Jump to content

केसरीची त्रिमूर्ति/प्रिं. गोपाळ गणेश आगरकर

विकिस्रोत कडून









गोपाळ गणेश आगरकर
( अर्वाचीन दधीचि )














चरित्र - रूपरेषा



दधीचि
 देवांवर मोठें संकट आलें होतें. वृत्रासुर उन्मत्त झाला होता. देवांचा त्याने छळ मांडला होता. देव हतबल झाले होते. अशा वेळीं दधीचि ऋषि त्यांच्या साह्यास धावून आले. आपल्या हाडांचें वज्र बनविलें तर त्याने इंद्राला वृत्ताचा वध करतां येईल असे त्यांना कळले. त्यांनी तत्काळ प्राणत्याग केला व देवांना आपल्या अस्थि उपलब्ध करून दिल्या. विश्वकर्म्याने त्यांपासून वज्र तयार केलें. तें वृत्रावर फेकून इंद्राने त्याचा वध केला व देवांना संकटमुक्त केलें.
 भारतीयांवर संकट आलें होतें. अंध, विवेकहीन, जीर्ण, पुराण, रूढिधर्म उन्मत्त झाला होता. हिंदूंचा त्याने छळ मांडला होता. हिंदु अगदी हतबल झाले होते. अशा वेळीं एक अर्वाचीन दधीचि ऋषि त्यांच्या साह्यास धावून आले. त्या पुराण, दुष्ट, रूढ धर्माच्या शस्त्रांचे आघात आपल्या हाडांवर झेलले तर तीं बोथट बनतील, निकामी होतील व मग आपल्या अस्थींचें वज्र त्यावर फेकलें तर तो दुष्ट धर्म नामशेष होईल, हें त्यांच्या ध्यानांत आलें. त्यांनी तत्काळ आपल्या हाडांवर तें शस्त्राघात झेलण्यास प्रारंभ केला व शेवटीं प्राणत्याग करून हिंदूंना आपल्या अस्थि उपलब्ध करून दिल्या. हिंदूंनी त्यांपासून वज्र तयार करून तें त्या अंध, दुष्ट, रूढ धर्मावर फेकलें. त्याला नामशेष केलें व समाज संकटमुक्त केला. त्या अर्वाचीन दधिचि ऋषींचें नांव गोपाळ गणेश आगरकर.
 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १८५६ साली कऱ्हाडजवळच्या टेंभू या खेड्यांत झाला. घरची फार गरिबी असल्यामुळे त्यांना बारा-तेराव्या वर्षांपासूनच शिक्षणासाठी नोकरी करावी लागली. कधी कारकुनाची, कधी कंपौंडरची अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. कधी ते वार लावून शिकले, तर कधी शगिर्दी करून. पुढे ते वऱ्हाडांत अकोल्यास आपले मामा सदाशिवराव भागवत यांच्याकडे गेले, तेथे मामांनी त्यांना आश्रय दिला. त्या अकोल्याच्या शाळेतूनच १८७५ साली मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विष्णु मोरेश्वर महाजनी यांच्या हाताखाली शिकण्याचें भाग्य त्यांना तेथे लाभलें होतें.
 पुढे कॉलेजचें शिक्षण घेण्यासाठी त्यांना असेच कष्ट करावे लागले. 'वऱ्हाड समाचार' या पत्रांत ते कधी लेख लिहीत, वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊन बक्षिसाचे पैसे मिळवीत, कधी मित्रांकडून, गुरुजनांकडून मदत घेत. तरीहि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधला खर्च भागत नसे. एकाच सदऱ्यावर त्यांना वर्ष काढावें लागे. असे हाल झाल्यामुळेच त्यांची मूळची सुदृढ प्रकृति याच काळांत खालावू लागली.
 कॉलेजांतील पहिल्या वर्षीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गोपाळरावांना शिष्यवृत्ति मिळू लागली. त्यामुळे थोडी स्वस्थता मिळून इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादि आपल्या आवडत्या विषयांचा अभ्यास त्यांना करता आला. १८७८ च्या नोव्हेंबर महिन्यांत ते बी. ए. ची परीक्षा पहिल्या वर्गांत उत्तीर्ण झाले. त्या वेळचे प्रिन्सिपॉल सेल्बी यांची या आपल्या शिष्यावर मर्जी होती. त्यांनी गोपाळरावांना फैलो नेमले. दक्षिणा फेलोशिप म्हणून त्यांना त्या वेळी ७५ रु. महिना मिळत. यामुळे दोन वर्षे निवान्त अभ्यासाला मिळून १८८० च्या नोव्हेंबरांत ते एम्. ए. झाले. एवढी उच्च पदवी मिळविल्यानंतर त्या वेळी त्यांना मोठ्या पगाराची सरकारी नोकरी सहज मिळाली असती; पण त्यांनी तो विचारहि केला नाही. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आईला कळविलें होतें की, "तूं माझ्याविषयी मोठे मनोरथ करीत असशील; पण विशेष संपत्तीची हाव न धरतां मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे."
 १८७९ सालीं आगरकर एम्. ए. चा अभ्यास करीत होते. त्या वेळी टिळकहि एल्एल्. बी. च्या अभ्यासासाठी डेक्कन कॉलेजांत राहिले होते. तेथे त्या दोघांची मैत्री झाली. विष्णुशास्त्री यांच्या निबंधमालेचें वाचन पूर्वीपासून दोघेहि करीत असत. १८७६ साली कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतांनाच आगरकरांनी राजकीय विषयावर एक लेख लिहिला होता आणि तो घेऊन ते विष्णुशास्त्री यांच्याकडे गेले होते. डेक्कन कॉलेजांत आगरकर व टिळक दोघेहि देशस्थितीविषयी नित्य चर्चा करीत. त्याच सुमारास विष्णुशास्त्री नवी शाळा काढण्याच्या विचारांत आहेत हें त्यांना समजलें. तेव्हा दोघांनीहि त्यांना जाऊन मिळावयाचें ठरविलें. टिळक लगेच जाऊन मिळाले. १ जानेवारी १८८० या दिवशीं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली; आणि वर्षअखेर एम्. ए. झाल्यावर आगरकर शाळेत आले.
 लोकशिक्षणाचे कार्य सर्व मार्गांनी करावयाचें असें त्या तिघांचें व त्यांच्या सहकाऱ्यांचें ठरलें असल्यामुळे त्यांनी पुढल्याच वर्षी १८८१ च्या जानेवारीमध्ये केसरी व मराठा (इंग्रजी) ही पत्रे सुरू केलीं व राष्ट्रीय जीवनाच्या विशाल क्षेत्रांत प्रवेश केला. प्रारंभापासून आगरकर केसरीचे संपादक होते. ते पद त्यांनी १८८७ पर्यंत संभाळले.
 वृत्तपत्र-संपादकाचें पद म्हणजे काटेरी मुकुट आहे हें या तरुण पत्रकारांच्या लवकरच ध्यानांत आलें. कोल्हापूर संस्थानचे दिवाण बर्वे यांनी तेथले दत्तक राजे शिवाजीमहाराज यांचा छळ चालविला आहे, अशा वार्ता केसरीकर्त्यांच्या कानीं आल्या. केसरीने त्याविषयी कांहीं पत्रें प्रसिद्ध केलों व लेखहि लिहिले. मराठ्यांतहि कांही लेख आले. तेव्हा बर्वे यांनी केसरीचे संपादक आगरकर व मराठाचें संपादक टिळक यांच्यांवर अब्रूनुकसानीची फिर्याद केली. त्यांच्या बाजूचे साक्षीदार आयत्या वेळीं फिरले. बर्वे यांच्यावरचा आरोप कोर्टात सिद्ध झाला नाही, आणि दोघां संपादकांना १०१ दिवसांची शिक्षा झाली. 'डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे एकशेएक दिवस' या पुस्तकांत आगरकरांनी या तुरुंगवासाचें वर्णन केले आहे.
 हा खटला चालू असतांनाच १८८२ च्या मार्चमध्ये विष्णुशास्त्री कालवश झाले होते; त्यामुळे या नव्या मंडळींचा मूलाधारचं निखळून पडला होता; पण हे दोघेहि पुरुष स्वयंप्रभ होते. त्यामुळे मुळीच न डगमगतां त्यांनी सुटून आल्यावर राष्ट्रकार्याची धुरा पुन्हा खांद्यावर घेतली.
 न्यू इंग्लिश स्कूलचा जम बसल्यावर दोन-तीन वर्षांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी शाळेच्या चालकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि १८८५ सालीं २ जानेवारी रोजी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलें. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, म. शि. गोळे, वा. बा. केळकर, म. ब. नामजोशी, ना. कृ. धारप हे सोसायटीचे संस्थापक व आजीव सभासद होते. वा. शि. आपटे हे कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले.
 प्रारंभी टिळक व आगरकर यांच्यांत मतभेद नव्हते; पण १८८४ च्या सुमारास ते सुरू झाले. बालविवाह, असंमत वैधव्य या दुष्ट रूढिं कायद्याने बंद कराव्या की नाही, सरकारला आपल्या धर्मांत हस्तक्षेप करूं द्यावा की नाही, या व असल्या प्रश्नांवरून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सभासदांत तीव्र मतभेद होऊं लागले. यामुळे १८८७ साली डे. ए. सोसायटी व केसरी-मराठा हीं वृत्तपत्रे यांचा संबंध तोडून टाकण्यांत आला आणि टिळक, वा. बा. केळकर व ह. ना. गोखले हे छापखाना व वृत्तपत्रे यांचे संयुक्त मालक झाले. तेव्हापासून केसरीत सामाजिक सुधारणांच्या बाबतींत आगरकरांच्या मतांविरुद्ध लेख येऊ लागले. त्यामुळे त्यांनी केसरीचें संपादकपद सोडून दिलें आणि पुढल्या वर्षी १८८८ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर 'सुधारक' हें पत्र काढलें.
 पण डेक्कन एज्युकेशन सोसायटींतील भांडणे एवढ्याने मिटली नाहीत. प्रारंभी निर्वाहापुरतें वेतन सर्वांनी घ्यावें असें ठरलें होते; पण पुढे सांपत्तिक स्थितीप्रमाणे वेतन घ्यावें असें आगरकरांनी सुचविलें. तें टिळकांना पसंत पडले नाही. इंदूरच्या महाराजांनी दिलेल्या देणगीवरून असाच वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला. इतरहि अनेक कारणें झालीं व शेवटीं १८९० साली टिळकांनी सोसायटी सोडली.
 आगरकर सोसायटींत शेवटपर्यंत राहिले. १८९२ साली प्राचार्य वामनराव आपटे मृत्यु पावले. तेव्हा त्यांच्या जागीं आगरकरांची नेमणूक झाली. 'सुधारक' पत्रहि आगरकर नेटाने व उत्साहाने चालवीत होते. आता केसरी व सुधारक या दोन्ही पत्रांचे संसार स्वतंत्र झाले होते, तरी त्यांच्यांतील भांडणें मिटली नाहीत. प्रारंभी त्यांच्यांतील मतभेद केवळ तात्त्विक होते, पण पुढे एकमेकांविषयी टिळक व आगरकर या थोर पुरुषांचीं मतें कलुषित झाली. एकमेकांच्या सद्भावनेविषयीहि त्यांना शंका येऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्यांतील वाद अगदी विकोपाला गेला व निंदा- प्रतिनिंदा यांना सीमा राहिली नाही.
 फर्ग्युसनचा कारभार आगरकरांनी उत्तम चालविला होता; पण हळूहळू त्यांचा दम्याचा विकार बळावला. तरुणपणांत त्यांना अनंत हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. पुढे दारिद्र्य कांही अंशीं गेलें; पण समाजसुधारणेचा पक्ष त्यांनी उचलल्यामुळे त्यांना लोकनिंदा फार सोसावी लागली. त्यांच्या हयातीतच लोकांनी त्यांची प्रेतयात्रा काढली होती. या सर्वांचा परिणाम होऊन १८९५ साली आगरकर कालवश झाले.
 टिळकांनी केसरींत आगरकरांच्यावर मृत्युलेख लिहिला त्यांत आगरकरांच्या मनोनिग्रह, स्वार्थत्याग, धैर्य, इत्यादि गुणांचा गौरव करून पुढे म्हटलें आहे की, "दुःखाची अगर संकटांची भीति न बाळगतां जो आपल्या ठायीं असणाऱ्या या सद्गुणांचा लोकसेवेसाठी उपयोग करतो तोच मोठा म्हणावयाचा. गोपाळराव आगरकर हे त्या कोटींतले होते."
 अशा या थोर पुरुषाचें– या अर्वाचीन दधीचीचें- कार्य आता आपल्याला अभ्यासावयाचें आहे. वर सांगितलेंच की, बी. ए. ची पदवी मिळाली तेव्हाच या पुरुषाने आईला लिहून टाकलें होतें की, "मी आपले जीवन देशाला अर्पण करणार आहे." आता दोन वर्षांनी बुद्धि, प्रज्ञा, अर्पण-वृत्ति, राष्ट्रनिष्ठा, धैर्य, दृढनिश्चय या साधनांनी समद्ध होऊन तो पुरुष हिंदुस्थानाकडे पाहूं लागला तेव्हा त्याला तो कसा दिसला तें प्रथम पाहूं.




-१-

आगरकरांना हिंदु समाज कसा दिसला?



