चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न/लक्ष्मीमुक्ती : मंगल सावकाराचे देणे

विकिस्रोत कडून

चार

लक्ष्मीमुक्ती : मंगल सावकाराचे देणे




 माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,
 आपल्या गावातील शंभरावर शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नावाने आपल्या जमिनीचा एक भाग करून दिला आणि लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम संपन्न केला याबद्दल आपला आणि गावाचा सन्मान करण्याकरिता मी येथे आलो आहे.
 पण आपला सन्मान मी करतो म्हणण्यापेक्षा, मला वाटते माझा स्वत:चा आपण सन्मान केला आहे. गावात एवढा अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा होत आहे. गावात सगळी साफसफाई करून, अंगणात सडे घालून, रांगोळ्या घालून, पताका लावून, रोषणाई करून आपण हा उत्सव साजरा करत आहात. अगदी दिवाळी दसऱ्याला करणार नाही असा सण आपण केलात आणि एवढ्या मंगल महोत्सवाला मला निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याचे सद्भाग्य दिलेत याबद्दल आपणा सर्व भावाबहिणींचे शतश: आभार.
 शेतकरी महिला आघाडीच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमासंबंधी मी आज बोलू इच्छितोः
 लक्ष्मीमुक्ती हा काय कार्यक्रम आहे ? ज्या गावात शंभरावर शेतकरी आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नावाने थोडीशी जमीन किंवा उत्पन्न करून देतील त्या गावाने 'लक्ष्मीमुक्ती' केली. एखाद्या गावात १०० खातेदारच नसले तर मग ८० टक्के शेतकऱ्यांनी असे केले आहे तर त्याही गावाला हा सन्मान मिळतो.
 सव्वा वर्षांपूर्वी म्हणजे २ ऑक्टोबरला १९९० रोजी मी जाहीर केले की ज्या ज्या गावात लक्ष्मीमुक्ती होईल त्या त्या गावात मी स्वतः जाऊन गावाच्या आनंदोत्सवांत सहभागी होईन; मग ते गाव भले आडवाटेला असो, दऱ्याखोऱ्यांत असो, डोंगराकपारीत असो, जंगलांत असो का वैराण माळमाथ्यावर असो. त्यावेळी माझी कल्पना अशी होती की उभ्या महाराष्ट्रात पाच-पंचवीस गावे फार तर लक्ष्मीमुक्तीची होतील. दिलेले वचन पुरे करायला फारसे सायास पडणार नाहीत.
 मोठमोठ्या विद्वानांनी, पुढाऱ्यांनी मला बजावले होते की, लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम अव्यावहारिक आहे. जमिनीच्या तुकड्याकरता शेतकरी भावाभावांत वैर माजते, डोकी फुटतात, मग स्वत:च्या बायकोच्या नावाने शेतकरी जमीन करून देतील हे निव्वळ अशक्य आहे असे अनेकांनी निक्षून सांगितले.
 पण शाब्बास मराठी शेतकऱ्यांची. त्यांनी या सगळ्या भल्या पंडितांना खोटे ठरवले. आजपर्यंत मी ४०० वर गावच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमांना हजर राहिलो. पण गावांची यादी वाढतच आहे. आजमितीला दीड हजारावर गावांची लक्ष्मीमुक्तीची तयारी झाली आहे. आणि एवढ्या सगळ्या गावांना पोचायचे कधी आणि कसे या विचाराने मी चिंताक्रांत झालो आहे.
 इतक्या गावांत मी गेलो. स्त्रियांमध्ये अपार उत्साह, पुरुषांत नाराजीचा अंशही नाही. त्यांच्या चेहऱ्यावरून कृतार्थता ओसंडून चाललेली. गावांत साफसफाई करून, सडे घालून रांगोळ्या घालून पताका लावून रोषणाई करून स्त्री-पुरुष शेतकरी हा उत्सव साजरा करतात. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या गेल्या बारा वर्षात कितीक दुःखाचे प्रसंग कोसळले. घर उजाड झाले. कधी यश मिळाले कशी अपयशाचा सामना करावा लागला. आपण हाती घेतलेले हे सतीचे वाण कसे निभावते या चिंतेने कितीकदा व्याकूळ झालो. पण लक्ष्मीमुक्तीच्या या लोकविलक्षण यशाने सगळा शीण आणि सगळे दुःख दूर होऊन जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.
 माझ्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांच्या मनांतसुद्धा लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनाविषयी खूप गोंधळ आहे. शेतीमालाला रास्त भाव हा एक कलमी कार्यक्रम सोडून संघटना कुठे वाट चुकून भरकटत तर चाललेली नाही ना अशीही शंका अनेकांच्या मनात आहे.
 काही कार्यकर्त्यांना वाटते, या लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमात काहीतरी खुबी, डावपेच आहे.
 कदाचित जमिनीची विभागणी घडवून आणून लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती सर्व शेतकऱ्यांना मिळाव्यात म्हणून साहेबांनी ही युक्ती काढली असावी असे काहींना वाटते.
 शेतकरी आंदोलनात स्त्रियांनाही भाग घेण्यास तयार करावे म्हणजे आंदोलने अधिक मोठी होतील, आंदोलकांत स्त्रिया असल्या म्हणजे लाठीमार होणार नाही गोळीबार होणार नाही. शेतकरी आंदोलनाची ताकद अश्या तऱ्हेने वाढवण्याकरता लक्ष्मीमुक्तीची शक्कल मी काढली असा काहींचा तर्क आहे.
 काहीजण म्हणतात कर्जमुक्तीच्या आंदोलनाच्या वेळी कर्जमुक्तीचे अर्ज भरण्यात आपण हयगय केली. त्यामुळे नुकसान ओढवले. या वेळी अशी चूक करायची नाही. म्हणून लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम राबवावा.
 बरेच कार्यकर्ते विचार करतात, शरद जोशी शेतीमालाच्या भावाकरता इतके झटतात, धडपडतात. त्यांना लक्ष्मीमुक्तीची हौस असेल तर त्यांच्या समाधानाकरता एवढे काम करायला काय हरकत आहे? करून टाकू या लक्ष्मीमुक्ती !
 भाषणाच्या अगदी सुरुवातीलाच मी अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमात डावपेच, युक्ती, खोटेपणा लपवाछपवी असे अजिबात काही नाही. हा अगदी निखळ आणि आरपार प्रामाणिक असा कार्यक्रम आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हा मुळी काही वेगळा कार्यक्रम नाहीच. शेतकरी संघटनेच्या, "उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव" कार्यक्रमाचाच हा एक भाग आहे. एवढेच नाही तर, अगदी निक्षून सांगतो, लक्ष्मीमुक्तीखेरीज रास्त भावाचा लढा संपूर्ण यशस्वी होणे शक्य नाही.
 आज आपल्यापुढे मी बोलणार आहे ते एवढी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी. शेतकरी संघटनेच्या दोन मूळ घोषणा कोणत्या? "शेतकरी तितुका एक एक" आणि "भीक नको, हवे घामाचे दाम" याच की नाही?
 आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. या सगळ्या मायबहिणी. या शेतकरी आहेत का नाहीत? लक्षात ठेवा मी काय विचारले. या 'शेतकरी आहेत का?' असे विचारले, 'शेतकरणी आहेत का?' असे नाही विचारले. शहरात डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीण म्हणतात, मग तिला औषधपाण्याचे औषधाइतकेही ज्ञान नसले तरीसुद्धा. वकिलाच्या बायकोला वकिलीण म्हणतात, तिला भले कायद्याचा काहीएक गंधसुद्धा नसला, तरीही. शेतकरी मायबहिणी नुसत्या शेतकऱ्याची बायको म्हणून शेतकरणी नाहीत. त्या स्वतः शेतकरी आहेत.
 शेतकरी म्हणजे कोण? ज्याचे शेतावर पोट आहे तो शेतकरी. जो शेतांत घाम गाळतो तो शेतकरी. शेतकऱ्याच्या पोटचा पोरगा मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून शेतकऱ्यांचे गळे कापायला लागला तर तो भला शेतकऱ्याच्या रक्तामांसाचा असला तरी तो शेतकरी नाही असे आपण ठामपणे मांडतो.
 या सगळ्या माझ्या मायबहिणींचे पोट शेतावर आहे, त्या शेतात घाम गाळतात. फार काय, मशागतीची आणि इतर जड कामं सोडली तर पेरणीनिंदणीपासून पार उफणणी, निवडण्या, पोती भरण्यापर्यंत सगळी कामे बहुतेक त्यातच करतात. शेतात काळ्या आईच्या अंगावर घामाचे १०० थेंब पडले तर त्यातले साठ-सत्तर थेंबतरी मायबहिणींच्या श्रमाचे असतात. म्हणजे या सगळ्या मायबहिणी शेतकरी आहेत हे नक्की.
 पण त्या शेतकरी आहेत म्हणजे शेतमालक आहे का शेतमजूर आहेत?
 शेतमालक म्हणावे तर त्यांच्या नावाने जमीन म्हणून नाही. ७-१२ च्या उताऱ्याला त्यांचे नाव नाही.
 शेतमजूर म्हणावे तर तेही मुश्किल. शेतमजूर सात-साडेसात तास काम करतात; पण ही आपली मायमाऊली पंधरा पंधरा तास राबते. दिवस नाही, रात्र नाही, ऊन नाही, पाऊस नाही. थंडी नाही वारा; नाही-राबते.
 शेतमजुराला किमान वेतन कायदा आहे. घरधनिणीला कसले किमान वेतन ? वर्षाला दोन लुगडी आणि पोटाला पुरेसे मिळाले म्हणजे धन्य झाले !
 मालकाशी पटले नाही तर मजूर दुसरीकडे काम धरेल. लक्ष्मी तर तुमच्या संकटात, आजारपणात, दुःखातसुद्धा तसं करायचा विचारही मनात आणणार नाही. अगदी मुजोर दांडग्या मालकाचीसुद्धा आताशी मजुरावर हात उगारायची हिंमत होत नाही. दोन दिवसांत तालुक्याच्या गावाहून पोलिस शिपाई येऊन धरून नेतील. पण बाईच्या बाबतीत, "पावसाने झोडपले आणि दादल्याने मारले तर तक्रार कुणाकडे करायची" अशी परिस्थिती. 'अंगावर कापड आणि पोटाला भाकर' यावर राबणाऱ्या माझ्या या मायबहिणी मजूरसुद्धा नाही. निव्वळ वेठबिगारच म्हटल्या पाहिजेत. वेठबिगारांकरतासुद्धा कायदे झालेत. पण शेतकऱ्याच्या गृहलक्ष्मीला काहीच कशाचा आधार नाही.
 शेतकरी संघटना म्हणजे काही 'शेतकरी पुरुष संघटना' नाही. मग एकूण शेतकरी समाजात संख्येने निम्म्या असलेल्या मायबहिणींच्या 'घामाच्या दामाचे' काय? त्यांच्या घामाला दाम कोण मिळवून देणार?
 शेतकरी संघटना गेल्या दहा बारा वर्षांत वाढली. गावठाणांतून राजवाड्यांत गेली. उत्तरेत पार पंजाबपर्यंत गेली. दक्षिणेत तामिळनाडूत गेली. पण शेतकऱ्याच्या घरांतल्या चुलीपर्यंत फारशी पोचली नाही.
 दहा एक वर्षांपूर्वी मला मराठवाड्यांतील एका शेतकरी बहिणीने प्रश्न केला. "भाऊ शेतीमालाला भाव मिळाला म्हणजे सगळे सुखी होतील असं तुम्ही म्हणता. शेतकरी सुखी होईल. मजुराला मजुरी मिळेल, बलुतेदाराला काम मिळेल, व्यापार-उदीम वाढेल. देश सारा भरभराटीला येईल असे तुम्ही म्हणता. पण खरं सांगा भाऊ, शेतीमालाला भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या घरच्या बाईला एखादातरी दिवस सुखाचा भेटेल का हो?"
 म्हणजे आपण सगळे शेतीमालाच्या भावाकरता आकाशपाताळ एक करीत होतो आणि ही लक्ष्मी देवाला आळवणी करीत होती शेतीमालाला भाव न मिळो म्हणून!
 आणखी एका शेतकरी बहिणीने तिच्या आयुष्याची चित्तरकथा सांगितली. डोळ्यांतून आसवं गाळीत सांगितली.
