Jump to content

गंगाजल/व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता

विकिस्रोत कडून



सात :
व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता

  "अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणारांच्या मेंदूचा गुण होय," हे वाक्य कै.रघुनाथ धोंडो कर्वे आपल्या 'समाजस्वास्थ्य' मासिकाच्या पहिल्या पृष्ठावर ठळकपणे छापीत असत. त्यांचा उद्देश असा दिसतो की, हिरवा, पिवळा, तांबडा, लांब-रुंद, उंच-ठेंगणा, कडू-आंबट-गोड वगैरे गुण वस्तुनिष्ठ असतात, त्याप्रमाणे अश्लीलता हा गुण नसून तो केवळ अनुभवणार्‍या मनाचा विकार आहे. त्यांना असे म्हणावयाचे आहे की, अमकी एक कृती अश्लील आहे असे जो म्हणतो, त्याचे मनच अश्लील आहे. ह्या म्हणण्यात एका दृष्टीने तथ्य नाही, आणि एका दृष्टीने आहे- कोणत्याही गोष्टीच्या गुणधर्माचा विचार करताना अगदी पूर्णतया शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर परिणाम कदाचित वस्तूचाच गुण म्हणून म्हणता येईल. पण रंग, चव वगैरे अगदी वस्तुनिष्ठ भासणारे गुणसद्धा वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असतात. निदान व्यक्ती ज्या जीवनकोटीतील असते, त्या कोटीच्या शरीररचनेवर व मेंदूच्या ग्रहणशक्तीवर ते अवलंबून असतात. माझ्या बागेतील अमक्या-एका फुलांचा रंग तांबडा आहे असे जेव्हा मी म्हणते, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की, त्या फुलावरून परावर्तित होणाच्या काही लांबीच्या प्रकाशलहरी माझ्या (मनुष्याच्या) डोळ्यांना तांबड्या भासतात. पण त्याच वेळी त्यांच बागेत भ्रमण करणाच्या मधमाशीला तेच फूल मुळीच तांबडे दिसणार नाही. ही झाली अगदी वस्तुनिष्ठ समजल्या जाणाऱ्या गुणांची गोष्ट. इतर गुण तर बहुतेक अंशी व्यक्तिनिष्ठ किंवा समाजनिष्ठच असतात. चांगले-वाईट, सुंदर  ६४ / गंगाजल

कुरूप, इष्ट-अनिष्ट हे गुण वस्तूंना आपण सारा वेळ चिकटवीत असतो. ते वस्तूंत नसून व्यक्तींच्या मनाचेच असतात. आणि व्यक्तीचे मन बहुतेक अंशी समाजाने घडविलेले असते.