प्रास्ताविक
 हिंदु समाजांतील कोणत्या दोषांमुळे त्याचा गेल्या हजार वर्षांत विलक्षण अधःपात झाला आहे, हें लोकांना पुनः पुन्हा सांगून, आता त्याचा उत्कर्ष होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत व पाश्चात्य लोकांचें कोणत्या बाबतींत अनुकरण केलें पाहिजे याचें दिग्दर्शन करण्याच्या हेतूने आगरकरांनी आपलें स्वतःचें 'सुधारक' नांवाचें वृत्तपत्र सुरू केलें, त्याच्या पहिल्याच अंकांत त्यांनी आपल्या देशाचें व आपल्या समाजाचें मोठें मार्मिक वर्णन केलें आहे. भरत खंडांत अनेक मोठे पर्वत, असंख्य नद्या व घनदाट अरण्यें आहेत. त्याच्या तिन्ही बाजूंना विशाल महासागर असून, त्याच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर अनेक बंदरें आहेत. आपली भूमि अत्यंत सुपीक असून, देश अन्नवस्त्राच्या बाबतींत समृद्ध आहे. आपली खनिज संपत्तीहि विपुल आहे. अशा प्रकारे आपला हा देश भौतिक संपत्तीत जगांतील कोणत्याहि देशापेक्षा कमी नाही.
 याच्या उलट आपल्या समाजाची स्थिति झालेली आहे याचें आगरकरांना अतिशय दुःख होत होतें. मानवी कर्तृत्वाच्या बाबतींत हिंदु समाज अगदी हीन दशेला पोचला आहे, त्याला शिलावस्था प्राप्त झाली आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. भारताला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे हें खरें, व हजार-दोन हजार वर्षांपूर्वी आपली संस्कृति बरीच उन्नत झाली होती हेंहि खरें. राज्य, धर्म, नीति, वेदान्त, न्याय गणित, ज्योतिष, इत्यादि शास्त्रे आणि विद्या व कला यांत आपण पुष्कळ प्रगति केली होती; पण त्यानंतर आपली प्रगति थांबली. आपला समाजवृक्ष आता जुना झाला आहे, वठला आहे, कसा तरी उभा आहे. समाजव्यवस्था चालीरीति, शास्त्रे, कला या सर्व बाबतींत आम्ही जुनाट झालों आहों. आमची स्थिति दगडासारखी झाली आहे; तिच्यांत कांही बदल होत नाही. कारण आमच्यांत चैतन्यच उरलें नाही. आमचें व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन खुरटले आहे. या स्थितीलाच आगरकरांनी शिलावस्था हें नांव दिले आहे; आणि त्या शिलावस्थेची विविध लक्षणें त्यांनी आपल्या निरनिराळ्या लेखांत प्रसंगाप्रसंगाने सांगितलीं आहेत.
अज्ञान
 हिंदु समाजाच्या या शिलावस्थेचें पहिलें लक्षण म्हणजे लोकांचें अज्ञान. त्यांना भूगोलाविषयी मुळीच माहिती नव्हती. पृथ्वी कशी आहे, आपला मायदेश कसा आहे, हें त्यांना ठाऊक नव्हतें. पुराणें हेंच त्यांचे ज्ञानभांडार. त्यावरच त्यांची सर्व भिस्त व श्रद्धा; आणि 'नवखंड पृथ्वी व दहावें खंड काशी' यापलीकडे या ग्रंथांची धाव गेलेली नव्हती. त्यांत प्राचीन राजांच्या कथा आहेत, पण इतिहास नाही. आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे आपला इतिहासहि कोणाला ज्ञात नव्हता. दुसऱ्या देशांचा इतिहास जाणून घेण्याचाहि कोणी प्रयत्न केला नाही. तशी बुद्धीच कोणाला झाली नाही. त्या काळीं दशग्रंथी ब्राह्मण आणि शास्त्री पंडित कांही थोडे नव्हते; पण पुराणांबाहेरचें ज्ञान त्यांनी कधी मिळवलेच नाही, त्याची पर्वाहि केली नाही. जगांत काय घडामोडी चालू आहेत, इतर देशांतील लोकांनी शास्त्रे, कला यांत किती प्रगति केली आहे, याची त्यांनी कधी चौकशीहि केली नाही. कारण जगांत जेवढें कांही ज्ञान आहे, तें सगळे संस्कृत ग्रंथांत भरलेलें आहे, असा भ्रम त्यांना झाला होता. आणि बहुसंख्य असा जो शेतकरी व कारागीर वर्ग त्याला तर आपल्या गावाबाहेर काय उलथा-पालथ चालली आहे, त्याचीहि गंधवार्ता नसे. तिकडे राज्यसंत्ता बदलली, परधर्मीयांची आक्रमणें आलीं, तरी शेतकन्यांना त्याचा संसर्ग होत नसे.
 अशा प्रकारे समाजांतील सगळे वर्ग अज्ञानी व उदासीन होते. लिहिता-वाचतां येणाऱ्या लोकांनाहि आपल्या समाजाची अवनति कशामुळे झाली आहे, उन्नति म्हणजे काय व ती होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हें समजत नव्हतें. कारण कार्यकारणभाव पाहून तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रताच त्यांच्या अंगीं नव्हती.
 आगरकरांच्या निरनिराळ्या निबंधांतून याविषयीचे थोडे उतारे पुढे दिले आहेत. त्यांवरून हिंदु समाजाचें ज्ञान किती भयावह होतें आणि त्यामुळे स्वतःची उन्नति साधण्यास तो किती अपात्र, असमर्थ होऊन बसला होता, याची कल्पना येईल.
 "या लोकांना समाजाच्या घटनेचीं, अभिवृद्धीचीं व लयाची कारणें ठाऊक नाहीत, पितृतर्पणापुढे यांचें ज्ञान गेलेलें नाही, अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थ-धर्माचें केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखवर्धक किती साधनें शोधून काढली आहेत, राज्य, धर्म, नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत, हें यांना ऐकूनसुद्धा ठाऊक नाही... जुनीं शास्त्रें तेवढीं ईश्वरप्रणीत, त्यांना हात लावणें हें, घोर पातक, अशी यांची समजूत आहे. जगत्कारणाच्या तोंडांतून, हातांतून, मांडींतून व पायांतून एकेक वर्ण निघाला अशी यांची वर्णोत्पत्तीविषयी कल्पना आहे, आहे ही सामाजिक स्थिति उत्तम, हींत फिरवाफिरव करण्यास कोठेहि अवकाश नाही, अशा यांच्या समाजविषयक कल्पना.' (सुधारक काढण्याचा हेतु).
 "आमच्या बहुतेक जुन्या पंडितांस ऐतिहासिक पद्धति म्हणजे काय हें मुळीच ठाऊक नाही. त्यांना असें वाटतें की, जगांत जेवढे म्हणून कांही ज्ञान आहे तेवढें संस्कृत भाषेतील ग्रंथसमूहांत भरलेलें आहे. त्याच्या बाहेर चहूंकडे अंधार आहे. त्यांना असें वाटणें कांही अंशी स्वाभाविक आहे. ज्या अर्थी दुसऱ्या भाषेतील ज्ञान- भांडाराचा गंधहि त्यांना लागलेला नाही, त्या अर्थी त्यांना त्यांची माहिती कोठून कळणार? तेव्हा अर्थातच त्यांनी आपल्यापाशी असलेल्या छोटेखानी डबोल्यासच अखिल विश्वांतील संपत्समूह समजून त्याच्या महत्त्वाचे व अद्वितीयत्वाचे पोवाडे गात सुटावे, हें साहजिकच आहे." (स्वयंवर).
 'गुलामांचें राष्ट्र' या लेखांत आमच्या ज्ञानाचें दारिद्र्य आगरकरांनी असेंच स्पष्ट करून दाखविलें आहे. "जें जें जुनें आहे तें सारें आम्हांस निर्दोष, पूज्य व संरक्षणीय वाटतें. आमच्या मनाच्या या खोडीमुळे जमिनींत खोल पुरलेल्या खांबा प्रमाणे आमची स्थिति झाली आहे. जुन्या वेदान्तापलीकडे वेदान्त नाही; जुन्या गणितापलीकडे गणित नाही, जुन्या अलंकारांहून अलंकार नाहीत, जुन्या व्यवहारापुढे गति नाही, जुन्या न्यायापेक्षा दुसऱ्या न्यायांत अर्थ नाही! असल्या श्रमामुळे आमचे डोळे बांधल्यासारखे होऊन आज कित्येक शतकें तेल्याच्या बैलाप्रमाणे आम्ही जुन्या शास्त्रांच्या आणि पुराणांच्या घाण्याभोवती घिरट्या घालीत आहों. या परिभ्रमणांतून सुटका झाल्याखेरीज कोणत्याहि शास्त्रांत किंवा कलेंत आमचें पाऊल पुढे पडण्याचा संभव नाही..."
 "लिहिता-वाचतां येणाऱ्या लोकांत ज्यांना दुसऱ्या देशांविषयी कमीत कमी माहिती आहे असे कोणी लोक असतील, तर ते हिंदु लोक होत. यांना स्वतःस इतिहास लिहिण्याची आवश्यकता कधी वाटली नाही व लिहिण्याची अक्कल आली नाही. इतकेंच नाही तर दुसऱ्यांचे इतिहास अवलोकन करून त्यांपासून आपली सुधारणा करण्याची पर्वाहि त्यांनी कधीं केली नाही. एकंदरीत यांना इतिहासाचें माहात्म्यच समजलें नाही, असें तरी कां म्हणू नये?" 'आमचे दोष आम्हांस कधी दिसूं लागतील?' या निबंधांत आगरकरांनी अशी टीका केली आहे.
 ही सयुक्तिक आहे याविषयी वाद नाही. इतिहासाविषयीची अनास्था, उपेक्षा, अज्ञान हें हिंदूंच्या संस्कृतींतले फार मोठे वैगुण्य आहे, हें खरेंच आहे; पण त्यापुढे जाऊन आगरकर जेव्हा "ज्या देशांतील व्यक्तींनी किंवा व्यक्तिसमुदायांनी केव्हाहि मोठमोठे पराक्रम केले नाहीत, ते इतिहास लिहिणार कशाविषयी आणि वाचणार काय?" असे उद्गार काढतात तेव्हा ते फार म्हणजे फारच रागावले आहेत, इतकेंच ध्यानांत घ्यावयाचें. कारण या देशांतल्या लोकांनी मोठमोठे पराक्रम केलेले आहेत हे त्यांनी पुढे याच लेखांत व अन्यत्रहि सांगितलेलें आहे.
 पण ही किरकोळ गोष्ट आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी हजार-दीड हजार वर्षे हा देश अगदी लाजिरवाण्या अज्ञानांत बुडून राहिला होता याबद्दल शंकाच नाही; आणि पाश्चात्त्य भौतिक विद्यांचा अभ्यास करून आम्ही ज्ञानविज्ञानांत त्यांच्या बरोबरीस आल्यावांचून आमचा उत्कर्ष होणार नाही, हें त्यांचे म्हणणेंहि यथार्थच आहे.
कर्मकांडात्मक धर्म
 हिंदु समाजांत रूढ झालेले तर्कशून्य धार्मिक आचार हें त्याच्या शिलावस्थेचें दुसरें लक्षण होय. त्यांत सोवळें-ओवळें, प्रेतसंस्कार, शिमग्यांसारखे बीभत्स सण यांचा समावेश आगरकरांनी केला आहे. ब्राह्मण लोकांत सोवळ्याचें प्रस्थ फारच माजलें होतें. त्यांच्या कल्पनेप्रमाणे नवें कोरें वस्त्र विटाळत नाही. धूतवस्त्र सोवळ्यांत चालतें, पण तें लवकर विटाळते. रेशमी किंवा लोकरीचें वस्त्र सुती वस्त्रापेक्षा अधिक शुद्ध. त्याचें शुद्धत्व कशानेच बिघडत नाही. परटाकडची भाताची खळ लावलेलीं वस्त्रे एका शिंतोड्याने शुद्ध होतात. जेवणाखाण्याच्या बाबतींत तर सोवळेपणाचा फारच गोंधळ असतो. हरभऱ्याची डाळ आधी भिजवून मग वाटली तर ती निर्लेप, पण ती आधी दळून तिचें पीठ पाण्यांत घातलें तर मात्र खरकटें होतें. त्याचें पिठलें मुकटा नेसल्याशिवाय तोंडांत घालण्याची सोय नाही. भडबुंज्याकडचे पोहे खाता येतात, पण बाजारांतला भाजी-भात किंवा पावबिसकुट यांकडे ब्राह्मणाने पाहण्याची सोय नाही. प्रवासांत कोणाचाहि स्पर्श झालेले अन्न चालते, पण घरांत कुणबिणीने केलेली भाकरी मुळीच चालत नाही. हरणाचे किंवा वाघाचे कातडें फारच शुद्ध मानलें जातें. तें धार्मिक विधींत बसायला घेतात. पण गाय इतकी पवित्र मानलेली असून तिचें कातडें मात्र पवित्र नाही. सोवळें म्हणजे शुचिता असा अर्थ असतो तोंपर्यंत तें स्पृहणीय होय. पण वरील रूढ कल्पनांशीं स्वच्छतेचा कांही संबंधच नसतो. विटाळ- चांडाळाच्या चमत्कारिक कल्पनांवर हे नियम बसविलेले असल्यामुळे त्यांना विवेकाचा कस लावतां येत नाही. 'सोवळ्याची मीमांसा' या निबंधांत आगरकर म्हणतात, "या अर्थाच्या सोवळ्याचें मंडन विवेकदृष्ट्या करणें अत्यंत दुर्घट आहे. त्याला विवेकाची कात्री लावली की त्याच्या चिंधड्या होतात." जुन्या आचारांवर टीका करतांना आगरकरांनी त्यांतील असंबद्धता व तर्कशून्यता अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहे. ब्राह्मण लोक इतर जातींच्या हातचें पाणी पीत नाहीत; पण गवळ्याने पाणी घातलेलें दूध दिलें तर तें त्यांना चालतें! मुलींच्या बाहुल्या, पुरुषांच्या पगड्या, पुस्तकें, जोडे वगैरे वस्तु कोण तयार करतो; त्यांचे घटक काय; त्यांमुळे सोवळे किती बिघडते, याचा कोणी विचारहि करीत नाही. मेलेल्या जनावरांच्या कातडयाचे जोडे नित्य वापरायला योग्य आणि ते बनवणारा चर्मकार मात्र अगदी अपवित्र मुसलमान व युरोपियन लोक गोमांस खातात, तरी त्यांचा स्पर्श व सहवास आम्हांस चालतो मात्र महार, मांग, धेड यांची सावलीहि अमंगळ मानली जाते. हें सर्व विसंगत व असयुक्तिक आहे असें सांगून आगरकर म्हणतात, "श्रद्धाळू धार्मिकांस आपल्या धर्म- समजुती व त्यांवर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही. त्यांना अशी भीति वाटते की, ते हिणकस ठरल्यास, पुढे काय करावें?"
 कर्मकांडात्मक धर्मांतला दुसरा मूर्खपणाचा आचार म्हणजे हिंदूंचा प्रेतसंस्कार. आगरकरांना तो फारच भयप्रद, अमंगळ व कष्टमय वाटतो. प्रेताला न्हाऊ घालणें, सवाष्ण स्त्रीच्या प्रेताला नवें पातळ नेसवून मळवट भरून तिची ओटी भरणें, तिरडीवरून प्रेत नेणें, स्मशानांत क्षौर करणें, प्रेतावर कणकीचे गोळे ठेवणें, गळकें मडकें पाण्याने भरून घेऊन चितेला प्रदक्षिणा घालणें; हे सर्व विधि त्यांच्या मतें बीभत्स आहेत; पण त्यांतील विधवेचें सक्तीने केशवपन करण्याची चाल त्यांना अत्यंत क्रूर व निर्दयपणाची वाटते. पतिव्रता स्त्रीने दुसऱ्याशीं बोलणें किंवा त्याच्याकडे पाहणेंहि पुरुषांना खपत नाही; पण पति मेला की लगेच त्याच्या विधवेला हे लोक न्हाव्या- बरोबर एका खोलीत कोंडून तिचे केस जबरदस्तीने काढायला लावतात! याचा त्यांना फारच संताप येतो. श्राद्धविधीविषयीहि आगरकरांना असाच तिरस्कार वाटतो. जिवंत मनुष्याला अन्नवस्त्र व उपभोगाचे पदार्थ लागतात, तेच मेलेल्या माणसाला अर्पण करण्यांत काय अर्थ आहे? त्याचा अशरीरी आत्मा त्या पदार्थांचा उपभोग कसा घेणार? आगरकर आपल्या 'प्रेतसंस्कार' या लेखांत म्हणतात "तुम्ही जे प्रेतविधि करतां त्यांवरून जिवंत मनुष्य आणि मेलेला मनुष्य यांतील भेद तुम्हांला कळत नाही, असें म्हणणें भाग आहे."
 मेलेल्या मनुष्याच्या आप्तांना क्षौर करावें लागतें व जें अशौच पाळावें लागतें, त्यावरहि आगरकरांनी टीका केली आहे. ते म्हणतात, "समुद्रपर्यटन, अभक्ष्य भक्षण वगैरे दोषांस क्षौरादिकांचीं प्रायाश्चित्तें सांगितली आहेत. व ज्या अर्थी प्रेताच्या मुलाला व बायकोलाहि तेंच प्रायश्चित घ्यावें लागतें त्या अर्थी बाप किंवा नवरा मरणें हें मुलाच्या व बायकोच्या हातून घडणारें दंडनीय पातक आहे, असाच आमच्या लोकांचा म्हणजे आम्हां सर्वश्रेष्ठ म्हणविणाऱ्या अत्यंत मूर्ख ब्राह्मण लोकांचा समज असला पाहिजे हे उघड आहे. विटाळ म्हणजे काय हें तुम्हांला बिलकुल कळत नाही असें वाटतें. जर तें तुम्हांला कळत असतें तर सुतकाहून सोयराचा विटाळ तुम्ही अधिक दूष्य मानिला असता."
 हिंदु समाजांत जे अनेक लज्जास्पद आचार रूढ होते, त्यांतील शिमग्याच्या सणाला आगरकरांनी पहिला क्रमांक दिला आहे. त्याविषयी 'पांचजन्याचा हंगाम' या निबंधांत प्रारंभीच ते म्हणतात, "इतका बीभत्स सण दुसऱ्या कोणत्याहि देशांत पाळला जात असेल, असें आम्हांस वाटत नाही. माघ शुद्ध पौर्णिमेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हिंदु धर्माने हिंदु लोकांस पशुतुल्य वर्तन करण्याचा पास दिला आहे!" त्या दिवसांत उनाड, टारगी पोरेंच काय, पण मोठे संसारी पुरुष देखील रस्तोरस्ती, अर्वाच्य उखाणे घेऊन बोंब मारीत हिंडत असत. होळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी व चवाठ्यांवर होळी पेटवून तिला पांचजन्ययुक्त प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात होता. तो एक धार्मिक विधीच मानला जात असे; पण तेवढ्याने हा सण पार पडत नसे. होळीच्या रानटी देवतेला खूष करण्यासाठी नंतरचे पांच दिवस जो धुडगूस चाले, तो तर फारच बीभत्स असे. होळीच्या राखेंत माती, शेण किंवा त्याहून घाण पदार्थ कालवून केलेल्या खातेऱ्याने एकमेकांना माखणें, तुटक्या केरसुण्या व फाटकी शिपतरें डोक्यावर घेऊन व गाढवावर बसवून त्या सोंगाची मिरवणूक काढणें, अचकट-विचकट लावण्या म्हणणे, बाजूच्या लोकांवर खातेरें उडवून त्यांच्या नांवाने पांचजन्य करणें व स्त्रियांची टिंगल करणें, असें पशुतुल्य वर्तन करायला कोणालाहि लाज वाटत नसे.
 या सणांचे भक्त त्याचें समर्थनहि करतात. ते म्हणतात की, होळीच्या धुरामुळे मनुष्याला अपायकारक असे सूक्ष्म जंतु भरून जातात. बोंब मारण्यामुळे आगीच्या प्रसंगी चार माणसांना गोळा करून आग विझवण्याचा प्रयत्न कसा करावा त्याचें शिक्षण मिळतें. बीभत्स वर्तनाचेंहि असेंच समर्थन केलें जातें. मनुष्याच्या स्वभावांत ज्या वाईट वृत्ति व विकार असतात त्यांना नीतिनियमांमुळे कोंडून ठेवलेलें असतें. त्यांना केव्हा तरी असें मोकळे सोडलें नाहीं तर ते अनावर होऊन शेवटीं त्यांचा घातक परिणाम व्हायचा. पण आगरकरांना ही विचारसरणी मुळीच पसंत नाही. मनुष्याच्या विकारांना अशी वाट देण्याची गरज नाही हें सांगतांना ते म्हणतात, "मनुष्याच्या मनांतला दुर्वृत्तीचा अंकुर समूळ उपटण्याचा प्रयत्न केला नाही तर स्वल्प वयांत तो सारें अंतःकरण आपल्या विषारी विस्ताराने व्यापून टाकून सद्वृत्तींची वाढ बिलकुल होऊं देत नाही. तेव्हा शिमग्यासारखे सण नाहीसे करून टाकल्यास आमचें कोणत्याहि प्रकारे नुकसान होण्याचा संभव नाही. शिमग्यावांचून शिमग्यांतले निंद्य प्रकार समाजांत नित्य घडत असतात. आम्ही मात्र त्यांना धर्माच्या नावाने फाजील उत्तेजन देऊन आपले अधिक नुकसान करून घेत आहों."
 सनातन धर्माभिमानी लोक या कर्मकांडालाच खरा धर्म मानतात. वास्तविक नीति व सदाचार हा खरा धर्म होय; पण त्याची परवा न करतां हे लोक तर्कशून्य आचारांनाच जास्त महत्त्व देतात. मांसाहार, मदिरापान, व्यभिचार, विश्वासघात, क्रूरपणा अशीं निद्य कर्मे करणारा मनुष्य रूढ आचार-धर्माचें पालन करीत असेल, तर तो यांना धर्मनिष्ठ वाटतो. त्याच्याशी अन्नोदक व्यवहार करण्यासच काय, पण त्याच्या अंगुष्ठाचें तीर्थ घेऊन आपल्या पापाचें क्षालन करून घेण्यास देखील ते तयार! पण सदाचारसंपन्न अशा ब्राह्मण किंवा प्रभू माणसाने शूद्राच्या हातचें पाणी घेतले किंवा ख्रिस्ती माणसाकडचा घोटभर चहा घेतला की लगेच त्याला पतित मानून ते त्याच्यावर बहिष्कार टाकीत असत. मात्र त्याने प्रायश्चित्त घेऊन ब्राह्मणांना दक्षिणा दिली की झाला तो शुद्ध व अन्नोदक-व्यवहारास योग्य. रूढ आचारांत चूक झाली की धर्म बुडतो, पण नीति बिघडली तर मात्र धर्म बुडत नाही; अशी त्यांची घातक समजूत होती. मनुस्मृतीसारख्या शास्त्रग्रंथांत त्या समजुतीला आधार नाही; पण तें कोण बघतो! शास्त्रात् रूढिर्बलीयसी!
 असें असले तरी, इंग्रजांच्या राज्यांत परिस्थिति इतकी बदलली व दैनंदिन जीवनावर तिचा एवढा प्रभाव पडला की, पूर्वीचे नित्याचे कर्मठपणाचे अनेक आचारधर्म नियमितपणें पाळणे कठीण वाटू लागलें, सरकारी नोकरी संभाळतांना त्यांची अडचण होऊं लागली आणि बरेच लोक त्यांकडे दुर्लक्ष करूं लागले. साहेबाशी व त्याच्या शूद्र नोकरांशी सहवास व शेकहॅड घडायचा; आगगाडींतून प्रवास करतांना वाटेल त्या जातीचे लोक शेजारीं येऊन बसायचे; त्यांचा विटाळ टाळायचा कसा, व तो घालविण्यासाठी स्नान तरी कितीदा करायचें? डॉक्टरांचे औषध घ्यायलाच पाहिजे, मग त्यांतले निषिद्ध पदार्थ पोटांत गेले तर काय करणार! काम-धंद्यासाठी प्रवास केलाच पाहिजे; त्या घाई-गर्दीत स्नान-संध्येचा नेम कसा पाळणार! इंग्रजी शिक्षणामुळे सुशिक्षित लोकांची श्रद्धा थोडी तरी कमी झाली होतीच. त्यांचा आचारधर्म जरासा शिथिल होणें साहजिक होतें; आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली वृद्ध माणसें त्यांना जाब विचारूं शकत नव्हती. त्यांची सत्ता गरीब अबलांवर व मुलाबाळांवर तेवढी चालायची. कांही दांभिक लोक जाणूनबुजून ब्राह्मणधर्माचें उल्लंघन करीत होते, दुराचार करीत होते; पण त्यांना वाळीत टाकण्याचें कोणी मनांतहि आणीत नव्हतें. तांबोळ्याकडचा ओला चुना, हलवायाकडची मिठाई यांमुळे दोष लागतो हें कोणाच्या ध्यानांतच येत नव्हतें. सनातनी लोकहि निष्ठेने आचारधर्म पाळीत नव्हते. 'ग्रामण्य- प्रकरण' या निबंधांत आगरकर याविषयी म्हणतात, "नवीन तऱ्हेचें शिक्षण लोकांस मिळू लागल्यामुळे तरुण पिढीच्या मनांत नवीन धर्मकल्पना आणि नवीन आचार यांचा उदय होऊं लागला आहे. इतकेंच नाही, तर या कल्पनांचा आणि या आचारांचा परिणाम जुन्या लोकांवरहि अप्रत्यक्ष रीतीने त्यांस न कळत होत आहे; आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध व समाजाविरुद्ध ते सुधारक बनत आहेत."
 सुधारणेला विरोध करणाऱ्या सनातनी धर्ममार्तंडांबद्दल आगरकर लिहितात की, आज जे धर्माभिमानी थाटले आहेत, ते खऱ्या खऱ्या धर्मरक्षण बुद्धीने पुढे आले आहेत, असें नाही. तसें असतें तर चालू धर्मसमजुतींविरुद्ध हजारो गोष्टी त्यांच्या डोळ्यांपुढे घडत असून व कित्येक तर खुद्द त्यांच्या घरांत शिरल्या असून तिकडे ते जी डोळेझाक करतात ती त्यांनी कधीच केली नसती.
 अशा प्रकारे जुना आचारधर्म हळूहळू शिथिल होत चालला होता; पण आगरकरांना त्या कर्मकांडात्मक धर्माचा केवढा उबग आला होता तें त्यांच्या पुढील उदगारांवरून स्पष्ट समजतें- हे अमंगळ हिंदु धर्मा, जबरदस्त पंचाक्षऱ्याप्रमाणे आम्हां साऱ्या अज्ञ लोकांस त्वां भारून टाकून केवळ गुलाम केलें असल्यामुळे आज कित्येक युगे अगदी अशक्य गोष्टी आम्ही शक्य मानीत आहों, व अत्यंत निद्य कृत्यें वंद्य मानून तुझ्या संतोषाकरिता ती बेलाशक करीत आहों; पण ध्यांनांत ठेव! या तुझ्या अश्लाघ्य व निर्घृण वर्चस्वाचा अंत होण्याचा काल अगदी समीप येऊन ठेपला आहे. आजपर्यंत त्वां आम्हांस ज्या असह्य यातना भोगण्यास लावलें आहेस, व जीं अनन्वित कर्मे आम्हांकडून करविली आहेस, त्या सर्वांबद्दल तुझीं पाळेंमुळें खणून काढून विचारकुंडांत पेटवलेल्या प्रचंड अग्नीच्या कल्लोळांत तुझी आहुति देणाऱ्या नवीन ऋषिवर्याचा अवतार नुकताच झाला आहे.
स्त्री-जीवन
 हिंदु समाजांतील स्त्रीची हीन दीन अवस्था हें त्या समाजाच्या शिलावस्थेचें तिसरें लक्षण होय. स्त्रियांच्या बाबतींत हिंदु धर्मशास्त्र फार निष्ठुर आहे. तें स्त्री- पुरुषांना समान अधिकार देत नाही, वेगवेगळा न्याय लावतें; तें पुरुषांचें पक्षपाती आहे. स्त्रियांवर त्याने फार अन्याय केलेला आहे. पडद्याची चाल, बालविवाह, विधवा-विवाहाची बंदी, शिक्षणाला बंदी या सर्व स्त्रीच्या दास्यत्वाच्या खुणा आहेत. स्त्रीला समाजांत प्रतिष्ठाच नव्हती, ती पुरुषाची दासी मानली जात होती. तिला घराबाहेर मानाचें स्थानच नव्हतें. पुरुषाच्या जीवनाचा अल्पांश, प्रजोत्पत्तीचें साधन, कष्टाची धनीण एवढीच तिची किंमत होती. तिच्या स्वतःच्या गुणांचें कांहीच महत्त्व नव्हतें. पतीच्या मृत्यूमुळे स्त्रीचें प्राणोत्क्रमण झालें किंवा ती सती गेली तर ती साध्वी असें मानले जात होतें.
 विधवा स्त्रीची अवस्था तर त्याहून शतपटींनी दयनीय होती. पति मेला की तिचा संसार संपला, तिला जगण्याचें कारणच राहिलें नाही; तिने पतीच्या प्रेताबरोबर सती जावें हाच सर्वोत्तम मार्ग मानला जात होता. कारण पतीच्या मागे तिने जिवंत राहणें हें त्या कुटुंबावर संकटच होतें. तिचें पाऊल वाकडें पडण्याची भीति सदैव असायची. त्यासाठी तिला सोवळी करण्याची चाल पडली. पतीचा आधार नसल्यामुळे घरांतल्या कोणीहि तिला छळावें अशी मुभा होती. तिच्याकडून किती काबाडकष्ट करून घ्यावें याला तर सीमाच नसे. गोळाभर अन्नासाठी बटकीप्रमाणे सर्वांची सेवा करावी, अपमान सोसावे, मुलांचे हाल झालेले मुकाट्याने पाहवें हेंच तिच्या नशिबी येत असे. 'शहाण्यांचा मूर्खपणा' या लेखांत आगरकर म्हणतात- "ब्राह्मणी विधवा ही हिंदु लोकांच्या निष्करुणेची, मात्सर्याची, अविचाराची, विपरीत व रानटी धर्मश्रद्धेची आणि अन्यायीपणाची खूण आहे!"
 विधवेचें केशवपन म्हणजे हिंदु स्त्रीवर होणाऱ्या घोर अन्यायाचें व जुलमाचें मूर्तरूपच होय. विधवेला पुन्हा विवाह करायला बंदी करूनच समाज थांबला नाही, तर तिला विद्रूप करून माणसांतून उठवण्याची व्यवस्था त्याने करून ठेवली. आणि ही तिची विटंबना कशासाठी, तर तिच्या व समाजाच्या नीतीच्या रक्षणासाठी! निराधार विधवेकडे पाहून परपुरुषाची कामवासना जागृत होणार व त्याचें पाऊल वाकडें पडणार. 'शहाण्यांचा मूर्खपणा' या वर उल्लेखिलेल्या लेखांत आगरकरांनी या कल्पनेवर फार कडक टीका केली आहे. ते म्हणतात, "गतभर्तृकांची कृत्रिम कुरूपता राष्ट्राच्या नीत्युन्नतीस अवश्य आहे असें ज्यांचें मत असेल ते त्यांचें वपनच करून कां थांबतात कोण जाणे! त्यांचे हातपाय तोडावे, डोळे काढावे, नाके कापावीं, त्यांना कांही खाऊ न घालतां कोंडून घालाव्या म्हणजे त्यांचे कामविकार प्रबल होणार नाहीत व त्यांना कोणाशी संबंध ठेवतां येणार नाही. किंबहुना त्यांना अफूच्या गोळया किंवा सोमलाच्या पुड्या देण्याचा प्रघात पाडला तर त्यांच्या हातून अनीति घडण्याचा मुळीच संभव नाही."
 "बालविवाहाची चाल हें स्त्रीच्या दुर्दशेचें एक प्रमुख कारण आहे. स्त्री व पुरुष वयांत आल्यानंतरच त्यांचें मीलन घडावें, असा सृष्टीचा नियम आहे. त्याचें उल्लंघन झालें तर समाजावर त्याचे घातक परिणाम होतात. हिंदु समाजांत बालविवाहाची चाल शेकडो वर्षे रूढ असल्यामुळेच आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमचें मानसिक सामर्थ्यहि नाहीसें होत आहे," असें आगरकरांचें मत आहे. बालविवाह बंद झाल्यास बालविधवा होणार नाहीत, पुरुषांच्या अंगीं अधिक पौरुष दिसूं लागेल, असें ते म्हणतात. स्त्री-पुरुषांच्या सुखासाठी त्यांनी स्वयंवराचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या मतें स्वयंवर नाही तो बालविवाहच होय. हिंदु समाजांत पूर्वी स्वयंवराची चाल होती, तरुणपणीं विवाह होत असत; पण पुढे ते बंद होऊन बालविवाह सुरू झाला. तो इतका पराकोटीला गेला की, मुलें जन्माला येण्यापूर्वीच त्यांचें लग्न कांही लोक ठरवूं लागले, आणि लहान अर्भकांचींहि लग्नें करूं लागले. ऋतुप्राप्तीपूर्वीच मुलीचें लग्न केलें पाहिजे, नाही तर पितर नरकांत जातात, असें धर्मशास्त्र सांगतें. त्यामुळे ज्यांना कामविकार अजून माहीत नाही अशा मुला-मुलींचा लग्नसोहळा उरकून त्यांना रात्नीं शृंगारलेल्या खोलीत कोंडायचें व त्यांनी रतिसुख भोगावें अशी अपेक्षा करावयाची, अशी सर्वांना घाई झालेली असे. स्त्री-पुरुषांच्या रतिसुखाचा भंडवडा व मातेरें करण्याची अधिक मूर्खपणाची रीत कल्पनीय असेल काय, असें आगरकरांनी म्हटलें आहे. तारुण्याने मुसमुसलेल्या, कामाने व प्रणयरंगामुळे धुंद झालेल्या, संगमोत्सुक स्त्री-पुरुषांच्या मीलनाची बहार व अल्पवयी, अजाण मुला-मुलींना बळजोरीनें एकत्र कोंडण्याचा अत्याचार यांची तुलना करून, आगरकरांनी बालविवाहाचा निषेध केला आहे.
