Jump to content

केसरीची त्रिमूर्ति/विष्णुशास्त्री चिपळूणकर

विकिस्रोत कडून









विष्णुशास्त्री
चिपळूणकर










चरित्र-रूपरेषा

 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे प्रापंचिक व्यवहारांत फारसें लक्ष घालीत नसत. त्यामुळे विष्णुशास्त्री यांचें प्राथमिक शिक्षण आजोबा हरिपंत यांच्याजवळच झालें. १८६६ साली मॅट्रिक होऊन ते पूना कॉलेजांत गेले. त्याच्या आधीच्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. पूना कॉलेज हें १८६८ सालीं येरवड्या- जवळच्या नव्या इमारतींत गेलें, व त्याला डेक्कन कॉलेज हें नांव मिळाले. १८७२ सालीं तेथून ते बी. ए. झाले व १८७३ च्या प्रारंभींच पूना हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करूं लागले.
 १८७४ च्या जानेवारींत निबंधमालेचा पहिला अंक निघाला. १८६८ सालापासूनच विष्णुशास्त्री शालापत्रकांत लिहू लागले होते. ते बी. ए. झाल्यावर कृष्णशास्त्री यांनी त्याच्या संपादनाची सर्वच जबाबदारी चिरंजीवांवर टाकली. 'संस्कृत कविपंचक' ही लेखमाला यांनी शालापत्राकांतूनच लिहिली. शालापत्रकांत मिशनरी व सरकार यांवर विष्णुशास्त्री यांनी फार जहाल टीका केली. शिवाय त्याचे अंक वेळेवर निघेनात; म्हणून १८७५ साली सरकारने तें पत्र बंद केलें. पण त्याआधीच निबंधमालेला प्रारंभ झाला होता. त्यामुळे शास्त्रीबुवांची लेखणी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. ती थांबली नाही तसाच तिचा स्वभावहि बदलला नाही. उलट सरकार व मिशनरी यांच्यावर ती जास्तच कठोर प्रहार करूं लागली. त्यामुळे पहिली समज म्हणून सरकारने १८७७ सालच्या अखेरीस विष्णुशास्त्री यांची रत्नागिरीस बदली केली. तेथे ते दीड वर्ष राहिले. दरम्यान १८७८ सालच्या मे महिन्यांत त्यांचे वडील कृष्णशास्त्री हे मृत्यु पावले. या वेळेपासूनच नोकरी सोडून देण्याचा विचार त्यांच्या मनांत घोळू लागला होता. १८७७ साली 'चित्रशाळा' स्थापून त्यांनी निर्वाहाचा प्रश्न सोडविला होता. १८७८ च्या जानेवारीपासून 'काव्येतिहाससंग्रह' हें मासिकहि निघू लागलें होतें. निबंधमालेचा खपहि बरा होता. वडिलांच्या नाराजीचा संभवहि आता नाहीसा झाला होता. त्यामुळे तो निश्चय पक्का करून १८७९ साली विष्णुशास्त्री मे महिन्यांत सहा महिन्यांची रजा घेऊन पुण्यास आले व तेथूनच सप्टेंबर महिन्यांत त्यांनी नोकरीचा राजीनामा पाठवून दिला.
 नोकरीची बेडी तोडल्यावर निबंधमाला, चित्रशाळा व काव्येतिहाससंग्रह या विविध उद्योगाच्या भरीला त्यांनी नवे दोन कार्यारंभ केले. १ जानेवारी १८८० रोजी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली; आणि पुढच्या वर्षी आर्यभूषण छापखाना स्थापून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' हीं पत्रे सुरू केलीं. या कामी त्यांना आगरकर, टिळक, नामजोशी, आपटे, यांसारखे खंदे सहकारी मिळाले होते. त्यामुळे त्यांचा हुरूपहि वाढला होता. तेव्हा 'निबंधमाला' परिसमाप्त करून आता 'ग्रंथमाला' सुरू करावयाची असें त्यांनी ठरविलें. मालेच्या ८४ व्या अंकांत त्यांनी लिहून टाकलें की, "हें महासत्र संपवून आम्ही आता अवभृथ स्नानास मोकळे होणार." त्याप्रमाणे त्यांनी अवभृथ स्नान आचरिलेंहि होतें. त्यानंतर दुसऱ्या महासत्राच्या तयारीला त्यांनी प्रारंभहि केला होता; पण नियतीची इच्छा निराळी होती. १६ जानेवारी १८८२ या दिवशीं फोटोला बसले असतांना ऊन्ह लागल्याचें निमित्त होऊन ते घेरी येऊन खाली पडले. तेव्हापासून त्यांना ताप येऊ लागला व तेंच दुखणें बळावून १७ मार्च १८८२ रोजी ग्रंथयज्ञ तसाच सोडून ते परलोकी गेले.
 १८७२ ते १८८२ हीं दहाच वर्षे विष्णुशास्त्री यांना त्यांच्या जीवित कार्यासाठी लाभली; पण तेवढ्या अवधीत 'विष्णुशास्त्रीयुग' अशी महाराष्ट्राच्या इतिहासांतील त्या कालखंडावर मुद्रा उठवून ते गेले. या त्यांच्या अलौकिक यशाचें रहस्य काय ?
 पुढील प्रबंधांत तेंच विशद करावयाचें आहे.




-१-

चित्कळेचा स्पर्श


 १८७४ ते १८८२ हा निबंधमालेचा कालखंड होय. याच्या आधीचा साधारण वीस वर्षांचा काळ आणि नंतरचा वीस वर्षांचा काळ यांचा महाराष्ट्रांतील मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने विचार केला तर काय दिसेल ?
चित्कळा
 १८८२ नंतरच्या वीस वर्षांत महाराष्ट्रियांच्या कर्तृत्वाला प्रत्येक क्षेत्रांत विलक्षण बहर आलेला दिसतो. प्रत्येक क्षेत्रांत नवें तेज निर्माण झालें, नवी चित्कळा रूपास आली, नव्या सौंदर्याचीं झगमगीत किरणें फाकूं लागलीं असा प्रत्यय येतो. लो. टिळक, आगरकर, न. चिं. केळकर, काकासाहेब खाडिलकर, शिवरामपंत परांजपे, महाराज सयाजीराव गायकवाड, ना. गोखले, चाफेकर बंधु, राजवाडे, खरे, गो. स. सरदेसाई, पारसनीस, पांगारकर, अण्णासाहेब कर्वे, अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल, श्री. कृ. कोल्हटकर, पं. पलुसकर, पं. भातखंडे, पं. बखले, भाऊराव कोल्हटकर, हरिभाऊ आपटे, केशवसुत, शं. बा. दीक्षित, चिंतामणराव वैद्य हीं नांवें पाहा. वृत्तपत्र, ग्रंथ, निबंध, इतिहास-संशोधन, शास्त्र-संशोधन, काव्य, कादंबरी, नाटक, लघुकथा, विनोद, चरित्र, राजकीय जागृति, समाजसुधारणा, धर्मजागृति, अर्थकारण, कला, शिक्षण, इत्यादि मानवी संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत कार्य करणाऱ्या थोर पुरुषांचीं हीं नांवें आहेत. त्यांतील कांही नांवें हीं दोन-दोन, तीन-तीन क्षेत्रांत ख्याति पावलेली असून कांहींना अखिल भारतीय कीर्ति मिळालेली आहे.
 हें अभिनव तेज, नवनिर्मितिक्षम अशी ही चित्कळा महाराष्ट्राला कोठून प्राप्त झाली ? नवजीवनरसांनी दुथडी भरून वाहणारी ही जी वाग्गंगा, तिचा उगम कोठे होता ? महाराष्ट्राच्या चिदाकाशांत नव्या सृष्टीचे हे हुंकार कोठून आले ?
 विष्णुशास्त्री चिपळूणकर व त्यांची निबंधमाला हें या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. महाराष्ट्रवाणीचा पति म्हणून ज्यांचा पंडितांनी गौरव केला आहे ते विष्णुशास्त्री हेच या नव्या सृष्टीचे जनक आहेत.
नवयुग
 वरील सर्व थोर पंडित, कवि, कलाकार, संशोधक यांच्या कार्याचें ज्यांनी विवेचन केलें आहे त्या सर्वांनी एकमुखाने, "त्यांनी क्रांति केली, नवयुग निर्माण केलें, मन्वंतर घडविलें" असे उद्गार काढले आहेत. आणि या क्रांतीमागची प्रेरकशक्ति म्हणजे निबंधमाला होय, असेंच मत नमूद करून ठेविलें आहे. त्या काळांतील ऐतिहासिक वाङमयाचा आढावा घेतांना म. म. दत्तो वामन पोतदार लिहितात, "शास्त्रीबुवांनी साने, मोडक व शाळिग्राम यांच्या साहाय्याने 'काव्येतिहाससंग्रह' मासिक चालवून एका नव्या युगाची स्थापना केली. राजवाडे, पारसनीस वगैरे जे तरुण पुढे इतिहास-कार्याला लागले त्या सर्वांना प्रेरणा शास्त्रीबुवांच्या लिखाणामुळे मिळाली, असे त्यांच्या लेखांवरूनच शाबीत होतें." 'मराठींतील निबंध-वाङ्मय' या आपल्या लेखांत प्रा. वि. ह. कुलकर्णी म्हणतात, "मालेची कामगिरी विध्वंसक आणि विधायक अशा दुहेरी स्वरूपाची आहे. चिपळूणकरांच्या विधायक कामगिरीकडे डोळेझाक करून त्यांच्या विध्वंसक कामगिरीचें भडक चित्र रेखाटणें, हें केव्हाही अनुदारपणाचें व अन्यायाचेंच निदर्शक ठरेल. टिळक, आगरकर, वि. का. राजवाडे, ह. ना. आपटे, शि. म. परांजपे, न. चि. केळकर इत्यादि श्रेष्ठ ग्रंथकारांची परंपरा ज्या मालेने निर्माण केली तिची योग्यता मराठी भाषेच्या इतिहासांत अगदी अनन्यसाधारण आहे हे मान्य केलेच पाहिजे."
 "प्रथम १८८० सालींच आपण एका महान् क्रांतीच्या उंबरठ्यांत येऊन पोचतों. इ. स. १८८० सालच्या दिवाळीत अण्णा किर्लोस्करांनी पुणे येथे आपल्या 'संगीत शाकुंतला'चा पहिला प्रयोग केला. इ. स. १८८० ते १९०० हा यापुढील वीस वर्षांचा टप्पा. या काळांत नाट्याची कल्पनातीत भरभराट झाली. हा वीस वर्षांचा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासांत सर्वच दृष्टींनी विशेष महत्त्वाचा गणला जाईल. राजकीय, सामाजिक व धार्मिक ध्येयवाद या काळांत उदय पावत होता. पाश्चात्त्यांच्या जीवनाचे आदर्श जसेच्या तसे आपणांस घेतां येत नाहीत व घेणें इष्टहि नाही, हे दिसून येऊं लागलें होतें. आपल्या जुन्या परंपरागत आदर्शाच्या संशोधनाला व निरीक्षणाला त्यामुळे या काळांत अधिक जोर चढला होता." 'नाट्यवाङ्मय व त्याचा विकास' यांचे विवेचन करतांना प्रा. बनहट्टी यांनी हा अभिप्राय दिलेला आहे. 'मराठी कादंबरी'चा इतिहास सांगतांना प्रा. वि. बा. आंबेकर यांनी जो अभिप्राय दिला आहे त्याचा आशय असाच आहे. "हरिभाऊंच्या लेखनाच्या प्रारंभकालीं (१८८०), महाराष्ट्रांत जें विचारमंथन होऊं लागलें होतें, त्याचा हरिभाऊंच्या तरल आणि संवेदनाक्षम अशा कलाप्रेमी अंतःकरणावर फार परिणाम झाला. "तीस कोटि लोक ब्रिटिशांचे जोडे पुसण्याची लाचारी करतात व तींतच आनंद मनातात" हें मॅक्स ओरलंचें एका ग्रंथांतील वाक्यं विद्यार्थिदशेच्या शेवटी शेवटी हरिभाऊंच्या वाचनांत आलें. असल्या वाक्याचा परिणाम संवदेनाक्षम मनावर व्हावा, अशी त्या वेळी भोवतालची परिस्थिति होती. चिपळूणकर, टिळक, रानडे, आगरकर, गोखले यांच्या विविध मत- प्रदर्शनांनी आणि कार्यपद्धतींनी हा कालखंड तेजस्वी बनलेला आहे. या गोष्टीला उद्देशूनच म. गांधींनी म्हटलें आहे की, पुण्यांतील लोकांनी जीवनाचे एक नवें अध्यात्म उत्पन्न केलें आहे."
 "काव्येतिहास संग्रहामुळेच महाराष्ट्रांत इतिहासाबद्दलची नवी जाणीव निर्माण झाली व तींतूनच वासुदेवशास्त्री खरे, रा. ब. पारनीस यांची नाना फडणीस, झाशीची राणी, ब्रह्मेंद्रस्वामी यांचों चरित्रे निर्माण झाली. आपल्या इतिहासाचा इंग्रज लेखक विपर्यास करतात हें पाहून स्वाभिमानी विद्वान् अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपल्या देशाचा कैपक्ष घेऊन असल्या इतिहासकारांवर टीकेचा आसूड उगारला," (आणि त्यामुळेच ही नवी जाणीव निर्माण झाली), असें गोपीनाथ तळवलकरांनी म्हटलें आहे. केशवसुत आणि हरिभाऊ आपटे यांनी काव्य व लघुकथा या क्षेत्रांत या जाणिवेमुळेच नवनिर्मिति केली असाच त्यांच्या चरित्रकारांचा अभिप्राय आहे. ('प्रदक्षिणा'- पहिली १० प्रकरणें पाहा).
स्फूर्तिस्थान
 वरील थोर कर्त्या पुरुषांच्या चरित्रकारांनीच त्यांच्या स्फूर्तिबद्दल असें मत मांडले आहे असें नाही. यांपैकी हरिभाऊ आपटे, पांगारकर, खरेशास्त्री, राजवाडे, यांनी स्वतःच विष्णुशास्त्री आपलें स्फूर्तिस्थान होय, असें लिहून ठेविलें आहे. टिळक, आगरकर यांचा आदर्श तोच होता हे प्रसिद्धच आहे. त्यांना परिस्थितीमुळे स्वतंत्रपणे प्रेरणा मिळाली असणें, हें पूर्ण शक्य आहे; पण ती मिळाल्यावर त्यांची मनें धावलीं तीं विष्णुशास्त्री यांच्याकडे, अन्यत्र नव्हे. याचा भावार्य तोच आहे. तेव्हा गेल्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांतील महाराष्ट्रीय कर्तृत्वाच्या मागे प्रेरक शक्ति म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हीच होती, यांत शंकेला जागा नाही.
 प्रा. गं. बा. सरदार यांनी हाच भावार्थं साकल्याने 'अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका' या पुस्तकांत मांडला आहे. ते म्हणतात, "इ. स. १८७४ साली निबंधमाला निघाली आणि मराठी वाङमयाच्या इतिहासांत एका नवीन युगाला प्रारंभ झाला. त्या पूर्वी निबंध-वाङमय हे अगदी प्राथमिक स्वरूपाचें होतें. कोणत्याहि प्रश्नाची स्वतंत्र रीतीने सांगोपांग चर्चा करण्याची धमक त्या काळच्या लेखकांत क्वचितच आढळते. निबंधमालेंतील विस्तृत, विद्वत्तापूर्ण चित्ताकर्षक आणि प्रभावी लेखांच्या योगाने हा मनु पालटला. महाराष्ट्रांत स्वदेशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली. प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. उदयोन्मुख लेखकांना नवी दृष्टि मिळाली, त्यांच्यांत आत्मविश्वास उत्पन्न झाला आणि मराठी गद्य-वाङ्मयवैभव वाढीला लागलें."
 'स्वदेशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली' याला महत्त्व आहे. ती प्रज्वलित झाली की सर्वच क्षेत्रांत- केवळ वाङ्मयांतच नव्हे- मानवी कर्तृत्व फुलारून येतें. प्रारंभीं यांचीं जीं उदाहरणे दिली आहेत तीं मानवी कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांतलीं आहेत. त्यांचे श्रेय सर्व त्या स्वदेशाभिमानाकडे आणि प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे तो प्रज्वलित करणाऱ्याकडे जाते.
 यावर प्रश्न असा येतो की, शास्त्रीबुवांच्या लेखणींत असें काय अलौकिक होतें, की ज्यामुळे ही प्रेरक शक्ति तिच्या ठायीं निर्माण झाली ? त्या आधीच्या कालखंडांत महाराष्ट्रांतील कर्तृत्वाला अडसर बसेल असें काय घडलें होतें ? येथल्या जनांची गुणसंपदा आंतल्या आंत थिजून जावी, गोठून जावी असें काय वातावरण येथे निर्माण झालें होतें ? आणि तो अडसर दूर व्हावा, तें वातावरण नष्ट होऊन त्या गुणसंपदेला फुलोरा यावा अशी कोणती किमया निबंधमालेने केली ?
तेजोभंग
 स्वत्व-जागृति, स्वाभिमान-चेतना, अहंप्रबोधन ही ती किमया होय. पेशवाई नष्ट होऊन इंग्रजांचें राज्य येथे प्रस्थापित झाल्यापासून इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज व इतर पाश्चात्त्य पंडित आणि इंग्रज मिशनरी यांनी येथल्या जनतेचा तेजोभंग करून तिचें स्वत्व नष्ट करावें, तिचा स्वाभिमान शून्यवत् करून तिच्या ठायीं असलेली स्वातंत्र्याची ऊर्मि जीवहीन, बलहीन, करून टाकावी असे जाणूनबुजून प्रयत्न चालविले होते. इंग्रज हा चतुर राजकारणी होता, प्रज्ञासंपन्न मुत्सद्दी होता, आणि मानवी मनांतील अंतःप्रेरणांचा जाणकार अभ्यासी होता. रणामध्ये जिंकलेले हे मराठे केवळ देहाने जिंकले गेले आहेत, त्यांची मनेंहि गुलाम करून टाकल्यावांचून आपले राज्य येथे दीर्घकाळ चालणार नाही, हें तो जाणून होता. म्हणून राज्य स्थिर होताच, किंवा त्याच्या आधीपासूनच मराठ्यांच्या व भारतीयांच्या मनःशक्ति क्षीणजीव करून टाकण्याच्या उद्योगास तो लागला.
मूळ प्रेरणा
 आपली प्राचीन परंपरा, आपली संस्कृति, आपला पूर्व दिव्य इतिहास, आपल्या पूर्वजांचे पराक्रम, आपल्या पूर्वसूरींची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, आपला धर्म, आपली भाषा यांचा अभिमान ही मानवी कर्तृत्वाची मूळ प्रेरणा आहे, त्याच्या पराक्रमाची ती गंगोत्री आहे, त्याच्या जीवशक्तीचा तो मूलस्रोत आहे हें इंग्रजांनी व पाश्चात्त्य पंडितांनी जाणलें होतें. त्यामुळे या मुळावरच घाव घालावा, या गंगोत्रींतच विषार कालवावा, हो स्त्रोतच खंडून टाकावा म्हणजे भारतीय जन मरगळून जातील, त्यांच्या शक्ति वठून जातील आणि मग आपसया ते शरीराने व तसेच मनाने, प्रज्ञेने व भावनेनेहि आपले गुलाम होतील, आपल्यापुढे लाचारपणें नमतील, अशी राज्यकर्त्यांच्या मनाची निश्चिति झाली होती; आणि म्हणूनच त्या धोरणाने पावले टाकण्यास त्यांनी प्रारंभ केला होता.
अस्मिता कोमेजली
 हिंदी जनांना ते सांगू लागले की, तुमच्या इतिहासांत, तुमच्या प्राचीन परंपरेंत, तुमच्या संस्कृतींत उज्ज्वल, अभिमानास्पद, दिव्य, असें कांही नाही. रामायण, गीता, वेद, उपनिषदें, महाभारत यांचा तुम्ही अभिमान धरता, पण हे सर्व ग्रंथ म्हणजे प्राधान्याने होमरचें इलियड महाकाव्य, ख्रिश्चनांचें बायबल इत्यादि पाश्चात्य ग्रंथांची भाषांतरें किंवा रूपांतरें आहेत. हीं आपलीं मतें सिद्ध करण्यासाठी इतिहास, भाषाशास्त्र, प्राचीन प्रवाशांचे ग्रंथ, यांचे असे कांही भरभक्कम आधार पाश्चात्त्य पंडितांनी उभे केले की, क्षणभर भारतीय जन मूढ होऊन गेले. विद्वत्तेच्या क्षेत्रांतील असल्या शस्त्रास्त्रांचा त्यांना गंध सुद्धा नव्हता. भाषाशास्त्रीय पुराव्यांनी, व्युत्पत्तीच्या साह्याने एखाद्या ग्रंथाचा काळ ठरवावयाचा असतो, त्याचें पौर्वापर्य निश्चित करावयाचें असतें, तो अस्सल की नक्कल हें त्यांवरून निर्णित करतां येतें याची भारतीयांना स्वप्नांत सुद्धा कल्पना नव्हती. भाषाशास्त्राप्रमाणे इतिहास ही विद्याहि हिंदी लोकांना अगम्यच होती. भाषाशास्त्राचा अभ्यास येथे निदान प्राचीन काळी तरी झाला होता; पण इतिहास- विद्या पहिल्यापासूनच येथे शून्य होती. त्यामुळे रणांगणांतील आक्रमणाच्या वेळीं पाश्चात्यांच्या नव्या, भारी शस्त्रास्त्रांमुळे व युद्धविद्येमुळे जसे हिंदी लोक पराभूत झाले तसेच या विद्वत्तेच्या क्षेत्रांतहि या सर्वस्वी नव्या शस्त्रास्त्रांपुढे ते प्रारंभी निष्प्रभ झाले, आणि त्यांची अस्मिता कोमेजून गेली.
पाश्चात्त्यांचे प्रलाप
 डॉ. लारिन्सर या पंडिताने श्रीमद्भगवद्गीतेवर एक प्रबंध लिहून गीता ही बायबलच्या आधारे लिहिलेली असून, ती ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकाच्या सुमारास लिहिली गेली आहे, असें मत मांडलें. गीतेचा बारावा अध्याय व जॉनचें शुभवर्तमान यांतील बऱ्याच कल्पना सारख्या आहेत, हा त्याला पुरावा. प्रो. विल्सन यांनी याच मताचा अनुवाद करून गीतेंतील सोळाव्या अध्यायांत बौद्धांचा स्पष्ट उल्लेख आहे, असा पुरावा दिला आहे. डॉ. वेबर यांनी असा सिद्धान्त मांडला की, वाल्मीकीने आपलें रामायण बौद्धांच्या दशरथ- जातकाच्या आधारें लिहिलें असून, त्यांत ग्रीक महाकवि होमर याच्या इलियडची मदत घेतली आहे. याशिवाय त्याने असेंहि विधान केलें की, रामायण हें ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत रचलें गेलें आहे. हे ग्रंथांविषयी झालें. वेरूळच्या लेण्यांविषयी काय ? तीं तर बाहेरून चोरून आतां येत नाहीत! पण तीं हिंदूनी कोरली असें मान्य केलें तर त्यांच्या अंगीं कर्तृत्व होतें असें सिद्ध होईल ही भिति आहे. म्हणून मग जेम्स मिल्ल या साहेबाने सांगून टाकलें की, तीं स्वयंभूच असली पाहिजेत ! मेकॉलेने तर जाहीर करून टाकले की, हिंदूचे प्राचीन ग्रंथ ज्या कागदांवर लिहिले आहेत त्या कागदाच्या रद्दीइतक्याहि ते योग्यतेचे नाहीत !
पूर्वग्रह
 भारतीयांचे प्राचीन ग्रंथ भाषांतरित आहेत असें सिद्ध करणें हा पाश्चात्त्य विद्वानांचा पहिला मनसुबा तें नच जमले तर ते फार प्राचीन नाहीत, ख्रिस्ती शकाच्या फार मागे ते नेतां येत नाहीत, असें तरी निदान दाखवून द्यावयाचें, हा त्यांचा दुसरा डाव. मॅक्समुल्लर हा भारताचा अभिमानी होता. सर्व जन्म त्याने भारताच्या प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासांत घालविला; पण त्याच्याहि मनांत पूर्वग्रह किती जबर होता तें पाहा. तो म्हणतो, "वालखिल्यसूक्त हें प्रातिशाख्यापेक्षा अलीकडचें आहे असें सिद्ध करतां आलें, तर मला बरें वाटेल, तसेंच प्रातिशाख्यादि ग्रंथ सध्यापेक्षा अलीकडचे आहेत, असें सिद्ध झाल्यास मला समाधान वाटेल. पण तें समाधान मला लाभणार नाही, अशी भीति वाटते." प्राच्यविद्येच्या सर्वश्रेष्ठ पंडिताचे हे उद्गार आहेत. त्यांवरून भारतीयांच्या प्राचीन वैभवावर, त्यांच्या उज्ज्वल परंपरेवर आघात करून त्यांचा तेजोभंग करण्याचा पाश्चात्य पंडितांनी केवढा अट्टाहास चालविला होता हें ध्यानांत येईल.
न्यूनगंड
 अगोदरच रणांगणांत पराभूत झाल्यामुळे भारतीय जन मनाने खचून गेले होते. त्यांच्या ठायीं न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यांतच इंग्रजांची आगगाडी, वाफेचीं जहाजें, तारायंत्रे, नाना प्रकारची इतर कळीचीं इंजिनें हीं डोळ्यासमोर चमत्कारांसारखी दिसूं लागली. त्यांच्या मागच्या विज्ञानाची कांही कल्पना नसल्यामुळे हे लोक दैवी शक्तीने संपन्न आहेत अशी भारतीयांची दृढ भावना झाली. त्यामुळे हे लोक जातितः, वंशतःच आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असें त्यांना वाटूं लागलें व त्यांच्या ठायीं, कालिदासाच्या दिलीप राजाप्रमाणे, आत्मनि अवज्ञा निर्माण झाली. आपण हीनदीन आहोंत, प्रज्ञा, बुद्धिमत्ता, ज्ञान, विद्वत्ता या बाबतींत त्यांची आपली तुलनाच होणार नाही, असें त्यांच्या मनाने पक्कें घेतलें. त्यांत प्राचीन परंपरा, संस्कृति, इतिहास यांवर जो इंग्रजांनी हल्ला चढविला त्याचाहि प्रतिकार आपल्याला करतां येत नाही, हें ध्यानांत आल्यामुळे हिंदी लोक सर्वस्वी प्रज्ञाहत झाले. त्यांच्या स्वत्वाचा लोप होण्याचा समय आला.
मिशनरी
 भारताचा व भारतीयांचा तेजोभंग करण्याचें व्रत घेणारा दुसरा एक वर्ग म्हणजे पाश्चात्त्य मिशनरी हा होय. पाश्चात्य पडितांनी भारताच्या प्राचीन वैभवावर आघात केला तर यांनी भारतीयांचा सनातन असा जो हिंदु धर्म त्याच्यावर भडिमार केला. प्रत्येक मनुष्याला स्वतःचा धर्म प्राणाहून प्रिय असतो; आणि तो धर्मच हीन आहे, निंद्य आहे, त्यांतील मूलतत्त्वें हास्यास्पद आहेत असें ठरलें, तर त्याच्या आत्म्याचाच लोप होण्याची वेळ येते. त्यामुळे मनुष्याला ठार करणारा त्याचा शत्रु जसा नेमका काळजाचा वेध घेतो त्याचप्रमाणे त्याची अस्मिता नष्ट करणारा शत्रु त्याच्या धर्माचा वेध घेतो. पाश्चात्त्य मिशनऱ्यांनी हेंच केलें.
 भारतांत सोळाव्या शतकापासून ख्रिश्चन मिशनरी येत आहेत. सेंट झेवियर या जेसुइटपंथीय मिशनऱ्याने गोमंतक प्रदेशांत धर्मांतरासाठी केवढे भयानक अत्याचार केले हें प्रसिद्धच आहे. एकोणिसाव्या शतकांत इंग्रजांचें राज्यच येथे प्रस्थापित झाले. तेव्हा मिशनऱ्यांना सर्व रान मोकळेंच झालें. प्रारंभीं इंग्रज सत्ताधाऱ्यांचा मिशनऱ्यांना विरोध होता; पण तो आपल्या सत्तेला धक्का पोचेल या भीतीपोटी. मनांतून त्यांना भारताचें ख्रिश्चनीकरण इष्टच होतें. "सक्तीने धर्मांतर केल्यामुळे ज्याचें कल्याण होईल असा एखादा समाज असेल तर तो हिंदु समाज होय" असें ते म्हणत. मिशनऱ्यांच्या मोहिमेमुळे लवकरच सर्व हिंदु लोक ख्रिश्चन होतील, आणि मग आपले साम्राज्य चिरंतन टिकेल अशी इंग्रज राज्यकर्त्यांना फार आशा होती. म्हणून त्यांनी हळूहळू मिशनऱ्यांना पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलें व सर्वतोपरी साहाय्य केलें.
 ख्रिश्चन मिशनरी शाळा, दवाखाने, वसतिगृहें स्थापीत व त्या मार्गांनी जनतेची सेवा करीत, पण धर्मांतर हाच त्यांचा अंतिम हेतु असे. त्यामुळे या संस्थांतून ते हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदु परंपरा यांची निरर्गल निंदा करीत. 'हिंदु धर्म प्रसिद्धीकरण' हें मिशनरी जॉन विल्सन यांचें पुस्तक व 'भगवद्गीतेचें सार' हें रॉबर्ट निज्बिट यांचें पुस्तक म्हणजे मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराचे नमुने आहेत. वस्तुमात्रांत परमेश्वर व्यापून राहिला आहे, असें हिंदु तत्त्वज्ञान सांगतें. त्यावर विल्सनसाहेब म्हणतात की, "असें असेल तर वस्तु फुटली की ईश्वर फुटतो, असें होईल." सर्व जग म्हणजे माया आहे, असें हिंदू म्हणतात. त्यावर साहेब म्हणतात की, "मग देव फसविलेला आहे आणि फसविणारा आहे" असें या हिंदु मतांवरून दिसतें. वाहवा जी वाहवा." जीव हा देवाचा अंश आहे, असें वेदान्त सांगतो. त्यावर निज्बिट साहेब म्हणतात की, "देवाच्या ठायी अज्ञान नाही, तसे जीवाच्या ठायीहि नाही, असें म्हणावें लागेल; पण तें आहे. तेव्हा जीव हा देवाचा तुकडा नाही, असें सिद्ध होतें."
 यावरून हे दिसून येईल की, हिंदूंचा तेजोभंग करून त्यांचें स्वत्व नष्ट करण्याचा जो प्रयत्न इंग्रज पंडितांनी चालविला होता तोच प्रयत्न मिशनऱ्यांनी धर्म-प्रसाराच्या मार्गाने चालविला होता. इंग्रज राज्यकर्ते तर यांत अग्रेसर होते. कसें तें आता पाहू.




-२-

आत्मप्रत्यय


 इंग्रज सत्ताधाऱ्यांना तर काय, हिंदी लोक जितके भग्नतेज, हतप्रभ, स्वत्वहीन होतील तितके हवेच होते. त्यामुळे त्यांचा मिशनऱ्यांना सर्वस्वीं पाठिंबा होता. प्रारंभी त्यांनी मिशनऱ्यांवर कांही बंधने घातली होतीं, पण तीं केवळ भीतीमुळे होतीं हे वर सांगितलेंच आहे. मिशनऱ्यांच्या हिंदुधर्मनिदेमुळे कदाचित् दंगली माजतील या भीतीनेच ते विरोध करीत, पण मनांतून हिंदुस्थान सर्व ख्रिस्ती झाला तर तें त्यांना हवेंच होतें. कारण त्यामुळे आपले साम्राज्य निर्वेध चालेल असे त्यांना वाटत असे.
 ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख डायरेक्टर मँगल्स हा १८५७ साली हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणाला की, "हिंदुस्थानच्या या टोकांपासून त्या टोकापर्यंत ख्रिस्ताचा ध्वज डौलाने फडकविण्याकरिताच हें हिंदुस्थानचें अफाट साम्राज्य ईश्वराने आपल्या हातीं सोपविलें आहे. म्हणून सबंध हिंदुस्थान ख्रिस्तमय करण्याच्या या महत्कार्यात कोणत्याहि प्रकारची ढिलाई न करतां प्रत्येकाने आटोकाट प्रयत्न करणें अवश्य आहे." हिंदुस्थानांतलें धर्म, आणि विशेषतः हिंदु धर्म नष्ट झाला की येथील राष्ट्रीय भावनाहि मरून जाईल, आणि मग अशा स्वत्व मेलेल्या राष्ट्रावर राज्य करणें सोपें होईल, अशी इंग्रजांची कल्पना असल्यामुळे, ईस्ट इंडिया कंपनीचा हा अट्टाहास चालला होता.
 रेव्हरंड केनेडी हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सारखे बजावीत होता की, "हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारतवर्ष ख्रिस्ती धर्माला कवटाळीपर्यंत, आणि तो हिंदूंच्या व मुसलमानांच्या धर्माची निर्भर्त्सना करूं लागेपर्यंत, आपलें कार्य अतिशय जोमाने चाललें पाहिजे; आणि त्यासाठी आपल्या हाती असलेली सर्व सत्ता व अधिकार आपण वापरले पाहिजेत."
सक्तीचा धर्मोपदेश
 रेव्हरेंडसाहेबांचा हा आदेश तंतोतंत पाळण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरविलें होतें. कंपनीचा प्रत्येक अधिकारी हाताखालच्या काळ्या नोकरांना ख्रिस्ती होण्याकरिता गळ घालीत असे. लष्कर हें तर त्यांच्या हातचें क्षेत्र. तेथे कर्नल, कॅप्टन, लेफ्टनंट इत्यादि सर्व अधिकारी काळ्या सैनिकांच्या पुढे ख्रिश्चन धर्मावर व्याख्यानें झोडीत आणि तीं ऐकण्याची शिपायांना सक्ती असे. हीं व्याख्यानें सभ्य भाषेत असत काय ? लष्करांत सभ्य भाषा वापरणें हेंच असभ्यपणाचें ठरते. हे अधिकारी श्रीरामचंद्र व महंमद पैगंबर यांना अगदी गाळीव शिव्यांची लाखोली वाहत. बंगाल पायदळाचा कमांडर स्वतःच सांगतो की, "मी सतत अठ्ठावीस वर्षं सैन्यांतील शिपायांना ख्रिस्ती करण्याचा उद्योग करीत असून, या मूर्तिपूजक रानटी शिपायांचे आत्मे सैतानापासून सुरक्षित राहतील, अशी व्यवस्था करणें हें आपलें लष्करांतले कर्तव्यच आहे, असें मला वाटतें." अशा कर्तव्यभावनेमुळेच लष्करांत कोणी शिपाई बाटला तर त्याला इतरांचे हक्क डावलून बढती देण्यांत येत असे; आणि या बीभत्स धर्मप्रसाराबद्दल कोणी नापसंती दाखविली तर त्या शिपायाची 'तूप-रोटी' तोडण्यांत येई.
 सैन्यांतल्याप्रमाणे शाळांतहि ख्रिश्चन धर्माचा प्रसार हाच उद्योग चालविला पाहिजे, असा साहेबाचा आग्रह होता. १८३६ साली बंगालमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या शाळा पहिल्यानेच उघडल्या गेल्या तेव्हा मेकॉलेने असा निर्धाराचा आशावाद प्रगट केला की, पुढील तीस वर्षांत बंगालमध्ये एकहि मूर्तिपूजक नांवालाहि राहणार नाही ! ('सत्तावन्नचें स्वातंत्र्यसमर'- सावरकर, प्रकरण ५ वें).
डलहौसीची प्रतिज्ञा
 पण सत्ताधाऱ्यांना हिंदी लोकांची मानखंडना करण्याचा धर्मांतर हा एकच मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना सर्वच मार्ग मोकळे होते. १८४६ सालीं डलहौसी भारतांत आला तो, 'सर्व हिंदुस्थान मी सपाट करून टाकीन' अशी प्रतिज्ञा करीतच आला. आल्याबरोबर प्रथम त्याने पंजाबचा बळी घेतला. नंतर क्रमाने नागपूर, सातारा, अयोध्या हे प्रदेश त्याने सपाट केले. हें करीत असतांना त्याने तेथल्या राजांना केवळ पदच्युत केलें असें नाही. त्याने त्यांचे राजवाडे खणून काढले, वाड्यांतून लष्कर घालून राजस्त्रियांना बाहेर काढले व त्यांच्या अंगावरचे दागिनेहि ओरबडून घेऊन त्यांची शक्य ती बेअब्रू केली. आम्ही जेते आहों व तुम्ही आमचे गुलाम आहां, बूटपुशे आहां, हें दर वेळीं हिंदी लोकांच्या प्रत्ययास आणून देणे हाच यामागचा हेतु होता. इंग्रजांनी रणांगरणांत भारताचा उच्छेद केलाच होता. आता त्यांच्या मनाचा, स्वत्वाचा, स्वाभिमानाचाहि उच्छेद त्यांना करावयाचा होता. ('कित्ता'- प्रकरण २ रें).
आम्ही जेते
 इ. स. १८७७ च्या जानेवारीत 'कैसर-इ-हिंद' ही पदवी व्हिक्टोरिया राणीने धारण केल्याचा समारंभ दिल्ली येथे दरबार भरवून करण्यांत आला, त्यांतील हेतु हाच होता. आम्ही जेते, तुम्ही जित, आम्ही शास्ते, तुम्ही आमचे गुलाम, आम्ही गोरे साम्राज्यकर्ते, तुम्ही काळे प्रजाजन, हा दिमाख इंग्रजांना दाखवावयाचा होता. हिंदी लोकांची अस्मिता पराभूत करण्याचेंच उद्दिष्ट त्याच्या मागे होतें. विष्णुशास्त्री यांनी अगदी जळफळून त्याविषयी लिहिलें आहे की, "हिंदी प्रजा दुष्काळामुळे मरणाच्या दारी असतांना बीकन्स फील्डसाहेब दिल्लीस दिवा लावीत आहेत. आम्ही राजाधिराज, संस्थानिक हे आमच्या खाली एक पायरी, आणि हिंदी प्रजा ही त्याहूनहि खालची पायरी, हाच काय तो इत्यर्थ. त्या दिवशीं जागजागी कैंसर-इ-हिंदच्या नांवाने खंडोगणती दारू जाळून जे हजारो रुपये खराब केले, त्यांत होता. यापूर्वी सारे लोक मोगलाईस व पेशवाईस नांवें ठेवून इंग्रजी राशियतीची जी तारीफ करीत असत ती स्थिति आता गेली."
 विष्णुशास्त्री यांनी इतकें जळफळून कां लिहिलें ? भारताच्या स्वाभिमानाला झालेला हा डंख त्यांना सहन झाला नाही. देशाची अस्मिता अशी पराभूत झाली तर स्वातंत्र्याची आशा कायमची दुरावेल अशी त्यांना भीति होती. म्हणून त्या मदांध सत्तेवर प्रत्याघात करण्याचें साहस करण्यास ते सिद्ध झाले. हिंदी जनतेच्या स्वत्वाची जपणूक हें त्यांचे एकमेव उद्दिष्ट व कार्य होतें.
आधीचे नेते
 पण यावर प्रश्न असा निर्माण होतो की, विष्णुशास्त्री यांच्या आधीच्या पंचवीस-तीस वर्षांत महाराष्ट्रांत जे थोर पुढारी होऊन गेले त्यांच्या कार्याचें काय ? त्यांनी अशा तऱ्हेचा प्रयत्न केला नव्हता काय ? त्यांना काय स्वाभिमान नव्हता ? या देशांच्या स्वत्वाची त्यांना चिंता नव्हती ? आणि ती जर असेल, तर शास्त्रीबुवांच्या कार्याचें कांही वैशिष्ट्य राहतें काय ?
 या प्रश्नांचा विचार आता करावयाचा आहे.
 शास्त्रीबुवांच्या आधीच्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळांत महाराष्ट्रांत व भारतांतहि अनेक थोर पुढारी होऊन गेले होते; आणि त्यांनी स्वदेशाची चिंता वाहून त्याच्या उद्धारार्थं सर्वांगीण प्रयत्नहि केले होते. महाराष्ट्रांतच दादाभाई नौरोजी, न्या. मु. रानडे, लोकहितवादी व महात्मा फुले यांसारखे कर्ते पुरुष झाले होते; विष्णुशास्त्री यांच्या आधीपासूनच त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. आणि त्यांच्या निधनानंतरहि त्यांचे कार्य चालूच होतें. या थोर नेत्यांनी भारतांत लोकजागृतीचें जें कार्य केलें तें निस्तुळ असेंच आहे. त्यासाठी हिंदुस्थान आणि विशेषत: महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण असे असले तरी विष्णुशास्त्री आणि त्यांची निबंधमाला यांचें अनन्यत्व शिल्लक राहतेंच. गेल्या शतकांतील महाराष्ट्राच्या इतिहासांत त्यांचें स्वतंत्र असें स्थान निश्चितच आहे. तें कोणतें ?
ब्रिटिशांवर विश्वास
 या दृष्टीने पितामह दादाभाई नौरोजी यांचा विचार करू. १८४८ पासून अनेकविध मार्गांनी ते समाजसेवा करीत होते. 'ज्ञानप्रसारक सभा', 'बाँबे असोसिएशन' अशा अनेक संस्था आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापून दादाभाई त्यांमध्ये अविरत कार्यमग्न असत; पण त्यांचें खरें महत्कार्य म्हणजे त्यांनी इ. स. १८७१ सालीं विलायतेंतील 'ईस्ट इंडिया फिनॅन्स कमिटी' पुढे साक्ष देऊन इंग्रजी राज्याचें खरें स्वरूप हिंदी जनतेला दाखवून दिले; त्या परकीय सत्तेचें कृष्ण अंतरंग लोकांच्या लक्षांत आणून दिलें, हें होय. पगाराच्या रूपाने, व्यापारी नफ्याच्या रूपाने, अघोरी करांच्या रूपाने ब्रिटिशांनी भारताचा रक्तशोष चालविला होता. महंमद गझनीने अठरा स्वाऱ्या करून जितकी संपत्ति लुटली तितकी इंग्रज एका वर्षांत भारतांतून लुटून नेतात, त्यांचें साम्राज्य हिंदी लोकांच्या पैशावर व रक्तावर उभारलेले आहे, त्या रक्तशोषणामुळे हिंदुस्थान मृत्युपंथास लागला आहे, असें अत्यंत स्पष्ट व परखड भाषेंत, दादाभाईंनी आपल्या साक्षीत प्रतिपादन केलें आणि तेंहि इंग्लंडमध्ये व इंग्रज सभासदांच्या तोंडावर ! दादाभाईंचें हें कार्य अपूर्व असेंच आहे; पण अशा तऱ्हेने ब्रिटिश साम्राज्यशाहीचें राक्षसी रूप लोकांना दाखवून दिल्यानंतरहि, आपला ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास ढळला नाही, असें ते त्यानंतर सतत सांगतच राहिले !
 १९०६ सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनांत त्यांनी 'स्वराज्य' मंत्राचा संदेश दिला आणि त्या स्वराज्याच्या प्राप्तीसाठी हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांत, 'चळवळ करा, सतत चळवळ करा', असा लोकांना उपदेश केला. पण ती चळवळ म्हणजे काय ? ब्रिटिशांच्या पुढे आपली गाऱ्हाणी मांडणें ! (ॲजिटेट मीन्स इन्फॉर्म). "भारतीयांना आपल्या हक्कांची जाणीव करून द्या व ब्रिटिशांना त्यांनी ते हक्क कां दिले पाहिजेत, तें समजावून द्या. आपण जर गप्प बसलों तर त्यांना वाटेल की, हे लोक संतुष्ट आहेत. म्हणून ब्रिटिशांना आपल्या तळमळीची जाणीव करून द्या." १९०६ सालच्या काँग्रेसमधील भाषणांत त्यांनी पुनः पुन्हा सांगितले की, "ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवरील माझा विश्वास उडालेला नाही." ते म्हणाले, "प्रयत्नांना आरंभ केल्यापासून मी इतक्या वेळा निराश झालों आहें की, दुसऱ्या एखाद्याचें काळीज फुटून गेलें असतें व त्याने बंड उभारलें असतें; पण चिकाटी हा माझ्या जीवनाचा धर्म असल्यामुळे मी हताश झालों नाही." ('आधुनिक भारत,'- जावडेकर, पृ. ११४). ज्याने ब्रिटिशांचे काळेकुट्ट राक्षसी रूप स्पष्ट करून दाखविलें त्याच थोर पुरुषाची, पन्नास वर्षांनंतरहि ब्रिटिश हेच हिंदुस्थानचें कल्याण करतील, ही श्रद्धा कायम होती.
 या पार्श्वभूमीवरून विष्णुशास्त्री यांच्या निबंधमालेचा विचार आपण केला पाहिजे. पण त्याआधी वर उल्लेखिलेल्या इतर थोर नेत्यांच्या कार्याचा विचार करूं.
ईश्वरी वरदान
 न्या. मू. रानडे हे गेल्या शतकांतील नेत्यांचे अग्रणी होत, हें आता सर्वमान्य झालें आहे. लोकमान्यांनी त्यांच्या मृत्यंनूतर त्यांच्या कार्याचें मूल्यमापन केलें तें अगदी यथार्थ आहे. "थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला त्यांनीच प्रथम ऊब दिली; आणि त्याला सजीव करण्याचें दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड मेहनत केली. आमच्या मतें हेंच त्यांच्या थोरवीचें व असामान्य मोठेपणाचें मुख्य चिन्ह होय," असें टिळकांनी म्हटलें आहे व 'सर्वज्ञः स हि माधवः' या वचनाने विजयनगरच्या माधवाचार्यांशी त्यांची तुलना करून त्यांचा गौरव केला आहे. हा गौरव यथायोग्य म्हणावा इतकें न्यायमूर्तीचें कार्य असामान्य होतें यांत शंकाच नाही; पण ब्रिटिश राज्यकर्त्यांविषयी बोलतांना मात्र माधवराव दादाभाईंच्या इतकी सुद्धा टीका करण्यास तयार नसत. इंग्रजी राज्य म्हणजे ईश्वरी वरदानच होय, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. हिंदुस्थानांतून इंग्लंडला जाणारी प्रत्येक पै ही लूटच आहे, असें दादाभाई म्हणत. माधवरावांना हें मान्य नव्हतें. ब्रिटिश लोक भारताला भांडवल पुरवितात व तें हलक्या व्याजाने देतात, यासाठी हिंदी जनतेने त्यांचे आभार मानले पाहिजेत, असे ते म्हणत. दादाभाई- पक्षाचें म्हणणे असे की, हिंदुस्थानची लूट करून ब्रिटिशांनी हा पैसा मिळविलेला असतो व तोच भांडवल म्हणून ते आम्हांला परत देतात, यांत उपकार कसले ?
 ब्रिटिश भांडवलदार व ब्रिटिश राज्यकर्ते यांची न्यायमूर्ति जी तरफदारी करीत तिची राष्ट्रीय पक्षांतल्या लोकांना अत्यंत चीड येई. ती इतकी की, ज्या टिळकांनी पुढे त्यांचा मोठा गौरव केला त्यांनीच या वेळीं "परदेशी भांडवलाचे गोडवे गाणारे भाधवराव देशद्रोही आहेत" अशी त्यांच्यावर ध्वन्यार्थाने टीका केली. ('रानडे चरित्र'- फाटक, पृ. ४६९) आगरकरांनीहि न्यायमूर्तीच्यावर याच प्रकारे, पण सौम्य भाषेंत टीका केली आहे; आणि पुढे म्हटलें आहे की, "इंग्लिश लोकांच्या मनोधर्मांत एकाएकी प्रचंड क्रान्ति झाल्याशिवाय त्यांच्या अंतःकरणांत आमच्या व्यापारवृद्धीविषयी कळकळ उत्पन्न होईल, अशी आशा करणें व्यर्थ आहे." ('आधुनिक भारत', पृ. १२८).
 येथेच मूळ मेख आहे. रानडे, लोकहितवादी, तेलंग यांची अशी दृढ श्रद्धा होती की, ब्रिटिश राज्यकर्ते भारताचे हितच चिंतितात. त्यांच्या मनांत भारताच्या उद्धाराची तळमळ आहे. त्यांची सत्ता भारताला कल्याणकारक आहे. म्हणून त्यांच्या आश्रयानेच आपण सर्व उद्योग केले पाहिजेत. उलट या राज्यामुळे भारताची सर्व प्रकारची हानि झाली असून, तें नष्ट झाल्यावांचून आमची उन्नति होणार नाही, अशी विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक यांच्या मनाची निश्चिति झाली होती. निबंधमालेने हा संदेश प्रथम दिला, म्हणून तिच्यामुळे नवयुग निर्माण झालें.
यथान्याय
 लोकहितवादींच्या कार्याचा व्याप अथवा त्याची महत्ता दादाभाई किंवा रानडे यांच्याइतकी नाही, हें खरें आहे. तरीहि गेल्या शतकांतील प्रबोधनच्या कार्यात त्यांचें स्थान महत्त्वाचे आहे याबद्दल दुमत होईल असें वाटत नाही. धर्म समाजरचना, अर्थव्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी, आजहि पुरोगामी वाटतील, असे विचार सव्वाशे वर्षांपूर्वी सांगितले, यांतच त्यांची थोरवी आहे. राममोहन रॉय यांनाहि नव्या अर्थकारणाचें स्वरूप आकळलें नव्हतें; तें लोकहितवादींनी पुरेपूर जाणलें होतें व आपला व्यापार वाढला पाहिजे, कारखाने स्वतःचे उभारले पाहिजेत, असा उपदेशहि केला होता.
 पण ब्रिटिश राज्य व ब्रिटिश राज्यकर्ते हा विषय आला की त्यांची सर्व आकलनशक्ति मरगळून जाई. इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे, असेंच ते म्हणत. एवढेच नव्हे तर, 'इतिहासाच्या संबंधाने समुद्रच' असा ज्यांचा लौकिक होता ते लोकहितवादी 'इंग्रजांनी हिंदुस्थानचें राज्य न्यायाने घेतलें' असेंहि सांगत. "त्या राज्यस्थापनेचा इतिहास पाहूनच, इंग्रजांनी यथान्याय राज्य घेतले आणि ईश्वराने हे राज्य त्यांस अशा प्रकाराने दिले की, त्यांस कोणी दोष देणार नाही, असें माझें मत झालें आहे," असें एका पत्रांत ते लिहितात तेव्हा विस्मय वाटतो. क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्ज यांची चरित्रें अप्रामाणिकपणा, वचनभंग, पिसाट लोभ यांनी बरबटलेली आहेत हे लोकहितवादींना माहीत नव्हतें काय ?
 पण हा प्रश्न दादाभाई, रानडे यांच्याबद्दलहि निर्माण होतो. विष्णुश्चास्त्री यांच्या आधीच्या सर्वच थोर पुरुषांबद्दल तो विचारावा लागतो. ब्रिटिश हेच आपले उद्धारकर्ते आहेत, असें कोणत्या इतिहासाच्या अधारे आपण म्हणतां ? याला उत्तर नाही. त्यांची तशी श्रद्धा होती, एवढेच उत्तर देतां येईल. या श्रद्धेला सुरुंग लावून 'आपणच आपले उद्धारकर्ते' हा स्फूर्तिदायक विचार प्रथम विष्णुशास्त्री यांनी मांडला.
म. फुले- अनन्यकोटी
 यानंतर महात्मा जोतिबा फुले यांचा विचार करावयाचा. वरील तिघांच्या तुलनेने पाहतां फुले अनन्यकोटीतले होते. लोकहितवादी, रानडे हे समाजसुधारकच होते; पण स्वतः प्रतिपादिलेलीं तत्त्वें आचरण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी माघार घेतली; पण फुले यांनी अनन्यसामान्य धैर्य दाखवून आपल्या तत्त्वांप्रमाणे जन्मभर आचरण केलें. प्रथम त्यांनी महार-मांग- चांभार या जातींच्या मुलींसाठी शाळा स्थापिली. त्यापाठोपाठ कनिष्ठ जातींसाठी इतर अनेक शाळा स्थापन केल्या. विधवाविवाहाला उत्तेजन देऊन ते घडवून आणले. बालहत्याप्रतिबंधक गृह काढलें, आणि अस्पृश्यांसाठी घरांतला पाण्याचा हौद खुला केला; आणि हें सर्व करीत असतांना, चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता यांचा आधार असलेलें जें हिंदु धर्मशास्त्र त्याच्यावर अत्यंत प्रखर असा हल्ला चढविला. या ब्राह्मणी शास्त्रांतील विषमता, अन्याय, जुलूम, पक्षपात यांवर एवढी विदारक, प्रखर टीका दोन हजार वर्षांत कोणी केली नसेल इतकी जोतिबांनी केली. या काळांत यामुळेच त्यांच्यावर अनेक संकटें आली. प्राणसंकटहि आले. पण जोतिबा डगमगले नाहीत. ते अत्यंत धाडसी, साहसी होते. त्यांनी या सर्व सकटांना तोंड देऊन सामान्य, दलित जनतेच्या उद्धाराचे कार्य अव्याहत चालविलें.
इंग्रज त्राते
 पण असे असूनहि लोकहितवादी, रानडे यांची इंग्रज राज्यकर्त्यावर एकपट श्रद्धा असली, तर म. फुले यांची दसपट शतपट होती. ब्राह्मणी सत्तेपासून दलितांचें संरक्षण व्हावें म्हणून, "यापुढे तरी सरकारने शुद्धीवर येऊन प्रत्येक खेड्यांत एका तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थाला गतकुळी शेतें इनाम देऊन त्याला गावच्या कच्च्या हकीगतीविषयी रिपोर्ट करण्यास सांगावें," अशी सूचना केली आहे; आणि इंग्रज हेच आपले त्राते अशी त्यांची शेवटपर्यंत श्रद्धा होती. आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांत इंग्रजांनी तेथील आदिवासींच्या अमानुष कत्तली केल्या होत्या, आणि भयानक अस्पृश्यता निर्माण करून, त्यांच्या वेगळ्या वस्त्याहि शक्य तेथे निर्माण केल्या होत्या. हा इतिहास जोतिबांनी दृष्टिआड केला. पण एवढेंच नाही. हिंदुस्थानांतल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांचे स्वरूप कांही प्रमाणांत तरी तसेंच आहे असें स्वतः जोतिबांनीच 'शेतकऱ्याचा आसूड' या आपल्या प्रबंधांत दाखवून दिले आहे. दादाभाईंनी इंग्रजांवर केलेले आरोप थोड्या सौम्य भाषेत जोतिबांनीहि केले आहेत. असें असतांना इंग्रजांखेरीज आपला त्राता कोणी नाही या मताला ते चिकटून बसले आणि ती भावना शूद्रांच्या व सर्व ब्राह्मणेतरांच्या मनांत त्यांनी दृढमूल करून टाकली.
 जोतिबांचा लढा ब्राह्मण्याविरुद्ध होता, सनातन हिंदु धर्मशास्त्राविरुद्ध होता. त्यांच्या मतें ब्राह्मण हेच फक्त आर्य व त्या शास्त्राचे पुरस्कर्ते असून, शूद्र, अस्पृश्य यांसकट सर्व ब्राह्मणेतर समाज हा शूद्र होता. असे असतांना त्या सर्वांना संघटित करून, त्यांना स्वतःच्या बळावर, स्वावलंबनाने, ब्राह्मण्याविरुद्ध लढा करण्यास त्यांनी उद्युक्त केलें असतें तर सर्व ब्राह्मणेतर समाजाचें आत्मतेज जागृत झालें असतें; पण तसें झालें नाही. जोतिबांनी लढा सुरू केला; पण ब्राह्मणांखेरीज आपण सर्व शूद्र आहों, समान आहों, हें तत्त्वज्ञान ब्राह्मणेत्तरांनी क्षणभरहि स्वीकारलें नाही. सत्यशोधक चळवळींतून त्यांनी ब्राह्मणद्वेष फक्त घेतला. चातुर्वर्ण्य, जातिभेद या सर्व संस्था, त्यांतील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व वगळून, ब्राह्मणेतरांना जशाच्या तशा हव्या होत्या. म्हणजे त्यांचा लढा, जोतिबांप्रमाणे तात्त्विक नव्हता. त्याला नैतिक अधिष्ठान नव्हते. इंग्रज राज्यकर्त्यांच्या बाबतींत तर, 'पंचम जॉर्ज पिता व मेरी आमची माता' असें म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षे ब्राह्मणेतरांच्या हाती सत्ता आहे. या काळांत शूद्र-अस्पृश्य यांवरचे अत्याचार, जोतिबांच्या काळाप्रमाणेच चालू आहेत. नव्हे, त्यांचे प्रमाण फार वाढलें आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी जोतिबांनी कणाकणाने देह झिजविला तो शेतकरी, ते शूद्र, ते अस्पृश्य, ते आदिवासी, ते दलित यांची स्थिति पूर्वीपेक्षाहि जास्त दयनीय झाली आहे. आणि भाई माधवराव बागल, डॉ. बाबा आढाव, केशवराव मोरे रा. ना. चव्हाण हे ब्राह्मणेतर कार्यकर्तेच हे सांगत आहेत. सत्यशोधक समाज म. फुले यांचे तत्त्वज्ञान मुळीच मानीत नाही, हें अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केलें आहे. ('साधना', पुणे - अंक १५-५-७१, ९–१०–७१, ११-३-७२ वं २४-६--७२). म. फुले यांचा खरा अनुयायी एकच- महर्षि वि. रा. शिंदे. पण ते अंत्यज सेवा करतात म्हणून बहुजनांनी त्यांना बहिष्कृत केलें. याचा अर्थ हा की, ब्राह्मणेतर समाजाने म. फुले यांच्यापासून स्फूर्ति घेतली नाही. आपले उद्धारकर्ते आपण आहोत, ही भावना प्रारंभापासून त्यांच्यांत चेतली असती तर त्या सामाजिक, धार्मिक लक्ष्यांतूनहि स्वत्वजागृति बहुजनांच्या ठायी झाली असती, व त्यांच्यांतूनहि अपार कर्तृत्व निर्माण झालें असतें. १९३० सालानंतर तो समाज स्वातंत्र्यलढ्यांत उतरल्यानंतरच तो शुभारंभ झाला.
 पण पितामह दादाभाई, न्या. मू. रानडे व लोकहितवादी यांच्यासारखे जें 'माहितीचे समुद्र' त्यांनी सुद्धा इंग्रज राज्यकर्ते हेच आपले उद्धारकर्ते ही भूमिका स्वीकारली तेथे महात्मा फुले यांना कसा दोष द्यावयाचा?
 याचा अर्थ एकच. इंग्रज गेले तरी हिंदुस्थानचे भवितव्य आपण आपल्या खांद्यावर सहज पेलूं शकूं, असा आत्मप्रत्यय या थोर पुरुषांच्या ठायीं नव्हता. विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक यांचें वैशिष्ट्य हे की, त्यांचे मन या आत्मप्रत्ययाने ओतप्रोत भरलें होतें, दुथडी वाहत होतें. यामुळेच विष्णुशास्त्री यांनी बेधडक सांगून टाकलें की, इंग्रज इकडे आले नसते तर आपले कांही अहित झालें असतें असें नाही. इतकेंच नव्हे, तर या जगांत इंग्रज मुळीच नसते तरी त्यांच्यावांचून आम्ही रसातळास जाऊन पोचलों असतों, असें नाही. ('आमच्या देशाची स्थिति'- य. गो. जोशी प्रकाशन, पृ. २९, २४).




-३-

स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश


अहं - स्फुरण
 स्वत्वाची ओळख, अस्मितेची- पृथकपणाची- जाणीव, अहंकार-जागृति ही संजीवनी आहे. सर्व नवी सृष्टि या अहंकारांतूनच निर्माण होते. भारतांतील प्राचीन तत्त्वज्ञानामध्ये कपिलमहामुनींचें सांख्यदर्शन फार महत्त्वाचे मानले जाते. सांख्यमताने मूलप्रकृतींत बुद्धि निर्माण होते व तींतून प्रथम अहंकाराचे स्फुरण होतें; आणि या स्फुरणांतूनच सर्व चराचर सृष्टि निर्माण होते. मानवी जीवनाचें असेंच आहे. कोणत्याहि राष्ट्राला स्वत्वाची, आपल्या अस्मितेची जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांत कर्तृत्व निपजत नाही. मूलप्रकृतीच्या ठायीं सुप्तावस्थेंत सर्व गुणसंपदा असते; पण अहंकार- स्फुरणावांचून नवी सृष्टि नाही, त्याचप्रमाणे समाजाच्या ठायीं सर्व प्रकारची गुणसंपदा असूनहि त्याचा पृथगहंकार जागृत झाला नाही, तर तो वैभवास चढत नाही. विष्णुशास्त्री यांच्या आधी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, दादाभाई, रानडे, फुले यांच्या प्रयत्नाने येथे गुणसंपदा निर्माण होऊं लागली होती, पण अस्मितेंतून जो चित्कळेचा स्पर्श तिला व्हावा लागतो तो अजून झाला नव्हता. त्यामुळे नवनिर्मिति होत नव्हती, कर्तृत्व फुलत नव्हतें, समाजांतून नवे उन्मेष येत नव्हते. विष्णुशास्त्री यांनी तो जीवनदायी स्पर्श घडविला आणि आरंभीं म्हटल्याप्रमाणे येथे नवयुग निर्माण झालें.
आत्मविश्वास
 इंग्रज हिंदुस्थानांत आले नसते तर आमचें कांही अहित झालें असतें असें नाही, किंबहुना ते या जगांतच नसते तरी कांही बिघडलें नसतें, असें विष्णुशास्त्री कां म्हणाले ? एक तर त्यांना हें माहीत होतें की, असा एक देश दुसऱ्या देशाचे कधीहि कल्याण करीत नाही. तो दुसऱ्याला पादाक्रांत करतो तें स्वतःच्या स्वार्थासाठी, जितांच्या रक्तशोषणासाठी; आणि दुसरें म्हणजे आपल्या देशाच्या लोकांमध्ये स्वत्वजागृति झाली, त्यांना आपल्या अस्मितेची ओळख पटली की आपल्या देशाची सर्वांगीण उन्नति करण्यास, त्याचा उत्कर्ष साधण्यास ते स्वतःच पूर्णपणे समर्थ होतील, अशी शास्त्रीबुवांना निश्चिति होती. त्यांच्या लेखनांतून त्यांच्या सुप्त मनाचा ठाव घेतला तर असें दिसेल की, तें मन असेंहि म्हणत होतें- आमच्या पूर्ववैभवाचें आम्हीं स्मरण केलें तर कदाचित् आम्ही इंग्लंडहि पादाक्रांत करूं. 'आमच्या देशाची स्थिति' या प्रबंधांत महादजी शिंदे यांच्या पराक्रमाचा गौरव करतांना त्यांनी लिहिलें आहे.- "वृद्धकथेवरून असें ऐकण्यांत आलें आहे की, पाटीलबोवांचा इरादा खुद्द लंडनवर भगवा झेंडा रोवण्याचा होता." इंग्रजांचें वागणें ख्रिस्ती धर्मास सोडून आहे, असें सांगतांना अन्यत्र त्यांनी विचारलें आहे की, "आम्ही उद्या उठून इंग्लंडवर गेलों आणि सारी दौलत हिंदुस्थानांत भरली तर चालेल काय ? नाना तऱ्हेचे चरक लावून तेथील प्रजा सारी पिळून काढली असतां तें आमच्या पाश्चात्त्य आर्य बंधूंस कितीसें मानवेल बरें ?"
 असला दुर्धर्ष आत्मविश्वास विष्णुशास्त्री यांच्या ठायीं होता; आणि तोच आत्मविश्वास आपल्या हिंदी लोकांच्या ठायीं जागृत करावा, यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लेखणी झिजविली व त्यांना सत्वाची ओळख करून दिली.
स्वत्व म्हणजे काय ?
 शास्त्रीबुवांनी स्वत्वाची ओळख करून दिली म्हणजे काय केलें ? अस्मितेची जाणीव म्हणजे काय ? स्वभाषा, स्वधर्म, आणि स्वदेश यांचा अभिमान हे स्वत्व- स्वदेश या शब्दांत स्वतःची संस्कृति, प्राचीन परंपरा, पूर्वजांचें बहुविध कर्तृत्व त्यांच्या ठायीची गुणसंपदा यांचा अंतर्भाव होतो. आचार्य जावडेकर यांनी म्हटलें आहे की, "१८७५ पासून १८८५ पर्यंतच्या काळांत जें एक नवचैतन्य राष्ट्रांत निर्माण होत होतें त्याला एक सांस्कृतिक अंगहि होते. हें सांस्कृतिक अंग म्हणजे भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान हेंच होय." या अभिमानानेच चैतन्य निर्माण होत असतें. विष्णुशास्त्री यांनी हा अभिमान कसा जागृत केला तें आता पाहूं.
मातृभाषा
 समाजाच्या अस्मितेचें पहिलें अंग म्हणजे भाषा. स्वत्वाच्या दृष्टीने भाषेचें महत्त्व काय तें बांगला देशाने दाखवून दिलें आहे. बांगला हा मुस्लिमांचा देश. त्यांच्या धर्म-ग्रंथाची भाषा आरबी आहे. त्यांचे राष्ट्र म्हणजे पाकिस्तान, त्याची भाषा उर्दू होती; पण बांगला-जनांना त्या भाषा परकीय वाटत होत्या. बंगाली ही त्यांची स्वभाषा. त्यांचें स्वत्व त्या भाषेत होते. त्यामुळे तिच्यावर आक्रमण होतांच तेथले अवघे लोक-जात खवळून उठले आणि पाकिस्तानांतून फुटून निघून आपल्या अस्मितेचें त्याने रक्षण केलें. ही गोष्ट कांही नवीन नाही. सनातन काळापासून प्रत्येक समाज आपल्या भाषेचा असा अभिमान बाळगीत आला आहे, हें जाणूनच विष्णुशास्त्री यांनी स्वभाषाभिमान चेतविण्यापासून आपल्या लेखनास प्रारंभ केला.
 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा निबंधमालेतील पहिला निबंध. त्याच्या प्रारंभीच त्यांनी म्हटले आहे की, भाषेची अभिवृद्धि ही देशाच्या उत्कर्षाचें एक मोठेंच साधन आहे. कारण देश व भाषा यांची एकच अवस्था मानली तरी चिंता नाही. म्हणजे अस्मितेचीं हीं दोन अंगें अविभाज्य आहेत. अशा या महत्त्वाच्या अंगाची– स्वभाषेची- इंग्रजीच्या वर्चस्वामुळे अवहेलना होत आहे हें पाहून विष्णुशास्त्री अस्वस्थ झाले आणि त्या भाषेचें वैभव महाराष्ट्रियांच्या निदर्शनास आणून देण्याचें कार्य त्यांनी आरंभले. सर्व प्रकारचे विकार, विचार, भावना, कल्पना, नाना आंतरिक संवेदना, अभिप्राय हे व्यक्त करण्यास मराठी भाषा असमर्थ आहे, तींत तसे समर्पक, अर्थव्यंजक शब्दच नाहीत असा एक आक्षेप त्या वेळी घेतला जात असे; आणि हा आक्षेप नव्या पदवीधरांकडून, सुशिक्षितांकडून येत असे. (आश्चर्यं असें की, आज शंभर वर्षांनंतरहि महाराष्ट्रांतले अनेक लेखक मराठी लिहितांना बिनदिक्कत मधेच अनेक इंग्रजी शब्द वापरतांना दिसतात. सर्व भावार्थ व्यक्त करण्यास मराठी समर्थ आहे हें आजहि त्यांना मान्य नाही.) त्याला उत्तर देतांना शास्त्रीबुवा म्हणतात, "जी भाषा बोलणाऱ्यांनी दिल्ली-अटकेपर्यंत आपले झेंडे नेऊन लावले, जींत तुकाराम-रामदासांसारख्या भगवत्परायण साधूंनी आपले श्रुतिवंद्य अर्थ ग्रथित केले, जीस मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इत्यादि कवींनी आपल्या रसाळ व प्रासादिक वाणीने संस्कृत भाषेचीच प्रौढी आणली, त्या भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरिता कोणत्याहि अन्य भाषेच्या तोंडाकडे पाहण्याची खास गरज नाही, अशी आमची खात्री आहे."
 स्वभाषा व स्वदेश हीं अस्मितेचीं अंगें अविभाज्य आहेत म्हणजे काय, हें यावरून स्पष्ट होईल. ज्या लोकांच्या ठायीं कर्तृत्व आहे, पराक्रम आहे त्यांची भाषा समृद्ध असणारच; आणि भाषेच्या विकासामुळे कर्तृत्वाचा विकास साधणारच, असा हा अन्योन्य संबंध आहे. हा दुसरा विचार मनांत असल्यामुळेच विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, "इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाही. हें तर काय, पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास तीमोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठविलें असल्यामुळे तिचें साहाय्य मराठीसारख्या पक्व होऊ पाहणाऱ्या भाषेस होईल तितके थोडें आहे. इतकेंच मात्र की, तें ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें स्वत्व म्हणजे निराळेंपण कायम राखलें पाहिजे. तर मराठी भाषेच्या हितकर्त्या विद्वानांनी हें पक्के लक्षांत वागवावें की, इंग्रजीतील केवळ अर्थ मात्र घेऊन त्यास शुद्ध मराठीच्या साच्यांत त्यांनी ओतलें पाहिजे. अशा तऱ्हेचे ग्रंथ बनले असतां ते भाषेस फारच हितावह होऊन भूषणप्रद होतील."
ग्रंथ - निर्मिति
 भाषेच्या अभिवृद्धीचा मार्ग येथे शास्त्रीबुवांनी स्पष्ट केला आहे. भाषेची अभिवृद्धि म्हणजे काय ? विकास म्हणाजे काय ? सर्व जगाचें ज्ञानभांडार तिच्यांत आणून सोडणारे ग्रंथ तयार होणें ! हीच अभिवृद्धि, हाच विकास; आणि हा विकास झाला म्हणजे सहजगत्याच देशाचा विकास होईल. कारण मराठींत ग्रंथ झाल्याने आज ज्ञानाचा मार्ग ज्यांस खुला नाही त्यांस तो खुला होईल आणि त्यांतूनच देशाचा उत्कर्ष साधेल. या सर्व निबंधांत भाषेचा उत्कर्ष म्हणजेच देशाचा उत्कर्ष हें सूत्र विष्णुशास्त्री यांनी अखंड राखलें आहे. शेवटीं समारोप करतांनाहि त्यांनी म्हटलें आहे की, "आपल्या भाषेच्या अंगी अर्थव्यंजकता, वर्णसौंदर्य फार कमी आहे हा अलीकडील विद्वानांचा ग्रह कांही अंशीं तरी मोडून टाकण्यास जर आमचें निबंध कारण झाले तर आमच्या हातून देशहिताचे एक मोठेच कृत्य घडलेसें आम्ही मानूं."
 तेव्हा स्वत्व याचा पहिला अर्थ म्हणजे स्वभाषेचा अभिमान, आणि त्याची जागृति म्हणजे स्वत्वाची ओळख होय, याविषयी विष्णुशास्त्री यांच्या मनांत तिळप्राय संदेह नव्हता, हें यावरून स्पष्ट होईल. तसें असल्यामुळेच त्यांनी स्वत्वा जागृतीला तेथूनच प्रारंभ केला.
मर्मघातक हल्ला
 स्वधर्म हा स्वत्वाचा दुसरा महत्त्वाचा घटक होय. एका अर्थी स्वभाषेच्या तुलनेने स्वधर्म हा दसपटीने, शतपटीने महत्त्वाचा घटक आहे. म्हणून मिशनऱ्यांनी मराठीचा किंवा इतर देशभाषांचा आश्रय करण्यांत मुळीच खंत मानली नाही आणि धर्मावर मात्र अत्यंत मर्मघातक हल्ला चढविला. इंग्रज पंडितांचें धोरण असेंच होतें. सरकारने प्रजेवर धर्माच्या बाबतींत सक्ती करावी की नाही असा विषय चालला असतां, मेकॉलेसाहेब हिंदुस्थानाविषयी लिहितात, "परधर्म जबरीने लोकांवर बसविला असतां, जेथे त्यांचे अपरिमित कल्याण होईल, असा देश हिंदुस्थानाखेरीज कदाचित् दुसरा कोठेहि सापडणार नाही. तेथील धर्मासारखा नीचतेस पोचलेला धर्मं साऱ्या पृथ्वीवर कोठेहि नाही. त्याचा समूळ उच्छेद करून ख्रिस्ती धर्माचें अत्यंत हीन काळी अत्यंत हीन जें स्वरूप कधी कोठे चालू असेल, तें त्याच्या जागी आणून बसविलें असतांहि त्या देशांतील लोकांचे हित होणार आहे."
प्रत्याघात
 अशा तऱ्हेने अत्यंत दुष्ट व विकृत बुद्धीने केलेले धर्मावरचे हल्ले हिंदूंना सहन होणें कसें शक्य होतें ? १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा त्या संतापाचाच उद्रेक होता. इतरहि मार्गांनी हिंदूंनी या आघाताला प्रत्याघात चालविला होता. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 'विचारलहरी' हे नियतकालिक चालविलें होतें. त्यामुळे कांही काळ त्यांच्या नोकरीवरहि गदा आली होती. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी मिशनऱ्यांच्या अस्सल भाषेतच त्यांना प्रत्युतर देऊन अनेक ठिकाणीं त्यांना नामोहरम केलें होतें; पण पैसा, सत्ता, विद्वत्ता या सर्व दृष्टींनी मिशनऱ्यांचे बळ फार मोठें होतें, त्यामुळे त्यांचे हिंदु धर्म-निंदेचें व धर्मांतराचें कार्य अविरतपणें तसेंच चालू होतें. म्हणूनच विष्णुशास्त्री यांनी मिशनऱ्यांविरुद्ध सतत शस्त्रसंधान चालविलें होतें. त्यांतील ख्रिस्ती धर्माचें जें विदारण त्यांनी पाश्चात्त्य पंडितांच्या- ख्रिस्ती पंडितांच्याच आधारें केलें त्याचा विचार पुढे करावयाचा आहे. येथे भाषेचे महत्त्व सांगतांना त्यांनी जो मुद्दा मांडला तसा धर्मचर्चेच्या सदर्भात मांडलेला मुद्दा पाहूं. विष्णुशास्त्री म्हणतात की, "प्राचीन काळी याच धर्माच्या आश्रयाने येथल्या लोकांनी अलौकिक व दिव्य असें कर्तृत्व प्रगट केलें होतें. वाल्मीकि, पाणिनि, कालिदास, आर्यभट्ट हे सर्व हिंदु धर्माचे पुरुष होते. विक्रमादित्य, पोरस, शिवाजी, बाजीराव यांनी हिंदु राहूनच दिग्विजय केला. तुकाराम, रामदास, यांसारखे थोर धर्मवेत्ते याच धर्मांत निपजले ! तेव्हा यापुढे प्रगति करण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा अवलंब करणें अवश्य आहे हा विचार कमालीच्या मूर्खपणाचा आहे. त्यांतून हिंदु धर्मांत कांही हीण मिसळलें असेल तर तें काढून टाकून धर्मसुधारणा करण्यास कसलाच प्रत्यवाय नाही." मराठी भाषेत सुधारणा करण्यास ज्याप्रमाणे शास्त्रीबुवांचा विरोध नव्हता तसाच धर्मसुधारणेसहि नव्हता. परदेशगमनास पूर्वी बंदी होती. पण १८५७ चे वीर अफगाणिस्तान, इराण, माल्टा येथे गेलेच होते. राघोबादादांचा वकील इंग्लंडला गेला होता. पेशव्यांनी सर्व हिंदुस्थानभर संचार केला तेव्हा 'न नीचो यवनात् परः ।' हें वचन उराशी बाळगलें नव्हतें. हीं उदाहरणें देऊन शास्त्रीबुवांनी म्हटले आहे की, सुधारणा होण्यास हिंदु धर्म बाधक आहे ही समजूत अगदी चुकीची आहे.
ख्रिश्चन वळण
 हिंदु धर्मांत सुधारणा करण्यास कसलीच हरकत नव्हती, तर विष्णुशास्त्री यांनी ब्राह्मोसमाज व प्रार्थनासमाज या पंथांवर टीका कां केली, असा प्रश्न येतो. ते पंथ तर हिंदु धर्मांत राहूनच सुधारणा करण्याचे प्रयत्न करीत होते. याचे उत्तर असें की, त्या पंथांनी व विशेषतः प्रार्थनासमाजाने ख्रिस्ती धर्माच्या वळणावर कांही आचार सुरू केले होते. समाजाच्या उपासना रविवारी होत आणि कांही प्रार्थना इंग्रजीतून होत. उपासनेला कधी कधी बायबलचा आधार घेतला जात असे; आणि एकंदर उपासनेचें स्वरूप चर्चमधील उपासनेसारखे दिसत असे. आज हे आक्षेप अगदी बालिश व पोकळ असे वाटतील हें खरें आहे; पण मिशनरी व इंग्रज पंडित यांचे रानटी हल्ले ज्या वेळी चालू होते, सरकारचा त्यांना ज्या वेळीं पूर्ण पाठिंबा होता, आपल्यांतलेच कांही लोक धर्मांतर करून ख्रिस्ती कळपांत जाऊन हिंदु धर्माच्या निंदेस उद्युक्त झाले होते, त्या वेळीं या नव्या पंथामुळे ख्रिस्ती धर्माकडे लोकांची ओढ होईल अशी भीति वाटणे साहजिक होतें. ब्राह्मोसमाजाचे प्रसिद्ध अनुयायी केशवचंद्र सेन यांनी पुढे त्याच वळणावर आपल्या समाजाला नेलें. त्यांनी आपल्या नवविधान समाजांत ख्रिस्ती धर्मांतील अनेक विधींचा अंतर्भाव केला आणि ख्रिस्ती लोकांचा त्रिमूर्तिवाद समाजाच्या मूलतत्त्वांत प्रविष्ट केला. ख्रिस्ती मिशनरी या सर्वांचा फार विचित्र अर्थ करीत असत. हे नव्या पंथाचे लोक स्वधर्माला विटले असून ते लवकरच ख्रिश्चन होतील, असा प्रचार ते करीत. ('प्रार्थनासमाजाचा इतिहास', पृ. ४६). स्वत्वरक्षणास उद्युक्त झालेले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना हीच भीति होती. अशी भीति केवळ चिपळूणकरांनाच वाटत होती असें नव्हे. राजारामशास्त्री भागवत हे सुधारकच होते. त्यांनीहि, ख्रिस्ती धर्माच्या नमुन्यावर हा नवा नंदादीप पाजळला, अशी समाजाच्या संस्थापकांवर उघडपणे टीका केली होती. 'ज्ञानप्रकाश' हें पत्र सुधारकी वळणाचें असूनहि त्याने प्रार्थनासमाज स्थापन झाला तेव्हा लगेच त्यावर अशाच प्रकारचा आरोप केला होता. आज आपण शंभर वर्षांनी शांतपणें त्या काळचा विचार करीत आहोंत. पण आक्रमक असे मिशनरी व इंग्रज राज्यकर्ते आणि हिंदु धर्म व हिंदु संस्कृति यांच्यांत त्या वेळीं मोठा संग्राम सुरू झाला होता. तो युद्धकाळ होता. युद्धकाळांत शत्रूच्या गौरवाचा व स्वकीयांच्या अधिक्षेपाचा नुसता वास जरी कोठे आला तरी त्याच्यावर लोक खवळून उठतात; आणि तसें खवळणें अवश्यच असतें. तीच भावना विष्णुशास्त्री यांची होती. म्हणून ख्रिश्चन वळणावर जाणाऱ्या पंथांवर ते तुडून पडत होते.
परंपराभिमान
 स्वत्वाचा तिसरा घटक म्हणजे स्वदेश. स्वदेशाचा अभिमान म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीचा, प्राचीन परंपरेचा अभिमान, आपल्या पूर्वजांच्या बहुविध कर्तृत्वाचा अभिमान होय. मागे सांगितलेच आहे जितांचा हा अभिमान नष्ट करावा असा जेत्यांचा नेहमीच प्रयत्न असतो; आणि त्याप्रमाणे इंग्रज पंडितांनी गेल्या शतकांत तसे पराकाष्ठेचे प्रयत्न चालविले होते. या पंडितांच्या आघाताचें निवारण करून त्यांच्यावर तसाच जबर प्रत्याघात करणें हें निबंधमालेचें एक प्रधान उद्दिष्ट होतें. आम्हांला इंग्रजांचें गुरुत्व पतकरण्याचें मुळीच कारण नाही हें सांगतांना व्यास, वाल्मीकि, कालिदास, कपिल, पाणिनि, आर्यभट्ट, भास्कराचार्य, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, चंद्रगुप्त, पोरस, शिवाजी, बाजीराव, माधवराव, महादजी, यशवंतराव होळकर, रणजितसिंग, रमाबाई, अहल्याबाई, लक्ष्मीबाई, नाना, तात्या टोपे अशा अनेक स्त्री-पुरुषरत्नांचीं नांवें सांगून कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांतील गुणसंपदा जोपासण्याची ऐपत आम्हां हिंदुधर्मीयांत आहे, असें विष्णुशास्त्री यांनी वारंवार आवर्जून सांगितलें आहे.
डाव उलटविला
 शिवाय हा आपला सिद्धान्त जास्त दृढ व विवादातीत करून टाकण्यासाठी अनेक युरोपीय पंडितांचे आधार देऊन भारतीय संस्कृतीचे निंदक जे पाश्चात्त्य पंडित त्यांना त्यांच्याच जातभाईंकडून त्यांनी प्रत्युत्तर देवविलें आहे. बॉसेट नांवाच्य एका फ्रेंच ग्रंथकाराने 'जगाचा इतिहास' या नांवाने एक इतिहास लिहिला आहे. त्यांत ज्यू लोक यांचाच प्रामुख्याने इतिहास देऊन इतरांना अगदी गौण लेखिलें आहे. त्यावर टीका करतांना एक नामांकित इंग्लिश इतिहासकार लिहितो, "या जगाच्या इतिहासांत लेखकाने हिब्रू लोकांनी ज्यांच्यापासून संकृतीची शिकवण घेतली त्या पर्शियन व इजिप्शियन लोकांना तर वगळलेच आहे. पण त्यांच्याहिपेक्षा अतिशय श्रेष्ठ असे सिंधु व गंगा यांच्या काठचे लोक त्यांनाहि वगळले आहे. त्यांचें तत्त्वज्ञान इतकें उदात्त होतें की, युरोपियांचें सर्व अध्यात्मज्ञान त्यांत पूर्वीच येऊन गेलें आहे. आणि ज्यू जेव्हा भटक्या जंगली अवस्थेत होते तेव्हा अत्यंत उदात्त ज्ञानविद्या जोपासून त्यांनी तो आपल्या अमृतमधुर भाषेत ग्रथितहि करून ठेविली होती."
 प्रसिद्ध संस्कृत पंडित कोलब्रुक, इतिहासकार ओक्ले, सर जॉन मालकम, सर जेम्स मॅकिंटाश, यांसारखे इंग्लिश अधिकारी अशा अनेक पंडितांची अशींच अवतरणे देऊन विष्णुशास्त्री यांनी इंग्लिश मिनशरी, इंग्रज पंडित व इंग्रज राज्यकर्ते या तीन धूर्तांनी हिंदी जनांना भग्नतेज करण्याचा जो डाव रचला होता तो उलटवून त्यांच्या मनाला येणारी मरगळ झाडून टाकली व या भूमींत नवें चैतन्य निर्माण केलें.




-४-

एक पाय तुरुंगांत



राजद्रोहाचा आरोप
 विष्णुशास्त्री यांनी स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश यांचा अभिमान जागृत करून या भूमींत नवें चैतन्य निर्माण केलें ; पण आपण हें ध्यानांत ठेवले पाहिजे की, स्वत्वाचें केवळ तात्त्विक विवेचन करून असें चैतन्य कधीच निर्माण झालें नसतें. ज्यांना ही स्वत्व-जागृति होऊं नये असें वाटत असतें, ज्यांची त्यामुळे मोठी हानि होण्याचा संभव असतो ते असले प्रयत्न ठेचून टाकण्यास सदैव सिद्ध असतात. तेव्हा ज्याला स्व-समाजाची अस्मिता जागृत करावयाची आहे त्याने हें भविष्य जाणूनच पावलें टाकणें अवश्य असतें. विष्णुशास्त्री यांना या भविष्याची पुरेपूर जाणीव होती आणि मनाची तशी तयारी करूनच त्यांनी लेखणी उचलली होती. "तुम्ही इतके प्रखर, इतके कडक कसे लिहितां, सरकारवर, मिशनऱ्यांवर ही टीका कशी करता," असें कोणी त्यांना विचारले तेव्हा, 'एक पाय तुरुंगांत ठेवूनच मी लिहितों,' असें त्यांनी उत्तर दिलें होतें; आणि तुरुंगाची ही भीति केवळ काल्पनिक नव्हती. 'इंग्रजी भाषा' या विषयावरील तिसरा आणि मालेतील तिसावा निबंध प्रसिद्ध झाला त्या वेळी शास्त्रीबुवांच्यावर राजद्रोहाचा आरोप आलाच होता. त्या अंकांत भारताचा इतिहास लिहिणारे पाश्चात्त्य व विशेषतः इंग्रज इतिहासकार यांची बुद्धि कशी दुष्ट, पूर्वग्रहदूषित व पक्षपाती असते, त्यांचे लिखाण अयथार्थं व विपर्यस्त कसें असतें तें सांगून, त्यांच्यावर आणि अनुषंगाने येथील इंग्रज अधिकारी व मिशनरी यांच्यावर शास्त्रीबुवांनी झोंबरी टीका केली होती. ती सहन न होऊन मेजर जेकब यांनी 'एलिफास' या सहीने 'बॉम्बे गॅझेट'मध्ये पत्र लिहून, विष्णुशास्त्री व एकंदर पुण्याचे सर्व ब्राह्मण हे राजद्रोही आहेत, असा आरोप केला होता; आणि त्या तिसाव्या अंकाचें संपूर्ण भाषांतर करून ते सरकारकडे पाठवून दिलें होतें. पुण्याच्या ब्राह्मणांवर तेव्हापासूनच सरकारची वक्रदृष्टि झाली होती. विष्णुशास्त्री यांना या वेळी प्रत्यक्ष शिक्षा झाली नाही; पण डायरेक्टर चॅटफील्डसाहेबांनी त्या वेळीं त्यांची रत्नागिरीस बदली करून, तुमच्या राजद्रोहाची सरकारने दखल घेतली आहे, याची जाणीव करून दिली होती. आणि ही जाणीव प्रथमपासूनच असल्यामुळे विष्णुशास्त्री यांनी नोकरीची रुपेरी बेडी तोडून टाकण्याचें तेव्हाच ठरवून टाकलें, आणि तेवढ्यावर भागले नाही तर तुरुंगांत जाण्याचीहि मनाची सिद्धता करून ठेवली. फ्रेंच राज्यक्रांतीचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. रूसो, व्हाल्टेअर यांच्या ग्रंथांचें मनन केलें होतें. त्यामुळे प्रस्थापित सत्तेविरुद्ध लोकांना चेतवणी द्यावयाची तर लेखकाला त्यासाठी कोणती किंमत द्यावी लागते, कोणते अनर्थ त्याच्यावर आदळतात, त्याच्या आयुष्यांत सुखाला अनवसर कसा असतो याची त्यांना पुरेपूर जाण होती. मनाची अशी सिद्धता करून जो लिहितो त्यालाच लोकांत चैतन्य निर्माण करतां येतें. नवयुगाचें प्रवर्तन तोच करूं शकतो. लोकजीवनाला चित्कळेचा स्पर्श तोच घडवू शकतो. हें आणिकांचें काम नाही.
 हें आणिकांचें काम नाही हें कांग्रेसच्या स्थापनेच्या आधी सात-आठ वर्षे आणि नंतर आठ-दहा वर्षे या काळांत ज्या घडामोडी झाल्या त्यांवरून स्पष्ट होईल.
धैर्य नाही
 १८७७ सालापासून दादाभाई, रानडे, तेलंग, मंडलीक, फेरोजशहा मेथा, सुब्रह्मण्य अय्यर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी या नेमस्त प्रागतिक पक्षाच्या नेत्यांच्या मनांत काँग्रेससारखी एखादी अखिल भारतीय सभा स्थापावी, असें येत होतें पण त्यांच्या हातून तें घडलें नाही. तें घडलें केव्हा, तर ह्युम, वेडरबर्न, कॉटन यांसारखे इंग्रज अधिकारी यांनी पुढाकार घेतला तेव्हा ! वरील नेत्यांच्या मनांत, या कार्याला अवश्य तो आत्मविश्वास नव्हता, धैर्य नव्हते, त्यांच्या हातून राष्ट्रसभेची स्थापना होणें अशक्य होतें, असें खुद्द ना. गोखले यांनीच म्हटलें आहे. कारण अत्यंत सौम्य असें का होईना, पण तिला राजकीय संघटनेचें रूप होतें. तेव्हा अशी संघटना निर्माण करून सरकारची नाराजी ओढवून घेण्याचे धैर्य त्यांपैकी कोणाच्याहि अंगीं नव्हतें. ह्यूम, वेडरबर्न, कॉटन यांना सरकारच्या नाराजीची भीति नव्हती. म्हणूनच पुढाकार घेऊन ते अशी सभा स्थापूं शकले. राष्ट्रसभेची चार-पांच अधिवेशनें झाल्याबरोबर सरकारची तिच्यावर वक्रदृष्टि झालीच. १८९० सालीं सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहूं नये असा हुकूम काढण्यांत आला आणि खेदाची गोष्ट अशी की, न्या. मू. रानडे व न्या. मू. तेलंग यांच्यासारख्यांनी तो मानला ! (आधुनिक भारत प्रकरण ६ वें).
क्षात्रधर्म
 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत आचार्य जावडेकर यांनी विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक यांनी सर्वस्व वाहून देशसेवा करणारा असा नवा पंथच स्थापिला, असें वारंवार म्हटलें आहे. वरील नेमस्त नेते आणि या नव्या पंथांचे नेते यांच्यांतील फरक ध्यानांत घेतल्यावर त्याचा अर्थ स्पष्ट होईल. 'जयासि जिवाचें वाटे भय त्याने क्षात्रधर्म करूं नये ।' असें समर्थांनी म्हटलें आहे. राष्ट्रसभेचें कार्य हा त्याहि काळांत क्षात्रधर्मच होता. विष्णुशास्त्री आपल्या निबंधमालेतून त्याचीच शिकवण देत होते. पहिल्या अंकापासून त्यांनी हिंदी जनतेचा तेजोभंग करणाऱ्या इंग्रजांवर हत्यार धरलें होते; आणि मालेच्या शेवटच्या प्रबंधांत इंग्रज या जगांतच नसते तरी कांही बिघडलें नसतें, असें बेधडक सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती ! त्यावांचून स्वत्व-जागृति झाली नसती.
 राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून रानडे व तेलंग या दोघा थोर नेत्यांनी तिच्या संवर्धनासाठी अविरत कष्ट केले होते. १८९० च्या सुमारास या दोघांची सांपत्तिक - दृष्ट्या अगदी सुस्थिति होती. तरीहि सरकारी नोकरी की राष्ट्रसभेचें राजकारण, असा प्रश्न येतांच त्यांनी राष्ट्रसभा सोडून दिली, अनेक वर्षांचें अंगीकृत कार्यं सोडून दिलें; आणि सरकारी नाराजी ओढवून घेण्याची आपत्ति टाळली.
सर्वस्वाचा होम
 राष्ट्रीय अस्मितेचें पोषण अशाने कसें होणार ? मानवी चित्तांतील अहंचा पोष, त्यासाठी सर्वस्वाचा होम करण्यासाठी जेव्हा मनुष्य सिद्ध होतो, तेव्हाच होतो. विष्णुशास्त्री यांनी स्वत्वाची जागृति केली असें म्हटलें म्हणजे कोणी विचारतात की, त्या आधीच्या नेत्यांना स्वत्वाचा, या देशाचा, त्याच्या प्राचीन परंपरेचा अभिमान नव्हता काय ? निश्चित होता. त्याच अभिमानाने प्रेरित होऊन तेलंगांनी वेबर, लॉरिन्सर यांना उत्तर देणारे प्रबंध लिहिले. रानडे यांचा अभिमानहि जागजागीं प्रगट झालेला आहे; पण तो अभिमान दुबळा आहे. सरकारी वक्रदृष्टि होताच तो निस्तेज होतो. सर्वस्व अर्पणास तो सिद्ध होत नाही. त्यासाठी सिद्ध होणारे आगरकर टिळकांसारखे पुरुष शास्त्रीबुवांच्या परंपरेंत निर्माण झाले. विष्णुशास्त्री यांनी या भूमींत तेज निर्माण केलें, तिला चित्कळेचा स्पर्श घडविला, याचा अर्थ असा आहे.
काँग्रेस इंग्लंडमध्ये !
 राष्ट्रसभेचे संस्थापक ॲलन ह्यूम निवृत्त होण्याची वेळ आली तेव्हाहि हेंच दिसून आलें. १८९१-९२ च्या सुमारास ह्यूमसाहेबांची प्रकृति नीट राहीना. त्यामुळे त्यांनी इंग्लंडला कायम जावयाचें ठरविलें; पण त्यांना एक चिंता होती. राष्ट्रसभेचें- काँग्रेसचें- काय करावयाचें ? पांच-सहा वर्षे त्या तिघा इंग्लिश अधिकाऱ्यांनी गाडीचा मार्ग आखून तो नीट चालवून दाखविल्यानंतरहि येथले नेमस्त प्रागतिक नेते हा भार पेलण्यास समर्थ आहेत, असें त्यांना वाटेना. त्यामुळे काँग्रेस यापुढे इंग्लंडमध्ये भरवावी असा विचार त्यांनी मांडला. आणि अत्यंत लज्जेची गोष्ट अशी की, १८९२ सालच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनांत नेमस्त नेत्यांनी तसा ठरावहि केला. आपण गेलात तरी चालेल, आम्ही हीं सूत्रे हातीं घेतों, असें म्हणण्याची धमक कोणी दाखविली नाही. रानडे, तेलंग यांसारखे सरकारी अधिकारी, त्यांनी राष्ट्रसभा वर्ज्यच केली. आणि इतर जे पुढारी होते ते सरकारी नोकर नसले तरी सरकारी नाराजी ओढवून घेण्याची हिंमत त्यांना नव्हती. काँग्रेसच्या पहिल्या तीन अधिवेशनांपर्यंत सरकार तिचें कौतुक करीत होतें; पण अलाहाबादच्या चौथ्या अधिवेशनानंतर सर्व चक्र उलटलें, ठिकठिकाणांहून येणाऱ्या प्रतिनिधींना प्रतिबंध करण्याचें धोरण सरकारने स्वीकारलें. राष्ट्रसभेच्या कार्यकर्त्यांकडून चांगल्या वर्तनाबद्दल हमी म्हणून जामीन मागण्यांत येऊं लागले, आणि राष्ट्रसभेला हजर राहणें हें दुर्वर्तन ठरविण्यांत येऊं लागलें. पंजाबमध्ये त्या वर्षी पांच-सहा हजार लोकांकडून जामीन घेण्यांत आले होते. तेव्हा अशा आगींत, इंग्रज सरकार हेंच आपले नाते, उद्धारकर्ते, सद्गुरु असे मानणारे, त्यांचें राज्य म्हणजे परमेश्वरी कृपा समजणारे, आपले संरक्षण केलें तर तेच करतील अशी श्रद्धा बाळगणारे नेते, कसें पाऊल टाकणार ?
ह्यूमसाहेबांचे पत्रक
 पण हें एवढ्यांवर भागले नाही. १८९२ सालीं हह्यूमसाहेबांनी यापुढे लोकांत चळवळ करण्याची कां व कशी आवश्यकता आहे, यासंबंधी चर्चा करणारें एक गुप्त परिपत्रक काढलें व तें राष्ट्रसभेच्या सभासदांकडे पाठविलें. आणि तें ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना पोचविण्याची विनंती त्यांनी केली. पण तेवढीहि हिमत काँग्रेस- कमिट्यांची होईना. या परिपत्रकाची भाषा कडक होती. "देशांत दरिद्रयामुळे लोक पिचून निघाले आहेत, त्यामुळे तुम्ही निष्काळजी राहिलांत तर त्यांतूनच भडका उडण्याचा संभव आहे, तेव्हा काँग्रेसने यापुढे लोकांत चळवळ केली पाहिजे", असें ह्यूमसाहेबांनी प्रतिपादन केलें होतें. असलें परिपत्रक प्रसिद्ध करण्यास तर राहोच, पण सभासदांना वांटण्यास सुद्धा राष्ट्रसभेच्या चालकांनी नकार दिला; आणि कांही लोक तर "ह्यूमसाहेब अतिशयोक्ति करीत आहेत, ते पराचा कावळा करीत आहेत, वार्धक्यामुळे त्यांना वेड लागल्यासारखें झालें आहे," असे म्हणूं लागले. ('आधुनिक भारत' प्रकरण ६ वें).
 मग या पत्रकाचें काय झाले ? आगरकर आणि टिळक यांनी तें वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केलें आणि ह्यूमसाहेबांविषयी तसे निरर्गल प्रलाप काढणाऱ्या लोकांवर कडक टीका केली. आगरकरांनी त्याआधीच लिहून टाकलें होतें की, "राष्ट्रसभा इंग्लंडमध्ये भरवावी असें ह्यूमसाहेबांनी म्हटले याचें कारण हेंच की, आमच्या कर्तृत्वाविषयी, देशाभिमानाविषयी व उद्योगपरायणतेविषयी ते अत्यंत निराश झाले होते." हें लिहून त्यांनी पुढे म्हटलें होतें, "अशा स्थितीत आम्हीं हातपाय हलविले नाहीत तर उत्तरोत्तर आमची स्थिति शोचनीय होत जाऊन अखेरीस पर्शियन, ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे भारतीयांस नामशेष व्हावे लागेल." आणि ह्यूमसाहेबांनी काढलेल्या परिपत्रकाची राष्ट्रसभेच्या नेत्यांनी वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा संभावना केली तेव्हा तर ते फारच संतापले. ते म्हणाले की, "हिंदुस्थानच्या व इंग्लंडच्या खऱ्या हितचितकांवर अशा रीतीने उलटून पडणें हें आम्हा भेकड, लोभी, अविचारी व स्वार्थी हिंदु लोकांशिवाय कोणाच्यानेहि होण्यासारखें कर्म नाही. ह्यूमसाहेबांसारखी आमची आम्हांस काळजी असती, तर राजद्रोहाचा किंवा दुसरा कसलाहि आरोप आपणांवर आणून घेण्यास व त्याचे परिणाम साहण्यास आम्ही तयार झालों असतो. पण इतकें धैर्य आमच्या अंगीं असतें तर आमची सांप्रतची दास्यावस्था आम्हांस कोठून प्राप्त झाली असती !"
श्रमविभाग
 लो. टिळकांनी त्या पुढाऱ्यांवर अशीच टीका केली आहे. ते म्हणतात, "काँग्रेसच्या कार्यास धक्का येऊं नये एवढ्यासाठी तरी हे सर्क्युलर प्रसिद्ध होणे इष्ट नाही," असा कित्येक शाहण्या लोकांनी तर्क काढला आहे. आपला भित्रेपणा कसा झाकावा हें आम्ही फार चांगलें शिकलों आहों. राष्ट्रहितासाठी झटून कळकळीने व स्वार्थाकडे लक्ष न देतां मेहनत करण्याचा मक्ता आम्ही ह्यूमसाहेबांवर सोपविला आहे. त्याने खुशाल मेहनत करावी व एखाद्या वेळी कडक सर्क्युलर काढलें तर आम्ही त्याचा भिऊन निषेध करावा, असा त्याचा आमचा श्रमविभाग झाला आहे ! अशाने काँग्रेस ह्यूमसाहेबांच्या मागे कशी चालेल, याची आम्हांलाहि मोठी काळजी वाटतें."
पुढाऱ्यांची माघार
 यासंबंधी विवेचन करतांना पुढे लाला लजपतराय यांनी नेमस्त प्रागतिक नेत्यांविषयी हेंच मत दिलें आहे. ते म्हणतात, "इंग्लंडांतील चळवळ पैशाच्या अभावी फसली आणि हिंदुस्थानांतील चळवळ चिकाटी, जोम, आणि कळकळ यांच्या अभावीं ढासळली. या बाबतींत आमचें असें मत आहे की, ह्यूमसाहेबांनी पुढे जें धोरण स्वीकारलें तें स्वतःच्या बुद्धीच्या निर्णयानुसार स्वीकारलें नसून तें स्वीकारण्यास हिंदी पुढाऱ्यांची भीति व अंगचुकारपणा यांचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम हाच त्यांस कारण झाला असावा. हिंदी पुढाऱ्यांनी आपलीं हत्यारें खाली ठेवली नसती तर देशाने त्यांना पैशाचा पुरवठा केला असता, आणि त्यांच्या निशाणाखाली राष्ट्र गोळा झालें असतें. सरकारने ही चळवळ कदाचित् दडपून टाकली असती, पण तोच मोठा विजय ठरला असता. आणि १९०९ साली जें मिळालें तें कदाचित् दहा-वीस वर्षे आधी मिळालें असतें. पण हिदी पुढाऱ्यांना वाटलें की, आपल्या अंगीं पुरेसें सामर्थ्य नाही, म्हणून त्यांनी माघार घेतली व हें नवें राजकीय हत्यार फेकून दिलें." (कित्ता).
सर्वस्वत्यागाची परंपरा
 विष्णुशास्त्री यांनी एक निराळी पीठिका, निराळी परंपरा निर्माण केली म्हणजे काय तें यावरून ध्यानांत येईल. क्रांतीच्या आधी क्रांतीचें एक तत्त्वज्ञान सिद्ध होत असतें. दलित, पीडित जनतेंत त्यामुळे प्रतिकारशक्ति निर्माण होते. अस्मितेची जाणीव याचा हाच अर्थ आहे. माझा आत्मा व परमात्मा एकच आहेत, मी परब्रह्मच आहे ही जाणीव जशी केवळ बौद्धिक असून चालत नाही, ती अनुभूति असावी लागते त्याचप्रमाणे राष्ट्रीय अस्मितेची जाणीव केवळ बौद्धिक असून चालत नाही. ती रक्तांत भिनून मनुष्य जेव्हा अन्याय, जुलूम, पारतंत्र्य, गुलामगिरी यांच्या प्रतिकारासाठी, आणि त्याला अवश्य असणाऱ्या सर्वस्वत्यागासाठी सिद्ध होतो तेव्हाच त्याचें स्वत्व जागृत आहे, त्याला 'स्व'चा अभिमान आहे. असें म्हणतां येईल. हा अभिमान कोण निर्माण करूं शकेल ? सर्वस्वाचा होम करण्यास जो स्वतः सिद्ध झाला आहे त्यालाच हें सामर्थ्य आहे. हें सामर्थ्य विष्णुशास्त्र्यांच्या ठायीं होतें. म्हणून त्या परंपरेंतले लोकनेते जे लो. टिळक त्यांच्या वर्चस्वाखाली जेव्हा काँग्रेस आली तेव्हाच ती जिवंत झाली. तोंपर्यंत म्हणजे १८९० नंतरची दहा-पंधरा वर्षे तिला एखाद्या वार्षिक संमेलनाचें रूप आलें होतें. कारण तिच्या नेत्यांची संघर्षाची तयारी नव्हती. त्यांचें तत्त्वज्ञानच त्याच्या विरुद्ध होते. इंग्रजी राज्य ईश्वरी प्रसाद आहे, असें त्यांना वाटत होतें. म्हणून त्यांच्यालेखीं चळवळ याचा अर्थ येथली गाऱ्हाणी इंग्रजांच्या कानावर घालणें, त्यांना समजावून देणें, पटवून देणें एवढाच होता. यालाच टिळक अर्ज-विनंत्यांचे राजकारण असें म्हणत असत. त्या राजकारणांत अस्मितेचा प्रश्न येतच नाही. स्वत्व आणि अस्मिता यांचा लोपच तेथे अभिप्रेत असतो. अर्ज, विनंती यांत हा लोप गृहीतच धरलेला असतो. रानडे, दादाभाई, गोखले 'इंग्रजी राज्य म्हणजे ईश्वरी कृपा' मानीत होते; पण इंग्रज अधिकारी, ते व त्यांच्या मागची स्वत्वहीन जनता यांच्याबद्दल काय म्हणत असत ? मॅक्स ओरलचें वाक्य मागे दिलेच आहे. "तीस कोटि लोक इग्रजांचे जोडे पुसण्यांत धन्यता मानतात !" याला विष्णुशास्त्री यांनी उत्तर दिलें, "आम्ही जोडे पुशीत नाही. त्या पादत्राणांचा आम्ही निराळा उपयोग करतों !"




-५-

तेजोवलयाचा भेद


तेजोवलय
 स्वत्वजागृतीसाठी ज्याप्रमाणे भारताची प्राचीन परंपरा व संकृति यांचे उज्ज्वल रूप लोकांना दाखविणें आवश्यक होतें, त्याचप्रमाणे ब्रिटिशांचें राज्य, ब्रिटिश राज्यकर्ते, त्यांचा धर्म, त्यांची नीति, यांच्याभोवती जे एक दैवी तेजोवलय येथील जनतेच्या भाबडेपणामुळे, अज्ञानामुळे, पुराणकल्पनांमुळे निर्माण झालें होतें तें फाडून काढून त्यांचें वास्तव रूप लोकांना दाखविणें हेंहि आवश्यक होतें. स्पॅनिश वीर कोर्टीझ याने सोळाव्या शतकांत मेक्सिको देश जिंकला तेव्हा तेथील मेक्सिकन भोळेभाबडे व अज्ञानग्रस्त होते. त्यांनी घोडा हा प्राणी पूर्वी पाहिलाच नव्हता. त्यामुळे घोड्यावर बसलेला माणूस हा पुराणांत वर्णिलेला कोणी दैवी पुरुषच आहे, असें त्यांना वाटलें. कोर्टीझनेहि तशा वदंता मुद्दाम पसरून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ते नरमांसभक्षक क्रूर अझटेक जमातीचे लोक एकदम लुळे पडले. त्यांचा प्रतिकार संपला; आणि स्पॅनिश लोकांच्या पायाशी ते शरण आले. हिंदुस्थानांतील लोकांनी इतक्या हीन पातळीवरची शरणागति पतकरली नाही हें खरें; पण इंग्रजांना परमेश्वराने धाडलें आहे, आमच्या उद्धारासाठी धाडलें आहे, असें येथले बुद्धिमंतांचे, पंडितांचे अग्रणीहि म्हणूं लागले होते. १८५७ च्या बंडाच्या वेळी 'संवाद- भास्कर' या कलकत्त्याच्या पत्राने, "ब्रिटिश राज्य हे रामराज्य आहे, रामाला सेतु बांधण्यासाठी खारींनी सुद्धा मदत केली होती, तशी आपण ब्रिटिशांना केली पाहिजे," असा उपदेश लोकांना केला होता. इंग्रज म्हणजे रामाच्या काळचीं वानरें असून, कलियुगांत तुमचें राज्य होईल, असा सीतेने त्यांना वर दिला होता, अशी पुराण कथा आम्ही आमच्या लहानपणी ऐकलेली आहे. तेव्हा इंग्रजी राज्यकर्त्यांच्या मुखाभोवतीचें हें दैवी प्रभामंडल वितळवून टाकणें फारच अवश्य होते. कारण त्याच्या प्रभावाखाली हिंदी लोक दडपून गेले होते. आपण दासच होण्याच्या लायकीचे आहों, सुज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करूं नये, अशी त्यांची भावना झाली होती. अशी ही आत्मनि अवज्ञा असतांना, हा हीनगंड रुतून बसलेला असतांना त्या राजसत्तेला प्रतिकार करण्याची कल्पना त्यांच्या स्वप्नांत सुद्धा येण्याची शक्यता नव्हती. म्हणून अगदी परखड शब्दांत विष्णुशास्त्री यांनी ब्रिटिशांची स्वार्थी राजनीति, लुटारू कारभार, ढोंगी, आपमतलबी धर्म, त्यांचें मायिक बोलणें यांचें रूप स्पष्ट करून त्यांच्यावरची भोळया जनतेची श्रद्धा छेदून टाकली.
वास्तव रूप
 'आमच्या देशाची स्थिति' हा प्रबंध लिहिण्यामागे हाच प्रधान हेतु होता असें दिसतें. आमच्या राज्यकर्त्यांची स्थिति, एतद्देशीय राजेरजवाड्यांची स्थिति आणि सामान्य लोकांची स्थिति असे याचे तीन भाग आहेत. या तीनहि भागांत उद्दिष्ट एकच आहे- इंग्रज राज्यकर्त्यांचे वास्तव रूप हिंदी लोकांना दाखविणें !
 इंग्रज राज्यकर्त्यांचा विचार करतांना, ते ख्रिश्चनधर्मी आहेत, तेव्हा ते त्या धर्मातील तत्त्वांप्रमाणे कितपत वागतात, नीतीचीं जीं सर्वमान्य तत्त्वें आहेत त्यांचें ते पालन करतात की नाही, आणि राज्यकर्त्यांची जी अगदी प्राथमिक व्यवहारदृष्टि, ती तरी त्यांना आहे की नाही, असे प्रश्न विष्णुशास्त्री यांनी उपस्थित केले आहेत. यांची उत्तरें काय असतील तें निबंध न वाचतांच समजण्याजोगे आहे. या सर्व प्रबंधाची रचनाच शास्त्रीबुवांनी अशी केली आहे की, प्रत्येक विभागाच्या प्रारंभींच त्याचा भावार्थ स्पष्ट व्हावा. इंग्रज राज्यकर्त्यांचें विष्णुशास्त्री यांनी दाखविलेलें रूप पाहा.
येशूचे अनुयायी
 इंग्रज सत्ताधारी हे ख्रिश्चन आहेत. आमच्याच खजिन्यांतून दरसाल लाखो रुपये उठवून मिशनऱ्यांकरवीं ते गावोगावीं, रस्तोरस्तीं, सद्धर्माचा प्रकाश पाडीत आहेत. तेव्हा ते येशूमहाराजांचे परम भक्त आहेत हें कोणालाहि दिसणार आहे. आता ही ख्रिस्तभक्ति आणि गेल्या शंभर वर्षांतला कारभार यांत कितपत मेळ आहे हें कोणाला सांगायला नकोच. जो कोणी पवित्र शास्त्रांतील येशुचें चरित्र आणि क्लाइव्ह, हेस्टिंग्ज, टेंपल, डलहौसी या चतुष्टयाची चरित्रावलि वाचील त्यास वरील मंडळींची ख्रिस्तलोकीं काय संभावना होण्यासारखी आहे, हें समजण्यास फार आयास पडतील असें नाही. दया, क्षमा, सत्त्वभाव हीं ख्रिस्ती धर्माची तत्त्वें आहेत, असें शुभवर्तमानांत सांगितलें आहे. इंग्रजांचें वर्तन त्यांस अनुसरून आहे काय ? परमुलखावर जाऊन धाड घाला, ज्यांनी सालसपणें तुम्हांला आश्रय दिला त्यांच्यावर उलटून अरेरावी करा, खोट्या सह्या करा, दुसऱ्यांच्या बायका उपटा, दिवसाढवळ्या दरवडे घाला, वाटेल त्यास उचलून फाशी द्या, असा उपदेश शुभवर्तमानांत आढळत नाही ! तेव्हा लिटन, टेंपल (एक त्या वेळचे व्हाइसरॉय, एक गव्हर्नर) यांना ख्रिस्ताच्या शिष्यांत सामील करणें म्हणजे 'वेषधारी लांडग्या'स मेंढयांत सामील करणें किंवा डंकनरोडवासी अखंड सुवासिनींचे 'सीता- मंदोदरी- तारा' या वर्गांत परिगणन करण्यासारखेंच आहे.
भामटे
 या ठिकाणी सिडने स्मिथ याचें एक अवतरण शास्त्रीबुवांनी दिलें आहे. आपला युक्तिवाद मांडतांना विष्णुशास्त्री यांनी हें मुद्दामच धोरण ठेवलें होतें, असें दिसतें. भारताची प्राचीन परंपरा, त्याचें तत्त्वज्ञान, त्याची संस्कृत विद्या यांचें गुणगान करणाऱ्या पाश्चात्त्य पंडितांचे उतारे द्यावयाचे; आणि ख्रिश्चन धर्म, इंग्रजी राजनीति, यांचें रूप स्पष्ट करण्यासाठीहि पाश्चात्त्य व विशेषतः इंग्रज पंडितांचेच उतारे द्यावयाचे. यामुळे इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचे दात त्यांच्याच घशांत घातल्यासारखे होऊन येथल्या जनतेचे डोळे उघडणे सुलभ झालें. सिडने स्मिथ म्हणतो, "तुम्ही वन्य जमातींना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देऊ पाहत असाल तर प्रथम तुमचें बायबल जाळून टाकणें अवश्य आहे. कारण त्यावरून पाहतां तुम्ही ख्रिश्चन नसून भामटे आहांत, हें त्यांना कळून येईल." एडमंड बर्कहि एकदा म्हणाला होता की, "आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून इंग्रज पुढे आले की ख्रिश्चन धर्माला तिलांजलि देतात." इंग्रज ख्रिस्ती धर्माचें आचरण करतात तें असे !
प्रजाभक्षक
 नीतीच्या दृष्टीने तरी काय आहे ? राजा हा प्रजेचा रक्षणकर्ता असावा, त्याने तिला सुमार्गाला लावावें, देश समृद्ध करावा, हीं सामान्यपणें सर्व जगांत नीतितत्त्व आहेत. ही जबाबदारी न घेतां जो केवळ सुखोपभोगाची अपेक्षा करील. तो राजा प्रजारक्षक नसून प्रजाभक्षक होय. आम्हांस लिहिण्यास दिलगिरी वाटते की, प्रभुत्वाची खरी लक्षणें आमच्या राज्यकर्त्यांच्या ठायीं विरलतेनेच आढळतात. प्रारंभीचे राज्यकर्ते अल्पिष्टन, बेंटिक यांची नीति श्रेष्ठ होती. ती मंडळी कोणीकडे आणि खुद्द कलेक्टरास, दुष्काळांत लोक मरत आहेत, असा नुसता अहवाल दिल्याबद्दल ताबडतोब अर्धचंद्र देणारे व लक्षावधि प्रजा मरणाच्या दारी बसली असतां दिल्लीस दिवा लावणारे बीकन्सफील्डप्रमुख महापंचायतन कोणीकडे ! आमच्या राज्यकर्त्यांचें एकच सूत्र आहे. जेणेंकरून गोऱ्या लोकांच्या पोतड्या भरतील तो कायदा. त्यामुळे पूर्वीची तिस्मारखानी व पेंढारशाही पुरवली, पण इंग्रजी चरक फार भयंकर असें सर्वांस वाटू लागले आहे. के. सी. एस्. आय्. या किताबाचें विष्णुशास्त्री यांनी (क. स. ई.) असें मराठी रूप केलें आहे.
 व्यावहारिक राजनीतीच्या दृष्टीने पाहिलें तरी इंग्रज राज्यकर्ता नालायकच दिसतो. हिंदुस्थान ही सोन्याची अंडी घालणारी हंसी त्याला मिळाली खरी; पण तिच्या पोटांतलीं सर्व अंडी एकदम मिळवावीं अशी हाव त्याला सुटली असून, तो तिच्या गळ्यावर सुरी फिरवीत आहे. मागे पेंढाऱ्यांच्या राज्यांत लुटालुटीचें वादळ शांत झाल्यावर गावांतून पळून गेलेले लोक परत येऊन सुखाने कांही काळ तरी राहत असत; पण आमच्या टेंपलसाहेबांनी आपल्या हिंदी प्रजेला परलोकचे दरवाजे खुले करून दिले आहेत ! अशा रीतीने सर्व प्रजा उत्सन्न झाल्यावर सर्व जमीन जरी सरकारने घशांत घातली तरी त्याला काय किफायत आहे ! अशा धोरणाने होईल काय ? जें राष्ट्र इंग्लिश लोकांचे पाय येथे लागण्यापूर्वी लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, वीरश्री इत्यादिकांनी युक्त होतें तेथे सारी नासाडी करून साहाराचें वाळवंट करून सोडलें, ही परम देदीप्यमान कीर्ति आमच्या श्वेतद्वीपीय बंधूंच्या वांटास येऊन तिचा ध्वज यावच्चंद्र दिवाकरौ फडकत राहील.
ख्रिश्चन नीतितत्त्वें ?
 प्रत्यक्षांत आचरण असें पेंढाऱ्यांचें लुटारूंचें, दरोडेखोरांचें असतांना स्वतःच्या धर्मांतील नीतितत्त्वांचा अभिमान मात्र आमच्या राज्यकर्त्यांना मोठा जाज्वल्य आहे. तो इतका की, हीं उदात्त नीतितत्त्वें जगांत ख्रिश्चन धर्मानेच प्रथम सांगितलीं अशी शेखी ते मिरवितात. पण हें तरी खरें आहे काय ? इंग्रज पंडितच काय म्हणतात ते पाहा. सुप्रसिद्ध इतिहासकार बकल म्हणतो, "नव्या करारांत एकहि नीतितत्त्व असे नाही, की जे पूर्वीच्या धर्महीन (पेगन- अख्रिश्चन) लोकांनी सांगितलें नव्हतें. बायबलमधील अनेक सुंदर वचनें म्हणजे पूर्वीच्या पेगन ग्रंथ- लेखकांचीं अवतरणें आहेत. यांत ख्रिश्चन धर्माला दूषण नसून भूषणच आहे. भिन्न युगांतील मानवांचीं नीतितत्त्वेंच आपण सांगतों हा गौरवच आहे, पण पूर्वी अज्ञात असलेली नीतितत्त्वें ख्रिश्चन धर्म सांगतो, असें जर कोणी म्हणत असेल, तर तो एक तर अज्ञ आहे किंवा लुच्चा तरी आहे." बकलच्या या उताऱ्याच्या जोडीला विष्णुशास्त्री यांनी प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हाल्टेअर याचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, "अरे इतिहासपंडिता, तूं हें काय सांगत आहेस ? ख्रिश्चनच फक्त नीतिमान होते आणि पेगनांना नीति माहीतच नव्हती ? मग सॉक्रेटीस, चारोंडस, सिसेरो, एपिक्टेटस् आणि मार्कस् ऑर्लियस यांचें काय ?"
कृतघ्नता
 इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचें असें वस्त्रहरण केल्यानंतर विष्णुशास्त्री यांनी आपल्या काळच्या राजेरजवाड्यांचें, संस्थानिकांचें वर्णन केले आहे. त्यांचें सध्याचें दैन्य, लाचारी, हांजीखोर वृत्ति, नादानी, नालायकी यांचें त्यांनी वर्णन केलेंच आहे; पण त्याच्या आधी मराठ्यांच्या काळांत महादजी शिंदे, यशवंतराव होळकर हे राजे, सरदार कसे पराक्रमी होते आणि इंग्रजच त्यांच्यापुढे दर वेळी कसे नामोहरम होत असत, हे प्रथम सविस्तर सांगितलें आहे. कारण तोच त्यांचा प्रतिपाद्य विषय आहे. इंग्रज हा अजिंक्य नाही, दुर्जय नाही. त्याच्या ठायीं दैवी सामर्थ्य मुळीच नाही. त्याचा धर्म म्हणजे कांही अलौकिक आहे असें नाही. तो तुमच्या- आमच्या- सारखा सामान्य माणूस आहे. राग, लोभ, मोह, स्वार्थ, अनीति, असत्य यांना तो इतर माणसासारखाच बळी पडतो. हें शास्त्रीबुवांना नाना प्रकारे स्पष्ट करावयाचें होतें. त्यामुळे या निबंधांत आणि अन्यत्रहि हे इंग्रज पूर्वी रुमालाने हात बांधून शिवाजी, पेशवे, शिंदे, होळकर यांच्यापुढे उभे असत, याचा ते वारंवार निर्देश करतात; आणि या आपल्या पूर्वीच्या आश्रयदात्यांवरच आता ते कृतघ्नपणाने उलटले आहेत, हें पुन: पुन्हा नजरेस आणतात.
खराटा
 सामान्य जनांची स्थिति वर्णितांनाहि त्यांनी याच हेतूने रचना केली आहे. हिंदुस्थानांतील सामान्यजनांची स्थिति वर्णितांना त्यांनी इंग्लंडमधील सामान्य जन व हिंदी सामान्य जन यांची तुलना केली आहे; आणि आम्हांला लुटून, आमचा रक्तशोष करून पुष्ट झालेले ते लोक पाहा व आमचे मरण-पंथाला लागलेले, त्यांनी त्या पंथाला लावलेले लोक पाहा, असें ते सांगत आहेत. तेव्हा तात्पर्य काय की, या गोऱ्या बादशाहीची जिकडे जिकडे स्वारी फिरली तेथे तेथे तिजबरोबर खराटा फिरत चालला आहे. 'आमच्या देशाची स्थिति' ही अशी आहे.
पाश्चात्त्यांच्याच आधाराने
 'इंग्रजी भाषा' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी असाच पाश्चात्त्य पंडितांच्या आधारे, पाश्चात्त्यांचें सत्य स्वरूप उघड करण्याच्या प्रयत्न केला आहे. या निबंधाचा मूळ विषय तो नव्हे, पण विष्णुशास्त्री यांच्या लेखणीचा कायमचाच तो विषय आहे. ते कोणत्याहि विषयावर लिहीत असले तरी हिंदी लोकांचें स्वत्व जागृत करणें, त्यांची अस्मिता प्रबळ करणें, त्यांचा स्वाभिमान चेतविणें आणि त्याचबरोबर त्यांचा तेजोभंग करण्याचा अहर्निश प्रयत्न करणारे जे मिशनरी, राज्यकर्ते आणि पाश्चात्य पंडित त्यांचा मुखभंग करणें हेंच त्यांचें उद्दिष्ट असे. इंग्रजी भाषेच्या वृत्तान्तांत इंग्रज इतिहासकार सहजच येतात. तेव्हा ती संधि साधून त्यांनी त्यां पंडितांपैकी काहींनी आपल्याच बांधवांवर जी प्रखर टीका केली होती, तीच वरील तीन धूर्तांच्या तोंडावर फेकली नसती तरच नवल झालें असतें.
 पाश्चात्त्यांच्या मनांत इकडील लोकांविषयी ज्या वृत्ति वागत असतात त्यांचे दूषण तिकडीलच एका नामांकित ग्रंथकाराने किती तीव्रतेने केलें आहे पाहा- अशी प्रस्तावना करून त्यांनी ऑकले नांवाच्या इतिहासकाराचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, पूर्वेकडच्या देशांना ज्ञानकिरण परमेश्वर देतो तसे तो आपल्याला देत नाही. पण 'जगापेक्षा आपण जास्त शहाणे आहों' असा भ्रांत अहंभाव आपल्या ठायीं निर्मून त्याने त्या उणिवेची भरपाई केलेली आहे. ही भ्रांति मोठी सुखद असते; आणि ती नष्ट करून अशा लोकांचे डोळे उघडणें म्हणजे मोठें क्रूर कृत्यच आहे; पण केव्हा केव्हा त्यांना त्यांचें सत्य स्वरूप दाखवावें लागतें. पौर्वात्यांना रानटी, वन्य, समजून त्यांना तुच्छ लेखणें हा केवळ मूर्खपणा होय. क्वचित् एखादे वेळी आपल्याला चांगला शोध लागला की आपण मोठा आत्मगौरव करतों. पण पूर्वेकडे तीन हजार वर्षांपूर्वीच तो ज्ञात असतो. वास्तविक आपलें जें थोडें तुटपुंजें ज्ञान आहे तें सर्व आपण पूर्वेकडून घेतले आहे. प्रथम पूर्वेकडून तें ग्रीकांनी मिळविलें, नंतर रोमनांनी आणि त्यापुढील शतकांत हीं दोन्ही राष्ट्रे तमोयुगांत गेल्यावर आरबांनी तेंच ज्ञान युरोपला परत दिलें. तेव्हा आपण जास्त बुद्धिमान् आहों, जास्त उद्योगी आहों, असें मानणें हा कमालीचा उद्दामपणा आहे. अगदी उद्दाम असा गर्व आहे.
 अशा या गर्वाला प्रथम तसल्याच गर्वाने उत्तर देणें हें अवश्य होतें. गर्व या निबंधांत सविस्तर विवेचन करून विष्णुशास्त्री यांनी हा विचार फार चांगल्या रीतीने मांडला आहे. ते म्हणतात, आपली खरी योग्यता लोकांत कमी करण्याचा जो यत्न करील त्याशीं गर्वाची वागणूकहि समजदार मनुष्यास करावी लागते. तसें तो न करील तर आपल्या अंगच्या खऱ्या योग्यतेचाहि नाश व्हावयाचा. याचा उत्कृष्ट प्रत्यय सध्या आमच्या देशांतच येत आहे. असें म्हणून शास्त्रीबुवांनी इंग्रज मिशनरी, इंग्रज ग्रंथकार व इंग्रज शिक्षक यांनी आम्हांस मतिमंद, कर्तृत्वशून्य व अत्यंत नीच असे क्षुद्र प्राणी ठरविण्याचा जो प्रयत्न चालविला होता त्याचें वर्णन केलें आहे.
विसाव्या शतकांतहि
 फेब्रुवारी १९६८ च्या ' रीडर्स डायजेस्ट'मध्ये अमेरिकेतील 'टाइम'मधील एक लेख संक्षिप्त करून दिला आहे. तो लेखक म्हणतो, "भ्रष्टाचार, लाचलुचपत, अप्रामाणिकपणा, ही पौर्वात्य देशांची परंपराच आहे. करप्शन हा शब्द फक्त पाश्चात्त्य आहे; पण त्याचा आशय सगळा पूर्वेतच आहे. आता सिसिलींतील 'माफिया' आणि फ्रान्समधील वसुली अधिकारी, असली उदाहरणें पश्चिमेंत आहेत; पण ते अपवाद होत. पूर्वेकडे तो नियम आहे. त्यांची परंपराच ती आहे. ख्रिश्चन धर्मात ज्याप्रमाणे भ्रष्टाचार, पाप यांचा अधिक्षेप, निषेध केलेला आढळतो त्याप्रमाणे एकाहि पौर्वात्य धर्मांत आढळत नाही."
 आज अमेरिका, फ्रान्स, इटली येथील भ्रष्टाचाराचीं, स्वैराचाराची, गुन्हेगारीची, मादक व्यसनांची, अनाचाराचीं जीं वर्णनें 'रीडर्स डायजेस्ट 'मध्येच येतात आणि जी तिकडील लेखकांनीच केलेलीं असतात, तीं वाचलीं की अंगावर काटा उभा राहतो आणि मानवाच्या एकंदर संस्कृतीविषयीच चिंता वाटू लागते. असें असतांना अमेरिकेतलाच एक लेखक पौर्वात्य देश नियमाने अनाचारी असून पश्चिमेत तो अपवाद आहे, असें सांगण्याचें धाडस करतो, आणि पौर्वात्य धर्म-ग्रंथांचा गेलीं शंभर वर्षे पश्चिमेत सतत अभ्यास चालू असतांना त्या धर्मांत अनाचाराचा निषेधच केलेला नाही, असें लिहितो तेव्हा, अज्ञान भ्रांती मनुष्याला किती किळसवाणा मद चढविते, तें दिसून येतें. ही आजची, विसाव्या शतकाच्या आठव्या दशकांतली स्थिति; मग शंभर वर्षांपूर्वी शस्त्रबलाने रणांत पाश्चात्त्यांनी बहुतेक सर्व पूर्व- देश जिंकले असतांना ते किती मदोन्मत्त झाले असतील याची सहज कल्पना येईल. त्यांच्या त्या उन्मत्ततेचा, पाश्चात्त्य पंडितांच्या ग्रंथांच्याच आधारेच रेच उतरविणें अत्यंत अवश्य आहे असें विष्णुशास्त्री यांनी जाणलें यांतच त्यांची दृष्टि कशी काल भेदी होती याचें प्रमाण मिळतें.
इंग्रज माणूसच
 हा सर्व उद्योग विष्णुशास्त्री यांनी केला यांत त्यांचा हेतु हा होता की, "मनुष्यमात्रांत जे दोष सापडतात त्यांपासून युरोपीय लोक झाले म्हणून ते तरी तिळमात्रहि मुक्त झाले आहेत असें नाही," हें हिंदी जनतेच्या ध्यानांत आणून द्यावें. आणि इंग्रजांनी आपल्याभोवती नखशिखान्त जें गूढ दैवी तेजाचें वलय निर्माण केलें होतें तें भेदून टाकून त्या झगझगाटाने हिंदी लोकांच्या दृष्टीला आलेला दीप नाहीसा करावा. तसें केल्यावांचून त्यांच्या चित्ताला आत्मप्रत्यय आला नसता; आणि आक्रमक ब्रिटिश सत्तेशी झुंज देण्याचें मनोधैर्य त्यांना लाभलें नसतें.
 मात्र असे करतांना पौर्वात्य जनांच्या खऱ्या गुणांविषयी जी अज्ञानभ्रांति पाश्चात्य मनावर होती तशीच त्यांच्या गुणांविषयी हिंदी जनांच्या मनावर येऊ नये, याविषयी विष्णुशास्त्री दक्ष होते. ज्या शत्रूशी आपल्याला मुकाबला करावयाचा आहे त्याच्या गुणसंपदेविषयी आपल्या ठायीं अज्ञान असूं नये, तसें असण्यांत धोका आहे, हा विवेक शास्त्रीबुवांनी केव्हाच सोडला नव्हता. याविषयी ते फार सावध होते. म्हणूनच त्यांनी साक्षेपाने पाश्चात्त्यांचे व विशेषतः इंग्रज राज्यकर्त्यांचे गुणहि अभ्यासले आणि स्वकीयांना त्याचें उत्तम दर्शन घडविलें.
गुरु कोणत्या अर्थाने ?
 लोकहितवादी, रानडे इंग्रजांना आपले गुरु मानीत. विष्णुशास्त्रीहि त्यांना गुरु मानीत. पण या दोन मानण्यांमध्ये जमीन-अस्मानाचें अंतर होते. इंग्रज हिंदी जनांचें हित चिंतितात, कल्याण करतात, अशी लोकहितवादींची, रानड्यांची श्रद्धा होती. तर विद्येच्या, ज्ञानाच्या दृष्टीने त्यांना गुरु मानावें, पण ती विद्या हस्तगत करून शेवटीं त्यांच्यावर मात करावयाची आहे, हें विसरू नये असें विष्णुशास्त्री सांगत. 'संस्कृत कविता' या लेखांत "इंग्रजी शिक्षणाने आमच्या बुद्धीस जी तीव्रता आली आहे ती आमच्या गुरूंच्याच गर्व-खंडनास अगोदर कारण होईल," असें त्यांनी म्हटले आहे.




-६-

इंग्रजी विद्येचें वज्र


आत्मनिरीक्षण
 इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज पंडित, पाश्चात्त्य मिशनरी, यांच्यावर विष्णुशास्त्री यांनी अत्यंत प्रखर व जहरी टीका केलेली असल्यामुळे हे राज्यकर्ते, त्यांची विद्या, त्यांची संस्कृति, यांत त्यांना कसलाहि ग्राह्यांश दिसत नाही, त्या संस्कृतींत भारताला हितकर व म्हणूनच अनुकरणीय असें त्यांना कांहीच आढळत नाही, असा एक गैरसमज त्यांच्याबद्दल झालेला आढळतो. त्यांत आणखी "आमच्या देशाला कांहीहि झालेलें नाही, त्याची नाडी अगदी साफ आहे, त्याला आलेली विपन्नावस्था चक्रनेमिक्रमाने आलेली आहे" असें दोन-तीन ठिकाणी त्यांनी लिहून ठेविलें असल्यामुळे हा गैरसमज जास्त बळावलेला आहे; पण हा समज अगदी निराधार आहे. 'आमच्या देशाला काहीहि झालेले नाही' ह्या त्यांच्या विधानाचा आपल्याला पुढे विचार करावयाचा आहे. या त्यांच्या विधानाचा अर्थ, भारताच्या प्राचीन इतिहासांत, परंपरेंत, आक्षेपार्ह, दूषणास्पद असें त्यांना कांहीच दिसत नाही, असा होतो. यामुळे विष्णुशास्त्री प्राचीन भारतीय संस्कृतीचे अंध अभिमानी आहेत, अंतर्मुख होऊन ते आत्मपरीक्षण करूं शकत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप येतो. हा आरोप सर्वस्वीं खरा नाही. अंतर्मुख होऊन अनेक वेळा ते कठोरपणें आत्मपरीक्षण करतात, असें दिसतें. तरीहि त्या आक्षेपांत बरेंच तथ्य आहे, हें नाकारता येणार नाही. इंग्रज पंडित, मिशनरी व राज्यकर्ते यांनी या देशाची अस्मिताच नष्ट करण्याचा जो डाव रचलेला त्यांना दिसत होता त्यामुळे त्यांचा भयंकर संताप होत असे; आणि स्वकीयांचा तेजोभंग होऊ द्यावयाचा नाही अशी प्रतिज्ञा करून ते लेखणी उचलीत असत. अशा वेळी अनेक ठिकाणी मिशनरी एका टोकाला ले, तर ते दुसऱ्या टोकाला जात. त्यामुळे त्यांचें आत्मनिरीक्षणाचें सामर्थ्य लुप्त होत असे. पण असे असले तरी पाश्चात्त्य संस्कृति, पाश्चात्त्य विद्या यांच्या बाबतीत मात्र त्यांनी आपला विवेक केव्हाही ढळू दिलेला नाही; आणि ज्या गुणांमुळे व संस्थांमुळे इंग्रज व युरोपीय लोक वैभवास चढले ते गुण व त्या संस्था यांचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. त्यांचे अनुकरण केल्यानेच आपली प्रगति शक्य होईल हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. तेव्हा या त्यांच्या मतांचा प्रथम परिचय करून घेऊ; आणि नंतर त्यांच्या आत्मनिरीक्षणशक्तीचा परामर्श घेऊ.
इंग्रजांचे ऋण
 लोकसत्ताक राज्यपद्धति ही पाश्चात्त्य संस्कृतीकडून भारताला मिळालेली सर्वांत मोठी देणगी होय. विष्णुशास्त्री यांना हें पूर्णपणे मान्य असून, विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, लोकमतांविरुद्ध आपले मत निर्भयपणे मांडण्याचा प्रत्येक व्यक्तीचा हक्क, दुसऱ्याच्या मतांचा आपल्याइतकाच आदर करण्याची पद्धत हीं जीं लोकशाहीची मूलभूत तत्त्वें त्यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती; आणि अशा तऱ्हेचें मानसिक स्वातंत्र्य इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदी प्रजेला दिले याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणीं कृतज्ञता व्यक्त केली आहे. 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा निबंधमालेतला पहिला निबंध. त्यांतच ते म्हणतात, "वरच्या लिहिण्याने हल्लीच्या राज्यांचा आम्ही द्वेष करतों किंवा त्यांनी आपल्या देशावर जे अपरिमित उपकार केले आहेत किंवा अजूनहि करीत आहेत ते आम्ही जाणीत नाही, असें नाही. आम्हांस तर वाटतें की, असे विचार करण्याची आमच्या अंगीं शक्ति आणून, त्यांचा उल्लेख उघडपणें करण्याची जी मोकळीक आमचें सरकार आम्हांस देत आहे, त्यापरतें औदार्य कोणतेंहि नाही. ते मनांत येऊन वरच्यासारखे लेख लिहितांना कृतघ्नत्वशंकेने लेखणी वरचेवर अडखळते." 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या निबंधांत हीच कृतज्ञता त्यांनी प्रारंभी व्यक्त केली आहे. "त्याप्रमाणेच मानसिक स्वातंत्र्य हाहि या काळांत झालेला एक मोठाच लाभ आहे. मानसिक स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची व ते विचार वाग्द्वारा किंवा लेखनद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक. हल्लीच्या राज्यांत आम्हांस जितकें स्वातंत्र्य आहे तितकें यापूर्वी स्वदेशीय राजांच्या उत्कृष्ट कारकीर्दीतहि कधी नव्हतें." असे धन्यवाद त्यांनी इंग्रज राज्यकर्त्यांना दिले आहेत.
 कायद्याने इंग्रज सरकारने विचारस्वातंत्र्य दिले असले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत दंडेलीने असें स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे प्रकार त्या वेळीं अनेक घडत. त्यांवर टीका करतांना शारीरस्वातंत्र्य म्हणजे हवें तें करण्याची मोकळीक व मनाचें स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची मोकळीक हे दोन्ही मनुष्याचे जन्मसिद्ध हक्क आहेत, असा सिद्धान्त 'गर्व' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी मांडला आहे.
विचारकलह
 प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिलें की कोणताहि विषय असला तरी त्यावर भिन्न मतें होणारच आणि त्यांतून विचारकलह निर्माण होणारच. या विचारकलहाविषयी पुढे आगरकरांनी जीं मतें मांडलीं तींच विष्णुशास्त्री यांनी निबंधमालेंत मांडली आहेत; आणि तीं मांडतांना "या जगांत पूर्णावस्थेस पावलेलें असें कांहीच नाही" हा लोकशाहीने गृहीत धरलेला सिद्धान्त स्पष्टपणे मांडला आहे. जे लोक आपले धर्म-ग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत, अपौरुषेय आहेत, असें मानतात ते हा सिद्धान्त मान्य करीत नाहीत. कारण ते धर्म-ग्रंथ व ते धर्माचार्य प्रमादरहित असतात अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. अशी श्रद्धा वरील सिद्धान्त कधीच मान्य करणार नाही. विष्णुशास्त्री यांनी तो आवर्जून मांडला आहे. यावरून अंध धर्मश्रद्धेपासून त्यांचें मन मुक्त होतें हेंच दिसून येतें.
निकोप दृष्टि
 'जगांत पूर्ण असें कांहीच नाही' हाच भावार्थ 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. ते म्हणतात, "सत्य हें एकाच राष्ट्राला, एकाच धर्माला, किंवा एकाच पक्षाला अनुसरून असतें असें नाही, तर अशोधित धातूंत जसे सुवर्णरज यदृच्छेने मिसळलेले असतात त्याप्रमाणेच सत्याचीहि गोष्ट होय. त्याचे अंश ज्यांत मिश्रित झाले नाहीत असा प्रायः कोणताहि पक्ष नाही. यास्तव एकाच पक्षाचा दृढ अभिमान धरणें हा दुरभिमान होय."
 सत्याविषयी हीच निकोप दृष्टि लोकशाहीला अवश्य असते. विष्णुशास्त्री यांनी हें चांगलें जाणलें असल्यामुळे अगदी प्रारंभापासून "आमच्या विरोधकांनाहि आमच्यावर वाटेल ती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे त्यांनी पुनः पुन्हा सांगितल्याचे आढळते. निबंधमालेच्या उद्देशाविषयी स्पष्टीकरण करतांना त्यांनी लिहिलें आहे की, "एखाद्या गोष्टीविषयी आम्ही जे अभिप्राय लिहू ते केवळ सत्य-निरूपणाच्याच उद्देशाने लिहूं, अशी आमची खात्री आहे व आम्ही दुसऱ्यास वाजवी रीतीने नांवें ठेवण्यास ज्याप्रमाणे मागेपुढे पाहणार नाही त्याचप्रमाणे दुसऱ्यांनी आमच्या लेखांविरुद्ध मतें प्रदर्शित केल्यास त्यांत आम्हांस अगदी वाईट वाटणार नाही. अशा रीतीने प्रदर्शित केलेलें मत कदाचित् खोटें ठरेल, पण तरीहि तो मनुष्य प्रशस्तच होय; कारण तसे न केल्यास सत्याचा निवाडा होणार नाही. मिल्टन कवीने म्हटलें आहे की, "चुकलेल्या मतांतूनच खरें मत पुढे निघतें" यास्तव आम्ही पुन्हा एकदा सर्वांस सांगतों की, "आमच्या विरुद्ध जर कोणाचे अभिप्राय असतील तर ते आम्ही मोठ्या प्रेमाने वाचूं व ते लिहिणाराचे आभार मानून आम्हांस सुचेल तें प्रत्त्युत्तरहि देऊ."
लोकमताविरुद्ध
 विचारस्वातंत्र्याचें तत्त्व मान्य केल्यावर तें स्वातंत्र्य आपल्याइतकेंच दुसऱ्यालाहि असले पाहिजे, हें मान्य करणें, नव्हे त्याचा आग्रह धरणें हें जसें ओघानेच येतें त्याचप्रमाणे एकंदर लोकमत कितीहि विरुद्ध असले तरी, त्याची तमा न बाळगतां, आपल्याला जें सत्य वाटेल तें प्रत्येकाने निर्भयपणे सांगितलें पाहिजे, हा उपसिद्धान्तहि अपरिहार्य होतो. आगरकरांनी हा विचार फार जोरदारपणे मांडला आहे. ते म्हणतात, "जो तो लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल, तर कोणत्याहि समाजाला उन्नतावस्था येणार नाही. इतकेंच नव्हे, तर त्यास उतरती कळा लागून अखेर त्याचा ऱ्हास होईल." शास्त्रीबुवांची लोकमताविषयी हीच वृत्ति होती. मालेच्या पहिल्या वर्षाच्या समारोपाच्या अंकांत त्यांनी म्हटले आहे की, "आमच्या बुद्धीने जें जें आम्हांस खरें भासलें व ज्याच्या सत्यत्वाविषयी आम्हांस स्वतः संशय उरला नाही तें तें, कितीहि लोकमताविरुद्ध असले तरी, आम्ही प्रमाणांसहित सादर केलें आणि पुढेहि निष्पक्षपातीपणाने जो मजकूर आम्हांस खरा वाटेल तो आम्ही अवश्य लिहिणार; मग तो कोणास आवडो, कोणास न आवडो. 'खऱ्यास मरण नाही' ही आमच्या भाषेतील उत्कृष्ट म्हण आम्हांस सर्वथैव मान्य होय !"
इंग्रजांचा इतिहास
 मुद्रणस्वातंत्र्य हा विचारस्वातंत्र्याचाच एक प्रकार होय; आणि लोकशाहीला प्राणभूत असणारें जें वृत्तपत्र त्याचें अस्तित्व सर्वथा या मुद्रणस्वातंत्र्यावरच अवलंबून असतें. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याइतकाच, विष्णुशास्त्री यांनी मुद्रणस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे; आणि या बाबतींत देशी वृत्तपत्रांनी, युरोपीय वृत्तपत्रांचे आदर्श पुढे ठेवून, सरकारच्या कृत्यांवर पहारा ठेवण्याचें कार्यं निर्भयपणें केलें पाहिजे, असा त्यांना उपदेश केला आहे. या विषयासंबंधीचे लेख केसरीच्या अंकांत आलेले आहेत. (जानेवारी, फेब्रुवारी १८८२) मुद्रणस्वातंत्र्याचें महत्त्व सांगतांना विष्णुशास्त्री म्हणतात, "राजकीय प्रकरणीं जो स्वातंत्र्याचा झेंडा साऱ्या पाश्चात्य राष्ट्रांतून आजला उभारलेला आढळतो तो कसा उभारला गेला ही हकीगत समजण्याची ज्यास इच्छा असेल व जयप्राप्ति तरी केवढ्या दारुण व दीर्घकालिक युद्धप्रसंगानंतर झालेली आहे हें ज्यास पुरतेपणीं ध्यानांत आणावयाचें असेल, त्याने युरोपीय राष्ट्रांचा व विशेषतः आमच्या राज्यकर्त्यांचा इतिहास साग्र ऐकून घेणें जरूर आहे. कां की, वरील स्वातंत्र्याबद्दल युरोपांत जशा खटपटी व झटापटी झाल्या तशा इकडे झाल्या नाहीत."
प्रजासत्ताक
 आगरकरांनी विष्णुशास्त्री यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखांत म्हटलें आहे की, "एखाद्या वेळी त्यांचा कल्पनाविहंग पूर्ण पंख उभारून भराऱ्या मारूं लागला म्हणजे त्याला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखाली सुखाने नांदत आहे असें दिसे." विष्णुशास्त्री यांनी भाषण मुद्रणस्वातंत्र्याविषयी, वृत्तपत्रांच्या व ग्रंथकारांच्या स्वातंत्र्याविषयी लिहितांना पाश्चात्त्य देशांत यासंबंधी जो संग्राम झाला त्याचें व विशेषतः व्हॉल्टेअरच्या निर्भय लेखनाचें जें अत्यंत आत्मीयतेने वर्णन केलें आहे त्यावरून आगरकरांचे ते उद्गार यथार्थ आहेत असें वाटतें आणि ध्यानांत येतें की, इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचा जरी ते कडवा द्वेष करीत असले तरी पाश्चात्त्य संस्कृतीचा ते तिळमात्र द्वेष करीत नसत. उलट तेथील व्हॉल्टेअर, गिबन, बकल यांसारखे जे थोर ग्रंथकार त्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यांच्यासारखेंच कार्य येथे भारतांत आपण करावयाचें, अशी प्रतिज्ञा करूनच त्यांनी लेखणी उचलली होती.
पाश्चात्त्य विद्या
 पण यापेक्षाहि विष्णुशास्त्री यांचें पाश्चात्त्य संस्कृतीवरचें खरें प्रेम दिसून येतें तें त्यांची लेखणी जेव्हा पाश्चात्य विद्या, पाश्चात्त्य ज्ञान यांचा गौरव करते तेव्हा. भारताचा खरा उद्धार हा पाश्चात्त्य विद्येमुळे, पाश्यात्त्य ज्ञानामुळे होणार आहे याविषयी त्यांच्या मनाची दृढ निश्चिति झाली होती. त्यामुळे निबंधमाला वाचतांना त्यांनी या ज्ञानाचा जणू ध्यास घेतला होता असें पदोपदीं वाटू लागतें.
 शास्त्रीबुवांनी निबंधमाला हें मासिक-पुस्तक काढलें त्याचा हेतु काय ? "ज्या लोकांस विद्यालयांतील. शिक्षणाचा वगैरे लाभ न घडल्याने ज्ञानाचा मार्ग खुला नाही त्यांस अनेक गोष्टींचें ज्ञान व्हावें, हा एक हे निबंध लिहिण्याचा उद्देश आहे. संस्कृत व विशेषतः इंग्रजी भाषेत जें अगाध ज्ञान भरलें आहे त्याचा पाट फोडून जर आपल्या भाषेकडे वळवितां येईल तर केवढी मजा होईल !" 'प्रस्तुत मालेचा उद्देश' या दुसऱ्या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी आपला हा उद्देश लोकांस कळविला आहे; आणि याच निबंधांत एकंदर मासिक- पुस्तकांचे महत्त्व वर्णितांना त्यांनी इंग्रज लोकांच्या विद्याभिलाषाचें फार कौतुक केलें आहे. "इंग्रजांनी आमची लक्ष्मी जशी लुटून नेली तशी संस्कृत भाषेचा त्यांना शोध लागतांच त्या लक्ष्मीहून अमूल्य अशी विद्याहि लुटून नेली. आणि यापुढे तिचें महापीठ तिकडेच स्थापन होणार, असा अदमास दिसतो." "मराठी भाषेविषयीहि त्यांनी असाच अचाट उद्योग केला आहे. तो म्हणजे मोल्सवर्थ व कँडी यांनी रचलेला कोश हा होय. हा कोश रचून त्यांनी महाराष्ट्र-भाषेवर जे उपकार करून ठेविले आहेत त्यास पार नाही." 'वक्तृत्व' या निबंधांतहि त्यांनी हेच उद्गार काढले आहेत. "इंग्रज सरकारचा या देशावर सर्वांत मोठा उपकार हाच होय की, ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने एतद्देशियांस दिली व अद्याप देत आहे. चाळीस वर्षांपूर्वी मेकॉलेने जी नवी पद्धति सुरू केली तिच्यामुळे ही नवी (पाश्चात्त्य) विद्या प्रसार पावून त्यामुळे देशाची स्थिति आजला एकंदर बदलून गेली आहे, असें म्हटलें असतां चालेल."
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत आरंभी आणि शेवटी मिळून विष्णुशास्त्री यांनी पाश्चात्त्य विद्येचें व ज्ञानाचें स्तोत्रच रचलें आहे असें दिसेल. ते म्हणतात-
इंग्रजी विद्येचें वज्र
 इंग्रजी राज्यापासून आपला मोठा लाभ कोणता झाला ? "मानसिक उन्नति. मानसिक उन्नति म्हणजे देशाभिमान, जात्यभिमान, स्वाभिमान, अनुचित कर्मापासून निवृत्ति, स्वातंत्र्याभिलाषा, दैन्यवर्जन इत्यादिकांविषयी ज्या मानसिक स्थितीपासून स्फूर्ति येते ती." हा लाभ इंग्रेजी राज्यापासून कसा होणार? "या राज्यांमुळे पाश्चात्यांची अपूर्व विद्या आपल्या पायांनी चालत आली आहे. आणि विद्येचा संस्कार सामान्यतः वरील उन्नतीस कारणीभूत होतोच. त्यांतून ग्रीक, रोमन, इंग्लिश या विद्यांचा तर वरील प्रभाव स्पष्टच आहे." या प्रकारे त्या विद्येचा गौरव करून युरोप खंडांत ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपीय लोकांनी केवढी धार्मिक व राजकीय क्रांति केली त्याचें वर्णन मोठ्या तन्मयतेने विष्णुशास्त्री यांनी केलें आहे. आणि शेवटी तीच क्रांति त्याच शस्त्राने येथे आपण केली पाहिजे हें निःसंदिग्धपणें सांगितलें आहे. ते म्हणतात, "एकंदरीत हें सांगावयाचें की, सज्ञान दशेचें फळ देशोन्नति हे होय. यास्तव आमच्या देशांत जों जो इंग्रेजी विद्येचा प्रसार होत जाईल तों तो सुधारणा, स्वातंत्र्य, सुख यांचा प्रसार अवश्य होत जाणार. एक इंग्रजी विद्येचें वज्र आमच्या हातांत असलें, म्हणजे मग लिटनशाही, टेंपलशाही, चाटफील्डशाही, मूरशाही वगैरे शंभर शाह्यांस सुद्धा आम्ही दाद देणार नाही."
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधाच्या अखेरीस पुन्हा असाच ज्ञानाच्या प्रसाराचा महिमा त्यांनी गायिला आहे. हिंदुस्थानचें नष्टचर्य संपविण्यास उत्तम उपाय, त्यांच्या मतें, एकच. लोकांना आत्मस्थितीचें पूर्ण ज्ञान करून देणें. आणि याचें स्पष्टीकरण देतांना आत्मस्थितीचें ज्ञान म्हणजे साऱ्या जगाच्या स्थितीचें ज्ञान, असा खुलासा केला आहे; आणि छापखाने, तारायंत्रें, आगगाड्या या दिव्य अस्त्रांच्या साहाय्याने, कुंभकर्णाप्रमाणे सुस्त होऊन पडलेल्या या देशाला हालहालवून जागे करण्याची तजवीज केली पाहिजे, असें सांगून रसना आणि लेखणी या दोन साधनांचा अवलंब करून हें कार्य साधावें, असा देशबांधवांना त्यांनी उपदेश केला आहे. पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्त्य ज्ञान यांचा प्रसार हाच देशोन्नतीचा सर्वश्रेष्ठ उपाय होय, असा विष्णुशास्त्री यांचा अभंग विश्वास असल्यामुळेच, ग्रंथकार होणें, नाना विषयांवर ग्रंथ लिहिणें हें त्यांनी आपले ध्येय ठरविलें होतें; आणि निबंधमालेतून व 'केसरी'तून नव्या विद्वानांपुढे तुम्ही ग्रंथ लिहा, ग्रंथ लिहा, असा सारखा घोष चालविला होता.
ग्रंथ लिहा
 अगदी पहिल्याच निबंधांत मराठी भाषेची उपेक्षा केल्याबद्दल नव्या विद्वानांवर टीका करतांना शास्त्रीबुवा म्हणतात, सध्या इंग्रजी विद्येचा व भाषेचा जो फैलावा लोकांत होत आहे तो आम्हांस अनिष्ट तर वाटत नाहीच, उलट आपल्या मराठीच्या उत्कर्षालाच तो कारण होईल अशी आमची खात्री आहे; पण तसें व्हावयाचें तर इंग्रजींतील केवळ अर्थ मात्र घेऊन त्यास शुद्ध मराठीच्या साच्यांत ओतलें पाहिजे. मात्र इंग्रेजींतील ज्ञानभांडार मराठींत आणतांना आपल्या भाषेचें स्वत्व म्हणजे निराळेंपण कायम राखलें पाहिजे. अशा तऱ्हेचे ग्रंथ बनले असतांना ते भाषेस हितावह होऊन भूषणप्रद होतील." 'प्रस्तुत मालेचा उद्देश' या दुसऱ्या निबंधांतहि ज्ञानाचा प्रसार, पाश्चात्त्य विद्येचा फैलावा आणि त्यासाठी मासिकपुस्तकें व ग्रंथ यांची आवश्यकता यासंबंधीच चर्चा आहे; आणि "मराठींत ग्रंथ लिहून आपल्या इंग्रेजी विद्वत्तेस बट्टा आणणें हें तर त्यांस अगदी आवडत नाही" अशी नव्या विद्वानांवर टीका केली आहे. 'इंग्रेजी भाषा' या निबंधांत, इंग्रजी ग्रंथांचें माहात्म्य सांगून, नाना प्रकारच्या विषयांवर हजारो ग्रंथ होऊन ते तिकडे सर्वांस समजूं लागल्याने एकंदर राष्ट्राचे ठायीं अभिज्ञता व ज्ञानाविषयी उत्कंठा अधिकच प्रबळ झाली, असा अभिप्राय मांडला आहे; व प्रसिद्ध इंग्रज लेखक मेकॉले याच्या ग्रंथकर्तृत्वाचा गौरव करून त्याच्या गुणदोषांची चिकित्सा केली आहे. डॉक्टर जॉनसन याच्या चरित्राचा समारोप करतांना, त्याच्या चरित्रावरून एतद्देशियांनी कोणता बोध घ्यावा हें सांगतांना, विष्णुशास्त्री यांनी मराठींत विविध विषयांवर ग्रंथरचना करावी, हाच उपदेश केला आहे; आणि या उद्योगापासून सध्याच्या काळीं धनलाभ होण्याचा संभव नसला तरी केवळ देशहितबुद्धीने हा उद्योग त्यांनी केला पाहिजे, असा आग्रह धरला आहे.
ग्रंथमाला
 यावरून पाश्चात्त्य संस्कृतींतील मूलभूत तत्त्वांच्या बाबतींत तरी विष्णुशास्त्री दुराग्रही वा अंध नव्हते हें निश्चित म्हणतां येतें. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, विचार-स्वातंत्र्य, आणि या सर्वाला पायाभूत असणारें ज्ञान, भौतिकविद्या, त्या विषयावरील ग्रंथरचना या पाश्चात्त्य संस्कृतीच्या महत्त्वाच्या घटकांचा आपण स्वीकार केला पाहिजे, असें त्यांनी आग्रहाने सांगितलें आहे. त्या संस्कृतीचे त्यांच्यापुढे उभे असलेले प्रवक्ते म्हणजे जे इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज पंडित व मिशनरी यांच्याबद्दल त्यांना वाटणारा द्वेष त्यांनी विवेकी रसग्रहणाच्या आड येऊ दिला नाही. निबंधमाला बंद करण्याचे त्यांनी ठरविलें त्या वेळीं ग्रंथमाला सुरू करण्याचा त्यांचा संकल्प होता. या ग्रंथांत त्यांनी ग्रीस, रोम, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड यांच्या इतिहासाचेंच विवेचन केलें असतें असें वाटतें. कारण ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपांत जें महान् परिवर्तन घडून आलें तें त्यांच्या डोळ्यासमोर नित्य असे, असें निबंधमालेवरून वाटतें. तें कसेंहि असो. पाश्चात्त्य संस्कृतीबरोबर जीं मूल्ये भारतांत आलीं त्यांचें त्यांनी मुक्त मनाने स्वागत केलें होतें यांत शंका नाही.
 हे निश्चित केल्यानंतर आता प्राचीन भारतीय संस्कृति, येथला धर्म, येथली समाजरचना, येथल्या जुन्या परंपरा यांविषयी विष्णुशास्त्री यांचा दृष्टिकोन काय होता तें पाहावयाचें आहे.




-७-

मनावरचे दोन ताण


लोकनिर्मिति
 ज्यांना आपल्या देशांत लोकसत्ता प्रस्थापित करावयाची आहे त्यांनी प्रथम देशांत लोक निर्माण करणें अवश्य असतें. लोक याचा अर्थ नागरिक असा आहे. जुन्या काळचे प्रजाजन आणि लोकसत्ताकांतले नागरिक यांत फार फरक आहे. प्रजाजनांना व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य यांपैकी कोणतेंच स्वातंत्र्य नसतें. राजा त्यांना जाबबदार नसतो. त्याच्यावर प्रजाजनांचे कसलेंहि नियंत्रण नसते. सर्वस्वी अनियंत्रित असा त्याचा कारभार असतो. कायद्याचेंहि नियंत्रण त्याच्यावर नसतें; आणि लोकांनी केलेल्या कायद्यांचें राज्य हे तर लोकशाहीचें प्रधान लक्षण होय. राजांची अनियंत्रित सत्ता ज्यांच्यावर चालते व राजसत्तेची अनेक बंधनें ज्यांच्यावर असतात त्यांना नागरिक म्हणतां येणार नाही. शिवाय असें की, अनियंत्रित राजसस्ता जेथे असते तेथे बहुधा अनियंत्रित अशी धर्मसत्ताहि असते; आणि यामुळे अशा समाजांत फार विषमता असते; आणि ही विषमता बहुधा जन्मनिष्ठ असते. सरदार, जहागीरदार, इनामदार, खोत हे आपल्याला उच्च कुळांतले मानतात व सामान्य जनांना हीन लेखतात. असली उच्च-नीचता जेथे असते तेथे लोकसत्तेला अवश्य ते लोक म्हणजे नागरिक निर्माण होऊ शकत नाहीत. विचारस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, मानवत्वाची प्रतिष्ठा हें नागरिकाचें प्रधान लक्षण होय. त्यावांचून तो राजसत्तेवर नियंत्रण ठेवूं शकत नाही. कायद्याने सर्वांना समान हक्क असल्यावांचून नागरिक अन्यायाचा प्रतिकार करूं शकणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, कायद्याचें राज्य हीं तत्त्वें समाजांत सुप्रतिष्ठित असल्यावांचून नागरिक निर्भय होऊं शकत नाही. यामुळेच पाश्चात्त्य देशांत लोकशाहीचा लढा जेथे जेथे झाला तेथे तो प्रथम या तत्त्वांच्या प्रतिष्ठापनेसाठी झाला.

सर्वांगीण क्रांति
 भारतात ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी अनेक शतकें सर्वत्र राजसत्ताच होती तिच्या खालच्या पायरीवर सरदार- जहागीरदार, इनामदार, खोत, सरंजामदार यांची सत्ता असे. शिवाय धर्मपीठांची व जात पंचायतींची अत्यंत अनियंत्रित आणि बेजबाबदार अशी सत्ताहि सर्वत्र होती. या सत्तांमुळे व त्यांनी घातलेल्या आचार-विचारांवरील असंख्य बंधनांमुळे येथल्या सामान्य जनांना कसलीहि प्रतिष्ठा नव्हती. त्यांचें मानवत्वच शून्य झालें होतें. ज्यांचा स्पर्शहि इतरांना चालत नाही त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा ती कसली असणार ? असा मनुष्य निर्भय कसा होणार ? तो अन्यायाचा प्रतिकार कसा करणार ? राजसत्तेवर नियंत्रण कसें घालणार ? म्हणजेच त्याला नागरिक ही पदवी कशी प्राप्त होणार ? ही पदवी त्याला प्राप्त व्हावयाची तर धार्मिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारची क्रांति भारतांत होणें अवश्य होतें. त्यावांचून येथे लोक निर्माण होणें अशक्य होतें.
 भारतांत लोकसत्ता यावी अशी आकांक्षा असलेले विष्णुशास्त्री यांची या बाबतींत काय मतें होतीं ? कोणता दृष्टिकोन होता ?
भूमिका
 'वक्तृत्व-पत्रास उत्तर' या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, "विद्यमान धर्म अत्यंत दुष्ट असून त्यास अनुसरल्याने आपल्या देशबांधवांचे फार अकल्याण होत आहे असें मनापासून वाटून, तो नष्ट करून टाकून नवा धर्म प्रसृत करण्याचें जर कोणी मनांत आणील व त्याकरिता बुद्धिपुरस्सर, निर्मळ अंतःकरणाने तो झटेल, तर त्याचा अत्यंत द्वेष करणाऱ्या शत्रूसहि त्याची योग्यता वाखाणावी लागेल." पण अशी वृत्ति असूनहि 'चालू हिंदु धर्म नव्या पंथांच्या प्रवर्तकांना जसा केवळ उपहास्य व उच्छेद्य वाटतो... तसें आम्हांस बिलकुल वाटत नाही." असेंहि त्याच लेखांत त्यांनी सांगून ठेविलें आहे.
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत 'हिंदु धर्म हा सुधारणेस बाधक नाही,' असें सांगून अटकेपार जाणारे लष्करांतले शिपाई, इंग्लंडला जाणारां राघोबाचा वकील, जपजाप्य कमी करणारे माधवराव पेशवे यांची उदाहरणें विष्णुशास्त्री यांनी दिली आहेत; पण असे असूनहि रूढ, विद्यमान, हिंदु धर्म हिंदुस्थानच्या अवनतीस कारण झाला, हें विष्णुशास्त्री यांना मुळीच मान्य नव्हतें. प्राचीन काळीं आमची सुधारणा झाली त्या वेळीं येथे हाच धर्म होता, तेव्हा तो प्रगतीच्या आड आला नाही, मग आताच कां यावा, असें तें विचारतात.
विरोध नाही
 हिंदु धर्म हा सुधारणेस बाधक नाही, त्या संबंधांत कोणी कोणतेंहि मत मांडलें तरी चालेल, असें विष्णुशास्त्री यांनी म्हटले असले तरी प्रार्थनासमाज, ब्राह्मो समाज, आर्यसमाज यांच्या प्रवर्तकांवर त्यांनी अतिशय उपहासाने टीका केली आहे. याविषयी कोणी कांही आक्षेप घेतल्यास या लोकांच्या विसंगत आचरणावर ती टीका आहे, असे ते म्हणत. मूर्तिपूजेचा सभेत निषेध करून घरी मूर्तिपूजा करणारे, सभेत प्रायश्चित्त, व्रतें-वैकल्ये यांचा निषेध करून घरीं तीं आचरणारे, धर्मसुधारणावादी पत्रकावर सह्या घेऊन मागून शरणागति पतकरणारे, समुद्रप्रवासबंदीचा निषेध करून स्वतः ती पाळणारे यांचा ते उपहास करीत असत.
 स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह, शूद्र-अतिशूद्र यांची उन्नति, अस्पृश्यता-निवारण, जातिभेदविनाश या सर्वांविषयी शास्त्रीबुवांची अशीच भूमिका आहे. या क्षेत्रांत सुधारणा करू पाहणारांवर त्यांनी सतत धार धरली आहे. यासंबंधी 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत त्यांनी खुलासा केला आहे. ते म्हणतात, "वरील कोट्यांचें आम्हीं जें खंडन केलें आहे. त्यावरून कित्येक समंजस मंडळींचें असें अनुमान होईल की, वरील बालविवाहादि प्रकार आम्हांस सर्व प्रकारे मान्य होत व आजपर्यंत जे चालत आले आहे. तें सर्व जसेच्या तसे ठेवण्याविषयी आमचा आग्रह आहे. वस्तुतः पाहतां वरील मतें काढण्यास बिलकुल आधार नाही. आमचें म्हणणे इतकेंच की आज जी आमची अवस्था झाली आहे तिला ते कारणीभूत आहेत या म्हणण्यांत कांही अर्थ नाही."
सत्याचा विसर
 विष्णुशास्त्री यांचें हें निरनिराळ्या निबंधांतले प्रतिपादन पाहिले म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांति ही लोकशाहीसाठी अवश्य आहे; याकडे त्यांनी दुर्लक्ष केलें होतें असें दिसतें. ते लोकसत्तावादी होते, प्रजासत्ताक हे त्यांचे स्वप्न होतें, असें आगरकर म्हणतात; आणि विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य यांचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आहे आणि लोकप्रभुत्व व स्वातंत्र्य यांविषयीच्या आकांक्षा प्रकट केल्या आहेत, यांवरून त्याविषयी शंका राहत नाही; पण लोकशाहीला लोकनिर्मिति अवश्य असते. धार्मिक, सामाजिक, जातीय इत्यादि सर्व बंधनांपासून मुक्त असे नागरिक उदयास आल्यावांचून लोकसत्ता सिद्ध होऊं शकत नाही या सत्याचा त्यांना विसर पडला होता, असें म्हणावें लागतें. धार्मिक, सामाजिक रूढि व इतर पीठिका तशाच चालू ठेवाव्या, असा आमचा आग्रह नाही, असें ते म्हणतात. पण लोकशाहीला, प्रगतीला त्यांच्या निर्मूलनाची आवश्यकता नाही असें त्यांना वाटते. तसें त्यांना वाटत नसतें तर त्यांनी भाषाभिमान, ग्रंथरचना, इतिहाससंशोधन यांचा जसा हिरिरीने पुरस्कार केला तसा सामाजिक व धार्मिक क्रांतीचाहि केला असता.
मानव अपूर्ण
 लोकशाही, विचारस्वातंत्र्य, लोकमतांविरुद्ध जाण्याचा व्यक्तीचा अधिकार पाश्चात्त्य विद्येची उपासना यांचा पुरस्कार करणाऱ्या पुरुषाने धार्मिक व सामाजिक क्रांतींचें महत्त्व जाणलें नव्हतें, हें जरा विस्मयजनक आहे. पण कोणताहि मानव पूर्ण नाही, हें ध्यानांत घेतलें म्हणजे मनाचा त्रास जरा कमी होतो. गांधीजी लोकशाहीचे भोक्ते, पुरस्कर्ते होते. व्यक्ति हे अंतिम मूल्य ते मानीत. समता, बंधुता यांचा तर ते पावलोपावलीं उपदेश करीत. तरीहि चातुर्वर्ण्य ही श्रेष्ठ समाजरचना आहे, असें ते म्हणत. "आणि आत्म्याच्या विकासासाठी सहभोजन व मिश्रविवाह यांवर बंदी घालणें अवश्य आहे," असें सांगत. ('यंग इंडिया', ६, १०, २१). या विसंगतीचा अर्थ कसा लावायचा? पंडितजीहि लोकशाहीचे उपासक होते; पण दंडायत्त कम्युनिस्ट देशांवर त्यांचें फार प्रेम. आणि रशिया व चीन आपल्या जवळच्या राष्ट्रांवर प्रत्यहीं आक्रमण करून साम्राज्य- विस्तार करीत आहेत हें डोळ्यांनी ते पाहत असतांनाहि, कम्युनिस्ट राष्ट्रें आक्रमक असणें शक्य नाही, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. यामुळे चीनविषयी ते गाफील राहिले इतकेंच नव्हे, तर त्याने आक्रमण केल्यावरहि ते त्याला आक्रमण म्हणेनात. विष्णुशास्त्री यांचे, किंवा कोणत्याहि थोर पुरुषाचें मूल्यमापन करतांना, मानवाची ही अपूर्णता आपण सतत ध्यानांत ठेविली पाहिजे.
सहानुभूतिशून्य
 त्यावेळी हिंदु धर्माला अत्यंत विकृत रूप आलें होतें. विषमता, जुलूम, अन्याय, पक्षपात यांचा तो पुरस्कार करीत असे. अनंत जाति-उपजाति तशाच राहिल्या पाहिजेत असें त्याचें शास्त्र होतें. 'धारणात् धर्मइत्याहु: ।' 'अभ्युदय व निःश्रेयस प्राप्त करून देईल तो धर्म' या व्याख्यांशी त्याचा कसलाहि संबंध राहिलेला नव्हता. असे असूनहि लोकशाहीच्या यशासाठी या धर्मांत फार मोठें परिवर्तन घडविलें पाहिजे, असें विष्णुशास्त्री यांना वाटले नाही. या परिवर्तनाला किंवा सुधारणेला आमचा विरोध नाही, इतकेंच ते म्हणत. पण त्या धर्मामुळे भारताची अवनति झाली आणि उन्नतीसाठी, लोकायत्त शासनासाठी, जातीय विषमता, अस्पृश्यता, शूद्र-अंत्यज यांची विपन्नावस्था, स्त्रियांची परवशता, वर्णानां गुरु जे ब्राह्मण त्यांची चारित्र्यहीनता, हें सर्व नाहीसे होणें अवश्य आहे, हें त्यांना बिलकुल मान्य नव्हतें. लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या पुरस्कर्त्याने हें मान्य करावयास हवें होतें, आणि त्यासाठी इतर विषयांचा जसा त्यांनी प्रपंच केला तसा यांचाहि करावयास हवा होता, पण तसें त्यांनी केलें नाही. उलट या दुष्ट रूढिविरुद्ध ज्यांनी मोहीम सुरू केली होती त्यांच्यावर ते सहानुभूतिशून्य टीका करीत राहिले. विष्णुशास्त्री यांनी त्यांच्या दोषांवर, त्यांच्या विसंगत वर्तनावर टीका करूनहि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास वास्तविक हरकत नव्हती.
विचारसाम्य
 एक गमतीची गोष्ट पाहा. लोकहितवादींची 'शतपत्रे' व विष्णुशास्त्री यांची 'निबंधमाला' हे दोन ग्रंथ जरा न्याहाळून पाहिले तर या दोन थोर विचारवंतांमध्ये किती तरी वैचारिक साम्य असल्याचे आढळते. विष्णुशास्त्री यांना अत्यंत प्रिय असलेले विचार, तत्त्वें, सिद्धान्त लोकहितवादी यांनी किती तरी पत्रांत सांगितले आहेत. असे असूनहि त्यांची दखल विष्णुशास्त्री यांनी घेतली नाही, यामुळे मन अस्वस्थ होतें. इंग्रजी विद्या शास्त्रीबुवांना किती महत्त्वाची वाटत असे, तें मागे सांगितलेंच आहे. लोकहितवादी यांनी तिचें तसेंच गुणगान केलें आहे. ते म्हणतात, "इंग्रजांच्या विद्या हिंदूस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यांतील ज्ञान घ्यावें. सांप्रत इंग्रजीत ज्या विद्या, भूगोल, खगोल, राज्यनिति इत्यादि आहेत त्यांचा विचार करावा, त्यावांचून लोकांस कोणतेंहि कार्य नीट करतां येणार नाही." ('पत्र', ६९). पत्र क्र. ९५ यांत लोकहितवादींनी आपले शास्त्री पंडित, रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्पज्ञान यांवरील ग्रंथ पाहत नाहीत म्हणून त्यांना दोष दिला आहे. याच अनुषंगाने ग्रंथरचनेचें माहात्म्यहि लोकहितवादींनी विष्णुशास्त्री यांच्याइतकेंच पोटतिडिकीने सांगितलें आहे.
 विचारस्वातंत्र्यहि लोकहितवादींना विष्णुशास्त्री यांच्याइतकेंच महत्त्वाचें वाटतें. "मनूचें वचन असो, याज्ञवल्क्याचें असो, कोणाचेंहि असो. ब्रह्मदेवाचें का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असें आहे. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धि चालवा. प्राचीन काळीं ऋषि विचारशील होते. त्यांनी नक्षत्रे पाहून, औषधे शोधून ग्रंथ बुद्धिबळाने लिहिले; पण त्यानंतर लोकांस समजूत पडली की, ते ऋषि देवावतार होते. तेव्हा आपला धर्म इतकाच की, त्यांनी जें करून ठेविलें तितकें मात्र शिकावें. त्याजवर नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवांचा अपमान होतो. अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले."- असे विचार त्यांनी ठायीं ठायीं मांडले आहेत. 'ग्रंथावर टीका' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी हीच वृत्ति प्रगट केली आहे. "आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्यास आपणांस अधिकार नाही, अशी भाविक लोकांची समजूत आहे. पण सूर्यावरचे डाग पाहूं नयेत, किंवा चंद्रास कलंकी म्हणू नये असे म्हणण्यासारखेंच हें असमंजस होय. थोरांचे दोष दाखविले तर त्यांचा उपमर्द होतो ही अगदी खोटी समजूत आहे."- असे त्यांनी स्वच्छ सांगितलें आहे.
भटभिक्षुक
 जुने शास्त्री-पंडित यांना विद्याभिरुचि मुळीच नाही हा जो विष्णुशास्त्री यांचा अभिप्राय तोच लोकहितवादींनी निरनिराळ्या पत्रांत प्रगट केला आहे. भट, भिक्षुक, यांच्याविषयी तर ते फारच भरड व थोड्या असंस्कृत भाषेत लिहितांत. विष्णुशास्त्री यांना त्याचा फार राग येतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, संपत्तीचा योग्य उपभोग कोणता तें सांगतांना त्यांनी भावार्थाने तसेंच लिहिलें आहे. ते म्हणतात, "यापूर्वी ब्राह्मणांची, विशेषतः भटांची सर्वथा भर करण्यांत लोक पुण्य मानीत; पण आता समदृष्टीने पाहतां सर्व विपन्न मनुष्यें धर्मास सारखींच सत्पात्र आहेत, अशी उत्तम समजूत पहिलीच्या जागी आली." खरा धर्म कोणता तें सांगतांना लोकहितवादी म्हणतात, "आंधळ्यास जेवावयास घातलें काय ? दीन-गरिबांस (ब्राह्मणांस नव्हे) वस्त्रे दिलीं काय ? अज्ञानास ज्ञानी केलें काय ?- हें पाहवें. धर्म त्यावरून ठरतो." ('पत्र', ३५).
 आपले लोक उद्योग करीत नाहीत, आळशी आहेत, बसून खाण्यांत, पोटांतले पाणी हलूं न देण्यांत त्यांना भूषण वाटतें, श्रीमंतीचें हेंच लक्षण, असें त्यांस वाटतें; अशी टीका लोकहितवादींनी केली आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांवरच नाही, तर राजेरजवाडे, सरदार यांवरहि केली आहे. 'संपत्तीचा उपभोग' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी अशीच टीका केली आहे. आणि शेवटी आमचे राजेरजवाडे आणि इतर श्रीमान् गृहस्थ यांनी, ऐश्वर्य आम्हीच भोगावें, हा मूर्खपणाचा अभिमान सोडून देऊन युरोपियन लोकांचा कित्ता उचलावा आणि प्रवास करणें, विद्या जोडणें या कामों संपत्तीचा उपयोग करावा, असा उपदेश केला आहे.
 जातिभेद, परदेशगमन, आणि विशेषतः स्वदेशप्रीति यांविषयी या दोन नेत्यांची मतें अशींच मिळतीजुळती आहेत. धर्मसुधारणेविषयी लोकहितवादी यांचा एक उतारा देतो. त्यावरून सर्व भावार्थ घ्यानीं येईल. "प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्याची लिहिण्याची मोकळीक असावी. आचारापेक्षा नीति प्रमुख मानावी, स्त्री-पुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामांत व संसारांत एकसारखे असावेत. जाति-अभिमान नसावा. स्वदेशाची प्रीति व त्याचें कल्याण विशेषेकरून मनांत असावें, गुणेकरून व योग्यतेवरून जातिभेद मानावा, कुलेकरून मानूं नये. सरकारकडून प्रजेचे अधिकार थोर असावे. म्हणजे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत, ते सरकारशी भांडून घेत जावे. विद्यावृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी, शेवटचें कलम असें की, सर्वांनी सत्याने चालावें."
 लोकहितवादींची धर्माची ही व्याख्या आहे. यांतले बहुतेक विचार विष्णुशास्त्री यांना जसेच्या तसे मान्य आहेत, हें आतापर्यंतच्या विवरणावरून दिसून येईल.
नीरक्षीर विवेक !
 मनांत असें येतें की, विष्णुशास्त्री यांनी त्यांची दखल घेऊन त्यांचा गौरव केला असता, तर देशांतल्या या भिन्न शक्ति एक होऊन समाजाची प्रगति वेगाने झाली असती. लोकहितवादी यांची इंग्रजांविषयीची अंधभक्ति, विचार-आचार यांतील विसंगति, त्यांची अतिरेकी स्वजननिंदा, त्यांची असंस्कृत भाषा यांवर टीका करूनहि विष्णुशास्त्री यांना त्यांच्या वरील विचारधनाचा गौरव करता आला असता. इंग्रजांच्या, राज्यकर्त्यांच्या व एकंदर पाश्चात्त्य पडितांच्या बाबतींत त्यांनी अशीच नीरक्षीरविवेकी दृष्टि ठेविलेली दृष्टीस पडते. त्यांच्यावर त्यांनी जितकी प्रखर टीका केली तितकीच त्यांच्या गुणांची स्तुतीहि केली. त्यांचा कित्ता घ्यावा, त्यांना गुरु मानावें, म्हणजे लोह-परिस- न्यायाने आपल्याला त्यांचे गुण लाभतील, असा उपदेशहि केला आहे. मग हाच विवेक लोकहितवादी, न्या. मू. रानडे व जोतिबा फुले यांच्याविषयी त्यांनी कां केला नाही ?

क्रांतीचा उपहास
 माधवराव रानडे यांच्या तत्त्वज्ञानांतील अनेक सिद्धान्त विष्णुशास्त्री यांना वरीलप्रमाणेच मान्य होण्यासारखे होते. मानवत्वाची प्रतिष्ठा हें त्याचें पहिलें महातत्त्व होते. संपत्तीच्या उपभोगाविषयीचीं त्यांचीं मतें, त्यांचा मराठी भाषेचा अभिमान, इंग्रजी विद्येविषयीची त्यांची भक्ति, भारताच्या प्राचीन संस्कृतिविषयीचा त्यांचा अभिमान, मराठ्यांच्या इतिहासासंबंधीचे त्यांचे प्रेम, त्यांचे शुद्ध, निष्कलंक चारित्र्य, अखंड उद्योग तत्परता, त्यांचा स्वदेशाभिमान आणि त्यांची अत्यंत थोर, अत्यंत सुसंस्कृत अभिरुचि यांविषयी त्यांच्या शत्रूंनाहि शंका घेण्यास जागा नव्हती. विष्णुशास्त्री यांनी या युगाचे अग्रणी, असा त्यांचा गौरवहि केला होता. असें असतांना त्यांच्या कार्यातील अधू जागा तेवढ्या निवडून त्यांवर विष्णुशास्त्री सतत प्रहार करीत राहिले आणि सामाजिक व धार्मिक क्रांतीची ते जी पायाभरणी करीत होते तिची त्यांनी पूर्ण उपेक्षा केली. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणें तिचा उपहास केला. त्यामुळेच मनांत येतें की, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, विचारस्वातंत्र्य, ज्ञाननिष्ठा, ह्रीं जीं नवसमाज- निर्मितीची तत्त्वें त्यांनी मनाशी निश्चित केली होतीं त्यांचा संपूर्ण व्याप, संपूर्ण आशय, त्यांचे सर्व घटकोपघटक त्यांच्या ध्यानी आले नव्हते.
 म. जोतिबा फुले यांनी तत्कालीं चालू असलेल्या सर्व धार्मिक, सामाजिक व आर्थिक चळवळींचा मोहरा सामान्य जनांकडे, शूद्र, अस्पृश्य, दलित यांच्याकडे वळविण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता; आणि लोकशाहीचा तोच खरा आशय होता. लो. टिळकांनी केसरीच्या पहिल्या अंकापासून सामान्य जनतेच्या जागृतींतून निर्माण होणाऱ्या लोकशाहीवर आपले सर्व लक्ष केंद्रित केलें होतें. आता जनता जागृत व्हावयाची तर सामान्य जनांच्या ठायीं व्यक्तित्वाची जागृति होणें अवश्य असतें ; आणि हिंदुसमाजांतील धर्मबंधनें व जातिबंधनें कायम असतांना शूद्र, अस्पृश्य, दलित यांच्या व्यक्तित्वाला अवसर मिळणे अशक्य होतें. यासाठीच जोतिबांनी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी या अविवेकी, घातक बंधनांवर घणाघात चालविले होते. लोकशाहीचे उपासक विष्णुशास्त्री यांनी या त्यांच्या कार्याचें स्वागत करावयास हवें होतें; पण तें न करतां त्यांनी जोतिबांवर भयंकर जहरी टीका केली. 'गुलामगिरी' या जोतिबांच्या पुस्तकांत अनेक अपसिद्धान्त आहेत. त्याची भाषा असंस्कृत आहे, म्हणून त्यांवर विष्णुशास्त्री यांनी टीका केली असती तरी कांहीच बिघडलें नसतें. पण ती करूनहि जनजागृतीचा जो प्रयत्न जोतिबांनी चालविला होता त्याचें, इंग्रज राज्यकर्त्यांच्या कांही कृत्यांचें नीर-क्षीर- विवेकाने त्यांनी जसें स्वागत केलें तसें करावयास हवें होतें असें वाटतें. पण तें त्यांनी केले नाही.
 याचें कारण असें दिसतें की, लोकशाहीच्या स्थापनेसाठी, आपलें प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य लोकांच्या अंगीं निर्माण होण्यासाठी, या देशांत आमूलाग्र सामाजिक व धार्मिक परिवर्तन होणें अवश्य आहे हें सत्य विष्णुशास्त्री यांनी जाणलें नाही.
दोन ताण
 यावरून असें दिसतें की, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, विरुद्ध मताविषयीचा आदर, समता, बंधुता हीं जीं नवसमाजरचनेचीं तत्त्वें, त्याचप्रमाणे देशाभिमान व त्यासाठी अवश्य असे त्याग, संघटना, एकोपा यांसारखे गुण हे एका बाजूला आणि सनातन परंपरेतील जातीय उच्चनीचता, ब्राह्मणांचें श्रेष्ठत्व, धर्माची अपरिवर्तनीयता हीं तत्त्वें दुसऱ्या बाजूला यांचे दोन्ही बाजूंनी दोन ताण विष्णुशास्त्री यांच्या मनाला लागले होते; आणि त्यामुळे अनेक जुन्या पीठिका, परंपरा यांवर निक्षून प्रहार करीत असतांना सुद्धा त्यांच्या अभ्यंतरांत इतर कांही निषिद्ध अशा जुन्या तत्त्वांविषयीचा आग्रह कायम असे.
 खं. भि. बेलसरे या नांवाचे विष्णुशास्त्री यांचे एक अनन्यभक्त होते. त्यांनी १८९१ साली 'विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्राचें व लेखांचें साधारण स्वरूप' या नांवाचें एक लहानसें पुस्तक लिहिलें आहे. त्यांत विष्णुशास्त्री यांच्या धर्ममतांविषयी चर्चा केली आहे. तिचा भावार्थ असा- शास्त्रीबुवांच्या कित्येक लेखांवरून ते पक्के हिंदुधर्मी होते, त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, व डोळे मिटून ते त्यास अनुसरत असत, असा सकृद्दर्शनीं कोणाचाहि सिद्धान्त होऊन जाईल; पण आम्हांस तसें वाटत नाही. त्यांनी हिंदु धर्माचा अभिमान धरला होता ही गोष्ट खोटी नव्हे. तरी तो अभिमान विश्वासजन्य होता, असें मात्र म्हणवत नाही. तर देशभक्तिजन्य होता, असें आमचें मत आहे. म्हणजे त्यांस स्वदेशाविषयी जें अत्यंत प्रेम होतें त्यामुळे विस्कळीत होत चाललेल्या हिंदु समाजास बंधनरूप जो हिंदु धर्म त्याचा अभिमान त्यांस वाटू लागला इतकेंच (पृ. ७३).
 हे विवेचन करून, मनुष्य कितीहि ज्ञानी झाला तरी त्याचे पूर्वग्रह सर्वस्वीं सुटत नाहीत, याची अनेक उदाहरणें बेलसरे यांनी दिली आहेत. आणि शास्त्रीबुवांच्या विचारांतील विसंगतीचें स्पष्टीकरण केलें आहे (पृ. ७६). याचा अर्थ असा की, उत्कट स्वदेशाभिमानामुळे या देशाचा सतानत असा जो हिंदु धर्म त्याचा त्यांना तसाच अभिमान वाटे, व त्यांतील दोषांकडे ते पाश्चात्त्य विद्येने प्राप्त झालेल्या विवेकी दृष्टीने पाहू शकत नसत. मात्र ही स्थिति नेहमीच असे असे नाही. तो विवेक जागृत झाला की ते स्वकीयांचे दोषहि कठोरपणें दाखवून त्यांवर निःस्पृह अशी टीका करीत असत. त्यासंबंधी चर्चा पुढे येणारच आहे; पण त्याआधी देशाभिमानामुळे दृष्टि झाकोळलेली असतांना त्यांनी हिंदुस्थानच्या अवनतीची जो मीमांसा केली आहे, तिची चिकित्सा करावयाची आहे. ती मीमांसा विष्णुशास्त्री यांच्या नेहमीच्या भेदक बुद्धिवादी दृष्टिकोनाशी विसंगत अशी झालेली आहे. तिचा परामर्श घेऊन मग स्वकीयांच्या दोषांवरहि ते किती प्रखर क्ष-किरणें टाकूं शकतात तें आपण पाहू.




-८-

अवनतीची मीमांसा


अवनतीची मीमांसा
 उत्कट अशा स्वदेशप्रीतीमुळे विष्णुशास्त्री यांची विवेकी दृष्टि केव्हां केव्हा झाकोळून जात असें, असें वर म्हटले आहे. तशा झाकोळलेल्या दृष्टीतूनच त्यांनी भारताच्या अवनतीची मीमांसा केली आहे. तिचें समीक्षण आता करावयाचे आहे. लोकहितवादी यांच्या ग्रंथांवर टीका करण्यासाठी त्यांनी जे दहा-बारा निबंध लिहिले त्यांतील आरंभीच्या तीन-चार निबंधांत ही मीमांसा आलेली आहे. आणि सारार्थाने तीच पुढे 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या प्रबंधाच्या समारोपांत त्यांनी दिली आहे.
 विष्णुशास्त्री यांचा निश्चित सिद्धान्त असा की, "आमच्या देशास काही एक झालेलें नाही. त्यांची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यांसारखी कांही एक विकार झालेला नाही." मात्र देशाला कांही झालेले नाही, असे म्हणत असतांनाच सध्या त्याला विपन्नावस्था आलेली आहे, सांप्रत तो ऱ्हास पावला आहे, हे त्यांना मान्य आहे. या दोन विधानांत विसंगति आहे, असें दिसेल; पण लोकहितवादीवरील निबंधात त्यांनी त्यासबंधी खुलासा केला आहे.
नैमित्तिक निकृष्टावस्था
 ते म्हणतात, "एकंदरीत हल्लीच्या काळाला या देशाची स्थिति मोठी भयंकर झाली आहे, त्याला निकृष्ट दशा आली आहे, यांत बिलकुल संदेह नाही, पण निकृष्ट स्थितीचीं दोन स्वरूपें असतात. एक नित्य, शाश्वत निकृष्ट स्थिति व दुसरी आगंतुक, नैमित्तिक अशी निकृष्ट स्थिति. दुसऱ्या निकृष्ट स्थितीत कांही तात्कालिक भयंकर अनर्थापात होऊन राष्ट्र क्षीण झाल्यासारखें दिसतें पण त्याच्या अंगचा मूळचा जोस कायम असतो. एखाद्या वृक्षाच्या मुळालाच कीड लागली की तो वठत जातो. मग कितीहि उपचार केले तरी त्याला पुन्हा टवटवी येण्याची आशा नसते. ही शाश्वत निकृष्ट अवस्था. पण त्याचा फुलौरा, त्याच्या फांद्या, पल्लव कांही वेळा छाटले जातात, किंवा वणव्यांत सापडल्याने जळून जातात, तरी त्या वेळी त्याच्या अंतरीचें सत्त्व कायम असतें. ही नैमित्तिक निकृष्टावस्था होय. ही फार काळ टिकत नाही. थोड्याच वेळांत तो वृक्ष पुन्हा पहिल्यासारखा किंवा आणखी भराने वाढून फळा-फुलांनी बहरून जातो. हिंदुस्थानची सध्याची निकृष्ट अवस्था या दुसऱ्या प्रकारची आहे. छत्रपति संभाजी यांच्या मृत्युसमयीं आणि पानपतच्या पराभवाच्या वेळीं महाराष्ट्राला अशी स्थिति आली होती; पण थोड्याच वेळांत अपूर्व पराक्रम करून हे राष्ट्र उन्नत स्थितीला आलें. "हिंदुस्थानाविषयी हेंच निदान विष्णुशास्त्री यांनी केलें होतें; साधारण पौष्टिकाचे उपचार त्याजवर सुरू केले असतां तो पुन्हा पहिल्यासारखा सशक्त व तेजस्वी होईल. त्यासाठी शस्त्रक्रियेसारख्या जालीम उपायांची मळीच गरज नाही, असें त्यांनी म्हटलें आहे.
आम्हीच जबाबदार
 विष्णुशास्त्री यांच्या अगोदरचे पंडित आणि विशेषतः लोकहितवादी व रानडे यांच्या मतें प्राचीन काळी, ऋषींच्या कारकीर्दीत हा देश उन्नत अवस्थेला पोचला होता, ऐश्वर्यसंपन्न होता; पण पुढे आमच्या धर्माला विकृतरूप आलें. आमचें बुद्धिप्रामाण्य जाऊन तेथे शब्दप्रामाण्य आलें. आम्ही विद्याविमुख झालों. वर्ण-जाति यांतील विषमता फार वाढली. स्त्री-जीवनाला पराकाष्ठेची अवकळा आली. अन्याय, जुलूम, पक्षपात, अनीति, भ्रष्टता फार वाढली, आणि यामुळे हिंदु समाजाला हीन दशा प्राप्त झाली. याचा अर्थ असा की, आमच्या अवनतीला आमचे आम्हीच जबाबदार आहों. आमच्या मूर्खपणामुळेच आमचें वैभव, आमचें स्वातंत्र्य यांचा लोप झाला.
 विष्णुशास्त्री यांना हे मत बिलकुल मान्य नाही. आमचा धर्म बिघडला आहे, नीति सुटली आहे, मूळचे चांगले आचार जाऊन वेडगळ रीतिभाति आम्हांस लागल्या आहेत, या विधानांना ते कोट्या म्हणतात. त्या बड्या बड्या मंडळींनी ही उपपत्ति केवळ इंग्रज लोकांच्या प्रलापांवरून बसविली आहे, असें त्यांना वाटतें. मग असा प्रश्न येतो की, सध्याची जी अवदशा या देशाला आली आहे ती कशामुळे ? नैमित्तिक का होईना, पण आपल्याला निकृष्ट दशा आली आहे हें विष्णुशास्त्री यांना मान्य आहे. मग ती का आली? त्यांची उपपत्ति काय आहे ?
विस्तीर्णत्व
 या देशाचें विस्तीर्णत्व आणि प्राचीनत्व हीं दोन कारणें त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत, असें विष्णुशास्त्री यांचें मत आहे. रशिया वगळून राहिलेल्या युरोपएवढा हिंदुस्थानचा विस्तार आहे. आणि युरोपमध्ये तेवढ्या प्रदेशांत एकोणीस राष्ट्र आहेत तर हिंदुस्थानांत एकच आहे. शिवाय या देशांत अनेक धर्मपंथ, अनेक जाति, अनेक चालीरीति आहेत. येथे हिंदूंखेरीज फिरंगी, हबशी, रोहिले, पारशी, शीख अशा अनेक भिन्न जमाती असून त्यांच्या विवाहपद्धति, रीतिभाती, आहार-विहार अतिशय भिन्न आहेत. असे हे भिन्न समाज या अत्यंत विस्तीर्ण प्रदेशांत पसरलेले आहेत आणि हा विस्तारच या देशास बाधक झाला आहे. हें सांगून पुढे विष्णुशास्त्री यांनी इंग्लंड, तुर्कस्थान, प्राचीन ग्रीस यांची उदाहरणें देऊन, देश लहान, आटोपशीर असला म्हणजे त्यांतील लोक संघटित, एकरूप होऊ शकतात आणि म्हणूनच ते पराक्रम करूं शकतात, असें दाखविलें आहे. आणि हिंदुस्थानांत छपन्न देश, छपन्न भाषा, शेकडो जाति, शेकडो धर्म, शेकडो आचार- इतक्यांत एकोपा व्हावा कसा, असा प्रश्न विचारला आहे. याच विवेचनांत इतर देशांच्या इतिहासांतली आणखी उदाहरणें देऊन, आटोपशीर राज्यांत जी बळकटी असते ती मोठ्यांत असत नाही, अतिविस्तार राज्यास अपायकारकच होतो, असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे व हिंदुस्थानच्या सांप्रतच्या ऱ्हासास तेंच कारण आहे, असें मत मांडले आहे.
हेत्वाभास
 विष्णुशास्त्री यांच्या या प्रतिपादनांत अनेक हेत्वाभास आहेत. हिंदुस्थान देश अतिविस्तीर्ण असला तर तो प्राचीन काळापासून तसाच आहे. असे असूनहि त्या प्राचीन काळीं तें विस्तीर्णत्व पराक्रम, कर्तृत्व, यांच्या आड आलें नाही, अपायकारक ठरले नाही. व्यास, वाल्मीकि, कालिदास, पाणिनि, यास्क, पतंजली, राम-कृष्ण, विक्रमादित्य, शिवछत्रपति, बाजीराव, रणजितसिंग, अहिल्याबाई, लक्ष्मीबाई, यांचीं उदाहरणें स्वतः विष्णुशास्त्री यांनीच दिली आहेत. शक, यवन, हूण, युएची, यांच्यासारख्या परकीय रानटांची दहा-बारा आक्रमणे या देशावर आली. त्यांचे निर्दालन करून त्या सर्व जमातींना हिंदु समाजांत सामील करून टाकण्याचा अनेक वेळा हिंदूंनी विक्रम केला, तो याच काळांत. या देशाचा प्रचंड विस्तार जर आड आलाच असला, तर तो सर्व हिंदुस्थानावर एकछत्री साम्राज्य स्थापण्याच्या मार्गांत आला असेल. तरीहि चंद्रगुप्त, अशोक यांनी अखिल भारतावर त्या काळांत साम्राज्य स्थापन केलें होतेंच. आणि त्यानंतरहि सातवाहन, गुप्त, राष्ट्रकूट यांनी अखिल भारतावर नसली तरी, खूप मोठ्या विस्तारावर सत्ता स्थापिली होतीच; पण या मुद्याला तितकें महत्त्व नाही. अखिल युरोपवर एकछत्री सत्ता कधीच कोणाची नव्हती. तरी इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी या देशांनी पराक्रम केलेच. त्याचप्रमाणे भारतांतहि पल्लव, कदंब, वाकाटक, प्रतिहार, सेन, चालुक्य, यादव इत्यादि राज्यांनी पराक्रम करून विद्या कलांची जोपासना इसवी सनाच्या दहाव्यां शतकापर्यंत केलीच होती. तेव्हा विस्तीर्णत्व आणि कर्तृत्व, प्रगति, पराक्रम, स्वातंत्र्य, यांचा अभाव यांत कंसलाहि कार्यकारणसंबंध दाखवितां येत नाही. दहाव्या शतकानंतर अफगाण, घोरी, मोगल, इराणी यांची आक्रमणें सुरू झाली. त्या वेळी चव्हाण, राठोड, यादव, सेन यांची पूर्वीप्रमाणेच मर्यादित अशी राज्ये भारतांत होती; पण त्यांच्यांतला जोम नष्ट झाला होता. त्यामुळे त्यांना या आक्रमणाला तोंड देतां आलें नाही; आणि याचीं कारणें निवृत्ति, शब्दप्रामाण्य, कर्मकांड, सिंधुबंदी, स्पर्शबंदी इत्यादि शृंखला, विद्याविमुखता, अंधश्रद्धा, विषम, अन्यायी, जुलमी समाजरचना, ही होतीं. थोड्याफार निराळ्या शब्दांत लोकहितवादी, रानडे यांनी आपल्या अवनतीची हीच मीमांसा केली होती; आणि आज, साधारणतः नवव्या-दहाव्या शतकापासून हिंदुस्थानचा ऱ्हासकाळ सुरू झाला व तो वरील करणांमुळेच झाला, असेंच डॉ. मुनशी, म. म. मिराशी, डॉ. आळतेकर, चिंतामणराव वैद्य, डॉ. मुजुमदार, इत्यादि बहुतेक सर्व थोर इतिहासपंडितांनी मत मांडलेलें आहे. या ऱ्हासकाळांतहि रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी हिंदु समाजाचें संरक्षण केलें हें खरें; पण पाश्चात्त्य राष्ट्रांपुढे त्यांचाहि पराक्रम चालला नाही. या काळांत त्यांनी पूर्वीप्रमाणे प्रवास केला असता, जगभर व्यापार वाढविला असता, विज्ञानाची जोपासना केली असती, नवी युद्धविद्या हस्तगत केली असती, विचारस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य प्रस्थापित केलें असतें, लोकहितवादींनी म्हटल्याप्रमाणे इतिहास लिहिला असता, भूगोल पाहिला असता, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या भाषांचा अभ्यास केला असता, निवृत्तिवाद, कर्मकांड यांचा समूळ उच्छेद केला असता, तर पुढे जपानने जें चाळीस-पन्नास वर्षांत करून दाखविलें तें रजपुतांना, मराठ्यांना, शीखांना करतां आलें असतें; पण या सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैज्ञानिक, बौद्धिक, क्रांतीच्या तत्त्वांची त्यांना पुसटसुद्धा ओळख नव्हती. बंगाल, गुजरात, तमीळ, सिंधु, आसाम, काश्मीर, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार येथील लोकांना तर जगाकडे डोळे उघडून पाहण्याची सुद्धा या काळांत शक्ति नव्हती. त्यामुळे ते नवव्या-दहाव्या शतकापासून जे सत्त्वहीन झाले ते परवापर्यंत.
परागतीचे कारण
 बाराव्या-तेराव्या शतकापासून पश्चिम युरोपांत वरील सर्व तत्त्वांचा तत्त्ववेत्ते, विज्ञानवेत्ते, राज्यकर्ते, पंडित, सामान्य जन, आणि कोठे कोठे धर्मवेत्तेहि अंगीकार करीत होते आणि आपापल्या देशांत सर्वांगीण परिवर्तन घडवून आणीत होते. त्यामुळेच त्यांची अपूर्व प्रगति झाली. ते जगभर साम्राज्य स्थापूं शकले. उलट पूर्व युरोपांतील देशांनी हीं तत्त्वें स्वीकारली नाहीत. पोलंड, रुमानिया, बल्गेरिया इत्यादि पूर्व युरोपांतले देश विस्तीर्ण नव्हते, लहान, आटोपशीर होते; पण तरीहि ते मागासलेलेच राहिले. तेव्हा देशाचा लहान किंवा मोठा विस्तार यावर कांही अवलंबून नसून सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्रांतीवरच प्रगति-परागति अवलंबून असते.
चक्रनेमिक्रम
 भारताच्या अवनतीचें प्राचीनत्व हें जें दुसरें कारण विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे त्यांतहि असाच हेत्वाभास आहे. एक विस्तीर्णत्व भूगोलावरचें आहे तर दुसरें कालपटावरचें आहे इतकेंच. हिंदुस्थानचा इतिहास चार-पांच हजार वर्षांचा आहे. तेव्हा एवढ्या काळानंतर त्याला थकवा येऊन त्यामुळे ऱ्हासकाळ आला असला तर त्यांत नवल कसले ? दीर्घकालीन प्रगतीनंतर रोमन साम्राज्य ऱ्हास पावलें, मिसर देशाला अवकळा आली, आणि आणखी दोन-तीन हजार वर्षांनी इंग्लंडचें तेंच होणार आहे, असें विष्णुशास्त्री म्हणतात. कालौघांत असेच चालावयाचें. मनुष्य कितीहि बलवान असला तरी केव्हा तरी तो थकणारच. त्याचप्रमाणे राष्ट्रांचें आहे. उत्पत्ति, स्थिति व लय हें अवस्थात्रय जसें व्यक्तिभूत मनुष्यास टळत नाही तसेंच राष्ट्राला टळणार नाही; असें असतांना हिंदुस्थानाला आज जर लयावस्था प्राप्त झाली असली तर ती आमच्या नैसर्गिक मूर्खपणामुळे आली, आमच्या धर्मविकृतीमुळे, जातिभेदामुळे, विद्याविमुखतेमुळे आली असें म्हणण्याचे काय कारण? हा चक्रनेमिक्रम आहे ! कधी उन्नति, कधी अवनति हें चालावयाचेंच !. समाजाचे अवगुण त्याला जबाबदार आहेत असें म्हणतां येणार नाही.
हा दैववाद
 विष्णुशास्त्री यांनी मांडलेला हा युक्तिवाद त्यांना स्वतःलाच मान्य होता असे दिसत नाही. कालगतीनेच जर सर्व होणार असेल तर मग देशाच्या उन्नतीचे उपाय समजाला सांगण्याचें प्रयोजन तरी काय ? मग प्रयत्नवादाला अर्थ तरी काय ? प्रारब्धवाद, कर्मवाद, यापेक्षा निराळा काय असतो ? दैववाद, प्रारब्धवाद तो हाच. विष्णुशास्त्री तो क्षणभर तरी मान्य करतील काय ? तसें असतें तर इंग्रजी विद्येचें वज्र हातीं घ्या, असें त्यांनी सांगितलें नसतें. मराठी भाषेचा अभिमान धरून नव्या विद्वानांनी ग्रंथ लिहावे असा अट्टाहास केला नसता. देशाभिमानाचा परिपोष करावा, त्या थोरल्या नात्यांत अठरापगड जातींची लहान नातीं. विलीन करावी, असा उपदेश केला नसता. आमच्या राजेरजवाड्यांनी, धनिकांनी संपत्तीचा उपयोग करतांना युरोपीय लोकांचा कित्ता घ्यावा, असें म्हटलें नसतें. भुतेंखेतें, शकुन- अपशकुन, फलज्योतिष असल्या लोकभ्रमांतून समाजाला मुक्त करण्यासाठी लेख लिहिले नसते. विष्णुशास्त्री दैववादी असते तर वरील लोकभ्रमांचा, विशेषतः फलज्योतिषाचा त्यांनी पुरस्कार केला असता; पण त्याचा निषेध करून ग्रहज्योतिष- खरें ज्योतिषशास्त्र व इतर सृष्टिशास्त्रे यांचा न्यूटन, गॅलिलिओ, केप्लर यांच्याप्रमाणे अखंड अभ्यास आपण करावा, असा आग्रह ते करतात. यावरून प्रारब्धवाद त्यांना स्वप्नांतहि मान्य होण्याचा संभव नव्हता हें उघड आहे.,
 चक्रनेमिक्रमाप्रमाणेच उन्नति-अवनति होत असते असें जर खरेंच त्यांच्या मनांत असतें, तर त्यांनी उन्नतीचे उपाय जसे सांगितले नसते तशीच अवनतीची वरच्याहून निराळी अशी कारणमीमांसाहि केली नसती; पण दीर्घकाळपर्यंत या देशांत विचारस्वातंत्र्य नाही, सृष्टिसंशोधन नाही, विद्याभिरुचि नाही, एकोपा नाही, प्रवृत्तिधर्म नाही, प्रवासाची आवड नाही, ग्रंथलेखन नाही आणि देशाभिमान नाही आणि तो जातिभेदामुळे नाही अशी कारणें त्यांनी वरचेवर सांगितली आहेत. तेव्हा आमच्या अवनतीला आमचे आम्हीच जबाबदार आहों, आमच्या मूर्खपणामुळे आम्ही ऱ्हास पावलों, हें मत आम्हांस बिलकुल मान्य नाही, असें जरी ते म्हणत असले, तरी अवनतीचीं वरील कारणें त्यांनीच सांगितली आहेत, हें आपण विसरता कामा नये.
 आता आमच्या देशाला कांहीहि झालेले नाही हें दाखविण्यासाठी विष्णुशास्त्री यांनी जी प्रमाणे सादर केलीं आहेत त्यांचा विचार करून हा विषय संपवू.
आमचे शौर्य
 आमच्या ठायीं पूर्वीचें शौर्य, धैर्य, पराक्रम अजून कायम आहे हें सांगण्यासाठी इंग्रजांनी येथे तयार केलेली काळी फौज हैं उदाहरण त्यांनी दिलें आहे. 'इंग्रजी भाषा' या निबंधांतहि डुप्लेने व पुढे इंग्रजांनी एतद्देशीय लोकांच्या फौजा तयार करूनच हिंदुस्थान जिंकला व सध्या इंग्रजी साम्राज्याचा तोच आधारस्तंभ आहे, हा हिंदी लोकांच्या शौर्याचा पुरावा म्हणून दिला आहे. आमच्या पलटणी अफगाणिस्तान, सयाम, चीन, इजिप्त, रशिया या देशांत इंग्रजांनी नेल्या तेव्हां त्या युरोपीय पलटणींइतक्याच शौर्याने लढल्या, असें टीप देऊन मुद्दाम निदर्शनास आणले आहे. शिवाय लोकहितवादींवरील दुसऱ्या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, पूर्वीपासून शिपाईगिरीविषयी प्रख्यात असे जे रजपूत, पुरभय्ये वगैरे लोक त्यांच्या अंगचें पाणी हल्लीच्या चिरकालिक स्वस्थतेनेहि कमी झालें आहे, असें नाही. इतकेंच की, तें प्रगट होण्यास हल्ली बिलकुल जागाच नाही.
 विष्णुशास्त्री यांनी हीं जीं प्रमाणें दिली आहेत त्यांवरून प्रत्यक्ष रणांगणांतलें शौर्य-धैर्य हिंदी लोकांच्या अंगी होतें एवढे जरी सिद्ध होत असले, तरी युद्धविद्या, युद्धनेतृत्व, त्यासाठी लागणारें स्वपरबलाचें ज्ञान, इतिहास-भूगोलाचें ज्ञान, लढाईतल्या विविध व्यूहरचना यांचे कसलेंहि ज्ञान, की जें पूर्वी सर्वार्थाने या देशांत होतें तें हिंदी लोकांच्या ठायीं नव्हतें हेंच सिद्ध होत नाही काय ? फ्रेंच, इंग्रज सेनापति व त्या राष्ट्राचे नेते यांनी आपल्या युद्धनेतृत्वाने यांना हाताखाली तयार केलें, व्यूह आखून या फौजा तेथे नेऊन उभ्या केल्या म्हणजे त्या असामान्य धैर्याने लढत. याचा अर्थच हा की आमच्याजवळ शौर्य असूनहि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी- राष्ट्राचें रक्षण करण्यासाठी- त्याचा कसा उपयोग करावा, याची विद्या आमच्या जवळ नव्हती. रजपुतांचे शौर्य कायम होतें, हें खरें आहे. पण पृथ्वीराजाचा पराभव झाल्यानंतर पुढे अनेक शतके आक्रमकांची साम्राज्यें स्थापणें व वाढविणे यासाठीच तें खर्ची पडलेलें होतें. हा अधःपात नव्हे काय ? आणि याला आमचे आम्हीच जबाब दार नाही काय? आमच्या फौजा युरोपच्या मैदानावर पुष्कळदा युरोपीयांनाहि भारी ठरत असतांना, तें शौर्य स्वदेशरक्षणासाठी उपयोगी पडूं नये, यावरून या देशांत स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान शून्यावर येऊन ठेपला होता असा अर्थ होत नाही काय ? आणि हा अभिमान हें तर क्षात्र धर्माचें मुख्य लक्षण.
आमची बुद्धिमत्ता
 आमची बुद्धिमत्ता वेदकालाइतकीच आजहि प्रखर आहे, असें विष्णुशास्त्री म्हणतात, आणि इंग्रजी विद्येचें अध्ययन आमच्या लोकांनी अतिशय जलद केलें, जो विषय हाती घ्यावा त्यांत ते पारंगत होतात, हें प्रमाण देतात. हें खरें आहे, पण ती इंग्रजी विद्या- म्हणजे रसायन, पदार्थविज्ञान, भूविज्ञान, जीवशास्त्र, भूगोल- खगोल शास्त्र, भाषा, विज्ञान, विद्युत्शास्त्र ही विद्या- निर्माण करण्याचें जें सामर्थ्यं पूर्वी आमच्या ठायीं होतें तें आता सर्वस्वीं लुप्त झालें होतें, आणि ह्या सर्व भौतिक विद्या इंग्रज आम्हांला शिकवतील तेव्हा आम्हांला अवगत होणार अशी जी अवस्था आली तीवरून बुद्धिमत्तेच्या दृष्टीनेहि हिंदी जनांना अवकळा आली होती असेंच ठरत नाही काय ?
 तेव्हा अगदी मूलभूत शौर्य- धैर्य किंवा बुद्धिमत्ता हे गुण जरी हिंदी लोकांच्या ठायीं असले तरी अनेक शतके ते क्षीण व निर्जीव होऊन गेले होते असेंच म्हटलें पाहिजे. आणि शब्दप्रामाण्य, जिज्ञासाशून्यता, परमार्थप्रवणता, संशोधनावर येणारी नाना तऱ्हेची बंधनें, प्रवासावर येणारी जातीय बंधनें हींच त्याची कारणें होत असें म्हणण्यावांचून गत्यंतर नाही.
 आमचें शौर्य-धैर्य कायम आहे, आमची बुद्धिमत्ता आजहि वेदकालाइतकीच प्रखर आहे, पण आमच्या या गुणांना अवसर न मिळाल्यामुळे ते प्रगट होत नाहीत, असें म्हणणें आणि ते गुण लोपले आहेत असें म्हणणें, हें सारखेच आहे. विक्रमादित्य, शिवछत्रपति, शंकराचार्य, रामदास, तुकाराम, तात्या टोपे यांना काळ अत्यंत प्रतिकूल होता; पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाला, शौर्याला, बुद्धिमत्तेला स्वतःच अवसर मिळविला. असा अवसर जेव्हा देशांतील लोकांना मिळवितां येत नाही तेव्हा समाजाचा अधःपात झाला आहे, असेंच म्हटलें पाहिजे; आणि तो अधःपात धर्माला अवकळा आल्यामुळे, सामाजिक न्याय नष्ट झाल्यामुळे, बुद्धिवाद लोपल्यामुळेच झालेला असतो, असेंच प्रत्येक देशाच्या इतिहासावरून दिसून येतें.
 पण या बाबतींत इतिहासांतलीं वा अन्य ग्रंथकारांच्या ग्रंथांतली प्रमाणें देण्याची गरजच नाही. कारण स्वतः विष्णुशास्त्री यांनीच अन्यत्र तशी मीमांसा केली आहे. त्यांची दृष्टि झाकोळते तेव्हा ते सनातन धर्माचा व प्राचीन परंपरांचा असमर्थनीय अभिमान घेऊन उठतात. पण इंग्रजी विद्येचें वज्र त्यांच्या हाती असलें म्हणजे त्यांचा विवेक नेत्र उघडतो. आणि मग ते पूर्ण तटस्थपणें स्वजन दोषांकडे पाहू शकतात. या क्ष-किरणांतून त्यांना काय दिसतें तें आता पाहूं.




-९-

क्ष-किरणे



अंतमुख
 'आमच्या देशाला कांहीहि झालेले नाही' हें विष्णुशास्त्री यांचे निदान टिकण्याजोगे नाही; त्याचप्रमाणे त्यांनी हिंदुस्थानच्या अवनतीची केलेली मीमांसाहि अनेक हेत्वाभासांनी भरलेली आहे, हे आपण गेल्या दोन लेखांत पाहिले; पण तेथे हेंहि सांगितलें आहे की, कोणत्याहि कारणांनी त्यांनी वरील प्रकारे अयथार्थ निदानें केली असली तरी स्वदेशाच्या व्यंगांकडे, दोषांकडे, प्राचीन परंपरेंतील वैगुण्यांकडे, आणि स्वजनांच्या प्रमादांकडे ते चिकित्सक दृष्टीने पाहूच शकत नव्हते हें खरें नाही. निबंधमालेतील लेखांतच त्यांनी अंतर्मुख दृष्टि करून प्राचीन परंपरेंतील, हिंदु धर्मातील अनेक दोष दाखवून त्यांवर परखड टीका केली आहे. इतकेंच नव्हे, तर वर जीं त्यांचीं अयथार्थ निदानें म्हणून सांगितलीं त्यांहून बरीच निराळीं अशीं निदानें शेवटच्या शेवटच्या 'केसरी'तील लेखांत त्यांनी केली आहेत, असें आपल्याला आढळते. त्यांनी हें जें आत्मनिरीक्षण केलें आहे त्याचा आता विचार करावयाचा आहे.
जीवितकार्य
 पण त्याहि आधी एक गोष्ट निदर्शनास आणावयाची आहे. ती ही की, विष्णुशास्त्री यांचें खरें कार्य म्हणजे या देशाचा तेजोभंग करणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांना, पंडितांना आणि मिशनऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने जहरी उत्तर देऊन येथील लोकांचा स्वत्वाभिमान जागृत करणें हें होतें. त्यांनी नवयुग निर्माण केलें तें या अर्थाने. इंग्रजी राज्याचें अंतरंग जाणून ते राज्यकर्ते स्वार्थी, लुटारू व दुष्ट प्रवृत्तीचे आहेत हें ध्यानीं घेऊन त्यांनी या देशाला घातलेल्या दास्यशृंखला तोडून टाकल्या पाहिजेत व त्यासाठी सर्वस्वत्यागास सिद्ध झाले पाहिजे असा निश्चय करणाऱ्या तरुणांची पिढी त्यांनी निर्माण केली. आणि या त्यांच्या संदेशामुळेच या भूमींत सर्वत्र चैतन्य रसरसून येऊन लोकांच्या सर्वांगीण कर्तृत्वाला फुलोरा आला हें ऐतिहासिक सत्य आहे. त्यांच्या कार्याचें मूल्यमापन करतांना हे सत्य दृष्टीआड करण्याची सध्या चाल पडत आहे, पण तें दृष्टीआड केलें तर आपल्या देशाला लाभलेलें स्वातंत्र्यच आपल्याला दृष्टीआड करावें लागेल, हें आपण विसरता कामा नये.
 तेव्हा स्वातंत्र्याची प्रेरणा हें त्यांचें मुख्य जीवितकार्य हें नित्य ध्यानी वागवून त्या संदेशाने प्रेरित झालेल्या तरुण वीरांनी रणांगणांत उतरतांना स्वतःच्या शारीर व मानसिक प्रकृतीच्या दृष्टीने कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी त्यांनी जे उद्बोधक विचार सांगितले त्यांचे स्वरूप आता स्पष्ट करू.
यज्ञोपवीत
 'देशोन्नति' हा त्यांचा निबंध पाहा. मृत्यूच्या आधी थोडेच दिवस हा निबंध त्यांनी लिहिलेला आहे. देशाभिमानाचा अभाव ही जी भारताची सर्वांत मोठी व्याधी तिच्यावरच त्यांनी येथे नेमके बोट ठेविलें आहे. ते म्हणतात की, "इकडील देशांतून देशाभिमान ही मनोवृत्तीच म्हणण्यासारखी लोकांस माहीत नाही. रोम, ग्रीस, इंग्लंड, अमेरिका वगैरे ठिकाणीं स्वदेशप्रीति म्हणून एक अत्यंत प्रबळ मनोवृत्ति आजला जशी आढळत आहे तशी एशिया खंडांतील कोणत्याहि देशांत आढळत नाही" असें व्यापक विधान करून १८५७ साली झालेल्या संग्रामाविषयी ते म्हणतात की. "त्यांस कारण देशाभिमान बिलकुल नसून केवळ धर्माभिमान होय. इतकी काळी फौज जी एकाएकी बिथरली, तिच्यापैकी एकाहि शिपायाच्या अंगीं ह्यामडन् किंवा वॉशिंग्टन यांच्या अंगांतला आवेश (देशाभिमान) संचारला असेल असें बिलकुल म्हणवत नाही." हाच विचार आणखी स्पष्ट करण्यासाठी त्या वेळी उपस्थित झालेल्या बर्वे- प्रकरणाविषयी त्या वेळच्या शिष्ट लोकांचे उद्गार त्यांनी दिले आहेत. ते म्हणत असत की, "या लष्कराच्या भाकरी भाजल्यावांचून यांचें काय अडलें होतें ? हीं राजकीय प्रकरणे, यांत आपल्यासारख्या गरीब पत्रकर्त्यांनी कशाला पडावें ? हरि हरि म्हणत स्वस्थ बसावयाचें सोडून, या मंडळींनी हा काय नसता उपद्व्याप आरंभिला आहे ?" त्या वेळचा समाज सार्वजनिक जीवनाला किती विमुख होता, देशसेवेच्या जाणिवेचा लवलेशहि लोकांच्या ठायीं कसा नव्हता, हें दाखविण्यासाठीच शास्त्रीबुवांनी हे उद्गार नमूद केलेले आहेत. १८९७ सालों लो. टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याचा संभव दिसला त्या वेळी कांही लोकांनी त्यांना, "या लष्कराच्या भाकरी आपण भाजूं नये," असाच सल्ला दिला होता. विष्णुशास्त्री म्हणतात, "वरच्यासारखें पोक्त तत्त्वज्ञान आमच्या वाचकांपैकी शेकडो किंवा हजारो जणांनी ऐकलें असेल. तर हीच स्थिति आजपर्यंत आमच्या देशांत चालत आली आहे. लोकांस अभिमानास चढायास बाजू कोणती ? तर यज्ञोपवीत, गोब्राह्मण इत्यादि. स्वातंत्र्य, जन्मभूमि या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो."
जातिभेद घातक
 हिंदुस्थानांतील अत्यंत बारीकसारीक गोष्टींचा सुद्धा तीव्र, उत्कट, जाज्ज्वल्य अभिमान धरणारे विष्णुशास्त्री ! अंतर्मुख दृष्टि करून स्वदेशाच्या विपन्नावस्थेचें कारण सांगतांना, १८५७ सालच्या तेजस्वी संग्रामाची चिकित्सा करतांना सुद्धा, अतिशय तटस्थपणें, पूर्वग्रहदूषित न होतां एक अतिशय विदारक सत्य सांगू शकतात ! या देशांत देशाभिमान ही वृत्तीच नाही ! पण एवढेच सांगून ते थांबत नाहीत; ही वृत्ति कां नाही हें सांगतांना जातिभेद हे एक मोठे कारण म्हणून त्यांनी सांगितलें आहे. त्याविषयी ते म्हणतात, "याने तर या राष्ट्राची फूट अतिशयितच पाडली आहे. अठरापगड जातींस अठरा टोपकरांनी गुंडाळून टाकले व साऱ्यांच्या हातीं सारखीच करवंटी दिली; पण लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत." येथले ब्राह्मण, तुम्ही त्रिकर्मी नि आम्ही षट्कर्मी हृींच भांडणें भांडत बसले होते. त्याविषयी शास्त्रीबुवा म्हणतात, "यांना एकाहि कर्माची खरी ओळख नाही. मात्र या वादांत बिचारें ब्राह्मण्य तर टेम्स आणि रेणा यांच्या तीरांच्या आश्रयाने जाऊन राहिलें, या गोष्टीची दोघांहि पक्षकारांस शुद्ध नाही."
 देशाभिमान ही वृत्तीच येथे नाही. मग ती आणण्यास शास्त्रीबुवांच्या मतें, उपाय काय ? हा देश पादाक्रान्त करणाऱ्या पाश्चात्त्यांपासून ही गुरुकिल्ली आपण घेतली पाहिजे. त्यांचे इतिहास वाचून, त्यांच्या उलाढालींकडे सतत लक्ष पुरवून, आम्ही किती गचाळ लोक झालों आहों याची प्रचीती आपल्या ठिकाणीं बाणली पाहिजे. (आमच्या देशाला कांही झालें नाही- हा भ्रम सोडून दिला पाहिजे !) ती बाणली असतां लोह-परिस न्यायाने आमचे नादान लोकहि काले करून बाणेदार होतील !
अठरा धातूंची मूस
 या लेखांत विष्णुशास्त्री यांनी पुनः पुन्हा जातिभेदावर टीका केली आहे. लेखाचा समारोप करतांना त्यांनी म्हटलें आहे, (पाश्चात्त्यांपासून आम्ही गुरुकिल्ली घेतली तर) "कालयोगेकरून या अठरा धातूंचीहि चांगली मूस बनून, सर्वांस साधारण जो देश त्याविषयी अभिमानवृत्ति सर्वांच्या हृदयांत स्फुरूं लागतील, व या देशांतील सगळ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यांत अंतर्मुख होऊन एकोप्यापासून सर्वांचें किती हित आहे हे दिवसेंदिवस अधिकाधिक उमजूं लागतील, अशी दृढ आशा आहे."
 राष्ट्रभावनेचा अभाव, जातिभेद, हीं हिंदी लोकांच्या ऱ्हासाची मोठीं कारणें झालीं. पण ऐतिहासिक चिकित्सा करून माणूस वास्तव दृष्टीने पाहू लागला की त्याला या ऱ्हासाचीं, अवनतीचीं अनेक लहानमोठीं कारणें आणि लक्षणे दिसूं लागतात. विष्णुशास्त्री प्रारंभापासून स्वजनांकडे तशाच दष्टीने पाहत होते. त्यांनी स्वजनांवर क्ष-किरणें टाकली आहेत, असें म्हटलें तें याच अर्थाने.
मूढविद्या
 संस्कृत विद्या, जुने पंडित, त्यांचे दशग्रंथी पांडित्य यांचा शास्त्रीबुवांना केवढा अभिमान असावयास हवा ! पण या पंडितांची विद्या जडमूढ होती. म्हणून त्यांना त्यांचा अभिमान तर नव्हेच, उलट तिरस्कार वाटत असे. 'विद्वत्त्व आणि कवित्व' या निबंधांत त्यांनी या पंडितांच्या जड पांडित्यांवर अतिशय परखड टीका केली आहे. त्यांना काव्याची अभिरुचि मुळीच नाही. श्लेषासारखे शब्दचमत्कार याची त्यांना गोडी. या पंडितांना शब्दाचें प्रसन्नार्थत्व व एकार्थत्व कधीहि सहन होत नसतात. अशी टीका करून शास्त्रीबुवा म्हणतात, "युरोपांतील सामान्य पंडितास आमचे काव्य-ग्रंथ जसे समजतात तसे इकडील मोठमोठ्या शास्त्र्यांसहि समजत नाहीत, व त्यांतील अप्रतिम रसाचा आस्वाद घेण्यास हे परस्थ लोक जर आम्हांस न शिकविते, तर तो आम्हांस कधीहि समजताना, यांतहि अगदी संशय नाही. सारांश, या शास्त्राची चांगली माहिती ज्यास करून घेणें असेल त्याने या विषयावरील इंग्रेजी ग्रंथ वाचले पाहिजेत." 'वाचन' या निबंधांत याहिपेक्षा कठोर टीका त्यांनी केली आहे. "या जुन्या शास्त्री, पंडितांस काव्याभिरुचि नव्हतीच, पण एकंदर विद्येचीच अभिरुचि त्यांना नव्हती," असें त्यांनी म्हटलें आहे. विद्याभिरुचीच नसल्यामुळे "खरें विद्यासुख हे जुन्या पद्धतीच्य लोकांस बहुतकरून मुळीच माहीत नाही." या ठिकाणीहि पुन्हा विष्णुशास्त्री यांनी आपल्या लोकांची युरोपीय लोकांशी तुलना केली आहे. "काव्यशास्त्र- विनोदाने ज्यांचा काळ जातो असे धीमान पुरुष युरोप खंडांतच काय सापडतील ते सापडतील. आमच्या हिंदुस्थानांत तर विचारूच नका. येथे पुराणें, ज्ञानेश्वरी इत्यादि ग्रंथ लोक पूर्वी वाचीत असत, पण ते परमार्थ- बुद्धीने ! अर्थज्ञान किंवा रसानुभव घेऊन वाचणारे फारच थोडे. त्यामुळे वाचनापासून होणारा आनंद त्यांस कधी घडत नसे. व्यसन, निद्रा किंवा कलह ह्यांतच त्यांचा काळ जावयाचा !"
युरोपियनांचे उपकार
 'संस्कृत कविता' या लेखांत प्राच्य पंडितांवर अशीच टीका करून विष्णुशास्त्री यांनी युरोपी पंडितांची मुक्तकंठाने स्तुति केली आहे. "आमच्या प्राचीन भाषेचा पुरस्कार जर पाश्चात्त्य पंडितांनी घेतला नसता, तर तिची काय दुर्दशा होऊन जाती, हें सांगवत नाही. या थोर मनाच्या लोकांनी तिचें नुसतें रक्षण केलें इतकेंच नाही तर तिचा सार्वत्रिक प्रसार होण्यास ते कारणीभूत झाले. यावरून साऱ्या भारतवर्षीय जनांवर त्यांचे केवढे उपकार आहेत तें सहज ध्यानांत येईल. शोधकपणा हा जो पाश्चात्य पंडितांचा गुण तो पूर्वीच्या पंडितांत मुळीच नव्हता म्हटलें तरी चालेल. आमच्या प्राचीन विद्यांचें अध्ययन करून त्या आम्ही जागरूक ठेवीत होतों हें खरें पण रत्ने बाळगणारांस जशी रत्नांची पारख नेहमी असतेच असे नाही त्याचप्रमाणे आमची स्थिति होती."
 काव्याभिरुचि नाही, विद्यानंद काय तें जाणण्याची पात्रता नाही, शोधकपणा नाही, आणि आपल्या जवळच्या ग्रंथाची योग्यता समजण्याइतकी सुद्धा कुवत नाही ! हा दोष दिसायला जातिभेद, निवृत्ति यांपेक्षा लहान असला, तरी प्रत्यक्षांत तो तसा नाही, इतकेंच नव्हे, तर संस्कृतीचें जें आद्य लक्षण तेंच आमच्या ठायीं त्या तमोयुगांत नव्हतें, असा त्याचा भावार्थ असल्यामुळे तो दोष अत्यंत घातक होय, हें सहज ध्यानांत येईल. मराठ्यांच्या काळाच्या आधी अनेक शतकें हा देश अवनत स्थितीतच होता, असें एक-दोन ठिकाणी विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे; आणि त्यामुळे आर्य लोकांचा धर्म, विद्या, यांचा सर्वथा लोप होण्याचा समय आला होता तो मराठ्यांच्या पराक्रमामुळे टळला, असेंहि त्यांनी म्हटले आहे. वरील विवेचनावरून असें दिसतें की, मराठ्यांच्या पराक्रमामुळे सर्वनाश होण्याचें जरी टळले तरी विद्याभिरुचि, शोधकपणा, ज्ञानलालसा हे गुण कांही आपल्या पंडितांना लाभले नाहीत. ते युरोपियनांनी शिकविले तेव्हा त्यांचे महत्त्व आम्हांला समजलें. यावरून विद्याभिरुचीचा लोप हा समाजाला किती घातक ठरतो हें कळून येईल.
निष्णात वैद्य
 विष्णुशास्त्री यांनी आत्मनिरीक्षण कसें केलें आहे या दृष्टीने निबंधमाला तपासून पाहतां, असें दिसतें की, एखादा निष्णात वैद्य रोग्याची प्रकृति तपासूं लागला म्हणजे, बाह्यतः क्षुल्लक दिसणाऱ्या लक्षणांवरूनहि अंतरांतल्या मोठ्या व्याधी जसा अचूक जाणतो, त्याचप्रमाणे विष्णुशास्त्रीहि हिंदी जनांच्या मनाला जडलेल्या व्याधी जाणीत होते. जॉनसनचें चरित्र हा त्यांचा प्रबंध पाहा. प्रारंभीच त्यांनी सांगितलें आहे की, "हिंदुस्थानांतील जुन्या-नव्या कोणत्याहि भाषेत चरित्र-लेखनाचा प्रकार मुळीच आढळत नाही. आता शंकरविजय, ललितविस्तार, भोजप्रबंध किंवा भक्तिविजय, संतलीलामृत अशांसारखे ग्रंथ संस्कृतांत व मराठींत आहेत खरे, पण पुराणांत व इतिहासांत जितकें अंतर तितकेंच वरील ग्रंथांत व खऱ्या चरित्रांत ! ग्रीक व रोमन लोकांत प्लूटार्क, कॉर्नेलियस, नीपॉस वगैरे चरित्रकार जसे होऊन गेले तसा प्रकार इकडे बहुधा कधीहि झाला असेलसें वाटत नाही!" याचें कारण काय ? तर या रचनाविशेषाची अभिरुचीच लोकांत नव्हती व अजूनहि नाही !
पुराण-वृत्ति
 अभिरुचि नाही ! पुराणांची अभिरुचि आहे; पण इतिहासाची नाही; आणि इतिहासाची नाही तशीच- किंवा म्हणूनच चरित्राची- नाही. याचा अर्थ असा की, वास्तव सृष्टीचें- जड किंवा मानवी वास्तव सृष्टीचें- जें ज्ञान त्याचीच अभिरुचि आम्हांला नाही. हा काय लहान दोष आहे ? किंबहुना या दोषामुळेच इतर अनेक व्याधी आम्हांला जडल्या, असें म्हटलें तरी चालेल. याच पुराणप्रेमी वृत्तीचे, पुढे डॉ. जॉनसन यांची चरित्रासाठी कां निवड केली, हें सांगतांना, शास्त्रीबुवांनी वर्णन केलें आहे. सर्वसाधारणपणें लोकांना अद्भुत पराक्रम करणाऱ्या लोकांचीं, चमत्कार करणाऱ्या संतांची चरित्रें हवीं असतात. ज्ञानेश्वर, नामदेव, भक्त प्रल्हाद, सती सावित्री यांच्या चरित्रांत चमत्कार असतात. म्हणजे तीं चरित्रे हीं पुराणेंच असतात. म्हणून ती लोकांना आवडतात. तीं सोडली तर शिकंदर, कोलंबस, वॉशिंग्टन यांची चरित्रे ते वाचतील. यांत दैवी चमत्कार नसले तरी अद्भुत पराक्रम असतात; आणि लोकांना ते पराक्रम दैवी आहेत, असेंच वाटत असतें. अशा लोकांविषयी शास्त्रीबुवा म्हणतात, "चरित्रांच्या वाचनापासून होणारा वास्तविक फायदा, त्यांस बिलकूल कळलाच नाही, असें म्हटलें पाहिजे."
वास्तवाची अभिरुचि
 हेच खरें आहे. मानवाचीं चरित्रे त्यांना नकोच असतात. आपल्याकडे इतिहास-लेखन कां झालें नाही, हें सांगतांना विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, आपल्या लोकांना नरस्तुति गाण्याचा कंटाळा होता. हें त्यांचे निदान अगदी बरोबर आहे. डॉ. जॉनसन याच्या चरित्रापासून काय मिळणार ? संसारास व लोकव्यवहारास सदुपदेश प्राप्त होतो, तसा सार्वभौम राजांच्या लढायांपासून होणार नाहीं- असें शास्त्रीबुवा म्हणतात. हिंदी जनांना लोकव्यवहाराची चिंताच नव्हती. संसाराची काळजीच नव्हती. कारण तो मायामय असून क्षणिक आहे. चिरंतन आहे तो परमार्थ. तो पुराणांतील व्यक्तींच्या चरित्रांत आढळतो ! म्हणून येथे पुराणें व तत्सम चरित्रे शेकड्यांनी झाली. लोकव्यवहारास उपयुक्त अशीं चरित्रें झालींच नाहीत. त्यांची म्हणजे वास्तवाची अभिरुचि निर्माण करावी म्हणून तर विष्णुशास्त्री यांनी जॉनसनचें चरित्र लिहिलें.
शब्दप्रामाण्य
 विद्येची अभिरुचि नाही, हें जसें फार मोठें व्यंग तसेंच वास्तवाची अभिरुचि नाही, हेंहि फार मोठें घातक व्यंग होय. हिंदुस्थानांत प्राचीन काळांत उत्तम टीका-वाङमय नाही, ग्रंथांचें परीक्षण नाही हें सांगतांना अशाच आणखी एका व्यंगाचा त्यांनी निर्देश केला आहे. प्राचीन काळी हिंदुस्थानांत इतिहासरचना नव्हती, चरित्र- लेखन नव्हतें, त्याचप्रमाणे, ग्रंथावर टीका हा प्रकारहि म्हणण्यासारखा नव्हता, असें 'ग्रंथावर टीका' या निबंधांत विष्णुशास्त्री म्हणतात. याचें कारण काय ? शब्दप्रामाण्य-बुद्धि ! हें तिसरें मोठें व्यंग होय. विष्णुशास्त्री यांनी या शब्दांत तें मांडलेलें नाही; पण त्यांचा भावार्थ तोच आहे. ते म्हणतात, "आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्याचा अधिकार आपणांस नाही, अशी मागे समजूत होती." यानंतर पुढे नव्या विद्वानांविषयी लिहितांना ते म्हणतात की, "आतासारखें मनाचें स्वातंत्र्य पूर्वी कधी नव्हते, असे इंग्रज सरकारचे पोवाडे हे नवे विद्वानच गातात; आणि मेकॉले मिल्ल, डॉ. विल्सन यांवर आम्हीं टीका केली तर तें महापातक असें त्यांना वाटतें. याचा अर्थ असा की, पूर्वी मनाचें स्वातंत्र्य नव्हतें म्हणूनच आपल्याकडे टीका- वाङमय झालें नाही. मल्लीनाथासारखे टीकाकार झाले, पण ते शब्दार्थ, व्याकरण यापलीकडे कधी गेले नाहीत. त्यामुळे काव्याचे हृदगत् विशद करून त्याची परखड गुणदोष- चिकित्सा करणें हें पूर्वी कधी झालें नाही 'संस्कृत कविता' या निबंधांत विष्णुशास्त्री लिहितात, "सुमारे तीनशे वर्षापूर्वी युरोप खंडांत ज्याप्रमाणे ॲरिस्टॉटल याच्या ग्रंथांचे प्राबल्य असे व त्यांत यत्किचितहि दोष काढणें म्हणजे केवळ पातकच, असें लोक मानीत असत त्याचप्रमाणे आपल्या देशांतील पंडितांची देखील कवि, शास्त्रकार, इत्यादींविषयी समजूत असावी असें दिसतें. मिल्टन, ड्रायडन, बेकन इत्यादि महान् ग्रंथकारांविषयी इंग्रेज ग्रंथकार अगदी निर्भीडपणें जो अभिप्राय देतात तो वाचून, आमच्या देशांतील पंडितांच्या तर अंगावर खरोखर काटा उभा राहील !"
 तेव्हा पाश्चात्त्यांप्रमाणे टीका- वाङमय येथे निर्माण न होण्याचें कारण, शास्त्रीबुवांच्या मतें, शब्दप्रामाण्य-बुद्धि किंवा विचारस्वातंत्र्याचा अभाव हेंच होतें हे यावरून दिसून येईल. 'भाषापद्धति' या निबंधांत विनोदात्मक लिहिण्याची प्रवृत्ति मराठींत किंवा संस्कृतांत पूर्वी नव्हती, हा विचार त्यांनी मांडला आहे. मात्र त्याची कारणमीमांसा त्यांनी कोठेच केलेली नाही. पण ती केली असती तर हेंच कारण त्यांनी दिलें असतें. कारण विनोद ही कोणत्या ना कोणत्या व्यंगावर टीकाच असते.




-१०-

इहवादी दृष्टिकोन


 आपल्या समाज-पुरुषाच्या देहावर क्ष-किरणें टाकतांना विष्णुशास्त्री यांनी पूर्णपणे इहवादी दृष्टिकोन स्वीकारला होता, हें मागील विवेचनावरून ध्यानांत येईल; पण त्या लेखांत ज्या व्यंगांचा, दोषांचा विचार केला आहे त्यांचा परमार्थाशीं, धर्माशीं, अध्यात्माशी फारसा संबंध नव्हता. देशाभिमान ही वृत्ति, काव्याची वा विद्येची अभिरुचि, वास्तव- दृष्टि, विनोद-बुद्धि यांचा येथे अभाव होता, असें म्हणण्यांत धर्म-ग्रंथाला, धार्मिक परंपरेला धार्मिक तत्त्वांना कोठे बाधा पोचत नव्हती; पण ज्या तत्त्वांचीं, रुढींचीं, परंपरांची मुळें धर्मामध्ये आहेत त्यांची चिकित्सा करतांनाहि ते इहवादी दृष्टीचाच अवलंब करतात, असें आपणांस दिसून येईल. इंग्रजी विद्येला वज्र म्हणणाऱ्या व भौतिकज्ञान हेंच सर्व उन्नतीचें साधन आहे असें सांगणाऱ्या पंडिताच्या बाबतींत असें नसतें तरच नवल वाटलें असतें.
निवृत्ति
 आपल्या धार्मिक परंपरेंत अनेक शतकें निवृत्तिवादाचें फार महत्त्व होतें, हजारो वर्षे हिंदी लोक परलोकवादी व इहविमुख होऊन बसले होते, हें सर्वांस माहीतच आहे. 'इतिहास' या निबंधाच्या प्रारंभीच प्राचीन हिंदु लोकांत सप्रमाण व खरे इतिहास लिहिण्याची प्रवृत्ति कां नव्हती हें सांगतांना, निवृत्तिवाद हे एक मोठे कारण म्हणून विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे. ते म्हणतात, "आपल्या लोकांच्या मनाचा एकंदर कल निवृत्तिमार्गाकडे जेवढा दृष्टीस पडतो तेवढा प्रवृत्तिमार्गाकडे नाही. जग सर्व मिथ्या आहे, प्रपंचांतील सर्व व्यवहार लटके आहेत, अवघा ईश्वरी मायेचा गोंधळ आहे. "दिसें क्षणिक सर्व हें भरंवसा घडीचा नसे," असे विचार ज्यांच्या मनांत नेहमी घोळावयाचे, ज्यांचा परमार्थाकडेच विशेष ओढा, अशा लोकांस रक्तपात, राज्यांच्या घडामोडी वगैरे गोष्टींची वर्णने करून नरस्तुति गात बसण्याचा कंटाळा असल्यास नवल काय?"
 निवृत्ति, परमार्थप्रवणता, इहविमुखता हा विषय मोठा आहे. ती समाजाच्या ऱ्हासास कशी कारण होते याचें विवेचन करण्यास मोठा ग्रंथच लिहावयास हवा. (लो. टिळकांनी पुढे तो लिहिलाच.) त्या दृष्टीने पाहतां हें वरील विवेचन अगदी स्वल्प आहे. खरें म्हणजे तें विवेचन नाहीच. मनांत आलेला विचार त्यांनी मांडला इतकेंच; पण या निवृत्तिमार्गांतील संपत्तीची निंदा व काम-क्रोध-मद-मत्सरादि षड्रिपूंचा निषेध ही जीं प्रधान तत्त्वें, त्यांविषयी विष्णुशास्त्री यांनी जें सविस्तर विवेचन केलें आहे त्यावरून, निवृत्ति हें आपल्या समाजाचें फार मोठे व्यंग आहे, ती एक मोठी व्याधी आहे, असें त्यांचें मत होतें, याविषयी शंका राहत नाही.
धन - एक शस्त्र
 'संपत्तीचा उपभोग' आणि 'गर्व' या निबंधांत, या दोन गोष्टींविषयी जुन्या तत्त्ववेत्त्यांचे जे विचार आहेत त्यांवर शास्त्रीबुवांनी अगदी परखड टीका केली आहे. संपत्ति, धन, लक्ष्मी यांविषयी प्राचीन महाज्ञानी पुरुष, थोर तत्त्ववेत्ते यांची मतें काय होतीं तें सांगतांना त्यांनी "मूढ जहीहि धनागमतृष्णाम्" इत्यादि वचनें देऊन खुद्द शंकराचार्यांचेच विचार मांडले आहेत. आणि एवढा मोठा प्रतिपक्षी समोर स्वतःच उभा करून, त्याचीं मतें एकदेशीय आहेत, असें आपलें मत स्वच्छ सांगितलें आहे. अनेक प्रमाणें देऊन त्यांनी असें दाखवून दिलें आहे की, दुराचार, मदांधता इत्यादि संपत्तीपासून होणारे जे अनर्थ त्यांचा संपत्तीशी कार्यकारणरूप संबंध कांही नाही. मोठी राजसत्ता भोगीत असतांहि या विकारांपासून मुक्त असलेल्या राजरत्नांचीं आपल्या इतिहासांत अनेक उदाहरणे आहेत; आणि संपत्तीपासून जसे अनर्थ होतात तसे अनेक लाभहि होतात! तें एक शस्त्र आहे. त्याच्यापासून लाभ किंवा हानि होणें सर्वस्वी त्याच्या मालकावर अवलंबून आहे. यास्तव संपत्तीची स्तुति किंवा निंदा दोन्ही व्यर्थं होत.
धन - पुरुषार्थसाधन
 जें व्यक्तीच्या बाबतींत तेंच राष्ट्राच्या बाबतींत. राष्ट्रांत संपत्ति फार झाली म्हणजे त्याच्या ऱ्हासास प्रारंभ झालाच म्हणून समजावें, असें मत गेल्या (अठराव्या) शतकाच्या अखेरपर्यंत रूढ होतें. 'ऋद्धिः चित्त विकारिणी ।' हें वचन प्रसिद्धच आहे; पण शहाणा जो आहे तो जसा धनाने मदांध होऊन जात नाही, त्याचप्रमाणे ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे, त्यास धनाची समृद्धि कांहीहि अपाय न करतां, उलटी, अधिकच बलाढ्य करते. यास उदाहरणें अलीकडचीं इंग्लंड, फ्रान्स, प्रशिया इत्यादि राज्यें व प्राचीन काळचीं रोम, कार्थेज हीं राज्ये होत. हीं उदाहरणें सविस्तर देऊन शेवटीं शास्त्रीबुवांनी निष्कर्ष सांगितला आहे की, "संपत्तीची विपुलता ही उत्कर्षास किंवा अपायास कारण होणें हें राज्यांच्या अंगच्या मजबुतीवर अवलंबून आहे. म्हणून तीं बुडाल्याचें अपेश तिच्यावर घालणे बरोबर नव्हे." या संपत्तीच्या विवेचनांतील एका वाक्यावरून विष्णुशास्त्री यांची इहवादी दृष्टि स्पष्ट दिसून येते. ते म्हणतात. "धर्माच्या व नीतीच्या आड न येतां परमेश्वराने सुखाचे जे हजारो पदार्थ या पृथ्वीवर निर्माण केले आहेत त्यांचें सुख घेणें, हें अगदी रास्त आहे. फार तर काय, आपल्या शास्त्राप्रमाणे असें करणें हें तिसऱ्या पुरुषार्थाचें साधन करणें होय." मानवाच्या ऐहिक सुखाविषयी हाच विचार पुढे आगरकरांनी जास्त सविस्तर मांडला आहे. ऐहिक सुखाविषयीची ही दृष्टि अगदी अर्वाचीन आहे.
काम-क्रोध - मित्र
 संपत्तीचा प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी निषेध केला आहे म्हणून त्यांच्यावर विष्णुशास्त्री यांनी टीका केली ती सौम्य आहे; पण त्यांनी काम-क्रोधादि विकारांना षड्रिपु म्हटलें व त्यांची निंदा केली म्हणून शास्त्रीबुवांनी जी टीका केली आहे ती अगदी प्रखर आहे. ते म्हणतात, "परमेश्वराने मनाच्या ज्या निरनिराळ्या शक्ति निर्माण केल्या आहेत व त्यांस निरनिराळ्या वृत्ति जडविल्या आहेत, त्यांस अहेतुक किंवा अनर्थावह म्हणणें हें धर्माच्या दृष्टीने पाप व न्यायाच्या दृष्टीने मूर्खत्व होय." या विकारांचा विचार करतांना त्यांनी त्यांना घोड्याची उपमा दिली आहे. "बसणारा जर चतुर असेल तर त्याचा हवा तसा उपयोग करून घेता येतो; पण तो जर कच्चा असेल तर घोडा त्यास खड्ड्यांत नेऊन टाकील. तेंच काम-क्रोधादि षड्विकारांचें आहे. तेव्हा हे सहा जण जगाचे केवळ शत्रूच आहेत असें नाही. उलट असेंहि म्हणतां येईल की, ते जगाचे हितकर्ते मित्रहि पण आहेत; या वृत्ति अनर्थकारक नाहीत. त्यांपासून मनुष्यास फार उपयोग आहे. इतकेंच मात्र की, त्यांस मनुष्याने नेहमी स्वाधीन ठेवून त्यांस आपण सर्वथा वश कधीहि होतां कामा नये."
 षड्विकारांसंबंधीचें हें विवेचन 'गर्व' या निबंधांत आलें आहे. त्यांत प्रामुख्याने गर्व, अभिमान, अहंता या मनोवृत्तीचेंच विवेचन आहे; व त्याचा निष्कर्षहि असाच आहे. श्रीमंती, रूप इत्यादिविषयीचा गर्व हा दोषरूपच होय; पण थोर पुरुषांनी आपल्या गुणांचा गर्व वाहिला तर तो दोषावह न होता उलट शोभादायकच होतो. मौजेची गोष्ट अशी की, शोभादायक गर्वाचीं, आत्मस्तुतीचीं उदाहरणें देतांना विष्णुशास्त्री यांनी मिल्टन, वर्डस्वर्थ, भवभूति, जगन्नाथपंडित अशा कवींची उदाहरणें तर दिलीं आहेतच; पण त्यांच्या जोडीला परम भगवद्भक्त जे तुकाराम त्यांचेंहि उदाहरण दिले आहे. "तोवरी तोवरी माळामुद्राभूषण । जंवतुक्याचें दर्शन झालें नाही ॥" "तुका म्हणे आता उरलों उपकारापुरता ।" या त्यांच्या वचनांवरून थोर पुरुषांना गर्व ही वृत्ति शोभादायकच ठरते, हें विष्णुशास्त्री यांचें म्हणणें यथार्थ वाटतें.
गर्वाचे महत्त्व
 या विकारांचा मनुष्याला फार उपयोग आहे, फार उपयोग आहे, असें या निबंधांत वारंवार म्हटलें आहे आणि त्यांच्या स्वतःच्या काळचेंच उदाहरण दिलें आहे. त्या वेळी इंग्रज पंडित, मिशनरी व राज्यकर्ते यांनी भारताच्या प्राचीन परंपरेची, धर्माची व थोर पुरुषांची निंदा करण्याचा विडाच उचलला होता; आणि त्यामुळे हिंदी लोक मनाने खचून जाण्याचा फार संभव होता. ही आपत्ति ध्यानांत घेऊन शास्त्रीबुवांनी त्यांना उपदेश केला आहे की, "वरील निंदेने त्यांनी बिलकुल खचून जाऊं नये, आणि मेकॉलसारख्या मोठ्या नांवास न भितां व मिशनरी, पाद्री, बाटे यांच्या रांगास न जुमानतां आपल्या देशावर वरील लोकांनी जीं अज्ञानमूलक व दुराग्रहजन्य परोपरीचीं दूषणें दिलों आहेत, त्यांचें यथास्थित खंडन करावें." असें सांगून शेवटीं समारोप करतांना ते म्हणतात, "याप्रमाणे या मनोवृत्तीचा- गर्वाचा मनुष्यास अत्यंत उपयोग आहे. ही त्याचे ठायीं वास करीत नसेल तर मत्सरी व द्वेषी मनुष्याच्या निर्भत्सनेखाली तो तेव्हाच खचून जाऊन, त्याच्या अंगचे खरे गुणहि कदाचित् लोपून जातील."
 धन-संपत्ति, काम-क्रोधादि षड्विकार यांची प्राचीन धर्मवेत्त्यांनी, साधूंनी, संतांनी एकजात निंदा करून त्यांना मानवाचे शत्रु ठरविलें आहे. असे असूनहि विष्णुशास्त्री यांनी त्यांच्यावर ही टीका करून, या मनोवृत्तींची मनुष्याने योग्य मर्यादित का होईना, पण जोपासना केली पाहिजे, असें निर्भय प्रतिपादन केलें. यांतचं त्यांची विज्ञाननिष्ठ, इहवादी दृष्टि स्पष्ट दिसून येते.
धननिषेध अयोग्य
 धन-संपत्ति, पैसा, द्रव्य यांचा ख्रिस्ती धर्मानेहि हिंदु धर्माप्रमाणेच निषेध केला आहे. युरोपांतील धर्मंक्रांतीचे प्रणेते लूथर, काल्व्हिन, यांसारखे जे धर्मसुधारक त्यांनी कॅथॉलिक पंथाच्या या संपत्तिविषयक दृष्टीचा निषेध करून भांडवलाला, भांडवलदारीला, व्यापाराला व सर्व आर्थिक उद्योगांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नसती, तर युरोपांत औद्योगिक क्रान्ति झालीच नसती. कॅथॉलिक धर्माला व्याजबट्टा मंजूर नाही. त्यामुळे सावकारीचा सर्व धंदा प्राधान्याने ज्यू लोकांच्या हातीं होता. त्यांना खिस्ती धर्म-बंधने लागू नव्हती. अर्थशास्त्र व भौतिक विज्ञान यांची वाढ युरोपांत अठराव्या शतकांत झाली. तेव्हा शेती हा धंदा श्रेष्ठ व कारखानदारी, व्यापार हे हीन व्यवसाय होत हा सिद्धान्त पदभ्रष्ट झाला. प्रॉटेस्टंट पंथाचा एक अध्वर्यु जीन काल्व्हिन याला त्याच्या चरित्रकाराने भांडवलशाहीच्या विकासाचें श्रेय दिलें आहे. कारण त्याने सावकारी, व्यापार, कारखाने, पेढी या उद्योगांना नैतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढील शतकांत विज्ञानाने तिलाच दृढता आणली व म्हणूनच युरोपच्या आर्थिक प्रगतीचा पाया घातला गेला. संपत्तीविषयीची हीच नवी दृष्टि विष्णुशास्त्री यांना आपल्या समाजांत रूढ करावयाची होती, असें 'संपत्तीचा उपभोग' या निबंधावरून दिसतें. ते दीर्घकाल जगते तर या विषयावर त्यांनी निश्चित ग्रंथरचना केली असती.
कार्यकारण भाव
 पण याहिपेक्षा, विष्णुशास्त्री यांची खरी विज्ञाननिष्ठा स्पष्ट दिसून येते ती त्यांच्या 'लोकभ्रम' या निबंधांतून. भुतेंखेतें, शकुन व फलज्योतिष यांविषयी त्यांनी जें विवेचन केलें आहे त्यावरून ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन झाल्यावर युरोपांत जें प्रबोधनयुग निर्माण झालें तेंच महाराष्ट्रांत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; याविषयी शंका राहत नाही. कार्यकारणभावाचा उदय हे प्रबोधनयुगाचें पहिले व प्रधान लक्षण होय. 'रॅशनॅलिझम इन् युरोप' या आपल्या ग्रंथांत लेकी या पंडिताने याचें उत्तम विवेचन केलें आहे. या कार्यकारण भावाचा संस्कार लोकमानसावर करावा हाच हे निबंध लिहिण्यांत शास्त्रीबुवांचा हेतु स्पष्ट दिसतो. शकुन-अपशकुन आणि त्यांची सांगितली जाणारीं फळें, आकाशांतील ग्रह व मानवाचें भवितव्य यांच्यांत कसलाहि कार्यकारणसंबंध नाहीं हें त्यांनी पुनः पुन्हा सांगितलें आहे व कोणत्याहि गोष्टीची सत्यासत्यता ठरवावयाची ती प्रत्यक्षप्रमाणाने ठरवावी, असा सारखा आग्रह चालविला आहे.
हा दीडशहाणा!
 सामान्यतः लोक गतानुगतिक असतात. एकाने मानलें म्हणून दुसरा मानतो, आणि मग शेकडो, हजारो लोक तेंच खरें मानून त्यावर अचल श्रद्धा ठेवतात; आणि त्याच्या विरुद्ध कोणीं कांही सांगितलें, तर हजारो लोक मानतात ते मूर्ख, आणि हाच काय तो शहाणा, असा युक्तिवाद करतात. असले युक्तिवादच प्रगतीच्या आड येत असतात. विष्णुशास्त्री म्हणतात, "आजपर्यंत साक्रेटीस, कोलंबस, ग्यालिलिओ, न्यूटन, बेकन, वॉट वगैरे जे मोठमोठे शोधक होऊन गेले त्या सर्वांशीं बाकीच्या अज्ञानग्रस्त जगाचें हेंच भांडण; 'आज हाच निघाला दीडशहाणा आम्हांस सांगायला, आजपर्यंत लोक झाले ते सगळे मूर्खच!" एकंदर लोकांची मोठी चूक दृष्टीस पडते की, एखाद्या गोष्टीचा खरेपणा तिच्या स्वरूपावरून न पाहतां ते नेहमी बहुमताकडे धांवत असतात. याचकरिता लोकशिक्षणाचा फैलाव होईल तेवढा देशास हितावहच होतो. त्याच्या योगाने लोकांचें भ्रमजाल तुटून सत्या- सत्याची निवड करण्याचें त्यांच्या अंगीं सामर्थ्य येऊ लागतें."
ज्ञानाचा प्रभाव
 हें सामर्थ्य ज्यांना नाही त्यांचीं मनें दुबळी झालेली असतात, त्यांना क्षीणत्व आलेलें असतें; आणि अशीं क्षीण मनाचीं माणसें ज्ञानसंपन्नापुढे सहजच हतप्रभ होऊन त्याची गुलाम होतात. कोलंबसाचें विष्णुशास्त्री यांनी दिलेलें उदाहरण फार उद्बोधक आहे. अमेरिकेजवळील एका बेटांतील आदिवासी लोक त्याच्याशीं थोडें उद्दामपणे वागूं लागले होते. त्या सुमारासच चंद्रग्रहण आलें होतें. कोलंबसाला तें माहीत होते; त्या आदिवासीजनांना अर्थातच हें ज्ञान नव्हतें. त्याचा फायदा घेऊन कोलंबसाने त्यांना धमकी दिली की, आज रात्रीं मी माझें सामर्थ्य तुम्हांला दाखवतों, आणि रात्री चंद्राचा ग्रास होऊं लागलेला पाहतांच, याच्या अंगी देवी सामर्थ्य आहे. अशी त्यांची खात्री झाली व अत्यंत भयभीत होऊन ते त्याला शरण आले!
मानसिक क्रांति
 इंग्रजी विद्या हें वज्र आहे व तें आपण हस्तगत केलें पाहिजे, असें विष्णुशास्त्री कां म्हणत असत, तें यावरून ध्यानांत येईल. इंग्रजांची भौतिक विद्या व तिच्यापासून त्यांना प्राप्त झालेल्या वीज, वाफ इत्यादि शक्ति यांमुळे हिंदी जनता दिपून गेली होती; व ते आदिवासीजन कोलंबसाला जसे शरण गेले तशी ही जनता इंग्रजांना शरण गेली होती. तेव्हा त्या जनतेला या भ्रामक श्रद्धेपासून मुक्त करण्यासाठी, लोकांत मानसिक क्रांति घडविणें अवश्य आहे, हे त्यांनी जाणलें होतें आणि म्हणूनच ज्ञानाची, इंग्रजी विद्येची उपासना ते त्यांना सांगत होते. युरोपांतील देशांची अर्वाचीन काळांत जी प्रगति झाली ती सृष्टिज्ञानामुळे झाली याविषयी त्यांना शंका नव्हती. यामुळेच लोकभ्रमांवरील निबंधांत सारखी केप्लर, गॅलिलिओ, बेकन, न्यूटन, यांची उदाहरणें त्यांनी दिली आहेत व त्यांचा मोठा गौरव केला आहे. ते म्हणतात, सूर्याची स्थिरता, पृथ्वीचें भ्रमण, तिची अंतराळांत निराधार स्थिति, पदार्थमात्राचें आकर्षण करण्याची तिच्या अंगची शक्ति इत्यादि ज्योतिषांतील प्रमेयें, त्यांचे सोपपत्तिक ज्ञान होऊन संपूर्ण सृष्टीचें नव्या ज्ञान-नेत्राने जेव्हा मनुष्य अवलोकन करूं लागतो तेव्हा त्याचा अधिकार काय सांगावा! त्याच्या ज्ञान-नेत्राचा टप्पा सृष्टीच्या सीमेपर्यंत जाऊन पोचतो असें म्हणावयास चिंता नाही! विष्णुशास्त्री यांना जी मानसिक क्रांति अभिप्रेत होती ती ही. लोकांच्या मनांतले सर्व भ्रम नष्ट व्हावे व वस्तूचें रूप स्वतः पाहून तिच्याविषयी निर्णय करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त व्हावे यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप होता.
विधवा - साध्वी
 मनाचें हें सामर्थ्य हाच सर्व सामाजिक व धार्मिक क्रांतीचा पाया होय, त्यांनीच दिलेल्या एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. आपल्याकडे विधवा स्त्रीचें दर्शन हा मोठा अपशकुन मानण्यांत येतो. त्याचा अत्यंत कडक शब्दांत निषेध करून ते म्हणतात, "असा अपशकुन मानणें हें विपद्ग्रस्त मानवी प्राण्याचा उपमर्द करणें आहे. हा प्रकार मुळीच केवढा मूर्खत्वाचा आहे. जी अत्यंत सदाचरणाने आपलें आयुष्य क्रमून आपल्या कुलास तर काय, पण सगळ्या मनुष्यजातीस भूषण आणीत आहे, त्या साध्वीचें दर्शन, पुरते तेरा दिवसहि जाऊं न देतां जो निर्लज्ज व विषयांध पुन्हा नवरा मुलगा होऊन उभाच, अशा पुरुषाने अशुभ मानावें हा केवढा उलटा न्याय!" हजारो वर्षे ज्या विधवा स्त्रीला धर्मशास्त्रकारांनी रूढींनी, लोकाचारांनी निद्य मानलें, अपशकुनी मानलें, करंटी, दळभद्री, असा जिचा उपहास केला तिला साध्वी म्हणण्याचें, मानवजातीला ती भूषण, असें म्हणण्याचे धैर्य, हें त्या सामर्थ्यांतूनच येते.

आस्तिक्य-बुद्धि
 प्रारंभीच सांगितलें आहे की, निवृत्ति, लक्ष्मीची अनर्थावहता, षड्रिपु, शकुन- अपशकुन, फलज्योतिष यांची पाळेंमुळे धर्मशास्त्रांत रुतलेली आहेत. तेव्हा अशा विषयासंबंधी रूढीविरुद्ध प्रतिपादन करण्यामुळे धर्मश्रद्धा कमी होऊन नास्तिकपणा वाढविलासा होईल, अशी शंका वाचकांना येण्याचा संभव होता. त्याविषयी खुलासा करतांना विष्णुशास्त्री म्हणतात की, "ही केवळ भ्रांति होय. या लोकभ्रमांचा व धर्माचा बिलकुल संबंध नाही. उलट त्यांचा कांही अंशी धर्माशीं विरोधच आहे;" पण ज्योतिषावरील निबंधाचा समारोप करतांना, याच्याहि पुढे जाऊन, केप्लर, न्यूटन यांनी ज्याचें प्रणयन केलें त्या खऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनामुळे व मननामुळे मनुष्याच्या ठायीं आस्तिक्य-बुद्धि उत्पन्न होऊन जगत्कर्त्या परमेश्वराच्या ठायीं भक्ति वृद्धिंगत होते, हा विचार त्यांनी मांडला आहे.
विज्ञानपूत दृष्टि
 विज्ञानाच्या प्रगतीमुळे, सृष्टिज्ञानामुळे परमेश्वरावरील भक्ति, प्रीति व श्रद्धा दृढ होते हा विचार पूर्णपणे इहवादी आहे. हॅनस कोहन या पंडिताने 'आयडिया ऑफ नॅशनॅलिझम' या आपल्या ग्रंथांत युरोपांतील धर्मक्रांतीचा विचार करतांना हाच मुद्दा मांडला आहे. न्यूटनने विश्व नियमबद्ध आहे हे सिद्ध केल्यामुळे लोकांना निसर्ग व परमेश्वर यांविषयी भीति न वाटतां भक्ति वाटू लागली. परमेश्वर हा अनियंत्रित सुलतान नाही, तर नियमांनी, कायद्यांनी बद्ध असा शास्ता आहे, आणि हें विश्वहि त्याने नियमबद्ध करून ठेविलें आहे, हें पाहून लोकांना आनंद झाला व त्यांची परमेश्वराविषयीची भक्ति व आदर द्विगुणित झाला, असें कोहनने म्हटले आहे. विष्णुशास्त्री यांनी हेंच प्रतिपादन केलें आहे. ते म्हणतात, "परमेश्वराच्या ठायी प्रीति व भक्ति या दोन्ही वृत्ति, सृष्टीचें लेशमात्रहि अवलोकन लक्षपूर्वक केलें असतां, सुज्ञ मनुष्यांच्या मनांत उत्पन्न होणाऱ्या आहेत; आणि धार्मिकपणाचें मूळ जी आस्तिक्य-बुद्धि ती प्रस्तुत शास्त्राने मनुष्याच्या मनांत दृढ होणार आहे." यावरून भुतेंखेंतें, शकुन-अपशकुन यांच्यावरच काय, परंतु परमेश्वरावरहि अंधश्रद्धा असू नये, असें विष्णुशास्त्री यांचें मत होतें हे दिसून येईल. आस्तिक्य-बुद्धीला सुद्धा, त्यांच्या मतें, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन यांचा आधार हवा. ही विचारसरणी अगदी अद्ययावत व विज्ञानपूत अशीच आहे.




-११-

टीकाकार विष्णुशास्त्री


 विष्णुशास्त्री यांच्या जीवनाचे ध्येय काय होतें, त्यांच्या बहुविध कार्यांचें उद्दिष्ट काय होतें, दहा वर्षांत 'शालापत्रक', 'निबंधमाला' व 'केसरी' यांत त्यांनी जें अनेक प्रकारचें साहित्य निर्माण केलें त्यांतून त्यांना अंततः काय साध्य करावयाचें होते याची, आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून स्पष्ट कल्पना यावी, असें वाटतें.
लेखणीचे उद्दिष्ट
 त्यांना या भूमींत नवी सृष्टि निर्माण करावयाची होती. येथल्या मानवी मनांत फार मोठें परिवर्तन घडवून आणावयाचें होते. येथले सर्व लोक पुराणयुगांत राहत होते, त्यांना वास्तवांत आणून उभे करणें हें त्यांच्या लेखणीचें उद्दिष्ट होतें. पुराणांतल्या देवदेवतांच्या असंभाव्य कथा, त्यांतले अद्भुत चमत्कार लोकांना खरे वाटत असत. इंग्रज हे रावणासारखे आहेत व त्यांच्या पराभवासाठी राम पुन्हा अवतार घेईल, अशी त्यांची श्रद्धा होती. अशा या लोकांना कार्यकारणांच्या नियमांचा बोध करावा, वास्तव सृष्टि पुराणसृष्टीहून अगदी निराळी आहे, हें त्यांन. शिकवावें, हा त्यांचा हेतु होता. हजारो वर्षे येथले लोक शब्दप्रामाण्यवादी होऊन त्यांच्या ठायीची, कार्यकारणाने, तर्काने, अनुभवाच्या आधाराने विचार करण्याची शक्ति नष्ट झाली होती. ती शक्ति जागृत करण्यासाठी विष्णुशास्त्री प्रयत्नशील होते.
 जवळ जवळ प्रत्येक निबंधांत, आमच्या जुन्या लोकांच्या कांही विलक्षण समजुती आहेत, त्यांना विचार करण्याची सवय नसल्यामुळे त्या दृढ होऊन बसल्या आहेत, म्हणून त्यांना ज्ञान देऊन, विचार करण्यास शिकविलें पाहिजे, हा विचार त्यांनी मांडलेला आढळतो. इतिहासाचा अभ्यास कशासाठी करावा? त्याने विचार- क्षमता वाढते. ग्रंथवाचनाचें फल काय? त्यामुळे विचार करण्याची सवय लागते. लोकभ्रम केव्हा नष्ट होतील? कार्यकारणसंबंध त्यांना कळून विचार करतां आल्यावर. लोकशिक्षणाचा फैलावा झाला तर तो हितावह होय. कां? त्यायोगे सत्यासत्याची निवड करण्याचे सामर्थ्य येतें!
 विष्णुशास्त्री यांना जी मानसिक क्रांति घडवावयाची होती ती ही. त्या मानसिक क्रांतीचें आणखी एक लक्षण होतें. तें म्हणजे ऐहिकाविषयीचें प्रेम, हजारो वर्षांच्या संस्कारांमुळे इहलोकाविषयीची आस्थाच हिंदी जनांच्या मनांतून नाहीशी झाली होती. संपत्तीविषयी, षड्विकारांविषयी, नवी दृष्टि देऊन ती आस्था विष्णुशास्त्री यांना जागृत करावयाची होती. ती जागृत झाल्यावर, त्यांच्या ठायीं देशाभिमान ही वृत्ति निर्माण होईल, अशी त्यांची खात्री होती.
प्रवास
 कालक्रम आणि भूगोल यांचें महत्त्व त्यांनी अनेक निबंधांत सांगितले आहे. कारण त्यावांचून लोक आंधळेच राहतात. हिंदी लोक इतिहासलेखनाच्या अभावीं पुराणयुगांत म्हणजे तमोयुगांत राहत होते. प्रवासामुळे कदाचित् त्यांना जग दिसलें असतें; पण हजारो वर्षे त्यांनी प्रवासहि वर्ज्य मानला होता. १८७१ साली वयाच्या एकविसाव्या वर्षीच शालापत्नकांत 'प्रवास' हा निबंध लिहून विष्णुशास्त्री यांनी प्रवासाचे महत्त्व हिंदु लोकांना सांगितलें होतें. त्यांतले पहिलेच वाक्य असें आहे. "सांप्रत या पृथ्वीवर मानवजातीस जें एवढे वैभव प्राप्त झालें आहे तें प्रवासाच्या योगाने झाले आहे, असें म्हणण्यास हरकत नाही." आणि शेवटीं प्रवासाचा लोप झाल्यामुळे या देशाचे फार अहित झालें आहे, तरी आता लोकांनी नव्या प्रवास- साधनांचा फायदा घेऊन प्रवास करून मोठा लाभ करून घ्यावा, असा विचार मांडला आहे. या आरंभीच्या एकाच लेखांत विष्णुशास्त्री यांना अभिप्रेत असलेल्या मानसिक क्रांतीचीं सर्व लक्षणें बीजरूपाने दिसून येतात. ज्ञान, ग्रंथ, जिज्ञासा, इतिहासलेखना शोधकपणा, साहस, धारिष्ट, काव्याभिरुचि, विद्याभिरुचि, प्राचीन परंपरेचें प्रेम ग्रीसचा व युरोपचा आदर्श हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्व घटक या निबंधांत आढळतात
पाश्चात्त्य वळण
 या सर्वांचा तात्पर्यार्थ असा की, त्यांना हिंदीजनांना पाश्चात्त्य जगांत न्यावयाचें होतें. पाश्चात्त्य विद्येचें वज्र त्यांना यासाठी हवें होतें. वर उल्लेखिलेले सर्व गुण त्या व्रजांत आहेत, याविषवीं त्यांना संदेह नव्हता. त्याच्या साह्याने त्यांना भारताला पाश्चात्त्य युरोपच्या वळणावर न्यावयाचें होतें.
स्वत्व आग्रह
 मात्र हे त्यांना स्वत्व रक्षण करून साधावयाचें होतें. नव्या विद्वानांच्या स्वाभिमानशून्यतेवर टीका करतांना त्यांनी म्हटले आहे, "इंग्रेज पहा! त्यांचें भ्रमण साऱ्या जगभर आहे. हव्या तेवढ्या उलाढाली त्यांच्या जेथे जेथे चालल्या आहेत; पण आपल्या देशास माघारी आले की पुन: इंग्रेजचे इंग्रेजच! त्याचप्रमाणे इतक्या भाषा इंग्रेजीशीं मिसळल्या असतांहि ती कायमची कायमच "
 ही विष्णुशास्त्री यांची दृष्टि होती. त्यांना पाश्चात्त्य विद्या हवी होती. धाडस, साहस, शोधकपणा इत्यादि पाश्चात्त्य गुण हवे होते. त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास हवा होता. संपत्ति, षड्विकार यांच्या बाबतींत त्यांचा आदर्श हवा होता. देशाभिमानासाठी त्यांना गुरु करण्यास त्यांची तयारी होती. त्यांचे वाङ्मय, त्यांचें साहित्यशास्त्र, त्यांचें इतिहासलेखन, त्यांची विद्याभिरुचि त्यांना अत्यंत प्रिय होती; पण हे सर्व स्वीकारतांना हिंदी जन हिंदीजनच राहिले पाहिजेत, असा त्यांचा प्रखर आग्रह होता.
 येथून पुढे 'टीकाकार', 'चरित्रकार' व 'निबंधकार' या दृष्टींनी विष्णुशास्त्री यांचा अभ्यास आपणांस करावयाचा आहे. या तीनहि प्रकारच्या लेखनांत त्यांच्या जीवनाचें हें सर्व तत्त्वज्ञान, त्यांच्या विचारसरणीचे हे सर्व घटक, त्यांना अभिप्रेत असलेल्या मानसिक क्रांतींची हीं सर्व लक्षणे दिसून येतात. म्हणून प्रारंभीच तीं सर्व येथे एकत्र सांगितलीं आहेत.
पाश्चात्त्य टीकापद्धति
 टीकाकार या दृष्टीने विष्णुशास्त्री यांनी एक अत्यंत महत्त्वाचें कार्य केलें आहे. त्यांनी सर्व पाश्चात्त्य टीकापद्धति मराठीत आणली. ती पद्धति त्यापूर्वीच्या काळीं भारतांत कोठेहि नव्हती. येथे साहित्यशास्त्र निर्माण झालें होतें. पण त्या शास्त्रांतील सिद्धान्तांअन्वये काव्य-नाटकांचें परीक्षण कोणी करीत नसत. मल्लीनाथ हा फार मोठा टीककार होऊन गेला; पण अर्थबोध करून देणें व फार तर एखादा अलंकार स्पष्ट करणें यापलीकडे त्याने कधीहि टीका केली नाही. त्या काळच्या पंडितांची अभिरुचीहि अतिशय हीन होती. काव्याच्या खऱ्या गुणांचा त्यांना समजच नव्हता. यमक, अनुप्रास, श्लेष इत्यादि शाब्दिक करामती म्हणजेच काव्यगुण असें त्यांना वाटे; आणि त्यामुळे कालिदास, भवभूति, यांच्यापेक्षा तसली करामत करणारा माघ त्यांना श्रेष्ठ वाटे. त्यांच्या काव्य-समीक्षणांतला आणखी एक मोठा दोष म्हणजे गुणदोष- चिकित्सा ते कधीच करीत नसत. मोठ्या लोकांवर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी त्यांची वृत्ति होती. त्यामुळे सुबंधूसारख्या अत्यंत गचाळ कवीचाहि ते गौरव करतांना दिसतात. तेव्हा तात्पर्य असें की, हिंदुस्थानांत काव्यसमीक्षा, टीका, रसग्रहण हा साहित्यप्रकारच उदयास आला नव्हता. इतिहास, चरित्र, निबंध यांच्याप्रमाणे याहि क्षेत्रांत विष्णुशास्त्री यांना नवाच संसार मांडावयाचा होता.
दोषदर्शनहि
 आणि त्यामुळे टीका म्हणजे काय, ती करणाऱ्याचे अंगीं कोणते गुण असावे लागतात, टीका करतांना गुणदोष- चिकित्सा करणे किती अवश्य असतें, हें सांगण्यापासून त्यांना प्रारंभ करावा लागला. 'ग्रंथावर टीका' या आपल्या निबंधांत त्यांनी याविषयीचे आपले सव विचार मांडले आहेत. इतर लेखांत "काव्य म्हणजे काय हें एकंदर लोकांस कांहीच कळत नाही" "आमच्या मराठी वाचकांस अद्याप म्हणण्यासारखी रसिकता आलेली नाही.' असें त्यांनी वारंवार सांगितलेच आहे, व त्यासंबंधी तेथे स्पष्टीकरणहि केलें आहे. 'ग्रंथावर टीका' या निबंधांतील येथे लक्षणीय विचार एवढाच की, अनेक प्रकारे युक्तिवाद करून, त्यांनी टीकाकाराने निर्भयपणें काव्यांतील गुणांप्रमाणेच दोषांचीहि चिकित्सा केली पाहिजे हे पुनः पुन्हा आवर्जून सांगितले आहे. ते म्हणतात की, "सर्व गुणांनी संपन्न असा एकहि मनुष्य सापडणार नाही. तसेंच ज्यांत लेशमात्रहि दोष आढळणार नाही, असाहि सापडणें केवळ अशक्य. आता कोणी म्हणतील की, मोठ्यांच्या अंगों दोष असले तरी ते लहानाने काढू नयेत; पण हे म्हणणे म्हणजे चंद्रास कलंकी म्हणूं नये, किंवा सूर्यबिंबावरचे काळे डाग पाहूं नयेत, असें म्हणण्यासारखेंच असमंजस होय."
 याप्रमाणे टीकाशास्त्रांतले कांही विचार या निबंधांत सांगितल्यावर विष्णुशास्त्री यांनी 'टेंपेस्ट' व 'तारा' या शेक्सपियरच्या नाटकांच्या मराठींतल्या भाषांतरांवर पुढील कांही अंकांत, त्याअन्वये टीका केली आहे; पण विष्णुशास्त्री यांचे महत्त्वाचे टीकालेख म्हणजे 'संस्कृत कविपंचक' या ग्रंथांतील होत. ते त्यांनी १८७२ सालींच शालापत्रक या मासिकांतून प्रसिद्ध केले होते; पण हे निबंध आधी लिहिलेले असले तरी निबंधमालेंत त्यांनी सांगितलेली टीका-तत्त्वेंच त्यांत अनुसरलेलीं आहेत. अर्थात् हीं सर्व पाश्चात्त्य टीकाशास्त्रांतील तत्त्वें आहेत; आणि वर सांगितल्याप्रमाणे ही पद्धतीच सर्वस्वीं नवीन असल्यामुळे त्या निबंधांचा येथे प्रथम परामर्श केला पाहिजे.
नवीन टीका
 कालिदास, भवभूति यांच्या काव्य-नाटकांचें समीक्षण करतांना विष्णुशास्त्री यांनी संविधानकाची रचना, स्वभाव- लेखन, शृंगार, वीर, करुणादि रस, भावना, मनाचे स्वाभाविक व्यापार, निसर्ग-वर्णन, प्रसंग वर्णन, रम्य कल्पना, मधुर कोमल पदरचना इत्यादि काव्यसौंदर्याचे जे खरे घटक त्याअन्वयेच समीक्षा केली आहे. संविधानकाचें परीक्षण करतांना त्यांतील घटनांची स्वाभाविकता, त्यातील संगति- विसंगति, संभाव्यता यांची चर्चा करून महाभारत रामायणांतील मूळ कथेंत कवीने कोणते फेरफार केले आहेत व ते कां केले आहेत, याचाहि विचार ते करतात. वरील कवींची बहुतेक कथानकें अशीं उसनी घेतलेलीच असल्यामुळे हा विचार अवश्यच होता.
 हें सर्व समीक्षण करीत असतांना जागोजागीं शास्त्रीबुवांनी कालिदास, भवभूति यांची होमर, शेक्सपियर, मिल्टन वर्डस्वर्थ या पाश्चात्त्य कवि- श्रेष्ठांशी तुलना केली आहे. तसेच त्या श्रेष्ठ भारतीय कविवरांच्यासंबंधी सर विल्यम जोन्स, गटे इत्यादि पाश्चात्त्य पंडितांनी जे गौरवोद्गार काढले तेहि उतरून दिले आहेत. आणि शेवटी रस, कल्पना, सृष्टि-वर्णन इत्यादि गुणांची उदाहरणें म्हणून त्या त्या कवीच्या काव्यांतील विपुल उतारे दिले आहेत.
 पाश्चात्त्य पद्धति ती हीच. काव्यसौंदर्याचें असें शास्त्रशुद्ध विश्लेषण पौर्वात्य साहित्यशास्त्रांत कोठेहि आढळत नाही. मूळ कथानकाशी कवीच्या कथानकाची तुलना करून त्याने केलेल्या फेरफारांची चिकित्सा करणें, हें तर आपल्या साहित्य- शास्त्रकारांच्या स्वप्नांतहि कधी आलें नव्हतें. पाश्चात्त्य कवींच्या काव्य-नाटकांशी आपल्या कवींच्या काव्य-नाटकांची तुलना ही तर त्यांना शक्यच नव्हती. कारण पाश्चात्त्य जगाच्या अस्तित्वाचीच त्यांना जाणीव नव्हती; पण दुर्दैव असे की, येथल्या कवींची परस्परांशी चिकित्सक दृष्टीने तुलना, जी सहज शक्य होती, तीहि त्यांनी केली नाही; पण तुलना सहज शक्य होती असें म्हटलें हेंच चूक आहे. स्वतंत्र बुद्धीने कशाची चिकित्सा करण्याचे, काव्यांचीच नव्हे, जीवनांतील कोणत्याहि गोष्टीची चिकित्सा करण्याचें, सामर्थ्यच भारतीय मनाला राहिलेलें नव्हतें.
 आपल्या लोकांना विचार करण्याची सवय नाही, त्यांना काव्य म्हणजे काय तें कळत नाही, त्यांच्या ठायीं रसिकता नाही, असें जें विष्णुशास्त्री यांनी ठायीं ठायीं म्हटलें आहे त्याचा हाच भावार्थ आहे. कालिदास असो, भवभूति असो, दंडी असो, सुबंधु असो. त्या जुन्या लोकांना सर्व कवि सारखेच वाटत. या मूढ वृत्तीचाहि विष्णुशास्त्री पुनः पुन्हा निषेध करतात. हे टीकालेख लिहिण्यांत त्यांचा काय हेतु होता, हे यावरून ध्यानांत येईल.
सर्व कवि समकालीन
 प्रत्येक कवीचा स्थल-काल- निश्चय करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे त्यामागलाहि हेतु हाच आहे. जुन्या लोकांना सर्वं कवि सारखे, तसे सर्व काळहि सारखेच होते. ज्ञानेश्वर आणि मोरया गोसावी, शिवछत्रपति आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटी घडविण्यांत बखरकारांनाहि कांही वावगे वाटत नसे. मग भक्तिभावाने काव्य वाचणाऱ्या लोकांची कथा काय? कालिदास आणि भवभूति हे समकालीन होते यावर त्यांची अढळ श्रद्धा होती. भवभूतीच्या विवेचनाच्या प्रारंभी हे दोन कवि समकालीन असणें शक्य नाही, असा निर्णय देऊन विष्णुशास्त्री म्हणतात. "वरील वाद आमच्या वाचकांस बहुधा रुचणार नाही. त्या मनोवेधक आख्यायिकेच्या विरुद्ध जीं प्रमाणे वर दाखविलीं तीं वाचून त्यांचा फार हिरमोड होईल; पण या गोष्टीस इलाज नाही. या जगांत सत्यत्व व मनोहारित्व या गुणांचें साहचर्य नेहमीच आढळतें असें नाही!"
 सर्व कवींची काव्यें सारखींच रम्य आणि सर्व कवि समकालीन! यांमुळे आणखीहि एक गोंधळ माजतो. या कवीचें काव्य त्याच्या नांवावर व त्या कवीचें आणखी तिसऱ्याच्या नांवावर हा प्रकार मागे सर्रहा चालू होता. 'नलोदय' नांवाचें एक अगदी अधम काव्य कालिदासाच्या नांवावर पूर्वकाळीं खपत होतें. याविषयी लिहितांना शास्त्रीबुवा म्हणतात, "पुष्कळ सामान्य प्रतीचे व कित्येक अप्रयोजक ग्रंथहि कालिदासाच्या नांवावर मोडत आले आहेत, आणि पूर्वीच्या पंडितांत शोधकता मुळीच नसल्यामुळे ते सर्व त्याच्या मोठ्या नांवावर आजपर्यंत खपलेहि गेले! कालिदासाच्या कवित्वाची ज्यास यत्किचित तरी ओळख आहे त्यास वरील 'नलोदय' या क्लिष्ट काव्याच्या कर्तृत्वाविषयी बिलकुल संशय राहणार नाही. संस्कृत कवींच्या कुलगुरूची प्रसन्न व सरस वाणी कोणीकडे आणि हें हठ-कवित्व कोणीकडे!'
 आणि तरीहि जुन्या शास्त्रीपंडितांना हा भेद जाणवत नव्हता!
इतिहास अभाव
 या सर्व घोटाळयाचें कारण काय? आपल्याकडचा इतिहास-लेखनाचा अभाव! पुढे निबंधमालेत 'इतिहास' या निबंधांत हें आपल्या प्राचीन संस्कृतीचें मोठें व्यंग्य होय असें विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे. पणं त्याच्याहि आधी तीन- चार वर्षे, हा विचार त्यांच्या मनांत येत होता असें दिसतें. 'संस्कृत कविपंचकां'त त्यांनी तीन-चार ठिकाणी तो सांगून त्याविषयी मोठा खेद व्यक्त केला आहे. बाणभट्टाविषयी प्रास्ताविक लिहितांना ते म्हणतात, "ज्याप्रमाणे गाढ अंधकारांत रंगरूप, आकारमान, अंतर इत्यादिकांचीं भानें सर्व नष्ट होतात, त्याप्रमाणे एक इतिहासाशिवाय आमच्या साऱ्या ग्रंथसमूहभर गोंधळ माजला आहे. कोणता आधी, कोणता मागून, कोणत्याचा कसा प्रसंग होता इत्यादि गोष्टी समजण्याची मनास मोठी उत्कंठा वाटते!...याप्रमाणे आपल्या देशाचा पुरातन इतिहास नसल्यामुळे आपली व एकंदर जगाचीहि मोठी हानि झाली आहे." याच निबंधांत पुढे त्यांनी म्हटलें आहे, आपल्या लोकांत पूर्वीपासून एक मोठी गैदी चाल पडलीशी दिसते. ती ही की, शक म्हणून लिहावयाचा नाही. प्रस्तुत प्रसंगी एक मोठी चमत्काराची व अंमळ लज्जेची गोष्ट आमच्या वाचकांस कळविणें आहे. ती ही की, बाणकवि केव्हा झाला याविषयीची आपली उत्कंठा, जी आपले स्वतःचे ग्रंथ तृप्त करण्यास समर्थ झाले नाहीत ती एका चिनी ग्रंथाने सहज तृप्त केली. (तो ग्रंथ म्हणजे हुएनसंगाचा ग्रंथ).
 संस्कृत कविपंचकांत कालक्रम आणि भूगोल यांचे महत्त्व अनेक ठिकाणीं विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे, आणि कवींनी स्वतःची माहिती लिहून ठेविली नाही. लोकांनी त्यांची चरित्रे लिहिली नाहीत आणि इतिहास-लेखन केलें नाही म्हणून वारंवार खेद व्यक्त केला आहे. यावरून, लोकांत रसिकता निर्माण करावी हा जसा या लेखनामागे हेतु होता तसाच युरोपांतील चौदाव्या-पंधराव्या शतकाप्रमाणे येथे प्रबोधन घडवावें हेंहि त्यांचे उद्दिष्ट होतें, हें स्पष्ट होतें.
परखड टीका
 'ग्रंथावर टीका' या निबंधांत गुणांप्रमाणे दोषांचेंहि विवरण करण्यास हरकत नाही असें विष्णुशास्त्री यांनी सांगितले. तें या ग्रंथांत त्यांनी आचरूनहि दाखविलें आहे. सुबंधु या कवीच्या 'वासवदत्ता' या कथेवर त्यांनी अगदी परखड टीका केली आहे; आणि त्यांतील कथानक असंभाव्य, तर्कहीन, विसंगत असून खऱ्या रसिकास आनंद देण्यासारखें त्यांत कांही नाही, असा निर्णय दिला आहे. 'दंडीच्या दशकुमार चरिता' विषयी जवळपास असाच अभिप्राय त्यांनी दिला आहे.
 'टेंपेस्ट' व 'सिबेलाइन-तारा' या दोन नाटकांची मराठीत भाषांतरे झालीं होतीं. त्यांवर विष्णुशास्त्री यांनी जे अभिप्राय दिले तेहि पाश्चात्त्य टीकापद्धतीचा अवलंब करूनच लिहिले आहेत. मनुष्यस्वभावाची माहितगारी, भावना, यथापात्र भाषा, वातावरण या गुणांचा गौरव करून कण्वांच्या आश्रमांत वाढलेली शकुंतला व निर्जन बेटावर वाढलेली मिरांदा यांची मोठी हृद्य तुलना त्यांनी केली आहे. सिबेलाईन हें नाटक शास्त्रीबुवांना आवडलें नाही. त्यावर अभिप्राय देतांना त्यांनी मूळ शेक्सपियरच्या कथानकावरहि टीका करण्यास कमी केलें नाही. "शेक्सपियरच्या नाटकांत पाहतां प्रस्तुत गुण-संविधानकाच्या रचनेचा- प्रायः पूर्णपणे आढळत नाही. कथासूत्रांत गुंतागुंत झालेली दृष्टीस पडते, व कोठे कोठे असंबंधत्वहि नजरेस येतें. प्रस्तुत नाटकांतील कथानक मौजेचें असलें तरी त्यांत अनेक प्रकारचे दोष आहेत," असें ते म्हणतात.
 आता विष्णुशास्त्री यांच्या टीका वाङ्मयापैकी एक मोठा प्रबंध तेवढा राहिला. तो म्हणजे मोरोपंताची कविता हा होय. हा प्रबंध खूपच मोठा आहे. तरी साहित्य-समीक्षेच्या दृष्टीने त्याचा फारसा विचार करण्याचें कारण नाही. कारण त्यांत साहित्य-सौंदर्यापेक्षा इतर अवांतर गोष्टींचीच चर्चा फार आहे, तेव्हा त्याचा परामर्श अगदी थोडक्यांत करणेंच युक्त ठरेल.
मोरोपंत
 प्रस्तुत प्रबंधांतील मुख्य प्रश्न 'कवि ही संज्ञा मोरोपंतास लावतां येईल की नाही?' असा आहे; आणि ही संज्ञा त्याला पूर्णपणे लागू पडेल, असें त्याचें उत्तर विष्णुशास्त्री यांनी दिलें आहे; पण असें उत्तर त्यांनी दिले असले तरी कालिदास, भवभूति यांच्या काव्यांचे विवेचन करतांना, रस, कल्पनाशक्ति, मनुष्य- स्वभावाचें ज्ञान, मनाचे व्यापार, सृष्टि, यांचें वर्णन, स्वभाव- लेखन इत्यादि काव्यगुणांची उदाहरणे देऊन जसें त्यांनी सौंदर्यदर्शन घडविलें आहे तसें या विशाल प्रबंधांत कोठेहि घडविलेले नाही. कांही रसभरित प्रसंगांचा एका ठिकाणी फक्त निर्देश केला आहे. मग इतर गुणांचें काय? शेवटच्या लेखांत शास्त्रीबुवांनी स्पष्ट म्हटलें आहे की, "आमच्या महाराष्ट्र कवींनी सामान्यतः पाहतां अर्थव्यंजनाच्या पलीकडे थोडेंच लक्ष दिलेलें आढळते. अर्थ शब्दांनी व्यक्त झाला म्हणजे झालें. मग शब्दांच्या ठाकठिकीकडे किंवा सौंदर्याकडे लक्ष पुरवावयाचें नाही, असा त्यांचा प्रघात आढळतो! ज्याने संस्कृत किंवा इंग्रजी कवितेचें रूप पाहिलें असेल त्यास प्रस्तुत कवीच्या ठायीं पदलालित्य, माधुर्य, प्रसाद इत्यादि गुण असावे तसे नाहीत हे सहज वाटणार आहे." असें होण्याचें कारणहि शास्त्रीबुवांनी दिलें आहे. ते म्हणतात, "मोरोपंताचा जर संस्कृत पंचकाव्यावर व नाटकांदिकांवर सतत परिश्रम असता तर त्यांतील सर्व विशेष त्याच्या कवितेंत दृष्टीस पडल्यावांचून राहतेना."
 या सगळ्याचा भावार्थ असा की, संस्कृत वा इंग्रजी अभिजात साहित्यांत जे सौंदर्यगुण दृष्टीस पडतात ते मोरोपंताच्या कवितेंत आढळत नाहीत.
 'विद्वत्त्व व कवित्व' या निबंधांत जुन्या शास्त्री पंडितांना काव्याभिरुचिं नव्हती हें दाखवितांना मोरोपंताविषयी हाच अभिप्राय, विष्णुशास्त्री यांनी दिला आहे. ते म्हणतात, "या शास्त्री पंडितांच्या मतें, मोरोपंतासारखा कवि आजपर्यंत झाला नाही व पुढे होणार नाही; पण त्यांस एवढे समजत नाही की, यमक- प्रासांची गर्दी ही बुद्धीची दर्शक होय, पण ही बुद्धि व कवित्व एक नव्हेत."
 'कविता' या निबंधांत तर वामनपंडित, मोरोपंत यांच्याविषयी विष्णुशास्त्री यांनी फारच स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या मतें शाहिरांच्या लावण्या किंवा पोवाडे हीच मराठी भाषेची आद्य कविता. कारण, वामनपंडित, मोरोपंत वगैरे कवींनी मराठी भाषेंत आपली कविता लिहिली, तरी ती संस्कृत भाषेच्याच केवळ धाटणीवर असल्यामुळे तीस मराठी कविता म्हणण्यापेक्षा संस्कृत कवितेचें रूपांतर म्हणावें हें वाजवी होय.
तत्त्वचर्चा
 साहित्य- समीक्षा हे एक शास्त्र आहे. साहित्याविषयी कांही सिद्धान्त सांगून त्यांचें विवरण करणें हा त्याचा एक भाग, आणि त्या सिद्धान्ताअन्वये काव्य- नाटकादि साहित्यकृतींचें परीक्षण करणें हा दुसरा भाग. विष्णुशास्त्री यांनी केलेल्या परीक्षणांचा विचार येथवर केला. पाश्चात्त्य समीक्षा-पद्धति मराठींत आणणें त्यांचे महत्त्वाचे कार्य होय, हें तेथे आपण पाहिले. आता साहित्याविषयी त्यांनी जे तात्त्विक सिद्धान्त सांगितले आहेत त्यांची चर्चा करावयाची आहे.
 खरें म्हणजे असे सिद्धान्त फारसे नाहीत. एक-दोनच आहेत. त्यांतहि महत्त्वाचा एकच आहे. 'कवित्वास अज्ञानावस्था विशेष अनुकूल असते.' 'कवितेचा ज्ञानसंपन्नतेच्या काळांत उत्तरोत्तर ऱ्हास होत जातो' हा तो सिद्धान्त होय. 'संस्कृत कवि-पंचक' या ग्रंथांत प्रथम बाणभट्टाच्या प्रस्तावनेत त्यांनी तो मांडला आणि पुढे निबंधमालेतील 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांत त्याचा सविस्तर प्रपंच केला. या सिद्धान्ताची विशेष चर्चा करण्याचें कारण नाही. सध्या आता हा अगदी भ्रामक ठरला आहे. तो कोणीहि मानीत नाही. ज्या मेकॉलेच्या अनुकरणाने विष्णुशास्त्री यांनी हा सिद्धान्त मांडला त्याने सुद्धा उत्तरकाळांत तो रद्द ठरविला होता. तेव्हा त्याचें महत्त्व फारसें नाही. पण 'विष्णुशास्त्री यांची साहित्य-समीक्षा' आपण पाहत आहों तेव्हा विषयपूर्तीसाठी थोडी चर्चा करू.
 'विद्वत्त्व आणि कवित्व' या निबंधांत त्यांनी पुढीलप्रमाणे विधानें केलीं आहेत. व्याकरण, न्याय, मीमांसा इत्यादि शास्त्रे कवित्वास अपायकारक होत; कवीचें मन व तत्त्वज्ञानाचें मन स्वभावतः परस्परविरुद्ध होत; पहिल्याचा विषय कल्पना व दुसऱ्याचा विषय सत्यासत्य विवेचन. अप्रबुद्धतेच्या काळांत कल्पनाशक्ति जशी उद्दाम असते तशी पुढे कधीहि असत नाही. राष्ट्राच्या आद्य अवस्थेत उत्कृष्ट कविता उदय पावते. पुढे विचारशक्तीचें प्राबल्य होऊन कवित्वाचा ऱ्हास होतो.
अज्ञान व काव्य
 यांतला एकहि सिद्धान्त खरा नाही, हे आता जगाच्या इतिहासावरून स्पष्ट दिसत आहे. आज जगांतली बहुतेक सर्व राष्ट्रें प्रौढ अवस्थेला आलेली आहेत. तरीहि रवीन्द्रनाथ टागोर, व्हिक्टर ह्यूगो, टेनिसन, शरच्चंद्र, गटे, हरिभाऊ, मुनशी प्रेमचंद, महादेवी वर्मा, टॉलस्टॉय, गॉर्की यांसारखे कवि, कादंबरीकार, नाटककार उदयास येत आहेत. तेव्हा विद्वत्त्व आणि कवित्व यांचा मुळांत कांही विरोध आहे, हे खरें नाही. मागल्या काळाकडे पाहिलें तरी हेंच दिसेल. वाल्मीकि, व्यास, कालिदास हे विद्वानहि होते आणि कविहि होते. त्यांचा काळहि अज्ञानावस्थेचा नव्हता. सर्व प्रकारचीं शास्त्रे तेव्हा उदयास आली होती व समाज चांगला प्रौढ झाला होता. तर्काच्या दृष्टीने पाहिलें तरी वरील सिद्धान्त चुकीचाच ठरतो. कवीला कल्पना सुचतात त्या अज्ञानामुळे सुचतात, हें जें गृहीत धरलेलें आहे तेंच चुकीचें आहे. नदी, चंद्र, कमल, स्त्री, हरिणशावकें, यांविषयीचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान कालिदासाला होतें. तरी त्यांवर त्याने रम्य कल्पना केल्या. कवीला साम्य दिसतें म्हणून तो तशी कल्पना करतो. तिच्याशीं अज्ञानाचा कांही संबंध नाही. तेव्हा काव्याला समाजाची व व्यक्तीची अज्ञानावस्था कारण असते, हा सिद्धान्त अगदी निर्मूल होय.
निराळी उपपत्ति
 स्वत: विष्णुशास्त्री यांनीहि याच्या अगदी विरुद्ध नव्हे, पण अगदी निराळी अशी काव्यनिर्मितीची उपपत्ति 'इंग्लिश कविता' या आपल्या निबंधांत मांडली आहे. शेक्सपियर, मिल्टन या कवींच्या काळीं इंग्लंड चांगले प्रौढ दशेस आलें होतें. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर ती प्रौढता अगदी परिपक्व झाली होती. तरी त्या काळांत शेक्सपीयर, बायरन् वर्डस्वर्थं, शेली, कीट्स, असे कवि झाले. हे कां झाले? विष्णुशास्त्री म्हणतात, "ज्या काळी मोठाल्या लढाया, राज्यक्रांति, वगैरे लौकिक महत्त्वाच्या गोष्टी घडून येतात व राष्ट्रचें राष्ट्र जसें काय खळबळून जातें, त्याच संधीस वक्तृत्व, कविता, इतिहास इत्यादिकांचा उदय होतो, असा अलीकडील इतिहासकारांनी एक सिद्धान्त काढला आहे, आणि या महासिद्धान्ताचा प्रत्यय आज अनेक वेळा घडून आला आहे." हें सांगून शास्त्रीबुवांनी, पुढे याचीं अनेक उदाहरणें दिली आहेत. तेव्हा कवित्वाच्या उदयास अज्ञानावस्था लागते, विद्वत्तेचा, विचारशक्तीचा व तिचा विरोध असतो, हा सिद्धान्त विष्णुशास्त्री यांना स्वतःलाच तितकासा मान्य होता, असें दिसत नाही.
उपयोग काय?
 आता राहिलेल्या एका मुद्दयाचा विचार करून 'टीकाकार विष्णुशास्त्री' हें प्रकरण संपवू. 'संस्कृत कविपंचक' या पुस्तकाच्या उपोद्घातांत विष्णुशास्त्री यांनी म्हटले आहे की, संस्कृत कवींविषयीचें आम्ही जें निरूपण करणार त्याचा उपयोग काय, असें कोणी विचारतील. हाच प्रश्न त्यांनी 'इतिहास' या निबंधाच्या प्रारंभीं व जॉनसनच्या चरित्राच्या प्रारंभी उपस्थित केला आहे. याचा उपयोग काय? इतिहासाचा उपयोग काय? चरित्राचा उपयोग काय? काव्य-सौंदर्य-समीक्षणाचा उपयोग काय? आपल्या समाजाला त्या काळी किती जडता, मूढता आली होती तें यावरून कळून येईल. असले प्रश्न आज कोणाच्या स्वप्नांतहि येत नाहीत. कोणीं तसे विचारलेंच तर त्याचें हसूं होईल. एवढें मानसिक परिवर्तन गेल्या शंभर-सव्वाश वर्षांत घडून आले आहे. ज्या थोर पुरुषांच्या प्रयत्नाने हें परिवर्तन घडून आलें. त्यांतच विष्णुशास्त्री यांची गणना होते. हें परिवर्तन घडविणें हेंच त्यांचे जीवितकार्य होतें.
 प्रस्तुतचा प्रश्न असा आहे की, संस्कृत कवींच्या काव्याच्या समीक्षणाचा उपयोग काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांना विष्णुशास्त्री प्रथम अगदी हेटाळून टाकतात. ते म्हणतात, "सुवासिक पुष्पांचा वास घेऊन काय करावयाचें आहे, सुंदर युवतींच्या लीला पाहण्यांत काय अर्थ आहे, हे प्रश्न कोणत्याहि मनुष्याच्या तोंडून प्रायः येणार नाहीत व आलेच तर त्या धन्य पुरुषाच्या ठायीं ब्रह्मदेवाने आपली कर्तबगारी कांही विशेष रीतीने ओतली आहे, अशी कल्पना करणें प्राप्त होतें. इतिहासाविषयी असा प्रश्न विचारणारा मनुष्य कल्पनेचा जड ठरून वृद्धप्रमदान्यायाने उपहास्य होतो, असेंच त्यांनी त्या निबंधांत म्हटले आहे. तेव्हा असा प्रश्न विचारणारांचा त्यांना अतिशय तिरस्कार वाटे, हें उघड दिसतें. पण उपहास केल्यानंतर त्यांनी जीं उत्तरे दिलीं आहेत तीं आपल्या दृष्टीने लक्षणीय आहेत. कारण लेखणीचा प्रपंच करून त्यांना काय साधावयाचें होतें तें त्यावरून स्पष्ट होतें.
राष्ट्र व भाषा
 संस्कृत-काव्यविवेचनाचा उपयोग काय या प्रश्नाला त्यांचें उत्तर असें : प्रस्तुत विषयाच्या निरूपणाचे पहिले मुख्य कारण त्याचें रमणीयत्व; पण या उपयोगाचें ज्यांस महत्त्व वाटत नाही त्यांना इतकेंच सांगतों की, या विषयापासून आपल्या लोकांस वरील मुख्य उपयोगाखेरीज दुसरेहि दोन मोठे उपयोग होणारे आहेत. ते एक राष्ट्राच्या संबंधाने व एक देशभाषेच्या संबंधाने असे आहेत.
 विष्णुशास्त्री यांच्या सर्व लेखनामागे, सर्व उद्योगांमागे या दोन महत्त्वाच्या प्रेरणा होत्या. राष्ट्र व देशभाषा! त्यांनी साहित्य-समीक्षण केलें त्यांत अर्थातच सौंदर्य-दर्शन हा मुख्य हेतु होता; पण तो समीक्षणे लिहीत असतांनाहि, त्यांचें वरील व्यवधान कधी सुटलेलें नव्हतें. या प्रेरणांचे ताणेबाणे या पटांतहि सारखे विणलेले दिसतातच.
 'संस्कृत कविपंचक' लिहिण्याचा उद्देश सांगतांना ते म्हणतात, "राष्ट्राच्या संबंधाने याचा उपयोग हा की, सध्या आम्हांस आमच्याविषयीचें जें लज्जास्पद अज्ञान आहे तें नाहीसें होऊन आपली योग्यता वास्तविक किती आहे हें चांगलें कळून येईल... इंग्रेज लोकांची विद्या व वैभव पाहून आम्ही पूर्वी केवळ चकित होऊन जात होतों व त्यांची योग्यता आम्हांस कधीहि यावयाची नाही असें म्हणत होतों. आमचे समज आता फिरले आहेत... बुद्धीच्या मानाने पाहतां आम्ही इंग्रेजांहून मुळीच कमी नसून ज्या कामांत आम्ही मन घालूं त्यांत त्यांची बरोबरी करूंच करूं."
 भवभूतीच्या विवेचनाचा समारोप करतांना, या उद्योगाचा हेतु त्यांनी पुन्हा स्पष्ट केला आहे. तो हा की, "नेणत्या मुलास त्याच्या बापाचें भुईंत पुरलेलें अपार द्रव्य पुनः दृष्टिगोचर करावें;" " सध्याच्या निकृष्ट स्थितीस्तव बाकीच्या सर्व जगास सर्वथा तिरस्कारास्पद झालों असतांहि आपणांस ज्या एकाकडे पाहून सर्व अद्याप मान देताहेत- तें हें विद्यारूप महाभांडार आहे."
 हें भांडार किती संपन्न आहें हे हिंदी जनांना चांगलें उमगावें म्हणून पाश्चात्त्य पंडितांनी त्याचा जो गौरव केला आहे, त्यांतून अनेक अवतरणें विष्णुशास्त्री यांनी दिली आहेत. सर विल्यम जोन्स म्हणतो, "भारतीय साहित्याकडे कोठेहि दृष्टि टाका. अनंताची कल्पना समोर उभी राहते. इतर देशांच्या साहित्याच्या राशींमध्ये हें साहित्य हिमालयासारखें उत्तुंग दिसतें. त्याचें अध्ययन कोणालाहि एका जन्मांत पुरें क़रतां येणार नाही." "पृथ्वी आणि स्वर्ग यांचा मधुर संगम तुम्हांला पाहवयाचा आहे काय? मग शाकुंतल पाहा." असे जर्मन महाकवि गटे याचे उद्गार आहेत. "शाकुंतलाचा जगविख्यात कर्ता कालिदास हा, निसर्गाचा मानवी मनावर केवढा प्रभाव असतो त्याचें उत्कृष्ट वर्णन करतो. भावनांचा मधुर-कोमल आविष्कार आणि संपन्न कल्पनाशक्ति यांमुळे जगाच्या कवि-मालिकेत त्याला श्रेष्ठ स्थान मिळालें आहे." असा गौरव अलेक्झँडर हंबोल्ट याने केला आहे. मोनियर विल्यम्स याने 'हा भारताचा शेक्सपियर आहे,' असे धन्योद्गार काढले आहेत.
 भारतीयांचें हें सुप्त धन, विस्मृतीत गेलेलें धन, हें पैतृक धन त्यांना पुन्हा युरोपीय पंडितांनी दाखविलें; म्हणून त्यांचे आम्हांवर अनंत उपकार आहेत, असा ऋणनिर्देश विष्णुशास्त्री ठायीं ठायीं करतात तो राष्ट्रावरील भक्तीमुळेच होय.
कृतज्ञता
 आपण या पाश्चात्त्यांच्या उपकाराच्या कल्पनेने विष्णुशास्त्री इतके भारून जातात की, प्रसंगवशात् कांही कारणाने त्यांच्यावर टीका करण्याची वेळ आली तर, कृतघ्नता तर दाखवीत नाही ना, अशी त्यास शंका येते. ते म्हणतात, "त्यांवर टीका करण्याचा हक्क चालवावयास आम्ही मुखत्यार आहों हें खरें पण तो हक्क कडक पणाने चालविणें आम्हांस उचित होणार नाही. कां की, आमच्या प्राचीन भाषेचा पुरस्कार पाश्चात्त्य पंडितांनी जर घेतला नसता तर तिची काय दुर्दशा झाली असती, हें सांगवत नाही. ग्रीक व रोमन ग्रंथांची रानटांच्या स्वाऱ्यांत जशी धुळधाण झाली व संस्कृत ग्रंथांचा मुसलमानांच्या तडाक्यांत जो नाश झाला तो मनांत आणला असतां, ज्या रसिक व थोर मनाच्या लोकांनी आमच्या जुन्या विद्येचें संपादन केलें, तिचें रक्षण केलें व तिचा सार्वत्रिक प्रसारहि केला, त्यांचे उपकार साऱ्या भारतवर्षीय जनांवर केवढे आहेत हे सहज ध्यानांत येईल."
 भारतीयांत स्वत्व-जागृति करणें हें विष्णुशास्त्री यांचें जीवितकार्य होतें. संस्कृत साहित्य- भांडाराच्या दर्शनाने तें साधेल म्हणून त्यांनी त्याच्या सौंदर्याचें दर्शन त्यांना घडविलें; आणि या कामी पाश्चात्त्य पंडितांनी अनमोल साह्य केलें म्हणून त्यांच्याविषयीची पराकाष्ठेची कृतज्ञता त्यांच्या मनांत वसत आहे. त्यांच्या देशप्रेमाचें हें मोठें मनोज्ञ दर्शन आहे.




-१२-

चरित्रकार विष्णुशास्त्री



नवी ग्रंथ-पद्धति
 साहित्य-समीक्षा लिहिण्यांत विष्णुशास्त्री यांचें जें उद्दिष्ट होतें तेंच चरित्र लिहिण्यांतहि होतें. त्यांना या देशांत मानसिक परिवर्तन घडवावयाचें होतें; लोकाभिरुचीस वळण लावावयाचें होतें; स्थल-कालाची चिकित्सा करणारी ऐतिहासिक दृष्टि लोकांना द्यावयाची होती; येथे प्रबोधनयुग निर्माण करावयाचें होतें; पाश्चात्त्य विद्येचा जो परिपाक इंग्लंड, फ्रान्स इत्यादि देशांत झाला तो त्यांना येथे घडवून आणावयाचा होता; देशाभिमान ही वृत्तीच येथे नव्हती ती त्यांना जागृत करावयाची होती; आणि यासाठीच चरित्र लेखन ही नवी ग्रंथ-पद्धति त्यांनी सुरू केली. डॉ. जॉनसन या चरित्र ग्रंथांच्या प्रारंभी तो ग्रंथ लिहिण्याची कारणें सांगतांना, ही एक नवी ग्रंथ-पद्धति आहे, हें एक कारण त्यांनी सांगितलें आहे. राष्ट्रीय संसारांत ज्याप्रमाणे त्यांना अनेक नव्या पद्धति निर्माण करावयाच्या होत्या त्याचप्रमाणे साहित्य-संसारांतहि निर्माण करावयाच्या होत्या. टीका ही नवी पद्धति, चरित्र ही नवी पद्धति, निबंध ही नवी पद्धति. अलीकडे यांना वाङमय प्रकार म्हणतात. विष्णुशास्त्री यांनी त्यांना ग्रंथ-पद्धति म्हटलें आहें. त्यांतील चरित्र हो जी नवी ग्रंथ-पद्धति त्यांनी सुरू केली तिचा परामर्श आता करावयाचा आहे.
उपयोग काय?
 विष्णुशास्त्री यांनी जे टीका लेख लिहिले त्याच्या आरंभी त्यांनी एक प्रश्न उपस्थित करून त्याचें उत्तर दिले आहे. वाचक म्हणतील की, या टीकेचा उपयोग काय? हाच प्रश्न जॉनसनच्या चरित्राविषयी लोक विचारणार. कारण अशा तऱ्हेची चरित्रे पूर्वी भारतांत केव्हाहि लिहिली गेली नव्हती. जी चरित्रे लिहिली गेलीं तीं सर्व देवादिकांची व संतांची, आणि त्यांनी केलेले अद्भुत चमत्कार हाच त्यांचा मुख्य विषय. डॉ. जॉनसन हा त्या कोटींतला मुळीच नव्हे. मग त्याच्या चरित्राचा उपयोग काय? विष्णुशास्त्री यांनी प्रारंभीच या शंकेचे निरसन केलें आहे. अशा चरित्रापासून संसारास व लोकव्यवहारास उपयोग होतो. त्यापासून जो सदुपदेश प्राप्त व्हावयाचा तो सार्वभौम राजांच्या लढाया वाचल्यापासून होणार नाही, तर सामान्य लोकांच्या चरित्राच्या वाचनानेच होणार. सामान्य लोकांस ज्या अडचणी व जे प्रसंग येतात ते त्यांच्या सारख्याच मनुष्यांनी कसे टाळले व त्यांतून ते कसे उदयास आले हें समजल्यानेच तो हेतु साध्य होतो. या दृष्टीने पाहतां शिकंदर, कोलंबस किंवा वॉशिंग्टन यांच्या चरित्रांपेक्षाहि जॉनसनसारख्यांचें चरित्रच जास्त उपयुक्त होय.
 विष्णुशास्त्री यांना लोकाभिरुचीस वळण लावावयाचें होतें. असें वर म्हटलें आहे, त्याचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. मानवी, वास्तवनिष्ठ चरित्राची त्या काळीं लोकांना अभिरुचीच नव्हती. ती प्रथम निर्माण करून मग तिचें पोषण करावयाचें, असे दुहेरी कार्य त्यांच्या पुढे होतें. डॉ. जॉनसनचें चरित्र लिहून त्यांनी तें साधलें आहे.
वास्तवाशी ओळख
 अलीकडे चरित्रे लिहिली जातात त्यांना 'काल आणि कर्तृत्व', ' व्यक्ति आणि वाङमय' अशीं नांवें दिली जातात. त्यांचा आशय स्पष्ट आहे. व्यक्तीच्या चरित्रांत पार्श्वभूमि म्हणून तिच्या काळची सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादि सर्व परिस्थिति बारकाईने वर्णिलेली असते. व्यक्ति ही त्या परिस्थितीशीं बद्ध असते, त्या परिस्थितीमुळे तिच्या जीवनाचें रूप पुष्कळ अंशी निश्चित होतें हा सिद्धान्त यांत गृहीत धरलेला असतो; पण व्यक्तीच्या कर्तृत्वाला परिस्थितीमुळे वळण लागत असतें हा विचारच मागल्या काळीं चरित्रकारांच्या मनांत कधी आलेला दिसत नाही. महिपतीने किंवा बरखरकारांनी लिहिलेलीं चरित्रें पाहिली की हें सहज ध्यानांत येईल. त्यांचे चरित्रनायक सर्व अवतारी पुरुष होते. परिस्थितीमुळे त्यांच्या कर्तृत्वावर परिणाम होणें हें त्यांना शक्यच वाटत नसे. त्यांनी अवतार घेतला, लोकांचें तारण केलें आणि ते निजधामाला निघून गेले. ज्ञानेश्वर किंवा समर्थ यांच्या चरित्रांत त्यांच्या ग्रंथांची सुद्धा नीट माहिती दिलेली नाही. त्या चरित्रांत आज वर्णितात तशी व्यक्तीहि नाही आणि वाङमयहि नाही. सारा भर भिंत चालविली, गाय जिवंत केली, देवळाचें तोंड फिरविलें, लक्ष चौऱ्यायशीचा चुकविला फेरा यांवर आहे. हिंदी जनांच्या मनाचें पोषण गेली अनेक शतकें या अद्भुतावर, अवास्तवारच होत होतें. म्हणूनच ते राज्यकारभार, व्यापार, युद्ध, समाज-संघटना या प्रत्येक क्षेत्रांत अपयशी होत होते. पाश्चात्त्य विद्येमुळे मुख्य क्रांति कोणती झाली असेल तर ती ही की, वास्तवाशी आपली ओळख झाली. पण प्रारंभी ती सर्व इंग्रजी वाङमयाच्या व भाषांतरित वाङ्मयाच्या साह्याने होत होती. मराठींत तसें साहित्य निर्माण करून बहुजनांपर्यंत ती क्रांति पोचवावी हा विष्णुशास्त्री यांचा उद्देश होता. म्हणूनच त्यांनी जॉनसन हा विषय निवडून त्याचें चरित्र अगदी अर्वाचीन पद्धतीने लिहिलें. त्यांत इंग्लंडची राजकीय, सामाजिक सर्व प्रकारची स्थिति त्या काळीं कशी होती याचें तपशीलवार वर्णन त्यांनी केलें आहे. इंग्लंडमध्ये राजकीय पक्ष कोणते होते, राजाचें स्थान काय होतें, लोकांचें स्वातंत्र्यप्रेम कसें प्रखर होतें, अमेरिकेत क्रांति झाली तिच्यामागे प्रेरणा कोणत्या होत्या हें सर्व त्यांनी विवरून सांगितलें आहे; आणि या संदर्भात जॉनसनची राजकीय तत्त्वप्रणालि कोणती होती याची चर्चा केली आहे. अशा तऱ्हेची चर्चा पूर्वीच्या काळच्या चरित्रांत केव्हाहि आढळावयाची नाही.
बॉसवेल आदर्श
 परिस्थितीमुळे जशी व्यक्तीची घडण होते तशीच तिच्या भोवतालचे जे आप्त, मित्र, सुहृद, यांच्यामुळेहि होत असते, हें जाणून विष्णुशास्त्री यांनी गॅरिक, साव्हेज व बॉसवेल यांचीहि माहिती प्रसंगाने दिली आहे. गॅरिक हा प्रख्यात नट तर डॉ. जानसनचा शिष्यच होता. शेक्सपियरचीं मागे पडलेली नाटकें त्याने रंगभूमीवर आणली आणि त्या राष्ट्राच्या महाकवीविषयी सर्वांच्या ठायीं पुन्हा अतिशय प्रेम उत्पन्न करून लोकाभिरुचीस नवेंच वळण लावलें. लोकाभिरुचीस नवें वळण लावणें हें शास्त्रीबुवांचें उद्दिष्ट होतें हें वर अनेक ठिकाणी सांगितलें आहे. तसें असल्यामुळे तें कार्य करणाऱ्या लोकांचें त्यांना मोठें कौतुक असे व त्यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. जॉनसनच्या आधी, आडिसनने लोकाभिरुचीस नवें वळण लावलें, जॉनसनने लोकांस विचार करावयास शिकविलें, बॉसवेलने जॉनसनचें चरित्र लिहून अपूर्व ग्रंथपद्धति सुरू केली, असें कौतुक निबंधमालेत अनेक ठिकाणी दृष्टीस पडतें. विष्णुशास्त्री यांनी आपले ध्येय निश्चित केलें तें या अशा लोकांच्या ग्रंथांच्या अभ्यासामुळेच केलें, हें यावरून स्पष्ट दिसतें. बॉसवेलने जॉनसनचें जें चरित्र लिहिलें त्याचें त्यांनी जें वर्णन केलें आहे त्यावरून तो आदर्श पुढे ठेवूनच त्यांनी जॉनसनचे चरित्र लिहिलें असावें याविषयी शंका राहत नाही. बॉसवेलच्या चरित्राचे मुख्य गुण कोणते? निःसीम सत्यभक्ति, मनुष्यस्वभावाचें ज्ञान आणि त्यांत मुख्य नायक, त्याचें मंडळ व त्याचा अवघा काळ यांचे आलेलें प्रतिबिंब. शास्त्रीबुवा म्हणतात तसा प्रकार इतरत्र कोठेहि नाही. त्याच्या ग्रंथाची लोकमान्यता अद्याप पहिल्यासारखी असल्याचें बीज तेंच होय.
मित्रपरिवार
 साव्हेज हा जॉनसनचा परम मित्र. दोघेहि समानशील. ते दोघे रात्रीचे बाहेर पडून पहाटेपर्यंत रस्त्याने भटकत असत; आणि भटकतांना काय करीत? जगाच्या उलाढाली! अनेक राजांना ते पदच्युत करीत, नव्या राज्यपद्धति प्रस्थापित करीत, युरोपातल्या सर्व राष्ट्रांना नवे कायदे करून देत आणि जगाची नाना प्रकारांनी सुधारणा घडवून आणीत. रात्रभर असें विधानसभेचें काम केल्यावर त्यांना थकवा येई, न्याहारी हवीशी वाटे; पण खिशांत दोन दमड्याहि सापडत नसत!
 जॉनसनच्या क्लबची ही अशीच माहिती विष्णुशास्त्री यांनी मुद्दाम दिली आहे. या क्लबांत बर्क, गिबन, ग्यारिक, गोल्डस्मिथ, रेनॉल्डस, फॉक्स, सर विल्यम जोन्स असे त्या वेळेचे अनेक विख्यात पुरुष दर आठवड्यास जमत असत व इंग्रजी भाषेतील नव्या-जुन्या ग्रंथकारांविषयी चर्चा करीत असत. ती चर्चा लोकांना इतकी महत्त्वाची वाटे की, त्या सभेत ग्रंथाविषयी जो निर्णय होई त्यावर त्या ग्रंथाचें भवितव्य अवलंबून असे. मित्रपरिवाराच्या या वर्णनामुळे जॉनसनचें व्यक्तिमत्त्व अगदी स्पष्ट होतें हें सांगावयास नकोच.
निष्पक्ष वृत्ति
 चरित्र ही जी ग्रंथपद्धति तिचीं कांही लक्षणें वर सांगितलीं. चरित्रनायकाच्या गुणांप्रमाणे त्याचे दोषहि दाखवून देणें, त्यांची चिकित्सा करणें हें तिचें आणखी एक महत्त्वाचें लक्षण. ती चिकित्सा करतांनाहि विष्णुशास्त्री यांना पुन्हा तसें करणें कसें योग्य आहे हें वाचकांना समजावून देणें अवश्य वाटलें. कारण ही पद्धत पूर्वी येथे नव्हती. किंबहुना दोषचिकित्सा करणें युक्त नव्हे असेंच लोकमत येथे होतें. थोर कवीच्या काव्यांतले दोष दाखविणें युक्त नाही, आपला तो अधिकार नाही, हा जसा पूर्व काळी समज होता तसाच चरित्रनायकावर कोणत्याहि कारणाने टीका करणें योग्य नव्हे, असाहि समज होता. म्हणून प्रथम दोषचिकित्सेचें समर्थन विष्णुशास्त्री यांना करावें लागलें. तें करतांना तेथे जो मुद्दा त्यांनी मांडला होता तोच येथे मांडला आहे. तो म्हणजे मानवाचें अपूर्णत्व. "दोषांचा सर्वथा अभाव हा एक परमेश्वराच्या ठायीं मात्र संभवतो. मनुष्यांत सर्वगुणसंपन्न व सर्व दोषविवर्जित असा कोणीहि नाही. यास्तव थोर पुरुषाचा गौरव जसा अवश्य तसाच त्याचा हीनपणा निष्पक्षपाती वृत्तीने सांगणेंहि जरूर आहे. अशामुळे त्या चरित्रापासून जो लाभ व्हावयाचा तो नष्ट होऊन त्याजवरची पूज्य-बुद्धि उडून जाते इत्यादि समजुती खोट्या आहेत."
 अशी प्रस्तावना करून जॉनसनच्या बारीक मोठ्या सर्व दोषांचें वर्णन विष्णुशास्त्री यांनी केलें आहे. वास्तविक जॉनसनबद्दल त्यांना पराकाष्ठेची भक्ति वाटत असे. ग्रंथलेखनाच्या बाबतींत तोच त्यांचा आदर्श होता. आपल्या नव्या विद्वानांनी तोच आदर्श पुढे ठेवावा, असें त्यांनी शेवटीं आवर्जून सांगितलें आहे. तरीहि त्यांनी विभूतिपूजक वृत्ति कोठेहि दाखविली नाही. जॉनसनच्या स्वभावांतील तिरसटपणा, सुस्तपणा, आळस हे दोष तर त्यांनी दाखविले आहेतच; पण त्याच्या पांडित्याला, विद्वत्तेला व विचारीपणाला बाधक होतील अशा दोषांचेहि विवरण केलें आहे. जॉनसनची भाषणे सर्वच युक्तीस धरून असत असें नाही. कधी कधी तो वादविवादाच्या भरांत अप्रमाण गोष्टीहि बोलून जाई व आपला पक्ष खोटा आहे, असें पक्कें जाणीत असतांहि तो खरासा भासवून देण्याचा यत्न करी; कधी कधी वितंडवादांत शिरून 'शेषं कोपेन पूरयेत्' अशी युक्ति लढविण्यासहि मागे घेत नसे. याशिवाय एखादा देश किंवा एखादी व्यक्ति यांच्याविषयी त्याचे जे कित्येक ग्रह होते त्यांचें पटलहि त्याच्या बुद्धि-चक्षूंवर प्रसंगविशेषीं येऊन ते प्रकृत विषयाचें यथावत् भान त्यास होऊ देत नसत. अमेरिकेत राज्यक्रांति झाली त्या वेळीं जॉनसनने सरकार-पक्ष उचलून धरून लेख लिहिले. हे लेख अगदीच सरासरी आहेत. त्यांत युक्तीपेक्षा भाषासौंदर्य व आवेश हेच गुण विशेषतः आढळतात. अशा रीतीने जॉनसनची बुद्धि, तर्कशक्ति, त्याची विद्धत्ता, त्याची वैचारिक सचोटी यांनाहि उणेपणा आणणारे जे दोष तेहि विष्णुशास्त्री यांनी परखडपणें सांगून टाकले आहेत.
इंग्रजांचे गुणगान
 या चरित्राच्या प्रारंभीच डॉ. जॉनसन हा इंग्लिश राष्ट्राचा प्रतिनिधिभूत होता असें विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे; आणि चारित्रावरील शेवटच्या निबंधांत त्या विधानाचे विवरण करतांना त्याच्या अंगचे प्रधान गुण हेच इंग्लिश राष्ट्राचे प्रधान गुण कसे होते तें सांगितलें आहे. हें विवेचन वाचतांना असें ध्यानांत येतें कीं, स्वदेशाचें, स्वकीयांचें गुणवर्णन करावें तसें तशाच आत्मीयतेने, शास्त्रीबुवांनी इंग्रजांच्या गुणांचें वर्णन केले आहे. इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज मिशनरी व इंग्रज पंडित यांच्यावर प्रत्येक निबंधांत, संधि सापडेल तेथे, न सापडली तर विषयांतर करून, हत्यार धरणारा हा पुरुष, आपल्या त्याच लेखणीने इंग्रजांचें मुक्तकंठाने गुणगान करतो यावर क्षणमात्र विश्वास बसत नाही. पण विष्णुशास्त्री यांच्या चरित्राचें हेंच रहस्य आहे. पाश्चात्त्य संस्कृति, पाश्चात्त्य विद्या, पाश्चात्य समाज आणि प्राश्चात्त्य व विशेषतः इंग्रज लोक, यांच्याबद्दल त्यांच्या मनांत खराखुरा आदर होता. ती संस्कृति, ती विद्या येथे आणावी व पाश्चात्त्यांचे, इंग्रजांचे गुण आपल्या लोकांच्या अंगी बाणवून, रुजवून, फार मोठें मानसिक परिवर्तन या समाजांत घडवून आणावें हेंच त्यांचें उद्दिष्ट होतें. त्यामुळे राज्यकर्त्यांवर संधि मिळेल तेथे ते जसे टीका करीत तसेच जेथे संधि मिळेल तेथे ते इंग्रजांचें गुणगानहि करीत.
 जॉनसन याच्या अंगचा पहिला गुण म्हणजे निश्चय. हा गुण इंग्रज राष्ट्राच्या ठायीं होता याचे प्रमाण काय? त्यांनी हजारो मैल दूर असलेल्या हिंदुस्थानांत येऊन, शेकडो बिकट प्रसंगांवर मात करून येथे आपले आधिपत्य स्थापन केलें हें! त्याचप्रमाणे अटलांटिक महासागरांत एका कोपऱ्यांत पडून राहिलेलें हें बेट, दोन हजार वर्षांपूर्वी कोणाला माहीतहि नव्हतें, तें आज वैभवाच्या शिखरावर चढलें आहे, व सारं जगहि त्याच्या उलाढालीस पुरेसें न होऊन विद्या, कला, कौशल्य यांचें तें केवळ माहेरघर होऊन राहिलें आहे, हा तरी वरील अमोलिक गुणाचाच प्रभाव होय!
 इंग्रजांचा दुसरा मोठा गुण स्वाभिमान. त्याचें लक्षण काय? इतर देशांप्रमाणेच त्यांच्यांमध्ये हरएक प्रकरणी परस्परांत मतभेद असतां व निरंतर राज्य-प्रकरणांत वगैरे निकराने कलह चालले असतां, संकटसमयीं सर्वांनी एक होणें व साऱ्या पृथ्वीभर उलाढाल चालली असतां स्वदेशाचें वारें न विसरणें या दोन गोष्टींवरून त्यांच्या स्वाभिमानाचें स्वरूप कोणाच्याहि लक्षांत येणारे आहे. शिवाय पर-राज्याची तर गोष्ट, दूरच पण स्वराजाचाहि जुलूम त्यांस सहन न होऊन त्यांनी एकाचा शिरच्छेद केला व एकास पळवून लावला व राजाचे अधिकार अगदी संपुष्टांत आणून ठेवले, व थोरापासून लहानापर्यंत सर्वास हवें तसें बोलण्याचालण्याची पूर्ण मोकळीक दिली!
 विष्णुशास्त्री यांनी केलेले इंग्रजांच्या स्वाभिमानाचें हें वर्णन अतिशय मार्मिक आहे. स्वाभिमानामुळे इंग्रज ऐक्य करतात. याचा अर्थ असा की, त्यांचा स्वाभिमान हा राष्ट्राभिमान आहे, आणि ऐक्यावांचून त्या अभिमानाच्या गप्पा फोल आहेत हें त्यांनी जाणलें आहे. या स्वाभिमानामुळेच ते स्वकीय राजाचीहि अरेरावी सहन करीत नाहीत. तेव्हा त्यांचा स्वाभिमान म्हणजे लोकाभिमान आहे, आणि लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणारा राजा स्वकीय असला तरी ते त्याला शत्रूच मानतात. विष्णुशास्त्री यांचा कल्पना-विहंग प्रजासत्ताक राज्याची स्वप्ने पाहत असे, असें आगरकरांनी म्हटलें आहे तें किती यथार्थ आहे तें यावरून ध्यानांत येईल; आणि जॉनसनचें चरित्र लिहिण्यांत त्यांचा हेतु काय होता हेंहि स्पष्ट होईल.
प्रबोधन
 या हेतूच्या सिद्धीसाठी या देशांत प्रथम विद्येचें पुनरुज्जीवन होऊन येथे युरोपांतल्याप्रमाणे प्रबोधनयुग प्रवर्तित झाले पाहिजे असें विष्णुशास्त्री यांना वाटत होते. हें प्रबोधन घडविण्याचा मार्ग कोणता? ग्रंथ-लेखन, ग्रंथ-निर्मिति. 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा लेख लिहिण्यास त्यांनी लेखणी उचलली तेव्हाच, किंवा त्याच्याहि आधी 'शालापत्रकां'त ते लिहू लागले तेव्हापासून या देशाच्या उद्धाराचा ग्रंथ-निर्मिति हाच मार्ग होय हें त्यांच्या मनांत निश्चित झालें होतें. जॉनसनच्या चरित्राच्या समारोपांत त्याच्या चरित्रापासून आमच्या नव्या विद्वानांनी कोणता बोध घ्यावा हें सांगतांना त्यांनी त्यांना हाच उपदेश केला आहे.
निरपेक्ष ग्रंथ लेखन
 प्रथमतः त्यांनी हे दाखवून दिले आहे की, आज आपल्या मराठी भाषेची जी स्थिति आहे तीच शंभर वर्षांपूर्वी म्हणजे जॉनसनच्या काळी इंग्रजी भाषेची होती; आणि त्या वेळी तेथील वाचकांच्या अंगींहि इकडच्या सध्याच्या वाचकांइतकीच अभिज्ञता व रसिकता होती. विष्णुशास्त्री म्हणतात, "या सादृश्यावरून एक मोठी गोष्ट वाचकांच्या लक्षांत आल्यावांचून राहणार नाही. ती ही की, इंग्रेज ग्रंथकारांच्या परिश्रमांनी ती भाषा जर आज इतक्या नावारूपास आली तर आमच्या लोकांनी तसाच उद्योग केला तर तितकें किंवा निदान त्याच्या खालोखाल तरी त्यांच्या श्रमास यश कां येणार नाही?" पण वरील सादृश्यावरून व जॉनसनच्या चरित्रावरून दुसरी एक गोष्ट एतद्देशीय ग्रंथकारांनी घेण्यासारखी आहे. ती ही की, ग्रंथ-रचनेच्या श्रमाचें साफल्य फार दीर्घकाळाने होत असतें. तेव्हा त्यांनी आमच्या या धनहीन व ज्ञानहीन देशांत ग्रंथ-रचनेपासून फलनिष्पत्ति कितपत होण्याचा संभव आहे हें जाणून मुख्यतः देशहित-बुद्धीनेच आपलें काम बजावलें पाहिजे. कोणत्याहि लाभावर नजर न देतां पहिल्याने केवळ कर्तव्य म्हणूनच त्यांनी हातांत लेखणी धरली पाहिजे; आणि या चरित्रावरून दुसराहि एक महत्त्वाचा उपदेश ग्रंथरचनेच्या संबंधाने एतद्देशियांनी घेण्यासारखा आहे. जॉनसनचे इतके ग्रंथ झाले त्यांच्या वृत्तान्तांत कोठे 'सरकारचा उदार आश्रय', 'दक्षिणाप्राइज कमिटीकडून बक्षीस' असा कांही प्रकार दृष्टीस पडत नाही. कोशासारखीं प्रचंड कामें जीं उठलीं तीं फक्त लोकाश्रयावर! तर देश-भाषांचा उत्कर्ष व्हावा अशी ज्यांची मनःपूर्वक इच्छा असेल त्यांनी वरील गोष्टींचें चांगलें मनन केलें पाहिजे.
कारणांतून कार्य
 या देश-भाषांच्या उत्कर्षांतून अंतीं काय साधावयाचें? विष्णुशास्त्री यांनी पहिला निबंध लिहिला- 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति'; आणि शेवटचा- 'आमच्या देशाची स्थिति.' तेव्हा भाषा आणि देश हे त्यांच्या मतें अविभाज्य होते. पहिल्या लेखाच्या पहिल्या कलमांतच त्यांनी लिहून टाकलें आहे की, भाषेची अभिवृद्धि ही देशाच्या उत्कर्षाचें मोठेंच साधन आहे. जॉनसनच्या चरित्रांत त्यांनी शेवटीं हा विचार अगदी स्पष्ट केला आहे. मात्र तो चरित्र-निरूपणाच्या ओघांत केला आहे. आणि त्या वेळची इंग्रजी भाषा व आजची मराठी भाषा यांच्या स्थितींत जसें सादृश्य आम्हीं दाखविलें तसेंच त्या वेळची इंग्लंडची स्थिति व आजची या देशाची स्थिति यांतलें सादृश्य येथे दाखवीत आहों, असा भास निर्माण केला आहे.
 जॉनसनच्या कारकीर्दीच्या अखेरीस अमेरिकेतील वसाहतवाले इंग्लंडविरुद्ध बंड करून उठले व इंग्लंडने धाडलेल्या सैन्याचा पराभव करून स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी फडकविला. विष्णुशास्त्री म्हणतात, "युद्धांत इंग्लंडची धुळधाणी उडून एवढें राज्यचें राज्य हातचें गेलें, यामुळे राजा व प्रधान-मंडळ यांची अतिशयित नाचक्की झाली व लोकपक्षास तेज आलें. त्यांतून विल्किज्, जूनियस यांच्यासारखे लोकपक्षाचे कैवारी यांनी तर आपल्या लेखांनी लोकांस आपले हक्क पुरतेपणीं भासवून देऊन प्रतिपक्षावर सारखा धडाका चालविला होता."
 आता वरील स्थितीचें सादृश्य आमच्या देशांतहि कसें दृष्टीस पडूं लागलें आहे, तें सर्वांस माहीत आहेच. पाश्चात्त्य विद्येचा संस्कार इकडील लोकांस घडून त्याच्याबरोबर वर्तमानपत्रांचा फैलाव, लौकिक प्रकरणांची चर्चा, सार्वजनिक सभा, वगैरे प्रकारहि सहजच सुरू झाले आहेत. तेव्हा या कारणांपासून वरील कार्य (म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा) उद्भवावें हें सहजच आहे. गारगोटीवर आपण होऊन जर चकमक झाडली आणि तींतून झाडण्यासरसा विस्तव पडला तर त्याबद्दल कोणास आश्चर्य वाटेल काय?




-१३-

निबंधकार विष्णुशास्त्री



 निबंध ही विष्णुशास्त्री यांनी मराठींत आणलेली तिसरी नवी ग्रंथ-पद्धति होय साहित्य-समीक्षा ही पहिली, चरित्र ही दुसरी आणि निबंध ही तिसरी ग्रंथ-पद्धति किंवा वाङमयप्रकार होय. भारताची प्राचीन संस्कृति ही मोठी उन्नत असूनहि येथे इतिहास किंवा चरित्र ही पद्धति आली नाही त्याचप्रमाणे निबंध हीहि पद्धति प्राचीन काळी कोणी अवलंबिली नाही; आणि इतिहास-लेखन झालें नाही म्हणून आपलें एकपट नुकसान झाले असले, तर निबंध लेखन झालें नाही यामुळे शतपट नुकसान झालें आहे.
 निबंध ही विचारप्रधान रचना आहे. बुद्धीला आवाहन करणें, तर्कशास्त्रीय पद्धतीने तिला आपले सिद्धान्त पटवून देणें, हें तिचे उद्दिष्ट आहे. एक विचारबीज मनांत येतांच त्याविषयीची सर्व माहिती संकलित करणें, तिचें वर्गीकरण करणें, मग तिची व्यवस्थित रचना करणें व त्यांवरून शेवटीं निष्कर्ष काढणें या पद्धतीने मानवी मनांत ग्रंथ किंवा निबंध तयार होतो. तसा तो तयार झाल्यावर विषयाचें महत्त्व, त्याचीं कारणें, त्याचें पूर्वरूप, सध्याचें रूप, रूढ समज, सत्य-दृष्टि, विरोधी विचार, आक्षेप, खंडन, मंडन, इतर पंडितांच्या तसल्याच विचारांशी तुलना, ऐतिहासिक दृष्टींतून समीक्षण, परिणाम, अन्वयव्यतिरेक दृष्टीने तपासणी, उपाय- चिंतन इत्यादि विविध अंगोपांगांनी त्याचा विकास करून त्याचा वटवृक्ष तयार करणें, ही निबंधरचना होय. या रचनेसाठी जें साहित्य जमवावयाचें तें सर्व अनुभव, इतिहास, तर्क, प्रयोग, अवलोकन यांच्या साह्यानेच जमवावयाचें, असा निबंधकाराचा कटाक्ष असतो; कारण त्याला लोकांच्या बुद्धीला आवाहन करावयाचें असतें.
 अशी निबंधरचना भारतांत गेल्या शतकांत पाश्चात्त्य विद्या येथे आल्यानंतरच सुरू झाली. त्याआधी प्राचीन काळी, संस्कृतांत किंवा नंतर प्रांतिक भाषांत कांही किरकोळ अपवाद वजा जातां येथे कोणीहि, केव्हाहि अशी रचना केली नव्हती. पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर महाराष्ट्रांत बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी इत्यादि पंडित भौतिक दृष्टीने समाजाच्या उत्कर्षापकर्षाचा विचार करूं लागले, व समाजाच्या बुद्धीला स्वतःचे सिद्धान्त पटवून देण्याच्या हेतूने लेखन करूं लागले. यांतूनच निबंध ही नवी ग्रंथ-पद्धति निर्माण झाली. विष्णुशास्त्री यांनी आपल्या अभ्यासाने व भाषाप्रभुवाने तिलाच परिणत रूप प्राप्त करून दिलें, तें परिणत रूप म्हणजेच निबंधमाला होय.
 विष्णुशास्त्री यांना स्वदेशाच्या उत्कर्षापकर्षाची मीमांसा करावयाची होती. आपल्या प्राचीन परंपरेच्या गुणदोषांची चर्चा करावयाची होती. इंग्रजी राज्यामुळे हिंदुस्थानाला लाभ कोणते झाले व त्याची हानि किती झाली ते ठरवावयाचें होतें. त्यांच्या आधीच्या पंडितांनी मांडलेल्या सिद्धान्तांचें परीक्षण करून त्यांतील ग्राह्याग्राह्य पाहवयाचें होतें. आणि यावरून स्व-समाजाला कांही मार्गदर्शन करावयाचें होतें. त्यांनी निबंध किंवा ग्रंथ रचले ते याच हेतूने. (वक्तृत्व, इंग्रेजी भाषा, मोरोपंताची कविता, आमच्या देशाची स्थिति- हे त्यांचे लहान लहान ग्रंथच आहेत.) नव्या विद्वानांनी ग्रंथ-रचना करावी हा त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी प्रथम तशी रचना करून त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करून ठेविले. ती आदर्श रचना कशी आहे तें आता पाहावयाचें आहे. ही पाहणी जरा सूक्ष्मपणें व चिकित्सेने करणें अवश्य आहे. कारण हिंदुस्थानच्या सर्व इतिहासांत प्राकृत भाषेत केलेली ही पहिलीच निबंध-रचना आहे. वर सांगितलेच आहे की, इंग्रजांपूर्वी येथे कोणत्याच भाषेत निबंध-रचना नव्हती. त्यांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर अव्वल इंग्रजीत जे पंडित झाले त्यांनी निबंध-रचना केली, पण ती इंग्रजींतून. मराठींत जांभेकर, लोकहितवादी यांनी निबंध लिहिले. त्यांचा आशय मोठा असला तरी ती रचना प्राथमिक स्वरूपाची होती. तिला प्रौढ, परिणत रूप दिलें तें विष्णुशास्त्री यांनी. म्हणून तिची चिकित्सा बारकाईनें होणें अवश्य आहे.
 एखादी वास्तु किंवा एखादें मंदिर बांधावयाचें ठरलें की प्रथम त्या वास्तूचा सर्व नकाशा काढतात. मजले किती, प्रत्येक मजल्यावर दालनें किती, जिने कोठे, दारें कोठे, गच्ची कोठे अशी सर्व आखणी आधी करतात. आणि सर्वांना प्रथम वास्तूच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना देतात. निबंध-रचनेंत प्रारंभी हेंच करावें लागतें. विष्णुशास्त्री यांनी प्रत्येक निबंधांत ही दक्षता घेतली आहे. 'संपत्तीचा उपभोग' हा निबंध पाहा. आरंभींच या निबंधांत कशाचें प्रतिपादन होणार आहे, तें त्यांनी सांगितलें आहे. प्राचीन काळी बहुतेक सर्व देशांत संपत्तीला तुच्छ लेखीत असत. अर्वाचीन काळीं याच्या उलट मतें सर्वत झाली आहेत. तेव्हा हीं मतें कितपत खरी किंवा खोटी आहेत, त्यांत ग्राह्माग्राह्य काय आहे तें या निबंधांत दाखवावयाचें आहे. विषयाची स्पष्ट कल्पना अशी दिल्यानंतर प्रथम शंकराचार्य, सॉक्रेटीस इत्यादि प्राचीन थोर पुरुषांचें संपत्तीविषयीचें मत विष्णुशास्त्री, यांनी सविस्तर मांडलें आहे व मग त्याचें खंडन केलें आहे. नंतर वैयक्तिक दृष्टीने संपत्तीपासून होणारा लाभ व व राष्ट्रीय दृष्टीने होणारा लाभ यांविषयी विवरण केलें आहे. आणि युरोपीय लोक संपत्तीचा उपयोग करतात तसा आपण करावा हा निष्कर्ष सांगितला आहे.
 'इतिहास' हा त्यांचा अतिशय गाजलेला निबंध पाहा. या विषयाचा व्याप, भारतीयांची त्याविषयीची अनास्था, तिचीं कारण, ग्रीस, रोम या देशांत त्या शास्त्राचा झालेला उदय आणि शेवटीं इतिहासवाचनापासून होणारे जिज्ञासा जागृति, नीतिबोध, मनाचें पोषण इत्यादि उपयोग अशी ही रचना होईल, असें आरंभीच विष्णुशास्त्री यांनी सांगून या वास्तूचा नकाशाच पुढे मांडला आहे. हा झाला पूर्वार्ध. उत्तरार्धांत- इंग्रज इतिहासकारांनी आमच्या इतिहासाची केलेली विटंबना, त्यांच्यांतल्याच कांही पंडितांनी केलेला गौरव, आमच्याच लोकांनी स्वतःची केलेली विटंबना, आणि शेवटीं या विषयाच्या अभ्यासासाचें महत्त्व व त्याची साधनें, अशी विषयाची मांडणी आपण करणार आहों, हें प्रारंभीच सांगितलें आहे.
 'आमच्या देशाची स्थिति' हा निबंध रचनेच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट झाला आहे. ज्यांना निबंध-रचनेचा अभ्यास करावयाचा आहे, ती कला हस्तगत करावयाची आहे, त्यांनी अनेक वेळा याचे पठण, मनन, चिंतन करावें. 'आमच्या देशाची स्थिति'- म्हणजे कोणाची स्थिति? आमच्या राज्यकर्त्यांची स्थिति, आमच्या राजेरजवाड्यांची स्थिति, आमच्या सामान्य जनांची स्थिति- ही ठळक रूपरेषा. मग राज्यकर्त्यांची स्थिति म्हणजे काय? या राज्यापासून आमचा झालेला लाभ, आमची झालेली हानि, ख्रिस्ती धर्मतत्त्वाप्रमाणे आमच्या राज्यकर्त्यांच्या कारभाराची तपासणी आणि त्यावरून निघणारा निष्कर्ष हा एका विभागाचा आराखडा. राजे-रजवाडे- हा विषय असाच. या राजेरजवाड्यांचें पूर्वीचें वैभव, सध्याचे दैन्य व त्यांना उपदेश. सामान्य जनांची स्थिति या विभागाची मांडणी कशी आहे? इंग्लंडमधील सामान्य जनांची स्थिति, त्या तुलनेने येथल्या सामान्य जनांची स्थिति, आणि शेवटी, धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा, अशी स्थिति झाली आहे. हा निष्कर्ष; आणि मग शेवटच्या विभागांत हिंदुस्थानाच्या अवनतीची इतरांनी केलेली मीमांसा, तिचें खंडन व शेवटीं स्वमत- प्रतिपादन.
 अशी सुबद्ध, रेखीव, नेटकी रचना मराठींत अगदी अपूर्व होती. त्यामुळे ती पाहून वाचकांना तिची एकदम मोहिनी पडली, यांत कांही नवल नाही.
 वर सांगितलेंच आहे की, लोकांच्या बुद्धीला आपले सिद्धान्त पटवून देणें हें निबंध या ग्रंथ-पद्धतीचें उद्दिष्ट आहे. इंग्रजी राज्य, खिस्ती धर्म, भारताची प्राचीन परंपरा, गर्व, संपत्ति, विद्वत्व आणि कवित्व यांचे संबंध, समाजाचे उत्कर्षापकर्ष याविषयी विष्णुशास्त्री यांनी पूर्ववयांतच कांही सिद्धान्त मनाशी निश्चित केले होते. आणि ते लोकांच्या बुद्धीला पटवून देण्यासाठीच त्यांनी लेखणी हातीं धरली होती. शिवाय त्यांना लोकांना विचार करावयास शिकवावयाचें होतें, समाजाला सज्ञानदशा आणावयाची होती. ती गद्य वाङ्मयानेच येते असें त्यांचें निश्चित मत होतें. 'इंग्रेजी भाषा' या प्रबंधाच्या अरंभींच त्यांनी म्हटले आहे की, भाषेत गद्य-ग्रंथांचा प्रचार सुरू होणें हें लोकसुधारणेचें एक मोठें चिन्ह आहे. कारण पद्य रचना सोडून देऊन गद्याकडे जेव्हा लोकांचा कल होतो तेव्हा केवळ मनोरंजन करणाऱ्या विषयांहून अधिक योग्यतेच्या विषयांकडे त्यांची मनें प्रवृत्त झालीं, असें दिसून येतें. तेव्हा ही रीत पडणें हें राष्ट्राच्या सज्ञान अवस्थेचें सूचक होय, हे उघड आहे.
 तेव्हा लोकांना विचार करावयास शिकवून, लोक-सुधारणा करावयाची, राष्ट्राला सज्ञान दशा आणावयाची हें उद्दिष्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्टींत त्यांच्या तर्काला बुद्धीला आवाहन करणें हें अपरिहार्यच होतें. हें बुद्धीला आवाहन करण्याचें कार्य विष्णुशास्त्री यांनी कोणत्या साधनांनी केलें? इतिहासांतील उदाहरणें, मोठमोठ्या ग्रंथकारांची वचनें आणि तर्कशास्त्रीय युक्तिवाद, हे तीन मार्ग त्यांनी अवलंबिले आहेत. लोकभ्रम या प्रबंधाचा उपोद्घात करतांना त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याहि गोष्टीच्या खरेपणाविषयी खात्री होण्यास तीन प्रकार लागतात. एक तिची संभाव्यता, दुसरें प्रत्यक्ष प्रमाण, आणि तिसरें विश्वासपात्र मनुष्याचें भाषण किंवा लेख. ढोबळपणें पाहतां वर सांगितलेले युक्तिवाद, इतिहास व ग्रंथ म्हणजेच हे प्रकार होत. त्यांचा आपल्या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी कसा उपयोग केला आहे तें पाहूं.
 इतिहास हा विष्णुशास्त्री यांचा अत्यंत आवडता विषय. या विषयाइतकें त्यांचें दुसच्या कोठल्याच विषयावर प्रेम नव्हतें. आपल्या विधानांचा विस्तार व प्रपंच ते प्रामुख्याने इतिहासाच्या आधारेंच करतात. भारताचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास हा तर त्यांनी अभ्यासलाच होता. पण त्यापेक्षाहि जास्त बारकाईने त्यांनी ग्रीस, रोम, इटली, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया या पाश्चात्त्य देशांचा इतिहास पाहिला होता. ग्रीस व रोम यांचा इतिहास तर त्यांना जणू काय मुखोद्गतच होता. ज्यामध्ये त्यांनी ग्रीसमधील एखाद्या घटनेचा उल्लेख केलेला नाही असा त्यांचा प्रायः एकहि निबंध नसेल. वक्तृत्व हा त्यांचा प्रबंध पाहा. ग्रीस देश तर वक्तृत्वाचें आदिपीठ. आणि तेथील जगविख्यात वक्ता म्हणजे डेमोस्थेनीस. त्याच्या वक्तृत्वकलेचें साग्रसंगीत वर्णन शास्त्रीबुवांनी केलें आहे. आणि त्याबरोबरच अथेन्स या नगरीचेंहि यासंबंधीचें माहात्म्य सांगितलें आहे. त्यानंतर क्रमानेच रोम येतें. तेथील सिपियो, केटो, मारियस, सीझर आणि शेवटी डिमोस्थेनीसच्याच तोडीचा सिसेरो. त्याच्या वक्तृत्वाच्या यशाचे जे रोमहर्षक प्रसंग त्यांचें वर्णन त्यांनी तपशिलाने केलें आहे. त्यानंतरचें वक्तृत्वाचें पीठ म्हणजे इंग्लंड. तेथील चॅथम, फॉक्स, विल्यम पिट बर्क, शेरिडन यांच्यापासून थेट ग्ल्याडस्टन, डिझरेली, ब्राइट येथपर्यंतचे वक्ते विवेचनांत येऊन जातात. 'इतिहास' हा निबंध मनांत येतांच विष्णुशास्त्री यांच्या मनांत प्रथम कोण उभा राहणार? अर्थात् ग्रीसचा हिरोडोटस. तो जगांतला पहिला इतिहासकार! त्याच्या पाठोपाठ साऱ्या जगांतला अत्युत्कृष्ट इतिहासकार थुसिडिडीस आणि तिसरा म्हणजे सॉक्रेटीसचा शिष्य जिनोफन. त्यानंतर रोमचे इतिहासकार लिव्हि, प्लुटार्क, सीझर, टासिरस आणि शेवटीं 'हल्लीच्या काळी सर्वांहून विशेष ज्ञानसंपन्न असलेले लोक म्हणजे इंग्लिश. त्यांनी तर सर्व जगांतल्या देशांचे इतिहास लिहून ठेविले आहेत! 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांचे संबंध विशद करतांना ग्रीसमधील ऱ्हापसोडिस्ट, सिसेरो, इंग्लंडमधील जॉनसन, पोप, ड्रायडन, शेक्सपियर, मिल्टन यांची उदाहरणें आधार म्हणून त्यांनी दिलीं आहेत. तशीं दिल्यावांचून शास्त्रीबबांचा निबंध पुरा होणारच नाही. 'वाचना'चे महत्त्व सांगतांना पेट्रार्कची आठवण सांगितल्यावांचून सजावट पुरी होणार नाही. "पूर्व दिव्य ज्यांचें त्यांना रम्य भावि काल" हा सिद्धान्त त्यांना विशद करावयाचा आहे. त्याला प्रमाणे? होमर कवीने आकिलिसचा पराक्रम वर्णिला नसता तर शिकंदर झाला नसता. व्यासानें पांडव-चरित्र गाइलें नसतें तर शिवाजी उत्पन्न होऊन त्याने यवनांपासून राज्यश्री माघारी हरण केली असती काय? शिकंदराचा इतिहास नसता तर सीझर कशाला होता? आणि याच स्वरांत पुढे थोरले बाजीराव, चिमाजीअप्पा, थोरले माधवराव, व समशेरबहादूर गोकलखा! शेवटीं निष्कर्ष- "तेव्हा इतिहास लिहावे लागतात. ते वाचून पुढे-मागे कोणाला तरी त्यांपासून उत्साह व प्रेरणा प्राप्त होते."
 विष्णुशास्त्री यांना लोकांना विचार करावयास शिकवावयाचें होतें; पण त्यासाठीच त्यांना बहुश्रुत करावयाचें होतें. आपल्या निबंधमालेचें, लोकांस बहुश्रुत करणें हे उद्दिष्ट आहे, असें त्यांनी दुसऱ्या अंकांतच सांगितलें आहे. इतिहासांतील शेकडो घटनांचा ते जागोजागी आधार देतात. त्यामुळे हीं दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. आधार-प्रमाणांनी बोलावयाचें असतें, सप्रमाण विधानें करावयाची असतात, हा संस्कार निबंधमालेमुळे लोकांच्या मनावर सतत होत राहिला आणि अनेक देशांतील घडामोडी डोळ्यासमोर नित्य येत राहिल्यामुळे लोकांच्या जगाच्या ज्ञानांतहि भर पडली.
 हेंच दुहेरी उद्दिष्ट साधण्यासाठी चिपळूणकरांनी आपल्या प्रतिपादनाला आधार म्हणून शेकडो ग्रंथकारांची अवतरणें बहुतेक सर्व निबंधांत दिली आहेत. विचारशक्ति जागृत होण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक घटनांना जसें महत्त्व आहे तसेंच पंडितांच्या ग्रंथांनाहि आहे. एकापरीने ते ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक घटनाच आहेत. भारताचा प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली होता. आम्ही एका थोर संस्कृतीचे वारस आहों, हें त्यांना जगाला व स्वजनांना पटवून द्यावयाचें होतें. हें महासत्य त्यांनी जागजागी पाश्चात्त्य पंडितांच्या तोंडूनच वदविलें आहे. तीन हजार वर्षांपूर्वीच पौर्वात्य लोकं ग्रीक-रोमनांपेक्षा जास्त सुसंस्कृत होते, असें ऑक्ले म्हणतो. सिंधु-गंगा या प्रदेशांत फार प्राचीन काळीं तत्त्वज्ञान व अध्यात्म या प्रांतांत लोकांनी अत्यंत प्रगत विचार मांडले होते, असें बकलने म्हटलें आहे. नाना फडणीस, पूर्णय्या, झाशीवाली, यशवंतराव होळकर यांचा सिडने स्मिथ, मरे, टॉरेन्स यांनी गौरव केला आहे. हे मुत्सद्दी व वीर स्त्री-पुरुष युरोपियांच्या बरोबरीचे होते, असें ते म्हणतात. हिंदी शिपायांचा युरोपांत इतका गौरव होत होता की, महाराणा फ्रेडरिक म्हणाला, असे शिपाई मला मिळाले तर मी युरोप सहज जिंकीन.
 ख्रिस्ती मिशनऱ्यांनी नीतीच्या बाबतींत नसती ऐट करूं नये हें सांगण्यासाठी विष्णुशास्त्री 'दि वे टु रीगेन इंडिया' या ग्रंथांतला उतारा देतात. त्याचप्रमाणे बकल, व्हाल्टेअर यांचीहि अवतरणें देतात. भारताची इंग्लिश इतिहासकार कशी विटंबना करतात हें दाखविण्यासाठी मेकॉले, मिल, मॉरिस यांचे उतारे तर त्यांनी पुनः पुन्हा दिले आहेत. काव्य-नाटकांची चर्चा करतांना तर पोप, ड्रायडन, जॉनसन, वर्डस्वर्थं, शेक्सपियर, बायरन्, कालिदास, भवभूति, भारवी, जयदेव, बाण, भर्तृहरि, आडिसन मेकॉले एडिंबरो रिव्ह्यू, वेस्ट मिनिस्टर रिव्हयू, यांच्या काव्य-नाटकांतील व टीकेतील अवतरणांचा अक्षरशः वर्षाव करतात.
  कोणी तरी मेकॉलेबद्दल असें म्हटलें आहे की, त्याचे ग्रंथ वाचणें म्हणजे सर्व ग्रंथालय वाचण्यासारखेंच आहे. विष्णुशास्त्री यांच्याबद्दल तेंच अगदी यथार्थतेने म्हणता येईल. आपल्या निबंधांतून इतक्या विविध क्षेत्रांतील ग्रंथकारांचा त्यांनी वाचकांना परिचय करून दिला आहे की, ग्रंथालय-वाचनामुळे जशा त्यांच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या असत्या तशाच निबंधमालेच्या वाचनाने त्या रुंदावल्या.
  यानंतर आता शास्त्रशुद्ध युक्तिवाद विष्णुशास्त्री कसा करतात तें पाहवयाचें आहे.
 युक्तिवाद करतांना त्याची अगदी सर्वमान्य व सर्वरूढ पद्धत म्हणजे पूर्वपक्ष- उत्तरपक्ष अशी मांडणी करणें. विष्णुशास्त्री तीच अनुसरतात. मराठीला हें लेणें पूर्वी कोणी घातलें नव्हतें म्हणून त्याचें महत्त्व. 'गर्व' हा निबंध पाहा. योग्य रीतीचा गर्व हा दोषरूप नसून तो मनुष्याला शोभादायकच होतो, आणि षड्विकार हे रिपु नसून ते मित्र आहेत, असें प्रतिपादन चिपळूणकरांना करावयाचें आहे. हा अर्थातच उत्तरपक्ष होय. त्याच्या आधी प्रारंभीच पूर्वपक्षाचें मत काय आहे तें त्यांनी सविस्तर मांडलें आहे; आणि मग पूर्वपक्ष-खंडन व स्वपक्ष-मंडन केलें आहे. असें करतांना त्यांनी ग्रीक तत्त्वज्ञ सोलन, भारतीय तत्त्वज्ञ भर्तृहरि, विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन, यांचीं उदाहरणे देऊन अयोग्य गर्व ते वाहत नसत, हें प्रथम सांगितलें आहे; आणि नंतर स्वपक्ष मांडतांना भवभूति, जगन्नाथपंडित, तुकाराम, मोरोपंत यांचीं अवतरणें देऊन त्यांचा गर्व त्यांना कसा शोभून दिसतो, तें दाखविलें आहे. आणि शेवटी सध्याच्या काळी भारतीयांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे, अशा तऱ्हेचा गर्व वाहणें किती अवश्य आहे तें सांगितलें आहे.
 'संपत्तीचा उपभोग', 'लोकभ्रम' या निबंधांची रचना अशीच शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे. संपत्तीला तुच्छ लेखूं नये. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी तिचें फार महत्त्व आहे, हें त्यांचें पहिल्या निबंधांत प्रतिपाद्य आहे. तेव्हा प्रथम ती तुच्छ आहे, त्याज्य आहे असे म्हणणाऱ्यांचा पक्ष शंकराचार्य, सॉक्रेटीस व संस्कृत मराठी कवि यांच्या आधारे मांडला आहे; आणि नंतर रोम, इंग्लंड, फ्रान्स इत्यादि देशांचीं उदाहरणें देऊन उत्तरपक्ष मांडला आहे.
 कार्यकारणभावाचा विचार हा युक्तिवादाचा एक प्रधान घटक होय. प्रतिपक्षाच्या सिद्धान्तामागे कार्यकारणभावाचा आधार नाही व आपल्यामागे तो आहे हे दाखविणें हा युक्तिवादाचा आत्माच होय. या युक्तीचा विष्णुशास्त्री यांनी अनेक ठिकाणी अवलंब केला आहे. संपत्तीचें महत्त्व सांगतांना ते म्हणतात, दुर्बलता, दुराचार प्रवृत्ति हे जे अनर्थ त्यांचा संपत्तीशी कार्यकारणरूप-संबंध नित्यत्वाने राहत नाही, कारण मोठी राजसत्ता भोगीत असतांना वरील विकारांपासून मुक्त असलेल्यांची उदाहरणें इतिहासांत अनेक आहेत. 'लोकभ्रम' या प्रबंधांत तर प्रामुख्याने याच पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे. भुतें-खेतें, शकुन-अपशकुन, आकाशांतील ग्रह आणि मानवी जीवनांत येणारे शुभाशुभ प्रसंग यांमध्ये कार्यकारण संबंध कांही दाखवितां येत नाही, हें त्यांनी नाना प्रकारे दाखवून दिले आहे; आणि शेवटी म्हटलें आहे की, "हें घडतें तें काकातालीय न्यायाने घडते. यास इंग्रजीत 'असोसिएशन ऑफ आयडियाज' (कल्पनांची संगति) असें म्हणतात; आणि मनाने घेतलेल्या कारणांचा व कार्यांचा असंबंध पुष्कळदा दृष्टीस पडल्याखेरीज वरील ग्रह नाहीसा होत नाही." असें असल्यामुळे हा असंबंध ते पुनः पुन्हा प्रस्थापित करतांना दिसतात.
 अन्वय- व्यतिरेकाने आपला मुद्दा सिद्ध करणें हीहि युक्तिवादांत महत्त्वाची पद्धत मानली जाते. विष्णुशास्त्री अनेक वेळा ती अनुसरतात. वक्तृत्व हे लोकसत्ताक शासनपद्धतींतच उदयास येतें, असें त्यांना सांगावयाचें आहे. त्यासाठी प्रमाणें कोणती? ग्रीसमध्ये अथेन्स संस्थानांत लोकसत्ता होती, तेथे ही कला उदयास आली. त्याच ग्रीसमध्ये स्पार्टा, थीबस, मासिडन या संस्थानांत लोकसत्ता नव्हती. तेथे कोणी मोठा वक्ता झाला नाही. इटलींत तसेंच घडलें. रोममध्येच फक्त मोठे वक्ते झाले. अन्यत्र नाही. अर्वाचीन काळांत इंग्लंड, अमेरिका या देशांत लोकसत्ताकें असल्यामुळे तेथे वक्तृत्वाचा उत्कर्ष झाला; पण आशिया खंडांत मोठमोठीं साम्राज्ये झाली तरी प्रजासत्ताक- पद्धति तेथे नसल्यामुळे तेथे तसा उत्कर्ष झाला नाही. संपत्ति ही राष्ट्राला हानिप्रद ठरत नाही व दारिद्र्य हें सामर्थ्य प्राप्त करून देत नाही हा विचार मांडतांना विष्णुशास्त्री यांनी अन्वय-व्यतिरेक प्रमाणच दिलें आहे. रोम व कार्थेज हीं संपन्न राष्ट्रें होतीं; पण तरी शेकडो वर्षे त्यांची सत्ता टिकली. उलट आफ्रिकेंतील अनेक देश पूर्ण दारिद्र्यांत दीर्घकाळ आहेत; पण त्यांनी मोठमोठी राज्य किंवा साम्राज्यें स्थापिल्याची उदाहरणें नाहीत. अन्य क्षेत्रांत उत्कर्ष साधला असेंहि नाही. 'भावे भावः अभावे अभावः' याचें अस्तित्व तेथे त्याचें अस्तित्व, याचा अभाव तेथे त्याचा अभाव- असें या पद्धतीचें स्वरूप आहे.
 "प्रस्तुत मालेचा उद्देश" या निबंधमालेतील दुसऱ्या निबंधांत सांगितल्याप्रमाणे विष्णुशास्त्री यांना लोकांना बहुश्रुत करावयाचें होतें. लोकांमध्ये मार्मिकपणा वाढवून त्यांना विचार करण्याची सवय लावावयाची होती. कठीण पहाडांतून घाट बांधले असतां वाटसरांची जी सोय होते तीच सोय ज्ञानेच्छु लोकांसाठी करावयाची होती. ज्यास विद्यालयांतील शिक्षण न मिळाल्यामुळे ज्ञानाचा लाभ घडत नाही त्यांना ज्ञानाचा मार्ग खुला करावयाचा होता. लोकांत सदभिरुचीचा प्रसार करून त्यांच्यांत ग्रंथ वाचण्याची गोडी निर्माण करावयाची होती; आणि याचबरोबर मराठी भाषेची योग्यता किती आहे तेहि समजून द्यावयाचें होतें. त्यांच्या निबंध-रचनेचें जें वर वर्णन केलें आहे त्यावरून तीं उद्दिष्टें निबंधमालेमुळे अचूकपणे साध्य होण्यासाठी त्यांनी काय धोरण ठेवलें होतें व कसकसे प्रयत्न केले होते, हें कळून येईल.
 आरंभीं सांगितल्याप्रमाणे अशी रचना मराठीतच काय; पण भारतांतल्या कोणत्याहि प्रादेशिक भाषेमध्ये तोंपर्यंत झाली नव्हती. मराठीलाहि हा संस्कार प्रथमच घडत होता. त्या दृष्टीने त्याचे महत्त्व फार आहे. मराठी गद्याचे विष्णुशास्त्री यांना जनक म्हणतात तें यासाठीच. गद्यरचनेचें सर्वं शास्त्र त्यांना करतलामलकवत झालें होतें. त्यामुळेच त्यांचे निबंध मराठींत अमर झाले आहेत. त्यांनी ही वाङ्मयवास्तु उभारण्यासाठी कशी भक्कम चौकट उभी केली होती तें येथवर आपण पाहिलें. आता तिची सौंदर्यशोभा त्यांनी कशी वाढविली त्याचा, म्हणजेच त्यांच्या शैलीचा, विचार करावयाचा आहे.




-१४-

वाग्वैभव


 कोणत्याहि वास्तूचें निरीक्षण करतांना प्रथम तिचा भक्कमपणा तपासून पाहवा लागतो. कारण त्यावरच तिची सर्व उपयुक्तता अवलंबून असते. तिचा पाया, तिचे खांब, तिच्या भिंती या, वरील मजले पेलून धरण्याइतक्या भक्कम आहेत की नाहीत, हें आधी पाहवें लागतें. नंतर तिचीं दालनें, तिच्या खोल्या, देवघर, माजघर, सैपाकघर, ओटी, पडवी हें सर्व सांसारिक व्यवहाराच्या दृष्टीने बांधलें गेलें आहे की नाही, हें पाहवें लागतें. ही पहिली तपासणी झाली म्हणजे मग तिचें सौंदर्य पाहवयाचें. तिच्यांतील प्रमाणबद्धता, समता, वक्रता, तिचा रंग, तिच्या भिंतीवरील चित्रे, हे सौंदर्याचे घटक होत. मंदिराची सर्व शोभा त्यावरून ठरते; आणि प्रथम ती शोभाच नजरेत भरते. तरीहि खरा शिल्पज्ञ आधी तपासणी त्या मंदिराच्या टिकाऊपणाची व उपयुक्ततेचीच करील. निबंधमालेची समीक्षा करतांना हाच क्रम ठेवणें उचित होय. त्याअन्वये प्रथम विष्णुशास्त्री यांच्या निबंधांतील उपक्रमोपसंहार, विषयनिरूपणाची व्यवस्था, प्रतिपादनांतील आधारप्रमाणें, लेखकाची बहुश्रुतता, त्याची युक्तिवादपद्धति यांची समीक्षा आपण केली. आता त्या निबंधाच्या सौंदर्याची समीक्षा करावयाची आहे. हें सौंदर्य म्हणजेच लेखनशैली किंवा लेखकाचें वाग्वैभव होय.
 हें सौंदर्य पाहूं लागतांच, प्रथम नजरेत भरतें तें त्यांचें भाषाप्रभुत्व. लांब, प्रदीर्घ, पल्लेदार वाक्यांची त्यांनी फेक सुरू केली की वाचक स्तिमित होऊन जातो. भाषेला वाटेल तशी वांकविण्याचें सामर्थ्य लेखकाच्या ठायीं आहे, याची प्रचीति येते; आणि मनाला प्रफुल्लता येते. नवा गवई गावयास बसला व तो एखादा राग आळवूं लागला म्हणजे त्याच्या ताना, आलाप, व्यवस्थित संभाळून हा समेवर कसा येणार, याची ऐकणाराला चिंता वाटते. विष्णुशास्त्री यांच्या आधीच्या लेखकांचे निबंध वाचतांना वाक्याचा तोल साधून ते शेवटपर्यंत कसे पोचणार, अशी शंका वाटू लागते; पण शास्त्रीबुवांचे निबंध वाचतांना अशी शंका मनाला शिवतहि नाही. "जी भाषा बोलणारांनी दिल्ली-अटकेपर्यंत आपले झेंडे नेऊन लावले, जींत तुकाराम-रामदासांसारख्या भगवत्परायण साधूंनी आपले श्रुतिवंद्य अर्थ ग्रथित केले, जीस मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इत्यादि कवींनी आपल्या रसाळ व प्रासादिक वाणीने संस्कृत भाषेची प्रौढी आणली, त्या भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरिता कोणत्याहि अन्य भाषेच्या तोंडाकडे बघण्याची खास गरज नाही, अशी आमची खात्री आहे" अशी दीर्घ वाक्यें ते सहज पेलूं शकतात हें लोकांना पहिल्या अंकापासूनच दिसूं लागलें; आणि भाषाप्रभुत्वाचा हा नवाच खेळ आपण पाहत आहों हें त्यांच्या ध्यानांत आलें. 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या निबंधांतलें हें वाक्य पाहा. "पण हल्ली चालू असणारे एकोणिसावें शतक हें तर सुधारणेच्या संबंधाने पहिल्या प्रतीचा बाणा मिरविणारें असतां व या शतकांत सद्धर्माचे पवित्र प्रेषित आकाशांतली दिवटी घेऊन सारें भूमंडळ आक्रमीत असतां व येशूच्या दयामय धर्माचा जिकडे तिकडे गजर करीत असतां, कंठस्नानाचा व झोटिंगपाच्छाईचा प्रचार पहिल्यापेक्षा आता काडीभरहि कमी आहे असें नाही." वाक्य लांब असूनहि अर्थाचा ओघ कोठे अडखळत नाही, प्रसन्नता कमी होत नाही. भाषाप्रभुत्वाचें हेंच लक्षण होय.
 अशा या मोत्यांच्या सरांतून मधून मधून संस्कृतवरून मराठींत अन्वर्थक अशीं तयार केलेली वा घेतलेलीं शब्दांचीं रत्नें गुंफल्यामुळे भाषेची शोभा द्विगुणित झाली आहे. अभिवृध्यर्थ, कृतकृत्यता, पंडितमान्यता, उपपादन, पुनरुज्जीवन, विगतार्थं, भाषेचें वर्णसौंदर्य, बुद्धीची प्रगल्भता, उद्दाम कल्पनाशक्ति, मनोवृत्तीचे व्यापार, अनिष्टांचें मूळ, लेशमात्र शुभवर्तमान, भूमंडळ, श्वेतदीप, शार्मण्य देश, शब्दपांडित्य; दुर्मतांचें महाजाल, स्वार्थसाधु मिशनरी, अप्रयोजकपणा, तिरस्कारास्पद, जन्मसिद्ध निष्प्रतिबंध, मुद्रणस्वातंत्र्य, वर्तमानपत्र, स्थित्यंतर, जनसमूह, भरतखंड, देशबंधुत्वाचें थोरलें नातें.– यांसारखे शब्द शास्त्रीबुवांच्या निबंधांत मधून मधून चमकत असतात. मराठी भाषेच्या अंगीं अर्थव्यंजकता, वर्णसौंदर्य फार कमी आहे, हा अलीकडील विद्वानांचा ग्रह मोडून टाकण्यास आपले निबंध कारण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. निबंधमाला वाचून खाली ठेवल्यावर ती इच्छा पूर्ण झाली आहे, असाच निर्वाळा वाचक देतील.
 लांब, पल्लेदार, भरघोस वाक्यें आणि समर्पक, समुचित शब्दयोजना यांखेरीज इतरहि अनेक प्रकारचा शृंगार विष्णुशास्त्री यांनी आपल्या भाषेला चढविला आहे. त्यांतील एक विशेष शोभादायक अलंकार म्हणजे संस्कृत वचनें. आधार-प्रमाण म्हणून दिलेलीं अवतरणें, तीं ही नव्हेत. त्यांचा परामर्श वर केला आहे. कल्पनासादृश्यामुळे जशी काव्याला शोभा येते तशी विचारसाम्यदर्शक वचनांनी गद्याला येते. तशी वचनें येथे अभिप्रेत आहेत. मराठी अवतरणेंहि त्यांनी दिली आहेत; पण भर आहे तो संस्कृत वचनांवर. त्यांतहि शिरोभागी दिलेली अवतरणें पाहून मन हरखून जातें.
 'प्रस्तुत मालेचा उद्देश' या निबंधांत बहुश्रुतता हें मासिक-पुस्तकांचें उद्दिष्ट असावें, असें त्यांना सांगावयाचें आहे. तो सर्व भाव व्यक्त व्हावा म्हणून "पिबामः शास्त्रौघान् ! उत विविधकाव्यामृतरसान् ।" हें भर्तृहरीचें वचन त्यांनी शिरोभागी दिले आहे. नानाविध शास्त्रे व काव्य-नाटकें आम्ही अभ्यासूं- असा त्याचा भावार्थ आहे. सर्व निबंधाचा सारार्थ यांत आला आहे; आणि श्लोकाच्या एका लहान चरणांत तो सामावल्यामुळे त्याला चित्तवेधक रूप आले आहे. शिरोभागी देण्यासाठी विष्णुशास्त्री यांनी सर्वत्र अशींच वचनें निवडलीं आहेत. सर्व प्रतिपादनाचें रूप एका दृष्टिक्षेपांत त्यामुळे येतें.
 इतिहास या विषयावरील तिसरा निबंध पाहा. प्राचीन काळीं भारत हा अत्यंत वैभवशाली देश असूनहि आज इंग्लिश पंडित, इंग्लिश मिशनरी इत्यादिकांनी त्याची विटंबना मांडली आहे, हा या निबंधाचा विषय आहे. तो नेमका व्यक्त व्हावा म्हणून "न यत्न स्थेमानं...हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकलः ।" हें जगन्नाथपंडिताचें भामिनी विलासांतील वचन त्यांनी दिले आहे. "ज्या गुहेपुढे उभे राहण्यास मदमत्त हत्तीहि धजत नसत त्याच सिंहाच्या गुहेपुढे आज भालू भुंकत आहेत" यांतील रूपक किती समर्पक आहे; आणि मेकॉले मिल प्रभूति पंडितांविषयीचा विष्णुशास्त्री यांच्या मनांतला तिरस्कार त्यांतून कसा टचून व्यक्त होतो, हें सहज ध्यानांत येईल; आणि निबंधांच्या प्रारंभी दिलेलीं हीं वचनें म्हणजे निबंधमालेचें एक आगळें सौंदर्य आहे हें कोणालाहि मान्य होईल.
 इंग्लिश राज्यकर्ते या देशांत केवळ लूटमार करीत आहेत, या भूमीचा रक्तशोष करीत आहेत; अशाने हा देश भुकेकंगाल होऊन उद्या त्यांना लुटावयालाच कांही राहणार नाही, एवढा तरी विवेक त्यांनी ठेवावा- हें 'आमच्या देशाची स्थिति' यांतील तिसऱ्या निबंधाचे प्रतिपाद्य आहे. अशा या निबंधाच्या आरंभी कविवचन कोणते आहे? "राजन् दुधुक्षसि यदि क्षितिधेनुमेनां... नाना फलैः फलति कल्पलतेव भूमिः ।" हे राजा या भूमिरूप गाईचें तुला दोहन करावयाचें असेल तर लोक हा जो तिचा वत्स त्याचा उत्तम सांभाळ कर! तसें केलेंस तरच ही भूमि नानाफलांनी समृद्ध होईल!" पारतंत्र्यामुळे आमची अतिशय हानि झाली आहे हा भावार्थ- "फारचि बरी निरयगति, परवशता शतगुणे करी जाच" या मोरोपंतांच्या वचनांतून उत्तम व्यक्त होतो. शकुन-अपशकुन फलज्योतिष हे सर्व लोकभ्रम आहेत, त्यांत तथ्य कांही नाही हें तुकोबांच्या- "सांगो जाणती शकुन, भूत भविष्य वर्तमान । त्यांचा आम्हांसि कंटाळा, पाहो नावडति डोळा ॥" या अभंगवाणीपेक्षा जास्त निश्चयात्मक रीतीने कोण सांगणार? ग्रंथावर टीका करतांना कोणतें धोरण संभाळावें तें विष्णुशास्त्री यांनी "नीरक्षीर विवेके हंसालस्यं त्वमेव तनुषे चेत् । विश्वस्मिन्नधुनाऽन्यः कुलव्रतं पालयिष्यति कः ॥" या जगन्नाथपंडिताच्या वाणींतून वदविले आहे.
 निबंधाच्या शिरोभागीं जशी, तशीच त्याच्या अभ्यंतरांतहि शेकडो वचनें विष्णुशास्त्री गुंफून देतात. त्यांमुळे निबंध सारखे चमचमत राहतात व मनाला आल्हाद वाटतो. विद्वत्त्व आणि कवित्व एका ठिकाणीं नांदत नाहीत, कारण "प्रायेण सामग्ऱ्याविधौ गुणानां पराङमुखी विश्वसृजः प्रवृत्तिः ।" संपत्तीच्या अंगीं मूलतः हानिकारक कांही नाही, तिचा त्याग करणारा मनुष्य अधोगतीला जाणार नाहीच, असें नाही, तें सर्व मनुष्याच्या मनोनिग्रहावर अवलंबून आहे- हा भावार्थ "वनेषु दोषाः प्रभवंति रागिणां । निवृत्तरागस्य गृहं तपोवनम् ॥" या वचनानाने उत्तम व्यक्त होतो.
 संपूर्ण इतिहास मनुष्याला कधी उपलब्ध होणार नाही हें खरें, पण म्हणून इतिहासाचा अभ्यासच करूं नये हें म्हणणें युक्त नाही. कारण- "आकाश अंत, न कळोनिहि अंतरिक्षीं । आकाश आक्रमति शक्त्यनुसार पक्षी ।"- वामनपंडित.
  नाना प्रकारचे न्याय आणि म्हणी हेहिं भाषाशैलीचे शोभाकरधर्मच आहेत. कविवचनांप्रमाणेच त्यांनीहि सौंदर्यात भर पडते. कांही पंडितांना काव्य आवडत नाही. त्यांच्याविषयी विष्णुशास्त्री म्हणतात की, "यामुळे काव्याचें मनोहर सौंदर्य केशमान कमी होत नाही. उलट ते पंडितच वृद्धप्रमदान्यायाने उपहास्य होतात!" येथे आलेले अनेक इंग्लिश अधिकारी अगदी सामान्य असतात; पण ते परत इंग्लंडला गेले की 'एरंडोऽपि द्रुमायते' या न्यायाने मोठी प्रतिष्ठा पावतात. मारिस साहेबाने हिंदुस्थानचा इतिहास लिहिला. त्यांत भारतीय वीरांना उगीच एखादें पान देऊन, विस्तृत वर्णन केलें आहे तें मेजर लॉरेन्स, कर्नल मॉनसन यांचें. म्हटलेच आहे- "स्वजातिः दुरतिक्रमा!" रानावनांत, उन्हातान्हांत वाटेल तसे दौडणारे मराठे वीर संताजी, धनाजी, त्यांच्यापुढे औरंगजेबाच्या लष्करांतले तिस्मारखान अगदी निस्तेज झाले. मराठी भाषेत म्हणच आहे "रानचा वारा आणि घरचा चारा! यांची बरोबरी कशाने होणार नाही."
 न्याय आणि म्हणी हीं एक प्रकारचीं सुभाषितेंच असतात, पण ती कवींचीं नसून समाजाची असतात; पण त्यामुळे तीं अगदी सुबोध असतात.
 अत्यंत समर्पक व उद्बोधक उपमा-दृष्टान्त देऊन अर्थ फुलविण्याची हातोटी विष्णुशास्त्री यांच्या ठायीं विशेषत्वाने दिसते. 'इतिहास' या निबंधांत ते म्हणतात, 'इंग्रेज लोकांच्या अज्ञानाने व दुराग्रहाने, आणि ख्रिस्ती भटांच्या मतलबी व हेकटपणाच्या उपदेशाने या देशांत स्वतःविषयीच्या दुर्मतांचें जें महाजाल चोहोकडे पसरलें आहे तें पार नाहीसें करून लोकांचीं मनें साफ दुरुस्त करणें तर ग्रीक लोकांच्या हर्क्युलीसने आजियस राजाच्या तबेल्यांत फार दिवस बिऱ्हाड करून राहिलेली लीद व घाण दोन नद्या धरून त्यांत सोडून जशी पार धुवून टाकली, तसेच एखाद्या अचाट महावीराने उठून येथे केल्याखेरीज दुसरा मार्ग नाही!" "आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत आपले प्रतिपादन नित्य एका पक्षाचें नसतें, कधी या पक्षाचें असतें तर कधी त्या पक्षाचें- याचें स्पष्टीकरण करतांना चिपळूणकर म्हणतात, "सत्य हें एकाच राष्ट्राला, एकाच धर्माला किंवा एकाच पक्षाला अनुसरून असतें असें नाही; तर अशोधित धातूंत जसे सुवर्णरज यदृच्छेने मिसळलेले असतात, व रसायन-व्यापारांनी त्यांचें पृथक्करण करून ते वेगळे काढावे लागतात त्याचप्रमाणे सत्याची गोष्ट आहे. त्याचे अंश ज्यांत मिश्रित झाले नाहीत असा प्रायः कोणताहि पक्ष नाही. यास्तव एकाच पक्षाचा दृढ अभिमान हा दुरभिमान होय." 'लोकभ्रम' या निबंधांत शास्त्रीय सत्यापुढे बहुमताला कांही किंमत नाही हा विचार सांगतांना ते म्हणतात, "ज्याच्यापाशी शास्त्रीय सत्याचें मजबूत प्रमाण आहे तो मनुष्य उलट पक्षाच्या कोट्यानुकोटि मनुष्यास भारीच होतो. ठीकच आहे. पाहा की, ज्यापाशी दिवा आहे तो त्या दिव्यावर अंधाराचे डोंगरचे डोंगर आणून लोटले तरी डगमगेल काय? असो; पण अशा सत्यस्वरूप ज्योतीचे किरण एकंदर जगाच्या ज्ञाननेत्रांत सुखेकरून कधीहि प्रवेश करीत नाहीत." संपत्तीला विष्णुशास्त्री यांनी शस्त्र म्हटलें आहे. शस्त्र हितकारक किंवा घातक, असें कांहीच नसतें. त्याचा उपयोग करणाऱ्या मालकावर सर्व अवलंबून असतें. याचसाठी दुसरें उदाहरण त्यांनी अग्नीचें दिलें आहे. तेंहि असेच समर्पक आहे. षड्रिपूंचा विचार करतांना त्यांनी त्यांना घोड्याची उपमा दिली आहे. स्वार जर कुशल असेल तर घोडा हा कल्याणच करील; पण तो ताब्यांतून गेला तर मात्र कठीण प्रसंग. तसेच षड्रिपूंचे आहे. "वाऱ्यावांचून अग्नि जसा निर्बल त्याचप्रमाणे मोठी जाज्वल्य बुद्धीहि दृढ निश्चयावांचून पंगु होय;" "सूर्यबिंबावरून ढग जसे जातात-येतात व अखेरीस आपोआप वितळून जातात, त्याप्रमाणेच जॉनसनच्या ग्रंथांवर दूषकांचे आक्षेप शतशः आले व कालगत्या लीपूनहि गेले." "मोठ्यांच्या अंगीं दोष असले तरी ते लहानांनी काढू नयेत हें म्हणणें म्हणजे चंद्रास कलंकी म्हणूं नये किंवा सूर्याच्या बिंबावरचे काळे डाग पाहूं नयेत, असें म्हणण्यासारखेंच असमंजस झालें." असे उपमा-दृष्टान्त निबंधमालेंत जागोजाग दृष्टीस पडतात. त्यामुळे भावार्थ विशद तर होतोच; आणि शिवाय भाषेला मनोहारित्वहि येतें.
 उपमा- दृष्टान्ताप्रमाणेच 'इसापनीति' व 'पंचतंत्र' यांतील मजेदार प्रसंग व चुटके यांनी भावार्थं खुलविणें हाहि विष्णुशास्त्री यांच्या शैलीचा एक विशेष आहे. "आकाशांतील प्रभूने आमचा कारभार करण्यासाठी इंग्रजांना मुनीम नेमलें आहे; पण हा मुनीम इसापनीतील खवाखाऊ माकडाप्रमाणे कृति करीत आहे!" भावार्थ असा की, दोन मांजरांच्या भांडणांत त्याने सर्व खवा स्वतःच लाटला त्याप्रमाणे येथील निरनिराळया जमातींच्या भांडणांत हा मुनीम न्याय देण्याचें मिष करून सर्व खवा स्वतःच लाटीत आहे. "आम्ही हिंदुस्थानच्या कल्याणाकरिता येथे आलों" असें म्हणत इंग्रज सत्तारूढ झाले; आणि इसापनीतींतील घोड्यासारखी आमची स्थिति झाली. वरील स्वाराने त्यास सांगितलें, "बारें, तूं म्हणतोस तें खरें पण आता नाही माझ्याने तुला सोडवत. तूं इतका उपयोगी आहेस हें मला पूर्वी माहीत नव्हते. आता तुझ्या पाठीवरचें खोगीर कधी निघेल ही आशा सोडून दे." वानर आणि घोडा यांच्या वरील गोष्टीमुळे इंग्रज राज्यकर्त्यांचे स्वरूप चित्र काढल्याप्रमाणे डोळ्यापुढे उभे राहतें. पंचतंत्रांतील गोष्टीने हेंच उद्दिष्ट साधलें आहे. पंचतंत्रांतील तीन धूर्तांनी त्या भोळ्या ब्राह्मणास फसवून प्रत्यक्ष पशूवर जशी कुत्र्याची भ्रांति करविली, त्याप्रमाणे आमचे पूर्वज सर्व राष्ट्रांत अग्रगण्य असतां व साऱ्या जगाचे गुरु असतां त्यांच्या पदरीं या लबाड, कुत्सित लोकांनी वेडगळपणा बांधला आहे. मिशनरी, राज्यकर्ते व मेकॉलेसारखे पंडित हेच ते तीन धूर्त होत हें उघड आहे.
 पण संस्कृत-मराठी कवींचीं वचनें, नानाविध न्याय, म्हणी, उपमा-दष्टान्त; पंचतंत्र, इसापनीतीतील पशुपक्ष्यांच्या कथा यांपेक्षाहि विष्णुशास्त्री यांच्या शैलीचा जास्त तेजस्वी अलंकार म्हणजे उपहास-उपरोध हा होय. त्यांच्या शैलीची शोभा या एकाच अलंकाराने द्विगुणित नव्हे दशगुणित झाली आहे. व्हाल्टेअर, ज्यूनियस यांचा त्यांनी अभ्यास केला होता; आणि तसाच विखार आपल्या लेखणींत त्यांनी उतरविला होता. त्यामुळे तिचा डंख ज्यांना होई त्यांना असह्य वेदना होत. एलिफास, ज्ञानोदय यांचा जो जळफळाट त्या वेळीं त्यांच्या पत्रांवरून दिसून येई त्यावरून हा डंख किती विषारी असे, तें चांगलें कळून येतें. मेकॉले, मॉरिस यांसारखे इंग्रज विद्वान, विलसनसारखे पाद्री आणि लिटन, टेंपल, स्ट्रॅची यांसारखे राज्यकर्त यांच्यावर विष्णुशास्त्री टीका करूं लागले म्हणजे त्यांच्या या उपरोधिक लेखनाला विलक्षण धार चढे; आणि ते विषदिग्ध खड्गाचे प्रहार भारताच्या शत्रूंवर होत असल्यामुळे वाचकांना विलक्षण आनंद होई. मेकॉलेसाहेब म्हणाले की, हिंदुस्थान-देश पोर्तुगाल, आयर्लंड यांहून भिकारी आहे. त्यावर विष्णुशास्त्री म्हणतात, "हिंदु- स्थान भिकारी! वाः! दिवसाढवळ्या साऱ्या जगाच्या डोळ्यांत माती टाकण्याचें साहेबांचें धाडस त्यांचें त्यांसच शोभो! हिंदुस्थान जर दरिद्री झाला तर साहेबांचा देश कशाने श्रीमंत झाला कोण जाणे! शिशाच्या व कोळशाच्या खाणींनी तर नाही ना? कोणी नाही म्हणावें? उद्या मेकॉलेसाहेबांचे एखादे बंधु जाहीर करतील की "अहो! हिमालयाविषयी भूगोलवेत्त्यांना भ्रांति आहे. आमच्या इंग्लंडांतील एखादें लहानसें टेकाडहि त्यास उंचीत हटवून टाकील! तसेंच गंगा, ब्रह्मपुत्रा यांना लंडनांतील एखादें गटारहि मागे सारून देईल!" 'ज्ञानोदय' हें जें ख्रिस्ती मिशनऱ्यांचें मासिक त्याने विष्णुशास्त्री यांशीं उभा दावा धरला होता. वेळोवेळी त्यांच्यावर कडाका उडवून मिशनरी शास्त्रीबुवांना राजद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करीत. त्याच्या टीकेला उत्तर देतांना विष्णुशास्त्री म्हणतात, "बरोबरच आहे. मेकॉले, मिल्ल अशा जगविख्यात ग्रंथकारांवरहि जो 'आपली क्षुद्ध लेखणी' उचलतो तो महामूर्ख कसा नव्हे? इंग्रेज लोकांनी त्यांच्या देशावर जन्मोजन्मीहि न फिटणारे जे असंख्य उपकार करून ठेवले आहेत ते न जाणता जो प्रत्येक इंग्रजास प्रतिख्रिस्त मानीत नाही, खिस्ती धर्म खरा, हिंदु धर्म खोटा अशी ज्याची अजून खात्री झाली नाही; पाठीवर घाव घेऊन तडक पळणारा इंग्रजी सोजीरहि आमच्या बाजीरावापेक्षा, रणजितसिंगापेक्षा शतपट अधिक शूर असें ज्यास भासत नाही, ज्याची पूर्वजप्रीति इंग्रेजी ज्ञानाने नष्ट होत नाही, महाराणीचे ठायीच्या राजनिष्ठेचा व आपल्या देशाच्या शूरांच्या वर्णनांत केवढा जबरदस्त विरोध आहे तो ज्यास दिसत नाही, तो केवढा नष्ट, केवढा कृतघ्न!"
 इंग्रज भारताचें कल्याण करणार, त्यांचें राज्य दैवी कृपेने येथे झाले, या उद्गारांची विष्णुशास्त्री यांना भयंकर चीड असे. अशा प्रलापांचा समाचार घेतांना, 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत ते म्हणतात, "मराठीशाहीची टोलेजंग इमारत उभारून दिली तेव्हा शिवाजीमहाराजांनी इंग्रेजी शिपाईगिरी किंवा मुत्सद्देगिरी चार हजार कोसांवरून उसनी मागून आणली होती काय? बाळाजीपंत पेशव्याने दिल्ली- अटकेपर्यंत नजर पोचवून अवघ्या बादशाहीस आपल्या जाळ्यांत गुदरविले तेव्हा आपली बुद्धि एखाद्या आंग्लभौम विद्यालयांत पाजळून घेतली होती काय?"
 इंग्रज राज्यकर्ते, पंडित व मिशनरी यांच्याप्रमाणेच स्वकीयांवरहि त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल विष्णुशास्त्री उपरोधिक टीका करीत. त्या वेळच्या राजे-रजवाड्यांवर टीका करतांना विष्णुशास्त्री म्हणतात, पाटीलबोवांचा तर खुद्द लंडनवर भगवा झेंडा रोवण्याचा इरादा होता; आणि आता? आता शिंदे यांनी मोठें शतकृत्य केलें म्हणजे काय, तर कलकत्त्यास एखाद्या 'बॉलांत' कमांडर इन् चीफच्या बायकोबरोबर नाचले! आणि महाराज होळकर यांनी मोठी तरवार गाजविली म्हणजे काय, तर एखादी गिरणी काढली!" पुणे-वर्णन लिहून स्वकीयांची निरर्गल निंदा करणाऱ्या लेखकाविषयी लिहितांना ते म्हणतात, "एकंदरीत हा ग्रंथ वाचला असतां मिशनरी लोकांच्या शिक्षणाने बुद्धि केवढी फाकते, सत्यनिष्ठा केवढी वाढते वगैरे गोष्टी स्पष्ट दिसून येतात!"
 विष्णुशास्त्री यांच्या शैलीच्या या अभ्यासावरून, त्यांच्या यशाचें श्रेय त्यांचें स्वत्व, स्वाभिमान याविषयीचे जे विचार त्यांना जसें आहे तसेंच त्यांच्या अद्वितीय भाषाशैलीलाहि आहे हे सर्वांना मान्य होईल असें वाटतें. ते खरोखरीच मराठी गद्याचे जनक होते यांत शंका नाही.




-१५-

व्यक्तिमत्त्व

 विष्णुशास्त्री यांचे कार्य आणि त्यांचें साहित्य यांचा येथवर सर्वांगीण विचार केला. त्यांचे ध्येय काय होतें, दर वेळी डोळ्यांपुढे त्यांनी कोणतें उद्दिष्ट ठेवलें होतें, त्याच्या सिद्धीसाठी कोणते प्रयत्न केले आणि त्यांना यश काय आलें याचाहि विचार केला. आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून हें सर्वं विवेचन पुरें करावयाचें आहे.
 मनुष्याचें व्यक्तिमत्त्व हें त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याची प्रज्ञा, त्याने केलेले बहुविध उद्योग, त्याचा मित्रपरिवार, आणि त्याच्या काळची परिस्थिति यांतून साकार होत असते; आणि त्या व्यक्तिमत्त्वांतून वरील घटकांवरहि परिणाम होत असतो. एका दृष्टीने आधी झाड की आधी बी अशासारखाच हा प्रश्न आहे. दोन्ही आधी आणि दोन्ही मागून असेंच नेहमी वाटत असतें. व्यक्तिमत्त्व आणि परिस्थिति यांचा विचार करतां या दोहींचा एकमेकांवर परिणाम होत असतो; आघात- प्रत्याघात होत असतात एवढेच निश्चयाने म्हणतां येईल. येथे आपणांस या तपशिलांत शिरावयाचे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रधान गुण तेवढे पाहवयाचे आहेत. कारण हा प्रबंध म्हणजे त्यांचें चरित्र नसून त्यांच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन आहे.
अहंवृत्ति
 विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रधान गुण म्हणजे त्यांची अहंवृत्ति हा होय. "मी मराठी भाषेचा शिवाजी आहे" हे त्यांचे उद्गार या अहंवृत्तींतूनच निघालेले आहेत. मराठी भाषा ही पुरेशी अर्थव्यंजक नाही. मनांतले सर्व विचार, सर्व भाव व्यक्त करण्याचें सामर्थ्य तिला नाही, असा आक्षेप त्या वेळीं कोणी घेत असत. त्याला "आमचें पुस्तक (निबंधमाला) हेंच या आक्षेपाचे खंडन होय," असें उत्तर या अहंवृत्तीनेच दिलें. शाळाखात्याचे डायरेक्टर चॅटफील्डसाहेब एकदा शाळेत आले होते. अशा वेळीं ते आपल्या अध्यापनाविषयी काय अभिप्राय देतील, या विचाराने शिक्षक सामान्यतः अस्वस्थ असतात; पण असली भीति, शंका, अस्वस्थता शास्त्रीबुवांच्या स्वप्नांतहि कधी आली नसेल. उलट त्यांनीच त्या दिवशीं डायरीमध्ये, "माणूस मोठा भला दिसतो, माझें त्याच्याविषयी अनुकूल मत झालें," असा अभिप्राय लिहून ठेवला. मला दुसऱ्यांचे अभिप्राय नको आहेत, मीच जगावर अभिप्राय देणार, हे त्या अहंवृत्तीचे बोल आहेत.
आत्मप्रत्यय
 ही अहंवृत्ति, हा अहंप्रत्यय विष्णुशास्त्री यांच्या ठायीं नसता तर त्यांच्या हातून जें कार्य झालें तें मुळीच झालें नसतें. मागे अनेक वेळा सांगितलेच आहे की, इंग्रेज राज्यकर्ते, युरोपीय पंडित आणि मिशनरी हे हिंदी जनांचा तेजोवध करण्याचा अहर्निश प्रयत्न करीत होते; आणि हे सर्व लोक मोठे कर्तबगार, विद्वान, अनुभवी असे होते. त्यांना भारताच्या उद्धारार्थ परमेश्वरानेच धाडलें आहे, अशी श्रद्धा मोठ मोठ्या हिंदी विद्वानांच्या मनांत निर्माण व्हावी, इतकें त्यांचें तेज होते, इतकी दीप्ति त्यांच्याभोवती होती. अशा स्थितीत त्यांनी हिंदु धर्म, हिंदु परंपरा, हिंदु इतिहास, यांच्यावर जी निरर्गल टीका चालविली होती तिला उत्तर देणाऱ्या माणसाचा आत्मप्रत्यय अगदी असामान्य असणें अवश्य होते. अत्यंत उग्रदर्प असलेला अहंकारच तेथे टिकणें शक्य होतें. अतिशय दुर्दम्य अशा अहंमतीने संपन्न असलेला पुरुषच त्यांचे आघात लीलया झेलून त्यांच्यावर तितक्याच जोराने प्रत्याघात करण्यास समर्थ झाला असता. विष्णुशास्त्री हा तसा पुरुष होता. विष्णुशास्त्री म्हणजे मूर्तरूपाला आलेला अहंकारच होता. त्यामुळेच इंग्रेज म्हणजे देवमाणसें, सर्व गुणांचें आगर म्हणजे इंग्लंड, खरा धर्म म्हणजे सिनिया पर्वतावरचा, विद्वत्त्व, सुशीलत्व, शूरत्व हे सर्व गोऱ्या कातड्याकडे, आणि हिंदु म्हणजे अगदी कृमि-कीटक, असल्या घातक, भ्रांत तत्त्वज्ञानाच्या मगरमिठींतून ते स्वजनांना मुक्त करूं शकले. त्यांच्या ठायीच्या या अहंकारालाच, त्यांनी गर्व असें म्हटलें आहे. आणि या विपत्काळी आपल्या सर्व समाजानेच अशा गर्वाची स्वतःच्या मनांत जोपासना केली पाहिजे, त्यावांचून आपली धडगत नाही, असें निःशंकपणे सांगितलें आहे.
राष्ट्रीय अहंकार
 विष्णुशास्त्री यांच्या या वैयक्तिक अहंकाराला सामाजिक व राष्ट्रीय अहंकाराची बैठक होती, हें आपण ध्यानांत ठेविले पाहिजे. "आज हिंदी जनांचें कर्तृत्व अगदी हीन पातळीला गेलें असलें तरी त्यांच्या अंगचे गुण आज सुप्त आहेत." असे ते म्हणत. निबंधमालेचा उद्देश काय तें सांगताना ते म्हणतात, आमच्या लोकांत कितीहि दोष असले तरी बुद्धीचा मंदपणा हा, आमचा अत्यंत तिरस्कार करणाराच्यानेहि आमच्या माथी मारवणार नाही! चलाखपणांत आम्ही कोणत्या लोकांस हार जाणार नाही, अशी आमची खात्री आहे. आमच्या बुद्धीचे प्रभाव जगाच्या इतिहासावर अक्षय खोदलेले आहेत व चंद्र-सूर्य आहेत तोंवर त्यांचा झेंडा मिरवत राहील!" स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश, यांचा अभिमान तर त्यांना होताच; पण दैन्यावस्थेला गेलेल्या स्वजनांचाहि अभिमान ते तितक्याच तीव्रपणें प्रगट करीत. त्या स्वजनांच्या अभिमानाची, अहंवृत्तीची जपणूक करणें हेंच त्यांच्या वैयक्तिक अहंवृत्तीचें प्रमुख कार्य होतें.
व्यासंग
 विद्वत्ता, पांडित्य, अखंड व्यासंग हा विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा घटक होय. स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश यांवर होणाऱ्या आघातांचें निवारण करून ते आघात करणाऱ्या शत्रूंवर त्यांना प्रत्याघात करावयाचे होते. हें सर्व युद्ध बौद्धिक पातळीवरून व्हावयाचें होतें. इंग्रज पंडित व मिशनरी यांचीं सर्व शस्त्रास्त्रे बौद्धिक होतों. इतिहास, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्या आधाराने ते बोलत व लिहीत. त्यांतून आधार काढून, प्रमाणें देऊन, हिंदु धर्म, हिंदु तत्त्वज्ञान यांतील सिद्धांतांचे खंडन करीत व स्वधर्माचें मंडन करीत. भारताच्या प्राचीन परंपरेला दूषण देतांना इतिहासाचें बळ मागे उभे करीत. विष्णुशास्त्री यांनी तींच शास्त्रास्त्रे वापरलीं नसती तर, हिंदी राजे इंग्रजांच्या भारी शस्त्रबळामुळे जसे रणांत पराभूत झाले तसेच, विष्णुशास्त्री इंग्रज पंडितांपुढे पराभूत झाले असते. पण शास्त्रीबुवांनी हें चांगलें जाणलें होतें, आणि डेक्कन कॉलेजांत असल्यापासूनच त्यांनी या युद्धाला लागणारी शस्त्रास्त्रे व दारुगोळा आपल्या कोठारांत भरण्यास सुरुवात केली होती. ग्रंथकार होण्याचें त्यांचे ध्येय तेव्हापासूनच निश्चित झालें होतें. बी. ए. झाल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा, असें कृष्णशास्त्री यांनी त्यांना सुचविलें होते; पण त्यांनी तें मुळीच मनावर घेतलें नाही. त्यांना बौद्धिक कुरुक्षेत्रावर जावयाचें होतें, म्हणून त्या बाणभात्यांचा साठा ते करीत होते.
बहुश्रुतता
 पण विष्णुशास्त्री यांची विद्वत्ता ही बहुश्रुततेच्या स्वरूपाची होती. एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला नव्हता. डॉ. भांडारकर, न्या. मू. रानडे यांच्यासारखें त्यांचें पांडित्य नव्हतें. डॉ. भांडारकर हे संस्कृत विद्येचे, प्राचीन इतिहासाचे पंडित होते. न्या. मू. रानडे अर्थशास्त्राचे पंडित होते. विष्णुशास्त्री त्या अर्थाने कोठल्याच विषयाचे पंडित नव्हते. हिंदी जनांची स्वत्वजागृति करणें, आणि इंग्रज राज्यकर्त्यांचें खरें स्वरूप त्यांना दाखविणें हें त्याचें उद्दिष्ट होतें. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपांत जसें प्रबोधन झाले, तसें प्रबोधन त्यांना येथे घडवावयाचें होतें. मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रांत मानसिक क्रांति घडविणें हें त्यांचें उद्दिष्ट होतें. आणि या उद्दिष्टांसाठी अवश्य तें वाचन, अवश्य तो व्यासंग, त्यांनी केला होता. या दृष्टीने इतिहास हा त्यांच्या व्यासंगाचा प्रधान विषय होता. वक्तृत्व, संपत्तीचा उपभोग, गर्व, मुद्रण-स्वातंत्र्य, लोकभ्रम, आमच्या देशाची स्थिति- कोणताहि विषय असो. ग्रीस, रोम, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, अमेरिका या देशांच्या व प्राचीन भारत व महाराष्ट्र यांच्या इतिहासांतील आधार-प्रमाणे देऊन ते उपपादन करतात. हे इतिहास मात्र त्यांनी फार बारकाईने वाचले होते. त्यांतील घटना व व्यक्ति त्यांच्या डोळ्यांपुढे सतत उभ्या असत आणि विषय निघतांच तेथे तेथे त्यांची गंफण ते करीत असत. त्यामुळे त्यांची निबंधमाला रत्नजडित मालेप्रमाणे शोभिवंत दिसे, आजहि दिसते. संस्कृत कविता, भर्तृहरि, जगन्नाथपंडित यांचे ग्रंथ आणि पाश्चात्यांनी संस्कृत विद्येचे व प्राचीन भारताच्या थोरवीविषयी लिहिलेले ग्रंथ, हा त्यांचा दुसरा आवडीचा विषय होता. प्राचीन भारताची संस्कृति, त्या काळच्या विद्या, कला आणि एकंदर कर्तृत्व यांचा अभिमान जागृत करण्यासाठी त्यांनी हा अभ्यास साक्षेपाने केला होता. याशिवाय 'वेदार्थयत्न', 'कौमुदी महोत्सव', 'भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश' अशासारख्या ग्रंथांचें परीक्षण करतांना वेदवाङमय, पाणिनि, पतंजली यांचे व्याकरण-ग्रंथ यांच्याविषयी अवश्य ती सर्व माहिती ते जमा करीत आणि येथील समाजाचें प्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्या ग्रंथांचें समीक्षण करीत. मूळ ग्रंथाचें साकल्याने परीक्षण करणें असा त्यांचा उद्देशच नसे. महाराष्ट्रभाषेची अभिवृद्धि व्हावी, लोकांची ज्ञानलालसा जागृत व्हावी हा हेतु ठेवून ते हीं समीक्षणे लिहीत. त्या त्या विषयाचें खोल ज्ञान त्यांना नव्हतें. तसें त्यांनी एक-दोन ठिकाणीं सांगूनहि टाकलेलें आहे; पण पुराण-युगांतून लोकांना वास्तव युगांत आणावें या दृष्टीने ग्रंथाचें परीक्षण करण्यास अवश्य तो व्यासंग ते निश्चित करीत.
 'इंग्रेजी भाषा' हा त्यांचा प्रबंध पाहिला म्हणजे विष्णुशास्त्री यांचें अंतिम उद्दिष्ट आणि तें सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेला व्यासंग यांचे स्वरूप बरोबर कळून येईल व त्यावरून त्यांच्या व्यक्तित्वाची रूपरेषा मनापुढे स्पष्ट उभी राहील.
गद्य महत्त्व
 या निबंधांत इंग्रेजी वाङ्मयांतील काव्य-नाटकादि साहित्याचा परामर्श ते जवळजवळ करीतच नाहीत. त्यांनी विवेचन केलें आहे तें प्रामुख्याने निबंध व इतिहासग्रंथ यांचें. सत्यदीपिकाकारांनी या प्रबंधावर जे आक्षेप घेतले त्यांना उत्तर देतांना विष्णुशास्त्री यांनी स्वतःच हे स्पष्ट केलें आहे; आणि याचें कारणहि उघड आहे. गद्य-ग्रंथांचा प्रारंभ हे राष्ट्राच्या सज्ञान अवस्थेचें सूचक होय, असा त्यांचा ठाम बुद्धिनिश्चय होता; आणि ती सज्ञान अवस्था या देशाला आणावयाची हें त्यांचें उद्दिष्ट होतें. म्हणूनच इंग्लंड या राष्ट्राला ती दशा ज्या ग्रंथांमुळे आली त्यांचें विवेचन त्यांनी केलें आहे. ते म्हणतात, "मागे स्पेक्टॅटर वगैरे पत्रें सांगितली, त्यांचा लोकांस अतिशय हव्यास लागून, वाचण्याची व ज्ञानसंपादनाची गोडी जशी त्यांस अधिका धिक लागत चालली, तसतसा इंग्लंडांत विद्येचा उत्कर्षं होऊं लागून, राजकीय प्रकरणांचाहि सामान्य लोकांत सुद्धा विचार होऊं लागला. शिवाय, नाना प्रकारच्या विषयांवर हजारो ग्रंथ होऊन, ते सर्वांस समजूं लागल्याने एकंदर राष्ट्राचे ठायीं अभिज्ञता व ज्ञानाविषयी उत्कंठाहि अधिकच प्रबळ झाली." हीच प्रगति येथे चिपळूणकरांना घडवावयाची होती. त्यांच्या निबंधमालेने वाचनाचा हव्यास लोकांना लागून त्याचें प्रत्यक्ष फल म्हणून भिन्न भिन्न क्षेत्रांतील लोकांना लेखनाची स्फूर्ति कशी झाली तें प्रारंभीच सांगितलें आहे.
इंग्रज इतिहासकार
 हें इंग्रजीतील निबंधवाङमयाविषयी झालें. इंग्रजीतील 'इतिहास-ग्रंथांचें'- विवेचन त्यांनी कशासाठी केलें! पौर्वात्य देशांचा व विशेषतः भारताचा इतिहास लिहिणारे जे इंग्रज इतिहासकार त्यांचें सत्य स्वरूप दाखविण्यासाठी! ते म्हणतात, 'इकडील लोकांविषयी खरें ज्ञान पाश्चात्त्य लोकांस होण्यास पहिली अवश्य गोष्ट ही की, अज्ञानास्तव, गर्वास्तव किंवा दुराग्रहास्तव त्यांच्या मनाने ज्या वेड्या निराधार समजुती घेतलेल्या असतात त्या काढून टाकून, त्यांनी आपला चित्तरूप-पट पहिल्याने स्वच्छ धुवून काढला पाहिजे. कारण इकडील लोकांविषयी ज्ञान व यथार्थबुद्धि या गुणांत यांतील बहुतेकांचा कमतरपणाच असतो.' शेवटीं निष्कर्ष म्हणून त्यांनी सांगितला आहे तो असा : सर्व गोष्टींचा यथार्थ विचार केला असतां, असें दिसतें की, मनुष्यमात्रांत जे दोष सापडतात त्यांपासून युरोपियन लोक झाले म्हणून ते तरी तिळमात्रही मुक्त झाले आहेत असें नाही. यथार्थबुद्धि किंवा मनाची सम-वृत्ति या गुणांत सुधारणेच्या शिखरावर जाऊन पोचलेले व खऱ्या धर्माचीं तत्त्वें स्वीकारल्याने पावन झालेले आमचे पाश्चात्त्य बंधु इतरांपेक्षा वरचढ आहेत असें नाही.
अनाग्रह दुर्मिळ
 इतिहासाच्या अशा सूक्ष्म व व्यापक अध्ययनानंतर बुद्धीचें फल जें अनाग्रह तें अभ्यासकाला मिळावे अशी सहजच अपेक्षा निर्माण होते; आणि विष्णुशास्त्री यांना तें मिळालें होतें हैं त्यांच्या अनेक निबंधांवरून स्पष्ट दिसतें; पण अनाग्रह आणि दुराग्रह यांचें चमत्कारिक मिश्रण त्यांच्या बुद्धींत झालें होतें; पण जगांतल्या थोर इतिहास- अभ्यासकांच्या बाबतींत अनाग्रहाची अपेक्षा बव्हंशीं विफलच झालेली दिसते. अलीकडे तो नियमच झाला आहे. मार्क्स, बकल, हंटिंग्टन, गोबिनो, चेंबरलेन, हेगेल, स्पेंगलर यांनी अर्थ, भूगोल, वंश, अध्यात्म, इत्यादींविषयी, प्रथम मनाशी कांही सिद्धान्त निश्चित करून, त्यांच्या उपपादनासाठी इतिहास त्या त्या चौकटींत वाटेल तसा ठोकून बसविला आहे. त्यांच्या इतिहास- विवेचनांत पूर्वग्रह, अभिनिवेश, अविवेक, अंधता, पक्षपात हे दोष पानोपानीं दिसून येतात. त्या मानाने विष्णुशास्त्री हे शतपटींनी जास्त तटस्थता दाखवू शकतात यांत शंकाच नाही; पण अनेक ठिकाणीं त्यांनी दुराग्रहाने कांही मते मांडली आहेत हें खरेंच आहे. याविषयी सविस्तर विवेचन मागे केलेच आहे. येथे त्यांचें व्यक्तिदर्शन- या विषयाच्या पूर्ततेसाठी फक्त निर्देश करतों.
 इंग्रज राज्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनांत कमालीचा द्वेष असूनहि त्यांचे गुण त्यांनी अनेक ठिकाणीं मुक्त कंठाने गाइले आहेत. त्यांची विद्याभिरुचि, त्यांची उद्योगप्रियता, त्यांची शोधक बुद्धि, त्यांचा देशाभिमान, त्यांची साहसप्रियता, त्यांची ज्ञानलालसा हे गुण आपण आत्मसात् केले पाहिजेत, त्यांच्यापासून शिकले पाहिजेत, असें अगदी मुक्तमनाने त्यांनी वारंवार स्वबांधवांना सांगितलें आहे; आणि त्याचप्रमाणे स्वजनांचे दोषहि त्यांनी परखडपणें सांगून त्यासाठी त्यांच्यावर कठोरपणें टीकाहि केली आहे. आपल्याला विद्याभिरुचि नाही, विद्यानंदाची कल्पना नाही, संपत्तीविषयी, षड्विकारांविषयी आपले सिद्धान्त प्रामादिक आहेत, देशाभिमान ही वृत्तीच आपल्या ठायीं नाही, जातिभेद हें त्याचें कारण आहे, आपण निवृत्तिमार्गी लोक आहों, लोकशाही पद्धति भारताला माहितीच नाही, इतिहास-लेखनाचा अभाव हें आपलें मोठें व्यंग आहे, असे हिंदी जनांचे दोष ते ठायीं ठायीं दाखवितात; आणि बहुधा दर वेळीं युरोपियनांचा कित्ता घेण्यास सांगतात. पण असे असूनहि आपल्या देशाला कांहीएक झालें नाही, असें निक्षून ते सांगतात, आणि सध्याच्या निकृष्ट अवस्थेची अगदी अनैतिहासिक मीमांसा करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करतांना नीर-क्षीर विवेक करूनच क्षीर तेवढे घेण्याचें धोरण कटाक्षाने संभाळले पाहिजे.
मित्रवर्य महाजनी
  त्या काळचे एक मोठे पंडित वि. मो. महाजनी हे विष्णुशास्त्री यांचे स्नेही व सहाध्यायी होते. त्यांना विष्णुशास्त्री यांच्या बंधूंनी आपण लिहिलेल्या विष्णुशास्त्री यांच्या चरित्रांत समाविष्ट करण्यासाठी, त्यांच्या ग्रंथांचें परीक्षण लिहिण्यास सांगितलें; पण महाजनी यांनी स्पष्ट कारणें सांगून नकार दिला. कारणें कोणती? विष्णुशास्त्री यांची टीका एकांगी असे. त्यांची भाषा फार जहाल असे. लोकहितवादी, जोतिराव फुले, दयानंद यांच्यावर त्यांनी पूर्वग्रहदूषित मनाने टवाळी केली ती महाजनींना आवडली नाही. त्यांनी अनेक वेळा विष्णुशास्त्री यांना तसे लिहून पाहिलें; पण उपयोग झाला नाही. बंधूंना लिहिलेल्या पत्नांत त्यांनी म्हटलें आहे की, "विष्णुपंत यांनी मराठीची मोठी सेवा केली, ते मोठे देशभक्त होते, हें मला मान्य आहे. तसेंच ते केवळ अंध रूढिभक्त होते असेंहि नाही. अनेक वेळा त्यांनी समाजांतील अविवेकी रूढींवर टीका केलेली आहे; पण दुर्दैवाने ती टीका लोक विसरले आणि त्यांचे 'जॉन्सन', 'इतिहास' हे निबंध दुर्लक्षून 'लोकहितवादी', 'दयानंद' यांच्यावरील निबंधच तेवढे लोकांनी लक्षांत ठेवले." (विश्रब्ध शारदा, पृ. २२२). हैं पत्न वाचून माझ्या मनांत आलें की, विष्णुशास्त्री यांच्याविषयीचा हा अभिप्राय त्यांनी जाहीरपणें वर्तमानपत्रांत मांडावयास हवा होता, किंवा त्यांच्या बंधूंची विनंती मान्य करून तसें परीक्षण लिहावयास हवें होतें. आपल्या मित्राचे गुणदोष दाखविणें त्यांचें कर्तव्यच होतें. त्यामुळे त्या मित्राच्या कार्याचें उज्ज्वल रूप तेवढेच कायम राहून दोषपरिहार झाला असता व समाजाचा फायदाच झाला असता.
नाण्याच्या दोन बाजू
 अर्थात् निश्चित असें कांही सांगणे फार अवघड आहे. कारण ज्या त्यांच्य अहंवृत्तीचा वर गौरव केला आहे तिच्यांतूनच हे दोष निर्माण झाले होते. म्हणजे- त्यांच्या प्रकृतीचाच तो घटक होता; आणि तो नाहीसा झाल्यावर प्रतिपक्ष्यांवर बेगुमान हत्यार चालविण्याचें जें धैर्य त्यांच्या ठायीं होते, तें कितपत टिकून राहिलें असतें, तें सांगवत नाही. कांदा, लसूण अशा कांही कंदांना अत्यंत उग्र असा दर्प असतो. तो पुष्कळांना दुःसह होतो. त्यांना हे दोन्ही कंद आवडतात; पण कांही तरी रासायनिक प्रक्रिया करून हा दर्प तेवढा घालवावा, असें त्यांना वाटतें. त्यांना शास्त्रज्ञ सांगतात की, तो दर्प घालविला म्हणजे त्यांचे गुणहि त्याच्याबरोबरच जातील. कारण त्या दर्पातच त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तित्व असतें. विष्णुशास्त्री यांच्या बाबतींत असेंच केव्हा केव्हा वाटतें. दुराग्रह ही नाण्याची एक बाजू आहे. अत्यंत निर्भय, साहसी प्रतिपादन करण्याचे धैर्य ही त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. बहुतेक थोर पुरुषांची अशीच स्थिति असते. डॉ. जॉनसन हा जो विष्णुशास्त्री यांचा आदर्श, तोहि तसाच होता.
राजद्रोह!
 निर्भय लेखन हा जो चिपळूणकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रधान गुण तो पहिल्या अंकापासूनच दिसूं लगला होता. 'इतिहास' या प्रबंधांत तो प्रकर्षाने दिसून आला. आणि 'आमच्या देशाची स्थिति' या प्रबंधांत त्याची अगदी परिणति झालेली दिसते. या काळांत त्यांच्या प्रतिपक्ष्यांनी त्यांच्यावर इतर आरोप तर केलेच; पण प्रामुख्याने राजद्रोहाचा आरोप करण्यांत सर्वांची एकवाक्यता होती. ते सरकारी नोकर असल्यामुळे त्यांना प्रायश्चित्त देणें फारच सोपें होतें; पण येथे त्यांच्या प्रतिपक्ष्यांचा अंदाज सपशेल चुकला. कारण ही बेडी त्रासदायक होणार, हें दिसतांच, विष्णुशास्त्री यांनी लेखणी तोडण्याऐवजी ती बेडीच तोडून टाकली. त्याच्या आधीच्या वर्षी, एलिफाससाहेबाने 'इंग्रेजी भाषा' या निबंधांतील कांही उताऱ्यांचे इंग्रजी भाषांतर करून, सरकारकड़े धाडलें आणि पुण्याच्या ब्राह्मणांवर सर्रहा राजद्रोहाचा आरोप ठेवला. यामुळे भिऊन वागण्याचें तर लांबच राहिलें, उलट 'निबंधमाला, वर्ष तिसरें' या अंकांत एकंदर टीकाकारांचा परामर्श घेतांना चिपळूणकरांनी त्या एलिफासचीच रेवडी करून टाकली. हे महाविद्वान् लेखक, हे हत्तीमहाराज, स्वतःच्या आवेशानेच निवळ खड्डयांत जाऊन कोसळले आहेत!- या शब्दांत त्यांनी या साहेबाची संभावना केली; आणि शेवटीं म्हटलें की, "या योगाने आमच्या वाचकांस जर एवढे कळून येईल की, हजारो युरोपियनांच्या हातीं जाणाऱ्या पत्रांतहि (सरकारी ग्याझिट- यांतच एलिफासने आपलें आरोपपत्र प्रसिद्ध केलें होतें) किती झोटिंगपाच्छाईचा मजकूर छापला जातो, व दुराग्रहास वश झाले असतां आमचे विद्यासंपन्न पाश्चात्त्य बंधु कोठवर भरकटत जातात, तर एवढ्यांनेच या प्रत्त्युत्तराचें आम्ही साफल्य समजूं."
सरकार!
 सत्यदीपिकाकारांनीहि सरकार हवें तें लिहिण्यास मोकळीक देतें तिचा मालाकार दुरुपयोग करून सरकारास नेहमी शिव्या देत असतात असा आरोप केला होता. त्याला याच अंकांत मालाकारांनी कांदा-लसूण- मोहरी-मिरची असें एकत्र करून, अगदी झणझणीत उत्तर दिलें. ते म्हणतात, "'सरकार' व 'दुरुपयोग' या शब्दांचा अर्थहि आमच्या ख्रिस्ती बंधूस कळत नाही. आमच्या या भाविक व राजनिष्ठ बंधूस जळीं, स्थळीं, काष्ठीं, पाषाणी तर सरकार दिसत नसेल ना? पाद्रीसाहेब सरकार, पवित्र शुभ वर्तमान सरकार, मेकॉलेप्रभृति ग्रंथकार सरकार, टेम्स नदी सरकार, साहेबी बूटहि सरकार! विलायती बुटासहि शिरसावंद्य मानीत जा, एरवी तुम्हांला हवें तें लिहिण्याची मुभा आहे!"
नववा आक्ट
 निबंधमालेला चार वर्षे पुरीं झालीं त्याच वर्षी "चालू सालचा नववा आक्ट हिंदुस्थानावर आदळला व हजारो लेखण्या एकाएकीं भय-स्तब्ध झाल्या. या आक्टाने कोणत्याहि जातीच्या अगर धर्माच्या लोकांस चिरड येईल असा मजकूर किंवा सरकारच्या राज्यपद्धतीच्या संबंधाने विरुद्ध विचार हीं दोन्ही मना केलीं आहेत!" 'निबंधमाला, वर्ष ४ थें' या अंकांत ही दुष्ट वार्ता देऊन, "देशदूषकांचा समाचार आता आम्हांस बेताबेतानेच घ्यावा लागेल." असें शास्त्री बुबांनी म्हटलें आहे. शिवाय "ख्रिस्ती बंधूंना उत्तर म्हणून लिहिलेला अंक छापखान्याच्या यंत्रावरून उतरून आम्हांस रद्द करावा लागला," असेंहि त्यांनी स्वतःच सांगितलें आहे.
ज्वाला तरी ते
 यावरून मालाकार घाबरले व त्यांनी आपली प्रौढी मागे घेतली, असे कित्येकांना वाटलें. त्या वेळी कोणाला तसें वाटले असले तरी तें साहजिकच होते; पण त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी, 'आमच्या देशाची स्थिति' हा प्रबंध वाचला असतांनाहि त्यांच्यावर तीच टीका करावी हैं नवल आहे.
 या प्रबंधांत विष्णुशास्त्री हें काय तेज होतें व "विप्रकृतः पन्नगः फणां कुरुते", "केला जरी पोत बळेंचि खाले ज्वाळा तरी ते वरती उफाळे" या उक्ती त्यांच्या बाबतीत कशा यथार्थ होत्या हें कळून येतें. " इंग्रजशाहीपेक्षा मोगलाई बरी होती", "गरीब प्रजेची लूट करून आपल्या तुंबड्या भरणें हाच आमच्या राज्यकर्त्यांचा उद्योग" अशी टीका तर त्यांनी केलीच; पण इंग्रेज येथे आले नसते तर, इतकेंच काय, इंग्रेज जगांतच नसते तरी आमचें कांही नुकसान झालें असतें असें नाहीं, असें जहरहि आपल्या लेखणींतून ओतण्यास त्यांनी कमी केलें नाही.
सहकार्य
 आणि अशा या निःस्पृह, निर्भय पुरुषाने आपल्या अल्प, अति अल्प आयुष्याच्या अखेरीस राष्ट्रीय प्रपंचांत जे बहुविध उद्योग सुरू केले त्यांत त्याच्या अंगच्या अगदी निराळ्या गुणांची कसोटी लागावयाची होती. ते गुण म्हणजे संयोजन- कौशल्य, सहकार्य, सामरस्य, मिळते-जुळते घेण्याची वृत्ति. आतापर्यंत त्यांनी कधी कोणाची परवा केली नव्हती. सरकारची, मिशनऱ्यांची, इंग्रज विद्वानांची तर नाहीच; पण बहुमताचीहि नाही. सत्य सांगण्याचा प्रसंग आला की, जग कांही म्हणालें तरी आम्ही त्याची मुळीच फिकीर करणार नाही, असें त्यांनी वारंवार लिहिलें होतें. पण आता अनेकांशी मिळते घेऊन काम करावयाचें होतें. कांही देवाण-घेवाण त्यांत अपरिहार्य होती. निःस्पृह, करारी माणसें बहुधा एकांतिक असतात. मिळते-जुळतें घेणें ही वत्ति त्यांच्या ठायीं नसते. "तेजसोर्हि द्वयोर्देवा, सख्यं वै भविता कथम्" दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य होत नसतें, असें महाभारतांत म्हटलें आहे. अनेक प्रसंगी त्याचा प्रत्ययहि आपल्याला येतो. विष्णुशास्त्री यांच्या बाबतींत तसेंच होण्याचा संभव होता; पण तसें घडलें नाही. प्रसंग येताच त्यांनी तोहि गुण प्रगट केला.
संयोजन
 संयोजन -कौशल्य हा विष्णुशास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा गुण होता. त्यांची निबंधमाला त्यांनी सर्वस्वी एकट्याने चालविली. एका अक्षराची किंवा एका पैशाचीहि मदत त्यांनी कधी कोणाकडून अपेक्षिली नाही व घेतली नाही. पण शेवटच्या तीन-चार वर्षांत त्यांनी काव्येतिहाससंग्रह, चित्रशाळा, किताबखाना, न्यू इंग्लिश स्कूल, केसरी-मराठा, आर्यभूषण छापखाना असे बहुविध उद्योग सुरू केले; आणि त्यांतील बहुतेक यशस्वी झाले. संयोजन- कौशल्याच्या अभावी हे यश मिळाले नसतें. यांतील चित्रशाळा, किताबखाना हे उद्योग त्यांनी निर्वाहाचें साधन म्हणून आरंभिले होते. सरकारी नोकरी आपल्या ध्येयाच्या आड येते हे दिसूं लागल्यापासून त्यांनी असा कांही स्वतंत्र व्यवसाय करण्याचें निश्चित केलें होतें. कारण ते ध्येयवादी असले तरी व्यवहारदक्ष होते. स्वाधीन असें निर्वाहसाधन असल्यावांचून सर्व ध्येयवाद व्यर्थ ठरतो, हें त्यांनी जाणलें होतें. म्हणून १८७९ साली राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी वरील संस्था सुरू केल्या होत्या. काव्येतिहाससंग्रह हे मासिक आणि न्यू इंग्लिश स्कूल व केसरी-मराठा हे उद्योग स्वत्वजागृति, प्रबोधन, लोकशिक्षण हीं जीं त्यांचीं प्रारंभापासून ठरलेलीं उद्दिष्टें त्यांच्या परिपूर्तीसाठी होते.
 निबंधमालेप्रमाणे हे उद्योग एकट्याने उरकण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी त्यासाठी निरनिराळीं निष्णात माणसे जोडली; व त्यांच्या सहकार्याने पावले टाकली. प्रत्येक उद्योगाचें स्वरूप निश्चित करणें, त्याची आखणी करणें, त्याला अवश्य ती साधनसामग्री सिद्ध करणें व कर्तबगार माणसें जोडून त्यांना संभाळणे हीच संयोजन- विद्या होय. काव्येतिहाससंग्रहांत महाराष्ट्राचा इतिहास, मराठी कविता व संस्कृत कविता असे तीन विभाग होते. त्यासाठी त्यांनी शंकर तुकाराम शाळिग्राम, काशिनाथ नारायण साने व जनार्दन बाळाजी मोडक यांचें सहकार्य मिळविलें. चित्रशाळेच्या उद्योगांत बाळकृष्णपंत जोशी, शाळिग्राम व पुढे वासुकाका जोशी हे त्यांचे सहकारी होते. किताबखान्याचे काम शाळिग्राम पाहत असत. 'न्यू इंग्लिश स्कूल' व 'केसरी-मराठा' या कार्यांत विष्णुशास्त्री यांना आगरकर, टिळक या महनीय पुरुषांचें सहकार्य लाभलें होतें. शिवाय माधवराव नामजोशी, वामन शिवराम आपटे यांसारखे कार्यदक्ष सहकारीहि त्यांना मिळाले होते. यांतले बहुतेक सहकारी पुढे महाराष्ट्राच्या इतिहासांत निरनिराळ्या क्षेत्रांत उंच पदाला गेले हें आपणांस माहीत आहेच. आगरकर, टिळक यांचीं नांवें तर अजरामर झाली आहेत. असे सहकारी विष्णुशास्त्री यांनी मिळविले व त्यांना एकत्र संभाळून सर्व उद्योग यशस्वी करून दाखविले यावरून त्या वेळच्या महाराष्ट्रांत त्यांनी केवढी पुण्याई संपादिली होती, हें सहज ध्यानांत येईल. इतक्या व्यक्ति आल्या की मतें, स्वभाव, कार्यक्षमता या दृष्टीने त्यांच्यांत अनेकप्रकारची भिन्नता असणारच. तें अपरिहार्यच असतें; पण तरीहि ही सर्व भिन्नता एक कार्यवाही करण्यांत विष्णुशास्त्री यशस्वी झाले. त्यांच्या अंगच्या संयोजन- विद्येचें हें फळ होय.
 असें हे एक आगळें व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रांत १८५० साली जन्माला आलें होतें, व आपल्या ठायींच्या सर्व तेजाचा आविष्कार करून, स. १८८२ सालीं तें विश्वतेजांत विलीन झाले.
 आज आपण स्वातंत्र्यवृक्षाच्या सावलीत उभे आहों; पण त्या आधी शंभर- सव्वाशे वर्षे पारतंत्र्याच्या रखरखीत वाळवंटांत आपण उभे होतों. आपला सर्व जीवनरस करपून चालला होता; अशा वेळीं देशाच्या एका कोपऱ्यांत आताच्या स्वातंत्र्यवृक्षाचें रोप ज्याने लावलें व स्वतःच्या भविष्याची यत्किचितहि परवा न करतां ज्याने त्याची जपणूक करण्याचे धैर्य समाजाला दिलें त्या पुरुषाचें नांव होतें- विष्णु कृष्ण चिपळूणकर.