 ह्या गोष्टींना ‘गुण' याऐवजी 'मूल्य' हा शब्द बरोबर ठरेल. प्रत्येक व्यक्ती सारा वेळ मूल्यांच्या जगात वावरत असते. ही मूल्ये व्यक्तिनिष्ठ किंवा समाजनिष्ठ आहेत, म्हणून ती खरी मूल्येच नव्हेत, किंवा ती मुळी खरोखरीची अस्तित्वातच नाहीत, हे म्हणणे अतिशय चूक आहे. बाहेरील जगात असलेल्या वस्तूंच्या गुणधर्मावर मनुष्याचे व्यवहार ज्याप्रमाणे आधारलेले असतात, त्याप्रमाणे सामाजिक मूल्येही मानवी व्यवहाराला जरूर आहेत. ती असल्याशिवाय समाज राहू शकत नाही आणि समाजाशिवाय व्यक्ती ही कल्पनासुद्धा अशक्य कोटीतील आहे. अगदी साध्यासाध्या व्यवहारातसुद्धा समाजाचे अलिखित नियम मनुष्य पाळीत असतो. जीवनोपयोगी वस्तूंची देवाणघेवाण, एकत्र राहणे, शेजारी-शेजारी राहणे, खेळणे, कुटुंब या नावाखाली येणारे अनंत व गुंतागुंतीचे व्यवहार करणे, यांशिवाय राजसंस्था, शासनसंस्था, धर्मसंस्था ह्यांच्यात भागीदार असल्यामुळे करावे लागणारे व्यवहार ह्या सर्वांनाच बंधने व नियम लागू आहेत. ह्या बंधनांमुळे आणि नियमांमुळे काही तऱ्हेचे व्यवहार योग्य समजले जातात व काही अयोग्य समजले जातात. योग्य असलेल्या व्यवहारांची यादी फार करून आढळत नाही. पण अयोग्य व्यवहारांची यादी बहुतेक साक्षर समाजांतून कायद्याच्या नावाखाली केलेली आढळते. अयोग्य व्यवहार कायद्याच्या कक्षेत झाल्यास त्याबद्दल शासन काय असावे, हेही बहुतेक साक्षर समाजांत नमूद केलेले असते. पण कायद्यात न सांगितलेले किंवा ज्यांच्याबद्दल शासन स्पष्ट तर्‍हेने दिलेले नाही, असेही अयोग्य व्यवहार पुष्कळच असतात व त्याबद्दल समाज किंवा त्याचा काही भाग आपली नापसंती निरनिराळ्या तर्‍हांंनी व्यक्त करीत असतो.

 व्यवहारातील योग्यायोग्यता ही जीवनातील काही विशिष्ट महत्वाच्या विभागालाच लागू आहे, असे नाही. अगदी क्षुल्लक बाबतीतसुद्धा वागण्याच्या मर्यादा असतात. किती खावे, किती वेळा खावे, काय ल्यावे कसे ल्यावे, काय बोलावे, कसे बोलावे, चालणे कसे असावे, दृष्टी कशी असावी, येथपासून तो लग्नाच्या बायका किती असाव्या, लग्नाबाहेरचे संबंध असावे किंवा नसावे, असल्यास कुठच्या प्रमाणात, सुंदर बायकोच्या 

गंगाजल / ६५

सौदर्याचा उपयोग नोकरीत बढती मिळण्याकरिता कितपत करावा, की मुळीच करू नये, देवभक्ती करीत असतानाही आचारातील कडवटपणा किती ठेवावा, स्वत:च्या आचारावर कितपत बंधने घालावीत, कुटुंबियांच्या आवडी-निवडी, शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य यांना कितपत किंमत द्यावी, या सर्व गोष्टींना लिखित व त्यापेक्षा अधिक प्रमाणाने अलिखित मर्यादा असतात. ह्या मर्यादा समाजातील निरनिराळ्या व्यक्तींना, निरनिराळ्या असू शकतात. कुमारिकेच्या वागण्याचे नियम, सौभाग्यवतीच्या वागण्याचे नियम व विधवेच्या वागण्याचे नियम हे बऱ्याच वेळा निरनिराळे असतात. एवढेच नव्हे, तर एकाच तऱ्हेच्या नियमांची तीव्रताही निरनिराळी असू शकते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या वयांप्रमाणेही वागणुकीचे नियम निरनिराळे असतात व त्यांच्या अंमलबजावणीच्या कडकपणातही फरक पडतो.