 बालविवाहांत लहान मुलीचें कित्येकदा वयस्क किंवा जख्खड म्हाताऱ्या पुरुषाशींहि लग्न केलें जातें. कारण विवाहाच्या बाबतींत पुरुषांवर कसलेंच बंधन नाही. अशा विजोड विवाहामुळे कामांध पुरुष कधी कधी आपल्या अल्पवयी स्त्रीवर अत्याचार करण्यासहि मागेपुढे पाहत नाहीत. बंगालमध्ये हरिमोहन याने तसलें दुष्ट कृत्य केलें. त्यांत ती मुलगी मेल्यामुळे, तें उघडकीस आलें.
 बालविवाहामुळे मुलींना प्राथमिक शिक्षणहि मिळू शकत नाही. आणि त्यांची वाढहि नीट होत नाही. त्यामुळे त्यांचें व सर्व राष्ट्राचें अतोनात नुकसान होतें. स्त्रियांची ही गुलामगिरी नष्ट होऊन गृहस्थिति सुधारल्यावांचून राष्ट्राची सुधारणा होणें शक्य नाही, असें आगरकरांनी प्रतिपादिले आहे.
विषम समाजरचना
 समाजाच्या शिलावस्थेचें चौथें लक्षण म्हणजे विषमता हें होय. प्रत्येक देशांत विचार करणारे, उपभोग घेणारे व कष्ट करणारे असे तीन ठळक वर्ग आढळतात. तिसऱ्या वर्गातील लोक काबाडकष्ट करून आवश्यकतेचे व चैनीचे पदार्थ उत्पन्न करतात आणि वरच्या दोन वर्गांतले लोक त्यांचा उपभोग घेतात. जेव्हा ही विषमता वाढू लागते तेव्हा देशाचा ऱ्हास होऊं लागतो. आगरकरांना अशी स्थिति या देशांत उत्पन्न झालेली दिसली आणि त्यांनी तरुण सुशिक्षितांना, ती बदलण्याचा यथाशक्ति प्रयत्न करावा, असा उपदेश केला.
 विषम समाजरचनेचा दुसरा प्रकार म्हणजे जातिभेद व अस्पृश्यता. भारतांत एका वर्णाचे चार वर्णं झाले; आणि त्या चार वर्णांपासून हजारो जाति उत्पन्न झाल्या. समाजाच्या या विघटनेमुळे किती हानि झाली आहे तें आगरकरांनी एका लेखांत सांगितलें आहे. या जातींतील उच्चनीचतेमुळे देशाभिमान संकुचित झाला, धार्मिक आचारविचारांत मतभेद उत्पन्न होऊन परस्पर वैर, मत्सर व झगडे सुरू झाले. अन्नोदक व्यवहार व विवाह यांत नाना प्रकारच्या अडचणी उत्पन्न झाल्या; भूतदया, उदारता, धर्मबुद्धि यांचे क्षेत्र मर्यादित झालें.
 हिंदु समाजांत अतिशूद्रादि लोकांना अपवित्र व अस्पृश्य मानण्याची जी वृत्ति अजूनहि दिसून येते, ती मनुष्याच्या विचारीपणास अत्यंत लांछनास्पद आहे, असें आगरकरांनी स्पष्ट बजावलें आहे. महार, मांग, धेड वगैरे जातींचे लोक कधीहि गोवध करीत नाहीत व गोमांस खात नाहीत. मुसलमान व युरोपियन लोक मात्र तसे करतात. तरीहि त्यांचा स्पर्श सवर्णांना चालतो आणि महराची सावलीहि चालत नाही. अशा प्रकारे आपल्या धर्मांतील कांही माणसांना हीन, अपवित्र व अस्पृश्य मानून त्यांना दूर लोटल्यामुळे ते ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराला चटकन बळी पडतात व ख्रिस्ती होतात, ही गोष्ट आगरकरांना अत्यंत उद्वेगजनक वाटत होती. उच्च वर्णाचे लोक शूद्रातिशूद्र लोकांना नीच न मानतां त्यांच्याशीं अन्नोदकव्यवहार करूं लागतील व त्यांच्या धर्मांतराला आळा घालतील तो सुदिन, असें त्यांनी म्हटलें आहे.
 'सोवळ्या ओवळ्याची पुरवणी' या लेखांत या जातीय विषमतेविषयी लिहितांना आगरकर म्हणतात, "समाजाच्या विलक्षण रहाटीमुळे उच्च-नीचत्व अस्तित्वांत येऊन तदनुसार जो व्यवसाय विभाग सहजगत्या झाला आहे, त्यास ईश्वरकृत मानून उच्च वर्गांत जन्मास आलेल्या लोकांनी नीचवर्गांत जन्मास आलेल्या लोकांना अपवित्र व अस्पर्श मानणे याहून मनुष्याच्या विचारीपणास लांछनास्पद अशी दुसरी गोष्ट नाही. "न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठगतैरपि" एवढा ज्या महंमदीयांविषयी आम्हांस तिरस्कार होता, त्या गोहत्या करणाऱ्या म्लेंछांचे व तत्समान युरोपियनांचें, राज्याधिकारांमुळे आम्हांस कांहीच वाटेनासें होऊन, ज्यांना वैदिक धर्म शिरसावंद्य, ज्यांचा धर्म व आचार हिंदु, जे अनादि कालापासून हिंदुस्थानचे रहिवासी, ज्यांच्या हातून गोवध होत नाही. अशा हिंदूंचा आम्ही तिरस्कार करतों, त्यांना स्पर्श करण्यास भितों आणि त्यांहून अनेक कारणांमुळे अस्पर्श अशा परकीयांस दृढालिंगन देतों, हा केवढा प्रमाद होय?"
 अशा तऱ्हेची टीका जागोजाग करून आगरकरांनी हें दाखवून दिले आहे की, हिंदूंमधील जातिभेद, अस्पृश्यता व तज्जन्य विषमता ही इतिहास, तर्क, समाजहितदृष्टि यांपैकी कोणत्याहि दृष्टीने पाहिलें तरी समर्थनीय ठरत नाही. समाज-प्रगतीच्या दृष्टीने पाहिलें, तर तें हिंदु समाजाचें घोर पापच आहे.
राजकीय शिलावस्था
 केवळ धार्मिक व सामाजिक जीवनांतच आम्हांला शिलावस्था आली आहे असें नाही. राजकीय जीवनांतहि आमची तीच स्थिति आहे; आणि त्याचें कारण हे की, आज हजारो वर्षे या देशांत अनियंत्रित राजसत्तेवांचून, दुसरी शासनपद्धति माहीतच नाही. "राजा कालस्य कारणम्"- ही आमची श्रद्धा. राजा आई, राजा बाप, राजा करील ती पूर्व दिशा, लोक राजाचे गुलाम या आमच्या राजकीय कल्पना रामराज्यापासून आजपर्यंत जशाच्या तशा कायम आहेत. आगरकर म्हणतात, "ज्याला याचें प्रत्यंतर पाहिजे असेल त्याने बडोदें, लष्कर (ग्वाल्हेर), हैदराबाद, म्हैसूर वगैरे पाहिजे त्या नेटिव संस्थानाची फेरी करून तेथील जुन्या पद्धतीच्या लोकांचे विचार व आचार कसे आहेत याची बारकाईने चौकशी करावी. त्या संस्थानच्या शास्त्यांपैकी एखाद्याने आपल्या प्रजेपैकी एखाद्याला केवळ चैनीखातर चाबकाचा खरपूस मार दिला, अथवा राखेचा तोबरा चढवून पाठीवर भला मोठा दगड दिला, किंवा प्रसंगविशेषीं एखाद्याचे नाही तसले हाल करून खूनहि केला, तरी देखील भोगणाऱ्याचे आप्त किंवा इतर लोक आपल्या स्वामीविरुद्ध उठावयाचे नाहीत. ही आमची राजभक्ति आणि राजनिष्ठा! धिक्कार असो आम्हांला! आमच्या राजभक्तांनी परक्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या देशांत येऊ दिल्या आणि एकाच्या जुलमाचें जूं निघालें नाही तोंच दुसऱ्याच्या जुलमाचें जूं मानेवर घेतलें, आणि आपल्या बायकापोरांसह, शतकेंच्या शतकें हवे तसले हाल सोशीत हीन दास्यावस्थेत काढली, यांत नवल तें काय?" (आमचे दोष आम्हांस केव्हा दिसू लागतील?)
 हे धिक्काराचे उद्गार वरील निबंधाच्या शेवटी शेवटीं आले आहेत. त्या आधी, "गेल्या दोन हजार वर्षांत आम्ही जीवरक्षणापलीकडे कांही केलें नाही, आणि अशाच स्थितींत पुढील युगें लोटावयाची असतील, तर आम्ही एकदम नाहीसें व्हावें हें इष्ट आहे," असें आगरकरांनी म्हटलें आहे. चंद्रगुप्तापासून रावबाजीपर्यंत हिंदूंनी कांहीच पराक्रम केला नाही, असें आगरकर म्हणत नाहीत; पण त्यांच्या मतें तो इतका अल्प आहे की, त्यामुळे आमच्या ऐतिहासिक शून्यतेस बाध येतो असें त्यांस वाटत नाही.
 आज भारताच्या प्राचीन इतिहासाचें जें संशोधन झाले आहे त्याअन्वये पाहतां इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाला आगरकरांचे हे उद्गार लागू पडतील असें नाही. सातवाहन, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, पाल, वर्धन, भोज, पल्लव, कदंब इत्यादि अनेक महापराक्रमी राजघराणीं या भूमींत होऊन गेलीं व त्यांनी सतत हजार-दीड हजार वर्षे परकीय आक्रमकांचे निर्दाळण करून या भूमीच्या वैभवांत सर्वांगांनी भर घातली, असें इतिहास सांगत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा सोनेरी पानें या ग्रंथांत हा सर्व इतिहास दिला आहे; पण एक तर असे महापुरुष या भूमींत होऊनहि आम्ही त्यांचे पराक्रम विसरून गेलों आणि युरोपीय लोकांनी त्यांचे इतिहास शोधून काढल्यावर आम्हांला आमच्या वडिलांची ओळख पटावी ही स्थिति मोठी भूषणावह नाही; आणि दुसरें म्हणजे ब्रिटिशांच्या पूर्वीच्या सात-आठशे वर्षांचा इतिहास आगरकर म्हणतात तसाच आहे. जीवरक्षणापलीकडे आम्ही कांही करूं शकलो नाही. विद्या नाही, कला नाही, संशोधन नाही, महाकाव्य नाही, व्याकरण नाही, कोश नाही, समाजरचनेचीं नवीन तत्त्वें नाहीत, शासनाच्या नव्या कल्पना नाहीत. शिलावस्था म्हणजे दुसरें काय असतें?
 'सामाजिक घडामोड' या निबंधांत राजकीय जीवनाविषयी हेच विचार आगरकरांनी मांडले आहेत आणि "आज (त्यांच्या काळीं) आम्ही पूर्ण हतबल झालों आहों, परावलंबी झालों आहों, प्रतिकारशून्य झालों आहों, याचें कारण म्हणजे आमची ती राजभक्तीच होय," असें सांगितलें आहे. ज्या त्या गोष्टींत राजाच्या तोंडाकडे पाहण्याची आम्हांस खोड! लोकशिक्षण असो, व्यापारवृद्धि असो, यांत्रिक शोध असो, मादक द्रव्यनिषेध असो, सामान्य नीतिप्रसार असो- काय पाहिजे तें असो, अगदी शुष्क गोष्टींपासून मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत सरकारपुढे तोंड वेंगाडल्याशिवाय आमचे हातून कांहीएक होणार नाही; असा आमचा पक्का ग्रह होऊन बसला आहे. कांही अंशी ही स्थिति अपरिहार्य आहे. पारतंत्र्यांत शतकेंच्या शतकें ज्यांचीं गेलीं आहेत त्यांना स्वातंत्र्याचा बाऊ वाटावयाचा; आणि पारतंत्र्यच सुखावह् वाटावयाचें!
गुणलोप
 अशा प्रकारे हिंदु समाजाला जी शिलावस्था आली होती, तिच्यामुळे त्याचें सर्व कर्तृत्व नष्ट झालें होतें. अज्ञान, अनियंत्रित व जुलमी राजसत्ता, विषमता, विपरीत धर्मकल्पना, यांमुळे राष्ट्रसंवर्धनास आवश्यक अशा सर्व गुणांचा लोप झाला होता. हिंदु लोकांत शूर वीर, मुत्सद्दी बरेच होते; पण सामान्य लोकांत देशाभिमान पूर्वीपासूनच नव्हता. तो असता तर मुसलमानांचें राज्य येथे स्थापन झालेच नसतें. आमच्या नादानपणामुळे देशाला कायमचें पारतंत्र्य आलें. मूर्खपणाचे धार्मिक आचार, दुष्ट रूढि, विषम समाजरचना, राज्यकौशल्याचा अभाव यांमुळे स्वातंत्र्यरक्षणाचें सामर्थ्यच आमच्यांत राहिले नाही. आगरकर म्हणतात, "पेशवाईचा जो मोड झाला तो आमची सामाजिक व धार्मिक स्थिति जशी पाहिजे तशी चांगली नव्हती म्हणून झाला; आणि येथून पुढेहि आम्हांस सुदशा प्राप्त होण्यास व ती कायम राहण्यास आम्ही आपली गृहस्थिति व धर्माचार सुधारण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे. चांगली राजकीय स्थिति ही चांगल्या गृहस्थितीचें व धर्मपद्धतीचें फळ आहे."
 पण हिंदु समाजाची तत्कालीन स्थिति पाहतां, आगरकरांना वाटू लागलें की, आम्ही पारतंत्र्यालाच लायक आहोंत. गुलामांचें राष्ट्र या लेखांत ते म्हणतात; "राष्ट्राचें ऐक्य होण्यास लागणारा एक तरी गुण आम्हांत भरपूर आहे काय? धैर्य नाही, उत्साह नाही, बल नाही; ज्ञान नाही, तर्क नाही, उद्योग नाही, कला नाही; खरा देशाभिमान नाही, खरी धर्मश्रद्धा नाही; खरें बोलण्याची किंवा खरें आचरण करण्याची सवय नाही; सारांश, चांगलें असें कांही नाही." हिंदु लोक मनुष्य नसून कीटक झाले आहेत; तेव्हा फ्रेंच, इंग्रज, जर्मन किंवा अमेरिकन लोकांनी येथे येऊन या देशावर राज्य करावें हेंच बरें, असें त्यांनी उद्वेगाने म्हटलें आहे. मराठींत चांगले ग्रंथ कां होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आगरकरांनी दिलें आहे की, समाजाची सर्वच क्षेत्रांत अवनति झालेली असतांना, दुसरें कांहीच चांगलें नसतांना, ग्रंथ तरी चांगले कसे होणार! या विधानावरून त्यांचा या बाबतींतला उद्वेग स्पष्ट दिसून येतो.
नवशिक्षितहि सुधारणा-विरोधी
 अशा प्रकारे हिंदु समाजाला शिलावस्था प्राप्त झालेली असतांना गेल्या शतकाच्या प्रारंभी येथे इंग्रजांची सत्ता सुरू झाली आणि त्यांनी पाश्चात्त्य विद्येचा प्रसार केल्यामुळे समाजांत थोडेंसें चैतन्य खेळू लागलें. देशाचा ऱ्हास कोणत्या कारणांमुळे होतो, राष्ट्रोन्नतीचीं तत्त्वें कोणतीं; गृहस्थिति, समाजरचना यांत कोणती सुधारणा केली पाहिजे, खरा धर्म कोणता, राजकीय स्थिति कशी असायला हवी, हें सर्व बऱ्याच जणांना पाश्चात्त्य ग्रंथांच्या द्वारे कळू लागलें; आणि त्यांतून एक नवा सुधारणावादी वर्ग निर्माण झाला. लोकहितवादी, रानडे, तेलंग हे त्या वर्गाचे नेते होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे हळूहळू समाजाच्या सर्व क्षेत्रांत परिवर्तनहि सुरू झालें; आणि लवकरच समाजांत क्रांति होऊन सर्वांगीण सुधारणा होईल, देशाची उन्नति होईल अशी आशा उत्पन्न झाली; पण त्याच सुमारास सुशिक्षित, नवविद्यासंपन्न लोकांतच एक प्रतिगामी, पुराणमतवादी पक्ष निर्माण झाला. त्या पक्षावर आगरकरांनी फार कडक टीका केली आहे; कारण ज्यांना नवीन ज्ञान प्राप्त झालेलें नाही त्यांनी सुधारणेला विरोध करणें अगदी साहजिक आहे; पण ज्यांना तें मिळालें आहे, आणि सुधारणेचें महत्त्वहि पटलेलें आहे, त्यांनीहि सुधारणेला विरोध करावा हें समाजाच्या उन्नतीला फार घातक आहे, असें त्यांना वाटत होतें. 'स्वयंवर' या लेखांत बालविवाहाविषयी विचार करतांना ते लिहितात, "जुन्या पंडितांस वाटतें की, जगांत म्हणून जेवढें कांही ज्ञान आहे तेवढें संस्कृत भाषेतील ग्रंथसमूहांत भरलेलें आहे. त्याच्या बाहेर चहूंकडे अंधार आहे. त्यांना असें वाटणें कांही अंशी स्वाभाविकहि आहे; पण ज्या आमचे डोळे उघडले आहेत, त्या आम्हीहि संकुचित दर्शनाच्या शास्त्रीवैदिकांप्रमाणे किंवा अगदी मूढ जनांप्रमाणे वागत सुटावें ही मोठ्या लाजेची गोष्ट आहे."
 कांही सुशिक्षित लोक सुधारकांची व त्यांच्या नवविचारांची टिंगल करण्यांत भूषण मानीत होते. पंडिता रमाबाई या विदुषीचें व्याख्यान पुण्यांत झालें, तेव्हा कांही टवाळांनी तिथे जी हुल्लड केली तिचा तर आगरकरांना फारच संताप आला. पुण्याचे लोक आफ्रिकन लोकांपेक्षाहि रानटी झाले आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. कांही वर्तमानपत्रांनी त्या टवाळांना उत्तेजन द्यावें, याचेंहि त्यांना फार दुःख झालें.
 आपल्या देशांत स्वतंत्रपणे विचार करणारे लोक निघाल्यावांचून देशाची प्रगति होणार नाही, असें आगरकरांचें ठाम मत होते; पण आपल्या समाजांतील सुशिक्षित लोकहि नवीन विचार मनांत आणण्यास तयार नाहीत, असें त्यांना दिसून आलें. आगरकर म्हणतात, जुनें तेवढें निर्दोष व चांगलें असा आग्रह धरून बसून जर कोणी नवीन गोष्टींचें चिंतन व चर्चा करणार नाही, तर रूढ विचारांतले व आचारांतले प्रमाद दूर होणार कसे व नवीन विचारांचे व आचारांचे चांगुलपण प्रस्थापित होऊन ते रूढ होणार कसे? समाजाचा उत्कर्ष व्हावयास हवा असेल तर वाटेल त्या गोष्टींचा विचार करण्याची तयारी हवी, असें त्यांनी वारंवार सांगितलें आहे. देवाचें अस्तित्व, वेदांचें अपौरुषयत्व, मुंज, लग्न, इत्यादि संस्कारांची आवश्यकता, स्त्री-पुरुषांचा स्वैर समागम, संपत्तीवरील हक्क इत्यादि प्रश्नांचा निर्भयपणें व सखोल विचार करणें अत्यंत अत्यावश्यक आहे; पण सुशिक्षित लोकांनाहि तसा विचार मनांत येणें म्हणजे पाप वाटत असे, त्यामुळे आगरकरांनी त्यांच्यावर कडक टीका केली आहे.
 कांही सुशिक्षित लोक सुधारणेला विरोध करतांना, इंग्रजांपेक्षा पूर्वी आम्ही अत्यंत प्रगत होतों, असें सांगून आपल्या गतवैभावाचें गाणें गाऊं लागत. इंग्रज लोक अगदी रानटी अवस्थेत होते, तेव्हा आम्हांला शेती, विणकाम, लेखन या कला ज्ञात होत्या, मोठी घरें बांधतां येत होतीं व आम्ही सुधारणेच्या शिखरावर होतों, अशी बढाई ते मारीत. अशा आम्हांला पाश्चात्त्यांच्याकडून कांहीहि शिकण्याची आवश्यकता नाही, सुधारणा करण्याचें कारण नाही, हा त्यांचा आशय; पण आगरकर म्हणतात की, 'अशा फुशारकीने त्या पक्षाचें मंडन न होतां उलट मुंडनच होते; कारण पूर्वीच इतके सुधारलेले लोक आता अधिकच सुधारलेले असायला हवे होते; पण तसे ते नाहीत. ती सुधारणाहि राहिली नाहीं व तें वैभवहि नष्ट झालें. देशाभिमान्यांची ही नवी जात केवळ बढाईखोर आहे; त्यामुळे त्यांना स्वदोष दिसेनासे होतात व सुधारण्याची इच्छाच होत नाही; याचा आगरकरांना विशेष राग येत असे.
 आमची जुनी संस्कृति, आमचें धर्मशास्त्र, आमचें गणित, आमचें तत्त्वज्ञान हें निर्दोष व श्रेष्ठ होतें, असें म्हणून पूर्वजांचें नुसतें: गुणगान करीत राहणें हें बहुभाष विधवेसारखें आहे, असें सांगून आगरकर पुढे म्हणतात, "पराक्रमी पतीच्या निधनामुळे नवीन संतानाची आशा खुंटलेली ती गतभर्तृका ज्याप्रमाणे असलेल्या अपत्यांनाच वारंवार दृढालिंगन देऊन 'आमचे पुरुष असे होते, आमच्या पुरुषांनी असें केलें, तसें केलें' अशा प्रकारचे गुणानुवाद गाण्यांतच समाधान मानून घेते व आपल्या जीविताची कृतार्थता समजते, त्याप्रमाणे जुन्या थोर पुरुषांचे गुण गाण्यांतच आमच्या पुरुषार्थाची परमावधि होऊन बसली आहे."
 सुशिक्षित लोकांत आगरकरांना असा एक वर्ग आढळला की, ज्यांना पाश्चात्य सुधारणेचे नवे विचार पटत होते, पण ते समाजांत प्रसृत करण्याची त्यांची तयारी नव्हती. समाजाचे दोष दाखविण्याला त्यांचा विरोध अशासाठी होता की, अशिक्षित लोकांपुढे अशा प्रकारचा बुद्धिवाद मांडल्याने त्यांचा बुद्धिभेद होऊन, समाजांत अनवस्था उत्पन्न होईल. या आक्षेपांत बराच अर्थ आहे हें मान्य करूनहि, आगरकरांनी म्हटले आहे की, "संक्रमणकाळांत तसे होणे अपरिहार्य असते; आणि दुसरें असें की, सुधारकांनी खूप उपदेश केला तरी लोक लगेच तसें वागूं लागतील, असा संभव नसतो. समाजाची सुधारणा मुंगीच्या गतीने होत असते. नवीन विचार लोकांना सांगणे हैं सुशिक्षित लोकांचे कर्तव्यच आहे. त्यावांचून तरणोपाय नाही."
 सुशिक्षित लोकांत असे कांही जण होते की, ज्यांना नवीन विचार पटले असले तरी, ते लोकांत प्रसृत करण्याचें धैर्य त्यांच्या अंगीं नव्हतें. आगरकरांच्या मतें हा आमचा राष्ट्रीय दोषच आहे. "आमच्या पंडितांना लोकापवादाचें भय फार असल्यामुळे ते पांडित्य-प्रदर्शनापलीकडे सहसा जात नाहीत; त्यांना आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करण्याची उत्कट इच्छा किंवा धैर्य होत नाही," असें सांगून आगरकरांनी भास्कराचार्यांचें उदाहरण दिलें आहे. ग्रहणें कशी लागतात याचें खरें ज्ञान त्यांना असूनहि ते स्नान, दान, मंत्र जप इत्यादि मूर्खपणाचे आचार सोडूं शकले नाहीत. 'आमचें ग्रहण सुटलें नाही' या लेखांत शेवटी त्यांनी म्हटलें आहे, "लोकापवादाचें भय टाकून, आपल्या मनास शुद्ध दिसेल तें लोकांस सांगण्याचे व तदनुसार वागण्याचे धैर्य केलें पाहिजे; आणि तसें पुष्कळांकडून होऊं लागले तरच अज्ञान-राहूने ग्रासलेल्या आमच्या या हतभाग्य देशाचे ग्रहण लवकर सुटणार आहे."
 "लोकमान्य टिळकांची मतें सुधारणेस अनुकूल असूनहि केवळ सवंग लोकप्रियता व पुढारीपण मिळवण्यासाठी त्यांनी आपली मतें बाजूला ठेवून पुराणमताभि मानी लोकांचा पक्ष घेतला," असा आगरकरांचा गैरसमज झाला होता. स्वाभिमान व स्वराज्यनिष्ठा जागृत करून स्वातंत्र्य-संपादनासाठी अखंड प्रयत्न करणें हेंच परतंत्र देशाचें परम कर्तव्य होय; सामाजिक सुधारणा नंतर करतां येईल, असें टिळकांचें ठाम मत होते; पण तें आगरकरांना मान्य नव्हतें. टिळकांना ते ढोंगी समजत होते आणि त्यांच्यावर सतत टीका करीत होते. "जे कोणत्याहि मिषाने लोकाग्रणी म्हणून मिरवूं लागले असतील, त्यांनी लोकांची मर्जी संपादण्यासाठी त्यांच्या दुराग्रहांचें मंडन करणें अत्यंत लज्जास्पद होय." हे आगरकरांचें विधान टिळकांना उद्देशूनच केलेलें होतें. त्यापुढे जाऊन आगरकरांनी सनातनी लोकांना बजावलें की, "हे तुमचे पुढारी नव्हेत. टिळक व जिनसीवाले हे मनाने सुधारकच आहेत. त्यांना स्त्री-शिक्षण, बालविवाह निषेध, वपन निषेध, पुनर्विवाह वगैरे सुधारणा व्हायला हव्या आहेत. मात्र त्या कायद्याने लोकांवर लादण्याला त्यांचा विरोध आहे एवढेच. तेव्हा लोकांनी त्यांना आपले पुढारी मानूं नये. साधनें आणि मार्ग यांबद्दल त्यांचें मत भिन्न असलें तरी ते आमच्यासारखेच सुधारणावादी आहेत. त्यांच्या नादीं तुम्ही लागाल तर फसाल."
 हिंदु समाजाला शिलावस्था आली आहे, त्याचें सारें व्यक्ति-जीवित्व व राष्ट्र-जीवित्व, ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखें, किंवा निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखें, अथवा उदकाच्या नित्य आघाताने कठीण झालेल्या लाकडासारखें किंवा हाडकासारखें शेकडो वर्षे होऊन राहिलें आहे, असें आगरकरांनी सुधारकाच्या पहिल्या अंकांतच म्हटलें आहे. त्यांना हिंदु समाज कसा दिसला हें यावरून स्पष्ट होईल. त्यांनी 'केसरी'साठी लेखणी उचलली तेव्हाच हिंदु समाजाविषयी त्यांचें हें मत झालें होतें. पुढे सतत केलेल्या चिंतनामुळे तें अगदी निश्चित झालें आणि 'सुधारक' पत्राला प्रारंभ करतांनाच त्यांनी ते समाजाला सांगून टाकलें.
 अशा या समाजाच्या अंगीं चैतन्य आणण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे तेंहि प्रारंभापासूनच त्यांच्या मनांत सुनिश्चित झालेलें होतें. या समाजाला शिलावस्था येण्याची त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि ती नाहीशी होऊन पुन्हा तो प्रगतिपथावर येण्यासाठी त्यांनी सांगितलेली उपाययोजना यांचीच आता चिकित्सा करावयाची आहे.
 पण ती चिकित्सा करण्यापूर्वी एकदा जरा मागे वळून पाहूं आणि मग पुढे जाऊं. मागे वळून काय पाहवयाचें?
 विष्णुशास्त्री आणि आगरकर यांच्यांतील विचारसाम्य.
 हिंदुस्थानाला शिलावस्था आली आहे असे शब्द विष्णुशास्त्री यांनी वापरले नाहीत; पण त्यांनी येथल्या समाजाचे जे दोष दाखविले आहेत त्यांवरून त्यांचा भावार्थ तोच होता है स्पष्ट दिसतें. कारण आगरकरांना हिंदुस्थान जसा दिसला तसाच त्यांना दिसला होता. येथल्या लोकांना ज्ञानलालसा नाही, विद्याभिरुचि नाही. कार्यकारणभावाचें आकलन नाही, इतिहास लिहिण्याची बुद्धि नाही, असें विष्णुशास्त्री म्हणत असत. हें मागे सांगितलेंच आहे. हिंदुस्थानच्या प्राचीन परंपरेचें ते गुणगान करीत असले तरी शिवछत्रपतींच्या पूर्वी अनेक शतकें या देशाचें प्राचीन वैभव नष्ट झालें होतें व प्राचीन आर्य लोकांचा धर्म, विद्या, आचार, इत्यादिकांचा सर्वथा लोप होण्याचा समय आला होता, असें मत त्यांनी वक्तृत्व या निबंधांत मांडलेलें होतेंच.
 हिंदुस्थानच्या शिलावस्थेविषयी जसें दोघांचे एकमत होतें तसेंच पाश्चात्त्य विद्येच्या महत्त्वाविषयी व पाश्चात्त्य लोकांच्या गुणांविषयी व संस्थांविषयीहि त्यांचे जवळ जवळ एकमत होतें. त्यांचेंच आपण अनुकरण केलें पाहिजे. त्यांना गुरु केलें पाहिजे असें विष्णुशास्त्री यांनी देशाभिमान, विद्याभिरुचि, उद्योगशीलता संपत्तीचा उपभोग, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे विवेचन करतांना ठायीं ठायीं म्हटलें आहे. आगरकरांचे त्यांविषयीचे विचार येथे मांडलेच आहेत. पाश्चात्त्य शिक्षण व तेथील नवीन कल्पना यांत मनुष्य-सुधारणेच्या अत्यवश्य तत्त्वांचा समावेश झाला आहे, म्हणून ज्यांना लयास जावयाचें नसेल त्यांनी त्यांचें अवलंबन केलेंच पाहिजे, असें त्यांनी म्हटले आहे.
 हें एवढें विचारसाम्य पाहून मोठें आश्चर्य वाटतें. आश्चर्य अशासाठी की, रोगाचे निदान व त्यावरील उपाय या दोन्ही बाबतींत इतकें साम्य असतांना भारताच्या अवनतीच्या मीमांसेच्या बाबतींत त्यांच्यांत दोन ध्रुवांइतकें अंतर असावें! सामाजिक व धार्मिक आचार-विचारांमुळे आम्हांस पारतंत्र्य आलें, असें आगरकर म्हणतात; तर या पारतंत्र्यामुळे आमची अवनति झाली असें विष्णुशास्त्री म्हणतात. शिवाय उन्नति-अवनति ही चक्रनेमिक्रमाने होत असते असेंहि विष्णुशास्त्री यांनी अनेक ठिकाणीं म्हटलें आहे. याच भिन्न दृष्टिकोणामुळे सुधारणाविरोधक असे जे नवे विद्वान् त्यांच्यावर आगरकर कडक टीका करतात, तर विष्णुशास्त्री सुधारक व सुधारणा यांचा तीव्र उपहास करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुस्थानच्या अवनतीविषयी पुढे जीं मतें मांडलीं बव्हंशीं तशींच मतें आगरकरांनी मांडलेली आहेत. रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी इत्यादि सप्तशृंखला आपणच आपल्या पायांत ठोकून घेतल्यामुळे आपला अधःपात झाला, आणि पुढे स्वातंत्र्य प्राप्त झालें तरी या बेड्या जर आपण तोडल्या नाहीत तर तें टिकणार नाही, असें सावरकर सांगत असत. समाजरचनेविषयी हेंच तत्त्वज्ञान या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या नेत्यांनी मान्य केलें म्हणूनच हा समाज संघटित व स्वातंत्र्यलढा देण्यास समर्थ झाला हे उघड आहे. असो.
 या ग्रंथांत केसरीच्या त्रिमूर्तीच्या कार्याचें विवेचन करावयाचे असल्यामुळे त्या त्रिमूर्तीच्या तत्त्वज्ञानांतील सास्य-वैषम्य पाहत पाहत असें पुढे जाणें हें उद्बोधक होईल