 तिला तीन भाऊ. बापाची जमीन पंधरा एकर. बाप वारल्यावर तीन भावांनी पाच पाच एकर वाटून घेतली. मुलीच्या नावाने काहीच नाही. थोरल्या भावाने जरा उजवी जमीन घेतली आणि त्याबदली बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतो म्हणाला. पोरीचे लग्न ठरले. ५००० रुपये खर्च करायचे ठरले. पण ऐन लग्नाच्या मुहूर्तावर थोरल्या भावाने काखा वर केल्या. माझ्याकडे रुपये नाहीतच तर देऊ कुठून, म्हणाला. असं घडल्यावर काय होणार? व्हायचं तेच झालं. माहेरच्या माणसांना माया नाही तर सासरची माणसं कसली कीव करतात? त्यांनी तिला माहेरी परत पाठवून दिले. रुपये घेऊन आलीस तर परत ये म्हणून तिला सांगितलं. बाई सांगत होती, 'भाऊ, माहेरी येऊन आता पंधरा वर्षं झाली. भावाच्या घरी राहते. समोर ठेवतील ते पोटात ढकलते. एखाद्या वर्षी भावाने नवे नेसूंचे घेऊन दिले तर आनंद वाटतो. नाहीतर जुन्यावरच दिवस काढायचे. आता संसाराचा विचारही मनात येत नाही. पोरांबाळांची स्वप्नंसुद्धा विरली. भावजय तोंडाची मोठी फाटकी आहे. पण तिचं बोलणं ऐकलंच नाहीसं दाखवते आणि आलेला दिवस गेला म्हणत देवाचे आभार मानते. पण भाऊ उद्याचं काय? उद्या माझे हातपाय चालेनासे झाले तर मी जाऊ कुठे आणि करू काय?'
 'गेली पंधरा वर्षे अब्रूच्या भीतीने भावाच्या आश्रयाने राहिले. याच्यापेक्षा शेजाऱ्याच्या शेतावर रोजीने गेले असते, तर काय चारपाच रु. रोज मिळाला असता. दिवसाकाठी चार आठ आणे शिल्लक टाकले असते तरी आजपर्यंत काहीतरी पैसे आधाराला साठले असते. भावाकडे राहिले म्हणून आज माझी स्थिती अशी की अंगावरची कापडं आणि पोटात सकाळी ढकलेली भाकर याखेरीज माझं म्हणून या उभ्या जगात काहीच नाही.'
 महाराष्ट्र तर गरीब आहे. पण पंजाब तर मोठा सुजलाम् सुफलाम् म्हणतात ना? हरितक्रांती तेथे झाली म्हणतात. शेती फायद्याची तेथेही झाली नाही; पण शेतकऱ्यांच्या हाती पैसा तर खेळू लागला? या सगळ्या संपन्नतेचा घरच्या लक्ष्मीला काय लाभ मिळाला? काहीसुद्धा नाही. उलट तिचं आयुष्य आणखीच दुःखी झालं. गावात दारू बोकाळली. पोरीबाळींना, बायामाणसांना दिवस मावळल्यावर घराच्या बाहेर पडायची चोरी झाली. शेतात कामाला बिहारची, ओरिसातील दूरदूरची माणसं आली अन् बाई घरात कोंडली गेली. तिच्याकडे आता सगळ्या माणसांच्या रोट्या भाजायची वेळ आली. अडकित्याने कडबा कापायचं काम मोठं अवजड; पण ते यायचं बाईच्या वाट्याला. अडकित्याच्या ऐवजी चॉपकटर आला. ते यंत्र बटन दाबून चालू करायचं काम मात्र हाती घेतलं पुरुषांनी. बाजरगावी डोक्यावरती अवजड ओझं घेऊन कोस कोस चालत जायचं काम बाई करी. ट्रॅक्टर चालवत बाजारला जायचं सोपं काम हाती घेतलं मर्दानी.
 सतीच्या छळाचा हा कार्यक्रम अगदी महासती सीतेपासून सुरू आहे.