 निरनिराळ्या वर्गातील जातींतील लोकांबद्दलचे नियम निरनिराळे असतात. सर्व तहेच्या लहानमोठ्या नियमांचे उल्लंघन निरनिराळ्या व्यक्तीकडून होत असते, व त्या व्यक्तींना बऱ्याचदा ह्या-नाही-त्या रूपात समाजाकडून धिक्कार, उपहास किंवा प्रत्यक्ष दंड अशा निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागतात. व्यवहारातील सर्वच नियम व त्यांबद्दल वाटणारी आस्था हा एका दृष्टीने संस्कृतीचा पाया आहे व दुसर्‍या दृष्टीने संस्कृतीचे कार्य आहे. समाज रचनेच्या मुळाशी असलेल्या सर्वचलहानमोठ्या नियमांना 'धर्म' ही संज्ञा देणे अयोग्य नाही. समाजधारणेचा पाया म्हणून, आणि समाजधारणा अव्याहत चालावी म्हणून जे काही लिखित आणि अलिखित नियम आहेत, त्या सर्वांना व्यापक अर्थाने 'धर्म' म्हणता येईल. त्याच व्यापक अर्थाने लग्नाच्या बायकोशी वागताना 'मी कोणत्याही समाजधर्माचे उल्लंघन करणार नाही.' अशी शपथ ‘धर्म च अर्थ च कामे च नातिचरामि' ह्या वाक्याने केलेली दिसते. ह्या वाक्यात ‘धर्म' याचा अर्थ वरील व्याख्येइतका व्यापक नसून आपण नेहमी ‘धर्म' हा शब्द जसा वापरतो, तसा संकुचित आहे. पण ‘अतिचर' म्हणजे काय, हा वादाचाविषय होतो; व समाज सारखा बदलत असल्याने समाजाची मूल्ये बदलत असतात; आणि आचार व अतिचार यांच्या मर्यादाही मागेपुढे होत असतात.

 समाजाच्या काही अवस्थांमध्ये आचार व अनाचार यांच्या मर्यादा  ६६ / गंगाजल

स्पष्ट असतात. काही अवस्थांमध्ये त्या बऱ्याच अस्पष्ट होतात. एका समाजाचा परकीय समाजाशी कोणत्याही तऱ्हेनेनिकट संबंध आला, म्हणजे आचारविचारभिन्नतेची तीव्र जाणीव होऊन ह्या मर्यादा पुसट व्हायला लागतात. उदाहरणेच द्यावयाची, तर आपल्या स्वत:च्या समाजातील देता येतील. “जाईन उभ्या बिदी। न दिसे उजवी बूज। राखील कुळ तुझं!" ह्या ओवीत मर्यादशील स्त्रीने पदर कसा घ्यावा, हे सूचित केले आहे. आजकाल कित्येक कुलवानांच्या मुली व वधू ह्यांचा पदर मुळी एकाच खांद्यावर असतो. तेव्हा ही मर्यादा बदलण्याचे कारण ज्या समाजात स्त्रिया दोन्ही खांदे उघडे टाकितात अशा समाजाशी संबंध आला, हेच आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या दोन बायका असणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण नव्हते. आता ती गोष्ट गुन्ह्याच्या सदरात जाऊन बसली आहे. हाही परिणाम संस्कृतिसंगमाचाचआहे.

 प्रत्येक समाजामध्ये आचाराचे जे नियम असतात, ते सर्वच्या-सर्वच अगदी निरपवाद नसतात. काही प्रसंगी ते नियम सैल होतात, किंवा काही वेळेपुरते अजिबात नाहीतसे होतात. उदा.- होळीच्या दिवसांत गोवरी-लाकडाची चोरी करणे पूर्वी क्षम्य मानिले जाई. तसेच, एरव्ही सभ्य वागणारे लोक त्या दिवसांत मन मानेल तसा गलिच्छपणा व शिवीगाळही करीत असत. काही प्रसंगी एरव्ही कानाला न रुचणारा विनोद आणि थट्टा क्षम्य समजली जाई. बहुतेक सर्व समाजांतून सर्वसाधारणपणे न खपणारे वर्तन काही विशिष्ट प्रसंगी करण्याची मुभा असे, आणि ही मुभाही सर्वांना नसून काही विशिष्ट वयाच्या व तऱ्हेच्या व्यक्तींना असे. हिंदू समाजातील शिमगा किंवा ख्रिस्ती समाजातील कार्निव्हल हे अशा प्रकारची बंधने शिथिल करावयाचे सण आहेत. ही बंधनांची शिथिलतासुद्धा काही तरी नियमांत बसलेली असते. ज्या वेळी कुठच्याच तऱ्हेचे नियम राहत नाहीत, कुठचे योग्य, कुठचे अयोग्य, कुठचे कर्म, कुठचे अकर्म हे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना कळेनासे होते, तेव्हा व्यक्तींच्या जीवनात भयंकर क्रांती होते. सर्व तर्‍हांंची जीवनमूल्ये विस्कटून गेली आहेत, कशाला प्रमाण म्हणून राहिले नाही, अशा अवस्थेत समाज किंवा व्यक्ती दोन्ही जगू शकत नाहीत. जुनी प्रमाणे नष्ट होऊन नवीन प्रमाणे सर्वमान्य होईपर्यंत जो वेळ जातो, तो व्यक्तीला किंवा समाजाला अतिशय कष्टाचा असतो.