-२-

व्यक्तिस्वातंत्र्य



व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप
 समाजाला अशी शिलावस्था येण्याचें, आगरकरांच्या मतें, मुख्य कारण म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप हें होय. हिंदु लोकांच्या मनावर मध्ययुगांत नाना प्रकारची बंधने घातलीं गेल्यामुळे कोणाला आचारस्वातंत्र्य राहिलें नाही, उच्चार स्वातंत्र्य राहिलें नाही आणि विचारस्वातंत्र्यहि राहिलें नाही. सर्व समाजावर श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माची सर्वंकष सत्ता चालत होती. वेदप्रामाण्य म्हणजे वेदवाक्यांचे बंधन होतें; कर्मवाद म्हणजे पूर्वजन्मांतील कर्माचें बंधन होते; स्मृतींचें म्हणजे धर्मशास्त्राचें बंधन; वर्णव्यवस्थेचीं सामाजिक बंधनें, तशींच जातिबंधनें, अशी असंख्य बंधनें अगदी अनुल्लंघनीय होतीं. तीं बंधनें न मानावीं तर जातिबहिष्काराची भीति होती. राजकीय बंधनें होतीं तीं वेगळींच, कारण राजाची सत्ता अनियंत्रित होती. त्याच्या मर्जीप्रमाणे व लहरीप्रमाणे सारी प्रजा गुलामी जीवन कंठीत होती. अशा साचेबंद, नियंत्रित जीवनांत व्यक्तीला स्वतंत्रपणें विचार करावयास अवसरच राहत नाही. शेकडो वर्षे अशा अवस्थेत राहिल्यामुळे माणसांचें स्वतंत्र व्यक्तित्व हळूहळू खुरटून गेलें व शेवटीं नष्ट झालें. त्याचा परिणाम असा झाला की, समाजांत नवीन विचार, नवीन कल्पना यांचा उदय होणे थांबलें, समाजाची प्रगति थांबली व अधोगति सुरु झाली.
 अशा अवनत समाजाचा उत्कर्ष व्हायला हवा असेल, तर प्रथम व्यक्ति निर्माण केली पाहिजे, असा आगरकरांचा सिद्धान्त आहे. 'सुधारक काढण्याचा हेतु' या निबंधांत ते म्हणतात, "समाजाचें कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधनें अपरिहार्य आहेत, तेवढीं कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्यांचा उपभोग घेतां येईल तितका घ्यावयाचा हें अर्वाचीन पाश्चात्त्य सुधारणेचें मुख्य तत्त्व आहे." आपल्या सर्वं लेखनांत आगरकरांनी याच तत्त्वाचा तळमळीने पुरस्कार केला आहे. किंबहुना व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणें हेंच त्यांचें जीवितकार्य होय, असेंहि म्हणतां येईल.
पाश्चात्त्य सुधारणांचा स्वीकार
 पाश्चिमात्य विद्येच्या प्रसारामुळे समाजाची शिलावस्था हळूहळू बदलूं लागली; कारण नवीन विचारांचें वारें समाजांत खेळू लागलें. नवीन शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य सुधारणांचा अंगीकार आपण केला तरच व्यक्तिस्वातंत्र्याची स्थापना होऊं शकेल व मग समाजाची उन्नति होईल, असें त्यांनी प्रतिपादिले आहे; आणि म्हणूनच ज्या तत्त्वांच्या अनुरोधाने समाजांत सुधारणा घडवून आणायची त्या नवीन तत्त्वांचें विवेचन त्यांनी आपल्या लेखांत केलें आहे. पाश्चिमात्य शिक्षणांत मनुष्य- सुधारणेच्या अत्यावश्यक तत्त्वांचा समावेश झालेला आहे, म्हणून ज्या लोकांस लयास जावयाचें नसेल त्यांनी त्यांचे अवलंबन केलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पाश्चात्त्य विद्येला आगरकरांनी दुर्बिणीची उपमा दिली आहे ती अगदी सार्थ आहे. ते म्हणतात, "ज्याला दुर्बिणीचें किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राचें साहाय्य आहे, त्याला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात, त्या ज्याला त्यांचें साहाय्य नाही, त्याला तितक्या स्पष्ट दिसत नाहीत; तसेच ज्याने शास्त्राभ्यास केला आहे, ज्याने इतिहास वाचला आहे, ज्याने जगाचा पुष्कळ अनुभव घेतला आहे व ज्याने विचारांत दीर्घ काळ घालविला आहे, अशा तत्त्ववेत्त्यास मनुष्य-प्रवृत्तीची दिशा जितकी नीट समजणार आहे, तितकी ती अशिक्षितास समजण्याचा संभव नाही.
 पाश्चात्त्य सुधारणेचीं मूलतत्त्वें ज्यांना पटलीं आहेत, त्यांना आपल्या समाज- व्यवस्थेत अनेक दोष दिसून येतील. ते सामान्य लोकांना दाखवून देऊन, नवीन तत्त्वांचा पुरस्कार करतांना, नवीन विचारांचें प्रतिपादन निर्भयपणें केलें पाहिजे, असें आगरकरांनी सांगितलें आहे. लोकमत नवीन विचारांना प्रतिकूलच असणार; पण त्या लोकमताला भिऊन चालणार नाही. ज्यांना समाजाला नवीन वळण लावून त्याची उन्नति करण्याची इच्छा आहे त्यांनी सत्यप्रतिपादन करणें अवश्य आहे. नाही तर लोकमतांत बदल होणारच नाही. समाजधुरीणांना लोकमताचा बागुलबोवा वाटू लागला, ते लोकमताविरुद्ध जाण्यास भिऊं लागले, तर कोणत्याहि समाजाला उन्नतावस्था येणें शक्य नाही, असें त्यांनी बजावलें आहे.
आमचा राष्ट्रीय दोष
 लोकापवादाचें भय वाटणें हा, आगरकरांच्या मतें आपला राष्ट्रीय दोष आहे व त्यामुळे आपलें अतिशय नुकसान झालें आहे. समाजाच्या हितास्तव ज्याला जी गोष्ट बरी वाटेल ती त्याने उघडपणें बोलून दाखवणें यांतच समाजाचें कल्याण आहे, असें त्यांनी सांगितलें आहे. ज्या कारणांमुळे आपली अधोगति झाली, तीं समाजाला निर्भयपणे सांगितली पाहिजेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी ज्या सुधारणा करणें आपल्याला योग्य वाटतें त्याहि सांगणें अवश्य आहे. लोकाग्रणी तसें न करतील तर समाजाची सुधारणा कधीच होणें वाक्य नाही. त्याचा नाश होणें अटळ आहे. निर्भयपणाचे महत्त्व विशद करतांना आगरकरांनी पुढे म्हटलें आहे, "पाश्चात्त्य ज्ञान पुष्कळ मिळवलें, नवीन विचार आत्मसात् केले तरी, त्याप्रमाणे वागण्याचें धैर्य नसेल तर त्यांचा समाजाला कांहीच उपयोग नाही. आपल्याकडील तत्त्ववेत्त्यांत एक मोठा दोष दिसून येतो तो हा की, त्यांना आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करण्याची उत्कट इच्छा किंवा धैर्य होत नाही. रूढ आचारधर्माचे आम्ही इतके गुलाम झालो आहों की, जुन्या गोष्टी आम्हांला सोडवत नाहीत. वाडवडिलांच्या विहिरींत खारे पाणी असले तरी तेंच आम्हांला प्रिय, तेंच आम्ही पिणार, असा आमचा दुराग्रह आहे. तो दुराग्रह सोडला पाहिजे. युरोप खंडांतील लोकांनी दुराग्रह सोडला म्हणून त्यांचा उत्कर्ष झाला. मध्ययुगांत युरोपांतील लोकहि धर्मपाशांनी अगदी जखडलेले होते, पण त्यांनी ते पाश तोडून टाकले म्हणून त्यांची उन्नति झाली. त्याप्रमाणेच आपणहि आपले कर्मकांडात्मक धर्माचे पाश तोडले पाहिजेत; आणि नवीन विचारांचे प्रतिपादन निर्भयपणें केलें पाहिजे. असें सतत केल्यानेच त्याप्रमाणे आचरण करण्याचें धैर्यं येतें." निर्भयपणा हा व्यक्तिस्वातंत्र्याचा एक पैलू आहे.
विवेक हाच आधार
 धर्मपाश तोडून टाकायचे म्हणजे बालविहासारख्या अनिष्ट प्रथा बंद करायला हव्या; पण त्यामुळे उभय कुळांतील चाळीस पिढ्यांना दुर्गति प्राप्त होण्याचें भय सामान्य लोकांना वाटत असतें, कारण तसें धर्मशास्त्र आहे. शेकडो वर्षे समाज तो आचारधर्म पाळीत आहे. यामळे कांही लोक धर्मशास्त्रांतच नवीन विचारांना, सुधारणेच्या तत्त्वांना आधार शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कोणत्या तरी प्राचीन ऋषीचा आधार हवा असतो. त्यावर आगरकर म्हणतात की, अशा आधाराची मुळीच आवश्यकता नाही. विवेक हाच आमचा आधार. आमची बुद्धि, आमची तळमळ, आमचें सृष्टिविषयक ज्ञान त्या जुन्या ऋषींच्या बुद्धीहून किंवा ज्ञानाहून कमी तर नाहीच, उलट अधिक आहे. तेव्हा धर्माचा निर्णय करण्याचा त्यांना जेवढा अधिकार होता तेवढा आम्हांलाहि आहे. म्हणून जुन्या धर्मशास्त्रांतील जे नियम आमच्या दृष्टीने समाजाला हितकारक असतील तेवढेच आम्ही पाळू व जे आम्हांला अपायकारक वाटतात ते टाकून देऊन त्यांच्या जागीं आम्ही नवीन नियम, समाजाला हितकारक असे नियम तयार करूं.
इष्ट असेल तें-
 समाजव्यवस्थेचे नियम करतांना जुन्या शास्त्रांचा आधार न घेतां स्वतःच्या बुद्धीचा आधार घेणार असा निर्धार व्यक्त केल्यानंतर आगरकरांनी त्याबद्दल स्वतःची भूमिका कोणती आहे, तें स्पष्ट केलें आहे. मनुष्याला बुद्धि असल्यामुळेच निरनिराळ्या व्यक्तींत व समाजांत मतभेद उत्पन्न होतात, तसे होणें अनिवार्य आहे. प्रत्येकाने स्वतःला योग्य वाटतील तेच विचार लोकांना सांगितले पाहिजेत व त्याप्रमाणे आचरण केलें पाहिजे. "इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार" हें आगरकरांच्या प्रतिपादनाचें सार त्यांनीच सांगितलें आहे. स्वतःच्या विचारसरणीबद्दल आगरकरांना केवढा जबर आत्मविश्वास वाटत होता तें त्यांच्या पुढील विधानावरून ध्यानांत येतें. "एखाद्या दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यांस शेकडो मनूंचे व सहस्रावधि पाराशरांचे आधार दाखविलेत व त्यांचा प्रसार न व्हावा म्हणून कितीहि अडथळे आणून घातलेत तरी आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतीस लागलेला 'वणवा' कोट्यवधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवाताने विझण्याचा मुळीच संभव नाही."
 पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे हिंदूंच्या धार्मिक व सामाजिक विचारांत क्रांति होईल व आचारांतहि बदल होईल, अशी खात्री आगरकरांना वाटत होती. कारण इंग्रजी सत्ता आल्यापासून हिंदूंच्या धार्मिक व सामाजिक मूढतेस धक्के बसूं लागले होते. नवीन प्रकारच्या शिक्षणामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करूं लागले होते, समाजाला जागृति आली होती. त्यामुळे व परिस्थितींच्या प्रभावामुळे हिंदूंच्या आचारांत बरीच शिथिलता आली होती. हिंदु धर्माला उतरती कळा लागली असा ग्रह होऊन त्याच वेळीं सनातन धर्माभिमानी लोक जुन्या आचारधर्मास कवटाळून बसलेले असल्यामुळे, त्याचें प्रस्थ चालू राहवें, त्याची सत्ता सर्व समाजावर पुन्हा प्रस्थापित व्हावी असा प्रयत्न ते करीत होते हें खरें; पण इंग्रजी शिक्षण चालू असेपर्यंत ती गोष्ट साध्य करणें अशक्य आहे, असें आगरकरांनी त्यांना बजावलें आहे. तेव्हा तसा व्यर्थ प्रयत्न न करतां नव्या कल्पनांचा स्वीकार करणें हेंच सर्वांच्या हिताचें आहे. अन्यथा तरुण पिढी वैदिक धर्माचा अजीबात त्याग करून निधर्मी बनेल असाहि इशारा त्यांनी दिला आहे.
विचारकलह
 पाश्चात्त्य शिक्षणामुळे, नव्या विचारांच्या प्रसारामुळे सुशिक्षित लोकांना आपल्या जुन्या आचारधर्मांतील दोष दिसूं लागले आणि ते सुधारावे अशी इच्छा त्यांच्या मनांत उत्पन्न झाली. त्यामुळे समाजांत दोन पक्ष निर्माण झाले; सुधारणावादी आणि सनातन धर्माभिमानी लोकांत वादविवाद सुरू झाले, कलह होऊं लागला. आगरकरांच्या मतें हें इष्टच आहे. ते म्हणतात, "बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतकें भितां कशासाठी? दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणाऱ्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडलें आहे. पाश्चिमात्य शिक्षणामुळे ज्या दिवशी या वादास प्रारंभ झाला तो दिवस हिंदुस्थानच्या भावी इतिहासांत महोत्सव करण्यासारखा होईल. विचारांचा कलह म्हणजे माणसांत चैतन्य निर्माण झाल्याचें द्योतक आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी त्याची नितान्त आवश्यकता आहे, असे त्यांचें निश्चित मत होतें.
 अशा प्रकारे व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्थापनेसाठी समाजांत कोणत्या सुधारणा करणें अवश्य आहे, त्यासाठी काय केलें पाहिजे, समाजाला काय शिकवलें पाहिजे, त्याचा परिणाम काय होईल यासंबंधी मनाचा निश्चय झाल्यानंतर, आगरकरांनी स्वतःची भूमिका ठरवून त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार केला होता. सत्य तेंच सांगणार ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यापायीं वाटेल ती संकटें येवोत; त्यांना तोंड देण्याची त्यांची तयारी होती. 'महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र' या लेखांत ते म्हणतात, "लोकांना आज ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या या हतभाग्य लेखकास पसंत नसल्यामुळे, लोकच्छंदानुवर्तन त्याला अशक्य झालें आहे. इतकेंच नाही, तर लोकांस अप्रिय परंतु पथ्यकर असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुनः पुन्हा त्यांचे पुढे आणणें हेंच आपले कर्तव्य व जीविताचें सार्थक अशी त्याची दृढ कल्पना झाली आहे."
 समाजशिक्षणाचें हें दुर्घट कार्य आगरकरांनी स्वार्थत्यागपूर्वक चालवलें, आणि त्यामुळे जो उपहास व जे शिव्याशाप समाजाकडून त्यांना मिळाले ते त्यांनी सहन केले. पूज्य व प्रिय आप्तजनांचा रोषंहि त्यांना पत्करावा लागला. विरुद्ध पक्षाच्या लोकांनी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची प्रेतयात्रा काढली तीहि त्यांना पाहवी लागली. पण हें सर्व त्यांनी एखाद्या स्थितप्रज्ञासारखें सोसलें. कारण आपलें सत्यप्रतिपादन केव्हा ना केव्हा तरी लोकांना पटेल व समाज त्याचा स्वीकार करील अशी त्यांना आशा वाटत होती.




-३-

मनुष्यसुधारणेची मूलतत्त्वे



ऐतिहासिक चिकित्सा
 हिंदु समाजाला जी शिलावस्था आलेली होती ती नष्ट होऊन त्याच्या ठायीं पुन्हा प्राणसंचार व्हावा यासाठी 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा निर्णायक उपाय होय, असें आगरकरांचें मत होतें. त्याचें प्रतिपादन त्यांनी कसें केलें तें आपण वर पाहिले; पण आगरकरांनी आपलें हें प्रतिपादन अधिक व्यापक भूमिकेवरून अनेक ठिकाणीं केलें आहे आणि त्याचाहि परामर्श घेणें अवश्य आहे.
 त्यांची व्यापक भूमिका ही की, 'व्यतिस्वातंत्र्य' हें आज आपल्याला जडलेल्या व्याधीवरच औषध आहे असें नाही, तर एकंदर मनुष्यसुधारणेचेंच तें मूलतत्त्व आहे. समाजाच्या प्रारंभीच्या काळी सर्वच क्षेत्रांत 'आज्ञाप्रामाण्य' किंवा 'दंडसत्ता' किंवा आगरकर ज्याला 'बलात्कार' म्हणतात त्याच तत्त्वावर समाजाचे सर्व क्षेत्रांतले व्यवहार चालू असतात. धर्म, राजकीय जीवन, समाजरचना या जीवनाच्या भिन्न अंगांचा विचार केला व त्या दृष्टीने मानवाचा इतिहास पाहिला तर धर्माचार्य, राजा व श्रेष्ठ वर्णीयांनी केलेल्या स्मृति किंवा कायदे यांच्या आज्ञेप्रमाणेच सर्वसामान्य जनतेला वागावें लागत असे, असें दिसतें. स्वतःच्या मताप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार कोणालाहि नव्हता. यालाच आगरकर बलात्कार-तत्त्व म्हणतात. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत हें कांही अंशी अपरिहार्यच असतें, असेंहि त्यांनी म्हटलें आहे. कारण स्वतः विचार करून उत्कर्षमार्ग कोणता तें अचूकपणें जाणण्याचें बौद्धिक सामर्थ्य त्या काळीं सामान्यजनांना आलेलें नसतें. अशा स्थितीत म्हणजे वन्यावस्थेत समाज असतांना लोकांना स्वातंत्र्य दिले तर समाजांत अराजक माजेल, मारामाऱ्या, लूट, विध्वंस, रक्तपात यांना ऊत येऊन सर्वत बेबंदशाही माजेल; आणि मग समाजाचें अस्तित्वच धोक्यांत येईल. म्हणून आगरकर म्हणतात, "तशा स्थितींत पराकाष्ठेचा क्रूर व जुलमी असा राजा असला तरी त्यापासून समाजाला नुकसानीहून अधिक फायदा होतो; आणि त्या एकट्याच्या जुलमापासून होणारी पीडा एकंदरीने अधिक हितावह होते. त्या अवस्थेत सारी दृष्टि समाजाच्या अस्तित्वावरच दिली पाहिजे. मनुष्यासारख्या बलहीन प्राण्यास क्रूर पशूंच्या व पशुतुल्य व्यक्तींच्या त्रासांतून सुटण्यास कसा तरी समाज करून राहणें व आपल्याचपैकी एखाद्या बलवंताचा आश्रय करणें, याहून स्वसंरक्षणाचा दुसरा मार्ग नसतो. (आमचें काय होणार?) पण समाज जसजसा समंजस, विवेकी होऊं लागतो तसतसें हें बलात्कार-तत्त्व नाहीसें होऊन समाजाचे व्यवहार संमति तत्त्वावर होऊं लागतात; आणि तसे झाले तरच त्याची प्रगति होते. व्यक्तिस्वातंत्र्य हा त्या संमति तत्त्वाचाच पूर्ण विकास होय.
 अशा रीतीने मनुष्यसुधारणेचें मूल-तत्त्वच व्यक्तिस्वातंत्य आहे, हळूहळू बलात्कार नष्ट होऊन त्याच्या जागीं संमति-तत्त्व आल्यावांचून समाजाची प्रगति होणें शक्य नाही. हें आपल्या समाजाच्या नीट ध्यानांत आलें तर पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांना असलेला त्याचा विरोध कमजोर होऊन हळूहळू तो नाहीसा होईल असें मनांत आल्यामुळे आगरकरांनी त्या मूल-तत्त्वांची ऐतिहासिक चिकित्सा केली आहे. ते म्हणतात, "तारवास जसें सुकाणूं किंवा इमारतीस जसा पाया तशी सामाजिक रचनेस व स्थित्यंतरास हीं तत्त्वें आहेत."
 हिंदु समाज गाढ अज्ञानांत बुडालेला होता, त्याला कार्यकारणभाव कळत नव्हता, त्यामुळे त्याच्यावर लादली गेलेलीं असंख्य बंधनें त्याला प्रिय वाटत होती. ती बंधनें केव्हा कशामुळे आली, आचारधर्म कोणत्या हेतूने सुरू झाला, हे लोकांना माहीत नव्हतें. कोणतें कर्म केलें असतां पुण्य लाभतें व कोणत्या कर्मामुळे पाप लागतें एवढेच त्यांना माहीत होतें. त्या परंपरागत कर्मकांडावर त्यांची अंधश्रद्धा होती; पण धर्मसत्ता, राजसत्ता यांचें मूल स्वरूप समजलें की लोकांचे डोळे उघडतील; ते विविध आचार, तीं व्रतवैकल्ये व त्या अनंत रूढि यांचे समाजावरील पाश तुटून जातील व लोकांची बुद्धि स्वतंत्र होईल, या आशेने आगरकरांनी ही ऐतिहासिक चिकित्सा केली आहे.
 आमचा धर्म सनातन आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला आहे, तो अपरिवर्तनीय असून परंपरागत आचार व रूढि पाळणें हेंच समाजाच्या हिताचें आहे. अशी लोकांची समजूत झालेली होती. आम्हीं उन्नतीचें शिखर गाठलेलें आहे; आणि अधिक उन्नतीला अवसर नाही, असेंहि त्यांना वाटत होते; पण पाश्चात्त्य विद्यारूपी दुर्बिणींतून जगाचें अवलोकन केल्यानंतर हा भ्रम नाहीसा होईल, अशी आगरकरांना खात्री वाटत होती; म्हणून त्यांनी समाजाला मनुष्यसुधारणेचीं मूल-तत्त्वें सांगून, मानवी प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी हा प्रपंच केला आहे. जग सारखें बदलत चालले आहे, असें सांगतांना ते म्हणतात, "या विश्वांतील कोणतीहि सचेतन किंवा अचेतन वस्तु स्थिर नाही; प्रत्येक क्षणास प्रत्येकीत दृश्य किंवा अदृश्य फेरफार होत आहेत. सध्या पृथ्वीवर जे ज्ञानी पुरुष आहेत, त्या सर्वांच्या अंतःकरणाची अलीकडे अशी खात्री होत चालली आहे की, जगाचीं स्थित्यंतरें अनादि व अनंत आहेत. तस्मात् आपणांस अनुकूल अशा स्थित्यंतरास आपण साहाय्यभूत व्हावें हे आपणांस योग्य आहे."
 आगरकरांनी मनुष्यजातीच्या स्थित्यंतरांचे धार्मिक, राजकीय व सामाजिक असे तीन विभाग कल्पून त्यांचा क्रमाने विचार केला आहे; तो आता पाहवयाचा आहे.
धार्मिक
 काम, क्रोध, लोभ, मत्सर, दया इत्यादि मानवी मनोवृत्तिः जशा नैसर्गिक आहेत, तशीच धर्मवृत्तीहि नैसर्गिक आहे. मात्र मनुष्याच्या प्राथमिक अवस्थेत ती स्पष्टपणे दिसत नाही; त्याच्या अंतःकरणांत अगदी सूक्ष्म अशा बीजरूपाने ती उत्पन्न झालेली असते. मनुष्याची अवस्था जसजशी बदलत जाते, तसतसा त्याच्या धर्मकल्पनेचा विकास हळूहळू होत जातो. निर्गुण, निराकार व सर्वगामी परमेश्वराची अत्यंत उन्नत कल्पना प्रारंभापासून मानवाच्या मनांत होती, हें खरें नाही. प्रथम तो निर्जीव वस्तु किंवा पशु यांच्या रूपाने निसर्गशक्तींची पूजा करूं लागला. मग अनेक देवता उत्पन्न झाल्या. त्या सगुण देवतांची उपासना हजारो वर्षे चालू आहे. कालांतराने अनादि, अनंत विश्वसंचालक अशा एकाच परमेश्वराची कल्पना उदित झाली. त्यानंतर द्वैत, अद्वैत इत्यादि तत्त्वज्ञान उदय पावलें. यावरून हें दिसून येईल की, वेद अनादि असून, त्यांतील सूक्तांचे द्रष्टे जे प्राचीन ऋषि त्यांना एकदम पूर्ण ज्ञान प्राप्त झालें होतें, ही समजूत अत्यंत भ्रामक आहे; तिला कसलाहि आधार नाही. अनेकत्वानंतर एकत्वाची, स्थूलानंतर सूक्ष्माची, जडानंतर चिद्रूपाची, साकारानंतर निराकाराची कल्पना मनुष्याच्या विकास पावत जाणाऱ्या बुद्धीस येणें हेंच अत्यंत स्वाभाविक आहे. पदार्थविज्ञान, रसायन, वैद्यक, न्याय इत्यादि शास्त्रांतहि उत्तरोत्तर असाच विकास होत गेला आहे. ज्याप्रमाणे जड सृष्टीच्या शास्त्रीय विचारांत गुरुत्वाकर्षण ठाम होऊन गेलें आहे, त्याप्रमाणे धर्मविचारांत सर्वशक्तिमान् व सर्वज्ञ अशा एका परमेश्वराची कल्पना दृढ होऊन गेली आहे; आणि आगरकरांच्या मतें मनुष्याला अजूनहि पूर्णावस्था आलेली नाही.
निसर्गपूजा
 रानटी अवस्थेतील मनुष्याला विश्वाचे व्यापार, पदार्थांचे धर्म, वस्तूंत होणारी नैसर्गिक रूपांतरें यांचें ज्ञान नसल्यामुळे त्याला ऊन, पाऊस, वारा, वीज, पूर वगैरे नैसर्गिक घटना आणि वाघ, सिंह इत्यादि क्रूर पशु यांची भीति वाटते. त्यांच्यापासून स्वसंरक्षण कसें करावें हें त्याला समजत नाही, म्हणून तो त्यांची पूजा करून संकटें निवारण्याचा प्रयत्न करूं लागतो; ' यांतच धर्मकल्पनेचा उगम आहे. बाह्य सृष्टीतील निर्जीव वस्तु आणि प्राणी यांनाहि आपल्यासारखींच मनें आहेत, आपल्यासारखेच राग-द्वेषादि विकार आहेत, असें मानून त्यांना संतुष्ट राखण्यासाठी त्यांचें स्तवन करणें, त्यांना कांही तरी वस्तु अर्पण करणें यांतून देवकल्पना व देवपूजा उदय पावली. सारांश, मनुष्याच्या अज्ञानामुळे, भिन्न भिन्न घटनांची कारणें त्याला कळत नसल्यामुळे अशा विचित्र कल्पना त्याच्या मनांत येतात आणि त्याच त्याला खऱ्या वाटू लागतात. सूर्य, चंद्र, दगड, माती, इत्यादि निर्जीव वस्तु; वड, पिंपळ, तुळस इत्यादि वनस्पति; मस्त्य, कूर्म, वराह, उंदीर, गाय, नाग, इत्यादि प्राणी यांना देव मानून त्यांची विविध प्रकारे पूजा करण्याची चाल भारतांतच नव्हे, तर जगांत सर्वत्र रूढ आहे.
पिशाच कल्पना
 सृष्टीतील सचेतन व अचेतन वस्तूंच्या ठायीं मनुष्याचें बरें-वाईट करण्याची शक्ति असते, असें समजून त्यांना देवता मानणें हा देवतोत्पत्तीचा एक प्रकार; व प्रबल पुरुषासच जिवंतपणीं व मरणोत्तर देव मानून त्याची पूजा करणें हा दुसरा प्रकार होय. रानटी माणसाला झोप व मरण यांतील भेद कळत नाही. झोपलेला मनुष्य जिवंत असतो, त्याचप्रमाणे मेलेला मनुष्यहि दुसऱ्या कोणत्या तरी अवस्थेत जिवंत असला पाहिजे व आपल्या भोवतीं वावरत असला पाहिजे, असें त्याला वाटतें. मेलेल्या मनुष्याचें शरीर नाहीसें झालें तरी, त्याचा जीव किंवा आत्मा पिशाचरूपाने त्या व्यक्तीच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्याला सुख किंवा त्रास देत राहतो, ही श्रद्धा जगांतील बहुतेक रानटी लोकांत आढळून येते. त्यामुळे त्या पिशाचाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याचा रोष होऊं नये म्हणून, त्याला प्रिय असलेली वस्तु अर्पण करणें, प्रार्थना करणें किंवा दुष्ट पिशाचाला मांत्रिकाच्या मदतीने गाडण्याचा प्रयत्न करणें, हे प्रघात सुरू झाले. पुढे कांही कारणांमुळे हींच पिशाचें वृक्षांच्या किंवा जनावरांच्या रूपाने प्रगट होऊन आपल्याला आनंद किंवा पीडा देतात, असें वाटून त्यांची आराधना सुरू झाली. याच पद्धतीने नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य इत्यादि मोठ्या वस्तूंत आपल्या मृत आप्तांनी मरणोत्तर प्रवेश केला असेल, असा विश्वास उत्पन्न होऊन त्यांची पूजा करण्याचा प्रघात पडला असावा. रानटी लोक आपल्याहून श्रेष्ठ असा मनुष्य दिसला की त्याला देव मानतात व त्याला भिऊं लागतात. तो मेल्यानंतर त्याचें पिशाच तर अधिकच भीतिदायक ठरते. त्यामुळे त्याला कांही तरी देऊन संतुष्ट ठेवण्याची प्रथा सुरू होते. आगरकर म्हणतात, "मृत आप्तांच्या पिशाचांनी आपणावर कुपित न होतां आपली कृपादृष्टि सदैव चालू ठेवावी आणि पोरांबाळांस त्रास देऊं नये हें सारें श्राद्धविधीच्या व पितृतर्पणाच्या बऱ्याच भागांचें गुह्य आहे." अशा प्रकारे पिशाच-कल्पनेतून देवतांची कल्पना निघाली आहे, असें सांगून आगरकर म्हणतात, "ज्या उपायांनी व कृतींनी रानटी व अर्धवट सुधारलेलीं माणसें आनंद पावतात, त्याच उपायांनी व कृतींनी देवताहि आनंद पावत असतील, असा आमचा भरवसा ठरून गेल्यामुळे आमच्यांतील अज्ञ लोकांचा पूजाविधि अत्यंत उपहासास्पद झाला आहे. सांब हा थेट पिशाचवर्गातून देववर्गांत आला असल्यामुळे त्याचें रूप आणि त्याची पूजाहि पिशाचाचें रूप आणि पूजा यांसारखी झाली आहेत."
 राजा हा फार पराक्रमी व सर्वसत्ताधीश असल्यामुळे लोक त्याला मोठा मान देत आले आहेत. स्वार्थसाधु लोकांनी तर त्याला देवाचा अंश किंवा साक्षात् देवच ठरविलें. जिवंत राजाविषयी अशी कल्पना असल्यामुळे तो मेल्यावर महादेव ठरतो; आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याची विशेष प्रकारे पूजा करावी लागते. देवाची कल्पना प्रथम पिशाच कल्पनेपासून निघाली असावी, असें स्पेन्सरने अनेक प्रमाणांनी सिद्ध करून दाखविलें आहे. आगरकरांच्या मतें हिंदूंचा महेश किंवा शंकर हा देव अशा प्रकारचें उत्तम उदाहरण आहे. सृष्टीचा संहार करणें हें त्याचें काम. त्याच्या भक्तांनी शंकराचें जें वर्णन केलें आहे, तें त्या संहारकार्याला साजेसें उग्र आहे. चितेंतली राख अंगाला लावणें, मेलेल्या पशूचें ओलें कातडें अंगावर घेणें, गळ्यात नररुंडमाला धारण करणें, वेताळाबरोबर नाचणें असें त्याचें रूप भक्तिभावाने वर्णिलें जातें. त्यावरून महादेव हा एक महापिशाच आहे संशय नाही.
 मृतात्मे, पिशाच व देव हीं नांवें मात्र भिन्न आहेत; बाकी त्यांची मूळ प्रकृति एकच आहे, हा सिद्धान्त सांगितल्यावर आगरकरांनी, देवळें हीं थडग्यांपासून झालीं आहेत, असेंहि सांगितलें आहे. पूर्वी प्रेतें पुरण्याची चाल होती, तशी अजूनहि आहे. कांही जातींचे लोक व जंगम, गोसावी, वगैरे पंथांचे अनुयायी प्रेतें पुरतात, व त्या जागीं थडगीं बांधतात. प्रेतांचें दहन करणारे लोकहि मृत मनुष्याची समाधि बांधतात. थडगे किंवा समाधि हें पिशाचाचे निवासस्थान असतें. पिशाचाचा देव झाला की त्याची समाधि म्हणजे देवालय ठरते.
 मूर्तिपूजेचा उगम पिशाच- कल्पनेतूनच झालेला आहे, असें आगरकरांचें मत आहे. ते म्हणतात, "मूळ वस्तूचे गुण तिच्या प्रतिमेंत उतरतात हाच ग्रह प्रधानतः मूर्तिपूजेच्या मुळाशी आहे. प्रथमावस्थेतील लोकांना प्रकृति व तिची प्रतिकृति यांतील भेद न समजल्यामुळे, लहान मुलांप्रमाणे, एकीचे गुण दुसरीत उतरतात असा त्यांचा समज होतो; आणि म्हणून त्यांना असें वाटतें की, जर मृत मनुष्याच्या थडग्यावर त्याची प्रतिमा ठेविली तर तींत त्याचें पिशाच शिरेल." अशा प्रतिमांची आराधना व पूजा करून त्यांना तेल, पीठ वगैरे पदार्थ चोपडण्याची चाल सर्वत्र आढळते. अडाणी लोक दगडाला, थडग्याला तेल व शेंदूर लावून त्याची पूजा करतात, त्याला अन्नाचा वा मद्यमांसाचा नैवेद्य दाखवतात; यांतूनच म्हसोबा, पिरोबा, खंडोबा, इत्यादि देव जन्माला आले आहेत. सारांश, अज्ञान व अप्रबुद्धता यांतून मूर्तिपूजा उदय पावली आहे.
आचार-प्रकरण
 माणसांचा समूह एकत्र नीटपणें नांदायला हवा असेल, तर त्यांच्या वागण्यावर बंधने घालावी लागतात. परस्परांशी वागण्याची हीं जीं बंधने वा नियम त्यांनाच आचारपद्धति म्हणतात. अशा नियमांची समाजाला फारच आवश्यकता असते. त्यांच्यावांचून समाज चालावयाचा नाही. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत त्यांतील घटकांच्या अज्ञानामुळे, भीतीमुळे किंवा दुराग्रहामुळे, कार्यकारण न कळल्यामुळे अनेक प्रकारचे अंध, तर्कशून्य आचार रूढ होतात. पूर्वी युरोपांत अशा प्रकारचा आचारधर्म रूढ होता व आपल्याकडे तो अजूनहि चालू आहे; पण ज्ञानाच्या प्रसारामुळे हीं आचारबंधनें शिथिल होऊं लागतात व वेडेपणाच्या आचारांचा लोप होतो. हीच सुधारणेची दिशा होय. शास्त्रांची प्रगति झाली, कार्यकारणभाव कळूं लागला की धर्मकल्पना उन्नत होतात. बुद्धीचा विकास झाला की प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागतात, असंख्य देवतांची पूजा करणें अयोग्य वाटू लागतें, आणि सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचें परिपालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो.
 ज्ञानाच्या प्रसारामुळे व बुद्धीच्या विकासामुळे आचारधर्माचें स्तोम कमी होतें, त्याचप्रमाणे नीति व सदाचार हाच खरा धर्म होय हें कळूं लागतें. अज्ञानाचा निरास करून लोकांना अशा धर्माची शिकवण द्यावी, याच हेतूने आगरकर पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांची सतत चर्चा करीत होते. "त्यामुळे तुमच्या धर्माचारांत प्रचंड क्रांति होऊन तुमचें वर्तन पराकाष्ठेचें साधें व फक्त नीतीच्या नियमांनी चालणारें असें होईल; संध्या, ब्रह्मयज्ञ, श्रावण्या, श्राद्धे, वगैरे चालू धर्माचार पूर्णपणें लयास जाऊन त्यांच्या जागीं अधिक उपयुक्त व समंजसपणाचे आचार प्रचारांत येतील; आणि सत्यपरायणता, न्यायरति, परोपकृति व शहाणपणा, इत्यादि सद्गुणांची वृद्धि होऊन लोकांना आतापेक्षा शतपट अधिक सुख मिळू लागेल." असा त्यांना विश्वास वाटत होता.
 आपल्या धार्मिक संस्थांची अशी ऐतिहासिक चिकित्सा केल्यानंतर आगरकरांनी राजकीय व सामाजिक संस्थांची व आचारांचीहि चिकित्सा केली आहे; आणि या दोन्ही क्षेत्रांत मनुष्यसुधारणेचा ओघ कोणत्या दिशेने वाहत आहे तें दाखविलें आहे. या दोन्ही विषयांत बलात्काराकडून संमति तत्त्वाकडे जगाची वाटचाल होत आहे, सर्व सुधारलेले देश त्या दिशेने निघाले आहेत, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
राजकीय
 मनुष्याचा रानटीपणा कमी होऊन तो समाज बनवून राहूं लागला की त्या समाजांत राजा व प्रजा किंवा शास्ता व शासित असे दोन वर्ग उत्पन्न होतात. समाज- व्यवस्थेसाठी अशा राजसत्तेची फारच आवश्यकता असते; कारण तोवांचून समाजाचें अस्तित्वच फार काळ टिकणार नाही. रानटी लोकांचाहि एक राजा असतोच व त्याची सत्ता अनियंत्रित असल्यामुळे तो बहुधा फार जुलमी असतो; पण सर्वांनी परस्परांना मारण्यापेक्षा एकाचा जुलूम पत्करला. मनुष्य हा जात्या बलहीन असल्यामुळे, राजाने कितीहि छळ केला तरी तो सोसून समाजांत राहण्यांतच आपले हित आहे, असें त्याला वाटतें; कारण राजा पराक्रमी असतो व तो प्रजेचें संरक्षण करतो.
 ज्याच्या अंगीं धैर्य, शौर्य, चातुर्य, इत्यादि गुण असतात तोच राजा होतो. लोक त्याला खूप मान देऊ लागतात व स्वार्थसाधु स्तुतिपाठक त्याला देवच म्हणू लागतात. हळूहळू राजाहि स्वतःला देव मानूं लागतो. तो निरंकुश असल्यामुळे लोक त्याचा जुलूम सहन करतात. त्यामुळे तो अधिकच जुलमी होतो. दुबळी प्रजा त्यांचा प्रतिकार करूं शकत नाही; पण मोठमोठ्या सरदार-कुळांवर जर राजाने जुलम केला व तो असह्य झाला, तर तीं कुळें प्रतिकारास सिद्ध होतात आणि प्रजेच्या मदतीने राजाविरुद्ध उठाव करतात. अशा संघर्षांत सरदारांचा जय झाला, तर राजसत्ता नष्ट होऊन तिच्या जागीं सरदार-कुळांची सत्ता स्थापन होते. कालांतराने हे सरदारहि सत्तेमुळे मदांध होऊन प्रजेवर जुलूम करूं लागतात. तो जुलूम असह्य झाला व लोक संघटित होऊं शकले, तर ते सरदारांची सत्ता नष्ट करून स्वतःची सत्ता स्थापन करतात,
 अशा प्रकारे राजसत्ता नष्ट होऊन तिच्या जागीं लोकांची सत्ता प्रस्थापित व्हायची असेल, तर त्यासाठी लोकांच्या ठायीं तेवढें सामर्थ्य असलें पाहिजे. प्रबळ राजसत्ता किंवा सरदारांची सत्ता उलथून टाकण्यांत युरोपांतील लोक यशस्वी झाले आहेत; पण आम्ही हिंदु लोक किंवा मुसलमान, चिनी यांच्यांत तें सामर्थ्य नाही. त्यामुळे जुलूम असह्य झाला की ते थोडीशी धडपड करतात; आणि फिरून गुलामगिरी पत्करतात. अज्ञान, अंधश्रद्धा, तर्कशून्य बंधनें यांमुळे हे समाज दुबळे झाले आहेत. त्यांना पाश्चिमात्य ज्ञानामृत पाजून त्यांच्यांत प्रथम चैतन्य आणलें पाहिजे, अशी आगरकरांची धारणा होती. म्हणून त्या वेळच्या लोकनेत्यांना त्यांनी बजावलें आहे की, "ज्या उपायांनी राजसत्ता लोकांच्या हातीं येईल ते आपण करीत असलों म्हणजे आपले कर्तव्य झालें, असें समजून स्वस्थ बसतां कामा नये; तर ज्या उपायांनी राजसत्ता (स्वराज्य) प्राप्त झाली असतां तिचें संरक्षण व तिचा सदुपयोग करतां येईल, असें शिक्षण त्यांस अगोदर दिलें पाहिजे."
 अनियंत्रित राजसत्ता म्हणजे जुलूम, जबरदस्ती, सक्ति. यालाच आगरकरांनी बलात्कार म्हटलें आहे. अशी राजसत्ता जाऊन तिच्या जागीं लोकांची सत्ता येणें याचाच अर्थ बलात्काराकडून संमति तत्त्वाकडे वाटचाल होणें असा आहे. व्यक्ति- स्वातंत्र्य ही याच्याच पुढची पायरी होय.
सामाजिक
 सामाजिक व्यवहारांतहि बलात्काराकडून म्हणजे सक्तीच्या तत्त्वाकडून संमति-तत्त्वाकडे मार्गक्रमण चालू आहे. "आमचें काय होणार" या लेखांत आगरकर म्हणतात. "जों जो मनुष्यांची सुधारणा होत जाते तों तों त्यांच्या अन्योन्य व्यवहारांतील बलात्काराचें तत्त्व लयास जाऊन त्याच्या जागीं संमति-तत्त्व प्रस्थापित होतें, व या कारणास्तव येथून पुढे राजा व प्रजा, कुलाधिपति व कुलावयव, पति व पत्नी, मातापितरें व अपत्यें स्वामी व सेवक, गुरु व शिष्य, विक्रेता व ग्राहक यांतील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होतां संमतिपूर्वक होत जाणार आहेत."
 मनुष्याचें शरीर व समाज यांच्यांत बरेंच साम्य आढळतें. समाजाला शरीराची व त्यांतील व्यक्तींना अवयवांची उपमा नेहमी दिली जाते. ज्याप्रमाणे शरीराचे निरनिराळे अवयव वेगवेगळी कामे करीत असले तरी, ते एकमेकांवर अवलंबून असतात व एकमेकांना मदत करीत असतात; त्याचप्रमाणे समाजाचे अवयव म्हणजे व्यक्ति एकमेकांवर अवलंबून असतात व एकमेकांना मदत करीत असतात. शरीराचे अवयव असें सहकार्य न करतील तर शरीर व्यापार चालणार नाहीत; तसेच व्यक्तींच्या सहकार्यावांचून समाजव्यवस्था टिकणार नाही, हें खरें आहे.
 पण समाज व मानवी शरीर यांच्या रचनेंत फार फरक आहे. समाजांतील प्रत्येक व्यक्तीला मन असतें, वेगळें ज्ञान असतें, संवेदना असते, स्वतःची इच्छा असते. त्यामुळे व्यक्तीला स्वतंत्रपणें सुखदुःखाचा अनुभव घेता येतो. तसें शरीरांतील अवयवांचें नसतें. त्या प्रत्येक अवयवाला वेगळें मन नसतें, व त्यासर्वांचे व्यापार त्या व्यक्तीच्या सुखासाठी चालू असतात. व्यक्तीचें जें सुख तेंच तिच्या अवयवांचें सुख होय; पण समाज हा काल्पनिक पुरुष आहे. म्हणून हें ध्यानांत ठेवले पाहिजे की, समाजाचें कल्याण म्हणजे त्याच्या अवयवांचें, त्यांतील व्यक्तींचें कल्याण होय; तेव्हा समाजाच्या हितासाठी व्यक्तीच्या सुखाचा बळी दिला तरी चालेल असें म्हणणें भ्रामक आहे, कारण व्यक्तींच्या हिताहून निराळें असें समाजाचें हित नसतें.
 तथापि बरेच पंडित, समाजाच्या हितासाठी व्यक्तींच्या हिताकडे दुर्लक्ष केलें तरी चालेल, असें मानतात. त्यांच्या म्हणण्याचा खरा भावार्थ असा असतो की, समाजांतील कांही लोकांच्या कल्याणासाठी इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष करावें लागतें. देशाच्या राजाचें किंवा वरिष्ठ वर्गाचें जें कल्याण तें साऱ्या समाजाचें कल्याण असाहि अर्थ कांही लोक करतात. ज्या समाजांत अशा संकुचित दृष्टीने वर्तन होत असतें, त्यांत एक सत्ताधारी, श्रीमंत वर्ग व दुसरा हीन दीन, दलित वर्ग, अशी विभागणी झालेली असते. ही विषमता नष्ट होऊन सर्वांना शक्य तितकें समान सुख मिळणें हें समाजाच्या सुधारणेचें व प्रगतीचे लक्षण होय. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत बहुतेक व्यवहार बलात्काराने होत असतात; आणि म्हणून त्याच्या सर्व अवयवांस सुखाचा सारखा वांटा मिळत नाही. तो मिळू लागल्यास ते व्यवहार समाजघटकांच्या अन्योन्य संमतीने होऊं लागले पाहिजेत. पाश्चात्त्य जगांत सध्या हें घडूं लागलें आहे. म्हणजेच संमति-तत्त्व प्रस्थापित होऊं लागलें आहे.
 त्यानंतर आगरकरांनी पति-पत्नीसंबंधाचा विचार केला आहे. त्यांच्या मतें पाश्चिमात्य देशांतील गृहस्थिति व विवाहप्रथा अगदी निर्दोष नसली तरी, भारतीय विवाहपद्धतीपेक्षा पुष्कळ चांगली व अनुकरणीय होती. हिंदुस्थानांत पूर्वी तीन लग्नपद्धति चालू होत्या. पुरुषांनी स्त्रियांना जिंकून किंवा पळवून आणून त्यांच्याशी लग्न करणें ही एक प्रथा; बापाकडून मुली विकत घेणें ही दुसरी; व स्त्री-पुरुषांनी एकमेकांना पसंत करून लग्न करणें ही तिसरी होय. पहिली प्रथा आदिवासी लोकांत अजूनहि थोडीबहुत आढळते. दुसरी पद्धत देशांत सर्वत्र चालू आहे. तिसरी मात्र आज अनेक शतके आपल्याकडे चालू नाही. वधूला वर व वराला वधू पसंत पडून त्यांचा विवाह होणें हा प्रशस्त प्रकार केवळ पुराणांत व संस्कृत नाटकांत वाचायला मिळतो. पूर्वी स्वयंवराची चाल होती, पण ती आता मुळीच रूढ नाही. पूर्वी केव्हा तरी एका स्त्रीने अनेक पति करण्याची चालू होती, असें द्रौपदीच्या उदाहरणावरून दिसतें. बहुभार्यात्व तर या देशांत अजूनपर्यंत चालू आहे. यावरून आमच्याकडे स्त्री- पुरुषसंबंध बलात्कार-तत्त्वावर चालत होते हे सिद्ध होतें. संमति तत्त्वास अनुसरून विवाह होऊ लागले म्हणजे एकपत्नीकत्वच स्थापित झालें पाहिजे. बालविवाहाची प्रथा म्हणजे लहान मुलामुलींचा विक्रय करण्याचा हक्क आईबापांना असतो याचेंच चिन्ह होय. विषमविवाह, स्त्रीचें दास्य, इत्यादि गोष्टी अत्यंत शोचनीय असून, त्यांत बलात्काराचा पुष्कळ भाग आहे. पाश्चात्त्य लोकांत ज्याप्रमाणे परस्परांच्या संमतीने विवाह होतात व एकपत्नीकत्व रूढ झालें आहे, तसें आपल्याकडे व्हायला हवें. आणि नवीन शिक्षणामुळे बलात्कारतत्त्व मागे पडून त्या जागीं संमति तत्त्व स्थापित होईल अशीं चिन्हें आगरकरांना दिसूं लागलीं होतीं.
 त्यानंतर आगरकरांनी कुटुंबसंस्थेचा विचार केला आहे. भारतांत प्राचीन काळी श्रेष्ठायत्त कुटुंब पद्धति प्रचलित होती. त्या पद्धतींत कुलपतीचा म्हणजे कुटुंबप्रमुखाचा अधिकार फार मोठा असे. कुटुंबांतील सर्व माणसांवर त्याची अनिर्बंध सत्ता चालत असे. त्यांतील कोणीहि मिळविलेल्या धनाची व्यवस्था करण्याचा अधिकार त्याला होता; कोणालाहि तो हवी ती शिक्षा करूं शकत असे. म्हणजे कुटुंब-व्यवस्था बलात्कार-तत्त्वाने चालत होती.
 अशा प्रकारची श्रेष्ठायत्त कुटुंब व्यवस्था आर्य लोकांत सुरू होण्यापूर्वी त्यांची अवस्था पारध करून जगणाऱ्या वनचरांप्रमाणे असली पाहिजे. तशा अवस्थेत आयुष्य कंठणाऱ्या लोकांत श्रेष्ठायत्त कुटुंब पद्धतिहि आढळत नाही. ते लोक पशुपालन करूं लागले म्हणजे मग ती पद्धति त्यांच्यांत सुरू होते. पाळलेल्या गुरांची जोपासना संरक्षण, गवतचाऱ्याची व्यवस्था, दूधदुभतें वगैरे कामें कुटुंबांतील निरनिराळ्या माणसांकडे सोपविलेलीं असतात; आणि तीं नीटपणे करून घेण्यासाठी मुख्य माणसाला सर्वांवर अधिकार गाजवावा लागतो. इतर कुटुंबांशी भांडण व मारामारी करण्याचा प्रसंग आला तर तोच पुढाकार घेतो. पुढे तेच लोक शेती करूं लागले तरी तीच कुंटुंब-पद्धति त्यांच्यांत चालू राहते. त्यानंतर समाज व्यापार व उद्योगधंदे करू लागतो. या अवस्थांतराबरोबरच समाजाची सुधारणा होत असते. त्यामुळे कुटुंब- व्यवस्थेंतहि बदल होत जातो; आणि सर्व व्यवहार संमति-तत्त्वावर होऊं लागतात.
 आपल्या काळी हिंदु समाजांत रूढ असलेल्या धर्मकल्पना, सामाजिक रूढि व आचार यांचें मूळ कशांत आहे व त्या कल्पनांना व आचारांना कवटाळून बसणें किती असमंजसपणाचें आहे तें लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आगरकरांनी धर्म, राजकारण व रूढ सामाजिक आचार यांची ही ऐतिहासिक चिकित्सा केली आहे. आपले सर्व आचार परमेश्वरप्रणीत आहेत व भावी उत्कर्ष त्यामुळेच होणार आहे हा भ्रम नाहीसा व्हावा व लोक, सुधारणेला, पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांच्या स्वीकाराला, उद्युक्त व्हावे हा त्यामागील हेतु होता. हीं तत्त्वें विशिष्ट काळापुरतींच नसून, मनुष्यसुधारणेची सर्व इतिहासांत दिसून येणारी तत्वें तीं हींच आहेत, हा सिद्धान्तहि त्यांनी या उद्देशानेच मांडला. यायोगे आपली धर्मव्यवस्था, समाजरचना, कुटुंबसंस्था व विवाह संस्था यांतील बलात्कार-तत्त्व नष्ट होऊन सर्वन संमति-तत्त्व स्वीकारले जाईल अशी त्यांना आशा होती.