 सीतेचे स्वयंवर झाले. अयोध्येची महाराणी होण्याकरितां ती सासरी आली. कैकयीने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलं. तीसुद्धा सीतेला म्हणाली, "पोरी तुझ्या अंगावरची अजून हळद उरतली नाही. तू इथेच राजवाड्यात राहा." सीतेला वनवासात जाण्याची काही सक्ती नव्हती. पण तिचा ठाम निश्चय. जिथं राम तिथं सीता. वनवासात असताना रावणाने सीतेला पळवली हा काही तिचा दोष नाही. दोष ठेवायचाच तर तो रामावर आणि लक्ष्मणावरच ठेवायला पाहिजे त्यांना तिचं संरक्षण करता आले नाही म्हणून राम-रावण युद्ध झाले. वनवास संपला. राम, लक्ष्मण, सीता अयोध्येला परतले. रामाला राज्याभिषेक झाला. राम राजा झाला. सीता महाराणी झाली आणि एक दिवस रामाचे डोके फिरले. साक्षात अग्नीने सीतेला शुद्ध ठरवले पण रामाने तिला पुन्हा वनवासात पाठवले. सीतेला जवळ ठेवायचे किंवा नाही हा रामाचा निर्णय. त्याबद्दल आपण काय बोलायचे ? पण रामापाठोपाठ चौदा वर्षे अरण्यवासात काढणाऱ्या सीतेची रामाने काय वासलात लावली? त्याच्याने एवढेसुद्धा बोलवले नाही;"बाई, मी राजा आहे. माझ्या कर्तव्यामुळे मी तुला ठेवून घेणे शक्य नाही. एवढ्या वैभवशाली अयोध्येतल्या कोणत्याही महालात तू सुखाने राहा." बाळंतपण होईपर्यंत तरी अयोध्येत दोन खोल्या सीतेला देऊ करायच्या! तेवढाही मनाचा मोठेपणा पुरुषोत्तम रामाला दाखवता आला नाही. सीता वनवासात आली. यवतमाळ जिल्ह्यातल्या, राळेगाव तालुक्यातल्या रावेरी गावी थांबली. एका खोपटात लवकुशांचा जन्म झाला. बाळंतपणानंतर पथ्याकरता म्हणून सीता गावकऱ्यांकडे पसाभर गहू मागायला गेली. एक काळच्या महाराणी महासती सीतेला पदर पसरून भीक मागावी लागली. गावकऱ्यांनी तेवढी भीकसुद्धा घातली नाही. लोककथा सांगते, सीतेने गावकऱ्यांना तळतळून शाप दिला, "तुमच्या गावात गहू म्हणून पिकणार नाही." रावेरी गावचे शेतकरी सांगतात परवा-परवापर्यंत म्हणजे संकरित गव्हाचे वाण येईपर्यंत गहू म्हणून त्या गावच्या वावरांत कधी पिकलाच नाही.
 अयोध्येत रामाच्या मंदिराचा आजकाल खूप गाजावाजा चालला आहे. रामाच्या मंदिराची काय घाई आहे ? गावोगाव रामाची छोटी मोठी देवळे आहेत. निराश्रित म्हणून हजारो वर्षे महासती सीता फिरते आहे. तिला आसरा केव्हा मिळणार आहे ? भूमिकन्या सीता निर्वासित झाली. आजच्या या मायबहिणींना आसरा देण्याचा 'लक्ष्मीमुक्ती' हा कार्यक्रम आहे.
 गेली दहा बारा वर्षे मी शेतीच्या उत्पादनखर्चाचा हिशेब देशभरच्या शेतकऱ्यांना शिकवतो आहे. समजावून सांगतो आहे. आज तुम्हाला मी एक नवीन उत्पादनखर्चाचा हिशेब सांगायला आलो आहे. शेतीत होणारे प्रत्येक काम आणि प्रत्येक खर्च टिपून ठेवा म्हणून मी तुम्हाला विनवले. आज एक नवीन विनंती करतो.
 एक दिवस भल्या पहाटे लवकर उठा; म्हणजे घरची लक्ष्मी उठायच्या आधी उठा. पेन्सिल घ्या आणि ती जे जे म्हणून काम करेल ते टिपायला लागा. चुलीचं, पोतेऱ्याचं, अंगणातलं, पोरांचं, जनावरांचं, रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायचं, धुणी धुण्याचे, भांडी घासण्याचं, शेतातलं, सरपणाचं, गवऱ्याचं, जे जे काम ती करेल ती टिपून ठेवा. एवढं एक काम माझ्याकरता तुम्ही कराच. रात्री सगळी निजानीज होईपर्यंतची सगळी कामे लिहून ठेवा. पोरांना, सकाळी पावशेर दूध जास्त मिळावे म्हणून अर्ध्या रात्री उठून गुरांना ती चारा घातले तेही टिपून ठेवा.
