Jump to content

कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> कोण हो कोण ? - काय ! अवचितराव करकर्‍यांची सून ? आणि ती एकाएकी कशानें हो मेली ? - वाख्यानें का ? बरें झालें हो ! सुटली एकदांची आपल्या दुःखांतून ! बिचारीचा नवरा वारल्याला दोन वर्षे व्हायला आलीं असतील नाहीं ? - बाई ! बाई !! केवढा आकांत माजला होत्या त्या वेळेला या घरांत ! घरांतल्या बायकांच्या ओरडण्यानें सगळी आळी किं हो गर्जून गेली होती ! आणि आतां ? या सोळा - सतरा वर्षाच्या मुलीकरतां - आनंदीच नाहीं का हिचें नांव ? - बिचारीकरतां या घरांतलें एक चिटपांखरुं तरी आता ओरडत आहे का ? - बरोबरच आहे ! नवरा मेलेली पोर ! हिच्या मरणाबद्दल हो कोणाला वाईट वाटणार आहे ! उलट जें तें हेंच म्हणणार कीं, ' विधवा मेली ना ? बरें झालें चला ! सुटली एकदांची ! ' इतकेंच काय, पण कितीएक तर असेंसुद्धां म्हणायला कमी करीत नाहींत कीं, ' बरें झालें ! आमच्या घरांतला अपशकुन - बरेच दिवस खिळलेली अवदशा लवकरच नाहींशी झाली ' म्हणून ! नवरा मेलेल्या बायका गेल्या, तर त्यांच्याबद्दल हें अशा तर्‍हेचें दुःख जगाला होत असतें ! - सवाष्ण मेली तर ? अहो कशाचें आलें आहे ! तिची लहान मुलेंबाळें जी काय रडतील, गागतील तेवढींच ! बाकी जग तर हेंच म्हणतें, ' सवाष्ण मेली ? भाग्यवान् आहे ! बरोबर कायमचें - अखंड ! - सौभाग्य घेऊन स्वर्गाला गेली !! ' - हं: , पाहिलें तर तें ' अखंड सौभाग्य ! ' नदींत तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यतसुद्धा टिकत नाहीं ! लागलीच दुसरी कोणी तरी पाठीमागून धांवत येऊन, झिंज्या धरुन, पाठींत लाथ मारुन, तें ' अखंड सौभाग्य ! ' बिचारीच्या हातांतून हिसकावून घेऊन, पुनः जगांत परत येतेही ! - खरेंच तर काय ! बायकाचें जगणे आणि मरणें, सारखेंच ! - जगल्यास जगा ! मेल्यास मरा ! अहो नाहीं तर, या आनंदीच्या नवर्‍यासाठी, तिच्या सासूसार्‍यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता ना ? आणि आतां ? नाहीं, तुम्हींच समक्ष पाहिलें आहे म्हणून विचारतें ? अहो ! आनंदीचा नवरा जगावा म्हणून जशी यांनी खटपट केली, तशीच ही एकदांची मरावी म्हणून यंनी निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरें ! - ती पहा ! ती पहा ! तिला बाहेर आणली आहे ! आई ! आई !! कशी कोंवळी पोर ! कायरे देवा हिला जगांत आणून हिची हौस पुरवलीस ? - तिला पाणी घेतलेली तिची प्रत्यक्ष आईच ना हो ती ? - जावयाकरितां कशी ऊर बडवून किं हो रडत होती ? आणी आतां ? - अहो हिच्या पोटचा गोळा ना तो ? - पण नाहीं, ही मेली म्हणून तिला - प्रत्यक्ष आईलासुद्धां - मनांतून बरें वाटत असेल ! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.