गणपतीची आरती/आरती सप्रेम जयजय स्वामी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना । तुझिया स्मरणें जाति पातकें पार्वतीनंदना । मोरया पार्वतीनंदना ॥ धृ ॥

मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण । कानी कुंड्लांची दिपकें झळकती परिपूर्ण ॥ पायीं घुंगुर वाळे घालुनी शोभती चरण । तुझिया दोंदावरी कंठी पदक घालुन ॥ १ ॥

मूषक वाहनावरी स्वारी करोनियां फिरसी । चंद्रम तुजला हांसे म्हणोनि शाप दिधलासी ॥ तेहतीस कोटी देव मिळोनि प्रार्थियलें तुजसी । दया करा महाराज उ:शाप देउनियां त्यासी ॥ २ ॥

भाद्रपद चतुर्थीचा दिवस सुदिन । त्या दिवशीं या चंद्रमाचे पाहूं नये वदन । हाच शाप दिधला त्यासी ऎका हो जन । जे जन पाहतील मुख त्यांसी दु:खपीडा जाण ॥ ३ ॥

वत्सें रक्षित असतां कृष्णें सोम पाहिला । स्यमंतक मणि जाबुवंते गृहासमिप नेला । आळ आला श्रीकृष्णावरी क्रोधातें चढला । शोधालागीं जातां तेव्हां जांबुवंत मिळाला ॥ ४ ॥

रामचंद्रे जांबुवंते होतें बोलणें । यास्तव आतां जाणे झाले युद्धाकारणें । युद्ध प्रसंग टळला तेव्हां कन्या देऊन । मणि आधन दिधला तेव्हा आले परतुन ॥ ५ ॥

सत्राजिता श्रीकृष्णाने मणि तो दिधला । असत्य भाषण करितां त्यांसी क्रोध बहु आला । सत्यभामा बोलावुनि दिधली कृष्णाला । मणि आंदण देऊनि त्यासी समाधान केला ॥ ६ ॥

गोपिकांचे गृही श्रीहरी भक्ती नवनीर । गोपी जाऊनि यशोदेपाशी सांगती वृत्तांत । कृष्ण तुझा चांडाळ येऊनि धरी अमुचा हस्त । काय सांगू यशोदे त्याची करणी अघटीत ॥ ७ ॥

ऎसी वार्ता कानी पडतां माता घाबरली । जाईनि एकदंतापाशी नवस बोलली । संकष्टीची व्रतें तुझी करीन मी आगळी ॥ ८ ॥

यशोदेचे नवस पूर्ण झाले म्हणोनिया । व्रतें तुझी नरनारी करतील मोरया । पतित मी आळशी माझी मतिमंद काया । दास म्हणे माझें मस्तक नित्य तुझे पायी ॥ ९ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.