Jump to content

गंगाजल/आई सापडली!

विकिस्रोत कडून



पाच :
आई सापडली!

 १ :-

 आई गेल्याला वर्ष झालं होतं, पण अजून ती कायमची गेल्यासारखी वाटत नव्हतं. एकतर तिच्या व माझ्या आजारामुळे आम्ही पूर्वीसारखी वारंवार भेटत नव्हतो, आणि दुसरं म्हणजे कित्येक महिने ती माझ्याकडे रहायला अशी आलीच नव्हती. पण अगदी खरं आतलं कारण म्हणजे अजूनही ती मला भेटायला यायची. ती येताना मला खिडकीतून दिसायची, 'माई' म्हणून तिच्या हलक्या मंजुळ आवाजात मारलेली हाक मला ऐकू यायची. मी दार उघडी. ती आली, म्हणजे आम्ही काय करीत असू, काय बोलत असू, ह्यातलं काही माझ्या लक्षात रहायचं नाही. फक्त ती येत असतानाची पांढ-या पातळातली, डोक्यावरून पदर घेतलेली तिची आकृती आज स्पष्ट दिसते व तिनं हळूच मारलेली हाकही अगदी स्पष्टपणे ऐकू येते. आम्ही दोघी काय बोलत असू, वा काय करीत असू, ते बहुधा फार समाधानाचं असावं, कारण त्या नंतरचा माझा सबंध दिवस अगदी आनंदाच्या धुंदीत जाई.

 नव्या घरी आले, आणि हे सर्व बदललं. इथं आल्यापासून आई भेटली नाही. तिनं नवं घर पाहिलं नाही. म्हणून मी मनातून खट्टू होतेच. आणि त्यातच तिच्या न येण्याची भर पडली. नवीन घरी आल्यावर घर लावण्यात, घराची सवय होण्यात एक-दोन महिने गेले. काहीतरी चुकल्या- चुकल्यासारखं वाटे, पण ते घराच्या नवीनपणामुळे असेल, असं म्हणून मी झटकून टाकी. जुन्या घरचा कोपरा-न-कोपरा कोणा-ना-कोणाच्या  ४४ / गंगाजल

आठवणीनं भरलेला होता. मामंजी जाऊन इतकी वर्ष झाली, पण एका खोलीला मुलं अजूनही 'आजोबांची खोली' म्हणतात. ताई सासरी गेली. तिची मुलगी कॉलेजात जायची वेळ आली, तरी त्या घरातील एक खोली ‘ताईची खोली' म्हणून राहिली आहे. स्वयंपाकघर व कोठी आईनं दर वेळी लावायची. सासूबाई कधी मधी येत, पण आठवण मागे ठेवून जात. त्या घरी माझीच नाही, पण इतरही मुलं वाढली होती. प्रत्येकजण काहीतरी आठवण ठेवून गेलं होतं. खालच्या जमिनीपासून वरच्या छातापर्यंत घर आठवणींनी कसं गच्च भरलं होतं. बाहेर अंगणात यावं, तरी तोच प्रकार. प्रत्येक झाडाचा खड्डा कधी खणला, व झाड कुठून आणून कधी लावलं, ते माहीत होतं. गुलाबाची बाग नाहीशी झाली होती, पण आमच्या बोलण्यात व मनात तीअजून ताजी टवटवीत होती.

