चतुःश्लोकी भागवत/नारदाचें दर्शन
ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होतां अनुतापता । तेथें निजभाग्यें स्वभावतां । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥
व्यास जंव उघडी नयन । तंव पुढें देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धांवोनी लोटांगण सदभावें घाली ॥५४॥
उपविष्ट होतां वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदें चरणक्षालन । केलें पूजन ज्ञानोपचारीं ॥५५॥
पुष्पांजुळी प्रदक्षिणा । तुळसीपत्रें वाहुनी चरणां । नारदीं भगवदभावना । करुनी पूजना प्रार्थितसे ॥५६॥
व्यास ह्नणे अहो स्वामी । जगीं परमभाग्याचा मी । स्वयें कृपा केली तुह्मीं । आजि सुखसंगमीं निवालों असें ॥५७॥
ऐशी विनंती प्रीतीकरुनी । धांवोनि लागलासे चरणीं । त्यासी आदरें नारदमुनी । सन्मानुनी उठवी अत्याल्हादें ॥५८॥
मग बैसोनियां सावचित्त । व्यास निवेदी मनोगत । म्यां स्वयें कथिलें ज्ञानमथित । परी समाधान चित्त माझें नपवे ॥५९॥
जो मी लौकिकीं अतिसज्ञान । तो मी निजस्वार्था अतिअज्ञान । माझ्या ज्ञातेपणाचे भूषण । तेंचि दूषण मज माझें ॥८६०॥
भीतरीं मूर्ख बाहेरी ज्ञाता । हें ज्ञातेपण निजघाता । तें मी वेदशास्त्रपुराणकर्ता । निजस्वार्था अतिअंध झालों ॥६१॥
अंतरीं नाहीं सुखसमाधान । जळो जळो तें ज्ञातेपण । ऐसें नारदासी सांगोन पूर्ण । झाला अनन्यशरण श्रीव्यास तो ॥६२॥
तंव नारद ह्नणे व्यासासी । केलें अत्युत्तम ग्रंथासी । जेणें विश्रांति होय वक्तयासी । त्या ग्रंथार्थासी नोळखसी ॥६३॥
स्वधर्मकर्तव्यें व्यवहाररीती । हेंचि निरुपिलें तुवां ग्रंथीं । परी भगवंताची निजस्थिती । ती ग्रंथार्थी प्रतिपादिली नसे ॥६४॥
सच्चिदानंदप्रभावासी । नाहीं वर्णिलें श्रीवासुदेवासी । तंव विश्रांति नव्हे वाचेसी । मां वक्तयासी सुख कैचें ॥६५॥
जो जगाचें निजजीवन । जो प्रतिपाद्य श्रीजनार्दन । नाहीं वर्णिला चैतन्यघन । तंव वक्तया संपूर्णं सुख कैचें ॥६६॥
ज्याचेनी जग होय सुखरुप । तो जनार्दन सुखस्वरुप । त्याचें न वर्णितां निजस्वरुप । वक्तयासी अल्प विश्रांती नुपजे ॥६७॥
जें वक्तयासी होय निजसुख । त्रिलोकीं कोंदे हरिख । ऐसा अत्यंत अलोलिक । तुज मी अवश्यक सांगेन आतां ॥६८॥
श्रोते वक्ते सुखरुप होती । जगीं प्रगटे परमशांती । ऐसी भगवंताची निजस्थिती । ते मी तुजप्रती सांगेन पां ॥६९॥
ज्याचें स्मरतां एक नाम । निर्दाळी सकळ कर्माकर्म । त्या पुरुषोत्तमाचें निजवर्म । गुह्यज्ञान परम सांगेन व्यासा ॥८७०॥
जेथें शब्देंसी वक्ता निवे । श्रवणेंसी श्रोता विसांवे । सुखासही निजसुख फावे । अनुभवा निजानुभवें निघती दोंदें ॥७१॥
जेणें शिवाचें पुरे कोड । जें गोडाचें निजगोड । जेणें वोसरे संसारकाबाड । सुखसुरवाड सांगेन तें ॥७२॥
जेणें तुटे ज्ञानाभिमान । जेणें कोंदाटे चैतन्यघन । ऐसें जें गुह्याचें गुह्यज्ञान । तें तुज सांगेन परात्पर मी ॥७३॥
जें भावार्थे घेतां वचन । जन जनार्दना अभिन्न । श्रोता वक्ता होय आपण । तें गुह्यज्ञान अवधारी तूं ॥७४॥
कैसें व्यासाचें शुद्धमन । नारद ज्ञाता मी काय अज्ञान । ऐसा नधरीच ज्ञानाभिमान । यालागीं तुष्टमन नारद झाला ॥७५॥