-४-

सुधारणा - अग्रक्रम व मार्ग


 मानवी समाजांत सर्वच क्षेत्रांत स्थित्यंतर झालें पाहिजे, त्यावांचून समाजाची उन्नति होणार नाही, असा सिद्धान्त सांगून आगरकरांनी त्या स्थित्यंतराची मूलतत्त्वें कोणती यांची सविस्तर चर्चा केली; तिचा परामर्श आपण मागील प्रकरणांत घेतला. आता सुधारणांच्या अग्रक्रमाविषयी त्यांचीं काय मतें होतीं याची चर्चा करावयाची आहे.
सर्वांगीण सुधारणा
 पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे भारतांत मन्वंतर कसें झालें तें आपण मागे पाहिलें आहे. राजा राममोहन राय, लोकहितवादी, रानडे, वगैरे सुधारणावादी पुरुषांनी तें घडवून आणले. त्यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार केला होता. केवळ सामाजिक व धार्मिक सुधारणा होऊन भागणार नाही, राजकीय व आर्थिक सुधारणाहि व्हायला हव्या, असें त्यांनी प्रतिपादिले आहे. लोकहितवादींनी तर एका पत्रांत हिंदी पार्लमेंटची स्थापना करावी असे सुचविलें आहे. गेल्या शतकांत स्थापन झालेल्यां 'बाँबे असोसिएशन', 'ब्रिटिश इंडिया असोसिएशन', 'मद्रास नेटिव्ह असोसिएशन' इत्यादि संस्था राजकीय सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठीच होत्या.
 तथापि त्या सुधारणावादांत राजकीय सुधारणेला दुय्यम स्थान होतें, तिचें स्वरूप प्राथमिक होतें. तिच्या पुरस्कर्त्यांच्या मनांत स्वराज्याची कल्पनाहि नव्हती. इंग्रजी राज्य म्हणजे परमेश्वरी योजनाच आहे, असें त्यांना वाटत होते. त्यांतच समाजाचें कल्याण होईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांवर विशेष भर दिला. त्या सुधारणासुद्धा इंग्रजांकडूनच घ्यायच्या, त्यांचेच अनुकरण करून समाजाला नवें वळण लावायचे, असाचे सुधारणावाद्यांचा विचार होता. ते इंग्रजांना आपले गुरु व पालक मानीत होते; कारण पाश्चात्त्य विद्येमुळेच त्यांना सुधारणेचा मार्ग दिसूं लागला होता.
विष्णुशास्त्री
 पण इंग्रजी राज्याचें रूप हळूहळू पालटू लागलें. दुष्काळ, हलाखी, बेकारी, या संकटांनी सारा देश ग्रस्त झाला. त्यामुळे तत्कालीन तरुणांना त्यांतील ईश्वरी योजनेचें सूत्र दिसेनासें झालें. उलट पारतंत्र्य ही एक महान् आपत्ति आहे असें त्यांना वाटू लागलें व इंग्रज हे आपले गुरु व पालक नसून या राष्ट्राचे शत्रु आहेत अशी त्यांची खाती होऊ लागली. तरुणांची ही भावना स्पष्टपणें व निर्भीडपणें व्यक्त करून लोकांमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत करणारा पहिला नेता म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हा होय. त्यांनी महाराष्ट्रीयांच्या मनांत स्वत्वजागृति कशी केली याचें सविस्तर विवेचन आपण पूर्वी केलेच आहे. ही जागृति करतांना त्यांनी पारतंत्र्यामुळेच आपले वैभव व सुख नष्ट झाले असून, परकीय सत्ता हेंच आपल्या दैन्याचें मुख्य कारण होय, असें ठामपणे प्रतिपादिले; आणि प्रथम स्वराज्य मिळविलें तरच देशाची उन्नति होईल हा विचार प्रस्थापित केला; आणि यांतूनच सुधारणांच्या अग्रक्रमाविषयी प्रथम महाराष्ट्रांत आणि नंतर सर्व भारतांत वाद निर्माण झाला. विष्णुशास्त्री सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या विरुद्ध नसले तरी त्यांचा आत्मीयतेने त्यांनी पुरस्कार कधी केला नाही. उलट त्या सुधारणांचा आग्रह धरणारांचा त्यांनी सदैव उपहासच केला. कारण पारतंत्र्य हेंच आपल्या अधोगतीचें मूळ कारण आहे, असें त्यांना वाटत होतें. आगरकरांचें मत बरोबर याच्या उलट होतें. सामाजिक व धार्मिक क्षेत्रांत आपले तत्त्वज्ञान व आचार-विचार अत्यंत प्रतिगामी व घातक असल्यामुळेच आपली अवनति झाली व त्यामुळेच आपल्याला पारतंत्र्य आलें असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता. विष्णुशास्त्री यांना ते येऊन मिळाल्यानंतर एक- दोन वर्षांतच विष्णुशास्त्री यांचा काळ झाला. त्यामुळे त्यांच्यांतील मतभेद विकोपाला गेले नाहीत. नाही तर ते गेलेच असते. लोकमान्य टिळकांशी त्यांचें पुढे वितुष्ट आलें हें प्रसिद्धच आहे. याची सविस्तर चर्चा पुढे येईलच. येथे एवढेच ध्यानांत घ्यावयाचें की, सुधारणांचा अग्रक्रम हा विषय त्या वेळीं अत्यंत महत्त्वाचा होता. भारताच्या नेत्यांमध्ये दुफळी व्हावी इतकें त्याला त्या वेळीं महत्त्व होतें.
 याच सुमाराला काँग्रेसची स्थापना झाली व 'आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा' या वादाचें लोण तेथेहि पोचलें. काँग्रेस ही प्रामुख्याने राजकीय सुधारणांसाठीच स्थापन झाली होती. त्यामुळे तिच्या व्यासपीठावरून राजकीय सुधारणांचा पुरस्कार व्हावा हें साहजिक होतें; पण तिच्यांतील बहुतेक लोक सामाजिक सुधारणांचा उपहास करीत हें आज विचित्र वाटतें. किती मुलींचे प्रौढविवाह झाले म्हणजे, किंवा किती विधवांचे विवाह झाल्यावर सरकार लोकांना राजकीय हक्क देईल, असें ते चेष्टेने विचारीत.
तिचें धोरण
 एकंदर काँग्रेसची वृत्ति अशी असली तरी न्यायमूर्ति रानडे यांच्यांसारखे विचारी लोकहि काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राजकीय सुधारणांबरोबर सामाजिक सुधारणांचाहि पुरस्कार केला; पण काँग्रेसमध्ये ती चळवळ न आणतां त्यांनी त्यासाठी स्वतंत्र अशी सामाजिक परिषद् ही संस्था स्थापन केली. काँग्रेसतर्फे सामाजिक सुधारणांची चळवळ न करण्याचें कारण उघड होतें. काँग्रेसमध्ये हिंदु मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादि सर्व धर्मांचे लोक होते, व त्या प्रत्येक धर्माच्या अनुयायांचे सामाजिक प्रश्न वेगळे होते. बालविवाह, विधवाविवाहबंदी हे प्रश्न खिश्चन समाजांत नव्हते. पारशी, ख्रिश्चन या समाजांत स्त्री-शिक्षणाला तसा विरोध नव्हता. मुस्लिम समाज या सर्व दृष्टींनी फार मागासलेला होता, पण सामाजिक सुधारणेचें त्याला हिंदूंपेक्षाहि जास्त वावडें होतें. शिवाय दुसरें असें की, एका धर्माच्या सभासदाने अन्य धर्माच्या धार्मिक वा सामाजिक दोषांवर टीका करणें व त्यांत सुधारणा सुचविणें हें कोणालाच सहन झाले नसतें. स्वधर्मीयाने केलेली धार्मिक आचारावरची टीकाहि तेव्हा कोणाला रुचत नव्हती, मग अन्यधर्मीयांची टीका कशी रुचणार? पण काँग्रेसमध्ये तो विषय आल्यावर तशी टीका होणे अपरिहार्यच होतें. म्हणून राजकीय व आर्थिक विषयांखेरीज अन्य कोणतेहि विषय काँग्रेसमध्ये आणूं नयेत असा विचार सर्वांनीच संमत केला.
वादाचे स्वरूप
 पण काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणांचा प्रश्न आणला नाही तरी ती चळवळच करूं नये हें पुष्कळांना मान्य नव्हतें व त्यांनीच वर सांगितल्याप्रमाणे सामाजिक परिषदेची स्थापना केली होती; आणि प्रारंभी काँग्रेसच्या मंडपांतच त्या परिषदेचें अधिवेशन भरत असे; पण त्यांतहि पुढे विरोध होऊं लागला. कारण सामाजिक सुधारणेला मुळांतच विरोध असणारा एक पक्ष त्या वेळीं निर्माण झाला होता. त्या पक्षाचीं मतें व विचारसरणी यांचें विवेचन मागे केलेलेच आहे.
 यांतच आणखी एका वादाची भर पडली. मलबारीशेठ या पारशी गृहस्थाने बालविवाह व असंमत वैधव्य या हिंदु सामाजांतील रूढि कायद्याने बंद कराव्या, असा पक्ष मांडला व तशी चळवळहि सुरू केली. याची सतानत हिंदूंना दोन कारणांनी चीड आली. एका परधर्मीय गृहस्थाने आपल्या सामाजिक बाबतींत हस्तक्षेप करावा हें त्यांना सहन झाले नाही; आणि कायद्याने समाजसुधारणा करावी हेहि त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे मूळ वादाला आणखी फाटे फुटले व उभय पक्षांत अत्यंत कटुता निर्माण झाली.
 आगरकरांचा राजकीय सुधारणांना विरोध नसला तरी सामाजिक सुधारणा मागे पडाव्या हें त्यांना मान्य नव्हतें. सामाजिक सुधारणा झाल्यावांचून राजकीय सुधारणांना अर्थच प्राप्त होणार नाही, असें त्यांचें ठाम मत होतें. मागे आपल्याला राजकीय स्वातंत्र्य होते; पण सामाजिक व धार्मिक स्थिति असावी तशी नव्हती म्हणून तें स्वातंत्र्य गेलें, असें अनेक लेखांत त्यांनी म्हटल्याचे वर सांगितलेच आहे. शिवाय कायद्याने सामाजिक सुधारणा करण्यास त्यांचा मुळीच विरोध नव्हता. इतकेंच नव्हे तर कांही रूढि कायद्याच्या साह्यानेच तत्काळ नष्ट केल्या पाहिजेत, असें त्यांचें मत होतें. यामुळे सामाजिक सुधारणा आधी झाल्या पाहिजेत या पक्षाच हिरिरीने पुरस्कार करण्यासाठी त्यांनी लेखणी उचलली व आपल्या सर्व सामर्थ्यानिशी प्रतिपक्षावर हल्ला केला. या वादासंबंधी 'सुधारकां'त त्यांनी अनेक लेख लिहून विरुद्ध पक्षाचें खंडन व स्वमताचें मंडन केलें.
 विरुद्ध पक्षाचें मत असें होतें की, आपण आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे. स्वातंत्र्य हे सर्वांनाच प्रिय असल्यामुळे ते मिळविण्याच्या बाबतींत लोकांमध्ये मतभेद असण्याचा संभव नाही. त्यामुळे सर्व लोक संघटितपणें तसा प्रयत्न करतील, असें त्या पक्षाच्या पुढाऱ्यांना वाटत होतें. सामाजिक सुधारणांच्या बाबतींत मान मतभेदाला बरीच जागा होती; किंबहुना सुधारणेला विरोध करणारेच फार लोक होते. त्यामुळे समाजांत कलह उत्पन्न होऊन, स्वातंत्र्यासाठी जे संघटित प्रयत्न व्हायला हवेत ते होणार नाहीत असें भय त्या पक्षाला वाटत होतें. म्हणून सामाजिक सुधारणेच्या मागे न लागतां आधी एकदिलाने स्वातंत्र्यासाठी चळवळ केली पाहिजे असें त्यांचे मत होतें.
तीन पक्ष
 या प्रश्नाविषयी अनेक निरनिराळीं मतें प्रचलित होतीं. शरीराच्या अवयवांचे दृष्टान्त त्या त्या मतांच्या पुष्टीसाठी सांगितले जात. कांही लोकांचें असें म्हणणें होतें, की शरीराचे व्यापार नीट चालण्यासाठी ज्याप्रमाणें मेंदूचें कार्य व्यवस्थित चालायला हवें, त्याप्रमाणे समाजशरीर नीट चालण्यासाठी त्याच्या मेंदूच्या जागी असणारी राज्यव्यवस्था चांगली असायला हवी; म्हणून राजकीय सुधारणा प्रथम हातीं घेतली पाहिजे. दुसऱ्या कांही लोकांच्या मतें शरीराचें आरोग्य हृदयाच्या बळकटीवर अवलंबून असतें आणि धर्म म्हणजे समाजपुरुषाचें हृदयच होय; म्हणून समाजाच्या स्वास्थ्यासाठी धर्मसंशोधन हे आपले आद्य कर्तव्य होय. आणखी कांही लोकांचें म्हणणें असें की, शरीरांत पचनेंद्रियांचें स्थान श्रेष्ठ आहे, अन्नाचे पचन होऊन सर्व शरीराचें पोषण करणारा द्रव उत्पन्न होतो तो पचनेंद्रियामुळे, आणि समाजरूपी शरीरांत तेंच महत्त्वाचे कार्य गृहाचार किंवा कुटुंबव्यवस्था करीत असते. कुटुंबव्यवस्था जितकी चांगली असेल तितकी समाजव्यवस्थाहि चांगली राहते; म्हणून प्रथम कुटुंबस्थिति सुधारली पाहिजे. अशा प्रकारे कोणी राजकीय, कोणी धार्मिक, तर कोणी सामाजिक सुधारणेला अधिक महत्त्व देतात. न्या. तेलंग यांनी सामाजिक सुधारणेच्या अगोदर राजकीय सुधारणा झाली पाहिजे, असें प्रतिपादिलें होते. युरोपांतले बरेच विद्वान् त्याच मताचे होते. उलट धर्मसुधारणा अधिक महत्त्वाची मानणारेहि पुष्कळ पंडित तिकडे होते. त्यांच्या मतें सोळाव्या शतकांत युरोपांत जी धर्मक्रांति झाली, तिच्यामुळेच तो देश विलक्षण सुधारला, त्या धर्मक्रांतीसाठी अनेक विचारी पुरुषांनी पुष्कळ यातना भोगल्या, पण आपला निश्चय ढळू दिला नाही. त्यांच्या त्या दृढ निश्चयामुळेच अलीकडील बहुतेक राजकीय. सुधारणा झाल्या आहेत.
 या तीन पक्षांत आगरकरांना मान्य असा पक्ष म्हणजे गृहसुधारणा ज्यांना सर्वश्रेष्ठ वाटते अशा विद्वानांचा. त्यांच्या मतें कुटुंबे म्हणजे राष्ट्राचे मुख्य घटक असल्यामुळे त्यांची सुधारणा झाल्यावाचून राष्ट्राची सुधारणा किंवा राजकीय सुधारणा होणें शक्य नाही. आगरकरांना ही विचारसरणी मान्य होती ते म्हणतात, 'ज्या देशांतील कुटुंबांत गुलामगिरी व क्रौर्य यांचा अंमल जारीने गाजत आहे, त्या देशांतील राज्यपद्धतीत ते दुर्गुण पूर्णपणे प्रतिबिंबित झालेच पाहिजेत व त्यामुळे त्या राष्ट्रास विकलता आलीच पाहिजे." त्यांच्या मतें हिंदुस्थानांतली सामाजिक व धार्मिक स्थिति चांगली नव्हती म्हणूनच समाज दुर्बल झाला व त्याचें स्वातंत्र्य नष्ट झालें.
पारतंत्र्य अनुकूल
 सामाजिक सुधारणेला आगरकरांनी अग्रक्रम दिला त्याचे आणखी एक कारण हें की, त्यांच्या मतें पारतंत्र्य हें अशा सुधारणांना जितकें अनुकूल असतें, तितकें स्वातंत्र्य नसतें. परकीय सरकार या देशांतील सामाजिक व धार्मिक सुधारणांविषयी उदासीन असतें; सुधारकांना तें प्रोत्साहन देत नाही किंवा विरोधहि करीत नाही. राजकीय सुधारणांच्या बाबतींत मात्र तें जागरूक असतें; आणि प्रसंग पडेल तेव्हा त्यांना कसून विरोध करतें. स्वतंत्र देशांतील राज्यकर्ते व प्रजा यांचा धर्म एकंच असल्यामुळे सरकारी अधिकारी सामाजिक व धार्मिक सुधारणांना बहुधा प्रतिकूल असतात; बहुतेक अधिकारी जुन्या मतांनाच अनुकूल असतात. त्यामुळे स्वतंत देशांत नवीन विचार प्रसृत करणें व नवे आंचार रूढ करणें फार कठीण असतें.
 पण गेल्या शतकांत भारताच्या समाजस्थितीसंबंधी इंग्रजांनी जें धोरण अवलंबिलें होतें, त्यावरून आगरकरांचे वरील मत बरोबर दिसत नाही. पाश्चात्त्य विद्यांचा भारतांत प्रसार होऊन येथील लोकांची सामाजिक उन्नति व्हावी यासाठी कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. ते कौटुंबिक व स्त्रीविषयक सुधारणांना अनुकूल होते. सतीची चाल इंग्रजांनीच बंद केली; पण जातिभेद, अस्पृश्यता, उच्चनीचत्व, हे सामाजिक दोष नाहीसे करणें इंग्रजांच्या हिताचे नसल्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न केला नाही; उलट ते वाढवण्याचाच प्रयत्न केला. फोडा व झोडा हीच त्यांची नीति होती. हिंदु समाजांतील भेद जेवढे विकोपाला जातील तेवढे त्यांना हवे होते. हिंदु- मसलमानांचे दंगे होऊन, त्यांची एकजूट होणें अशक्य ठरांवें अशीच त्यांची इच्छा होती. देशांतील जनतेंत जितकी यादवी वाढेल तितकें तिच्यावर राज्य करणें सोपें जाईल, असा त्यांचा हिशेब होता. त्यामुळे ते सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतींत उदासीन होते, असें म्हणतां येणार नाही.
 दुसरे असे की, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, जपान इत्यादि देश स्वतंत्र असूनहि त्या देशांतील सामाजिक व धार्मिक सुधारणांना राज्यकर्त्यांनी विरोध केला नाही. तेव्हा या सुधारणांना स्वातंत्र्य प्रतिकूल असतें व पारतंत्र्य अनुकूल असतें, हें खरें नाही.
अधिकार नाही
 राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा कां केल्या पाहिजेत, हें सांगतांना आगरकर म्हणतात की, राजकीय सुधारणा मागण्याचा आपल्याला हक्कच नाही; कारण आपण स्त्री, शूद्र व अस्पृश्य यांना हीन लेखतों. त्यांच्या जीवनावर आपण असंख्य निर्बंध लादले आहेत, म्हणजे त्यांना दास्यांत ठेवलें आहे, हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे. स्वतःच्या बांधवांवर अन्याय करणाऱ्यांना दुसऱ्याजवळ न्याय मागण्याचा अधिकार नाही. महाराची सावली पडली असतांहि विटाळ मानणारे लोक "रंगावर कांही मनुष्याची पात्रापात्रता ठरत नाही," असें उच्चरवाने प्रतिपादून गोऱ्या लोकांसारखा दर्जा आपल्याला मिळावा, असें म्हणू लागले, तर त्याला कोणीहि किंमत देणार नाही. गोऱ्या लोकांकडून समान वागणूक मिळायला हवी असेल तर आपणहि अस्पृश्यांना समानतेने वागवलें पाहिजे. याचाच अर्थ असा की, सामाजिक सुधारणा आधी केल्या पाहिजेत.
खरे मत
 राजकीय सुधारणांच्या आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत असा जरी आगरकरांचा आग्रह असला, तरी सर्व सुधारणा एकदमच व्हाव्या, असें त्यांचें खरें मत होतें. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत त्याचे राजकीय, सामाजिक व धार्मिक आचार फारसे भिन्न नसतात. त्या सर्व प्रकारच्या आचारांची सुधारणा होत जाते तेव्हाच तो समाज सुधारला, असें म्हणतां येतें. विकसित अवस्थेतल्या समाजांत राजकीय, सामाजिक व धार्मिक असे भिन्न भिन्न आचार व नियम असले, तरी ते केवळ व्यवस्थेसाठी असतात. त्या सर्वांची एकसमयावच्छेदेकरून सुधारणा होत जाणें म्हणजेच तो समाज सुधारणें होय. भारतांत पाश्चात्त्य विद्येचा प्रसार झाल्यामुळेच सुधारणेचे वारे वाहूं लागलें. राजकीय सुधारणांसाठी राष्ट्रसभेची स्थापना झाली, तशी सामाजिक सुधारणांसाठी सामाजिक परिषद् अस्तित्वांत आली; पण जुन्या मताच्या लोकांना राष्ट्रसभेचें राजकीय कार्य जसें मान्य होतें, तसें सामाजिक परिषदेचें कार्य पसंत नव्हतें. रानडे, तेलंग प्रभृति नेत्यांना पाश्चात्त्य ज्ञानामुळे सर्वांगीण सुधारणेची महती पटली होती, आणि ते राजकीय सुधारणेप्रमाणेच सामाजिक सुधारणांचाहि पुरस्कार करीत होते. पण जीर्णमतवादी लोक त्यांच्या सामाजिक सुधारणांविषयक विचारांची टवाळी करीत. आगरकरांनी अशा लोकांची गणना मूर्खात केली असून, त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांनी कितीहि असंबद्ध बडबड वा टवाळी केली, सामाजिक सुधारणेला कितीहि विरोध केला तरी क्रांति अटळ आहे. ते म्हणतात, "हिंदुधर्मविचारांत आणि सामाजिक आचारांत जेवढें कांही खरोखर निर्दोष आहे त्याला कशाचीहि भीति नाही; पण जें कांही सदोष व अहितकारक आहे तें सारें पाश्चिमात्य ज्ञानकुंडांत जळून खाक होणार."
 सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे, असा पक्ष अत्यंत हिरिरीने आगरकरांनी मांडला असला तरी तितक्याच हिरिरीने त्यांनी "राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजेत," असाहि पक्ष मांडला आहे. 'फेरजमाबंदी व लष्करी खर्च' या सुधारकांतील लेखांत (निबंधसंग्रह भाग ३ रा, पृ. ११५-१६) "सामाजिक सुधारणांपेक्षाहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत; म्हणून राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या आधी झाल्या पाहिजेत. वास्तविक सुधारणांचा असा क्रम असतांना सरकार त्याचा व्युत्क्रम (उलटापालट) करूं पाहत आहे, (व आमची दिशाभूल करीत आहे,)" असें निःसंदिग्ध प्रतिपादन त्यांनी केलें आहे. आचार्य जावडेकर यांनी 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत वरील लेखांतील प्रदीर्घ उतारा देऊन (पृ. १५०- १५१) त्याविषयी विवेचनहि केलें आहे.
बुद्धिपुरस्सर
 या सर्व सुधारणा बुद्धिपुरस्सर केल्या पाहिजेत, असा आगरकरांचा आग्रह होता. कारण त्या सहजगत्या, कालौघाने होणार नाहीत, असें त्यांचें मत होतें. पाश्चात्त्य शिक्षण, लोकसंख्येंतील वाढ, प्रवास इत्यादि कारणांमुळे कांही थोडे बदल आपोआप घडून आले असले तरी, ते चिरस्थायी होण्याचा संभव नसतो; आणि महत्त्वाच्या सुधारणा अशा प्रकारे आपोआप होतहि नाहीत. परिस्थितीच्या प्रभावाने जें होईल तें पत्करणें यांत कांही पुरुषार्थ नाही; तर प्रयत्नपूर्वक वर्तनांतर घडवून आणण्यांत भूषण आहे. म्हणून आगरकरांनी तरुण सुशिक्षित लोकांना अशी विनंती केली आहे की, "तुम्ही कालावर व वस्तुस्थितीवर अवलंबिणें पुरे करून, ज्या सुधारणा तुम्हांस अत्यंत आवश्यक अशा वाटत आहेत त्या करण्याविषयी बुद्धिपूर्वक प्रयत्न करण्यास लागलें पाहिजे. जे लोक असें करीत नाहीत ते हळूहळू दैववादी बनून निरुद्योगी होत्साते क्षीण होत जातात व शेवटीं समूळ नष्ट होतात."
 तरुणांना असें आवाहन करण्याचें कारण हे होतें की, या देशांत असमता वाढत चालली होती; तिची परमावधि होऊन समाजाची दुर्दशा होण्यापूर्वीच तिला आळा घालणें आवश्यक आहे, असें आगरकरांना वाटत होते. वृद्ध किंवा जुन्या मतांच्या लोकांच्या हातून हें कार्य होणें शक्य नव्हतें; कारण त्यांचा सर्व सुधारणांना विरोधच असतो; म्हणून तरुणांनी हें कार्य अंगावर घ्यावें, असें त्यांचे म्हणणें होतें.
कायद्याचे साह्य
 अवश्य त्या सर्व सामाजिक सुधारणा लवकर घडवून आणण्यासाठी कायद्याची कास धरायला मुळीच हरकत नाही, असेंहि आगरकरांचे मत होतें. सर्व कांही काय द्याने होईल असे नाही; शक्यतों लोकांना शिक्षण देऊन त्यांची मनें वळवून सुधारणा करणें हें उत्तम; पण कांही सुधारणा अशा होत्या की, त्या लोकमतावर अवलंबून ठेवणें इष्ट नव्हतें. आगरकर म्हणतात, "लोकांच्या आचारांत जेवढा अत्यंत क्रूरपणाचा व अविचाराचा भाग असेल तेवढा साधेल तर, तीव्र उपायांनी नाहीसा करण्यास हरकत नाही. आमच्यामधील सतीची चाल अशा प्रकारच्या सक्त उपायांनीच बंद करण्यासारखी होती; व आठ-दहा वर्षांच्या पोरींच्या गळ्याभोवतीं विवाहाचे फास घालून त्यांचा आमरण छळ करण्यास प्रवृत्त होणाऱ्या आई-बापांचें मुर्खत्वहि अशाच रीतीने बंद करण्यास कांही हरकत नाही, असें आमचें मत आहे." विधवेच्या केशवपनाची चालहिं क्रूर व जुलमाची असल्यामुळे ती कायद्यानेच बंद करायला पाहिजे, असे त्यांनी म्हटलें आहे.
 लोकशिक्षणामुळे सामाजिक सुधारणा हळूहळू सहजगत्या होतील, त्यासाठी सरकारी कायद्याची मदत घेण्याची आवश्यकता नाही, असें म्हणणारे लोक स्व-मताच्या पुष्ट्यर्थ असाहि युक्तिवाद करीत की, कायदा केल्यामुळे लोकांचें स्वातंत्र्य नष्ट होतें. बालविवाह, केशवपन वगैरे चालींतले दोष शिक्षणामुळे लोकांना कळू लागले असून, लोक आपणहून त्यांत सुधारणा करूं लागले आहेत. तेव्हा आपल्यां सामाजिक व्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करण्याची मुळीच आवश्यकता नाही; त्यामुळे आपले हित न होतां अहितच होईल, असेंहि त्यांचें म्हणणें होतें. पण ज्या हक्कासाठी व स्वातंत्र्यासाठी हे लोक आक्रोश करीत होते, तो हक्क कसला? तर पोटच्या पोरीचें कुंकूं पुसून तिला विद्रूप करण्याचा. आगरकर म्हणतात की, या लोकांना हक्क, स्वातंत्र्य या शब्दांचा अर्थच समजत नाही; त्यांचें बोलणें म्हणजे स्वातंत्र्याच्या शुद्ध वल्गना होत.
 यासंबंधी प्रतिपक्षाला उत्तर देतांना आगरकरांनी असा प्रतिप्रश्न विचारला आहे की, मग सर्वच सुधारणा लोकशिक्षणावर का अवलंबून ठेवीत नाही? समाजांत शिवीगाळ, मारहाण, चोरी, दरोडे, खून इत्यादि गुन्हे सतत घडतात. अज्ञान आहे तोपर्यंत अशा गोष्टी घडणारच. जसजसा शिक्षणाचा प्रसार होत जाईल तसतसे हे अनर्थ नाहीसे होत जातील; म्हणून पोलिस, न्याय वगैरे सर्व सरकारी खाती बंद करून सगळा खर्च शिक्षणासाठी केला म्हणजे झालें. चोरी- गुंडगिरीसाठी कायद्याचा बडगा कशाला हवा! पण हा विचार कोणालाहि मान्य होण्याचा संभव नाही; कारण समाजकंटकांची सुधारणा होईपर्यंत जो त्रास होईल, तो सहन करण्यास कोणीच तयार नसतें. हीच विचारसरणी सामाजिक सुधारणांना लागू करून त्या कायद्याने घडवून आणल्या पाहिजेत, असें आगरकरांचे म्हणणें होतें. अन्याय सहजपणें दूर होत नसेल तर तो सक्तीने, कायद्याने नष्ट करण्यांत अहित नसतें. गुलामांचा व्यापार सरकारने बंद केला तेव्हा कांही स्वार्थी लोकांनी गिल्ला केला; पण तो कायदा हितावहच ठरला. त्याचप्रमाणे वैवाहिक गुलामगिरी लवकर बंद करण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे.
सक्ती अवश्य
 शिक्षणामुळे लोकांचीं मतें बदलून त्यांनी आपण होऊन आपल्या आचार-विचारांत सुधारणा केल्या तर उत्तमच होय; पण असें बहुधा घडत नाही; कारण सर्वांना योग्य शिक्षण मिळतेंच असें नाही; आणि तसें तें मिळाले तरी देखील लोक स्वयंप्रेरणेने कांहीहि करीत नाहीत. इंग्लंड, फ्रान्स इत्यादि सुधारलेल्या देशांतहि समाजाला इतकी प्रगतावस्था प्राप्त झालेली नाही, असा निष्कर्ष आगरकरांनी काढला आहे. त्या देशांत सुद्धा कोणतीहि सुधारणा लोकांवर सक्ती केल्यावांचून झालेली नाही. अशी सक्ती करणारी सत्ता भिन्न भिन्न प्रकारची असेल; पण तिला इष्ट वाटणाऱ्या गोष्टी जबरदस्तीनेच लोकांच्या गळी उतरवाव्या लागतात. त्यामुळे लोकांवर थोडासा जुलूम झाल्यासारखें दिसतें; पण आगरकर म्हणतात की, जुलूम, सक्ती या शब्दांना घाबरण्याचें कांहीच कारण नाही. बालविवाह, विधवांचे केशवपन, सती या दुष्ट रूढींमुळे स्त्रियांवर जो जुलूम होतो, त्या मानाने सरकारची सक्ती कांहीच नाही. अशी सक्ती केल्यावांचून प्रचलित दुष्ट रूढींचा भयंकर जुलूम थांबणार नाही. कारण लोक निष्क्रिय आहेत. आगरकर म्हणतात, "ज्याने उठावें त्याने शिक्षण सर्वांच्या मुळाशी आहे, स्वप्रचोदित क्रिया अत्यंत कल्याणकारक आहे, सरकारी सक्ती पराकाष्ठेची विघातक आहे असें सांगत सुटावें व हाताने कांही करू नये, अशा प्रकारचा खुळा बाजार सर्वत्र माजला आहे!"
स्पेन्सरचा विपर्यास
 सुशिक्षित लोक स्पेन्सर, मिल्ल वगैरे पाश्चात्त्य पंडितांचे ग्रंथ वाचून प्रभावित होतात आणि त्यांचे विचार व सिद्धान्त आपल्या मताला आधार म्हणून सांगतात. पण या बाबतींत बरेच लोक स्पेन्सरच्या मतांचा विपर्यास करतांना दिसतात. समाजाच्या कोणत्या स्थितींत सरकारकडे कोणत्या प्रकारचा व किती अंमल असावा, याविषयी त्याने आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत; पण समाजाच्या उत्तमावस्थेंत लागू पडणारे सिद्धान्त आपले लोक आपल्या मागासलेल्या समाजाला लागू करतात. "याहून विशेष मूर्खपणाचा भ्रम असणें शक्य आहे काय?" असे उद्गार आगरकरांनी काढले आहेत.
स्वातंत्र्य?
 सामाजिक सुधारणेच्या बाबतींत सरकारी हस्तक्षेपामुळे आमच्या स्वातंत्र्याला बाधा येते, असें म्हणणारे लोक इतर बाबतीत मात्र सरकारच्या विनवण्या करतात; गोवधबंदी, मद्यपानबंदी, धंदेशिक्षण यासाठी सरकारने कायदे करावे, सक्ती करावी, ती चालेल असे लाचारपणें म्हणतात, याची आगरकरांना फार चीड येत असे. ते वचारतात, "सामाजिक सुधारणांविषयी इंग्रज सरकार परकीयत्वामुळे अत्यंत उदासीन आहे, म्हणूनच त्यासंबंधाने स्वातंत्र्याची तुम्ही एवढी ऐट मिरवतां, हें खरें नाही काय? तसें नसेल व तुम्ही खरेंच स्वातंत्र्यप्रिय असाल, तर मग इतर गोष्टींत सरकारची गुलामगिरी कां पत्करतां?"
धर्मात हस्तक्षेप नको!
 समाजसुधारणेला कायद्याची मदत घेण्यास अशिक्षित, पुराणप्रिय व जीर्ण मतवादी लोकांनी विरोध केला तर तें साहजिक आहे; कारण त्यांची मनें संकुचित असतात; पण सुशिक्षित लोकांनीहि कायद्याला विरोध करावा याचें आगरकरांना फार आश्चर्य वाटे. त्यांच्या या विरोधांत योग्यायोग्य विचार नसून दुराग्रहच आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. सुशिक्षित लोक कायद्याला विरोध करतांना दुसरा युक्तिवाद असा करीत की, सरकार परकीय लोकांचें असल्यामुळे त्याने आमच्या धर्माचारांत ढवळाढवळ करूं नये हें बरें; नाही तर १८५७ साली जसा धर्मनिष्ठ सैनिकांच्या मनाचा क्षोभ होऊन दुर्धर प्रसंग गुदरला, तसाच प्रसंग पुन्हा ओढवेल. पण या आक्षेपांत कांहीच अर्थ नव्हता. कारण सरकार असल्या विरोधाकडे मुळीच लक्ष देत नव्हते किंवा त्याला ज्या सुधारणा इष्ट वाटत होत्या त्या करण्यासाठी कोणाच्या परवानगीकरिता थांबत नव्हतें. सतीची प्रथा बंद करण्याचा कायदा, पुनर्विवाहाचा कायदा त्याने केला तेव्हा कोणाला विचारलें नाही, की कोणाचा विरोध जुमानला नाही. इंग्रज सरकार हिंदु समाजाच्या हितासाठीच असले कायदे करीत असतांना त्याला हे दुराग्रही लोक विरोध करतात; आणि पोर्तुगीज व मुसलमान लोकांनी पूर्वी अनन्वित अत्याचार केले तेव्हा मात्र हिंदु लोकांनी ते निमुटपणें सोसले. म्हणून आगरकर विचारतात, "हे भेकड व प्रतिष्ठाखोर हिंदु लोकांनो, त्या वेळेस तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता?"
 'सामाजिक सुधारणा आणि कायदा' या लेखांत आगरकरांनी सक्ती केव्हा योग्य व केव्हा अयोग्य याविषयी चर्चा केली आहे. ते म्हणतात, "व्यक्तीच्या ज्या आचरणापासून समाजाचें प्रत्यक्ष अपरिमित नुकसान होत नसेल, तें आचरण जरी त्या व्यक्तीस घातक असले, तरी तिने तें करूं नये अशी सक्ती करण्याचा समाजास अधिकार नाही. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजबंधन या दोहोसहि मर्यादा आहेत. व्यभिचार किंवा मद्यपान हे वाईट असले तरी, त्यामुळे समाजाला त्रास होत असेल तरच तें करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने प्रतिबंध करणें योग्य ठरेल; पण सती, केशवपन, वगैरे रूढि इतक्या क्रूर व घातक आहेत की, त्या कायद्याने बंद करणें हेंच हितकारक होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
 अशा प्रकारे आगरकरांनी समाजसुधारणेसाठी कायद्याचा आग्रह धरला असला तरी कायद्याच्या सामर्थ्याची व उपयुक्ततेची मर्यादाहि ते जाणत होते. कायद्याने सर्व साधेल असें त्यांना वाटत नव्हतें. म्हणूनच त्यांनी तरुण सुशिक्षितांना विज्ञापना केली आहे की, कायद्याला विरोध करूं नका व त्यावर सर्वस्वी अवलंबूनहि राहू नका; तर ज्या सुधारणा करणें योग्य व आवश्यक वाटत असेल, त्या धैर्याने ताबडतोब करायला लागा.
जात कां करीत नाही?
 कांही सुशिक्षित मंडळी सामाजिक व धार्मिक सुधारणांना मनांतून अनुकूल असूनहि त्या प्रत्यक्ष आचरणांत आणण्याचें धैर्य त्यांच्या अंगीं नसतें. सुधारणा अयोग्य आहेत असेंहि ते दाखवूं शकत नाहीत; आणि सुधारकांचे विचार बरोबर आहेत, असे उघडपणे मान्य करण्याचे औदार्यहि त्यांच्या जवळ नसतें. म्हणून ते लोक असा युक्तिवाद करतात की, "या सुधारणा अगदी इष्ट आहेत, त्या करणें अवश्य आहे, पण तसे करायला अनुकूल असा काळ अजून आलेला नाही. पाश्चात्त्य शिक्षणामुळे आम्हांला त्या सुधारणांचे महत्त्व कळते; पण पुष्कळ लोकांना अजून तें शिक्षण मिळालेलें नसल्यामुळे त्यांना तें महत्त्व समजत नाही. त्यांना शिक्षण मिळाल्यावर तेहि सुधारणा स्वीकारण्यास तयार होतील. मग सर्वांनी एकदमंच त्या कराव्या हें योग्य आहे. पण ज्यांना हे मान्य नसेल, सुधारणा घडवून आणण्याची ज्यांना अगदी घाई झाली असेल, त्यांनी आपली एक वेगळी जातच करावी, सर्व सुधारणा अमलांत आणून करून दाखवाव्या, व त्या हितावह आहेत हें इतरांना पटवून द्यावें. मग लोक त्यांचें अनुकरण करण्यास तयार होतील."
 अशा प्रकारचा उपदेश सुधारकांना करणारे लोक आगरकरांच्या मतें दांभिक व भेकड आहेत. आपला भित्रेपणा छपविण्यासाठीच ते अशीं मानभावी भाषणें करतात. जात करणें म्हणजे एखादी साधी, सोपी, सहज करण्याजोगी गोष्ट नव्हे; पण त्याचा मुळीच विचार न करतां हे लोक कांही तरी बोलतात. तथापि आगरकरांनी त्यांच्या त्या विचित्र सूचनेलाहि समर्पक उत्तर देऊन ठेवलें आहे. हिंदु समाजांत आधीच असंख्य जाती आहेत; आणि त्या जातिभेदामुळे समाजाची अतिशय हानि झालेली आहे, म्हणून त्यांत आणखी एका नवीन जातीची भर घालणें हें अनर्थकारक होईल. तेव्हा नवीन जात करण्याचा सल्ला देणारे हे लोक नुसते मूर्खच नाहीत, तर देशाचे शत्रु आहेत, असें आगरकरांनी म्हटले आहे.
 सुधारकांची वेगळी जात केल्यामुळे त्यांना सुधारणा लवकर करून दाखवतां येतील, हेंहि खरें नाही. कारण जातिभेदामुळे ज्या अनंत अडचणी नेहमी येतात त्या नवीन जातीच्या लोकांनाहि येणार. त्या अडचणी येऊ नयेत, सर्वांनाच, निर्धास्तपणें नवें आचरण करतां यावें, म्हणुनच कायद्याची मदत हवी, असें सुधारकांचें म्हणणें होतें. ज्या कारणासाठी कायदा हवा त्याच कारणासाठी नवी वेगळी जात करणें योग्य नव्हे, असें आगरकरांनी म्हटलें आहे. आणि वेगळी जात करून, सुधारणा हितावह आहेत असें सिद्ध केलें तरी, अज्ञानी दुराग्रही लोक त्या स्वीकारतील अशी खात्रीहि नाही. तेव्हा वेगळी जात करणें हें अगदी निरर्थक व अनिष्ट होय.