 एक वेळ अशी आली की, त्या घरात मला कोंडून बांधल्यासारखं वाटायला लागलं. सगळीकडून मला काहीतरी दडपून टाकीत आहे, असा भार माझ्यावर पडला होता. भूतकाळ माझी मान दाबून राहिला होता. त्यानं माझे हात-पाय-मन जखडलं होतं. तो मला खुलेपणानं, मोकळेपणानं वावरू देत नव्हता. नुसतं घर आणि अंगण झपाटलेलं होतं असं नाही, तर सर्व परिसरच झपाटलेला होता. शेजारी मैलभरात सर्व माणसं ओळखीची. एरव्ही जी दोन हात दूर, तीही आजारीपणामुळे भेटायला यायची आणि डोकं खायची. कोणीही रस्त्यावरून जाता-जाता डोकावावं व विचारावं, "ठीक आहे ना?" सगळ्यांनाच फार आपुलकी. सर्व काही-माझ्याखेरीज - पूर्वीसारखं. मी मात्र पार बदलले होते. ही आपुलीक माझा जीव घाबरा करीत होती. चांगुलपणानं मी कासावीस झाले होते. त्या आठवणी व ती आपुलकी ह्यातून सुटण्यासाठी तर इतक्या वर्षांचं घर सोडून मी नवं घर मांडलं होतं.

 नव्या घराच्या आसपास कोणी ओळखीचं नव्हतं. दिवसादिवसांत कोणी घरी डोकावलं नाही. भेटायला लांब असलं, तरी अधूनमधून आपली माणसं एकेकदा तरी येऊन गेली. फक्त तीच आली नाही. आज पडल्या- पडल्या मी तोच विचार करीत होते. तिचा फोटो समोरच भिंतीवर होता. मी विचारलं, “बये, येत का नाहीस? मला विसरलीस का?" ती काय उत्तर देणार? पण तिचे डोळे मला विसरल्यासारखे दिसत नव्हते.

 जुन्या घरी काही काम निघालं. मला तिकडे दोन दिवस रहावं लागणार होतं. ठरल्याप्रमाणे मी गेले. माझ्या पूर्वीच्याच अंगणाशेजारच्या खोलीत अंथरूण घातलं होतं. आणि काय आश्चर्य! ती अगदी नेहमी यायची तशी आली. तिची हाक मला ऐकू आली. मी दार उघडलं. आम्ही दोघी त्यादिवशी फिरायला गेलो, एवढं आठवतं. पण कुठं गेलो, कशा गेलो, काय बोललो, हे नेहमीप्रमाणेच आठवत नाही. परत दुसऱ्या दिवशीही ती येईल, ह्या समजुतीत मी होते. पण ती आली नाही. मला परत नव्या घरी जाणं भाग होतं. इथलं काम संपलं होतं. राहण्यातही अर्थ नव्हता. ती परत कधी येईल, हे सांगता येत नव्हतं. मी कधी नव्हतं इतक्या अनिच्छेनं जुनं घरसोडलं, आणि परत नव्या घरी आले.

 त्या रात्री आणखी एक आश्चर्य घडलं. आई मला माझ्या खोलीच्या दारात दिसली. नेहमी दिसे तशीच. तिने हाक मारली, “माई!" मी खडबडून उठले व “आई!" म्हणत दाराकडे धावले. कुठली आई न कुठलं काय! माझ्या जागं होण्यानं, उतावीळपणानं आपल्या पायी आलेल्या आईला मी घालवून बसले होते. तरीही मी हिरमुसले नाही. माझ्या मनात आनंद भरून राहिला होता. आई नव्या घरी आली होती. आजच कशी आली? इतके दिवस का आली नव्हती?- मी आठवयाला लागले. दोन दिवसांपूर्वी मी जुन्या घरी गेले होते. ती भेटली. तेव्हा आपण फिरायला गेलो होतो. मी तिला इकडं आणलं होतं का? मला काही-म्हटल्या-काही आठवत नव्हतं. मी झोपेत असताना जाग्या असलेल्या मनानं ही युक्ती केलेली दिसते. तिला नवीन घर माहीत नव्हतं रस्ता सापडत नव्हता, ही साधी गोष्ट माझ्या जागेपणाच्या तार्किक व्यवहारी मनाला कळली नव्हती. पण कोणाला तरी माझी काळजी होती खास! मी जुन्या घरी गेल्यावर भेटायला आलेल्या आईला त्यानं इकडे आणलं असणार.

 काही का असेना, आईला घर सापडलं होतं, आणि मला आई सापडली होती.


 २ :-

 आज ती मला काही महिन्यांनी भेटली होती. ह्या दोन महिन्यांत तिचं कसं चाललं होतं, ती कुठं राहिली होती, वगैरे मी विचारीत होते व ती नेहमीप्रमाणे भराभर उत्तेजित स्वरात मला निरनिराळ्या हकीकती सांगत होती. सांगतासांगता ती एकदम थांबली. तिचे डोळे विस्फारले. ती मला हलवून मोठ्यानं म्हणाली,  ४६ / गंगाजल

 “तुला एक विलक्षण प्रकार सांगू का? अग, मला माझी आई सापडली!"

 ही पोर मला सात-आठ वर्षं माहीत आहे. तिची थोरली बहीण त्या वेळी माझ्या चांगली ओळखीची होती. हिचं नाव मी ऐकायची. प्रत्यक्ष पाच-सहादा पाहिली असेल, इतकंच. हिला पहिल्या वेळी पाहिलं, तेव्हा ती अठरा-एकोणीस वर्षांची असावी. जरा लठ्ठ; तोंडावर विशेष कोणताच भाव नाही; जरा अंगानं आडवी आणि तोंडावर बालमुखाची गोलाई, अशी ती मला दिसली. तिची थोरली बहीण अक्का फार हुशार, फार शांत, विचारी, वयाच्या मानानं जास्तच प्रौढ अशी होती. ह्यात काही नवल नव्हतं. ती आपल्या बापाचा आईनं अर्धवट टाकिलेला संसार संभाळीत होती.

 धाकटी पाच का सहा वर्षांची असताना, तिची आई नवऱ्याला व लहान मुलांना सोडून गेली होती. तेव्हापासून बाप, भाऊ व बहीण ह्यांना अक्कानंच संभाळलं होतं. घर मोठं स्वच्छ व व्यवस्थित ठेविल होतं. वडिलांचं ऑफिस, लहान भावांच्या शाळा ह्या वेळा साधून सगळ्यांचं जेवणखाण व्यवस्थित ठेविलं होतं. धाकटीची तर ती आईच झाली होती. नहाणं-माखणं, कपडेलत्ते सर्वच तिनं केलं. आपली आई नाही, असं धाकटीला कधी वाटलं असेल, असं दिसत नव्हतं. थोरली जितकी शांत,तितकी ही अवखळ आणि धसमुसळी. थोरली विचारी, तर ही अजून विचार करायला शिकली नव्हती. थोरलीसारखीच हुशार मात्र होती. शाळेत वरचा नंबर सुटला नाही, तसा कॉलेजात वरचा सुटला नाही, अक्कामुळे आईची वाण अशी भासली नाही, पण आई मला टाकून गेली, म्हणून तिच्याबद्दल तिरस्कार व राग मात्र मनात भरून राहिला होता. पण आयुष्यक्रम सपाट्यानं पालटला. अक्काचं लग्न झालं. एवढंच नव्हे, पण ती सातासमुद्रापलीकडं गेली. तिच्या मागोमाग दादाही अभ्यासाच्या निमित्तानं गेला. इतके दिवस अक्काच्या मायेत वाढलेली छोटी आता घरातली मोठी झाली. वडिलांना संभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली.

 अक्कानं तिला स्वैपाकपाणी सर्व शिकविलं होतं. घरकाम तिला अवघड वाटलं नाही. पण वडिलांची ओळख मात्र नव्यानं होत होती. अक्काच्या राज्यात तिला वडिलांशी बोलण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. वडिलांनी तिला कधी जवळ घेतलं आहे, कधी तिच्याशी, लहानसं का होईना, संभाषण केलं आहे, असं तिला आठवत नव्हतं. सर्व काही 

गंगाजल / ४७

अक्का-अक्का, त्यापलीकडे कधीमधी दादा, पण वडील म्हणजे घरी असणारी, जेवणारी, अक्काला कुरकुरत-कुरकुरत घरकामासाठी पैसे देणारी एक व्यक्ती, ह्यापलीकडे वडिलांबद्दल तिला काहीच माहीत नव्हतं. घरात खुर्च्या-टेबलं होती, -ती एका जागी असत,-वडील ही वस्तू तशाच तऱ्हेची पण हलणारी, चालणारी, बोलणारी होती. त्यांची कामं वेळच्या वेळी व्हावी, ह्यासाठी अक्का जपत असे, हेही तिला माहीत होतं. पण मुलं व वडील कधी बसून गप्पा मारलेल्या तिला आठवत नव्हत्या.

 घरात आईबद्दल कुणीच बोलत नसे. पण ह्या मुलांना चार दिवस मोकळेपणे जाऊन रहायला जी घरं होती, ती सर्व आजोळची, -आईचे भाऊ व आईचे आईवडील यांची! मुलं गावाला गेली की हटकून आजीकडे, नाहीतर मामाकडे जात, -शक्य तर वडिलांना न कळविता. किंवा त्यांना कळवून, -त्यांच्या कुरकुरीला न जुमानता! छोटी मातृमुखी आहे, असं आजोळी बोलत. त्यामुळे छोटीला आईबद्दल जास्तच राग येई.

 अक्का लग्न होऊन गेली, त्या वेळी छोटी अठरा वर्षांची असावी. ह्यानंतर ती मला अधूनमधून भेटायची. अठरा वर्षांची मुलं सर्वज्ञ असतात, ह्या रुबाबात तिनं मला सांगितलं होतं, “माझे बाबा म्हणजे संशोधन करणारं एक यंत्र आहे. ठरलेल्या वेळी उशीर न करिता खाणं, चहा, आंघोळीला गरम पाणी दिलं की झालं?" पण जसजसा वडिलांशी जास्त संबंध येत गेला, तसंतसं हे मूळचं वर्णन फारच बदलावं लागलं. 'मी तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, किती पैसे खर्च केले व करतो,' हे ते यंत्र बोलून दाखवू लागलं. छोटीला विचार पडे, अक्काही हेच ऐकत होती का? का हे एक नवीनच सुरू झाल आहे? मी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या,' हे वाक्य मात्र ती गप्प बसून ऐकायची नाही-, “अक्का म्हणजे तुम्ही नव्हे-", 'माहीत आहे कुणी माझ केलं ते?', “बोलून दाखविणारं असतं एक, करणारं असतं निराळंच!" अशी वाक्यं ती वडिलांना ऐकवी. कधी वडील उत्तर देत नसत, कधीकधी शब्दावरून शब्द वाढे व कडाक्याचं भांडण होई. “अगदी थेट आईसारखी दिसतेस, आणि वागतेस पण आईसारखीच!" असं काही वडिलांनी म्हणावं व हिनं जवळजवळ वेड लागल्यासारखं ते नाकारावं, असं चालायचं. आईशी तुलना केली, आईचं नाव काढलं, की छोटी रागानं वेडी होते, हे लक्षात आल्यापासून वडिलांना तसे प्रसंग वारंवार आणण्याचा एक चाळाच लागला. लहानसहान बाबींवरून खटके उडत. पण मुख्य खटके  ४८ / गंगाजल

