Jump to content

चित्रा नि चारू/आनंदी आनंद

विकिस्रोत कडून
आ नं दी
आ नं द

♣ * * * * * * ♣







 चित्राला घेऊन आमदार हसन मुंबईस आले. ते आपल्या ओळखीच्या एका हिंदू आमदाराकडे गेले. गोविंदराव त्यांचे नाव. " गोविंदराव, ही घ्या तुमची धर्मभगिनी. हिच्या आईबापांचा मी शोध लावीपर्यंत ही तुमच्याकडे असू दे." आमदार हसन म्हणाले.

 "हसनसाहेब, हिंदूंनी मुसलमानांस नावे ठेविली म्हणजे मुसलमान रागावतात. परंतु हे पाहिलेत ना प्रकार ?” गोविंदराव जरा खोचून म्हणाले.

 " परंतु गोविंदराव, चित्राला एक मुसलमान तुमच्याकडे आणून पोचवीत आहे. एका मुसलमान मुलीनेच तिला वाचवले. एका मुसलमान मोलकरणीने तिचे रक्षण केले, या गोष्टी का विसरता ?" आमदार हसन म्हणाले.

 "मुसलमानांचा काय दोष? माझ्या सासूनेच जर गुंड बोलावून त्यांच्या हवाली मला केले, तर त्या गुंडांना तरी कशी नावे ठेवावी ? तेही पोटासाठी करतात. बायका-मुली पळवून बड्याबड्या नबाबांना व श्रीमंतांना विकतात. असो. देवाने मला वाचवले. सासूने मुसलमानांच्या हवाली केले. मुसलमान बंधूनी पुन्हा हिंदूंच्या हाती मला आणून दिले आहे."

 "गोविंदराव, मी जातो. हिचे वडील मामलेदार होते."

 "मामलेदार ? काय नाव ?"

 "बळवंतराव. " चित्राने सांगितले.

 "अहो वेड लागलेले बळवंतराव मामलेदार की काय ? "  "वेड लागले ? " चित्राने भिऊन धस्स होऊन विचारले.

 " अहो, येथे ठाण्याला एक वेड्यांचे हॉस्पिटल आहे. त्यात एक वेडा बळवंतराव आहे. ठाण्याला माझे एक मित्र आहेत, ते सांगतात मजा. मामलेदारच होते ते. वेडात कलेक्टरला सारखे शिव्या देतात."

 "गोविंदराव, मी ठाण्यास जाऊन येतो. मी फातमास शब्द दिला आहे, की तुझ्या मैत्रिणीची सर्व व्यवस्था केल्याशिवाय मी राहाणार नाही. जातो मी. माहिती मिळताच येईन."

 असे म्हणून आमदार हसन ठाण्यास आले. ते त्या वेड्यांच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांना भेटले. तो तेच बळवंतराव असे ठरले. हसनसाहेबांस आनंद झाला.

 “ त्यांच्या पत्नी, मुलेबाळे येथे जवळच राहातात. त्यांचा गडी भोजू येथे येतो. असा गडी पाहिला नाही बोवा. धन्याचे सारे कुटुंब जणू तो पोशीत आहे. धन्य त्या भोजूची. गरीब माणसे व फार न शिकलेली. परंतु हसनसाहेब, किती उदात्तता त्यांच्या जीवनात आढळते !" डॉक्टर म्हणाले.

 "आमच्या फातमाचीही मोलकरीण पाहा ना. बळवंतरावांच्या घरचा रस्ता कोणी दाखवील का ? "

 "याच मोटारीतून तुम्हाला पोचवतो."

 "आभारी आहे, डॉक्टरसाहेब. "

 "अहो आभार कसचे ? आम्ही सर्वांनी तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही एका हिंदू मुलीसाठी किती ही खटपट चालविली आहे ! चला. "

 मोटारीतून दोघे दत्तमंदिरात आले. दत्तमंदिरातील डॉक्टर मोटारचा आवाज ऐकून बाहेर आले, तो वेड्यांच्या दवाखान्याचे डॉक्टर !

 "काय डॉक्टर ! "

 "आता इकडे कोठे आलेत ?"

 "बळवंतरावांची मंडळी येथे राहातात ना ? त्यांच्या मुलीचा शोध लागला आहे. ती मुंबईस सुरक्षित आहे."

 "त्या पलीकडच्या खोलीत त्या राहातात. चला, मी येतो."  सीताबाई जप करीत होत्या. मुले शाळेत गेलो होतो. भोजू दुकानात सामान आणायला गेला होता.

