आली तेव्हा दिलावर घरी नव्हता. चित्रा पळून गेली, असे मोलकरणीने त्याला सांगितल्यापासून तो जरा पिसाळला होता. त्याला भीतीही वाटत होती. खटला वगैरे व्हायचा. ती मुलगी हुशार व सुशिक्षित होती. नेमकी पोलीस घेऊन यायची, असे त्याच्या मनात येई व तो घाबरे.

  तो जरा त्रस्त व सचित असा घरी आला.

 "दिलावर, बाबांची तार आली आहे."

 "तार ? ”

 "हो. ते येत आहेत उद्या सकाळच्या गाडीने. तू स्टेशनवर जा मोटार घेऊन."

 "का येत आहेत ? "

 "कोणास ठाऊक ?"

 "कोठे आहे तार ? "

 "येथेच कोठेतरी होती. परंतु तारेत ' येतो ' एवढेच होते."  दुस-या दिवशी सकाळी दिलावर मोटार घेऊन स्टेशनवर गेला. दुसरेही प्रतिष्ठित लोक त्याने बोलावले होते. हारतुरे होते. गाडी आली. आमदार हसन आले, दिलावर सामोरा गेला. लोकांनी हार घातले. पोर्टरने सामान उचलले. बाहेर मोटार तयार होती. मोटार निघाली.

 "दिलावर, काय काम आहे ?" आमदार हसन यांनी विचारले.

 "कसले काम ?"

 "फातमाच्या सहीची तार आली, की ' काही महत्त्वाचे काम आहे. ताबडतोब या.' म्हणून तर मी आलो, सारी कामे बाजूस ठेवून आलो."

 दिलावरला ही भानगड माहीत नव्हती. चित्राप्रकरण तर नाही ना ? तो दचकला.

 "काय बरे असेल काम ? " सास-याने पुन्हा विचारले.

 "ते मुस्लीम स्त्रियांच्या शिक्षणाचे काम असेल, फातमाने मुस्लीम स्त्रियांना साक्षर करण्यासाठी वर्ग सुरू केले आहेत. तिला ग्रँट वगैरे पाहिजे असेल, तेच काम असेल. मला तर तिने तार केली हे माहीतही नव्हते. ती मला इतकेच म्हणाली, की ' तुमची तार आली आहे व तुम्ही येत आहात.' घरी गेल्यावर कळेल."

 दारात मोटार वाजली. हसनसाहेब व दिलावर वर आले. फातमा सामोरी आली. पित्याने तिला जवळ घेतले.

 "बरी आहेस ना बेटा ?" त्याने प्रेमाने विचारले.

 "होय बाबा. बसा." ती म्हणाली.

 "काय ग, कसले काम ? " त्यांनी हसत विचारले.

 "मग जेवताना सांगेन. दिलावर, आज छान छान भाज्या आणा. आज हिंदूंच्या शाकाहारपद्धतीची मी रसोई करणार आहे. बाबा, तुम्हाला तसला स्वयंपाक आवडतो ना ? "

 "हो. पैगंबरसाहेबसुद्धा भाकरीच खात. फार तर मध घेत. कधी नुसता खजूर. माणसाने शक्यतो शाकाहारी असावे असे माझे मत आहे."

 "परंतु मांसाशनास इस्लाम बंदी नाही करीत."  दिलावर, अरबस्तान म्हणजे वाळवंट. शेतेभाते नाहीत, नद्या नाहीत. कालवे नाहीत. फार पाऊस नाही. तेथले लोक शाकाहारी कसे होतील ? केवळ खजुरावर कसे जगतील ? म्हणून तेथे उंट मारावे लागतात. मांस खावे लागते. परंतु अरबस्तान जर हिंदुस्थानसारखा सुजल, सुफल, सस्यश्यामल असता, तर पैगंबरांनी मांस खाऊ नका असेच सांगितले असते. परिस्थित्यनुरूप सांगावे लागते. जे शक्य व झेपण्यासारखे तेच धर्मपुरुष शिकवतात. त्या चीनमधले लोक म्हणे वाटेल ते खातात. न ख़ातील तर करतील काय ? ४० कोटी लोक. नद्यांना मोठमोठे पूर येतात. नद्यांचे प्रवाह बदलतात. मोंगोलियांतून वाळूची वादळे उठतात व वाळूचे थर येऊन पडतात. नेहमी दुष्काळ. कसे जगतील चिनी लोक ? परंतु वाटेल ते खाणारे चिनीही नद्यांचे पूर उतरावे म्हणून. ' तीन दिवस. मांसाशन बंद' असे ठराव करतात. यावरून त्यांची दृष्टी दिसते. फातमा, शाकाहारीच कर हं जेवण. खूप भाज्या कर ! ”

 "बाबा, माझी एक मैत्रीण आली आहे येथे लहानपणची ! तिलाही मी जेवायला बोलावले आहे. तिची आवडती भाजी करणार आहे. "दिलावर, टमाटो, कोबी, वगैरे आण हो. फळे आण. पोपया आण. आज बाबांना व माझ्या मैत्रिणीला मेजवानी !"

 दिलावर गोंधळला. तो निघाला बाजारात.

 "लौकर ये हैं दिलावर."

 "अच्छा ! ”

 दिलावर विचार करीत जात होता, ' फातेमाची ही कोण मैत्रीण ? तीच मुलगी. दुसरी कोण असणार ? तिने मला सारे सांगितलेच होते. ती मुलगी पळून पुन्हा फातमाला भेटली वाटते ?फातमाचा पत्ता तिला काय माहीत ? बरेच दिवसात तर त्यांचा पत्रव्यवहार नाही. त्या मोलकरणीने फातमास सांगितले का ?' तो विचारात मग्न होता. बाजारात त्याने आज खूप खरेदी केली. भाज्या, फळे, सर्व काही विकत घेऊन पाटीवाला करून तो घरी आला.

 "फातमा, काय करतेस ? "

 "पु-या तळीत आहे. दिलावर, श्रीखंड घेऊन ये. जा."  "फार प्रेमाची मैत्रीण आहे वाटते ? मला खर्च नको करूस असे सांगतेस आणि तू आता खर्च करतेस तो ? "

 "दिलावर. माझी मैत्रीण कधी तरी आली आहे ? रोज तुझे ते शेकडो दोस्त येतात. नको हो आणू श्रीखंड ! ”

 "आणीन ! श्रीखंड आणीन, बासुंदी आणीन !"

 दिलावर गेला आणायला. फातमाने रसोई केलीं ; टमाटोचा रस्सा केला; कच्या कोबीची कोशिंबीर ; खोब-याची चटणी. दिलावरही श्रीखंड घेऊन आला.

 "केव्हा येणार तुझी मैत्रीण ?"

 "येईल ! तुला भूक का लागलो ? बाबा नि तू बसवा का ? आम्ही दोघी मैत्रिणी मागून बसू. मी बाबांना विचारून येते."

 फातमा दिवाणखान्यात आली. ताजी वर्तमानपत्रे आमदारसाहेब वाचीत होते.

 "बाबा, बसता का जेवायला ? मैत्रिणीला यायला अवकाश आहे."

 "आपण बरोबरच बसू. मीही जरा बाहेर जाऊन येतोः दिलावर कोठे आहेत ?"

 इतक्यात दिलावर तेथे आला.

 " काय ?" त्याने विचारले.

 "दिलावर, जरा बाहेर येता ? आपण जाऊन येऊ एके ठिकाणी तोपर्यंत फातमाची मैत्रीणही येईल."

 "चला. "

 सासरे-जावई बाहेर गेले. फातमाने चित्राची खोली उघडली. चित्राने मंगल स्नान केले होते. सुंदर रेशमी साडी ती नेसली होती. फातमाने नवी आणून दिली होती. केसात फुले होती. फातमाने प्रेमाने घातली होती. चित्राचे मुख प्रसन्न दिसत होते.

 " चित्रा, चल बाहेर, आपण दोघी बोलत बसू."

 " चल."

 दोघीजणी बाहेर येऊन बसल्या. एका टेबलाभोवती चार खुर्च्या होत्या. टेबलावर ताटे होती.  "फातमा, आता येथून केव्हा जाऊ ?"

 "बाबांबरोबर जा. ते सारे करतील."

