Jump to content

गंगाजल/देवळाविना गाव

विकिस्रोत कडून

दोन :
देवळाविना गाव


 गेले काही दिवस आम्ही रोज त्या रस्त्याने जात होतो. एके ठिकाणी एक नवी बस्ती घडत होती. आमच्या डोळ्यांसमोर नवी नबी लहान घरे निर्माण होती. हळूहळू सर्व वसाहत बांधून झाली. बर्‍याच घरांतून कुटुंबेही राहायला आली. वसाहतीच्या एका अंगाला काही न बांधलेली अशी एक मोकळी जागा शिल्लक होती; एक दिवस तेथेही पाया खणला गेला. बाकींच्या घरांसारखा तो दिसला नाही. पाहता पाहता एक लहानसे देऊळ उभे राहिले. एक दिवस आमच्या जायच्या वेळेला देवळाच्या पटांगणात गर्दी दिसली. मारुतीची प्रतिष्ठापना चालली होती. परत आलो, तो त्या देवळात आमच्याकडे तोंड करून मारुती उभा!

 ‘आणखी एक नवे देऊळ! पुण्यात काय देवळे कमी आहेत?”

 ‘‘अग, पण ह्या नव्या वस्तीला कुठे होते देऊळ? आता इथल्या लोकांना दर्शनाला यायला, संध्याकाळचे टेकायला जागा झाली."

 तुझे आपले. काहीतरीच. कुठे लहान वस्ती झाली, तर लगेच देवळाची काय गरज? शिवाय, पहाटेच्या आणि रात्रीच्या भजनाने लोकांचे डोके उठायचे !’’

 मी हसले आणि पुटपुटले, ‘कोइल इल्ले उरिल. कूडी इरक्क वेण्डाम्"

 ‘‘तोंडातल्या तोंडात काय म्हणतेस?’

 ‘‘काही नाही, एक तामिळ म्हण आठवली" मी ती म्हण परत म्हणून दाखविली, आणि तिचे शब्दशः भाषांतर केले, “देवळाविना गावात घर असू नये' कोण जुन्या काळचा मनुष्य होता कोण जाणे! पण त्याला वाटले की, १४ / गंगाजल

ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळी तरी देवळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती असे वाटते. जुना काळ गेला, पण जुने संस्कार मनात रुजून आहेत. इथे पुण्यामध्ये ही नवीन वस्ती बांधणार्‍या लोकांना तमिळ म्हण काही माहीत नसणार, पण म्हणीच्या मागचा संस्कार मात्र त्यांच्या मनावर खासच आहे. "

 ‘आहे तरी काय हा संस्कार? त्याचे रूप काय?" परत प्रश्न आला.

 मी जरा विचारात पडले. माझी विद्वत्ता दाखवायची बरी संधी आली आहे, ह्याचीही जाणीव झाली. मी सांगू लागले :

 "गेल्या वर्षी मी एक जुने पुस्तक वाचीत होते. असेल तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील. संस्कृतामध्ये लिहिलेले. सर्व पुस्तक नगररचना व घराची रचना ह्यांबद्दल असल्यामळे मला नीटसे कळले नाही. पण त्यातल्या काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. नगररचनेसाठी पहिल्यांदा दिशा ठरवून एक चौकोन आखला. त्या चौकोनाच्या बाजूंचे बरोबर आठ भाग करून परत चौसष्ठ चौकोन आतमध्ये आखले व एकेका चौकोनाला एकेका देवतेचे नाव दिले. सर्वात मोठे देऊळ व त्याचे अंगण मध्यभागी होते. त्यानंतर राऊळ म्हणजे राजकुलाची राहण्याची जागा. नंतर राजाच्या सरदारांचे वगैरे मोठे वाडे असलेला रस्ता. नंतर अतिशय धनिक व्यापारी, हिर्‍या-मोत्यांचा व्यापार करणारे वगैरे गोष्टींपासून सुरूवात होऊन भाजीपाला विकणारे, मीठ-मसाला विकणारे अशा प्रकारच्या लोकांची दुकाने, मध्यमवर्गाची दुकाने, शहराच्या चौकोनाबाहेर अस्पृश्यांची घरे आणि त्यांच्यापासून दूर अंतरावर नगररचना करणाच्या स्थपतींची व सुतारांची घरे, असा एकंदर आराखडा दिलेला आहे.

 “नगरामध्ये कुठे काय आहे, हे सांगताना त्या चौकोनातील देवाच्या देवळाचा उल्लेख होई. म्हणजे बरोबर कोठच्या जागेबद्दल वर्णन आहे, हे निश्चित समजे. देवांचा व देवळांचा स्थाननिश्चितीसाठी अशा तर्‍हेने केलेला उपयोग मला नवीनच होता. पण एक गोष्ट लक्षात आली की, देव हे स्थापत्यशास्त्राने निर्माण केलेले नसून, आधीच अस्तित्वात असलेल्या देवांचा स्थाननिश्चितीसाठी ह्या ग्रंथकाराने फार हुषारीने उपयोग करून घेतला. ह्या पुस्तकामध्ये कोणाची घरे कुठे असावी, हे तर दिलेच आहे पण एकेका आळीतील घरांची उंची सारखी असावी, असे देऊन कोठच्या आळीतील घरे किती उंच, म्हणजे किती मजली असावीत, हेही सांगितले आहे. गावाच्या मध्यभागी असलेले सर्वात मोठे देऊळ ही गावातील सर्वात उंच इमारत असावी, असे सांगितलेले आहे.

  "देवळाखालोखाल देवळाच्या शिखरापेक्षा कमी उंचीचा राजवाडा असावा व राजवाड्यापेक्षा कमी उंचीची घरे ब्राह्मणांची असावीत, असा नियम घातलेला आहे. ब्राह्मण आपल्याला कितीही मोठे समजत असले, तरी विष्णूचा प्रतिनिधी जो राजा, त्याचा मान केव्हाही मोठाच होता. आणि प्रतिनिधीपेक्षा प्रत्यक्ष देवाचा मान सर्वात मोठा होता. लांबूनही येणाच्या प्रवाशाला देवळाचे शिखर दिसले की गाव आले, असे समजावे. देवळाचे शिखर ही गावाच्या अस्तित्वाची, वैभवाची व अभिमानाची एक खूण होती. आपल्याकडे महाराष्ट्रात डोंगरावरची देवळे सोडली, तर गावातील सपाट भुईवर बांधलेली देवळे इतकी भव्य नाहीत. पण दक्षिणेत मात्र अजूनही अशी उंच आणि अतिभव्य देवळे दिसतात. मदुरेच्या मीनाक्षीसुंदरमच्या देवळाची उंचउंच गोपुरे पाचदहा मैलांच्या परिसरात कोठूनही दिसतात. ख्रिस्ती लोकांची देवळेही त्याच पद्धतीने बांधलेली. वरील पुस्तकात दिल्याप्रमाणे देव व देऊळ ह्यांचा स्थलनिश्चितीसाठी उपयोग होई. आपल्या पुण्यातही पूर्वी देवळांचा उपयोग तसा होई. भांग्या मारुती, पासोड्या विठोबा तर होतेच, पण वेश्यांच्या वस्तीत एक छिनाल मारुतीसुद्धा होता."

 "एवढ्याचसाठी का देवळे होती?" माझ्या व्याख्यानावर औपरोधिक प्रश्न आला. "देऊळ असले म्हणजे आपल्या घराची खूण व पत्ता नीट देता येईल असेच ना तुझे म्हणणे?"

 "नाही; देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे. आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. ज्या गांवात ते नसेल ते एक श्रद्धा नसलेले, कोठच्याही तर्‍हेच्या सामुदायिक आकांक्षा नसलेले ठिकाण असते. म्हणून तेथे राहू नये, असे भाष्य हा म्हणीवर करावे लागेल."

 "देऊळ म्हटले, म्हणजे तुझ्या मनात आहे तरी काय? जे नाहीच, त्याच्यासाठी उभारलेली इमारत म्हणजे देऊळ ना? कसले ग प्रतीक होते ते?"

 "एक प्रकारे तू म्हणतेस ते खरेच. देवळामध्ये अरूपाला रूप दिलेले असते. अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते; प्रसंगी अनंताचे विसर्जनही करितात. आपण जे नाही; पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे असे काहीतरी सत म्हणून आहे. आपल्या आर्ततेत त्या सतला आपण निरनिराळे  १६ / गंगाजल

रूप देतो; तोच देव. जी मागणी मानवाजवळ करिता येत नाही, ती आपण देवाजवळ करितो. कायमचा आसरा मागतो, न्याय मागतो, निवारा मागतो, शांती मागतो... किंवा निरनिराळ्या प्रासंगिक मागण्या करितो. अगदी काहीच नाही, तर संसाराच्या भगभगीत क्षणभराची उसंत मिळावी, म्हणून देवळात जातो. काहींना असा आधार पसंत नाही. काहींना असा आधार घ्यावासा वाटतो. आपल्यापेक्षा सर्वस्वी श्रेष्ठ असे काही वाटते, त्याचे प्रतीक देऊळ!"

 “देवळाच्या उंचीचे व भव्यतेचे तू वर्णन करीत होतीस, तर राजवाडे, ताजमहाल हे नाहीत का भव्य? तेसुद्धा नाहीत का कोठच्यातरी भव्यतेची प्रतीके?

 "नुसतीच भव्य का, सुंदरही आहेत. पण ती उपासनेची स्थाने होऊ शकत नाहीत. शिक्षणसंस्था अशा काही भव्य व दिव्य भावनेचे प्रतीक होऊ शकतील अशी वेडी कल्पना काहींनी बाळगिली होती, पण त्याही तशा होऊ शकल्या नाहीत. इतरांची देवळे फोडणारे धर्म आहेत. स्वत:च्या देवळांना छिन्नभिन्न करून स्वत:चा भूतकाळाशी संबंध पार तोडून टाकणारेही लोक आहेत. अशा काळात देवळाविना राहू नये, म्हणणारा वेडाच ठरणार . पण अजूनही पुष्कळांच्या मनात ही भावना आहे. तीत देवळाच्या भव्यपणाला व सौंदर्याला दुय्यम स्थान आहे. आतील मूर्तीला तिच्या भोवताली गोळा झालेल्या शतकानुशतकांच्या आर्ततेच्या, कारुण्याच्या, शांतीच्या व पावित्र्याच्या भावना आहेत. ताजमहाल किंवा जयपूरचा राजवाडा पाहतो, त्या वेळच्या भावना व पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती पाहतो, त्या वेळच्या भावना अगदी निराळ्या आहेत. देऊळ नाही, तेथे भावनाही नाहीत, म्हणून तेथे राहू नये, असे त्या तमिळ माणसाचे म्हणणे दिसते."

 “ड्रेनेज, दुकाने, स्वच्छ वस्त्या, रस्ते व दवाखाना असल्या गोष्टी गावाला आवश्यक आहेत. त्या जोडीला बागा व करमणुकीची साधनेही हवीत. शाळा कॉलेजे-वाचनालयेही हवीत. पण देवळाचे काय प्रयोजन ? बाकीच्या गोष्टींनी माणसाचे आयुष्य सुसह्य होते. देवळाने काय होते ?"

 "जगातील सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे मग काही हवेसे वाटत नाही, असे नाही. सर्व मिळूनही काहीतरी हुरहूर वाटते. आपल्याला शरीरस्वास्थापलीकडे काहीतरी आहे, ह्याची जाणीव असते. अगदी सर्व माणसे सुखी झाली, तरीसुद्धा आयुष्यात काहीतरी प्रश्न उरतातच. गरीब माणसे नसली, तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठी धडपड करणार्‍या

गंगाजल / १७

माणसांचे काय होईल? अज्ञान माणसे नसतील तर त्यांना सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणाच्यांचे काय होईल? असल्या प्रकारचा हा आचरट प्रश्न नाही. माणसाला ध्येये असावीत, म्हणून देवाने जगात अपूर्णता ठेविली आहे, असेही नाही. जगात पूर्णता असली, तरी काही उणे आहे असे वाटत राहील व सारखे वाटत राहते. ते पूर्ण करायची जी इच्छा, तिचे प्रतीक देऊळ आहे"

 माझ्या मनात नव्याने एक विचार आला. मी म्हटले, "आपल्या संतांनी शरीराला 'देहगाव' म्हटले आहे. ह्या गावातसुद्धा देऊळ वा देव असलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बाहेरच्या गावातून देव नसला तरी तो चालेल, पण अंतर्यामी तो असावा, अशी त्यांची भावना होती. आयुष्यात मिळण्यासारखे असेल ते मिळाले, तरी मनाची कशासाठी तरी धडपड चाललेली असते. काहीतरी अशांतता मनाला पोखरीत असते. कशामुळे तरी निराधार वाटत असते."

 माझे म्हणणे मध्येच थांबवून तिने विचारले, “तू म्हणतेस हे मरणाच्या जाणिवेमुळे तर नसेल? अगदी सुखात बुडालेले असलो, तरीसुद्धा ह्या सुखाला अंत आहे, अशी बोचणी असते. कितीही जिवास जीव देणारे मित्र असले, तरी आपण एकाकीच आहोत, एकटेच राहणार व एकटेच जाणार, ह्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो. मनाची धडपड. अशांतता, अगतिकता सर्व ह्यामुळेच असेल. हृदयातल्या देवाला शोधण्याची, त्याच्यासाठी लागलेल्या तहानेची ती धडपड नसेलच मुळी!"

 "तेही खरेच. दोन्ही तऱ्हांची माणसे आहेत. काही अंतर्यामात देव शोधीत असतात. जगण्याला काहीतरी अर्थ शोधीत असतात. आणि जीवन सर्वस्वी अर्थहीन आहे, पण ते शक्य तितके सुखावह करणे, मानाने जगणे व इतरांना जगविणे ह्या बुद्धीने काही जगत असतात. एका दृष्टीने ह्या ध्येयवाद्यांना कुठचातरी देव सापडलेला असतो. काहींना हा ध्येयवाद नसतो. ते आपले स्वत:चे. अगदी सर्वस्वी स्वत:चे असे एक जीवन जगतात. जगातले जेवढे मिळण्यासारखे असेल, ते ते घेत राहतात; आणि एक दिवस- एका क्षणी- स्वतःच्या एकाकीपणाची, असहायतेची व निष्फळतेची त्यांना इतकी तीव्र जाणीव होते की, त्याने जगणे अशक्य होऊन ते जीव देतात.

 "बाळ व लहानी तुला माहीत आहेतच. काय उमदी पोरे होती! त्यांना काही कमी नव्हते. दोघांचीही परिस्थिती बाहेरून दिसायला हेवा करण्यासारखी! दोन्ही पोरे अगदी रस घेऊन सर्वतया जीवन जगत होती.  १८ / गंगाजल


एकाने परमुलुखात जीव दिला. कुटुंबापासून दूर. एकाकी. शेवटी वडिलांना लिहिलेले एक पत्र!...

 “दुसरीने भरल्या घरात एक दिवस जीव दिला. शेवटच्या पत्रातली असहायता व एकाकीपणा हृदयाला पीळ पाडणारा होता. पण सामान्याला कळण्यासारखा नव्हता. आई, भांवडे, नवरा, मुले, संपत्ती, शिक्षण, रूप, मित्रांचा परिवार सर्व होते. मग हा एकाकीपणा का? मागे राहिलेल्यांना निरंतरचे अपराधी करून हे जीव गेले. का? का? का?

 “हा प्रश्न कित्येक वर्षे मी विचारीत आहे. मला आता वाटते की, त्यांच्या गावात देव नव्हता व देऊळही नव्हते. एका क्षणी भरल्या संसारात ही निराधारपणाची जाणीव तीव्र झाली असली पाहिजे"

 क्षणाची फुरसत न देता प्रश्न आला, “अग, पण ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हते ना?

 तितक्याच वेगाने मी उत्तरले, “त्यांचा देव व देऊळ एवढे मोठे झाले होते की, ते लहानशा शरीरात मावेनातसे झाले. शरीराचे बंधन त्यांना अशक्य झाले. शरीरात राहून देवाएवढे मोठे होणे शक्य नव्हते, म्हणून ते गेले.

 दोघींच्या संभाषणाचा दुवा तुटला. प्रत्येकजण आपापल्या विचारात गुरफटलो. माझे मन एक कोडे सोडवीत होते.

 संभाषणाच्या भरात का होईना, बाळ, लहानी आणि ज्ञानदेव अशी सर्वस्वी निराळी माणसे एकत्र गोवली गेली होती. सर्वांनी पंचविशीच्या आत जीव दिला होता, एवढेच का साम्य त्यांच्यात होते? त्या साम्यापाठीमागे जाणिवेचा तीव्रपणा व जाणीव झाल्याबरोबर त्याप्रमाणे कृती करण्याची उतावीळ, हेही होते ना? तिघांनीही धावत जाऊन मृत्यू कवटाळला होता.

 ...आणि आम्ही इतर? आमच्या गावात देव आहे का, ह्याचा विचार आम्ही कधी केला आहे का? रिते आहोत का भरलेले आहोत, हा प्रश्न कधी आमच्या मनाला पडला आहे का? जन्मल्यापासून जिवंतपणे वावरत आहोत. हळूहळू विचाराविना वाट चालत आहोत. मृत्यू अगदी ‘उरी आदळे' पर्यंत..

 ""काय होतंय तुला? माझा सुस्कारा ऐकून तिने काळजीने विचारले.

 माझ्या अथांग रितेपणातून उत्तर आले, “काही नाही, अगदीच काही नाही."

१९६८