 "सीताबाई. "

 "कोण ? "

 "मी डॉक्टर. "

 " काय हो डॉक्टर ? "

 "हे हॉस्पिटलचे डॉक्टर आले आहेत. त्यांच्याबरोबर हे एक मुसलमान आमदार आहेत. तुमची चित्रा सापडली. "

 "सापडली ?

 “होय हो."

 त्या मातेच्या डोळ्यात पाणी आले.

 "देव पावला. आता यांचे वेड जाईल ना डॉक्टर ? "

 “होय हो. परंतु बातमी एकदम नाही सांगायची. मनाची तयारी करायची." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.

 "चित्राला येथे आणू ? " आमदारांनी विचारले.

 "हो." सीताबाई म्हणाल्या.

 "आणि मुलीचे यजमान कोठे आहेत ?"

 "तेही तिचा शोध करीत हिंडत आहेत."

 "आपण वर्तमानपत्रात देऊ. म्हणजे ते असतील तेथे वाचतील. येतील. सारे गोड होईल आई. तुमची मुलगी शुद्ध, पवित्र आहे. तिचे शील निष्कलंक आहे. कसली शंका नको. आले होते दुर्दैव. गेले ! "

 " देवाची कृपा."

 "अच्छा. जातो मी."

 "बसा हो. सरबत तरी घ्या. बसा डॉक्टर, तुम्हीही बसा डॉक्टर."

 तिघे बसले. इतक्यात भोजूही आला.

 "हा हो भोजू." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले. भोजूने आमदारसाहेबांस प्रणाम केला. सरबताचे पेले भोजूने सर्वांना आणून दिले. नंतर लवंग, सुपारी, वेलदोडा देण्यात आला.

 "जातो हो आई. " आमदार म्हणाले.  "तुमचे फार उपकार." सीताबाई म्हणाल्या.

 "अहो, तुमच्या चित्राच्या मैत्रिणीचा मी बाप, उपकार कसले ? "

 "फातमाचे का तुम्ही वडील ?”

 " हो."

 "फातमाचे आजोबा फार प्रेमळ. फातमा कितीदा यायची माझ्याकुडे. सारे सुरळीत झाले म्हणजे या हो. जेवायलाच या. फातमालाही आणा."

 "आणीन हो."

 आमदारसाहेब गेले. त्यांनी ताबडतोब वर्तमानपत्रांतून बातमी दिली. भोजू आनंदला. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बळवंतरावांचे मन हळूहळू चित्राच्या दर्शनार्थ तयार केले.

 "केव्हा येईल चित्रा ?"

 "आज येणार होती. गाडी चुकली असेल. पण येईल. आता वेड नाही ना?"

 "कसले वेड ? आली का चित्रा ?"

 "येणार आहे. पडा."

 असे चालले होते आणि चित्रा आली. गोविंदराव घेऊन आले. बरोबर आमदार हसनही होते. बळवंतरावांनी एकदम चित्राला हृदयाशी धरले.

 " चित्रा, आलीस ? आता सारे ठीक होईल. तू म्हणजे आमचे भाग्य, आमचा आनंद. " बळवंतराव म्हणाले.

 आणि तुमची मामलेदारीही तुम्हाला परत मिळेल. आम्ही खटपट केली आहे. मुलगी हरवल्यामुळे मेंदू भ्रमिष्ट झाला ; म्हणून कामाचे स्मरण राहीना, मुलगी हरवण्यापूर्वीचा कामाचा रेकॉर्ड पाहा, वगैरे बाजू आम्ही मांडली. काळजी नका करू. सारे ठीक होईल." गोविंदराव म्हणाले.

 "चित्रा आली, आता भाग्यही येईल. आता सारे ठीक होईल. चारू कोठे आहे ?"  "वर्तमानपत्रात ' चित्रा सापडली. चारू, तू परत ये. अमूक पत्त्यावर ये.' असे दिले आहे. येईल हो चारू. निश्चित राहा. मनाला आता त्रास नका देऊ. " आमदार हसन गोड वाणीने म्हणाले.

 "चल चित्रा, ने मला." बळवंतराव म्हणाले.

 "आधी माझ्याकडे सारे चहा घ्या." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.

 "डॉक्टर, तुमचे उपकार. तुम्ही बाबांची काळजी घेतलीत." चित्रा डोळे भरून येऊन म्हणाली.

 डॉक्टरांकडे चहा होऊन चित्रा, बळवंतराव दत्तमंदिरात आली. आमदार हसन व गोविंदराव मुंबईस गेले.

