गंगाजल/बॉय-फ्रेण्ड?

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchएक :
बॉय-फ्रेण्ड?


 मी पंढरपुराहून येऊन विश्रांती घेत कोचावर पडले होते. शेजारीच एका खुर्चीवर लेक काही तरी वाचीत बसली होती, आणि तिचा नवरा ओसरीवरून खोलीत व खोलीतून ओसरीवर अशा येरझरा घालीत होता. निरनिराळ्या कामांची निरनिराळी माणसे त्याला भेटायला येत होती. माणसे आली की तो बाहेर जाई, माणसे गेली की घरात तो माझ्याशी बोले. असे आमचे संभाषण चालले होते.

 तो आला. माझ्यासमोर खुर्ची घेऊन बसला आणि त्याने मला विचारले, “काय, भेटला का बॉय-फ्रेण्ड?"

 प्रश्न ऐकून काही क्षण मी बुचकळ्यातच पडले. मग लक्षात आले की, हा मुलगा विठोबाबद्दल विचारीत आहे. मी हसून म्हटले, “हो, भेटला की"

 एवढ्यात बाहेर माणसे आली. तो निघून गेला.

 पण त्याच्या प्रश्नाने माझी झोप मात्र उडाली. एका दृष्टीने बॉय-फ्रेण्ड हे बिरुद नवेच होते, पण अर्थाने काही नवे नव्हते. आई, बाप, सखा, सोयरा, जिवलग अशा कितीतरी नावांनी लोकांनी विठोबाला आळविले आहे. जिवलग वगैरे नावांत जो अर्थ, तोच अर्थ बॉय-फ्रेण्डमध्ये नाही का? प्रियकर म्हणून कितीतरी भक्तांनी देवाला आळविले नाही का?

 स्वारी परत घरात आली. दर प्रश्नानंतर बाहेर गेल्यानंतर निरनिराळ्या विषयांवर बोलून परत जुन्या प्रश्नाचा धागा त्याच्या मनात कसा राही, कोण जाणे! त्याने म्हटले, “तुझ्या नवऱ्याला बरा चालतो ग, बॉय-फ्रेण्ड असलेला?" मी म्हटले, “असले बॉय-फ्रेण्ड चालतात नव-यांना." माझे उत्तर पुरे व्हायच्या आतच कुणीतरी माणसे आली, म्हणून तो बाहेर गेला व माझे मन परत एकदा आमच्या प्रश्नोत्तरांभोवती घुटमळत राहिले. असे बायफ्रेण्ड म्हणजे कसे? दगडाचे? छे! दगडाचा जिवलग चालतोच, असे नाही. मीरेच्या नवऱ्याला, सखूच्या नवऱ्याला, बहिणाबाईच्या नवऱ्याला नाहीच चालला की, तेव्हा जिवलग दगडाचा आहे का हाडामांसाचा आहे, हा प्रश्न नसून तो कितपत जिवलग आहे, ह्यावर नवऱ्याला चालतो की नाही, हे अवलंबून आहे. मीरेला गिरिधारीशिवाय चालतच नव्हते. तसेच बहिणाबाई किंवा सखू विठ्ठलाच्या ओढीने घरदार, नवरा टाकून पंढरीच्या वाटेला चालू लागल्या. माझे थोडेच तसे आहे? नवऱ्याची गैरसोय न करिता सुट्टीच्या दिवशी गाडी मिळते का, मी पाहणार. पंढरपूरच्या वाटेवर ओढ्याना पूर नाही ना, ह्याची मी खात्री करून घेणार. आज काही विशेष दिवस-एकादशी, द्वादशी, गोपाळकाला वगैरे - नाही ना, देवळात गर्दी नसेल ना, थोडाच वेळ थांबून, देवाच्या पायांवर डोकं टेकून पोटभर दर्शन मिळेल ना? ह्या गोष्टींचा विचार करून मी सावकाशपणे पंढरपूरला जाणार. माझ्या नवऱ्याच्या दृष्टीने हा बॉय-फ्रेण्ड नुसता दगडाचाच नाही, तर खरोखर जिवलगही नाही. असला न चालायला काय झाले? कधीमधी आपणणहूनच मला विचारतो, ‘बऱ्याच दिवसांत पंढरपूरला गेली नाहीस ती?' एक व तरी कटकट आणि वटवट लांब गेली! म्हणजे असला बॉय-फ्रेण्ड चालतो एवढेच नव्हे, तर पुष्कळदा सोयीचाही पडतो.

 जावईबुवा परत आत आले. परत माझ्यासमोर बसले. "काय ग, तुझा बॉय-फ्रेण्ड तुला म्हणाला काय?" मी हसले, “तो म्हणाला, झाली आठवण?"

 माझे वाक्य संपायच्या आत हे वारं खुर्चीवरून उठून बाहेर गेले होतं. "झाली वाटतं आठवण?" ह्या वाक्याचा अर्थ काय? विठ्ठल एके ठिकाणी रात्रंदिवस उभा आहे. त्याला आठवण कायमचीच असते. तो वाट लपाहत असतो. मला मात्र आठवण कधीमधी होते. आणि आठवण झाली, तरी लगोलग मी भेटीला जात नाही. काळ, वेळ, सोय बघून मी जात असते. अशा कधीमधीच्या भेटीला गेले, तर तो दुसरे काय विचारणार? 'झाली का आठवण?' ह्यामधेच आणखी एक प्रश्न आहे. तो म्हणजे ‘बये, कशास आली आहेस? काय हवं आहे? काय उणं पडलं आहे?' मीरा देवाच्या प्रेमाने वेडी झाली होती. तिला देव हवा होता. मी थोडीच त्यातली आहे? सोसवेनासा काही भार शिरी पडला की मला हरी आठवतो. मी एकटी आहे, काहीतरी प्रसंगाला तोंड द्यायचे आहे,काहीतरी सहन करायचे आहे, अशी अवस्था आली की मी देवाकडे धाव घेते. आर्त आणि अर्थार्थी ह्या भक्तांच्या दोन पायऱ्यांपलीकडे मी गेलेच नाही. तेव्हा ‘आता झाली का आठवण?’ ह्याऐवजी खरोखर ‘आता का आठवण झाली?' असा प्रश्न पाहिजे होता.

 दार परत उघडले गेले. बाहेर लोक अजून उभे होते. तो आत माझ्याजवळ आला. “उद्या गेलीस, तर नाही का चालणार?"

 “नाही. बरीच कामं खोळंबली आहेत. मला आजच गेलं पाहिजे."

 ‘‘मी ह्या मंडळींबरोबर जरा शेतावर जाऊन येतो आहे. मला यायला उशीर होईल. मी येईन तो तू गेलेली असशील. जपून जा. फार दमलेली दिसतेस?" त्याने वात्सल्याने माझ्या तोंडावरून हात फिरविला व तो गेला.

 माझ्या मनात आले,भक्ताने विठोबाशी सर्व नाती जोडलेली आहेत. पण त्याला मुलगा किंवा मुलगी केलेले नाही. आईबाप, भाऊ, बहीण सर्व काही तो आहे.मग मुलगा का बरे नाही? एखादी जनी असे का बरे म्हणत नाही?...

 पंढरीचा विठूराया । जसा पोरगा पोटीचा
 मज आधार काठीचा । म्हातारीला
 विठूराया पाठीवरी । हात फिरवी मायेने
 पुसे लेकाच्या परीने । बये फार भागलीस

 ...पण छे! जनी काय, किंवा तुकाराम काय, विठूला मुलगा म्हणणे शक्यच नव्हते. मला वाटते, कोणाही भक्ताने देवाला आपले मूल कल्पिलेले नाही. कारण कुटुंबातल्या सर्व उपमा व त्या नात्यांचे कितीही दृष्टान्त दिले, तरी ज्या दृष्टांन्तात देवाकडे लहानपणा येईल, असे दृष्टान्त नाहीत. जिवलग हे नाते बरोबरीचे, पण त्या नात्यातही देव नेहमीच पुरुष असतो व भक्त बाई वा बुवा कोणीही असो, बाईचीच भूमिका पार पाडतो. वऱ्हाडच्या एका प्रसिद्ध सन्तांनी विठ्ठलाच्या नावे गळ्यात काळी पोत व हातात चुडा भरला होता ‘मधुरा'- भक्ती ह्या नावाखाली जी भक्ती येते, तीत पुरुषभक्त स्वत:ला राधाच समजतात. जी जी नाती कल्पिली आहेत, त्या सर्वात हिंदू रूढीप्रमाणे वरचढ समजली जाणारी नाती विठोबाला जडविली आहेत.बाळकृष्ण पूजेत असतो, पण विठोबाला कोणी लेक म्हणाल्याचे आठवत नाही. कृष्णाला मूल म्हणायचा अधिकार फक्त यशोदेचा, आपल्या पोटचा गोळा मारायला देऊन त्या बदल्यात तिने हा अधिकार मिळविला. तिने देवाला जन्माला घातले नाही. पण त्याला महाप्रयासाने जगविले. मी कोण देवाला असे काही म्हणणारी? मी त्याला इतकी जवळ नाहीच. जिवलग, बॉय-फ्रेण्ड ही नुसती गंमत. त्याच्यामधले व माझ्यामधले अंतर दुर्दैवाने फार, फार -फारच दूर आहे.

१९७०