जेणें जपतपाची श्रृंखळा तुटे । ध्येयध्यानाचें बिरडें फिटे । कर्माकर्माचें खत फाटे । तें वर्म गोमटे अवधारी पां ॥७६॥
जेणें अहंतेचें मूळ उपडे । अविद्येचें आयुष्य खंडे । अंगें ब्रह्म होइजे रोकडें । तें ज्ञान धडफुडें अवधारी पैं ॥७७॥
निजकृपें श्रीनारद । परमप्रीती अतिआल्हाद । व्यासासी वचनानुबोध । परमानंदें निववीत असे ॥७८॥
श्रीनारायणें निजानंद । परमेष्ठीसी केला बोध । तेणें ब्रह्मा पावे परमानंद । स्वानंदकंद सदोदित ॥७९॥
ऐसिया निजानुभवासी । ब्रह्मा अर्पी निजपुत्रासी । तेणें तो नारददेवर्षी । सुखस्वानंदेंसी डुल्लत असे ॥८८०॥
भुक्ति मुक्ति भगवद्भक्ती । नित्य नारदातें वोळंगती । येवढी स्वरुपाची प्राप्ती । अगाधस्थिती पावला ॥८१॥
भुक्ति नारदाचे पायीं घोळे । मुक्ति त्याचे चरणीं लोळे । भक्ति त्याचेनी धाकें पळे । करी सोवळें निजशिवातें ॥८२॥
काम नारदापुढें पळे । काळ त्याच्या तोडरीं रुळे । हरिहरांचेनी भावबळें । इंद्रादि पादकमळें वंदिती सदा ॥८३॥
सदा देवांचा आवडता । नित्य दैत्यांचा पढियंता । ज्याचे मुखींची स्वभाववार्ता । नुल्लंघ्य सर्वथा हरिहरांसी ॥८४॥
शुक्र लागे ज्याचे चरणी । बृहस्पति त्यातें मस्तकीं मानी । यापरी गा नारदमुनी । वंद्य त्रिभुवनीं सुरां असुरां ॥८५॥
नारदा रावणासी आप्तता । शेखीं रामाचा पढियंता । नारद शिवाचा आवडता । तो त्रिपुरासी तत्त्वतां एकांत चाळी ॥८६॥
श्रीकृष्णनारद एकांतविधी । त्यातें कालयवन पुसे बुद्धी । ज्यातें जरासंघ नित्य वंदी । तो कृष्णसभेमधीं आत्मत्वें पूज्य ॥८७॥
जेथें अत्यंत विषमता । तेथें नारदासी नित्य समता । तेथे समसाम्यसमानता । व्यासासी तत्त्वतां निजबोधक ॥८८॥
तो पाराशर तपतेजस । सरस्वतीतीरींचा निजहंस । परब्रह्मध्यानीं ध्यानस्थ व्यास । त्यासी करी उपदेश श्रीनारद तो ॥८९॥
ध्यानध्यातृत्वभेद । फोडोनी जो सच्चिदानंद । तोचि श्लोकार्थीचा अर्थबोध । व्यासासी श्रीनारद बोध सांगे ॥८९०॥
कानावचना होतां भेटी । व्यास स्वबोधेंसी स्वयें उठी । श्रीनारदाचे गोष्टीसाठीं । पडली मिठी परब्रह्मीं ॥९१॥
ज्या दादुल्याचें वचन । निर्दळुनी ध्यातें मन । ध्याता केला चैतन्यघन । हा प्रताप पूर्ण सदगुरुवचनीं ॥९२॥
तेंचि वाक्य इतर सांगती । परी तेथें नव्हे अर्थप्राप्ती । बाप सदगुरुवाक्याची ख्याती । वचनींच प्राप्ती पर ब्रह्माची ॥९३॥
हो कां वचनामाजीं आईतें । ब्रह्म बांधोनी आलें होतें । हाही अर्थ नघडे येथें । गुरुवाक्यचि निश्चितें परिपूर्ण ब्रम्ह ॥९४॥
वस्तुवेगळें वचन राहे । मां त्यामाजीं वस्तु बांधिली जाये । वस्तु वचनासी सबाह्य आहे । एवं गुरुवाक्य होय परिपूर्ण ब्रम्ह ॥९५॥
गुरुवाक्याचें अक्षर । तें क्षराक्षरातीत परमपर । यालागीं गा साचार । ब्रम्हपरात्पर सदगुरुवाक्य ॥९६॥
वचन वाक्य आणिक वक्ता । तिहींसी गुरुवाक्यें एकात्मता । यालागीं जाण पां तत्त्वतां । गुरुवाक्य वस्तुता परिपूर्ण ब्रह्म ॥९७॥
गुरुवाक्य चैतन्यघन । सदगुरु तो ब्रम्ह परिपूर्ण । हे श्रीव्यासासी बाणली खूण । आपणा आपण विसरला मग ॥९८॥
विसरला तो ध्येयध्यान । विसरला तो ज्ञेयज्ञान । विसरला तो मीतूंपण । देहीचें देहपण देहधर्म विसरे ॥९९॥