 ह्याच अनुषंगाने वाङमय, कला व संप्रदाय ह्यांचा विचार होणे 

गंगाजळ / ६७

आवश्यक आहे. वाङमयाच्या इतर कार्याबरोबरच एक महत्त्वाचे कार्य म्हणजे जे साधारणपणे मिळत नाही, ते मिळाल्याचा भास उत्पन्न करणे. "बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊनिया तृप्त होई कोण?" असे जरी तुकारामबोवा म्हणाले तरी थोड्याबहुत प्रमाणात तेच कार्य वाङमय, कला आणि धर्म करीत असतात. त्याशिवाय भिका-याला राजपद मिळाल्याच्या गोष्टी सर्व जगातील वाङमयातून दिसल्याच नसत्या. जातिनिष्ठ समाजामध्ये चोखामेळ्यासारख्याला प्रत्यक्ष लाथाच बसतात. पण धर्माने त्याला मरणानंतर संतपद दिले व वैकुंठाची प्राप्ती करून दिली. बायबलमध्ये बरोबर असेच सांगितले आहे की, देवाच्या राज्यात पृथ्वीवरील उपेक्षितांना खास जागा राखून ठेविलेली असते. प्रत्येक कादंबरी, कथा किंवा काव्य हे वाचताना साधारण मनुष्य त्यांतील कलामूल्यांचा विचार करीत नाही. वाचक त्या वेळेपुरते स्वत:ला त्या-त्या प्रसंगातील नायक किंवा नायिका करतो. जितका कलेचा दर्जा खालचा तितक्या प्रमाणात अशा त-हेने स्वत:चे समाधान करणे जास्त सोपे जाते. विशेष म्हणजे हे समाधान, हे सौख्य वीट येणारे नसते. इतकेच काय, अशा त-हेचे सौख्य लाभायला व कंटाळा टाकावयाला उपाय म्हणून कलाकृती जास्त-जास्त भडक व्हावी लागते. मनुष्य खाऊन-खाऊन तात्पुरता का हाईना, तृप्त होतो. कामेच्छा कितीही प्रबळ असली, तरी तृप्तीचा क्षण प्रत्यक्ष कामपूर्तीनंतरच येतो. कितीही ताकदवान असला तरी स्वतः खेळत असताना मनुष्य दमतोच. पण चविष्ट जेवणाची वर्णने वाचून किंवा शृंगाराची वर्णने वाचून किंवा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून सौख्य झाले, तरी तृप्ती मिळत नाही. आणि ब्रेबर्न स्टेडियमवर खेळणार्‍याने कितीही श्रमाने धावा काढिल्या, तरी पाहणा-याचे पाय दुखत नाहीत. ह्यासाठी शृंगार जास्त-जास्त भडक करण्याकडे वाङमय किंवा चित्रपट याची प्रवृत्ती होऊ लागते. कलेचे सर्वच क्षेत्र वासनेचा सौदा करावयालाही फार सोयीचे ठरते.