 बळवंतरावांची स्मृती आली. त्यांनी आमदारांच्या सल्ल्याने वरपर्यंत अर्ज वगैरे करून अन्यायाची दाद लावून घेतली. पुन्हा मामलेदारी मिळाली. ते कामावर रुजू झाले. ठाण्याहून येताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर व दत्तमंदिरातील प्रेमळ डॉक्टर यांना भेटी दिल्या. दत्ताच्या मूर्तीसही एक सुंदर अलंकार करून दिला.

 एके दिवशी चारू आला. त्या वेळेस चित्रा एकटीच खोलीत होती. रडत होती. बळवंतराव कामावर गेले होते. मुले शाळेत गेली होती. सीताबाई झोपल्या होत्या. भोजूही झोपला होता. आणि चारू आला. चित्रासमोर उभा राहिला.

 "चित्रा ! " त्याने मंजूळ हाक मारली.

 "चारू, माझा चारू ! आला, चारू आला !"

 दोघांना अत्यानंद झाला. काय बोलणार? त्यांच्या त्या स्थितीचे कोण वर्णन करील?

 "आईला सांगते हो चारू. आता जाऊ नको कोठे."

 "तूच गेली होतीस मला सोडून."

 घरात सर्वांना कळले. भोजू धावतच कचेरीत गेला व सांगून आला. रावसाहेब घरी आले. चारू त्यांच्या पाया पडला, देवाला गूळ ठेवण्यात आला. सर्वांना आनंद झाला.

 बळवंतरावांनी मोठा सत्यनारायण केला. साऱ्या गावाला प्रसाद वाटण्यात आला.  "चित्रा, आपण जाऊ."

 "चला."

 "परंतु माझी आई आहे हो."

 "पुत्रशोकाने त्यांचा पुनर्जन्म झाला असेल. किती झाले तरी मातृहृदय ते. चला जाऊ. मला भीती नाही वाटत आणि तू जवळ आहेस. खरे ना?" सर्वांचा निरोप घेऊन चित्रा व चारू आपल्या गोंडगावला आली. रात्रीची वेळ होती.

 "आई !' चारूने हाक मारली.

 "आल्ये रे. चारू आला ! " आईने हाक दिली. ती धावत आली. कडी काढण्यात आली.

 "दारात उभी राहा. मीठमोहऱ्या टाकते हो." असे म्हणून माता घरात गेली. मीठमोहऱ्या घेऊन आली. त्या ओवाळून टाकण्यात आल्या. मुलगा व सून घरात आली. वृद्ध पिताही उठून खाली आला.

 "बाबा, पाया पडतो." चारू म्हणाला.

 "मामंजी, नमस्कार करत्ये." चित्रा म्हणाली.

 "जन्मसावित्री हो. पुत्रवती हो." सासरा सकंप म्हणाला.

 "आई, नमस्कार करत्ये." चित्रा म्हणाली.

 " तुझी आता खरीखुरी आई होईन हो. आता नाही हो राग करणार ! चित्रा, चारू क्षमा करा मला. बाळ, तू घर सोडून गेलास नि कधी गोडाला स्पर्श नाही हो केला."

 "आई, आता आपण आनंदात राहू. "

 "होय हो, राहू."

 खरेच, आनंदी आनंद झाला. सासू आता मनापासून चित्रावर प्रेम करी. ती खरी आई झाली.

 चित्राने फातमाच्या मोलकरणीसाठी शंभर रुपये फातमाकडे पाठवून दिले. फातमाला गोड पत्र लिहिले. फातेमाचेही आले.

 असे दिवस आता आनंदात जात होते. काही महिने गेले. एके दिवशी फातमाचे गोड पत्र आले होते. चित्रा वाचीत होती. मंद हास्य तिच्या तोंडावर होते. चारू दारातून पाहात होता.  "चित्रा, काय आहे त्या पत्रात ?"

 आनंदाची वार्ता फातमाने लिहिली आहे. तिला बाळ होणार आहे. तुझा पायगुण असे लिहिले आहे.

 “तू नाही वाटते तिला तुझी वार्ता कळवलीस ? "

 "बाळ पाळण्यात पडला म्हणजे कळवीन.”

 "परंतु तुझे बाळंतपण येथे करावयाचे की माहेरी ?"

 "तुझ्या मळ्यात होऊ दे माझे बाळंतपण. सीतादेवी वाल्मीकींच्या आश्रमात प्रसूत झाली. मी माझ्या फुलांच्या, केळींच्या मळ्यात होईन. हसतोस काय चारू ? "

 "तू वेडी आहेस म्हणून हसू येते."

 "वेड्या बापाची वेडी मुलगी ! खरे ना ? "

 दोघे गोड हसली. किती त्यांचे परस्परांवर प्रेम ! त्या प्रेमावर दृष्ट न पडो, चित्रा नि चारू यांचा संसार सुखाचा होवो !