 सांगा, तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या दररोजच्या कामाचे तास किती होतात ? पंधरा तासात तर काहीच कमी नाही. आता या सगळ्या श्रमाचे मोल काय? प्रत्येक दिवशी दोन रोजाचे काम करते, त्याची रोजी काय धरायची? सगळी कामे ती ज्या प्रेमाने, आपुलकीने, ममतेने करते त्याची किंमत शून्य धरा. तुमची, पोराबाळाची, वडीलधाऱ्यांची आजारपणात ती जी सेवा करते त्याचीही किंमत शून्य धरा. पण रोजगार हमी योजनेच्या मातीच्या पाट्या टाकणाऱ्या बाईची किमान रोजी तर तुमच्या लक्ष्मीच्या नावे लावाल का नाही?
 एक दिवसाचा हिशेब झाला रुपये ३०. तिला सुट्टी कुठली? उलट, जगाचा सण म्हणजे तिला दुप्पट उस्तवार. समजा, तुमची लक्ष्मी हळदीच्या पावलाने तुमच्या घरात आली त्याला २० वर्षे झाली. मी २० वर्षाचा हिशेब करून दाखवतो. प्रत्येक भावाने आपापल्या घरचा हिशेब मनाशी करून पाहावा. २० वर्षांच्या कामाची रोजीच झाली रु. २ लाख १० हजार. तिला मिळालं काय, अंगावर कापड आणि पोटातली भाकर. सोसयटीचं देणं एवढं थकलं असतं तर आज थकबाकी निघाली असती किती? रुपये आठ लाखाच्या वर.
 हिंदू समाजात दोन प्रकारच्या देव-देवता मानतात. मंगल देवता आणि ओंगळ देवता. मंगल देव म्हणजे विष्णू, कृष्णासारखे. त्यांना प्रसन्न केले तर ते भले करतात. पूजाअर्चा काही केली नाही तरी त्यांची काही तक्रार नसते. या उलट गावोगावचे म्हसोबा-खंडोबा या ओंगळ देवता. त्यांना जत्रेच्या दिवशी बैल दाखवला नाही की आटोपलाच कारभार. सगळी माणसं ओंगळ देवतांची मर्जी संपादायला धावतात. मंगल देवतांकडे कोणी लक्ष देत नाही.
 सोसायट्या, बँका हे सगळे ओंगळ सावकार. तगादे लावतात, जीप पाठवून भांडी उचलतात, कोर्टात जातात, जप्ती करवतात. त्यांची कर्ज फेडण्याकरता आपण जिवाचा आकांत करतो. घरची लक्ष्मी सावकार खरी. थोड्याथोडक्या रकमेची नव्इहे, चांगली ८-१० लाखाच्या कर्जाची. पण ती काहीच तगादा लावत नाही. उलट इतर सावकाराचं कर्ज भागवण्याकरता अंगावरचे दागिनेसुद्धा प्रसंगी उतरून देते. या मंगल सावकाराचं कर्ज फेडण्याचा विचार तुम्ही कधी करणार?
 या कर्जातून मुक्त होणं महत्त्वाचं आहे. हे काम अगदी निकडीचं आहे. हे कर्ज न फेडल्याच्या पापाची किंमत, आपल्याला मोठी जबरदस्त द्यावी लागली आहे हे लक्षात ठेवा.
 शेतीमालाच्या भावाच्या लढ्यासाठी १९८४ साली आपण गावबंदीचे हत्यार काढले. गावात जे कोणी उमेदवार निवडणूक प्रचाराकरता येतील त्यांना शेतीमालाच्या भावाबद्दल बोलायला लावायचे, नाहीतर गावबंदी करायची असे आपण ठरवले. प्रत्यक्षात काय झाले ? इंदिराबाईंची हत्या झाली आणि उमेदवार आले ते डोळ्यांतून पाणी काढत आले. सरकारी धोरणामुळे आपल्या पोराबाळांची दैना झाली हे मायबहिणी विसरून गेल्या. "बिच्याऱ्याची माय मेली त्याला मत द्या." म्हणून त्यांनी राजीव गांधींना प्रचंड मतानं विजयी केलं. गावबंदी अयशस्वी झाली.
