Jump to content

ओझ्याखाली बैल मेला ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> ओ ! आग लागो त्या महत्त्वाकांक्षेला ! आणि त्यांत तळमळणार्‍या, तडफडणार्‍या या जीविताला ! - अरे हा गळफांस काढा - खुंटी नरड्यांत शिरली ! जूं दूर करा - मी मेलों ! - या बैलानें, चांडाळानें छळून किं हो शेवटी मला असें मारलें ! - नको ! ही यातनांची तीव्र ओढाताण ! देवा ! सोडीव आतां लवकर ! आयुष्याचा डोलारा कोसळला ! सोसाट्याच्या झंझावातांत जग गिरक्या घेऊं लागलें ? - विक्राळ अंधकारानें झडप घातली ! जीवा ! जिभेचा अडसर बाजूला काढ, - पहातोस काय ! - कानावर लाथ मारुन, नाही तर डोळे फोडून बाहेर नीघ लवकर ! हा ! नरकांतल्या धडधड पेटलेल्या आगींत अनंत काल उभें राहणें पुरवलें, - पण अंगांत शक्ति नसूनही, मोहक, कामुक अशा महत्त्वाकांक्षेच्या पुरें नादी लागून, कर्रर - कर्रर ओरडून रक्त ओकणार्‍या हाडांच्या सांपळ्यावर प्रचंड ओझीं लादून, तोंडाबाहेर दुःखांनी चघळून चघळून, जिवाचा फेंस काढीत, फरकटत ओढीत नेणारें, देवा ! हें जगांतलें बैलाचे जिणें नको ! अरे मूर्खा, अजागळा, रोडक्या बैला ! ' माझ्या इतर सशक्त सोबत्यांप्रमाणे मी आपल्या मानेवर मोठमोठी ओझीं घेऊन डौलाने, गर्वानें छाती फुगवून - जगांत कां मिरवूं नये ? ' असें पुनः एकदां वर मान करुन मला विचार पाहूं ? आ वासून रस्त्यांत धूळ चाटीत, मरणाशीं ओढाताण करीत कारे बाबा असा लोळत आहेस ? - हाय ! असा हंबरडा फोडून रडूं नकोस ! माझी चूक झाली - राग मानूं नकोस ! ये, मला एकदां कडकडून शेवटची मिठी मारुं दे । मग मी आनंदानें जाईन बरें ?....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.