चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> काळी आहें का म्हणावें मी ? कशी गोरी गोरीपान आहें ! - हो हो ! आतां आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, झालंच तर बाळे, साखळ्या, सगळे सगळे दागिने करायचे ते ! - कसा छानदार मग परकर नेसायचा, पोलकें घालायचें, अन् ठुमकत शाळेंत जायचें, नाहीं बाई ?

- शहाणी होईल बबी माझी ! 

मोठीं मोठीं बुकं वाचील ! अन् मग महाराज छोनीचं आमच्या लगीन ! - खरचं सोने, तुला नवरा काळा हवा, कीं गोरा ? - का..... ळा ! - नकोग बाई ! छबीला माझ्या कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो ! - अस्से थाटाचें लगीन करीन, कीं ज्याचें नांव तें ! आहात कुठें ! हजार रुपये हुंडा देईन, हजार ! ताशे, वाजंत्री, चौघडा - हो हो तर ! बेंडबाजासुद्धां लावायचा ! वरात पण वरात निघेल म्हणावें ! नळे, चंद्रज्योती, झाडें यांचा काय लकलकाट होईल ! - पण खरेंच गडे चिंगे, तूं मग भांडायसवरायची नाहींस ना ? जर का घरांत भांडलीच, तर पहा मग ! माणसाला कसं मुठींत ठेवायला हवें बरं का ! संसार पण संसार झाला पाहिजे ! आणि हें बघ, आपलें आधींच सांगून ठेवतें, पहिलें तुझें बाळंतपण कीं नाहीं, इथें व्हायला हवें ! पुढची करा हवीं तर खुशाल आपल्या घरी ! - मोठी दैवाची होईल चिंगी माझी ! पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला !! - पण काय ग, तुला मुलं झालेली आवडतील, का मुली ? मुली ! - नको ग बाई, कारट्यांचा मेला तो जंजाळ ! एकापेक्षां एक, असे सगळे मुलगे होतील म्हणावें, मुलगे ! - तसेंच, गाडी - घोडे, कपडालत्ता, कश्शा कश्शाला म्हणून कांही कभी पडायचं नाहीं ! - बरं बरं ! इतक्यांत नको कांहीं चढून जायला ! मोठा दिमाख दाखवते आहे मला ! - पहा, पहा ! फुगते आहे पहा कशी ! - पण कार्टे, बोलूं तर नकोस माझ्याशीं कीं अस्सा हा गालगुच्चा .... अग बाई ! .... हें ग काय ! कसें सोन्यासारखें बोलतें आहें, अन् तुं आपली .... नाय .... नाय .... उगी, उगी माझी बाय ती ....

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg