Jump to content

गंगाजल/पाच कविता

विकिस्रोत कडून



गंगाजल / ५३

सहा :
पाच कविता

१. लाडके, हे चार दिवस
फक्त तुझे-माझे आहेत.

पदराखालून तुला पाजीत होते,
भोवताली किती माणसे होतीं,
पण तू आणि मी
एवढेच एकत्र होतों.
अगदी तशीच आपण आज असूं ये.

भोवताली तिऱ्हाईत आहेत,
पण त्यांची जाणीव नाही,
त्यांची अडचण नाहीच.

आज तूं पांघरूण घेतलें आहेस
झाकण लावून घट्ट बंद केले आहेस
दरवाजा लावून टाकला आहेस
ठोठावले म्हणजे उघडते म्हणतात
मी केव्हाची ठोठावते आहे, -
तुला ऐकू येते आहे ना?
 ५४ | गंगाजल








२.
तांबडी माती
माझा ओरबाडलेला अहंकार
शेवाळांतून वर आलेली
कोवळी पाने
म्हातार्‍या मनाच्या
हिरव्या आशा
निरभ्र निळे आकाश
जे व्हावे म्हणून मनाची
धडपड आहे ते. 

गंगाजल / ५५












सूर्य गेला
पण वर उजेड आहे,
रात्र झाली नाही
पण खाली अंधार आहे,
डोळ्यांत प्रकाश
हृदयांत काळोख
अशा ह्या मधल्या वेळेला
जीव टांगणीस लागला आहे.

उजेड गेला
वर-खाली, बाजूला सगळा अंधार
अंगाला घट्ट लपेटलेला
थंडीने गारठलेला
पुढे न सरकणारा
अढळ, अटळ
उद्या उजाडणार का?  ५६ / गंगाजल










नरभक्षक असतात ना,
ते पुरुषच नाही खात
बायकांनासुद्धा खातात.
नरभक्षक फक्त पशूच नसतात
माणसेसुद्धा असतात.
ते लहान असतात, मोठे असतात,
तरुण असतात, म्हातारे असतात.
ते एकएकटे नाही शिकार करीत
टोळी करून हेरतात
तुटून पडतात
फाडून खातात
ढेकर दिली की परत हेरू लागतात,
आता कोणाला बरं घेरावं?
बाहेरचं कोणी सुचलं नाही
तर डोळे चुकवीत एकमेकांकडे पाहतात,
कोण बरं गाफील आहे?
कोण बरं सावध नाही?
सावध डोळे एकमेकांना भेटतात,
कोण गाफील ते सांगतात
मिळाली शिकार! मिळाली शिकार! 

गंगाजल / ५७









५.
बरं का, माई-
अरे, ह्याला इतक्या वर्षांत
आजच कां आठवण झाली?
माई-
ही तर आईची हाक
बये, आजच कां बरं आलीस?
उत्तर का देत नाही तुम्ही?
आणखी कोण बरं ही पलीकडे
डोक्यावरून पदर ओढलेली?
बाई नाही, बुवाच दिसतसो आहे,
कपाळावर टोपी किती ओढली आहे -
ओळखूच येत नाही.
मी जवळ आले आहे, वाकून पाहते आहे.
हात धरले आहेत, पण तोंडच दिसत नाही,
पण हातात हात आहेत
आणि त्या हातांतून दु:खाचे लोट
माझ्यात येऊन थडकताहेत,
मला हे दु:ख सोसवत नाही,
त्याची कळ माझ्या छातींत येऊन
मला जागी करते.  ५८ / गंगाजल







आजच कां बरं ही सर्वजणं आठवलीं?
माझ्या हाकेला ओ देऊन आली देखील?
पण निघून गेली,
बोलली नाहींत.
तोंड लपवून, टेापी घालून
मी मलाच कां दडवीत होते?
माझ्या दु:खाने शेवटीं मला दुखावलेंच
सर्व नाटक
सर्व स्वप्नांतला खेळ
पण नीटसा साधला नाहीच.

अरे, वाढलंस का?
उशीर होतो आहे,
कामाचा ढीग पडला आहे.
आलें एकदाची वेळेवर
आहांत का सगळे?
दोघेदोघेजण या,
काम समजावून सांगते
आज जायच्या आधी अर्धं झालं पाहिजे.
एक समाधानाचा सुस्कारा
एक अभिमानाचं हसू 

गंगाजल / ५९









... मग नेहमीची जाणीव.
मला लौकर यायला
घाईने जेवायला
वेळेवर पोचायला
हवंच होतं का?
दुस-यानं हे काम केलं असतं
असंच केलं असतं,
दुसरा ह्या खुर्चीवर बसला असता
असाच बसला असता,
हेपण एक नाटक खेळते आहे
ते स्वप्न, हेहि स्वप्नच.
खरी जाग कधी येईल का?
आली तर सोसेल का?

१९७०