 १९८९ मध्ये पुन्हा तेच घडलं. सीतामाईला वनवासात धाडणाऱ्या रामाच्या देवळाच्या बाजूनं मायबहिणी गेल्या. कर्जमुक्तीचे, शेतीमालाच्या भावाचे त्यांना काही अप्रूप वाटले नाही. त्यांचे काय चुकले? शेतीमालाला भाव मिळाल्यामुळे त्यांच्या वेठबिगारात काही फरक पडणार आहे अशी त्यांना काही आशाच वाटत नाही तर त्यांनी आपल्या आंदोलनाच्या बाजूने का नेटाने उभे राहावे?  आपण घामाचे दाम मागतो. पण घरच्या लक्ष्मीच्या घामाची किंमत करत नाही. शेतकऱ्यांना इतर नागरिकांप्रमाचे सन्मानाने जगायला मिळाले पाहिजे असे म्हणतो पण घरातल्या लक्ष्मीला गुलामासारखे वागवतो. अशा खोटेपणाला यश कसे लाभेल? कापसाचा भाव मागायचा आणि राजीवस्त्रे घालून मिरवायचे अशासारखाच हा खोटेपणा झाला. घरच्या लक्ष्मीचा मान राखला नाही तर बाहेरची लक्ष्मी घरात यायची कशी? आणि आली तरी टिकायची कशी?
 लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम म्हणजे काय हे आता स्पष्ट होऊ लागले असेल. घरच्या लक्ष्मीच्या कर्जातून मुक्त होण्याचा हा कार्यक्रम आहे. या एवढ्या लाखालाखांच्या कर्जातून मुक्त व्हायचे कसे? आणि कोणत्या जन्मी? देवाच्या देण्यातून आपण कसे मोकळे होतो ? तो आपल्याला हवा देतो, पाणी देतो, अन्न देतो, आकाश देतो, धरती देतो. त्याच्या ऋणातून आपण कसे मोकळे होतो? तोंडात घास टाकण्याआधी त्याला आपण नैवेद्य दाखवतो. म्हणतो बाबा हे सगळं तुझ्यामुळे आहे. झटकन देवाचं देणं फिटतं.
 लक्ष्मीमुक्ती हा कार्यक्रम असा नैवेद्याचा आहे. शेतकरी त्याच्या लक्ष्मीला म्हणतो, "बाई, माझ्या गरिबाच्या संसारात तू हळदीच्या पावलांनी आलीस. तुझी काहीच हौस मौज घरात झाली नाही. आल्यागेल्या पै-पाहुण्याचं तू काही कमी पडू दिलं नाहीस. मी तुला वेडेवाकडे बोललो. काही वेळा हातही उगारला. तुझ्या सगळ्या कष्टांची आणि त्यागाची आज मी कृतज्ञतापूर्वक आठवण करतो आणि या एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याचा तुला नैवेद्य दाखवतो."
 लक्ष्मीमुक्ती करणारे गाव कोठेही असो- आडवाटेला असो, दऱ्याखोऱ्यांत असो, डोंगरकपारीत असो, जंगलात असो वा वैराण माळमाथ्यावर असो तेथे जाण्याचे मी का मान्य केले हे आता तुम्हाला समजले असेल.
 लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमांत सहभागी झालेल्या या लक्षावधी शेतकऱ्यांनी काय केलं थोडक्यात सांगू?
 रामाला जे धनुष्य पेलले नाही ते धनुष्य या बहाद्दरांनी उचलून दाखवले म्हणून हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी मी तुमच्या गावात आलो.
 भूमिकन्या सीतेला जे भाग्य लाभले नाही ते लक्ष्मीमुक्तीच्या प्रत्येक गावातील शंभरेक मायबहिणींना लाभले त्याचा आनंदसोहळा पाहण्यासाठी मी गावागावांत आनंदाने फिरतो आहे.

(शेतकरी संघटक, २१ फेब्रुवारी १९९२)

■ ■