 योग्यायोग्यतेचे नियम कलेला लागू झाले, तर कलावंताच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कलेत प्रकट होणा-या सर्जनशक्तीला बाध येतो, असे काहींचे म्हणणे आहे. आणि खरोखरच अश्लील काय व काय नाही, हे ठरविण्याची अडचण खरी हीच आहे. कलावंत-मग तो लेखक, चित्रकार, शिल्पी किंवा चित्रपटनिर्माता-कोणीही असो, नवनिर्मिती करण्याचे त्याचे कार्य एका दृष्टीने जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या कार्यासारखेच आहे. ज्याप्रमाणे विश्वाचा विचार करितांना त्याला मानवी मूल्यांची कसोटी लावणे वेडगळपणाचे ठरेल, त्याप्रमाणे थोड्या अंशाने रोजच्या व्यवहारातील योग्यायोग्यतेची कसोटी कलेला लावणेही सर्वस्वी योग्य होणार नाही. "थोड्या अंशाने सर्वस्वी योग्य होणार नाही," ही शब्दयोजना मी सहेतुक केलेली आहे. कला हा जरी व्यक्तीच्या भावनांचा, बुद्धीचा व कल्पनाशक्तीचा आविष्कार असला, व कलावंताला स्वत:ला तो अगदी सर्वस्वी व्यक्तिनिष्ठ वाटला, तरी कलेचे रूप, कलेची मूल्ये, कलावंताच जीवन ही सर्वत्र समाजाने घडविलेली अशी असतात. शिवाय, कलेचे पांघरूण घेऊन कलावंत नसलेल्या लोकांना कलेप्रमाणे भासणारे असे काहीतरी बनवून त्यापासून लोकांकडून पैसेही काढिता येतात. अश्लील वाङमयाबद्दल काही वर्षांपूर्वी बोलताना एक पोलिस अधिकारी म्हणत होते की, असे वाङमय निर्माण करणारी पुण्यातील काही मंडळी थोड्या अवधीत इतका पैसा मिळवितात की, मोठमोठे दंड भरूनही वर्षानुवर्षे त्यांना आपला धंदा चालविता येतो. यासाठी कलेच्या स्वातंत्र्याचा पुकारा करून अश्लीलतेला उत्तेजन दिल्यामुळे लोकांच्याबरोबर कलेचीही हानी होते, असे मला वाटते.

 अश्लीलता नेमकी कशात आहे, हे ठामपणाने बोट ठेवून सांगता येत नसले, तरी तो वस्तूचा गुणधर्मच नाही, म्हणून अशी काही गोष्टच नाही, असे म्हणणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे आहे. अश्लीलतेचा विचार करिताना ती निर्माण करणाऱ्यांचा हेतू, ती ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्याचा संख्या व जितका वेळ पोहोचत राहते तो काळ ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात. संस्कृत ग्रंथांतून उत्तान शृंगारिक वर्णने असली, तरी एक तर ती आनुषंगिक असतात, इतर दुसऱ्या गोष्टींबरोबर ओघाओघाने आलेली असतात, व दुसरे- सामान्य मनुष्याला ती मिळत वा समजत नाहीत. फार थोडया लोकांपर्यंत ती पोहोचतात. अशा एखाद्या ग्रंथाचे भाषांतर करिताना त्यातील इतर सृष्टी बाजूला ठेवून फक्त उत्तान शृंगाराचाच भाग चवीचवीने भाषांतरित करून पैसे मिळविण्याच्या हेतूने लोकांच्या हातात पडेल असे केले, तर हा आचार गर्हय व दंडनीयच समजला पाहिजे. दंड करणारी व्यक्ती किंवा संस्था कोणती असावी, व दंड किती असावा हे ठरविणे कठीण आहे. केवळ शिष्ट लोकांना किंवा खऱ्या रसिकांना असंमत म्हणून अशा गोष्टींवर 