 "फातमा, तुझे उपकार ! तुझ्या मोलकरणीचे उपुकार !"

 "चित्रा, प्रेमाला उपकार शब्द नको लावू. "

 इतक्यात खाली मोटार वाजली.

 "आले वाटते ? चित्रा म्हणाली.

 फातमा उठली. तिने दार उघडले. दिलावर व आमदारसाहेब आले होते.

 "आली का ग तुझी मैत्रीण ? " आमदारांनी विचारले.

 " हो बाबा, तुम्ही गेलेत नि ती आली. चला, तुमची ओळख करून देते."

 फातमी आली. कोट वगैरे काढून आमदारसाहेब आले, दिलावर आला. त्यांनी हातपाय धुतले. फातमाने टुवाल दिला.

 " ही का तुझी मैत्रीण ?" आमदारांनी विचारले.

 " हो." फातमा म्हणाली.

 "चित्रा, हे माझे बाबा ! मी सांगत असे ना तुला यांच्याविषयी ! आणि हे दुसरे कोण? ओळख ! "

 "तुझे यजमान."

 होय. यांचे नाव दिलावर."

 "यांचे नाव मी रहीम ठेवले आहे." चित्रा म्हणाली.

 "वा ! छान नाव आहे." आमदारसाहेव म्हणाले, रहीम नाव ऐकून दिलावर काळवंडला. तो काही खाईना ; तसाच तो स्वस्थ बसला.

 "दिलावर, तुम्ही हातसे धरून ? भाजी फक्कड झाली आहे ! फातमा, तुझ्या मैत्रिणीस श्रीखंड वाढ की ! "

 "बाबा, ती जरा आजारी आहे."

 "आणि दिलावर आजारी आहेत वाटते ?"

 "त्यांनाही जरा बरे नाही."

 " काय होते त्यांना ? "

 " मी लवकरच सांगेन, त्यांना काय होते ते."  जेवणे झाली. दिलावरचा चेहरा खिन्न होता. त्याला काहीतरी दुःख होत होते. शल्य खुपत होते.

 " चित्रा, ही घे पानपट्टी. तुझा विडा रंगेल, आणि माझाही आता रंगतो हो ! दिलावर, ही तुला घे. बाबा, ही तुम्हाला ! "

 "फातमा, मला शेवटी वाटते ! "

 "बाबा, बसा सारी. मी तुम्हाला ज्या कामासाठी बोलावले ते आता सांगते. दिलावर, बसा. चित्रा, बस."

 सारी बसली आणि फातमाने चित्राची सारी हकीगत पित्याला निवेदिली. दिलावर काळा ठिक्कर पडला. आमदारसाहेब गंभीर झाले.

 "दिलावर, तुम्ही इस्लामी धर्माला काळोखी फासलीत. काय हे ? परंतु अद्याप मर्यादेत आहात. या मुलीच्या अब्रूचे तरी धिंडवडे केले नाहीत ! माझ्याजवळ का नाही मागितलेत पैसे ? पैशासाठी का मुली पळवाव्या, विकाव्या ? कोठे हे पाप फेडाल ? किती आहे कर्ज ? मी सारे फेडतो. पुन्हा कर्ज नका करू. जरा बेताने वागा. उद्या खटला झाला तर काय होईल ? माझ्या तोंडाला काळिमा. चित्रा, तू माझ्याबरोबर चल बेटा. मुंबईला पुष्कळ आमदार माझ्या ओळखीचे आहेत. हिंदू आमदार. त्यांच्याकडे तुला नेतो. तुझ्या पित्याचा व पतीचा शोध करतो. हो. दिलावर, फातमा होती म्हणून ही गरीब गाय वाचली. तिची क्षमा माग. तिला चोळीबांगडी दे. तू आता तिचा भाऊ हो. ती तुझी बहीण मान. दरसाल दिवाळीला तिला भाऊबीज पाठव. भेट पाठव."

 दिलावरने माफी मागितलो. फातमाने आणून ठेविलेली भेट त्याने चित्राला दिली. सर्वांना आनंद झाला. फातमा व चित्रा दोघी निघून गेल्या. आमदार व दिलावर बोलतबोलत घोरू लागले.