-५-

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा


 सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक इत्यादि सुधारणांचें तौलनिक महत्त्व, त्या सुधारणा घडवून आणण्याचें लोकशिक्षण व कायदा हे मार्ग आणि या संबंधांतून निर्माण होणारे वाद यांविषयी आगरकरांची काय मतें होतीं त्याचें विवरण गेल्या प्रकरणांत केलें. आता या क्षेत्रांत त्यांना काय सुधारणा अपेक्षित होत्या तें पाहवयाचें आहे. सामाजिक सुधारणांवर आगकरांचा सर्व भर होता हें खरेंच आहे, पण सामाजिक रूढींची सर्व पाळेंमुळें धर्मशास्त्रांत असल्यामुळे धार्मिक सुधारणांचाहि त्यांनी तशाच उत्कटतेने पुरस्कार केला आहे. राजकीय सुधारणांच्या बाबतीत आगरकरांच्याविषयी जरा गैरसमज आहेत हें मागे सांगितलेंच आहे. अनेक लेखांत त्यांनी राजकीय सुधारणांचाहि नव्हे, स्वराज्यरूप जी सर्वांत मोठी राजकीय सुधारणा तिचाहि, जोरदार पुरस्कार केला आहे. सामाजिक सुधारणांवर त्यांनी जेवढे लिहिलें त्यामानाने हे लेख संख्येने कमी आहेत एवढेच. असो, या तीनहि क्षेत्रांत त्यांना कोणत्या सुधारणा अपेक्षित होत्या तें आता पाहू.
सामाजिक सुधारणा
 (१) स्त्री-जीवन - आगरकरांच्या मतें राष्ट्राची उन्नति ही त्यांतील समाजाच्या स्थितीवर अवलंबून असते; आणि समाजस्थिति ही गृहस्थितीवर अवलंबून असते. गृहस्थिति म्हणजे कुटुंबांतील व्यक्तींची स्थिति व त्यांचे परस्परसंबंध. ही गृहस्थिति स्त्रीचें कुटुंबांतील स्थान, तिची प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचें स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते. म्हणूनच आगरकरांनी स्त्री- जीवनसुधारणेला विशेष महत्त्व दिले आहे. जातिभेद, अस्पृश्यता यांविषयी त्यांचीं मतें तशींच तीव्र आहेत; पण स्त्रीविषयक दृष्ट रूढींचा त्यांनी जितका विचार केला आहे तितका विचार त्यांनी इतर बाबतींत केलेला नाही.
 बालविवाह, त्यामुळे होणारे अनर्थ, लहान मुलींवर होणारे अत्याचार, बाल-विधवांची दुर्दशा, स्त्री-पुरुष विषमता, त्यामुळे स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांच्या बाबतींतली धर्मशास्त्राची निष्ठुरता, त्या शास्त्राने केलेली स्त्रीची अवहेलना अप्रतिष्ठा याविषयी आगरकरांनी केलेलें जें विवेचन त्याचा आपण हिंदु समाजाच्या शिलावस्थेचें वर्णन करतांना परामर्श घेतला आहे. येथे आता सारार्थानि ते विचार पुन्हा सांगून त्यांनी स्त्री-जीवनविषयक ज्या सुधारणा उपदेशिल्या आहेत, त्यांचा विचार करावयाचा आहे.
 (२) बालविवाह - स्त्रियांच्या दुःस्थितीचें प्रधान कारण म्हणजे हिंदु समाजांतील बालविवाहाची रूढि हें होय. स्त्रीच्या नशिबी येणारी बहुतेक सर्व दुःखें, सर्व आपत्ति, या रूढीमुळेच येतात व त्यामुळे समाजाचीहि अपरिमित हानि होते, असें आगरकरांनी वारंवार सांगितलें आहे. तरुण सुशिक्षितांस विज्ञापना करतांना ते म्हणतात, "ज्याप्रमाणे जोरदार वृक्ष निपजण्यास मूळ अंकुर जोरदार पाहिजे; त्याप्रमाणे देशांत सुदृढ स्त्री-पुरुष निपजण्यास, सुदृढ मुलें होण्यास, वैद्यकशास्त्रांत जो खऱ्या विवाहाचा काल सांगितला आहे त्याचें उल्लंघन होतां कामा नये. या कालाचें उल्लंघन आम्हांकडून आज अनेक वर्षे होत असल्यामुळे आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, श्रम करण्यास नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमच्या शरीर-सामर्थ्याचा लोप झाल्यामुळे आमचें मानसिक सामर्थ्यहि नाहीसे होत आहे. बालविवाह बंद झाल्यास आज घरोघरीं ज्या हतभाग्य बालविधवा दृष्टीस पडतात त्या दृष्टीस पडेनाशा होतील, पुरुषांच्या अंगीं अधिक पौरुष दृष्टीस पडूं लागेल, तरुणांस अधिक उद्योग करण्याची हिंमत येईल व धाडसाचीं कामें अंगावर घेण्याची छाती होऊं लागेल. विवाहापूर्वी मुलींस ज्ञानसंपादण्यास अधिक फुरसद मिळाल्यामुळे पुढे त्यांच्या हातून अपत्यसंवर्धनाचें व प्रपंच चालविण्याचे काम अधिक चांगल्या रीतीने होऊं लागेल. पण हें सर्व होण्यास बालविवाहाची चाल बंद झाली पाहिजे आणि ती बंद होणें न होणें सर्वथैव तुमच्यावर आहे." तरुणांना असा उपदेश करून त्यांनी ही चाल बंद करण्यासाठी 'महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी' स्थापावी अशी सूचना केली आहे व अशी मंडळी स्थापन झाल्यास तिचा पहिला सभासद होण्यास 'सुधारक' तयार आहे, असें आश्वासन दिलें आहे. केवळ स्त्रीसमाजावरच नव्हे तर या देशावर ओढवलेल्या बहुतेक सर्व अनर्थपरंपरा या बालविवाहामुळेच ओढवल्या आहेत, असा आगरकरांचा निश्चित सिद्धान्त होता, हें वरील उताऱ्यावरून दिसून येईल.
 'सामाजिक सुधारणा आणि कायदा' या लेखांत बालविवाहाच्या रूढीवर व तिचें समर्थन करणाऱ्यांवर आगरकरांनी अत्यंत प्रखर टीका केली आहे; आणि ही रुढि कायद्याने बंद केलीच पाहिजे, असा आग्रह धरला आहे. शिवाय त्यांनी असेंहि सांगितलें आहे की, केवळ त्या कायद्याने सर्व कार्य होईल असें नाही. कारण कायदा मुलींच्या बाबतींत फार तर दहा-बारा वर्षांपर्यंत मजल मारील; पण एवढ्याने समाधान मानून चालणार नाही. आपणांस त्याच्यापुढे पुष्कळ गेलें पाहिजे; आणि तो पुढचा सर्व मार्ग क्रमण्यास समाजाच्या पायांतच जोर पाहिजे.
 या दुष्टं घातक रूढींमुळेच बालवैधव्य व केशवपन या अत्यंत क्रूर व राक्षसी आपत्ति स्त्रियांवर कशा येतात त्याचें सविस्तर वर्णन याच लेखांत आगरकरांनी केलें आहे व त्याहि रूढि कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत, असे प्रतिपादिले आहे. या अमानुष रूढींमुळे आगरकरांच्या चित्ताचा केवढा दाह होत असेल हें ज्यांना पाहवयांचे असेल त्यांनी हा लेख पुनः पुन्हा वाचावा.
 बालविवाह व त्यापासून होणारे अनर्थ यांपासून स्त्रीचें रक्षण करण्यास आपल्या समाजांत स्वयंवर-पद्धति रूढ केली पाहिजे असें आगरकरांचें मत होतें. स्त्री-जीवनांत ही सुधारणा झाली तर स्त्रीच्या व्यक्तित्वाचा विकास होऊन ती सध्यापेक्षा पुष्कळच जास्त सुखी होईल, असें प्रतिपादन त्यांनी 'प्रियाराधन', 'स्वयंवर'. 'वल्लभोपासना' या लेखांतून केलें आहे.
 (३) स्वयंवर - स्वयंवरपद्धतीचें समर्थन करतांना प्रथम त्यांनी, युरोपीय ग्रंथकारांच्या आधारे, स्वयंवराची पद्धत प्राणिवर्गांतच दृष्टीस पडते असें नसून, वनस्पतींतहि दृष्टीस पडते, हा विचार मांडला आहे. स्वयंवर-पद्धति निसर्गसिद्ध आहे, म्हणून ती आपण अंगीकारिली पाहिजे, असें यावरून त्यांना सांगावयाचें आहे. निसर्गाने घालून दिलेल्या या आदर्शाचा आम्हीं अनादर केल्यामुळे या देशांत स्त्री-पुरुषांच्या रतिसुखाचा अगदी भंडवडा झाला आहे, असें सांगून पाश्चात्त्य व पौवा स्त्री- पुरुषांच्या प्रणयरंगांची त्यांनी तुलना केली आहे. "ज्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झाली आहे, ज्यांच्या विषयवासना जागृत झाल्या आहेत, उत्कंठा, अधीरता, लज्जा यांनी ज्यांचीं मनें व्यापून राहिली आहेत, अशा स्त्री-पुरुषांच्या प्राथमिक रति-सुखाची बहार कोणीकडे, व पंतोजीचा मार खाणाऱ्या, अभ्यासाखाली अर्धमेल्या झालेल्या, दुर्बल, भेकड, अशा आमच्या सोळा-सतरा वर्षांच्या पोरांच्या व ज्यांचा भातुकलीचा आणि बाव्हला बाव्हलीचा खेळ नुकताच कोठे सुटला आहे अशा आमच्या बारा-तेरा वर्षांच्या निस्तेज, लाजाळू व अज्ञान पोरींच्या बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे!"
 ही तुलना इतकी बोलकी आहे की, स्वयंवर-पद्धतीचें मंडन करण्यासाठी आणखी कोणताच मुद्दा मांडण्याची गरज नाही; पण त्या वेळचा समाज इतका मंद, बधिर व जीर्ण झाला होता की, ही तुलना समजण्याचीहि त्याला पात्रता नव्हती. म्हणुन आगरकरांनी आणखी बरेंच विवेचन केलें आहे. त्यांतील मुख्य विचार हा की, आमच्या देशांत प्राचीन काळी स्वयंवर-पद्धति रूढ होती, तेव्हा ती आज पुन्हा अनुसरण्यास कांहीच हरकत नाही. हा मुद्दा सांगतांना श्रीकृष्ण-रुक्मिणी, अर्जुनसुभद्रा, वत्सला-अभिमन्यु, शकुंतला-दुष्यंत, नल-दमयंती यांची उदाहरणे आगरकर देतात; आणि हिंदुसमाजधुरीणांना सांगतात की, एकीकडे या प्राचीन स्वयंवरांचें व ती पद्धत स्वीकारणाऱ्या स्त्री-पुरुषांचें तुम्ही कौतुक करतां आणि सध्या ती पद्धत अवलंबावी असें म्हणणाऱ्यांवर दुसरीकडे भडिमार करता; तेव्हा तुम्ही रूढींचे दास आहांत, भेकड आहांत, जें सत्य दिसतें त्याचा पुरस्कार करण्यास लागणारें मनोधैर्य तुमच्याजवळ नाही कोणी म्हणतील की, प्राचीन काळी ती पद्धत योग्य होती; पण सध्या मात्र ती हितावह नाही. त्यावर आगरकर विचारतात की, असें म्हणण्याचें कारण काय? शकुंतला, मालती, सुभद्रा, आणि, दुष्यंत, माधव, अर्जुन इत्यादि पौराणिक स्त्री-पुरुषांच्या प्रकृतींत आणि आजच्या आमच्या प्रकृतींत जमीन-अस्मानाचें अंतर पडलें आहे काय? असें आम्हांस बिलकुल वाटत नाही. तारुण्य, आरोग्य, बुद्धि, संपत्ति, स्वरूप, विद्या जितकें त्यांना प्रिय होते तितकेंच आम्हांसहि आहे. दुःखाचा कंटाळा व सुखाचा अभिलाष जितका त्यांना होता तितकाच आम्हांलाहि आहे. तेव्हा स्वयंवरामुळे ते स्त्री-पुरुष जितके सुखी होत. तितकेच आजचे स्त्री-पुरुषहि होण्याचा संभव आहे.
 आगरकरांची वृत्ति कशी क्रांतिकारक होती तें यावरून दिसून येईल. बालविवाह, वैधव्य, स्वयंवर इत्यादि रूढींबद्दल जीर्णवादी लोकांहून त्यांची मतें तर भिन्न होतीच; पण प्राचीन काळचे स्त्री-पुरुष पुण्यशील, धर्मनिष्ठ, तो काळच सत्ययुगाचा, धर्मोत्कर्षाचा; आणि आजचे स्त्री-पुरुष पापी, धर्मभ्रष्ट व आजचा काळ हा कलियुगाचा, धर्महानीचा अशी जी विकृत विचारसरणी हिंदु समाजांत रूढ झालेली होती व जी सर्व अधःपाताला कारण झाली होती तिच्याविषयीच भिन्न मत सांगून त्यांनी मुळावरच घाव घातला आहे.
 (४) राष्ट्रीय चारित्र्य - बालविवाहाची रूढि व स्वयंवर- पद्धतीचा अभाव यांचा केवळ आरोग्य, व सुदृढ प्रजा यांशींच संबंध आहे असें नव्हे. आगरकरांच्या मतें या दोन पद्धति सर्व राष्ट्रीय चारित्र्याच्या निदर्शक आहेत. प्रियाराधन या लेखाचा समारोप करतांना अत्यंत तीव्र व कडवट भाषेत त्यांनी आपले याविषयीचे विचार मांडले आहेत. ते म्हणतात, "ज्या लोकांना कोणों तरी पसंत केलेल्या बायका चालतात, ज्या लोकांना रत्युपभोगासाठी दुसऱ्यांनी कोंडून घालावें लागतें, ज्या लोकांना ज्ञानसंपादन, द्रव्यसंपादन, लौकिकसंपादन सामर्थ्यसंपादन, विषयसौख्य- रसज्ञान- संपादन यांपैकी कोणतीहि गोष्ट कमाविण्यापूर्वी 'जबरीसंभोग' करण्याची चटक लागली आहे व ज्यांच्या हातून या पापामुळे प्रतिदिवशी प्रेमाचे हजारो खून पडत आहेत, शारीरिक व मानसिक अनंत यातना भोगाव्या लागत आहेत, विद्या व वित्त संपादण्याची बिलकुल कुवत राहिलेली नाही, खऱ्या जातिविशिष्ट सुखाची कल्पना ज्यांच्या स्वप्नांत सुद्धा येत नाही, ज्यांना संसार असार होऊन गेला आहे व आयुष्य हे ज्यांना दुर्वह ओझ्यासारखें झालें आहे, अशां लोकांनी राष्ट्रीय सभांच्या फंदात पडून मनासारखे राज्यकर्ते वरण्याची इच्छा कशाला धरावी?"
 याचा भावार्थ स्पष्ट आहे. माझी स्त्री मी निवडीन, हा आग्रह ज्याच्या बुद्धीला नाही त्याला आयुष्यांत कोणतीच गोष्ट स्वमताने निवडण्याचे सामर्थ्यं प्राप्त होत नाही, असें आगरकरांचे मत आहे. असे लोक नेहमी प्रवाहपतितच राहणार. त्यांच्या जीवनाची दिशा दुसरे कोणी तरी ठरविणार. राज्यकर्ते आपले आपण निवडणें म्हणजेच स्वातंत्र्याचा लाभ करून घेणे आणि स्वयंवर-पद्धति यांचा असा घनिष्ठ संबंध आहे."
 (५) असंमत वैधव्य - स्त्रियांच्या दुःस्थितीचें दुसरें कारण म्हणजे असंमत वैधव्य हे होय. त्यांतहि बालपणीं आलेलें वैधव्य ही अतिदारुण आपत्ति होय. हिंदु समाजांतील वरिष्ठ वर्गातील स्त्रियांच्या पुनर्विवाहास धर्मशास्त्राने व रुढीने अनेक शतकें बंदी घातलेली होती. आगरकरांच्या मतें बालविवाह जितका निषिद्ध तितकीच पुनर्विवाहबंदीहि निषिद्ध होय. विधवा स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी करूनच समाज थांबला नाही, तर असें वैधव्य सक्तीने तिच्यावर लादून त्याने त्या स्थितींतलें तिचें जीवनहि नरकप्राय करून टाकलें, यांची आगरकरांना भयंकर चीड येते. विधवा स्त्रीला समाज अपवित्र मानतो, तिचें दर्शन हा अपशकुन मानतो; आणि तिच्या दुःखांत तिला सहानुभूति दाखविण्याऐवजी, तिच्यां कर्मानेच ती आपत्ति ओढवली, असें म्हणून तिच्या दुःखावर डागण्या देतो. इतकी क्रूरता, इतका अमानुषपणा जगांत दुसऱ्या कोठेहि सापडणार नाही. विधवेला समाजजीवन इतकें असह्य करून टाकतो की, आगरकरांच्या मतें त्यामुळेच अनेक स्त्रिया सती जाण्यास सिद्ध होतात. ते म्हणतात, जिचा नवरा मेला तिचें होईल तितक्या उत्तम रीतीने संगोपन करण्याची उदार चाल आमच्या देशांत असती तर सहगमनाची रूढि येथे कधीच न पडती; इतकेंच नव्हे, तर पतिवियोगामुळे एकाएकी प्राण सोडणारी किंवा आत्महत्या करणारी स्त्री देखील कधीहि दृष्टीस न पडती.
 (६) पुनर्विवाह - असंमत वैधव्य, पुनर्विवाहबंदी ही रूढि आगरकरांना बालविवाहाइतकीच घातक वाटत असली तरी त्यांनी वैधव्य किंवा पुनर्विवाह यासंबंधी स्वतंत्र व विस्तृत असें विवेचन केलेलें नाही. पण विष्णुशास्त्री पंडित यांनी या बाबतीत जे प्रयत्न केले त्यांचा आगरकरांनी गौरव केला आहे. त्यावरून या विषयासंबंधी त्यांचीं मतें काय होतीं याची सहज कल्पना येते. विष्णुशास्त्री यांनी प्रथम पुनर्विवाह सशास्त्र आहे, धर्मवचनांचा त्याला आधार आहे हें सिद्ध करण्यासाठी प्रमाणे गोळा केलीं व याविषयी कोणांस शंका असेल तर त्यांनी वादास उभे राहवें, अशा अर्थाचे जाहीरनामे शहरोशहरीं लावले. पण कोणीहि वादास आलें नाही. तेव्हा मग शास्त्रीबुवांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीतर्फे सोळा वर्षांच्या एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. या वेळीं "तुमच्या छापखान्यास आम्ही आग लावूं" अशी पंडितांना लोकांनी धमकी दिली होती, तरीहि ते डगमगले नाहीत. यामुळे आगरकरांना त्यांचे विशेष कौतुक वाटत होतें.
 याविषयी विवेचन करतांना 'न करत्यांचा वार शनिवार' या लेखांत आगरकरांनी सुधारणा-पक्षावर टीका करणाऱ्यांचा ढोंगीपणा, त्यांची भेकड वृत्ति, त्यांचे असत्याचरण यांवर विदारक प्रकाश टाकला आहे. आगरकरांना 'उतावळे सुधारक' असें लोक म्हणत असत; पण विष्णुशास्त्री पंडितांनी कसलाच उतावळेपणा केला नव्हता. त्यांनी शास्त्राधार जमविले होते. लोकांशी वाद करण्याची सिद्धता दाखविली. होती. तरी त्यांच्यावरहि जीर्णवादी लोकांनी गहजब केलाच. तेव्हा थंड्या सुधारकांविषयीहि समाजाची तीच दृष्टि होती, असें दिसून आलें. त्या वेळीं विष्णुशास्त्री पंडित यांना वे. व्यंकटशास्त्री यांनी पुनर्विवाहासाठी शास्त्राधार काढून दिले होते. त्यांचे मत पुनर्विवाहाला अनुकूल होतें, पण शंकराचार्यांपुढे वाद निघाला तेव्हा सनातनी लोकांनी त्यांना अतिशय भीड घालून उलट मत द्यावयास भाग पाडलें. याविषयी लिहितांना आगरकर म्हणतात, "अशा निर्लज्जपणाने पुनर्विवाह अशास्त्र ठरविण्याचा झालेला प्रयत्न पाहून विधिपक्षाच्या मंडळीस पराकाष्ठेचा राग यावा, व सरकार- दरबार व्हावेत व कित्येक मंडळींच्या मनांतून शंकराचार्यांवर फिर्याद करण्याचा विचार यावा यांत विलक्षण असें आम्हांस कांहीच वाटत नाही."
  (७) स्त्रीशिक्षण - गृहस्थिति आधी सुधारली तरच देशाची सर्व स्थिति सुधारेल असें आगरकर कां म्हणत असत, हें त्यावरून कळून येईल. बालविवाह, केशवपन, असंमत वैधव्य इत्यादि ज्या रूढींमुळे आमची गृहस्थिति बिघडली होती त्या रूढींच्या मागे अत्यंत तर्कदुष्ट, अमानुष अशी विचारसरणी होती; आणि त्याचप्रमाणे ढोंगी, अंध, असत्यप्रवण अशी वृत्तीहि होती. प्रत्यक्ष त्या रूढीपेक्षाहि ती विचारसरणी व ती वृत्ति या समाजाला जास्त घातक होत्या. म्हणूनचं आधी गृहस्थिति सुधारली पाहिजे, असा आगरकरांचा आग्रह होता, व ती सुधारावयाची तर स्त्रीजीवनाची स्थिति सुधारली पाहिजे असे ते म्हणत. ही स्त्रीजीवनाची स्थिति सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्त्रीक्षिण हा होय, असें त्यांनी सांगितलें आहे. मुलांना प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता आहे; पण मुलींना, त्यांच्या मतें, अशा शिक्षणाची गरज जास्त आहे. कारण अपत्यसंगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. संसार चालविण्याची जबाबदारी पुरुषांवर असली तरी मुलाला जन्म देऊन त्याच्या शरीराची व मनाची जोपासना करण्याचे काम स्त्रीच करीत असते. ज्या स्त्रीला प्राथमिक शिक्षण मिळाले आहे ती स्त्री अशिक्षित स्त्रीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारें अपत्यसंगोपन करूं शकेल यांत कांही शंका नाही. पाश्चात्त्य देशांत हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. पूर्वी त्या देशांतहि सामान्य स्त्रिया अशिक्षित असत. याला अपवाद म्हणजे स्पार्टन लोकांचा; त्यांच्या स्त्रियांना पुरुषांसारखेंच सर्व प्रकारचें शिक्षण मिळत असे, त्यामुळे त्या स्त्रियांना कुटुंबांत प्रतिष्ठा मिळत असे; आणि त्यांची संततीहि चांगली निपजत असे. रोमन लोकहि मुलांप्रमाणे मुलींना शिक्षण देत असत. तथापि युरोपांत धर्मक्रांति होईपर्यंत स्त्री-शिक्षणाकडे लोकांनी फारसे लक्ष दिलें नव्हतें. ल्यूथरने धर्मसुधारणेप्रमाणेच स्त्री-शिक्षणाविषयीहि आग्रह धरला होता, कारण बायबलांतील खरें रहस्य पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाहिं कळल्याशिवाय खरी धर्मसुधारणा होणार नाही, असें त्याचें मत होते.
 समाजाच्या उन्नतीसाठी मुलींना उच्च शिक्षणहि मिळणें अवश्य आहे, असें आगरकरांनी प्रतिपादिलें आहे; पण त्याचा विचार करण्यापूर्वी बालविवाहाची चाल बंद होऊन प्रौढविवाह सुरू होणें अत्यावश्यक आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. कारण तेरा-चौदाव्या वर्षांपासूनच जर मुलींच्या मागे गर्भारपण, बाळंतपण व अपत्य-संगोपन हीं लचांडें लागलीं, तर त्यांना अभ्यास करणें अशक्य होते; म्हणून उच्च शिक्षण मिळवायचे असेल, तर मुलींनी तोंपर्यंत अविवाहित राहिलें पाहिजे. हे उघड आहे.
 (८) एकत्र शिक्षण - स्त्रियांना व पुरुषांना एकाच प्रकारचें शिक्षण द्यावें आणि तेंहि एकत्र द्यावें, असेंहि आगरकरांचें मत होतें. वैवाहिक जीवनांतील विपत्ति टाळण्यासाठी त्यांच्या मतें, अशा शिक्षणाची आवश्यकता आहे. कांही लोकांचें मत असें होतें की, मुलींना फक्त प्राथमिक शिक्षण द्यावें आणि मग त्यांना घरीच ठेवून प्रपंच व्यवस्था शिकवावी. त्यांना आणखी शिक्षण देण्याविषयी आग्रहच असेल तर मुलांप्रमाणे भूगोल, शास्त्र असले अवघड विषय न शिकवतां त्यांना शिवणकाम, गायन, पाकशास्त्र, गृहव्यवस्था, भरतकाम, शिशुसंगोपन, आरोग्य हे विषय शिकवावे. स्त्रियांचीं कामें वेगळी व त्यांची बुद्धीहि कमी म्हणून त्यांना असें वेगळ्या प्रकारचें शिक्षण देणें योग्य होय, असें त्यांचें म्हणणें होतें. आगरकर म्हणतात की, हें मत स्वार्थी आहे. शेकडो वर्षे पुरुषांनी स्त्रियांवर वर्चस्व गाजवलें, तें स्त्रियांना उच्च शिक्षण दिलें तर नाहीसे होईल, आपली सत्ता जाईल अशा भीतीने हे लोक असलीं तर्कशून्य मतें मांडतात. स्त्रीची बुद्धि उच्च शिक्षणासाठी योग्य नाही हें मत पाश्चात्य देशांतील अनुभवाने खोटें ठरलें आहे. जीं शास्त्र व ज्या कला केवळ पुरुषांनाच सुसाध्य आहेत अशी कल्पना होती, तीं शास्त्रे व त्या कला स्त्रियांनाहि सुसाध्य असून, त्यांच्या अभ्यासामुळे स्त्रियांच्या नैसर्गिक चारुतेवर कांही परिणाम होत नाही, किंवा त्यांच्या अपत्य संगोपनाच्या कामांतहि उणीव येत नाही, असें दिसून आले आहे.
 स्त्री-पुरुषांना एकाच प्रकारचें शिक्षण द्यावें, एवढेच नव्हे तर तें एकत्र द्यावें, त्यांत समाजाचें हितच आहे, या मताचाहि आगरकरांनी पुरस्कार केला आहे. हिंदु समाजांत स्त्री-पुरुष मोकळेपणी एकत्र वागूं शकत नाहीत; तसे वागणें योग्य मानले जात नाही; कारण त्यामुळे समाजाची नीतिमत्ता ढासळेल अशी भीति वाटते. पण युरोपांतील स्त्री-पुरुष सर्व सामाजिक समारंभांत मिसळून वागतात, म्हणून कांही त्यांच्यांत अनीति माजली आहे, असें दिसत नाही. उलट स्त्रियांच्या सान्निध्यामुळे पुरुष नेहमी उल्हसित असतात. स्त्रियांना घरांत किंवा गोषांत ठेवल्याने समाजांची नीति वाढते, या म्हणण्यांतहि कांही अर्थ नाही. स्त्री-पुरुषांचा नित्य सहवास असेल, मोकळेपणीं बोलणें-चालणें असेल, तर त्यांच्या मनांत विषयवासना उत्पन्न होण्याचा संभव कमी असतो, उलट विशेष प्रसंगीच नटलेल्या स्त्रिया दृष्टीस पडल्यामुळे पुरुषांच्या मनांत त्यांच्याविषयी ओढ उत्पन्न होऊन, त्या अप्राप्य असल्यामुळे विकृत भावना निर्माण होतात. नित्य सहवास लाभल्याने नीतीचा परिपोषच होईल, असभ्यपणाचें वर्तन बंद होईल, बोलण्यांतली अश्लीलता कमी होईल. अशा प्रकारे प्रौढ स्त्री- पुरुषांचा मिश्र समाज सुखावह होण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच एकत्र शिक्षण देणें अवश्य आहे. अशा शिक्षणामुळे चांगला परिणाम होतो, असा अनुभव युरोप- अमेरिकेत आला आहे. वरिष्ठ शिक्षणहि तरुण-तरुणींना एकत्र देणें चांगलें, असें दिसून आले आहे. अशा प्रकारें एकत्र शिक्षण देण्यावर पुढील आक्षेप घेण्यांत येत -
 १. स्त्री-पुरुषांत नैसर्गिक भेद असतो, त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणांत फरक करणें अवश्य असतें. एकत्र शिक्षण दिलें तर तसा फरक करतां येणार नाही. २. मुलांच्या दांडगेपणाचा मुलींच्या वर्तनावर दुष्परिणाम होतो. मुलींच्या सहवासामुळे मुलांचा व्रात्यपणा मात्र कमी होत नाही. ३. मुलामुलींच्या सहवासामुळे त्यांची विषयवासना लवकर जागृत होऊन त्यांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होईल.
 आगरकर म्हणतात, अनुभवाने हे आक्षेप चुकीचे ठरले आहेत. १. एकत्र शिक्षणामुळे दोघांनाहि समजेल असें शिकवणें अवश्य होतें व तेंच अधिक उपयुक्त ठरते. २. मुलांचा दांडगेपणा व व्रात्यपणा मुलींच्या सान्निध्यामुळे कमी होतो असें दिसून आलें आहे. ३. सहवासामुळे विषयवासना जागृत न होतां मनें शांत व गंभीर होतात. व जीवनांतील साथी निवडणें सोपें होतें, असाच अनुभव आला आहे.
 योग्य वेळी मुलींना कांही उपयुक्त शिक्षण दिलें तर तें त्यांना पुढील आयुष्यांत चरितार्थासाठीहि निश्चितपणे कामी येईल, हा विचारहि आगरकरांनी मांडला आहे. पतिनिधनामुळे स्त्री निराधार व परावलंबी होत असल्यामुळे, विधवेचें जिणें जगण्यापेक्षा पतीबरोबर जाळून घेणेंच बरें, असें तिला वाटण्याचा संभव असतो. त्यामुळेच सहगमनाची दुष्ट रूढि सुरू झाली असावी. स्वतःचें पोट भरण्यापुरतें शिक्षण तिला मिळालेलें असेल, तर विधवा स्त्री मानाने जगू शकेल व सहगमनाचा विचार तिच्या मनांत येणार नाही, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
 (९) जातिभेद - स्त्री-जीवनाची दुःस्थिति हें जसें हिंदुस्थानच्या अधःपाताचें एक कारण, तसेंच सामाजिक विषमता हे, आगरकरांच्या मतें, दुसरें कारण होतें. वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता इत्यादि अनेक रूपांनी ती विषमता या समाजात हजारो वर्षे रूढ झाली होती व या समाजाच्या प्रगतीची सर्व आशा नष्ट करून टाकीत होती "जात का करीत नाही?" या प्रश्नाला उत्तर देतांना आगरकर म्हणतात, "जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे हीं जेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत. जातीमुळे धर्मविचारांत व आचारांत मतभेद उत्पन्न होऊन तो परस्पर वैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे. जातीमुळे अन्नव्यवहार, विवाह वगैरेंच्या संबंधाने अतिशय गैरसोय झाली आहे. जातीमुळे देशांतल्या देशांत किंवा परदेशी प्रवास करणे कठीण झालें आहें, जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग राहवें लागल्यामुळे फार नुकसान होत आहे. या जातीमुळे आमची भूतदया, आमचें बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धि आमची परोपकाररती यांचें क्षेत्र अतिशय मर्यादित झालें आहे. सारांश, आज ज्या अनेक विपत्ति आम्ही भोगीत आहों, त्यांपैकी ज्यांचें जनन जातिभेदापासून झालें नाही अशा फारच थोड्या असतील.
 आगरकरांच्यानंतर गेल्या पाऊणशे वर्षांत भारताच्या इतिहासाचे खूप संशोधन झालें असून, हिंदूंच्या समाजरचनेचा व इतिहासाचा अनेक मोठमोठ्या पंडितांनी कसून अभ्यास केला आहे, त्यांपैकी बहुतेकांनी जातिभेदामुळे हे दुष्परिणाम, हे अनर्थ झाले असल्याचें मान्य करून, आगरकरांच्या या मताला प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला आहे. आगरकरांच्या सामाजिक निदानाचा हा मोठाच विजय मानला पाहिजे.
 या जातिभेदामुळे खऱ्या नीति-धर्माची या समाजांत कशी परवड झाली होती हें आगरकरांनी 'आता धर्माभिमानी स्वतःच वेगळी जात करणार म्हणतात' या लेखांत दाखवून दिलें आहे. ते म्हणतात, अमुक देशांत किंवा अमुक जातींत जन्म होणें हें कांही मनुष्याच्या हातचें नाही. परंतु सदाचाराने किंवा दुराचाराने वागणें हें मनुष्याच्या हातचें आहे. पहिल्या गोष्टीमुळे मनुष्य दोषी होतो असे गृहीत धरलें तरी तो दोष दुसऱ्या दोषापेक्षा अर्थातच कमी असला पाहिजे; पण हा विचार आमचे सनातनी बांधव करणार नाहीत. तारतम्याने पाहिल्यास भिन्नधर्मीय व भिन्नदेशीय सुजनाने स्पर्शिलेल्या अन्नपाण्याहून स्वदेशीय व स्वधर्मीय दुर्जनाच्या हातचें पाणी अधिक त्याज्य असें आम्हांस वाटतें. हीन जातीय आणि दुराचारी यांत नीतिदृष्ट्या पाहतां दुराचारी हा खरा अस्पृश्य होय; पण हिंदुसमाजांत जातिभेदाचा प्रभाव इतका आहे की, हा सामान्य विवेक लोकांनी केव्हाहि दाखविलेला नाही. वाटेल त्या दुचाराचारी, पापी, समाजद्रोही मनुष्याला हिंदु लोक जवळ करतील; पण सदाचारी हीनजातियाची सावली सुद्धा घेणार नाहीत. आगरकरांच्या मतें हा अधर्म आहे.
 (१०) ॲनी बेझंट - १८९३ साली ॲनी बेझंट या हिंदुस्थानांत आल्या आणि त्यांनी पुण्यास एक व्याख्यान देऊन असें सांगितलें की, "पाश्चात्त्य व भारतीय समाजरचनेची तुलना करतां भारतीय समाजरचना श्रेष्ठ ठरते; पाश्चात्त्य समाजांत अतिश्रीमंत व अति दरिद्री असे दोन वर्ग पडत आहेत म्हणून ती समाज-रचना वर्णव्यवस्थेपेक्षा हीन आहे." यावर टीका करतांना आगरकर म्हणतात की, "अशी व्याख्यानें ऐकून आमच्या धर्माभिमानी लोकांस या स्त्रीस कोठे ठेवूं आणि कोठे न ठेवू, असें झालें आहे. पण त्यांनी हें ध्यानांत ठेवावें की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णव्यवस्थेच्या कैवारणीस या चार जातींत जे असंख्य पोटभेद आहेत ते मुळीच संमत नाहीत. ते मोडून टाकणें अत्यवश्य आहे असे तिचें मत आहे. आमचे लोक हे करण्यास तयार आहेत काय? असतील तर या हिंदु आचार-विचारांचें मंडन करणाऱ्या विदुषीचे आम्हांवर अगणित उपकार झाले, असें आम्ही मोठ्या आनंदाने कबूल करूं."
 वास्तविक जिला आपण वर्णव्यवस्था म्हणतों ती भारतांत ऐतिहासिक काळांत कधीच अस्तित्वांत नव्हती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चारच वर्ण आहेत व त्यांच्यांत पोटभेद, जातिभेद मुळीच नाहीत, अशी स्थिति भारतांत केव्हाही नव्हती. त्याचप्रमाणे ब्राह्मण केवळ अध्ययन-अध्यापन, क्षत्रिय फक्त राज्यकारभार व युद्ध, वैश्य फक्त धनोत्पादन आणि शूद्र केवळ सेवा करीत आहेत असेंहि कधी इतिहासांत दिसत नाही. इतकेंच नव्हे, तर इतिहासपूर्व काळांतहि अशी स्थिति नव्हती. यांचा अर्थ असा की, भारतांत चातुर्वर्ण्यव्यवस्था केव्हाहि अस्तित्वांत नव्हती; पण चातुवर्ण्य, चातुर्वर्ण्य असा घोष मात्र कायम चालू होता. या ढोंगीपणाची आगरकरांना अत्यंत चीड येत असे. या लेखांत त्यांनी पुढे हीच टीका केली आहे. हल्ली जे लोक ब्राह्मण या नांवाखाली मोडतात त्यांनी आपला सगळा वेळ अध्यात्मविचारांत घालविला पाहिजे. तसें करण्यास ते लोक राजी आहेत काय? तसें ते नसतील तर आपणांस ब्राह्मण म्हणवून घेऊन फुकाची आढ्यता मारण्यांत व टाळ्यांच्या गजरात व्याख्यातीचें अभिनंदन करण्यांत काय अर्थ आहे?
 (११) वर्णसंकर हितावह - जातिभेद, वर्णभेद यांविषयी आगरकरांचे असे विचार असल्यामुळे या देशांत वर्णसंकर घडून येणे हितावह होय, असें त्यांनी स्पष्टपणें प्रतिपादिले आहे. वर्णसंकर ही धर्मग्लानि होय असे जीर्णवादी लोकांनां वाटते; पण आगरकर म्हणतात, "त्यांच्या धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानि न समजतां धर्मोत्कर्ष समजतों. मूर्तिपूजा अजीबात नाहीशी होणें, यज्ञयागांचें थोतांड शिथिल होत जाणें, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदकव्यवहार करण्याची किंवा लग्न करण्याची सदर परवानगी असणें, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्रांचा किंवा धर्मग्रंथांचा अभ्यास करणें, वगैरे गोष्टी प्रचारांत आल्यास कोणत्याहि प्रकारची धर्मग्लानि होणार आहे असें आम्हांस वाटत नाही. त्या जुन्या प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे, असा आमचा समज आहे."
 (१२) पूर्णावस्था - मानवजातीची पूर्णावस्था मागे येऊन गेली व ती पूर्णावस्था अद्याप यावयाची आहे व ती पुढे येणार आहे, अशी दोन मतें लोकांत रूढ आहेत. त्यांपैकी पूर्णावस्था मागे होऊन गेली या मताचा व जातिभेदाचा दृढ संबंध आहे, असें आगरकरांचें मत होतें. पूर्णावस्थेचें विवेचन करतांना ते म्हणतात, "ज्यांची जातिभेदावर श्रद्धा आहे त्यांच्या मतें मानवाच्या पूर्णावस्थेचा काळ मागेच होऊन गेला असून आता समानतेकडे मानवाचा कल होत असल्यामुळे दिवसेदिवस मनुष्यजातिभ्रंश पावत आहे; पण जेथे लोकांना जन्मतः सर्वांमध्ये साम्य आहे असें वाटत असतें तेथे याहून भिन्न स्थिति असते. तेथे कोणासहि आपण आहों तीच पूर्णावस्था आहे असें भासत नाही. आपल्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यास जागा आहे असें प्रत्येकास वाटतें व त्यास ती करण्यास पुष्कळ उमेद असते. युरोपीय समाजांत ती समजूत दृढ होत आहे. या समजुतीनेच त्यांचे सुधारणेकडे सदोदित प्रयत्न चालले आहेत. या समजुतीने युरोपीय लोकांत किती परिश्रम, किती उद्योग, किती धाडस व किती घडामोड सुरू आहे याची आमच्याने कल्पनाहि करवत नाही." (केसरींतील निबंध, पुस्तक दुसरें, पृ. ८१).
 (१३) अस्पृश्यता - जातिभेदाविषयी आगरकरांची मतें जशीं अगदी पुरोगामी व क्रांतिकारक होतीं तशींच अस्पृश्यतेविषयीहि होतीं, या विषयाचें त्यांनी विस्तृत विवेचन केलेलें नाही; पण एक-दोन ठिकाणीं जातां जातां जीं मतें मांडलीं आहेत त्यावरून त्या काळांतहि आगरकर किती निर्भयपणें लिहीत असत हें ध्यानीं येईल. ते म्हणतात, "महाराची सावली पडली असतां विटाळ मानणारे लोक, कितीहि लांब जिभा करून, "अमचा रंग काळा असला व तुमचा गोरा असला म्हणून काय झालें? रंगावर कांही मनुष्याची पानापात्रता ठरत नाही," वगैरे गोष्टी प्रतिपादूं लागले; तथापि त्यांच्या शब्दांस जोर येण्याचा संभव नाही. त्या शब्दांस जोर येऊन इतरांनी ते ऐकलेच पाहिजेत अशी खरोखर इच्छा असल्यास, 'ब्राह्मणोस्य मुखमासीत्' हें पक्षपाती शास्त्र झुगारून देऊन, आपल्या मांडीला मांडी भिडवून शाळांतून बसण्यास महारांस मोकळीक दिली पाहिजे." (मूळ पाया चांगला पाहिजे). 'इति श्रीचहाग्रामण्य प्रकरणं समाप्तम्' या लेखांत याच्याहि पुढे जाऊन ते म्हणतात, "ब्राह्मणेतरांच्या हातचा चहा पिण्यांत आम्हांस दोष वाटत नाही. इतकेंच नव्हे, तर नीच मानलेल्या महारांची स्थिति सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहतां येती तर आम्ही स्वतःस मोठे कृतार्थ मानलें असतें, ही गोष्ट आमच्या देशबांधवांपासून आम्ही चोरून ठेवीत नाही."
 (१४) वर्णभेद - वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता हीं विषमतेची जुनीं कारणें होत. पाश्चात्त्यविद्येमुळे येथल्या समाजाची ही जुनी घडी विस्कटली हें खरें. आपला समाज व्यक्तिवादी होऊं लागला; आणि विचारस्वातंत्र्य, व्यवसायस्वातंत्र्य हीं प्राप्त होऊन समाजाची घडण बदलूं लागली. या नव्या समाजांत स्वातंत्र्याबरोबरच समता तत्त्वालाहि तितकेंच महत्त्व होते; पण तरीहि त्यांत वर्गभेद निर्माण होऊन एक नवीनच विषमता निर्माण होऊं लागली होती. विषमतेच्या याहि कारणाचा आगरकरांनी जातिभेदासारखाच विचार केला होता. आणि वेळीच या विषमतेला पायबंद घातला नाही तर आपला समाज उत्सन्न होईल, असा इशाराहि दिला होता. ते म्हणतात.
 "आमच्यामध्ये विचारस्वातंत्र्य व व्यवसायस्वातंत्र्य आल्याने आमच्या समाजाचें पूर्वी जें जातिभेदामुळे व धर्माभेदामुळे वर्गीकरण झालें होतें त्याचा आता लोप होत जाऊन प्राप्तीच्या व संपत्तीच्या मानाने वर्गीकरण होत चाललें आहे."
 (१५) वर्गकलह - सांपत्तिक विषमता हें वर्गीकरणाचें नवीन तत्त्व कशामुळे आलें तें सांगून, याच लेखांत, तें तत्त्व समाजास राज्यकारणी किती अपायकारक आहे व त्यापासून किती जुलूम होत आहे, त्याचीहि कल्पना लोकांना आगरकरांनी दिली होती. इतकेंच नव्हे तर कामगारवर्गाने संघटित होऊन या नव्या जुलमाचा प्रतिकार केला पाहिजे, असा उपदेशहि त्यांनी केला होता. 'रेल्वे कंपन्या व रेल्वेकडील नोकर' या लेखांत ते म्हणतात, "राजांचा व धन्यांचा आपल्या प्रजेशी व नोकरांशी नित्य कलह चाललेला असतो. तो इतका की, हा कलह हा उभयतांच्या मनोवृत्तीचा स्वाभाविक परिणाम, आणि उभयतांचा सलोखा हा अपवाद, असें म्हटलें तरी चालेल. आमच्या रेल्वे कंपन्या आणि त्यांचे नोकर या दुसऱ्या कोटींत पडतात. रेल्वेकडील नोकरांनी आपल्या धन्याशीं कलह करण्याचा निश्चय केल्याखेरीज त्यांची विपत्ति दूर होण्याचा संभव नाही" (केसरीतील निवडक निबंध, पुस्तक १ लें). या विषयावरील अन्य लेखांत आगरकरांनी कोळशाच्या खाणी, गोद्या, तारायंत्रे इत्यादि इतर धंद्यांतहि कामगारांना कट (संप) करणें कसें अवश्य आहे तें सांगून युरोप-अमेरिकेतील कामगार संप करून आपले उद्दिष्ट कसे साध्य करून घेतात त्याचें वर्णन केलें आहे. संप हा जसा सांपत्तिक विषमता नष्ट करण्याचाः मार्ग तसाच भांडवलदारांच्या बाजूने आचरण्याचा दुसराहि एक मार्ग आहे. कामगारांना नफ्यांतला कांही वांटा देणें हा तो मार्ग आहे. आज हा विचार पूर्ण रूढ होऊन गेला असून तो प्रत्यक्ष आचरणांतहि आणला जात आहे. पण १८८० सालापासून, केसरीच्या प्रारंभीच्या अंकापासून, आगरकरांनी त्याचें प्रतिपादन केलेलें आढळते. यावरून केवळ प्राचीन काळच्या सामाजिक विषमतेचाच विचार आगरकरांनी केला असें नसून, सध्याची घडी विस्कटल्यावर नव्या समाजरचनेत उद्भवणाऱ्या नव्या आर्थिक विषमतेचाहि विचार केला होता, असें दिसून येईल.
 ही नवी आर्थिक विषमताहि जुन्या जातीय विषमतेइतकीच घातक असल्यामुळे ती नष्ट करण्यासाठी तरुणांनी बद्धपरिकर व्हावे अशी या देशांतल्या 'तरुण सुशिक्षितांस आगरकरांनी विज्ञापना' केली आहे. तिचा सारार्थ असा: विचार करणें, सुखदुःखाचा अनुभव घेणें व क्रिया करणें या तीन गोष्टींपैकी पहिलीत, दुसरींत व तिसरीत प्रत्येक मनुष्य चूर होऊन गेलेला असतो. दीर्घ चिंतन करून ग्रंथरूपाने आपलें तत्त्वज्ञान लोकांपुढे मांडणारांचा एक वर्ग. अशांस बाह्य सुखांचा फार उपभोग सांपडत नाही. दुसरा वर्ग सुखाभिलाषी लोकांचा. यास मानसिक सुखापेक्षा शरीरसुखाची चाड विशेष असते. वारुळांत जशी एक खुशालचेंडू राणी मुंगी असते, तीसारखे हे सुखपरायण लोक होत. या सुखपरायण वर्गाशिवाय आणखी एक तिसरा वर्ग असतो. या वर्गांतील लोकांची क्रिया-प्रवृत्ति (शारीर कष्ट करण्याची शक्ति) फार जबरदस्त असते; व एका दृष्टीने त्यांस समाजांचे आधारस्तंभ म्हणतां येईल. यांनी काबाडकष्ट करून चैनीचे पदार्थ उत्पन्न करावे व इतर दोन वर्गांनी त्यांचा उपभोग घ्यावा असे आजपर्यंत बऱ्याच अंशीं चालत आले आहे: ही असमता ज्या देशांत वाढत जात असेल त्या देशाच्या ऱ्हासाचा प्रारंभ झाला आहे, असें समजावें. जेव्हा या असमतेची परमावधि होते तेव्हा घनघोर राज्यक्रांति होऊन समाजचे समाज लयास जातात, धुळीस मिळतात किंवा त्यांत अपूर्व स्थित्यंतरें होतात. यावरून हे दिसून येतें की, सध्या वरील तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात ते कायमचे नव्हेत. हळूहळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हीं समप्रमाणाने करावी लागून साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे व जो जो ती तशी होत जाईल तों तों खरी उन्नति होऊ लागली असें म्हणतां येऊं लागेल.
 समाजवाद हा शब्द आगरकरांच्या काळी आपल्याकडे रूढ झालेला नव्हता; पण त्यांच्या वरील प्रतिपादनाचा भावार्थ तोच आहे हें सहज ध्यानांत येईल. त्यांनी हे लेख लिहिले त्या वेळी संपत्तीची समान नव्हे, पण न्याय्य वांटणी सुद्धा होऊं लागली नव्हती. त्यासाठी दोन महायुद्धे व्हावीं लागलीं; पण त्यानंतर आता पाश्चात्त्य देशांत तरी त्यांनी वर्तविलेली सुखानुभवाची समान इयत्ता प्रत्यक्षांत येत आहे; आणि जेथे ती तशी आलेली नाही त्या देशांची वाटचालहि त्याच मार्गाने चालू आहे, असें दिसतें. हें भविष्यदर्शन पाऊणशे वर्षांपूर्वी आगरकरांना झालें होतें. हाच त्यांच्या प्रतिभेचा विशेष.
धार्मिक सुधारणा
 हिंदु धर्माला आगरकरांच्या काळीं अत्यंत मलिन, हीन रूप आलें होतें. गेली हजार वर्षे तो कर्मकांडात्मक जड धर्म झाला होता. समाजाला अत्यंत घातक अशा रूढींचा त्यांत बुजबुजाट झाला होता. अशा त्या धर्माची आगरकरांना अगदी शिसारी येत असे. "हे अमंगल हिंदु धर्मा" असें त्याला संबोधून ते त्याच्यावर प्रखर टीका करीत. ती टीका कोणत्या प्रकारची होती तें मागे आपण पाहिलेच आहे. आता त्यांच्या मतें धर्माचें उन्नत, परिणतं रूप कोणतें होतें तें पाहवयाचें आहे.
 (१) ऐहिक सुखवर्धन - आगरकरांना हिंदु धर्माचें संशोधन करून त्याला निर्विकल्प रूप आणावयाचें होतें. तें निर्विकल्प रूप कोणतें? "मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन" हा भावी काळांत सार्वत्रिक धर्म व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्या धर्माची त्यांनी स्वतः दीक्षा घेतली होती, आणि आपल्या समानधर्मी सुधारक मित्रांना, "त्यांनी कोणास न भिता, आपल्या मनास जें शुद्ध, प्रशस्त व कल्याणप्रद वाटत असेल तें दुसऱ्यास सांगावें, आणि तदनुसार होईल तेवढें आचरण करावें," असा उपदेश ते करीत असत.
 यावरून हिंदु धर्मांत कोणती सुधारणा व्हावी असें त्यांना वाटत होतें, उन्नत धर्माविषयी त्यांचे काय विचार होते, याची कल्पना येईल.
 धर्माच्या निर्विकल्प रूपाविषयी आगरकरांनी हा जो सिद्धान्त मनाशी निश्चित केला होता त्याच्यामागे त्यांचें दीर्घ चितन, दीर्घ अध्ययन व समाजहिताविषयीची तळमळ ही पुण्याई उभी होती. धर्माविषयी त्यांनी जे विचार मांडले आहेत ते सर्व त्यांतून उद्भवलेले आहेत.
 (२) इहवाद - आजच्या परिभाषेत बोलावयाचें, तर आगरकर खरेखुरे इहवादी होते. आज इहवाद, धर्मनिरपेक्षता हें तत्त्व म्हणून आपण स्वीकारलेलें आहे, आणि भारताचें शासन इहवादी करावयाचें अशी येथल्या नेत्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे; पण तसें घडवावयाचें, तर आपल्या एकंदर सामाजिक व्यवहाराचें अधिष्ठानच बदलणें अवश्य आहे; कारण आज हजारो वर्षे आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व अंगोपांगांवर धर्म-ग्रंथांची अप्रतिहतं अशी सत्ता प्रस्थापित झालेली आहे. श्रुति- स्मृति-पुराणोक्त धर्माची हिंदु जीवनावरची ही सत्ता नष्ट झाल्यावांचून येथे इहवाद यशस्वी होणें शक्यच नाही. आगरकरांच्या आधी पन्नास वर्षे राममोहन रॉय, लोकहितवादी, म. फुले, न्या. मु. रानडे इत्यादि थोर पुरुषांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करून ती सत्ता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्या सर्वांमध्ये आगरकरांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्वाचें स्थान आहे.
 आगरकर स्वतः अज्ञेयवादी होते. "ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियांस अगम्य आहे. हा धर्मासंबंधीचा शेवटचा सिद्धान्त आहे," असें त्यांनी 'आमचें काय होणार' या निबंधांत सांगून टाकलें आहे; आणि या अनुरोधानेच ते समाजशास्त्रीय तत्त्वांचे विवेचन करीत. 'आम्हा मनुष्यांना पाहिजे काय व तें मिळेल कशाने?' या आपल्या निबंधांत ऐहिक अभिवृद्धीला, मानवाच्या इहलोकीच्या उन्नतीला (पारलौकिक) धर्माची मुळीच आवश्यकता नाही, असें त्यांनी निःसंदिग्धपणें सांगितलें आहे. ते म्हणतात, "ग्रीस व इटली देशांचे जुनें वैभव, फ्रान्स देशांतील बडी राज्यक्रान्ति, जर्मनी आणि रशिया यांचे जय, पेशव्यांचा प्रचंड राज्यविस्तार, अमेरिकन लोकांचें स्वातंत्र्य व ज्यावरून सूर्य कधी मावळत नाही असे इंग्रजांचें अफाट राज्य यांचा धर्माशीं म्हणण्यासारखा कांहीएक संबंध नाही. यासाठी ऐहिक सुख पाहिजे असेल त्यांनी राजनीति, पदार्थविज्ञान, नीतिप्रसार, विद्योत्तेजन, यंत्र- कलाप्रसार व धनसंचय या विषयांकडे आपले तन-मन-धन लावावें." याच निबंधांत अन्यत्र त्यांनी म्हटलें आहे की, "ऐहिक व पारमार्थिक सुखाचे विषय व ते संपादण्याची साधनें अगदी भिन्न असल्यामुळे एकमेकांचे एकमेकांशी बहुधा पटत नाही. किंवा तीं परस्परांना उपरोधक असतात, असें म्हटलें तरी चालेल." हा विचार सांगून ऐहिक उन्नतीसाठीहि धर्माची आवश्यकता आहे, असें आग्रहाने प्रतिपादन करणारे जे न्या. मू. रानडे त्यांच्यावर आगरकरांनी कडक टीका केली आहे.
 (३) बुद्धिवादाचे जनक - आजच्या इहवादी तत्त्वज्ञानाचा भावार्थ हाच आहे. पारलौकिक, शब्दप्रामाण्यवादी, पोथीनिष्ठ धर्माचें वर्चस्व ऐहिक व्यवहारावर मुळीच असतां कामा नये हाच इहवादाचा मूळ सिद्धान्त आहे. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, लोकशाही, राजसत्ता, जमिनीची मालकी, इत्यादि जे अनेक प्रश्न सामाजिक जीवनांत निर्माण होतात त्यांच्यासंबंधीचा निर्णय इतिहास, अवलोकन, तर्क, अनुभव, प्रयोग यांच्या आधारानेच केला पाहिजे. श्रुति-स्मृति, बायबल, कुराण यांतील वचनांचा यांत कसलाहि संबंध असतां कामा नये, असे इहवाद सांगतो. आगरकरांच्या प्रतिपादनाचा सारार्थ हाच आहे. भारतांतील बुद्धिवादाचे जनक आगरकरांना म्हणतात तें याच कारणासाठी. त्यांच्या आधीचे राममोहन, रानडे, दयानंद इत्यादि थोर पुरुष जीर्णवादी लोकांप्रमाणे शब्दप्रामाण्यवादी नव्हते; पोथींतील अंध-धर्माचे अनुयायी नव्हते. तरी सामाजिक सुधारणांना शास्त्रवचनांचा आधार शोधून काढावा, असा त्यांचा प्रयत्न असे. आगरकरांना हे मनु-पाराशरांचे वर्चस्व मुळीच मान्य नव्हतें. आम्हांला सामाजिक बाबतीत निर्णय करण्याचा त्यांच्याइतकाच अधिकार आहे, असें तें निश्चयाने सांगत.
 मनुष्यजातीची पूर्णावस्था भविष्यकाळीं व्हावयाची आहे हा बुद्धिवादी पंडितांचा दुसरा सिद्धान्त आहे. बहुतेक सर्व प्राचीन धर्मवेत्ते असें मानीत नाहीत. त्यांच्या मतें मानवी समाजाची पूर्णावस्था मागे सत्ययुगांत होऊन गेली व आता तिचा अधःपात चालू आहे. म्हणूनच सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. मनु, कनफ्यूशियस इत्यादि धर्मवेत्त्यांचे समाजाला स्थिरावस्था आणण्याचे प्रयत्न असत ते याचसाठी. कारण गति प्राप्त झाली की ती अधःपतनाकडेच नेणार, असे त्यांना वाटत असे. म्हणून आहे ही स्थिति तरी टिकवावी या हेतूने त्यांनी धर्मशास्त्र रचलें होतें आणि तसें शास्त्र रचून समाजाला स्थिरावस्था आणण्यांत ते यशस्वी झाले होते, यांत शंका नाही. याच अवस्थेला आगरकर शिलावस्था म्हणतात, आणि हिंदु समाजांवर ओढवलेली ती सर्वांत मोठी आपत्ति होय, असें त्यांचें म्हणणें होतें, आणि तें अगदी यथार्थ होतें. त्यामुळेच आता ती शिलावस्था नष्ट करावयाची तर मनु-याज्ञवल्क्यांच्या धर्मशास्त्रामागे सत्य-कलियुगाची जी कल्पना होती ती नष्ट करणें अवश्य होतें. त्याच हेतूने आगरकरांनी हा प्रपंच केला आहे. पुढे सर्व कलियुग आहे, आता कांही केलें तरी समाजाचा अधःपातच होणार हा विचार ज्या लोकांच्या मनांत दृढमूल होऊन बसणार आहे त्यांची उन्नति होणें कदापि शक्य नाही. कारण उद्योग करण्याची उभारी माणसाला येते ती भविष्यकाळच्या आशेमुळे. ती आशाच कलियुगाच्या तत्त्वज्ञानामुळे नष्ट झाल्यावर उद्योग करण्याचा उत्साह मानवाच्या मनांत टिकून राहणें शक्यच नसतें. हें जाणूनच आगरकरांनी मानवी समाजाची पूर्णावस्था पुढे आहे, हा सिद्धान्त मांडला आहे. कारण मनुष्यजातीचें ऐहिक सुखसंवर्धन हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट होतें.
 (४) विषयसुखाचें महत्त्व - ऐहिक, भौतिक सुखभोगाचें महत्त्व आगरकर सांगतात तो विचार असाच क्रान्तिकारक आहे. सर्व धर्मानी या सुखभोगांची निंदाच केलेली आहे. वेदान्ती संन्यासमार्गी, पारलौकिक धर्मनिष्ठ पंडित नेहमी संसार, स्त्री-पुत्र, धन, राज्य, वैभव यांचा तिरस्कार करतात व त्यांचा त्याग केला पाहिजे, त्यावांचून मोक्ष मिळणार नाही, असें प्रतिपादन करतात. पण मानवजातीचें मोक्ष हें ध्येय आहे हेंच आगरकरांना मान्य नाही. अखिल मानवजातीला ऐहिक सुखाचा लाभ करून देणें यालाच ते धर्म मानतात. त्यामुळे ऐहिक सुखभोगाचें ते आध्यात्मिक सुखासारखेंच आदराने वर्णन करतात. "भात-भाकरीवर कसा तरी जीव राखावा व दोन जाडेभरडे कपडे घालून शरीर झाकावें यापलीकडे आमच्या लोकांची सुखोपभोगाची कल्पना जातच नाही" याविषयी खेद प्रदर्शित करून आगरकर म्हणतात, "आपल्यामध्ये स्वसुखोपभोगाची ही जी हेळसांड, माजली आहे, ती अत्यंत दूषणीय आहे, इतकेंच नव्हे तर ती देशाला शारीरिक व मानसिक दारिद्र्य येण्याचे आदिकारण होय. (केसरींतील निबंध, पुस्तक दुसरें, पृ. १२२). ऐहिक सुखाकडे या दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ति असल्यामुळेच आगरकरांनी त्याचे पुढील उद्गार काढले आहेत. "तीव्र भूक व विषयवासना यांस उत्तम रीतीने भागवितां आल्यास जें समाधान होतें तें अद्वितीय व अवर्णनीय आहे, हें सत्यप्रिय व विचारी मनुष्यास कबूल केलें पाहिजे" (पू. १४४). ऐहिक सुखाची व त्यांतल्या त्यांत विषयसुखाची उठल्याबसल्या निंदा करण्यास चटावलेल्या वेदान्त-प्रवण मनुष्यास हे उद्गार अगदी असह्य होतील; पण हेच विचार राष्ट्राच्या समृद्धीला व म्हणूनच लोकशासनाला पायाभूत होत असतात हें जाणून ते निर्भयपणे सांगितल्याबद्दल आपण आगरकरांना शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.
 (५) प्रवृत्तिवाद - ऐहिक सुखाविषयी असा दृष्टिकोण असलेला पंडित प्रवृत्तिवादाचाच पुरस्कार करणार यांत शंका नाही. आगरकरांनी अनेक ठिकाणी तसा पुरस्कार केला आहे. 'समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक' या निबंधांत ते म्हणतात, "मनुष्यांत व इतर प्राण्यांत एक मोठा भेद आहे. उदरपोषण व स्वजातिवर्धन यांशिवाय इतर सुखांची इतर प्राण्यांना कल्पनाहि नसते; पण मनुष्याला या दोन सुखांशिवाय इतर अनेक मानसिक व शारीरिक उपभोग घेण्यासारखीं मनें व शरीरें प्राप्त झालीं आहेत व त्या अनेक सुखोपभोगांकडे त्याची प्रवृत्तीहि आहे. आता यामुळे मनुष्य अधिक सुखी आहे की नाही याचे समाधानकारक उत्तर देतां येईल, असें वाटत नाही. थोड्या वासना व थोडी तृप्ति आणि पुष्कळ वासना व पुष्कळ तृप्ति या दोन स्थितींपैकी इष्टतर कोणती याचा निर्णय करण्यास कोण समर्थ होणार आहे? या वादांत समंजस मनुष्याने कधी पडूं नये. यांतूनच निवृत्ति व प्रवृत्ति असे दोन विचार व आचारपंथ झाले आहेत; पण फल-मूलाशन करून राहवें, पूर्ण वैराग्याचें अवलंबन करावें, पर्वतांच्या गुहांत वास करावा आणि संसाराच्या भानगडीत पडूं नये, असे निवृत्तिपंथाचे प्रचारक आज शेकडो वर्षे सांगत असतां, व बऱ्याच अंशीं वागून दाखवीत असतां प्रवृत्ति मार्गाकडे जग अधिकाधिक चाललें आहे. तेव्हा सामान्य विचाराअंती असे दिसून येईल की, ऐहिक उपभोगांमुळे मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा सुखी होंवो न होवो, त्या उपभोगांची वांछा तृप्त करावी असाच मनुष्याचा स्वभाव आहे; आणि हें जाणून त्याने इतर प्राण्यांपेक्षा शेकडोपट अधिक उद्योग केला पाहिजे.
 असा उद्योग न केला तर मनुष्याला इष्ट वाटणारी सुखें तर मिळणार नाहीतच; पण तसा उद्योग करणाऱ्या लोकांशी निवृत्तिमार्गी लोकांची गाठ पडली तर त्यांचें स्वातंत्र्यच नष्ट होईल व त्या उद्योगी लोकांच्या अधीन होऊन त्यांना रहावें लागेल. हिंदु लोकांचें सध्या तसें झालें आहे. शेकडो वर्षे कमी वासना व कमी तृप्ति हा निवृत्तिमार्ग स्वीकारून ते निरुद्योगी राहिले; आणि आता अत्यंत उद्योगी अशा इंग्रज लोकांशी त्यांची गाठ पडली आहे. तेव्हा एकतर आम्ही त्यांच्यासारख्या उद्योग करण्यास राजी झालें पाहिजे किंवा ते ज्या स्थितींत आम्हांला ठेवतील त्या स्थितीत राह्ण्यास सिद्ध झाले पाहिजे. आमचें भावी स्वातंत्र्य, अथवा आमचें निरंतरचें दास्य, सर्वर्थव आमच्या उद्योगावर अवलंबून आहे.
 प्रवृत्तिवादावर एक आक्षेप नेहमी घेतला जातो. मनुष्य एकदा ऐहिक सुखाच्या मागे लागला की सुखेच्छेला, त्याच्या वासनांना मर्यादा राहत नाही, आणि त्यामुळे समाजाचा अधःपात होतो. या आक्षेपाला आगरकरांनी दिलेलें वरील उत्तर अभिनव असें आहे. जास्त वासना व जास्त तृप्ति यांमुळे मनुष्य सुखी होवो न होवो; पण भीतीमुळे तो निरुद्योगी झाला तर जो अधःपात होतो तो केव्हाहि स्वीकारार्ह ठरणार नाही. निवृत्तीमुळे समाजाचें स्वातंत्र्यच जातें. यापेक्षा दुसरा अधःपात तो काय? निरयगति कांही निराळी असते काय?
 आगरकरांनी हिंदु धर्मावर व एकंदर धर्म या संस्थेवर फार प्रखर टीका केली आहे; आणि ऐहिक उत्कर्षास धर्माची मुळीच गरज नाही असें म्हटलें आहे; पण ही त्यांची टीका कर्मकांडात्मक धर्मावर आणि पारलौकिक धर्मावर होती हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे; पण धर्माचा व्याप एवढा मर्यादित नाही. समाजाचा प्रभव (उत्कर्ष) ज्याने होतो तो धर्म, ज्यामुळे धारणा होते तो धर्म, अशा ज्या धर्माच्या व्याख्या प्राचीनांनी केलेल्या आहेत, त्याअन्वये पाहतां आगरकरांना धर्मनिष्ठा पूर्ण मान्य होती, असें दिसून येईल. ध्येयवाद, त्याग, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, परोपकार, सत्यनिष्ठा या तत्त्वांनी संपन्न असा जो धर्म तोच खरा धर्म होय, असें त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलें आहे; आणि त्या भूमिकेतून कर्मकांडात्मक धर्मावर टीका केली आहे. कारण त्या धर्माचे पुरस्कर्ते मांसाहार, मदिरापान, व्यभिचार, अनृत-भाषण, विश्वासघात, अप्रामाणिकपणा, क्रूरपणा हीं महापातकें आचरणाऱ्या मनुष्यावर तुटून पडत नसत. निदान त्याकडे दुर्लक्ष करीत. असा महापातकी मनुष्य स्नानसंध्या, टिळेमाळा, जपजाप्य करीत असेल तर त्याच्या पायाचें तीर्थ घेण्यासहि सनातन धर्मनिष्ठ लोक तयार होतील; पण या पातकापासून अगदी अलिप्त असलेला मनुष्य जर शूद्राच्या हातचें पाणी पिईल तर मात्र त्याला ते धर्मभ्रष्ट मानतील! अशी टीका करून आगरकर संतापाने म्हणतात, काय धर्म! काय धर्मशास्त्रे! धिक् तुमच्या धर्माला, आणि तुम्हांला!
 आगरकरांचा रोख कशावर होता हें यावरून ध्यानीं येईल. समाजाचा अभ्युदय घडविणारा जो धर्म त्यावर त्यांचा मुळीच आक्षेप नव्हता. इतकेंच नव्हे, तर त्या धर्माचें त्यांनी स्वतःच जन्मभर आचरण केलें होतें. याच दृष्टीने प्रा. वामनराव जोशी यांनी त्यांना धर्मनिष्ठ, आस्तिक असें म्हटलें आहे. वामनराव 'ध्येय हाच देव' मानीत असत. आणि त्या अर्थाने आगरकरांची देवावरहि श्रद्धा होतो असें त्यांनी म्हटले आहे.
 आचार, नीति व तत्त्वज्ञान हीं धर्माचीं तीन अंगें. त्यांतील आचाराला जड कर्मकांडाचें रूप आलें की तो आगरकरांना त्याज्य वाटे. एरवी सदाचार, बुद्धिपूर्वक घालून दिलेले नियमन त्यांना मान्यच होते. नीतीसंबंधी वर लिहिलेच आहे. नीति हाच खरा धर्म असें त्यांना वाटत असे. राहिलें तत्त्वज्ञान. या बाबतींत आगरकरांनी फारसें विवेचन कोठें केलेलें नाही. 'ईशस्वरूप आमच्या सांप्रतच्या ज्ञानेंद्रियास अगम्य आहे,' असे ते म्हणत असत; पण कोणत्याहि प्रकारच्या तत्त्वज्ञानास त्यांनी कधी तुच्छ लेखिलें नाही. उलट त्या चिंतनाचें त्यांनी फार महत्त्व गाइलें आहे. देवतोत्पत्ति या विषयाचा समारोप करतांना ते म्हणतात, "जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध कळू लागतो तो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागून भूत-पिशाच, देव-दानव यांची असत्यता प्रत्ययास येते. पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते आणि कांही वेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचें परिपालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदान्त- विचाराच्या कुंडांत पेटलेल्या अग्नींत हें द्वतहि खाक होऊन जातें व अहं ब्रह्मास्मि एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो! व्यक्तीच्या व राष्ट्राच्या धर्मविचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत!
 मोठमोठे वेदान्ती- तत्त्ववेत्ते तरी यापेक्षा निराळें काय सांगतात?
राजकीय सुधारणा
 आगरकर जसे कडवे सामाजिक सुधारक होते, तसेच राजकीय क्षेत्रांतहि सुधारणावादी होते, हें त्यांचें असामान्यत्वच म्हटले पाहिजे. कारण बहुधा असें आढळत नाही. महाराष्ट्रांतील इतर पुढारी कुठल्या तरी एकाच क्षेत्रांत विशेष कार्य करणारे होते. लोकहितवादी, रानडे, भांडारकर यांनी मुख्यत: सामाजिक व धार्मिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांच्या लेखांत लोकांचे सामान्य हक्क, प्रतिनिधित्व अशांसारख्या राजकीय सुधारणांची मागणी आहे, नाही असें नाही; पण त्यांचा मुख्य भर सामाजिक व धार्मिक सुधारणांवर होता. त्याच्या उलट टिळक प्रभूति जहाल पुढाऱ्यांचा मुख्य भर राजकीय सुधारणांवर होता. त्यांना सामाजिक सुधारणा नको होती असें नाही; पण राजकीय स्वातंत्र्यासाठी सर्व सामर्थ्य वापरले पाहिजे, त्यानंतर सामाजिक सुधारणा सहज होतील, असें त्यांचे मत होतें. आगरकरांना मात्र समाजाची सर्वांगीण सुधारणा होणें अत्यंत आवश्यक वाटत होतें. राजकीय, धार्मिक व सामाजिक या तिन्ही क्षेत्रांत सुधारणा होते तेव्हाच समाजाची खरी उन्नति होते, असें त्यांचें मत होतें आणि सर्व सुधारणा एकाच वेळीं होणें उचित होय असेंहि त्यांना वाटत होते; पण धार्मिक व सामाजिक सुधारणा प्रथम झाल्यावांचून राजकीय सुधारणा करणें व मिळालेलें स्वातंत्र्य टिकवणें हिंदु समाजाला शक्य नाही म्हणून सामाजिक सुधारणांना त्यांनी अग्रक्रम दिला. तथापि त्यांच्या अनेक लेखांत त्यांनी राजकीय सुधारणांचेंहि विवेचन केलें आहे आणि जहाल पक्ष इंग्रजी राज्यकारभारावर जशी कडक टीका करीत असे, तशीच टीका आगरकरांनीहि केली आहे. तिचें स्वरूप आता पाहवयाचें आहे.
 (१) दारिद्र्य - 'गुलामाचें राष्ट्र' या लेखांत आगरकरांनी हिंदुस्थानच्या दुर्दशेचें वर्णन केलें आहे. इंग्रज सरकारने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी जें सैन्य ठेवलें होतें त्यावर अतोनात खर्च चालू होता आणि इतर खात्यांचा कारभारहि अत्यंत महागडा होता. एका शतकांत त्यासाठी दोन निखर्व रुपये या देशांतून परदेशांत गेले. अशा प्रकारे हा देश धुऊन निघत होता, इंग्रज लोक त्याची लूट करीत होते. त्यामुळे इथल्या लोकांची अन्नान्नदशा झाली होती. हें इंग्रजी राज्य असेंच चालू राहिलें, तर त्याचे या देशावर इतके भयंकर दुष्परिणाम होतील की, भुकेमुळे बेफाम झालेले लोक सरकारविरुद्ध बंड करून उठतील असें त्यांना वाटत होते. ज्याला या देशाविषयी कळकळ आणि लोकहिताविषयी तळमळ वाटत असेल त्याने ही वस्तुस्थिति उघड करून सांगितलीच पाहिजे, असें त्यांचें म्हणणें होतें. ह्यूमसाहेबाने आपल्या पत्रांत हिंदुस्थानांतल्या भयानक दारिद्रयाचें वर्णन केलें होते; आणि दादाभाई नौरोजी, डॉ. हंटर वगैरे लोकहि तेंच सांगत होते. इथले निम्म्याहून जास्त लोक अर्धपोटी आहेत, असेंच त्यांचें म्हणणें होतें.
 दुसऱ्या एका लेखांत आगरकरांनी मुंबई शहराच्या तत्कालीन वैभवाचें वर्णन करून पुढे असें म्हटलें आहे की, हा सगळा बाह्य देखावा डोळे दिपविणारा आहे. वरवर पाहणाराला सगळीकडे झगमगाट दिसत असला, ऐश्वर्य भरलेले दिसत असले, तरी या देशाची व लोकांची स्थिति याहून अगदी वेगळी आहे, फार वाईट आहे. देशांतील बहुतेक संपत्ति फक्त कांही शहरांतून साठलेली आहे व तीहि इंग्रज लोकांच्या मालकीची आहे. बाकी सर्व लोक भुकेकंगाल झालेले आहेत. ई. इं. कंपनी इथला कारभार पाहत होती तेव्हा इथल्या लोकांची स्थिति बरी होती; पण ब्रिटिश सरकारचें राज्य सुरू झाल्यापासून ती खालावत गेली आणि आता तर कमालीची बिघडली आहे. कांही उदार वृत्तीचे इंग्रज लोक हें जाणतात व तसें कबूलहि करतात; पण इथला कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र तसें वाटत नाही. इथे सर्वं आबादीआबाद आहे, इथले लोक सुखी आहेत, अशी त्यांची समजूत झाली असून, त्याप्रमाणे ते ब्रिटिश सरकारला व लोकांना सांगतात.
 अठराव्या शतकांत हिंदुस्थानांत चांगली समृद्धि होती, असें एका इंग्रज मनुष्याने लिहून ठेवलें आहे. इथल्या लोकांना आवश्यक अशा सर्व गोष्टी इथे भरपूर मिळत होत्या. कशाची कमतरता नव्हती. पण त्यानंतर एका शतकाच्या आंत, इथे इंग्रजांचें राज्य आल्यामुळे आता भयानक दारिद्र्य पसरलें आहे. हिंदुस्थानाचा वित्तक्षय चालू आहे. ब्रिटिश लोकांनी जी राज्यव्यवस्था इथे सुरू केली आहे व जे कायदे केले आहेत ते सर्व ब्रिटिश लोकांच्या व व्यापाऱ्यांच्या हितार्थ केले आहेत. त्यामुळे या देशाचें सतत शोषण चालू आहे. चरकांत घालून उसाचा रस काढतात त्याप्रमाणे ते परकीय राज्यकर्ते हिंदी लोकांचें रक्त पिळून घेत आहेत. ही राज्यपद्धति आर्थिक दृष्टीने हिंदुस्थानला अत्यंत हानिकारक असून, तिच्यामुळे आम्ही लवकरच नाहीसें होऊं, असें भय आगरकरांनी व्यक्त केलें आहे; पण पुढे त्यांनी असेंहि म्हटलें आहे की, इंग्लंडमध्ये मेकॉले, रिपन यांच्यासारखे उदार वृत्तीचे बरेच लोक असून, ते हिंदुस्थानावर अशी विपत्ति येऊ देणार नाहीत, असें वाटतें.
 इंग्रज लोक जाणुनबुजून आम्हांला दारिद्र्याच्या खाईत लोटत नसले तरी, त्यांनी केलेल्या कायद्यांमुळे तसें नकळत घडत आहे, हें खरें. म्हणून त्यांच्या नजर- चुकीने आमचें जें नुकसान होत आहे तें त्यांच्या ध्यानांत आणून दिले पाहिजे. त्यांना वस्तुस्थिति समजावून दिली पाहिजे, असेंहि आगरकरांनी म्हटले आहे.
 जगांत जे सुधारलेले देश आहेत, त्यांतील हिंदुस्थान हा सर्वांत गरीब आहे, हे दाखविणारे कांही आकडे आगरकरांनी आपल्या लेखांत दिले आहेत. ग्रेट ब्रिटनमधील प्रत्येक माणसाचें वार्षिक उत्पन्न ४२० रुपये, कॅनडांतील माणसाचें २६९ रूपये, हॉलंडमधे २६०, फ्रान्समध्ये २५८, जर्मनीत १८८, पोर्तुगालमधे १४०, नॉर्वेत १३०, रशियांत १००, तर हिंदुस्थानांतील प्रत्येक माणसाचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त २० रुपये; आणि त्यांतले सगळे त्याला मिळतेंच असें नाही. कांही भाग परदेशांत जातो. त्याचा वार्षिक खर्च मात्र ३० रुपये असतो. याचा अर्थ असा की, बहुसंख्य लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. माणसाचा निरोगीपणा ज्यावर अवलंबून असतो, तें मीठ देखील आपल्याला योग्य प्रमाणांत मिळत नाही. इंग्लंडमधील प्रत्येक माणसामागे ७० पौंड मीठ खर्च होतें, तर हिंदुस्थानांत प्रत्येकाला वर्षांत १० पौंडच मीठ मिळते. या हलाखीचे भयंकर परिणाम हिंदुस्थानांतील लोकांवर स्पष्ट दिसत आहेत. इंग्लंडमधील मनुष्याचे सरासरी आयुर्मान ४० वर्षे आहे तर, हिंदी माणसाचें फक्त २३.५ वर्षे. हिंदुस्थानांतील जमीन सुपीक आहे, निसर्गसंपत्ति भरपूर आहे, सर्वांना पुरेसे अन्न येथे उत्पन्न होतें, पण तरीहि लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. त्यामुळे लाखो लोक अकालीं मरून जातात. त्याशिवाय रोगराईला बळी पडणारे लाखों लोक निराळेच. इंग्रजांच्या राज्यांत इतर सुखसोयी व सुधारणा बऱ्याच आल्या. शांतता प्रस्थापित झाली. शिक्षणाचा प्रसार झाला, हें खरें. पण लोकांना अन्नवस्त्र पुरेसें मिळत नसतांना त्या सुधारणांना मुळीच किंमत नाही. तेव्हा इंग्रज राज्यामुळे अखेरीस आमचें काय हित होईल हें सांगणे कठीण आहे, असें आगरकरकरांनी म्हटले आहे.
 (२) दारिद्र्याची कारणें - अशा प्रकारे हिंदुस्थानांत जें भयानक दारिद्र्य पसरलें होतें, त्याची कारणमीमांसा आगरकरांनी कांही लेखांत केली आहे. ब्रिटिश सरकारचे जे सनदी व बिनसनदी नोकर हिंदुस्थानचा कारभार पाहत होते, त्यांना मोठाले पगार दिले जात, त्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचा प्रवास, त्यांची पेन्शनें, यांसाठीहि अवाढव्य खर्च होत असे. हा सर्व खर्च हिंदुस्थानच्या तिजोरीतून केला जाई. आधीच हिंदुस्थानांतील नोकरशाहीचा कारभार अत्यंत उधळेपणाचा होता आणि त्यांत रुपयाचा भाव खाली आल्यामुळे त्या नोकरवर्गाचें बरेंच नुकसान होऊ लागलें. तेव्हा सर्वांनी आकांडतांडव करून आपला पगार वाढवून घेतला. त्याचा बोजा हिंदुस्थानच्या तिजोरीवरच पडला. तो प्रचंड खर्च भागवण्यासाठी गरीब प्रजेवरील कर वाढवणें एवढाच उपाय सरकारजवळ होता.
 हिंदुस्थानांतील दारिद्र्याचें दुसरें कारण म्हणजे इंग्रज लोकांनी इथले उद्योग-धंदे बंद पाडून इंग्लंडमध्ये उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा मोठा व्यापार इथे सुरू केला हें होय. त्या मार्गे दरवर्षी अमाप संपत्ति हिंदुस्थानांतून इंग्लंडला जात असल्यामुळे इथल्या उद्योगधंद्यांना आणि व्यापाराला पुरेसें भांडवल मिळेनासें झालें. मुसलमानांच्या स्वाऱ्या पूर्वी येऊन गेल्या त्या वेळी त्यांनी जी संपत्ति लुटून नेली तिला काही मर्यादा होती. पुढे मुसलमानी राज्य सुरू झाले तेव्हा ते राज्यकर्ते व सरदार वगैरे सर्व लोक इथेच स्थायिक झाल्यामुळे संपत्तीचा बाहेर जाणारा ओघ थांबला, इथला व्यापार खूप वाढला व देशाची भरभराट झाली. इंग्रजांनी मात्र स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी हिंदी लोकांचा व्यापार बुडवला आणि त्यामुळे हिंदुस्थानांत दारिद्र्य वाढले.
 दारिद्र्याचे तिसरें कारण म्हणजे ब्रिटिश साम्राज्यासाठी जीं युद्धे चालू होतीं, त्यांचा सगळा खर्च हिंदुस्थानच्या माथीं टाकला जात होता. ब्रह्मदेशाशीं युद्ध, वायव्य सरहद्द प्रांतांतील लढाया, यांचा खर्च भागवण्यासाठी हिंदी प्रजेवर कर वाढवण्यांत आले आणि प्रांतिक सरकारांनी शिक्षणावरील खर्च कमी करून केंद्रसरकारला जास्त द्रव्य द्यावें, असा हुकूम काढण्यांत आला. ही नवीन प्रकारची सरंजामदारीच सरकारने सुरू केली होती.
 या युद्धांमुळे फायदा झाला इंग्लंडचा खर्च मात्र हिंदुस्थानचा. त्यामुळे प्राप्तीवरील कर व मिठावरील कर वाढवण्यांत आला. रुपयाचा भाव कमी झाल्यामुळेहि बोजा वाढला आणि अनेक वस्तु महाग झाल्या. अशा प्रकारे सर्व बाजूंनी लोकांचे दारिद्र्य वाढत गेलें.
 (३) इंग्रजांचे काळें अंतरंग - इंग्रज लोकांमध्ये कांही उदार वृत्तीचे पुरुष असले तरी, एकंदरीत ते लोक किती स्वार्थी व मतलबी होते याची आगरकरांना पूर्ण जाणीव होती. इंग्रजांच्या स्वार्थी धोरणाचें विवेचन त्यांनी 'तीन अर्थशास्त्रे' या लेखांत केलें आहे. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला व येथे आपले राज्य स्थापलें तें कांही हिंदी लोकांच्या कल्याणासाठी नव्हे, तर स्वतःच्या फायद्यासाठीच ते राज्य करीत आहेत आणि तें अगदी स्वाभाविक आहे, असें आगरकरांनी म्हटले आहे. त्यांच्या येथील राज्यामुळे हिंदुस्थानांतलाच नव्हे, तर सबंध आशिया खंडांतला बहुतेक व्यापार त्यांच्या हातीं आला आणि त्यामुळे तें राष्ट्र गबर झालें. त्यामुळे इथल्या लोकांचा व्यापार बंद झाला त्याची त्यांना मुळीच पर्वा नाही. या व्यापारामुळे त्यांचा अतोनात फायदा होतो, तो सोडायला ते कधीहि तयार होणार नाहीत. आगरकर म्हणतात, "आमचा सगळा व्यापार आमच्या हातीं फिरून पडूं देण्यापेक्षा आमचें राज्य ते आम्हांस अधिक आनंदाने परत देतील!"
 प्रजेची फारच हलाखी होऊन असंतोष वाढूं नये म्हणून राज्यकर्ते प्रजेच्या कल्याणाची चिंता वाटते असें दाखवतात; पण तें नाटक असतें. चौकशीसाठी कमिशन नेमावें, शेतकऱ्यांना थोडी सूट द्यावी, करांत थोडी सूट द्यावी, एखादा कालवा काढावा किंवा विहीर खणावी, बी-बियाणें वाटावें, गुरांचा दवाखाना काढावा, कोठे जंगलांतील गवत मोफत द्यावें, अशा प्रकारच्या क्षुल्लक सुधारणा करून, ते त्यांचा गाजावाजा खूप करतील, पण कापूस, धान्य, भिन्न धातु, यंत्रे यांचा व्यापार आमच्या हातीं यायला हवा, तो मात्र येऊ देणार नाहीत. काळजापर्यंत जाऊन भिडलेल्या जखमेवर नुसती मलमपट्टी करून कांही उपयोग होत नाही, चांगली औषधे द्यावी लागतात. व्यापार हेंच आमचें रक्तवर्धक औषध होय. पण राज्यकर्ते आम्हांला तें देत नाहीत. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, वगैरे स्वतंत्र देश आपापल्या व्यापाराला उत्तेजन व संरक्षण देतात तसे इंग्लंड देखील स्वतःच्या व्यापारासाठी मदत देते; पण हिंदुस्थानच्या बाबतीत मात्र 'सरकारने व्यापारांत हस्तक्षेप करूं नये' या सामान्य नियमाकडे सरकार बोट दाखवतें. तेलंग, रानडे, दादाभाई नौरोजी या शास्त्रज्ञांनी सरकारला आमच्या व्यापारास कशी मदत करता येईल तें सुचवले असले तरी; सरकार तिकडे लक्षच देत नाही. झोपेचें सोंग करणाऱ्याला जागे कसें करतां येणार! तसेंच या बाबतींतहि सरकारच्या विनवण्या करून कांही उपयोग होत नाही.
 इंग्लिश लोकांच्या अनेक गुणांची आगरकरांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली असली, तरी त्यांचें राजकीय व आर्थिक धोरण अन्यायाचें आहे हें उघडपणें सांगणें आपलें कर्तव्य आहे असें ते मानीत. त्यांच्या चुका दाखवण्याचे काम आपण करावें, त्या सरकारने दुरुस्त केल्या तर ठीकच. नाही तर "प्रजेची दारुण दैन्यावस्था कोणत्याहि राज्यकर्त्यांस केव्हा तरी विघातक झाल्यावांचून राहत नाही" असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
 अठराव्या शतकांत इंग्लिश लोकांच्या दृष्टीने हिंदुस्थानांतली परिस्थिति फार बिकट होती. तथापि अनंत हालअपेष्टा सोसून त्यांनी येथे आपली सत्ता स्थापिली. त्यांचा पराक्रम व त्यांची कर्तबगारी सध्या येथे राज्य करणाऱ्या लोकांत मुळीच नाही. उलट ते नादान, क्रूर व स्वार्थी असून, विलासीहि आहेत. त्यांना कित्येक सुखोपभोग मिळत असूनहि त्यांची इथल्या परिस्थितीबद्दल तक्रार असतेच; हिंदुस्थानला ते काळें पाणी म्हणजे अगदी वाईट देश म्हणतात. हिंदुस्थानांत नोकरी करणें म्हणजे हद्दपार केलेल्या मनुष्याप्रमाणे कष्टमय, दुःखमय जिणें कंठणें असें मानतात. अशा इंग्रज अधिकाऱ्यांना आगरकर विचारतात की, "हिंदुस्थानांत जर तुमचे एवढे हाल होतात, तर तुम्ही येथे येतां कशाला? इकडे आल्यानंतर तुम्हांला जर इथे राहणें असह्य वाटू लागतें, तर तुम्ही परत का जात नाही? येथे राज्य करणें जर तुम्हांला कठीण वाटत असेल, तर तें तुम्ही सोडून कां देत नाही? तुमच्या सुखासाठी इथल्या गरीब लोकांना कां पिळून काढतां?"
 अफू व दारू यांच्या बाबतींत ब्रिटिश सरकारने जें दुटप्पी धोरण अवलंबिले होतें, त्यावर आगरकरांनी खूप ताशेरे झाडले आहेत. वास्तविक पाहतां हे दोन्ही मादक पदार्थ अपायकारक आहेत; पण तुलनेने पाहतां अफूपेक्षा दारूचे परिणाम जास्त घातक असतात. अल्प प्रमाणांत अफूचें सेवन केलें तर तें शरीराच्या आरोग्याला उपकारक ठरतें असेंहि एक मत आहे; पण ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या दारूचा खप हिंदुस्थानांत वाढविण्यास उत्तेजन देतें; कारण त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांचा फायदा होतो. हिंदुस्थानांतील लोकांचें दारूचें व्यसन कमी करण्यासाठी इंग्लंडमधून येणाऱ्या दारूवर अधिक कर बसविणें अवश्य आहे, पण त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांचें नुकसान होईल, म्हणून सरकार तसें करीत नाही. दारूपायीं आमचें वाटोळें झालें तरी चालेल, पण इंग्रजांचें नुकसान होतां कामा नये, म्हणून हिंदी लोकांच्या घशांत दारूच्या बाटल्या ओतायच्या, असें सरकारचें धोरण आहे. अफूच्या कमी घातक व्यसनापासून मात्र हिंदी लोकांची सुटका केलीच पाहिजे, असें सरकारला वाटतें. हिंदुस्थानांतून चीनमध्ये जी अफू जाते तिच्यामुळे हिंदुस्थानला आठ-नऊ कोटि रुपये फायदा होतो; पण हा व्यापार बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. कारण अफू खाणें फार वाईट! त्यामुळे आर्थिक नुकसान झाले तरी पर्वा नाही, कारण तें नुकसान नेटिव्ह संस्थानांचे व हिंदुस्थान सरकारचें होतें. त्यावर मानभावीपणें त्यांनी तें कसें तरी भरून काढावें असें ब्रिटिश सरकार म्हणते. दारूचें व्यसन कितीहि वाईट असले तरी, तिच्या खपावर आळा घालून स्वतःचें नुकसान करून घ्यायला मात्र तें सरकार तयार नाही. पण सुदैवाने अफूचा व्यापार बंद करण्याविषयी जो ठराव पार्लमेंटमध्ये मांडण्यांत आला होता, त्याला ग्लॅडस्टनने विरोध केल्यामुळे तो रद्द झाला आणि ग्लॅडस्टनने मांडलेला नेमस्त ठराव पसार झाला. अफूचा व्यापार नीतीच्या दृष्टीने हीन असला, तरी या बाबतीत केवळ नैतिक तत्त्वांचा विचार करून चालणार नाही; तर आर्थिक व राजकीय विचारहि केला पाहिजे; हिंदुस्थानचे किती नुकसान होईल, प्रजेची काय दशा होईल, इतर अडचणी काय येतील, हें पाहिलें पाहिजे, असें त्याने प्रतिपादिले आणि तें पार्लमेंटने मान्य केलें; पण अशी गोष्ट घडणें हें अपवादात्मकच.
 'हिंदुस्थानचें राज्य कोणासाठी' या लेखांतहि आगरकरांनी इंग्रजांचा स्वार्थीपणा उघड करून दाखविला आहे. लिबरल पक्षाच्या कांही नेत्यांच्या मनांत ग्लॅडस्टनप्रमाणे हिंदुस्थानविषयी उदारपणाचे विचार येत असत; हिंदुस्थानांत यांत्रिक शिक्षणाची व कारखान्यांची वाढ व्हावी, राज्यकारभाराच्या निरनिराळ्या खात्यांत हिंदु लोकांना अधिकाराच्या जागा द्याव्या, सारांश, त्या लोकांची प्रगति व्हावी. असें त्या नेत्यांना वाटत होते; पण कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या लोकांना मात्र तें मंजूर नव्हतें. हिंदी लोकांना कोणत्याहि खात्यांत वरच्या जागा देऊ नयेत, कारखाने तेथे वाढू नयेत असेंच त्यांचें ठाम मत होतें; कारण त्यामुळे इंग्रजांचे वर्चस्व कमी झालें असतें. हिंदुस्थानचा फायदा होवो न होवो, त्यांना त्याची पर्वा नव्हती. इंग्लंडचा फायदा झाला पाहिजे, इंग्रजांचें राज्य कायम राहिलें पाहिजे हाच त्यांचा हेतु होता. त्यामुळे हिंदुस्थानांत इथल्या लोकांसाठी सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा ठेवण्यासहि त्यांचा विरोध होता. हिंदु लोकांनी राज्यकारभारांत शिरकाव करणें त्यांना मुळीच पसंत नव्हतें. कारण त्यामुळे तेवढ्या जागा इंग्रजांना कमी झाल्या असत्या व त्यांना चरायला रान कमी झालें असतें
 "इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संयोग घडून आल्यापासून हिंदुस्थानचें कांहीच कल्याण झालें नाही किंवा हिंदुस्थानच्या लोकांस मुळीच न्याय मिळाला नाही, असें प्रतिपादणें म्हणजे केवळ कृतघ्नपणा होय, हें आम्हांस कबूल आहे; पण ज्या गोष्टींचा संबंध इंग्लंडच्या तिजोरीशीं, तेथील व्यापाराशी किंवा इंग्रजांच्या अन्य हिताहिताशी पोचत असेल अशा बाबतींत इंग्लंडने हिंदुस्थानचे कल्याण केल्याचें किंवा येथील लोकांस इंग्लंडपासून न्याय मिळाल्याचें क्वचितच उदाहरण दाखवितां येईल." आगरकरांच्या या विधानांत वरील सर्व विवेचनाचें सार आहे. साम्राज्यासाठी युद्धे, व्यापार, सिव्हिल सर्व्हिस या बाबतींत अन्याय झालाच होता. त्यांत कापडावरील जकातीबाबतच्या धोरणामुळे भरच पडली. रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे जी तूट येणार होती, ती भरून काढण्यासाठी सरकारने परदेशांतून येणाऱ्या मालावर शेकडा पांच जकात बसविण्याचें ठरविलें होतें. ही जकात म्हणजे हिंदुस्थानातील लोकांवर अप्रत्यक्ष करच होता; पण त्यांतहि मोठा अन्याय म्हणजे ब्रिटिश गिरणी मालकांच्या फायद्यासाठी त्यांच्या कापडावरील जकात माफ करणें हा होय. मँचेस्टरचें कापड इकडे येत होतें, त्यावर जकात बसविली तर तिथल्या गिरणीवाल्यांचा रोष पत्करावा लागला असता. आणि तें ब्रिटिश सरकारला परवडणारे नव्हते. हिंदुस्थानचे नुकसान झालें तरी चालेल, पण ब्रिटिश कारखानदारांचें व व्यापाऱ्यांचे नुकसान मुळीच होता कामा नये, हेंच त्याचें धोरण होतें. मग तूट भरून काढण्यासाठी प्राप्तीवरील कर वाढवण्याचा विचार सुरू झाला. हा विचार तर फारच घातक होता. "इंग्लिश अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आधीच निष्कांचन झालेल्या प्रजेला असें पिळून काढणें अत्यंत लज्जास्पद आहे; सरकारच्या या वर्तनास काय नांव द्यावें तें आम्हांस समजत नाहीं," असे उद्गार आगरकरांनी काढले आहेत. तसेच आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीवर व दगडी कोळशावर जकात बसल्यामुळे हिंदुस्थानांतील गिरणीवाल्यांचें कापड महाग होऊन त्यांना बाहेरील मालाशी चढाओढ करणें कठीण पडणार होतें. मँचेस्टरवाल्यांना ही जकात पडणार नव्हती; आणि कापडावरहि जकात नाही; म्हणजे त्यांचा दुहेरी फायदा होणार.
 हिंदुस्थानांतील दारिद्र्याची मीमांसा करून व इंग्लंडच्या स्वार्थी धोरणावर टीका करून आगरकरांनी राज्यकर्त्यांना वारंवार इशारा दिला आहे की, अतिलोभ धरूं नका; नाही तर तुम्हांला हें राज्यच सोडून जावें लागेल. पूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अमर्याद लोभामुळे १८५७ सालचा प्रक्षोभ ओढवून घेतला, त्याचप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्ते भरमसाठ कर वाढवून प्रजेत असंतोष वाढवीत आहेत; त्याचा परिणाम फार घातक होईल. दारिद्र्य असह्य झालें तर प्रजा बंड करून उठेल; आणि "इतक्या कष्टाने रचलेली इमारत ढासळल्यावांचून राहणार नाही", असें आगरकरांनी लिहिले आहे. "लोभमूलानि पापानि" हें वचन ध्यानांत ठेवा, असेंच त्यांच्या लेखाचें शीर्षक आहे.
 (४) स्वावलंबन - अशी विपन्नावस्था आलेली असतांना, ती नाहीशी करून ऊर्जितावस्था आणण्यासाठी स्वावलंबन हाच सर्वोत्तम उपाय होय, असें आगरकरांनी प्रतिपादलें आहे. आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत; "नर करणी करे तो नरका नारायण हो जाय" हें हिंदी वचन लक्षांत ठेवून आपण दीर्घोद्योगाचा अबलंब करायला हवा, तरच आपली स्थिति सुधारेल व सर्व प्रकारचें सुखोपभोग आपल्याला मिळू लागतील, असें त्यांनी म्हटले आहे. सरकारचें नियंत्रण करण्याचें सामर्थ्य लोकांच्या अंगीं असले पाहिजे. सरकार जुलमी असणें किंवा नसणें, हें लोकांवर अवलंबून असतें. ज्यांना स्वातंत्र्याची खरी चाड असेल, ते योग्य संधि मिळतांच आपलें स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड करतील. "इंग्लिश लोकांनी आमची संपत्ति नेली, आम्हांला गुलाम केलें, कंगाल केलें, असें रडगाणे गात बसण्यांत अर्थ नाहीं" म्हणून लोकांना जागे करून, उद्योगास प्रवृत्त करावें, स्वतःच्या पायावर उभे राहून दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग दाखवावा हाच त्यांच्या लेखनाचा हेतु होता.
 स्वावलंबनाचा मार्ग दाखवतांना आगरकरांनी आपल्या लोकांच्या नादानपणावरहि ताशेरे झाडले आहेत. आम्ही दुबळे, नालायक म्हणून आमचें राज्य गेलें व त्यामुळेच आमचा व्यापार बुडाला, उद्योगधंदे बंद झाले आणि दारिद्र्य कपाळीं आलें. इंग्रज लोक आपण होऊन सुखासुखी त्यांचे कारखाने आमच्या ताब्यांत देणार नाहीत. धमक असेल तर ते आपण आपल्या कर्तबगारीने काबीज केले पाहिजेत; पण आम्ही पंगु, अडाणी व आळशी असल्यामुळे तें कठीण आहे. इंग्रज लोक उद्योगप्रिय आहेत, कारण त्यांना सुखोपभोगाची आवड आहे; आणि त्यासाठी नाना प्रकारच्या वस्तु निर्माण करण्याची बुद्धि आहे; पण आम्हांला हजारो वर्षे वैराग्याची शिकवण मिळालेली असल्यामुळे सुखोपभोगाची फारशी आवड नाही, व त्यासाठी उद्योग करण्याची इच्छा नाही. आम्ही अल्पसंतुष्ट आहों. हा अल्पसंतुष्टपणा सोडल्याशिवाय आम्हांला मोठमोठे उद्योग करतां येणार नाहीत. देशासाठी कष्ट करण्याची व नुकसान सोसण्याची ईर्षा बाळगून मोठे यांत्रिक कारखाने काढले पाहिजेत, व खंडोगणती माल उत्पन्न केला पाहिजे, असें त्यांनी म्हटलें आहे.
 आता मोठाले उद्योग व कारखाने सुरू करावयाचे म्हणजे मोठे भांडवल हवें. त्याचा तर आमच्याकडे अभाव! तें उभारण्यासाठी लोकांनी आपला सोन्याचा हव्यास कमी करावा; दागदागिने, लग्नसमारंभ यांवरील खर्च कमी करावा; ज्यांच्याजवळ थोडाबहुत पैसा शिल्लक असेल त्यांनी तो बँकेत न ठेवतां थोडेसें धाडस करून उद्योगधंदेवाल्यांना द्यावा; मग भांडवल निश्चित जमेल, असें आगरकरांनी म्हटले आहे.
 शेवटी आगरकरांनी पुढील वाक्यांत वरील सर्व कहाणीचें सार सांगितलें आहे- आमच्या अंगीं देशाभिमान असता; आम्ही धर्मवेडाने वेडावून जाऊन आपापसांत तंटे करीत नसतो; परशत्रूला तोंड देण्यासारखी आम्हांत जूट असती; राष्ट्रहितासाठी स्वहितत्याग करण्याची आवड आम्हांस असती; आम्हांस आमचें राज्य चालविण्याची अक्कल असती; आणि कोणत्याहि प्रकारच्या संकटास न डगणारें धैर्य आमच्या अंगी असतें, तर मुसलमान तरी येथे कशाला येते! आणि इंग्रज तरी कशाला येते! तेव्हा रडत न बसता राज्यकर्तृत्वाचे गुण संपादन करणे हाच श्रेष्ठ उपाय होय, असा उपदेश त्यांनी केला आहे.
 समाजसुधारणांची मुळें ज्याप्रमाणे धर्मशास्त्रांत गुंतलेली होतीं त्याचप्रमाण आर्थिक सुधारणांची मुळे पारतंत्र्यांत, सत्ताधाऱ्यांच्या राजनीतिशास्त्रांत गुंतलेलीं होती. त्यामुळे आगरकरांनी आर्थिक व राजकीय सुधारणांचा विचार बहुधा एकत्रच केलेला आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे विवेचनहि येथे एकत्र केलेले आहे.