गंगाजल / ६९

खाजगी रीत्या किंवा सार्वजनिक-रीत्या धिक्कार करून भागत नाही. कारण ह्या-ना-त्या उद्योगाने पैसा मिळविणाऱ्या लोकांवर सार्वजनिक धिक्काराचा परिणाम होत नाही. त्यांच्याविरुद्ध शासनसंस्थेचीच मदत घ्यावयास पाहिजे. ह्याउलट एखादा कलाकार आपल्या कलानिर्मितीत उत्कटतेच्या भरात- ती उत्कटता नुसती उपभोगाच्या आनंदाची नसून धिक्काराचीही असू शकेल, लोकांना अश्लील वाटणारी निर्मिती करून गेला. तर धिक्कार हे प्रभावी शस्त्र ठरू शकेल, किंवा त्याची निर्मिती पहिल्या दर्जाची कलाकृती असली, तर लोकांचा धिक्कार हास्यास्पद ठरेल.

 काही झाले, तरी ज्या युगात लोक हजारोंनी, स्त्री, पुरुष, तरुण, मुले- मुली अशी सरसकट-चित्रपटासारखी एखादी गोष्ट नेहमी पाहू शकतात, किवा रेडिओवरची गाणी ऐकू शकतात. किंवा १-२ आण्याला उत्तान भड़क वर्णन वाचू शकतात अशा युगात सर्वांनी मिळून वाचणे, ऐकणे, पाहणे, ह्या कुठच्याच गोष्टीत अतिचार न होण्याची खबरदारी घेतली पाहिजे.

 व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य ऐकावयाला किंवा उच्चारावयाला जितके गोड आणि सोपे. तितकेच आचरणात उतरावयाला दुष्कर आहे. हे स्वातंत्र्य कशाचे? चोरी करायचे, एखाद्याला ठार मारायचे, बायकोचा खून करायचे किवा तिला चोप द्यावयाचे? ह्या बाबतीत स्वातंत्र्य असावे असे म्हटले, तर सर्वच त्या माणसाला वेड्यात काढतील. लहान मुलांना चोरी करावयाला शिकविणे किंवा इतर तर्‍हानी कुमार्गाला लावणे हेही स्वातंत्र्य कोणी कबूल करणार नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी हीच गोष्ट धनसंचय करण्याच्या बाबतीत होती; पण आता कोठचीही राज्यसंस्था व्यक्तीला अनिर्बध धनसंचय करू देत नाही. ह्या गोष्टीमध्ये जितक्या उघडपणे समाजाची बंधने प्रतीत होतात, तितक्या उघडपणे जरी ती इतर गोष्टींत प्रतीत झाली नाहीत, तरी ती असतातच. समाजाला नवी दृष्टी देणाच्या कलाकाराला ही बंधने मोडण्याची इच्छा असली, तर त्याबद्दल होणाच्या दंडालाही त्याने तयार असले पाहिजे व उत्कृष्ट कलाकार ह्याप्रमाणे दंड सहनही करतात. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता व सार्वत्रिक बंधमुक्तता, खासच नाही. व्यक्तीच्या व्यवहारावर अति-दडपण नको, ह्यासाठी व्यक्तीची धडपड सदैव चाललेली असते. दुसऱ्या बाजुने व्यक्तीला कह्यात ठेवून समाजाचे नुकसान होऊ नये, अशी समाजाची धडपड चाललेली असते. समाज म्हणजे काही हातात शस्त्र घेऊन भांडणारा विराटपुरुष नव्हे, तर समाजाच्या मूल्यांना  ७० / गंगाजल

जपणाच्या व्यक्तीच समाजाच्या वतीने भांडत असतात. ह्या झगड्यात जुने बदलत असते. व नव्याची स्थापना होत असते. तेव्हा व्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाने वासनांच्या अमर्याद परिपोषाशिवाय ज्यात कसलाही दुसरा उद्देश नाही, अशा तऱ्हेच्या निर्मितीला मोकळीक देणे कधीही रास्त ठरणार नाही.

१९६९