विसरला तो कर्मधर्म । विसरला तो नित्यनेम । विसरला तो जपहोम । पूर्ण परब्रम्ह कोंदाटलें ॥९००॥
नाठवे सज्ञानमंहती । नाठवे महाकवित्वाची व्युत्पत्ती । नाठवे विदेहदेहस्फूर्ती । चैतन्यस्थिती ठसावली तया ॥१॥
बाप गुरुवाक्याचा निजबोध । निःशेषें निरसला जीवभेद । पूर्ण कोंदला परमानंद । स्वानंदकंद निजबोधेंसी ॥२॥
ऐसा पावतां निजबोध । विसरला गुरुशिष्यत्वभेद । श्रीव्यास आणि श्रीनारद । झाले एकचित्तबोध निजात्मरुपें ॥३॥
यापरी श्रीभागवत । दशलक्षण अर्थयुक्त । नारदें व्यासासी यथोक्त । पूर्ण परमार्थ प्रबोधिला ॥४॥
कृपापूर्ण पौर्णिमाद्वारें । सदगुरुप्रबोधबोधचंद्रें । निजानंदें अमृतकरें । निवविलें पुरें निजशिष्यातें ॥५॥
निरसुनी अविद्याअंधार । दवडुनी अहंसोहविकार । फेडिलें मुक्तीचें भुरर । सदगुरुभास्करअरुणोदयीं ॥६॥
सूर्यकिरणाचे संघातें । अंधारचि प्रकाशाआतें । तेवीं गुरुवाक्यभास्वतें । संसार सुनिश्चितें परब्रह्म केला ॥७॥
इतर सूर्य अस्तमाना जाय । गुरुसूर्य तैसा नव्हे । जो उगवतांची पाहे । उदयास्त खाय निजांगतेजें ॥८॥
जेवीं चंद्रकरअंगसंगें । चकोर निवाला डोलोंलागे । तेवीं गुरुवाक्यसंयोगें । श्रीव्यास सर्वांगें सुखरुप जाहला ॥९॥
तेणें सुखाचेनि स्वानंदें । सदगुरुकृपा पूर्ण बोधें । चतुःश्लोकींचीं अगाध पदें । दशलक्षणशुद्धें वर्णिलीं व्यासें ॥९१०॥
प्रथमस्कंधीं आरंभभाव । द्वितीयस्कंधी साधिला आव । तृतीयापासूनी नवलाव । लक्षणान्वयभाव लाविला असे ॥११॥
तृतीयस्कंधीं सर्गलक्षण । चतुर्थस्कंधीं विसर्ग जाण । पंचमस्कंधीं बोलिलें स्थान । षष्ठीं तें पोषण प्रतिपादिलें ॥१२॥
सप्तमस्कंधी बोलिली ऊती । अष्टमीं मन्वंतरांची गती । ईशानुकथनाची स्थिती । जाण निश्चिती नवमामाजीं ॥१३॥
दशमी बोलिला निरोध । एकादशी मोक्षपद । द्वादशीं आश्रय अतिशुद्ध । एवं लक्षणें विशद व्यासें केलीं ॥१४॥
जैसें वटबीज अणुमात्र । त्याचाचि होय वृक्ष थोर । तैसा चतुः श्लोकींचा विचार । श्रीव्यासें साचार विस्तारला ॥१५॥
व्यास कवि हाचि माळी । भूमिका शोधोनि वैराग्यहलीं । गुरुकृपाजीवनमेळीं । विवेकाचे आळीं वाढवी वृक्ष ॥१६॥
व्यासविंदानिया बळी । चतुः श्लोकींच्या निजमेळी । वृक्ष वाढवी समूळीं । पुष्पपल्लवफळीं सफलित ॥१७॥
पदोपदीं अतिगोड । मोक्षसुखाचे लागले घड । समूळ सगळें झाड । नित्य नूतनगोड सुस्वाद लागे ॥१८॥
नित्य नूतन याची गोडी । अवीटें विटोंनेणें चोखडी । जे सेवूं जाणती आवडी । त्यांसी बाधेना वोढी सुधैषणेची ॥१९॥
नवल या फळाची मात । त्वचा वीज नाहीं त्यांत । नमाखतां जीवाहात । नलागतां दांत सेवावें हें ॥९२०॥
हें रसनेविण रसस्वादन । सेवितां नव्हे उच्छिष्टवदन । परमानंदें तृप्त पूर्णं । गुरुभक्त सज्ञान पावती सदा ॥२१॥
एवं दशलक्षणविस्तार । द्वादशस्कंधभागवततरुवर । श्रीव्यासऋषि वदला साचार । स्वानंदनिर्भंर रस स्रवत ॥२२॥
समूळफळरुपें सदाफळ । अद्वितीय अतिरसाळ । समसाम्यसदा सरळ । समत्वें निर्मळ शाखोपशाखा ॥२३॥
शाखोपशाखाउत्पत्ति । निगमकोकिळा कूजती । आर्तभ्रमर परिभ्रमती । जिज्ञासु घालिती झेंपा फळीं ॥२४॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |