गंगाजल/दुसरे मामंजी

विकिस्रोत कडून



तीन :
दुसरे मामंजी

 मी कर्व्यांची सासुरवाशीण झाले. त्या दिवशी अप्पा माझे मामेसासरे झाले. माझी मुले शकूला (अप्पांच्या मुलीला) ‘आत्याबाई' म्हणतात. पण खरे म्हणजे हे नाते माझ्या लक्षातच येत नाही. कर्व्यांच्या घरच्या कोणाचीही ओळख होण्याआधीच किंबहुना ते नावही माहीत होण्याच्या आधी मी अप्पांच्या घरची झाले. माझ्या मनाच्या घडणीत त्यांचा वाटा इतका आहे की, खरे म्हणजे ते माझे दुसरे पिताजीच म्हणायला पाहिजेत.

 मी त्यांच्या घरी गेले, तो प्रसंगही मोठा चमत्कारिक. मी त्या वेळेला हुजूरपागेच्या बोर्डिंगात राहून शिकत होते. कुणाबरोबर तरी दुपारची खेळायला म्हणून फर्गसन कॉलेजातल्या त्यांच्या बंगल्यावर गेले होते. तेथे सईताई भेटल्या व मला त्यांच्याबद्दल काही विलक्षण ओढ वाटली. गंमत अशी की, त्यांनाही माझ्याबद्दल काही विशेष आकर्षण वाटले असले पाहिजे. त्यांनी मला विचारले, “आमच्याकडे रहायला येशील का? मीही चटदिशी 'हो' म्हणून गेले. सईताईंच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी माझ्या आई-वडिलांची चौकशी करून, ब्रह्मदेशात माझ्या वडिलांना पत्र लिहून मला आपल्या घरी ताबडतोब रहायला आणिले. आणि माझ्या वडिलांनी आपल्या स्वभावाप्रमाणे बोर्डिंगात पैसे पाठवायचे ते परांजप्यांकडे पाठवायला सुरुवात केली. तेव्हापासून काही वर्षे सतत व काही वर्षे येऊन- जाऊन मी त्यांच्या घरी होते.

 सईताई म्हणजे सीताबाई... अप्पांचे दुसरे कुटुंब. त्यांना माणसे फार आवडत व माणसांनाही अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांपासून तो  २० / गंगाजल

कॉलेजातील विद्यार्थी व अप्पांचे मित्र ह्यांपर्यंत सगळ्यांनाच, त्या हव्याहव्याशा वाटत. ही सगळीच चाहते -मंडळी अप्पांच्या आवडीची नसत. मला वाटते, मी जी अप्पांच्या घरी घुसले, तीसुद्धा थोडीशी त्यांच्या मनाविरुद्धच. माझे त्यांच्या घरात येणे सईताईंखेरीज इतर कुणाला फारसे रुचले असेल, असे वाटत नाही. त्यामुळे मीही कित्येक महिने सईताईंच्याच भोवतीभोवती असे. पहिले काही दिवस तर मला असा अनुभव आला की, त्यामुळे घरातल्या इतर वडील माणसांपासून शक्य तितके लांबच राहण्याचा मी प्रयत्न करू लागले.

 ज्याच्याशी मनात नसताना पदोपदी संबंध येई व मनस्ताप होई, असे एक मनुष्य म्हणजे वहिनी- सईताईंच्या आई. ह्या बाई एक अपत्य झाल्याबरोबर विधवा झालेल्या होत्या. त्या पुण्यात-गावात राहत असत. पण सईताईंचे लग्न झाल्यावर काही वर्षांनी सईताई आजारी पडल्यामुळे त्या लेकीच्या घरी रहायला म्हणून ज्या आल्या, त्या मरेपर्यंत तेथेच राहिल्या. संसार करायच्या दिवसांतच विधवा होऊन बोर्डिंगमध्ये राहिल्यामुळे त्यांची संसाराची सर्वच आशा अपुरी राहिलेली होती. अचानकपणे त्या लेकीच्या संसारात आल्या होत्या आणि तो त्यांनी अतिशय नेकीने, काटकसरीने, पैशाच्या दृष्टीने अप्पांचे हित बघून केला. पण त्यांची काटकसर, रूक्षपणा, क्षुद्रपणे लोकांना घालून-पाडून बोलायची सवय ह्यांचा घरात सर्वांनाच त्रास होई. तरीही पहिल्याने अपरिहार्य म्हणून व मागून कर्तव्यबुद्धीने अप्पांनी ह्या बाईंचा सासुरवास आपल्या स्वत:च्या घरात सहन केला. ह्या बाई काही वेळेला सकारण, पण ब-याचदा निष्कारण मला रागावत व माझा दु:स्वास करीत आणि त्यामुळे होता-होईतो त्यांचा संबंध टाळायचा, अशी माझी प्रवृत्ती असे.

 विलक्षण गोष्ट म्हणजे अप्पांच्याबद्दलही मला अतिशय भीती वाटत असे. अप्पा कधीही मला अपमानकारक बोलल्याचे किंवा जोराने रागावल्याचेसुद्धा आठवत नाही. तरी पण त्यांचा मोठा आवाज, आकडेबाज मिशा, गडगडाटी हसणे, उंच व भव्य देह ह्यांच्यामुळे की काय, मला त्यांची भयंकर भीती वाटत असे, हे मात्र खरे. इतरही लहान-लहान कारणे भीती वाटायला होती. एक म्हणजे मला गणित बिलकुल येत नसे; आणि अप्पा कधीकधी आम्हा मुलांना तोंडचे हिशेब घालीत व उत्तरे विचारीत. अशा वेळी अंग चोरून मी कितीही लहान व्हायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या 

गंगाजल / २१

दृष्टीतून निसटत नसे. मी चुकीची उत्तरे दिली की, ते मला समजावून सांगायचा प्रयत्न करीत. पण मी इतकी भेदरलेली असे की, ते काय सांगतात, हे मला ऐकूच यायचे नाही. संध्याकाळी ते क्लबातून घरी यायच्या आत दोन घास खाऊन मी बिछान्यावर झोपेचे सोंग घेऊन पडत असे. पण ही युक्ती नेहमीच जमायची नाही. त्यांची भीती वाटायचे आणखी एक कारण म्हणजे घरातल्या मुलांना ते आळीपाळीने इंग्रजी वाचायला सांगत. ते आरशापुढे दाढी करायचे व बहुतकरून शकू व कधीमधी दुसरे कोणीतरी उभे राहून पुस्तक वाचायचे. वाचताना चूक झाली की, ते जोराने खेकसायचे व चूक सुधारून द्यायचे. मला आठवते आहे की, एकदा साळूताई (अप्पांच्या घरी असलेली आणखी एक मुलगी) त्यांच्याजवळ वाचीत असताना एका इंग्रजी शब्दाचा उच्चार करायला चुकत होती; ते परत-परत तिला बरोबर उच्चार करून दाखवीत होते व तिला ते काही कळत नव्हते. शेवटी ती बिचारी घेरी येऊन पडली. हा प्रकार पाहिल्यावर तर अप्पांच्या दाढीच्या वेळेला लांबूनसुद्धा त्यांच्या दृष्टीस न पडण्याची खबरदारी मी घेऊ लागले. तिसरे कारण म्हणजे अप्पांचा निरीश्वरवाद. संधी मिळेल तेव्हा देवपूजा व व्रतवैकल्ये ह्यांची ते चेष्टा करीत असत. कुठे मला लागले, किंवा परीक्षेत नापास झाले, तरी मला म्हणत, “आता कुठे गेला होता तुझा देव? कर की त्याला नवस! त्यांच्या चेष्टेला मला उत्तर देता येत नसे, पण मनाला वाईट वाटे, व त्यामुळेही मी होता... होईतो त्यांच्यापासून लांब राही.

 अप्पांचे घर म्हणजे सुखवस्तू, आतिथ्यशील गृहस्थाचे घर होते.घरी गडी मनुष्य, म्हशी, घोडागाडी वगैरे होते. पण माझ्या आठवणीत, ते मिनिस्टर होईपर्यंत स्वयंपाकी नव्हता, वहिनी, साळूताई व आम्ही मुली अशा स्वयंपाकघरातली कामे करीत असू. अगदी लहानपणी भाज्या, कोशिंबिरी, जरा मोठी झाल्यावर भात, भाकरी, पोळी वगैरे जिन्नस करायला शकूच्याबरोबर मीही शिकले. निवडणे-टिपणेही सगळ्यांकडून-मुलगे व मुली मिळून होत असे. डाळ-तांदूळ, गहू-जोंधळा सर्व जिनसा सगळ्यांना वाटे घालून सारख्या निवडायला देत असत. असडी तांदूळ कांडायलाही मी त्यांच्याकडेच शिकले. शकू व सईताईही कांडप करीत. खाणे, पिणे, काम करणे, कुठच्याही बाबतीत आपली मुलगी व इतर असा भेद त्या घरात झाला नाही. फरक काय तो माझ्या आठवणीत एका बाबतीत होई. तो म्हणजे शकू आमच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मार मात्र खात असे. तिने परवा नुकतीच  २२ / गंगाजल

एक आठवण नव्याने सांगितली. ती शाळेतला इंग्रजीचा धडा अप्पांच्या समोर वाचीत होती. अप्पांनी तिला एका शब्दाचा अर्थ विचारिला. तो तिला काही आला नाही. मी असते, तर मुकाट्याने अप्पांचे बोलणे ऐकून घेतले असते. पण शकू कसली खट! त्यांना म्हणाली वाटते, “तुमच्या इरावतीला विचारा. तिलासुद्धा माहीत नाही ह्या शब्दाचा अर्थ! अप्पांनी मला बोलाविले, आणि त्या शब्दाचा अर्थ विचारला. माझ्या सुदैवाने मी तो धडा करिताना तो शब्द डिक्शनरीत पाहून ठेविला होता व तो मला माहीत होता. अर्थात मी तो बरोबर सांगितला. शब्दाचा अर्थ माहीत नाही म्हणून व वर तोंड करून बोलली म्हणून आणखी अशा दुहेरी अपराधाबद्दल शकूला चांगला चोप बसला. शकुला चोपणे हेच मला वाटते त्यांच्या तिच्यावरल्या मायेचे चिन्ह होते. आजतागायत त्यांची ही वृत्ती कायम आहे. त्यांची नात सई चित्रे छान काढिते, नाटके लिहिते, नाटकात स्वत: काम करिते. पण कधी एका शब्दाने तिला शाबासकी देतील तर शपथ. परवा मजजवळ म्हणाले, “सईचं आजचं नाटक छान झालं होतं नाही? तेव्हा मी म्हटले "अप्पा, पोरीजवळ का नाही मग तसं म्हणत? तर मला म्हणतात, "उगीच स्तुती केली तर शेफारून जाईल! आपलं न बोललेलच बरं."

 अप्पा जरी काव्याचे भोक्ते नाहीत, तरी एका ठराविक कालखंडा पर्यंतच्या इंग्रजी वाङमयाचे अगदी एकनिष्ठ भक्त आहेत. भाषांतरित फ्रेंच वाङमय त्यांनी वाचलेले आहे व काही आम्हा मुलींकडून वाचूनही घेतले आहे. पण इंग्रजी वाङमयाशी त्यांचा संबंध अगदी जिव्हाळ्याचा आहे. नुसत्या कादंब-याच त्यांनी आमच्याकडून वाचून घेतल्या असे नव्हे, तर शेरिडन, गोल्डस्मिथ थोड्या प्रमाणात शेक्सपियर ह्यांची नाटकेही वाचुन घेतली.

 जेन ऑस्टेनच्या बाबतीत तर त्यांची भक्ती पराकोटीची आहे. जेन ऑस्टेनच्या निरनिराळ्या कादंब-यांतील माणसे पुस्तकातच न राहता आमच्या घरी जणू नित्य वावरत असत. आयुष्यात प्रत्येकजण आपल्या मताने आपली स्वत:ची अशी एक भूमिका वठवीत असतो. एका मनुष्याच्या भूमिका सदैव व सर्वत्र एकच असत नाही. घरी, कचेरीत, मित्रमंडळींच्या घोळक्यात, क्रीडांगणावर मनुष्य आपापल्या मताप्रमाणे काही विशिष्ट कल्पना मनात ठेवून त्या आचरीत असतो. अप्पांनी घरामध्ये तरी निदान जेन ऑस्टेनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस'मधील मिस्टर बेनेटची भूमिका वठवायचे ठरविले होते. बेनेटच्या तोंडची वाक्येच्या वाक्ये अनुरूप प्रसंग आला की ते बोलून दाखवीत. आणि असे अनुरूप प्रसंग माझ्या लहानपणी दिवसातून निदान दहा-बारा वेळा येतच. बॅनेटच्या हुशार, फटाकड्या, मानी व उतावळ्या मुलीची भूमिका शकूकडे असे, आणि बेनेटच्या भोळसर, वेडपट व स्वत:ला आजारी समजणार्‍या बायकोची भूमिका सईताईंना बहाल केलेली होती. आपल्या भोवतालच्या माणसांचा भोळेपणा, वेडेपणा, आढ्यता वगैरे लहानसहान दोषांवर बोचक शब्दांमध्ये समर्पक टीका करणे हे मिस्टर बेनेटचे वैशिष्ट्य होते. आणि तशा तऱ्हेची टीका अप्पा घरातील सर्वांच्यावर अधूनमधून करीत असत. ह्या टीकेचे आम्हा मुलींना त्या वेळी काही वाटत नसे व अजूनही काही वाटत नाही. सईताईंना कधीमधी ही टीका झोंबत असे, असे मला आता आठवते.
 प्राईड अँड प्रेज्युडिस'च्या जोडीला नेहमी वाचलेली दुसरी कादंबरी म्हणजे ‘मॅन्सफील्ड पार्क.' तीत सर टॉमस नावाच्या सदाचरणी, कर्तव्यतत्पर मुलाच्याबद्दल महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका मनुष्याचे चित्र रेखाटलेले आहे. त्याच्या घरी एक मुलगी रहायला आणलेली होती. ती आपली भित्री व रडूबाई असायची. ह्या भिऊन-भिऊन वागणाच्या फॅनीची भूमिका मला दिलेली असे. सर टॉमसच्या घराची व्यवस्था ही त्याची स्वतःची बायको आळशी व भोळसट असल्यामुळे बायकोची थोरली बहीण पाहत असे. ही बाई सर टॉमसच्या पै-पैला जपणारी, सर टॉमसच्या मुलींचे लाड करणारी व फॅनीला छळणारी अशी होती. ह्या मिसेस नॉरिसचे नाव बिचार्‍या वहिनींना बहाल केले होते. जेन ऑस्टेनच्याच जोडीला गोल्डस्मिथही अप्पांचा फार लाडका. त्याची ‘व्हिकार ऑफ वेकफील्ड' ही कादंबरी आम्ही दोन-चारदा तरी वाचली असेल, तीतल्या भूमिका कोणाला बहाल झाल्या नसल्या; तरी तीतली वाक्येच्या वाक्ये प्रसंगानुसार अप्पा म्हणत असत. तरुण शाळकरी मुलींच्या निरर्थक गप्पा कधीकधी चालतात, तशा एकदा शकू व मी बोलत असता अप्पा शेजारच्या खोलीतून ('व्हिकार ऑफ वेकफील्ड' मधल्या बचेंलप्रमाणे) नुसते जोरात ‘फज’ (Fudge) असे म्हणाले. आम्ही भानावर आलो, हसलो व निरर्थक बडबड बंद केली.
 अप्पांच्या घरी शब्दकोशाचा उपयोग सारखा करावा लागे. शब्दांचा अर्थ, उच्चार व कळेल तेथे ज्या लॅटिन, ग्रीक, अँग्लोसॅक्सन किंवा जर्मन धातूपासून तो बनला असेल, त्याची चिकित्सा इतका खटाटोप करावा  २४ / गंगाजल

लागे. अप्पांचे शब्दज्ञान मोठे अचूक. शकू व मी शब्द अडला की, एकमेकींना विचारून, कधी सईताईंना विचारून, तर कधी अदमासाने ठोकून देत असू. आम्ही कोणाला शब्द विचारितो, हे अप्पांना ऐकू आले की ते "डिक्शनरीत पहा की! त्या आहेत कशाला घरी?" असे मोठ्याने म्हणत, शब्दार्थावरून एक प्रसंग आठवतो आहे : कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला ‘नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारीत होती. हाच शब्द मराठीतही माझ्या वाचनात आला होता. जो शब्द शकू विचारीत होती, तो ‘‘प्रियानितम्बोचितसंनिवेशैर्विपाटयामास युवा नखाग्रै:।' ह्या ओळीतला होता. मी अगदी नि:शंकपणे सांगितले, “त्या शब्दाचा अर्थ गाल. अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, “काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले" मीपण माझ्या संस्कृतप्रभुत्वाच्या व माझ्या वाङमयाच्या कल्पनांच्या धुंदीत होते. मी अगदी सोवळ्या घरात वाढत होते. जे वाङमय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङमयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती. शिवाय, अप्पांना संस्कृत फारसे समजत नाही, ह्या ऐटीतही मी होते. मी म्हटले. “इश्श. अप्पा! काहीतरीच काय सांगता?"

 ते म्हणाले, “मी काहीतरी सांगत नाहीः बरोबर तेच सांगतो आहे."

 मी म्हटले, “माझेच अगदी पैजेनं बरोबर आहे."

 अप्पा म्हणाले, “बरं, बरं, हजार रुपयांची पैज! पण आता तेवढा आपट्यांचा कोश आण आणि तो शब्द बघ."

 ..अजून मी अप्पांचे देणे फेडले नाही.

 अप्पांच्या घरचा कार्यक्रम संथ. एका ठराविक मागनि जाई. मोठयाने वाचन करण्यात खंड बहुधा पडत नसे. मोठ्याने नाट्यवाचन करणे हे दुसरे इतर वाचन करण्याइतकेच अप्पांना फार आवडत असे. वर सांगितलेल्या इंग्रजी नाटकांखेरीज 'शारदा', 'संशयकल्लोळ' व 'सौभद्र' ही त्यांची आवडती नाटके. एखाद्या शनिवार, रविवारी दुपारची जेवणे लवकर आटोपून एकेकाच्या हातात एकेक पुस्तक ह्याप्रमाणे सईताई, अप्पा, शकू व मी वाटून दिलेल्या भूमिकांप्रमाणे तासा-दोन-तासांच्या बैठकीत सबंध नाटक वाचून काढीत असू. सर्व कुटुंब एकत्र बसून. अशा ,तऱ्हेने इंग्रजी भाषेतील कित्येक पुस्तके आम्ही वाचली. त्यामध्ये स्विफ्टच्या लिलिपुट-ब्रॉबडिंगनॅगच्या सफरी होत्या, डिकन्सचे ‘पिक्विक पेपर्स' होते, थेकरेचे 'व्हॅनिटी फेअर' 

गंगाजल / २५

होते, जॉर्ज एलियटचे ‘सायलस मार्नर' होते. ‘सायलस मार्नर' ही आम्हा सगळ्यांनाच आवडणारी कथा होती. आम्ही दोन-तीनदा तरी ती वाचली असेल. माझ्या आयुष्यात ज्या काही अत्यंत सुखाच्या आठवणी आहेत, त्यांमध्ये ह्या एकत्र कौटुंबिक वाचनाच्या आठवणी आहेत.

 अप्पांनी आम्हाला आधुनिक ललितलेखक मॅट्रिक पास होईपर्यंत वाचू दिले नाहीत. शाँ तर त्यांना बिलकुल आवडत नसे. पण आम्ही तो भांडून वाचलाच. पण शाँ किंवा बॅरी ह्यांची नाटके व वेल्स, बेनेट किंवा गॉल्सवर्दी यांच्या कादंबऱ्या कौटुंबिक वाचनात कधी आल्या नाहीत. अप्पांच्या मते पूर्वी झालेल्या ब्रिटिश लेखकांच्या तोडीचे हे नवे लेखक नाहीत.

 अप्पांची वाङमयीन आवड त्यांच्या मनाच्या ठेवणीची निदर्शक म्हणावी की ह्या लेखकांनी ती ठेवण तशी बनविली, हे काही मला नीटसे सांगता येत नाही. मूल आपले गुण घेऊन जन्माला येते, ही गोष्ट तर खरीच, पण संस्कारक्षम वयामध्ये झालेल्या वाचनाचाही परिणाम मनावर होत असला पाहिजे. मिल, स्पेन्सर, बेंथम ही मंडळी बुद्धिवादी, सुधारणावादी व व्यक्तिस्वातंत्र्याची भोक्ती अशी होती. ह्या सर्वांच्या नीतिमत्तेबद्दलच्या कल्पना त्या वेळच्या काळाप्रमाणे ठाम अशा होत्या. नवीन मानसशास्त्राचा विकास त्या वेळी झालेला नव्हता. त्याचप्रमाणे समाजशास्त्राचाही प्रसार त्या वेळी इतका झालेला नव्हता. मनुष्य आडवाटेने जातो, त्याला कारणे म्हणून लहानपणी घडलेले संस्कार, वैफल्य, समाजरचनेचे दोष वगैरे दाखवून त्याच्या कृतीचे आकलन आणि त्याचबरोबर थोडेबहुत समर्थन हल्लीच्या वाङमयात जितके होते, तसे अप्पांना आवडणाच्या लेखकांत मुळीच दिसून येत नाही. बनियनच्या 'पिल्ग्रिम्स प्रोग्रेस' मध्ये म्हटल्याप्रमाणे सदाचरणाची वाट अगदी सरळ व अरुंद अशी होती. त्या वाटेने जाणार्‍याला कुठे फाटा भेटायचा नाही, किंवा वाटेवरच्या वाटेवरच जरा पाऊल इकडचे तिकडे करायला जागा नव्हती. जेन ऑस्टेनच्या सगळ्या कादंब-यांतही हीच वृत्ती दिसून येते. तिने रंगविलेले काही खलनायक किंवा तिच्या मताने कसोटीस न उतरलेल्या स्त्रिया तिच्या नायक-नायिकांपेक्षा एक दोन उदाहरणांत तरी जास्त आकर्षक वाटतात. पण कुठे तरी चूक घडल्यामुळे जेन ऑस्टेनने त्यांना भरपूर प्रायश्चित्त दिलेले आहे.

 सईताई आणि अप्पा ह्यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. मी मोठी होत होते, माझी समज वाढत होती, हे जसे

त्याचे एक कारण, तसेच त्या दोघांचा स्वभाव हेही दुसरे कारण. सईताई सुरेख होत्या, प्रेमळ होत्या, त्यांना काव्याची गोडी होती, पण त्यांचे मन लहान मुलाचे, अविकसित असे राहिले. संसारातील अनुभवांनी त्यात जी खोली यायची, ती आलीच नाही. इतकेच नाही, तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची सगळीच मानसिक वाढ एक प्रकारे खुंटली होती. शकू त्यांची पहिली मुलगी. तिच्या पाठोपाठच दीड वर्षात त्यांना मुलगा झाला आणि तो वर्षाच्या आतच गेलाही. त्या दु:खाने त्यांच्या मनावर काही विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. माझ्या लहानपणी मला ह्या गोष्टी कळत नसत, पण आता मात्र त्यांची संगती लागते. आपल्याभोवती कोणी तरी लहान मूल असल्याखेरीज त्यांना जेवणच जात नसे. आम्ही सगळी मुले जेवून शाळेत गेलो, म्हणजे त्या शेजारच्या लिमयांच्या घरची मुलं तरी आणीत, नाही तर गुण्यांच्या मधूला तरी घेऊन येत व आपल्या समोर बसवून जेवत. सईताईंच्या बरोबर बाजारात जायला मोठी गंमत असे. त्या नेहमी मला आणि शकूला काही तरी खाण्याची, खेळण्याची किंवा लेण्याची वस्तू घेऊन देत. स्वतः इतके जिन्नस खरेदी करीत की, त्यांची मागाहून येणारी बिले भागवता-भागवता बिचाऱ्या अप्पांच्या अगदी नाकी नऊ येत. त्यांना खेळायच्या वस्तू विकत घ्यायचा फार नाद. हटकून एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत. मी लहान असताना सर्वच गोष्टींबद्दल त्यांचे ऊतू जाणारे औत्सुक्य व आनंद एवढ्यापुरतीच ही विकृती होती. पुढे मात्र रोग फारच बळावला, तो थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे वर्षाचे काही महिने पहाटेपासून रात्रीपर्यंत अतिशय धांदल, समारंभ, हालचाल ह्यात जात; व काही महिने अगदी स्वस्थ बसून, नाही जेवण, नाही खाणे, नाही आंघोळ, केवळ उदासीनता- असे जात. त्यांच्या प्रेमळपणाने मी त्यांच्याकडे आकर्षित झाले खरी, पण पुढे ह्या आकर्षणाचे रूपांतर करुणेत झाले.

 अप्पांच्याबद्दल मात्र पहिल्याने भिऊन वागणारी मी हळूहळू त्यांच्याकडे ओढली गेले. त्यांचे मोठ्याने हसणे किंवा बोलणे, किंवा त्याच्या वागण्यातील खडबडीतपणा ह्यांच्या मागचे वात्सल्य मला जाणवू लागले. इंग्रजी वाङमयाची गोडी त्यांनीच मला लाविली. पहिल्यांदा मुलांच्या अदभुत-कथांपासून सुरुवात झाली. हळूहळू प्रसिद्ध-प्रसिद्ध कादंबऱ्या वाचून झाल्या. त्यामागून स्पेन्सर, मोर्ले, मिल वगैरेंचे ग्रंथ मी त्याच्याजवळ वाचले. ग्रंथ वाचताना मोठेपणी अधूनमधून त्यावर संभाषणही होई व अशा त-हेने माझ्या मनाची एक विशिष्ट घडण बनण्याला ते कारणीभूत झाले. मी त्यांच्याइतकी बुद्धिवादी कधीही झाले नाही व निरीश्वरवादीही झाले नाही. पण त्यांच्याजवळ केलेल्या वाचनामुळे ह्या विचारसरणीमागील मनोभूमिका व ध्येयवाद मला समजू शकला. अलीकडे-अलीकडे तर मी बरोबरीच्या नात्याने त्यांच्याशी वाद घालू शकते. तेही कधी वादाला कंटाळत नाहीत. ह्याप्रमाणे मला नकळत मी एका व्यक्तीपासून दुरावत होते व एका व्यक्तीच्या जवळ येत होते.

 अप्पा विलायतेहून आले, तेव्हा त्यांची पहिली बायको वारली होती व त्यांनी त्या वेळच्या मानाने सुशिक्षित (म्हणजे मॅट्रिक झालेल्या), सुस्वरूप व सुधारक घराण्यातील एका मुलीशी लग्न केले. सईताई लग्न झाल्यावरही काही दिवस कॉलेजात जात असत. पण पुढे काही शिकल्या नाहीत. मागे सांगितलेल्या कारणामुळे वाचन, शिक्षण, एवढेच काय, पण जीवनाचा अनुभव या दृष्टीनेही त्या कधी अप्पांची बरोबरी करू शकल्या नाहीत. मला राहून-राहून प्रश्न पडतो तो असा की, अप्पांनीसुद्धा जाणूनबुजून मन:पूर्वक असा प्रयत्न कधी केला होता का? अगदी अशिक्षित बायकोसुद्धा शिकलेल्या नवऱ्याबरोबर संसार करून रोजच्या घरगुती व्यवहारात त्याची बरोबरी करू शकते, हे मी पाहिले आहे. अप्पांना ते काही जमले नाही, किवा तशी त्यांची दृष्टीच नव्हती, असे मला वाटते. लहानपणी सईताई आम्हाला सांगत ती एक गोष्ट मी विसरू शकत नाही. त्यांनी सांगितले की, लग्न झाल्यावर अप्पा रोज हिराबागेत टेनिस व मागून पत्ते खेळायला जात असत. ते पाचाला जायचे ते चांगले साडेआठपर्यंत परत येत नसत. एवढा वेळ प्रिन्सिपॉलच्या बंगल्यामध्ये बायकोला एकटे ठेविले, म्हणजे कंटाळा येईल; म्हणून ते सईताईंना गाडीतून घेऊन जाऊन वहिनींकडे पोहोचवीत, व येताना बरोबर आणीत. येताना त्या दोघांचा एकी का-बेकीच्या धर्तीवर एक मोठा मजेदार खेळ चाले. त्या वेळी म्युनिसिपालिटीचे दिवे रॉकेलचे असत. प्रत्येक दिव्याच्या भोवती खुपसे किडे जमत व ते खायला पाली येत. प्रत्येक दिव्यात किती पाली असतील, त्यांचा अंदाज बांधीत व कुणाचा अंदाज बरोबर हे पाहत पाहत हे जोडपे घरी पोहोचत असे. मला वाटते, दररोज पालींचा हिशेब करून बहुतेक अप्पा एक आलेख तयार करीत असले पहिजेत.

 अप्पांचा कॉलेजातील सहकाऱ्यांशी काही मतभेद झाला, किंवा दुसऱ्या काही अडचणींना तोंड द्यावे लागले, तर ते कधीही बायकोबरोबर विचारविनिमय करीत नसत. अप्पांच्या निवडणुकीच्या वेळेला सईताईनी मोठ्या उत्साहाने काम केले. पण त्यांच्यात तात्त्विक विषयांवर चर्चा झालेली मी कधी ऐकली नाही. अप्पा सईताईंना कधी रागावलेलेही मला आठवत नाहीत. त्यांच्या खर्चापायी, त्यांच्या निरनिराळ्या छंदापायी ते टेकीस येत. पण बेनेटचे एखादे वाक्य बोलून मनाचे समाधान करून घेत. बायकोशी वागण्यामध्ये 'प्रेयो मित्रम' ह्या भवभूतीच्या व्याख्येपर्यंत ते कधी पोहोचलेच नाहीत, असे मला वाटते. ह्या वागण्यामध्ये प्रेमळपणा होता, पण त्याचबरोबर एक त-हेचे अंतर कायम राहिले. ज्ञानाने, वयाने, अनुभवाने कमी असणाऱ्या माणसाशी जे वागणे राहते, तसेच ते शेवटपर्यंत राहिले. अप्पांनी सईताईंना मिसेस बेनेटची भूमिका बहाल केली. तेव्हा एखादे वेळेस तरी सईताईंनी जेन ऑस्टेनच्याच एखाद्या कादंबरीतील पढतमूर्खाची भूमिका अप्पांना दिली असती, तर ती बरोबरी झाली असती. पण तशी बरोबरी करणे सईताईंच्या कधी स्वप्नातही आले नसणार. अप्पांचे बायकोशी हे वर्तन बऱ्याच दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपाचे होते. महादेव गोविद रानडे, अण्णासाहेब कर्वे वगैरे मंडळींची आपल्या कुटुंबाशी वागणूक अशाच त-हेची होती. बायकांना आपल्याबरोबर एखाद्या सभेला घेऊन जाणे शिकविणे वगैरे हे लोक करीत असत, पण जुन्या काळच्या करत्या पुरुषाची बायकोच्या बाबतीत जी भूमिका होती. तीच त्या सर्वांची होती. समाजकारण, राजकारण वगैरे विषय खास पुरुषांचे आहेत; त्यांची चर्चा पुरुषा-पुरुषांमध्ये होईल, पण घरात पोरीबाळी व बायको वगैरेंपूढे नाही. अप्पांच्या जीवनाचा आणखी एक विशेषही त्या वेळच्या पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचेच प्रतीक मानला पाहिजे. आप्पांनी आपल्या बायकोशीच काय, पण कोणाही स्त्रीजवळ आपले मन कधी उघडे केले नाही. कोणीही बाई त्यांना तितकी जवळची वाटली नाही; पण कालिदासाच्या म्हणण्याप्रमाणे 'दयितास्वनवस्थित' असे मात्र ते कधीच झाले नाहीत. अंत:करण उघडे करून बोलावे. किंवा दुसऱ्याने आपल्याजवळ ते तसे करावे, अशी कल्पना त्या वेळच्या पुरुषांना नसावीच.

अप्पा राजकारणी व्यक्ती होते, पण सार्वजनिक जीवन ते घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवीत असत. त्यामुले त्याचे पडसाद क्वचितच उमटत 'प्रासाद शिखरस्थोऽपि काको न गरुडायते' किंवा 'पशुपाल का शिशुपाल? अशांसारखी वर्मी लागणारी लिखाणे 'केसरी'त प्रसिद्ध झाली, तरी त्याबद्दलची बातमी आम्हांला बाहेरून लागायची. हे घरात आपले नेहमीसारखेच. अशा सरळ ध्येयवादी माणसाविरुद्ध त्याच गावातला दुसरा मनुष्य असे कसे लिहू शके, ह्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते. एकदा प्रतिस्पर्धी म्हटला, म्हणजे तो राज्यकर्ता इंग्रज आहे, की कुटिल दुष्टबुद्धी मनुष्य आहे, की केवळ आपल्याहून निराळी मते धारण करणारा एखादा सज्जन आहे, ह्याबद्दलचा काहीही विवेक न करिता त्याला नामोहरम करायचे, ही पुण्याची बरीच जुनी परंपरा आहे. तीतलाच हा प्रकार. एवढे खरे की, अप्पांच्यावर असल्या टीकेचा काहीच परिणाम होत नसे; आणि घराचे वातावरण ह्या दिवसापासून त्या दिवसापर्यंत कधी बदलत नसे. बाहेर काहीही टीका झाली असली, सहकाऱ्यांशी सभेत कितीही कटकटी झाल्या असल्या, तरी नाट्यवाचनाचा दिवस आमचा एकदा ठरला, म्हणजे त्यात खंड पडत नसे. ह्या प्रकारामुळे ते प्रिन्सिपॉलकी संपवून मिनिस्टर झाले, तरी ते बाहेर काय करतात, ह्याची आम्हांला- निदान मला तरी- बिलकुल दाद नव्हती. आमच्या मते ते मिनिस्टर झाले ह्याचा अर्थ एवढाच की, आम्ही मुंबईला मोठ्या बंगल्यात रहायला गेलो, महाबळेश्वरला महिनेच्या-महिने त्यांच्या बंगल्यात राहिलो, भटक-भटक भटकलो, आणि स्ट्रॉबेरींवर दुधाची दाट साय घालून त्या खाल्या!

 अप्पा सईताईंच्या कधी जवळ आले नाहीत. त्यांच्या नातेवाइकांच्या परिवारातही त्यांनी कधी आपले अंत:करण उघडे केले नाही. शकू त्यांना सगळ्यांत जवळची. ती स्वतः आयुष्यात बऱ्याच प्रसंगांतून गेलेली. पण त्याबद्दल कधी बापलेकींत मोकळी चर्चा झाली असेल, असे वाटत नाही. एक अशी व्यक्ती होती की, तिच्या जवळ अप्पा आपले खाजगी व सार्वजनिक आयुष्य ह्याबद्दल चर्चा करीत असत. ती व्यक्ती म्हणजे सेंट जॉन कॉलेजमध्ये ज्यांच्याशी अप्पांची मैत्री झाली, ते श्रीयुत बालकराम. बालकरामांच्या मनाची घडण कितीतरी जास्त गुंतागुंतीची, भावनाप्रधान व हळवी अशी होती. आणि अप्पा व ते एकमेकांना पूरक असावे, असे वाटते. ते पुण्याला येत, तेव्हा घरात सगळ्यांनाच उत्साह वाटे. अप्पांचे नि त्यांचे पुष्कळ वेळ बोलणे चाले. अप्पाही त्यांच्याकडे कधीमधी रहायला जात असत. ते दुर्दैवाने तीस-बत्तीस वर्षांपूर्वी वारले. तेव्हापासून बरोबरीचे, जिवलग असे मनुष्य अप्पांना नाहीसे झाले. एखादे वेळेला, एखादे वाक्य किंवा दोन वाक्ये आयुष्याबद्दल अप्पा बोलतात. तेही इतक्या झटपट इंग्रजीत बोलून जातात की, कधी एकदा वाक्याचा शेवट गाठतो, असे त्यांना होते. सईताईंच्याबद्दल माझ्याशी बोलताना नुकतीच मी त्यांच्या तोंडून दोन इंग्रजी वाक्ये ऐकिली. त्यांतले एक : "You know-she never grew up." जरा थांबून दुसरे वाक्य : "She was ill" ह्यांपेक्षा जास्ती बोलणे त्यांना शक्यच नव्हते. त्यांनी चटदिशी विषय बदलला. मलाही हायसे वाटले. गेलेल्या मुलाबद्दल सईताईंच्या तोंडून मी कितीतरी ऐकिले होते. एक कवितासुद्धा त्यांनी मला दाखविली होती. पण अप्पा त्याबद्दल कधी एक अक्षरही बोलले नाहीत. एकदा सहज बोलताना म्हणून गेले, -तेही नुकतेनुकतेच- मला मुलांची फार आवड. मला खूप मुलं हवी होती.' संपले. त्यांच्या एकेका वाक्यात त्यांच्या आयुष्यातील घटनांबद्दल इतका अर्थ मला आढळतो की, कधीतरी असे एखादे वाक्य जरी ऐकले, तरी माझे मन अगदी अस्वस्थ होऊन जाते. त्यांचे निकटवर्तीयांशी संबंध अतिशय प्रेमळपणाचे; पण आम्ही कोणीच त्यांच्या बरोबरीची नसल्यामुळे की काय कोण जाणे, अंतःकरण उघडे करून ते दाखवायचे नाहीत, हे मात्र खास.

 आयुष्यासंबंधी त्यांचे काही सरळसोट आडाखे आहेत. भावनेची काय, वागण्याची काय, किंवा बोलण्याची काय. तेढी वाट त्यांना मुळी माहीतच नाही. आपले नाकासमोर जायचे, असा त्यांचा व्यवहार अव्याहत चाललेला आहे. थोडे वळणाचे बोलणे किंवा विचार ह्यांचे त्याना वावडे आहे. त्यांच्याशी ज्यांचा संबंध आला आहे, त्यांना हे पदोपदी आढळले असेल. मला लहानपणची एक गोष्ट आठवते; आम्ही एकदा गाडीतून फिरायला जात होतो. अप्पा-सईताई बसायची मोठ्या बैठकीवर व त्यांच्या समोरच्या लहान बैठकीवर त्यांच्याकडे तोंड करून शकू व मी बसत असू. गाडी फर्गसन कॉलेजच्या रस्त्याने चालली होती. शकूला व मला बसल्या जागेवरून पर्वती व पर्वतीमागच्या टेकड्या दिसत होत्या. टेकड्यांचा रंग त्या दिवशी विशेष निळा दिसत होता आणि शकू व मी दोघीही "किती बाई आज गडद-निळे डोंगर आहेत!" असे म्हणत होतो. अप्पा आमच्या अंगावर खेकसून म्हणाले, “काहीतरी कविता वाचायच्या, नि काहीतरी बोलायचं! टेकड्या कुठं निळ्या असतात का?' आम्ही किती जीव तोडून सांगितलं की, खरोखरच त्या निळ्या आहेत, तरी अप्पांना काही ते पटले नाही! माझी दुसरी आठवण म्हणजे नुकतेच त्यांचे आत्मचरित्र वाचीत

असताना त्यांनी पोटसडामबद्दल लिहिलेले शब्द वाचले त्या वेळची. पोटसडाम बर्लिनशेजारी आहे. तेथे फ्रेडरिक द ग्रेट ह्या राजाने पॅरिस जवळच्या फ्रेंच राजांनी बांधलेल्या व्हर्साय ह्या राजवाड्याची नक्कल करून एक गचाळ राजवाडा व बाग उठविली आहे. अप्पांनी आपल्या आत्म- चरित्रात गंभीरपणे एक असे वाक्य ठेवून दिले आहे की, “पोटसडामचा राजवाडा सौंदर्याच्या बाबतीत काही व्हर्सायच्या राजवाड्याच्या तोडीचा नाही.' औरंगाबादचा बिबीचा मकबरा ही दगडाचुन्यात बांधलेली ताजमहालची प्रतिकृती ताजमहालइतकी चांगली नाही, असा गंभीर शेरा देण्याचाच हा प्रकार! बारकावे त्यांना समजत नाहीत, ह्याचे एक उदाहरण म्हणजे शकूने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचे ठरविल्यावर ते रागावले होते व लग्न झाल्याचे तिने कळविल्यावर तिला त्यांनी लग्नाची भेट म्हणून दोनशे रुपये पाठविले! दुसऱ्या कोणी हे केले असते, तर ह्या कृतीत किती अर्थ-की अनर्थ दिसला असता! अजून ह्या प्रसंगाची आठवण झाली की, शकू चिडते. पण त्याचे मूल्य तिच्याच शब्दांत द्यायचे म्हणजे “अप्पा फार पारंपरिक (traditional) आहेत. अमक्या वेळी एखादी गोष्ट करायची, म्हणून ते करितात. तीतील अर्थच मनात घेत नाहीत." हे मूल्यमापन मला सर्वस्वी पटत नाही, पण ह्या विचित्र देणगीचा(!) अर्थ मलासुद्धा दुसरा लाविता येत नाही.

 अप्पांचे जिवलग मित्र एक बालकराम. त्यांच्यानंतर अप्पांची इतकी अंत:करणापासून कोणाशीच मैत्री झाली नाही. पण त्यांच्याजवळ वात्सल्याचे भांडवल मात्र कधी न संपणारे असे आहे. त्यांच्या आयुष्यात एका दृष्टीने त्यांनी आपल्या बायको-मुलीला सहभागी केले नाही. पण तसे करणे त्यांना अवघड जाते म्हणून, स्वत:च्या मोठेपणामुळे नव्हे. अप्पांवर अतोनात प्रेम करणारी माणसे खूप आहेत. स्वत:च्या मुली-नातींखेरीज भाऊ-भावजया, त्यांची मुले, मुलांची मुले अशा सर्वांवर, माझ्या कुटुंबावर, त्यांची फार माया आहे. शकू व सई ह्यांचे मित्रमंडळ घरी येते व अप्पांच्या आकर्षणात सापडून ती सर्व मंडळी त्यांची होतात. पण व्यक्तिपूजा व तीमागची आंधळी भक्ती किंवा तीमागे असणारी पुढेपुढे करण्याची वृत्ती ही त्यांच्यात किंवा त्यांच्या आसपास चुकूनही दिसली नाही.

 मला वाटते, तेही अप्पांच्या स्वभावविशेषामुळेच. मी लहान असताना अप्पांच्या घरी त्या वेळी भारतात प्रसिद्ध असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती येऊन गेल्या होत्या. गृहस्थाच्या घरी त्यांचे जे आदरातिथ्य व्हायचे ते होत असे, व ते अगदी मनापासून होई. पण अप्पांनी कधी कोणाचा मोठा बडेजाव केला नाही व कोणाला आपला करू दिला नाही. त्यांच्या सान्निध्याचा असाच प्रभाव पुणे विद्यापीठावरही पडला. डॉ.जयकर अतिशय बुद्धिमान, पण स्वभावाने तर्ककर्कश व हुकमत गाजविणारे. ते सभापती होते, तेव्हा सारखे खटके उडत व तीव्र असंतोष असे. एखाद्याला खाली बसवीत तेही इतक्या हुकमतीने व तुच्छतेने की, ते मनुष्य कायम दुखावले जाई व इतर सभासदांच्या मनातही भीती व असंतोष निर्माण होई. अप्पा आल्यावर हे सर्व बदलले. सर्व सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एक वयस्क प्रोफेसर मला म्हणाले, "काय गोड माणूस हो! त्यानं आम्हांला आमच स्वत्व: परत दिलं.' विशेषतः, तरुण माणसांना आणि आता सर्वच त्यांच्यापेक्षा लहान आहेत, ह्या वागणुकीमुळे फारच आनंद होतो.

 हे सर्व होत असता त्यांच्या कर्तव्यात काडीमात्र कसूर होत नाही. बायबलमध्ये एक वाक्य आहे.... “जो प्रेम करतो. तोच शिक्षाही करू शकतो.” (He chastiseth best who loveth best.) ते मला नेहमी त्यांना लावावेसे वाटते. एका बाबतीत मात्र त्यांच्या मायेला कर्तव्यनिष्ठुरतेचा बंध नाही. त्यांना अगदी लहान मुले कमालीची आवडतात. अगदी एका दिवसाचे तान्हे मूलसद्धा ते हौसेने मांडीवर घेतात, व तोंडाने चाक-चूक असे आवाज काढीत त्याच्याशी बोलतात. एखादे तान्हे मूल त्यांच्या मांडीवर मुतले म्हणजे तर त्यांना धन्य वाटते. जाई, गौरी, सई वगैरे सर्व नातींना ते बजावून सांगतात, “नसता मोठेपणा सांगू नकोस; लहानपणी माझी मांडी भिजवली आहेस!"

 मुले जरा मोठी झाली, म्हणजे मात्र अप्पांच्या जवळून पळून जातात; कारण ते हळूच तपकीर त्यांच्या नाकात कोंबतात, नाही तर दंड दाबून बेटकुळी काढतात. मूल भेदरले, म्हणजे मोठमोठ्याने हसतात. 'मुलांचे मानसशास्त्र' हे शब्द त्यांनी ऐकिलेले दिसत नाहीत. एक प्रकारे ते ठीकच आहे. कारण त्यांच्या ह्या रानटी वागणुकीमुळे कुणी मूल त्यांना कायम दुरावलेले मला माहीत नाही. मुले परत जरा मोठी झाली की, त्यांच्याकडे ओढली जातातच.

 आप्पांच्यात विरोधी वाटणार्‍या दोन गुणांचा मिलाफ मजेदार रीतीने झालेला आहे. पहिला, त्यांची समता किंवा न्यायबुद्धी; आणि दुसरा, त्यांचे वात्सल्य. त्यामुळे त्यांना कितीही माया वाटली, तरी त्यांची समतोल कर्तव्यतत्पर वृत्ती ढळत नाही, व ते कितीही कर्तव्यनिष्ठुर असले, तरी त्यांची माया कमी होत नाही. हा अनुभव घरच्या माणसांचाच आहे असे नव्हे, तर विद्यार्थ्यांचाही आहे.. ते रागावतील, शिक्षा करितील, नापसंती कडक शब्दात व्यक्त करितील. पण कर्तव्यामुळे त्यांची प्रेमाची आर्द्रता कधीही नाहीशी होत नाही. त्यांच्या हातून खाल्लेल्या माराच्या आठवणी शकू रसभरितपणे सांगते. त्यांच्याशी तिची कितीतरी भांडणे झाली आहेत, पण कडवटपणा मुळीच नाही. मला ते पुष्कळच रागावले असणार, पण मला आठवते आहे ती त्यांची माया. माझे लग्न झाले, तेव्हा मला एका हाती हजार रुपयांचा आहेर त्यांनी केला. आमच्या संसाराच्या त्या वेळेच्या परिस्थितीत ते दहा हजारांच्या मोलाचे होते. मी अमेरिकेत होते, तेव्हा मला अंजायना नावाचा हृदयाचा विकार होऊन मी निजून आहे, हे ऐकिल्याबरोबर स्वत:ची प्रकृती बरी नसताही भारतसेवक समाजाच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांनी कैलासवासी श्रीनिवास शास्त्री अंजायनासाठी काय औषध घेत होते, त्याची माहिती काढून आणून त्यांनी मला पाठविली! अमेरिकेत सर्व आधुनिक उपचार मजवर होत असणार, पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याला श्री. शास्त्री जे औषध घेत असत, ते एव्हाना जुने झालेले असणार, हा विचारही ते विसरून गेले होते. अजूनही पंधरा दिवसांनी, महिन्याने माझे कसे काय चालले आहे हे पहायला दोन मैल चालत येतात. 'फार काम करू नको; विश्रांती घे,' म्हणून मला बजावितात.

 अप्पा विलायतेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दिवस-न-दिवस आणि वर्ष-न वर्ष केवळ विलायती पोषाखात वावरत असत. अजूनही विलायती पोषाख त्यांच्या चांगला अंगवळणी आहे. पण पुण्याला असले की, घरात धोतर आणि शर्ट आणि बाहेर पडताना त्यावर कोट, उपरणे आणि पगडी हा त्यांचा सर्वांना माहीत असलेला पोषाख, हे त्यांच्या पारंपरिकपणाचे आणखी एक लक्षण. त्यांच्या खाण्यात, बोलण्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत की, त्यांत त्यांचे लहानपणचे संस्कार दिसून येतात. पण तेच अप्पा आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी आपले वर्तन व विचार बदलू शकतात, ह्याचे एकच घरगुती उदाहरण देते.

 शकू लहानपणापासून हुशार. शाळेत तर तिचा पहिला-दुसरा नंबर असेच, पण कॉलेजातही तिने कधी पहिला वर्ग सोडला नाही. तिने सायन्स आणि गणित हे विषय घेतलेले होते आणि ह्या दोहोतही तिची बुद्धी फार छान चाले. अप्पांना ती मुलाच्या जागी. लहानपणापासून नाना त-हानी अप्पांनी तिचे लाडही केले होते, व शिस्तीत शिक्षणही केले होते. आपल्याप्रमाणेच तिने केंब्रिजला जावे, तेथे गणिताच्या परिक्षेत असामान्य यश मिळवावे, अशी त्यांची फार इच्छा होती. पण ह्या मुलीने इंटरमध्ये असतानाच आपले लग्न ठरविले. ज्याच्याशी ठरविले, तो मुलगा मध्यम स्थितीतील खाऊन-पिऊन सुखी अशा घराण्यातील, पण अतिशय हुशार नव्हे. मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षाही शकूने लग्न ठरवावे व आपल्या भावी बौद्धिक जीवनाला हरताळ फासावा, ह्याचे त्यांना वाईट वाटले. पण त्यांच्या नेहमीच्या सरळ स्वभावामुळे व सुधारकी तत्वांना धरून त्यांनी त्या लग्नाला मोडता घातला नाही. हे लग्न काही दिवसांत शकूनेच मोडले. मोडून शकू परत अभ्यास करण्यास मोकळी झाली ह्याबद्दल अप्पाना आनंदच झाला असला पाहिजे. हा आनंद काही त्यांनी बाहेर दर्शविला नाही; तरी तिला विलायतेला पाठविण्याची सर्व तयारी केली आणि बी.एससी.त पहिल्या वर्गांत येऊन शकू विलायतेला गेली. पण अप्पांच्या मनाप्रमाणे गणितात मोठे यश संपादन न करिता फ्रेंच, शिक्षणाची तत्वे वगैरे इतरच विषयांवर लक्ष केंद्रित करून जेमतेम ती परीक्षा पास झाली. अप्पा विलायतेहून आल्यानंतर तिने त्यांच्या मनाविरुद्ध तिकडेच लग्न केले. काही वर्षांनी शकू परत आली व शकूची मुलगी सई जन्मापासूनच आप्पांकडेच वाढली.

 ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ अप्पांनी काही लावला असेल, ह्याचा सुगावा मला नुकताच लागला. ती कथा अशी : सई अतिशय गोड पोरगी. अभ्यासात शकूइतकी हुशार नाही, पण लहानपणापासूनच निरनिराळया कला ती चटदिशी आत्मसात करी. ती कशीबशी बी.ए. पास झाली. पण तोपर्यंत शकूच्या प्रोत्साहनाने म्हणा, किंवा शकू मागे लागल्यामुळे म्हणा, तिने काही चित्रे काढली, काही गोष्टी व काही लहान नाटके लिहिली. सई म्हणजे कमालीची आळशी व सुखासीन. एखादी कल्पना आली, म्हणून मांड घालून लिहायला बसली, किंवा मानेवर खडा ठेवून आपण होऊन तिने चित्र काढिले, असे कधी व्हायचे नाही. सईला बसवायचे नि तिच्याकडून काम करून घ्यायचे, हा उद्योग शकूचा. एकदा मी एम.ए.चा वर्ग.शिकवून येताना मला सई भेटली. मी तिला जरा आश्चर्यानेच विचारिले. "बाई, तू इकडे कुठे आज?" तिने वाईट तोंड करून, गाल फुगवून मला सांगितले, “काय करायचं? हे अप्पा आहेत ना! मुळीच ऐकत नाहीत. मला म्हणतात, एम.ए. हो. रोज पाठीमागं लागतात. शेवटी घातलं एकदा नाव. त्यांना एकदा कळलं की, माझ्याच्यानं अभ्यास होत नाही, की देतील नाद सोडून!" सईचा हा प्रयत्न फारच लवकर यशस्वी झाला व परत काही मला ती विद्यापीठाच्या आवारात भेटली नाही! अप्पांनी कंटाळून नाद सोडून दिला असावा. ह्याही पोरीने आईप्रमाणेच आपले लग्न जमविले. तेही आईप्रमाणेच एका कलाकाराशी. आणि जसे तिच्या आईचे लग्न अप्पांना पसंत नव्हते, तसे हिचे लग्न आईला पसंत नव्हते. शकूने हे लग्न आपण लावणार नाही, असे साफ सांगितले व अप्पांनी नातीचे कन्यादान केले. अगदी वैदिक पद्धतीने व ब्राह्मणांच्या मंत्रघोषांत! ह्या सर्व प्रसंगाचा त्यांच्या स्वत:च्या आयुष्याशी काय संबंध आला, हे नेहमीप्रमाणे दोन मोजक्या वाक्यांत त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले... “मुलांच्याबद्दल नसत्या महत्वाकांक्षा ठेवू नयेत. मी नाही का शकूबद्दल उगीचच मनाच्या कल्पना केल्या होत्या?" वाक्ये दोनच. पण त्यांत सबंध आयुष्याचा अनुभव भरलेला होता. आपल्या महत्वाकांक्षेपायी मुलीला मनात नको तो अभ्यास करायला लाविले, त्याची पुनरावृत्ती त्यांनी नातीच्या बाबतीत होऊ दिली नाही. शकू रागावली, म्हणून त्यांच्या हृदयाची कोण कालवाकालव झाली; पण म्हणून ते आपल्या कर्तव्यापासून ढळले नाहीत. ह्या सर्व गोष्टी नेहमीच्या सहजपणे आणि प्रसन्नपणे त्यांनी केल्या. त्यात नातीबद्दलचा जिव्हाळा जसा होता, तसाच आयुष्यातील काही प्रसंगांवरून धडा घेण्याचीही वृत्ती त्यात होती. सईच्या लग्नाच्या दिवशी माझ्या राहून-राहून मनात येत होते की, मिस्टर बेनेटची भूमिका वठवू बघणाऱ्या अप्पांनी शेवटी सर टॉमसचीच भूमिका पार पाडली.

 वयाच्या ऐंशीव्या वर्षापुढे अशा त-हेने बुद्धीचा असामान्य समतोलपणा व लवचिकपणा दाखविणे अप्पांना शक्य झाले, पण त्याचबरोबर मी ज्याला प्रातिनिधिकपणा व पारंपरिकपणा म्हणते, तोही दुसऱ्या एका घटनेमुळे मला नुकताच परत एकदा कळला. एखाद्या संस्थेमध्ये, विशेषतः शिक्षणसंस्थेमध्ये कमी पगाराची नोकरी धरून ती वीस वर्षे करीत राहणे हे अप्पांच्या मते ध्येयवादाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या द्रव्यापैकी देववेल तितके द्रव्य एखाद्या शिक्षणसंस्थेला देणे हे आपले कर्तव्य आहे, ही त्यांची त्यांच्या वेळेच्या परंपरेप्रमाणे ठाम झालेली एक समजूत आहे. शकू हल्ली आपला बहतेक वेळ कटंबनियोजनाच्या प्रचारात घालविते. गेली कित्येक वर्षे ती हे काम करीत आहे. हे काम पगारी नाही. त्यात तिला द्रव्यप्राप्ती होत नाही. रहावयाला अप्पांचे घर नसते, तर तिला हे कार्य करणे जड गेले असते, व पुढेही जड जाईल. तिच्या ह्या आयुष्यक्रमात मोठा ध्येयवाद आहे, हे अप्पांनासुद्धा पटेल. पण तिचे कार्य सतत चालू राहण्यासाठी आपण तिच्यासाठी काही केले पाहिजे, ह्याची जाणीव मात्र त्यांना नाही. जी गोष्ट शकूची, तीच दुसऱ्या अर्थाने सईची. सई कलावंत आहे, तिने एका कलावंताशीच लग्न केले आहे, कलावंताचे जीवन बरेच खडतर असते, थोडासा का होईना, पण ठरलेला पगार महिन्याच्या महिन्याला मिळण्याची त्यात फारशी शक्यता नसते. मग रहायला स्वतःच्या मालकीच्या दोन खोल्या ही कल्पनाच नको. कलेच्या मागे लागणे हाही एक प्रकारचा ध्येयवाद आहे. दोन्ही मुली दोन तर्‍हानी अशा परिस्थितीत असताना आपले राहते घर त्यांनी मृत्युपत्रान्वये एका संस्थेला दिल्याचे ऐकून मला तर धक्काच बसला. अप्पांच्याजवळ गडगंज संपत्ती नाही. घरी मोटार नाही. दोन मुलींना पोटापुरते व डोक्यावर निवारा एवढे ठेविले, तर अप्पा आपल्या सार्वजनिक कर्तव्याला चुकले, असे मला मुळीच वाटत नाही. पण ह्या बाबतीत अप्पा आपल्या पिढीतील काही देशभक्तांचे व सुधारकांचे प्रतिनिधी आहेत.

 मला पुष्कळ वाटते की, एकदा त्यांच्याशी ह्या बाबतीत रागारागाने वाद घालावा. पण माझ्या आजपर्यंतच्या भूमिकेमुळे अजूनपर्यंत तरी मला ते तितकेसे जमले नाही. आणि मुलीबाळींनी विरोध केला, म्हणून हा मोठा पुरुष आपला विचार बदलील असेही वाटत नाही.

 एका दृष्टीने त्यांचा स्वभाव, वागणूक जीवनाचा प्रवाह सर्व काही एका . विशिष्ट कालखंडाचे द्योतक वाटतात. पण दुसऱ्या बाजूने पाहिले, तर त्यांची असाधारण बुद्धी, अपार वात्सल्य व बालसुलभ ऋजुता ह्यांचा मिलाफ अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कोठल्याही रेखीव चौकटीत त्याचे आयुष्य बसविताच येत नाही.

१९६१

 हे लिखाण लिहून झाल्यावर अप्पांकडे पाठविले व त्यांना विचारले "तुमची हरकत नसली, तर छापून काढायचे म्हणते आहे!" त्यांचे उत्तर त्यांच्याच शब्दांत देते.

 १ माझी हरकत नाही. तुला काय हवे ते कर.

 २ 'ही' इंटर पास होऊन बी.ए.त गेली होती.

 मी सध्या व्हर्जिल वाचतो आहे.

 ज्याबद्दल मला विशेष औत्सुक्य, त्या त्यांच्या मृत्युपत्राबद्दल एकही शब्द नाही!