छोटीकडे मित्रमंडळी आली म्हणजे उडत. चहा, कॉफी, विनोद चालला, तर हे शब्दही न बोलता आपल्या खोलीत जात. सर्वजणं गेली, म्हणजे छोटीवर राग निघे. “अशी तरुण मित्रमंडळी गोळा करतेस, त्यांच्याबरोबर हिंडतेस, मला खपायचं नाही!" वगैरे म्हणून शेवटी “आईच्या वळणावर गेली आहेस!" असं म्हणावं. छोटीची परीक्षा आली की ऐन गर्दीत ह्यांच्याकडे पाहुणे यायचे. म्हणजे स्वैपाक करून परीक्षेच्या वेळी हजर राहणं छोटीला भारी अवघड व्हायचं. खटका उडे. स्वैपाकच नीट झाला नाही, कॉफीच नीट नव्हती, वगैरे. छोटी रागावली, म्हणजे परत एकदा लहानपणापासूनचा पाढा वाचला जाई व शेवटी तिचा व तिनं न पाहिलेल्या आईचा उद्धार होई. छोटी किती तरी वेळा रडून-रडून डोळे सुजवून घेऊन, न जेवता, न खाता माझ्याकडे आलेली होती. थोड्या वेळानं शांत होऊन घरी जाई. कुठं जाणार? दुसरा मार्गच नव्हता!

 काही दिवसांपूर्वी छोटी अशीच दुपारी चार-पाचच्या सुमाराला आली. “मी आता परत घरी जाणार नाही. बाबा कुठे बाहेरगावी गेले आहेत. ते संध्याकाळी यायच्या आत मी निघून जाणार आहे!"

 "अग, तुझी परीक्षा दोन आठवड्यांवर आली आहे, चाललीस कुठे? परीक्षा होईपर्यंत तरी रहा."

 "तोच तर बाबांचा अंदाज आहे. किती बोललो, तरी ह्यावेळी चालेल, असं त्यांना वाटतं. मला परीक्षा नको. मी जाणार."

 "पण कुठं?"

 "मी मामाला निरोप पाठविला आहे. तो मला न्यायला येतो आहे. मी त्याच्याबरोबर गावी आजीकडे जाणार आहे."

 पुष्कळ सांगितलं, पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती व शेवटी ती मामाबरोबर गेली, असं मला कळलं.

 आज जवळजवळ दोन महिन्यांनी ती मला भेटली. अगदी घाईघाईनं तिच्या अक्काकडे दूरदूर ती चालली होती. बोलता-बोलता मला हलवून म्हणते, “अग, माझी आई मला सापडली!" मी ऐकतच राहिले.

 मी गावी गेले होते ना आजीकडे, तिकडे दोन-तीन आठवडे राहिले. अशीच एक दिवस दुपारी दिवाणखान्यात वाचीत बसले होते ती एक लहान सहा-सात वर्षांची मुलगी डुलत-डुलत आत आली. मी कधी त्या मुलीला पाहिलं नव्हतं; पण चेहरा ओळखीचासा वाटला. मी तिच्याकडे 

गंगाजल / ४९

पाहाते आहे, हे पाहून ती थेट माझ्याकडे आली व मला आपल्या हातातलं ती काढीत असलेलं चित्र दाखवीत म्हणाली, “छान आहे नाही?" तिच्या रेघोट्या पाहून मी म्हटलं, “छान आहे. कसलं आहे?" “एवढंसुद्धा कळत नाही का?" असं म्हणून स्वारी माझ्या मांडीवर चढली व ते चित्र कसलं आहे, हे समजावून देऊ लागली. तिचा लाघवीपणा, धीटपणा, गोडपणा ह्यांनी मी अगदी जिंकले गेले होते. एवढ्यात आजी आत आली. तिच्या तोंडावर आश्चर्य व थोडी भीती होती. “आजी, कोणाची ग ही? किती गोड आहे नाही?" एवढा वेळपर्यंत तिचा एक हात माझ्या मानेभोवती पडला होता. आजी उद्गारली, “तुझ्या आईची धाकटी मुलगी आहे ती. आईसारखीच दिसते." ओळखीची का वाटली, ते कळलं. ती व मी दिसायला सारख्या होतो. बिंब-प्रतिबिंब एक झालं. माझी आई, हरवलेली आई मला सापडली!

१९७०