-६-

प्राचीन परंपरेचा अभिमान


 आगरकरांनी आपल्या लेखांतून स्वकीय समाजांतील चालीरीति, रूढि, सण, धार्मिक आचार, विधि, जातिभेद, गुणलोप यांवर प्रखर टीका केली आहे; आणि परकीय लोकांची विद्या, त्यांची समाजव्यवस्था, त्यांचा राज्यकारभार यांची विलक्षण स्तुति केली आहे. त्यामुळे त्यांच्यासंबंधी कांही लोकांचा असा गैरसमज झाला होता की, त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल तिरस्कार वाटत होता; पण हा समज खरा नाही. इंग्लिश लोकांची त्यांनी अनेक बाबतींत स्तुति केलेली असली, तरी त्यांच्या राजकीय व आर्थिक धोरणावर त्यांनी कडक टीका केली आहे (हैं आपण वर पाहिलेच आहे); आणि त्यांनी आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमानहि वारंवार प्रगट केला आहे. समाजाची सुधारणा व्हावी या सद्हेतूनेच त्यांनी सामाजिक दोषांवर टीका केली व इंग्रजांचे गुण गाईले हे आपण ध्यानांत ठेवले पाहिजे.
स्वधर्म
 आगरकरांना स्वधर्माचा विलक्षण अभिमान होता. हिंदु धर्मांत अनेक व्यंगें असली किंवा आमच्या अनेक चालीरीति मूर्खपणाच्या असल्या तरी, आपला धर्म सोडून दुसरा एखादा धर्म स्वीकारणें हें त्यांना मुळीच मान्य नव्हतें. तसें करील तो सुधारकच नव्हे; स्वभूमींत, स्वलोकांत, स्वधर्मांत आणि स्वाचारांत राहून अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भितां, त्यांची सुधारणा करणें यांतच खरी देशप्रीति, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरें शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे, असें त्यांनी म्हटले आहे. हिंदु धर्मातील दोष दाखवून त्यावर ते तीक्ष्ण प्रहार करीत असले तरी, धर्मांतर त्यांनी निंद्यच मानलें होतें. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या थापांना भुलून अतिशूद्र लोक खिस्ती धर्माकडे धांव घेत होते, ही गोष्ट त्यांना उद्वेगजनक वाटत होती; कारण ख्रिस्ती लोकांच्या धर्मसमजुती कांही अधिक चांगल्या नव्हत्या. देश ख्रिस्ती व्हावा, ही कल्पनाहि त्यांना असह्य वाटत होती. पाश्चात्त्य लोकांचे जे विचार योग्य वाटत असतील, ज्या कल्पना ग्राह्य असतील त्यांचा स्वीकार केला पाहिजे हें खरें पण जुनें असेल तेवढे सर्व टाकून, प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणें ही सुधारणाहि नव्हे व तें हितावहहि नाही; तर भारतीय संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी न सोडतां अवश्य तेवढ्याच पाश्चात्त्य कल्पना अंगीकारणें उचित होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
भारतीय कला
 स्वधर्म व स्वसमाज यांवर टीका करतांना आगरकरांनी आपले असंख्य दोष दाखवून, आपल्या समाजाची इंग्रजांशी तुलना करून आपण अत्यंत क्षुद्र लोक आहों, असे म्हटलें आहे; पण असे असले तरी त्यांनी असेंहि स्पष्टपणे सांगितलें आहे की, आज आपली स्थिति अतिशय हीन झाली असली तरी तेवढ्यावरून प्राचीन काळींहि आपली तशीच स्थिति होती असें मुळीच सिद्ध होत नाही. अनेक लेख लिहून त्यांनी असे दाखवून दिलें आहे की, आम्ही ज्याचा अभिमान धरावा असे खूपच वैभव आमच्या प्राचीन इतिहासांत होतें. ते म्हणतात, "नीति, औदार्य वगैरे मानसिक गुणांचा, किंवा काव्य, चित्र, गायन, वादन इत्यादि ललितकलांचा, अथवा दुर्गरचना गृहरचना, मूर्तिघटना, पाषाणखनन इत्यादि शिल्पकलांचा येथे अभ्युदय होऊन त्यांची इतकी समृद्धि झाली होती की, त्या संबंधाने आजमितीस सुद्धा आम्हांस कोणापुढेहि खाली पाहण्याची आवश्यकता नाही.
 जी नवीन यंत्रकला पाश्चात्त्य देशांत विकास पावली आहे, ती युरोपियन लोकांकडून आम्हांला शिकायला हवी हें खरें; पण आमची जुनी हस्तकलाहि उच्च दर्जाची होती आणि तिचें रक्षण करणें अत्यंत आवश्यक आहे, असें मत आगरकरांनी प्रगट केलें आहे. जुन्या हस्तकलेच्या विकासासाठी त्या नवीन यंत्रकलेचें साहाय्य घेतलें पाहिजे; नाही तर तिचा लोप होईल, असें त्यांचें म्हणणें आहे. ती हस्तकला अभिमानास्पद असल्यामुळेच ती नष्ट होणें त्यांना इष्ट वाटत नव्हतें.
पाश्चात्त्य पंडितांची टीका
 कांही पाश्चात्य पंडितांनी अशी टीका केली आहे की, हिंदुस्थानांतील लोकांनी स्वतः कलाकौशल्याची अभिवृद्धि कधीच केलेली नाही; जें कांही हस्त-कौशल्याचें काम इथे दिसतें, तें सर्व त्यांनी ग्रीक, रोमन व मुसलमान यांच्याकडून शिकन केलेलें आहे. त्यांचे स्वतःचें असें येथे कांही नाही. हें विधानं कसें साफ चुकीचें आहे हें सिद्ध करण्यासाठी आगरकरांनी पुष्कळ परिश्रम करून साधकबाधक पुरावे गोळा केले आहेत. यासंबंधी त्यांनी जें विवेचन केलें आहे, त्याचा सारांश खाली दिला आहे, त्यावरून भारतीय कलांचें पुराणत्व निर्विवादपणें सिद्ध होतें, यांत शंका नाही.
 कलांच्या अभिवृद्धीसाठी कोणत्याहि देशांत समृद्धि असावी लागते. अन्नधान्य, वस्त्रप्रावरण यांची विपुलता असते तेव्हाच कलावंतांना चरितार्थासाठी फार कष्ट वा चिंता करावी लागत नाही; आणि कलाकुसरीचीं कामें करायला वेळ व स्वस्थपणा मिळू शकतो. भारतांत प्राचीन काळी सर्व प्रकारची समृद्धि नांदत होती. हिमालय, विंध्य, सह्य वगैरे पर्वतांवर घनदाट अरण्ये असून, त्यांत नाना प्रकारचे वृक्ष होते, शेकडो जातींचे पशुपक्षी होते; सर्वत्र सुपीक जमीन असून खंडोगणती धान्य पिकत होतें; येथे खनिज संपत्ति भरपूर होती. एकंदरींत कशाची कमतरता नसल्यामुळे या देशांतील लोकांना कलेचा विकास करण्यासाठी अवश्य असणारें स्वास्थ्य लाभत होतें.
 या समृद्धीमुळे हिंदुस्थानांत विविध प्रकारच्या कला पूर्वी विकसित झाल्या होत्या, हें अनेक प्रमाणांनी सिद्ध करून दाखवतां येतें. मनुस्मृति हा ग्रंथ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा असून, त्यांत अनेक कलांचा व कारागिरांचा उल्लेख आहे. त्यांचे सविस्तर वर्णन त्या ग्रंथांत नसले, तरी त्या काळीं त्या कला विकसित झालेल्या असल्या पाहिजेत, हें उघड आहे. देवालयें, हौद, विहिरी, प्रासाद, दुर्ग, इत्यादि बांधण्याचे शास्त्र हिंदु लोकांना ज्ञात होतें.; लोकर, कापूस, ताग, रेशीम यांपासून वस्त्रे विणून तो रंगविण्याची कला त्यांना अवगत होती; सोन्यारुप्याचे दागिने घडविण्यांत ते कुशल होते. लोखंड, तांबें, पाषाण, हस्तिदंत यांचीं पात्रे वा सुबक वस्तु ते बनवीत होते; नाणी तयार करीत होते, आणि विविध प्रकारच्या वस्तूंचा परदेशांशी मोठा व्यापार चालू होता, असें मनुस्मृतीवरून कळतें. तोपर्यंत भारतांत ग्रीक लोक येऊन स्थायिक झाले नव्हते; आणि मुसलमान तर त्यानंतर शेकडो वर्षांनी आले. तेव्हा आज ज्या कला येथे आढळतात त्यांची अभिवृद्धि फार प्राचीन काळी झालेली आहे; तिचा ग्रीक वा मुसलमान लोकांशी कांही संबंध नाही. रामायण च महाभारत या ग्रंथांतहि असे अनेक उल्लेख आढळतात. सर जॉर्ज बर्डवूड यांनी रामायणाच्या आधारे हिंदुस्थानच्या कलांच्या पुराणत्वाचें मंडन केलें आहे. भरत रामाला भेटण्यासाठी निघाला, त्या वेळीं अयोध्येंतील लोकहि त्याच्याबरोबर निघाले. त्यांत सर्व प्रकारचे कारागीर होते, असें वर्णन रामायणांत आहे. यावरून त्या काळी त्या कला विकसित झालेल्या होत्या, यांत कांही शंका नाही. ग्रीक लोक हिंदुस्थानांत कायमचे राहिले नव्हते; पण त्यांच्याशीं भारतीय लोकांचें दळणवळण मात्र चालू होतें. तेवढ्यावरून हिंदु लोकांनी ग्रीकांकडून सगळी कारागिरी घेतली, असें म्हणतां येत नाही. उलट येथील कलाकुसरीच्या वस्तु परदेशांत जात होत्या व त्यांचे तिकडे कौतुक होत असे, असेंच त्यावरून म्हणावें लागेल. मुसलमान लोक इथे येऊन स्थायिक झाले, व त्यांनी येथे राज्य केलें हें खरें पण ते संस्कृतीने श्रेष्ठ, नव्हते; त्यामुळे त्यांचा प्रभाव पडणें शक्य नव्हते; आणि ते येण्यापूर्वीच आमच्या कला विकसित झालेल्या होत्या.
वेदांतील पुरावा
 वेद हे हिंदूंचे आद्य ग्रंथ आहेत आणि ते सर्वांत प्राचीन ग्रंथ आहेत याविषयी जगांतील पंडितांचे एकमत आहे. वेदांतील ऋचा म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य इत्यादि देव यांच्या प्रार्थना आहेत. त्या प्रार्थना ज्या आर्यलोकांनी केल्या आहेत, त्यांना अनेक वस्तूंचे धर्म समजलेले असावे, ते वन्यावस्थेंतून वर येऊन त्यांच्यांत समाज-व्यवस्था उत्पन्न झालेली असावी, त्यांना राज्यधर्म, माहीत झालेला असावा, असें अनुमान करतां येतें. पंडितकृत वेदार्थयत्नांत, वेदांत निरनिराळ्या वस्तूंचे व कलांचें जे उल्लेख आहेत त्यांची जंत्री दिली आहे. त्यावरून त्या काळी आर्य लोकांना सोनें, रूपें, लोखंड इत्यादि धातूंचा उपयोग माहीत होता, शेती व पशुपालन हे उद्योग ते करीत होते, धनुष्यबाण, खड्ग, रथ वापरीत होते, घरें, शहरें व किल्ले बांधीत होते, असें दिसून येतें. यावरून असें सिद्ध होतें की, या सर्व कला येथे अत्यंत प्राचीन काळी उदय पावल्या आणि विकसित झाल्या होत्या.
बाह्य पुरावा
 भारताच्या प्राचीन संस्कृतीविषयी परकीय संशोधकांनी पुष्कळ लिहून. ठेवलेले आहे. 'फ्लारिडा' व 'पेरिप्लस' या ग्रंथांत भारताच्या व्यापाराविषयी बरीच माहिती मिळते. मिरी, दालचिनी, नीळ, केशर, हळद, कापूर, हस्तिदंत या पदार्थांप्रमाणेच सोन्यारुप्याचे दागिने, रेशमी कापड, मलमल, साखर; साग, शिसवी, शिंगें, वगैरेंचें कोरीव सामान; काचेचीं भांडीं, सोन्यारुप्याची तबकें इत्यादि वस्तूहि भारतांतून परदेशी जात होत्या. इ. स. पूर्वी अनेक शतकें असा व्यापार चालत होता, असें त्या ग्रंथांवरून कळते. यावरून प्राचीन काळीं पुष्कळ उच्च दर्जाची संस्कृति भारतांत नांदत होती, हें सिद्ध होतें.<br?हिंदु स्त्रीचें चरित्र्य
 स्वधर्म व प्राचीन भारतीय परंपरा यांबद्दल आगरकरांना जसा अभिमान होता, तसाच हिंदु स्त्रीच्या चारित्र्याविषयी त्यांना फार आदर होता. त्यावर कोणीं कुत्सित टीका केलेली त्यांना मुळीच खपत नसे. अशबरनर नामक एका इंग्लिश गृहस्थाने नॅशनल रिव्हयूमधील आपल्या लेखांत हिंदु विधवांबद्दल अत्यंत अशिष्ट विधाने केलेली जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा ते फारच संतापले. मात्र त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने संयमपूर्वक लेख लिहून त्या आरोपाचे खंडन केलें आहे. अशबरनरने लिहिलें होतें की, "हिंदु विधवांस वाटेल तसा आनाचार करण्यास हिंदु समाजाने पूर्ण सनद दिली आहे. तिच्या पापाचरणाकडे समाज जाणूनबुजून दुर्लक्ष करितो." या आरोपांत मुळीच तथ्य नाही; कारण कर्नल मनरोसारख्या गृहस्थांनी हिंदु स्त्रियांचें शुद्ध आचरण आदर्शवत मानले आहे, असें आगरकरांनी दाखवून दिलें आहे.
 अशबरनरप्रमाणेच ऑगस्टस बुइलर्ड नांवाच्या एका लष्करी अधिकाऱ्यानेहि हिंदु स्त्रियांविषयी विपर्यस्त विधानें केलेली होतीं. त्यांचाहि आगरकरांनी एका लेखांत असाच समाचार घेतला आहे. त्या गृहस्थाने हिंदुस्थानी संगीताचा खोल अभ्यास करून एक ग्रंथ लिहिला. तो चांगला असला, तरी त्याने नायकिणींच्या तोंडी असलेल्या शृंगारिक चीजांवरून इथल्या सामान्य स्त्रियांना अगदी कामातुर ठरवून टाकलें आहे आणि त्याची कारणमीमांसाहि केली आहे. अशा प्रकारे काव्य व संगीत यांवरून लोकांच्या नीतीविषयी कांही निष्कर्ष काढणें हें अगदी खुळचट व चुकीचें आहे, असें सांगून शेवटीं आगरकर म्हणतात, "कोणत्याहि देशांतील लोकांनी दुसऱ्या देशांतील लोकांस व्यभिचारी ठरविण्याचें धाडस करूं नये. तथापि जर ते आपण होऊन तो दोष आमच्या स्त्रियांवर अविचाराने आणूं लागतील, तर तुमच्या मडमांनी आमच्या स्त्रियांचें तीर्थ घेऊन त्या पापापासून मुक्त व्हावें इतक्या त्या पवित्र आहेत, असें म्हणण्यास आम्ही कधीहि सोडणार नाही! हिंदुस्थानांतील स्त्रियांच्या पातिव्रत्याइतकें शुद्ध पातिव्रत्य बहुधा दुसऱ्या कोणत्याहि देशांत सापडणार नाही."




-७-

व्यक्तिमत्त्व

करुणा, मानवता
 आगरकरांची मूळ प्रेरणा मानवतेची, करुणेची, भूतदयेची होती असें दिसतें. विष्णुशास्त्री, टिळक, सावरकर यांची प्रेरणा राष्ट्रोद्धाराची, स्वातंत्र्याची, होती. दीन, दलित जनता, शूद्र, अस्पृश्य, स्त्रिया यांचा उद्धार व्हावा याची आच त्यांना नव्हती असें नाही; पण तसें न केल्यास समाज संघटित होणारं नाही, एकजूट साधणार नाही, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यांत ब्रिटिशांविरुद्ध अखिल भारताची आघाडी उभारतां येणार नाही, ही त्यांना मूळ चिंता होती. अखिल जनता जागृत करण्यासाठी त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले ते राष्ट्रसंघटनेच्या हेतूने. आगरकरहि राष्ट्रनिष्ठ व स्वातंत्र्यवादीच होते, पण समाजसुधारणेचा त्यांचा जो आग्रह होता, त्यासाठी त्यांना जी पराकाष्ठेची तळमळ वाटे तिच्या मागे दया, करुणा ही प्रेरणा फार प्रभावी होती. म्हणजे त्यांचें चित्त गलबलून येत असें तें बालविधवा, उपेक्षित स्त्रिया, दलित जनता यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, कष्ट, जुलूम यांमुळे. विषमता, अन्याय हा मानवतेविरुद्ध अन्याय आहे, याचा त्यांना संताप येत असे आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे, ती विषमता नष्ट झाली पाहिजे, हा त्यांचा पहिला उमाळा असे. ते लेखणी उचलीत ती त्या प्रेरणेने.
तीव्र भावना
 यामुळेच आगरकर आपल्या दोन थोर सहकाऱ्यांपेक्षा जास्त भावनाप्रधान झाले होते. विष्णुशास्त्री व टिळक यांच्या वृत्तींत व लेखनांत भावनांचा ओलावा तसा फार कमी, पांडित्याचा प्रकर्ष करून, इतिहासांतील प्रमाणांचा वर्षाव करून, उपरोध, उपहास, या शस्त्रांनी प्रतिपक्षाला जमीनदोस्त करण्यावर विष्णुशास्त्री यांचा भर असे. आणि शत्रूवर तसा भडिमार केल्यावर त्याच्याकडे विष्णुशास्त्री मिस्किलपणे पाहत उभे आहेत, असें चित्र मनापुढे येतें. लो. टिळक स्थितप्रज्ञ वेदान्ती होते. सुख-दुःख, राग-द्वेष त्यांनी जिंकले होते. म्हणून लहान, आटोपशीर वाक्यांत वस्तुस्थिति सांगून ते अन्याय व जुलूम यांची कल्पना आणून देत. "मनांत रागद्वेष न आणतां, कर्तव्य-बुद्धीने तूं लढ" असें श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलें. त्याला तें कितपत जमले हा प्रश्नच आहे; पण टिळक तसे लढत आहेत, असें चित्र मनापुढे येतें, हें खरें आहे. जनतेंत संताप, असंतोष, चीड निर्माण व्हावी हें त्यांचें उद्दिष्ट होतें; आणि त्या भावनांचा प्रक्षोभ निर्माण करण्यासाठी अवश्य तो संताप व चीड तेहि व्यक्त करीत; पण हें सर्व कर्तव्य-बुद्धीने, कर्मयोगी वृत्तीने चालले आहे, असें वाटावें, अशी त्यांच्या लेखनाची, भाषणाची बैठक असे. आगरकर मात्र जीवनाच्या मूळ कंदापासून उन्मळून लिहीत बोलत आहेत असें वाटतें. सनातनी लोकांविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध, ते संतापून लिहितात, तेव्हा ते त्या संतापाच्या आहारी गेले आहेत असें वाटतें.
 बालविवाह, त्यापायी मुलींच्यावर होणारे अत्याचार, अस्पृश्यांची होत असलेली मानखंडना, विधवा स्त्रियांचें सक्तीने होणारें वपन, सनातन्यांचे ढोंगी सोवळें-ओवळें, हें पाहून त्यांचा मनःक्षोभ अनावर होई, आणि मग ते हिंदु समाजावर मर्मभेदी टीका करीत. तुम्ही नादान आहांत, भेकड आहांत, तुमचा धर्म अमंगल आहे, बीभत्स आहे, निर्दय आहे, वंचक आहे, असे शब्द त्यांच्या लेखणीतून उतरत, आणि ज्या हिंदु धर्माने हीं अनन्वित कृत्यें करविली त्याची पाळेमुळे खणून काढून विचारकुंडांत पेटलेल्या अग्नींत त्यांची आहुति देण्यास ते सिद्ध होत; आणि इतका भडिमार करूनहि हा समाज सुधारण्याची चिन्हें दिसली नाहीत की, अतिशय निराश होऊन हा हिंदु समाज नष्ट होऊन गेला तरी बरें, असे आततायी उद्गार ते काढीत. इतकी कमालीची तीव्रता व उत्कटता विष्णुशास्त्री व टिळक यांच्या भाषेत क्वचितच व्यक्त होते.
बुद्धिप्रामाण्य
 पण असें भावनांचें वर्चस्व मनावर असूनहि आगरकर कमालीचे बुद्धिप्रामाण्यवादी होते. केवळ भावनाप्रेरित असें लेखन त्यांनी केव्हाहि केलें नाही. कॉलेजमध्ये असतांनाच त्यांनी मिल्ल व स्पेन्सर ह्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याचे त्यांच्या मनावर खोल संस्कार झाले होते, आणि त्यामुळेच ते प्रखर बुद्धिवादी झाले होते. त्यांच्या आधी महाराष्ट्रांत निर्माण झालेले जांभेकर, लोकहितवादी, रानडे, भांडारकर, तेलंग हे जे थोर पुरुष यांच्यांत अंधश्रद्धावादी कोणीच नव्हते; पण जुन्या धर्मशास्त्रांतील अनुकूल वचनें शोधून काढून त्यांच्या आधारें परिवर्तन घडवून आणावें असें त्यांचें धोरण होतें. आगरकरांना हें मुळीच मान्य नव्हतें. एका ऋषी- विरुद्ध अशा रीतीने दुसरा ऋषि उभा करण्यांत कांही अर्थ नाही, असें ते म्हणत. त्या ऋषींना जेवढी प्रज्ञा होती, बुद्धि होती ज्ञान होतें तेवढेंच, किंवा थोडें अधिकच आम्हांला आहे, असें ते निर्भयपणे सांगत, आणि अशा रीतीने कोणत्याहि प्रकारच्या प्रामाण्याच्या मुळावरच कुठार घालीत.
क्रांतिवाद
 यामुळेच आगरकर पूर्णपणें क्रांतिवादी झाले होते. क्रांतिवाद व पुनरुज्जीवनवाद हे जगांतले दोन सनातन पंथ आहेत. सुधारणा दोन्ही पंथांना हवी असते; पण जुनेच घासून-पुसून त्याला नवें रूप द्यावें, त्यांतच अवश्य तो बदल करून त्याचा स्वीकार करावा, असे पुनरुज्जीवनवादी म्हणतात (अलीकडे अंधश्रद्धेने जुन्याचें समर्थन करणें असा पुनरुज्जीवन याचा अर्थ झाला आहे. तो बरोबर नाही) क्रांतिवादी जुन्याची पाळेंमुळें खणून तेथे सर्वस्वीं नवीनाची स्थापना करावी, अशा वृत्तीचा असतो. आगरकर प्राधान्याने क्रांतिवादी होते. विष्णुशास्त्री, टिळक हे प्राधान्याने पुनरुज्जीवनवादी होते. जुन्या स्वरूपांत चातुर्वर्ण्य किंवा विवाहविषयक रूढि टिकून राहव्या असें त्यांना वाटत नसे, पण जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य त्याज्य मानले तरी गुणकर्मनिष्ठ चातुर्वर्ण्य अवश्य मानावें असें ते म्हणत. चातुर्वर्ण्य मुळांतच नष्ट करून टाकावें, अशी आगरकरांची विचारसरणी होती. विवाहाच्या बाबतींत असेंच होतें. बालविवाह टिळकांना मान्य नव्हता, पण सुधारणा सुचवितांना, मुलीचे लग्न पंधराव्या वर्षानंतर करावें, इतक्याच मर्यादेपर्यंत टिळक जातात, पण आगरकर एकदम पाश्चात्त्य लोकांप्रमाणे आपण प्रेमविवाह रूढ करावे व जो प्रेमविवाह नाही तो बालविवाहच होयं असें सांगून, प्रणयबद्ध तरुण स्त्री-पुरुषांच्या प्रणयांतील उत्कट आनंदाचें मुक्त मनाने वर्णन करतात. टिळकांच्या बाबतींत हें कल्पनेला सुद्धा सहन होणार नाही.
नास्तिक
 मिल्ल, स्पेन्सर यांचा अभ्यास, बुद्धिप्रामाण्य व रूढ हिंदु धर्माची आलेली घृणा याचीच परिणति होऊन आगरकर अज्ञेयवादी आणि खरे म्हणजे नास्तिक झाले. जगाचा संसार, न्यायाने, सत्याने आणि सर्व भूतांच्या कल्याणासाठी चालविणारा कोणी परमेश्वर आहे यावर त्यांची श्रद्धा नव्हती. मिल्ल, स्पेन्सर यांचा टिळकांनीहि अभ्यास केला होता, आणि आरंभी न्या. रानडे यांच्याशी झालेल्या वादांत त्यांनी आगरकरांचाच पक्ष घेतला होता; पण पुढे वेदान्त व प्राचीन भारतीय परंपरा यांचा अभ्यास जसजसा वाढू लागला तसतसे ते पूर्ण आस्तिक व श्रद्धासंपन्न झाले. आगरकर मान्न शेवटपर्यंत अज्ञेयवादी व नास्तिकच राहिले. यामुळे देवदेवता, धर्मकल्पना, कुटुंबसंस्था यांची मूलगामी चिकित्सा ते करीत व तो धर्म आणि त्या देवता यांची चीरफाड करून त्यांची आतडी नि कातडी आपल्यासमोर धरीत. धर्मकल्पना, देवकल्पना या मुळांत पिशाच- कल्पनेपासून उदय पावल्या आहेत, आणि देव हें पिशाचाचेच रूपांतर आहे, असे मत ते मांडतात; आणि असे तात्त्विक सिद्धान्त सांगून स्वस्थ न बसतां शंकर या देवतेचें अगदी प्राकृत वर्णन करून ही देवता म्हणजे एक महापिशाचच आहे, असें ते सांगून टाकतात. लोकमान्य टिळकांना देवतांचें हें मूळ स्वरूप मान्य नसेल असें म्हणतां येणार नाही; पण त्या आधारें सध्या समाज ज्यांना पूज्य मानतो त्या शंकर, गणपति, ब्रह्मा, विष्णु या देवतांची व एकंदर मूर्तिपूजेची अशी चीरफाड त्यांनी कधी केली नाही. मात्र घातक श्रद्धा जपून ठेवाव्या अशी त्यांची वृत्ति नव्हती. नाही तर हजारो वर्षे अखिल भारतांत मान्य झालेल्या शंकराचार्यांच्या 'गीताभाष्यां'तील मतें सांप्रदायिक, एकदेशी व आग्रही ठरवून त्यांनी ती सर्वथैव त्याज्य मानली नसती. भागवतांत कर्मयोगाचें महत्त्व कमी करून भक्तीला प्राधान्य दिलें आहे, हें टिळकांना आक्षेपार्ह वाटलें. तरी त्यांनी टीका इतकीच केली की, "भक्तीचें माहात्म्य सांगण्यासाठी, भागवतपुराण ही पुराणपोळी मागाहून बनविली आहे." श्रीकृष्णाच्या चरित्रांतील गोपींच्याबरोबर त्याने केलेला शृंगार हा भाग विसंगत वाटतो, पण त्यावर "हा भाग मागाहून घातलेला आहे" इतकाच अभिप्राय टिळक देतात; पण आगरकर त्याला एकदम शिनळ, जारशिरोमणि ठरवून मोकळे होतात. परिवर्तन, स्थित्यंतर सर्वांनाच हवें होतें; पण जुन्याचा त्याग करतांना तो संभाळून करावा, आदराने करावा, त्यावर अक्षता टाकाव्या अशी टिळकांची वृत्ति होती. तर तें उचलून नाल्यांत फेकून द्यावें ही आगरकरांची वृत्ति. एक पुनरुज्जीवनवाद तर एक क्रान्तिवाद! दोन्ही समाजाला सारखेच उपयुक्त.
पाश्चात्त्य आदर्श
 आगरकरांनी पांडित्य जोडलें तेंहि याच धोरणाने. पुनरुज्जीवन त्यांना मान्यच नसल्यामुळे संस्कृत विद्येच्या ते वाटेसच गेले नाहीत. वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण यांचा आधार ते कधी घेत नाहीत. या ग्रंथांतील अवतरणें ते कधी देत नाहीत. विष्णुशास्त्री, टिळक यांच्या निबंधांच्या प्रारंभी पुष्कळ वेळा संस्कृत वचनें दिसतात. आगरकरांनी चुकून सुद्धा प्रारंभीं असें वचन दिलेलें नाही. संस्कृत वचनांच्या आधारे कांही सांगावें, हें त्यांच्या वृत्तींतच नव्हतें. त्यांचे आधार म्हणजे मिल्ल, स्पेन्सर, कोंट. ग्रीस, रोम, रशिया, इंग्लंड, फ्रान्स ह्या देशांचे इतिहास त्यांनी बारकाईने पाहिले होते. क्वेकर, प्रोटेस्टंट ह्या धर्मपंथांचा आधार ते वारंवार घेतात. फ्रेंच क्रांति, लूथरकृत धर्मंक्रांति, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध ह्यांचें सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलें होतें; आणि त्या आधारांनीच ते आपल्या निबंधांची सजावट करीत; पण वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत, भर्तृहरि यांच्यांतून जीवनरस घेऊन आपलें साहित्य फुलवावें असें त्यांना कधीच वाटले नाही. टिळकांना पाश्चात्य विद्या, पाश्चात्त्य विज्ञान, पाश्चात्त्य लोकायत्त संस्था, आगरकरांच्या- इतक्याच, किंबहुना जास्तच महत्त्वाच्या वाटत; पण जीवनरसाचा अमृतकुंभ म्हणजे वेदोपनिषदेंच होत अशी त्यांची धारणा होती. आगरकर मात्र पाश्चात्त्य पंडित, पाश्चात्य ग्रंथ, पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते, त्यांचें तत्त्वज्ञान या प्रवाहांतच अखेरपर्यंत मज्जन करीत राहिले होते.
अहंप्रत्यय
 पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व एकंदर पाश्चात्त्य विद्या ह्यांच्या अखंड चिंतनाने त्यांची अस्मिता, त्यांचा अहंप्रत्यय हा विष्णुशास्त्री, टिळक यांच्याइतका प्रबळ झाला होता. किंवा तो जास्तच प्रबळ असण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य आक्रमक, मिशनरी आणि पाश्चात्त्य पंडित यांशी सामना करावयाचा असल्यामुळे या तीनहि महापुरुषांचा अहंप्रत्यय हा अत्यंत प्रबळ व तेजस्वी असणें अवश्यच होतें. त्यावांचून या संग्रामांत ते क्षणमात्र टिकूं शकले नसते; पण आगरकरांना इतरांच्या मानाने दसपट मानसिक बळाची आवश्यकता होती. कारण त्यांना वरील सर्वांशी सामना देऊन शिवाय स्वजनांशी लढा करावयाचा होता. स्वजनांविरुद्ध, स्वधर्मीयांविरुद्ध व स्वदेशीयांविरुद्ध आणि एकंदर विश्वाविरुद्ध एकट्याने उभ राहवें, ही परंपरा भारतांत केव्हाच नव्हती. युरोपांत सॉक्रेटिसने ती सुरू केली; आणि वायक्लिफ, जॉन हस, लूथर यांनी व पुढे विज्ञानवेत्त्यांनी ती अखंड चालविली. विश्वाविरुद्ध उभें राहण्याची ही परंपरा भारतांत प्रथम कृतीने महात्मा फुले यांनी व तत्त्वज्ञानाने आगरकरांनी सुरू केली. अशा पुरुषांचा आत्मप्रत्यय हा इतरांपेक्षा दसपटींनी, शतपटींनी भक्कम असला पाहिजे यांत शंकाच नाही. आगरकर त्या आत्मिक बलाने अगदी संपन्न होते. त्यामुळेच मनु-पाराशर, देवदेवता, पुराणे, स्वकालीन विरोधक, निकटचे सहकारी, इंग्रज स्वार्थी पंडित, मिशनरी व राज्यकर्ते ह्यांच्यांशी अखंड, आमरण झुंज देण्याचें सामर्थ्य त्यांना लाभलें.
धीर पुरुष
 या जगांत सुखाने जगण्यासाठी लोकप्रियता, राजमान्यता व पैसा यांचा आधार अवश्य असतो. न्या. रानडे यांना लोकप्रियता आरंभी तितकीशी नव्हती, पण पुढे ती बरीच मिळाली. राजमान्यता तर प्रारंभापासूनच त्यांना विपुल प्रमाणांत लाभली. पैशाच्या दृष्टीने ते चांगले संपन्न होते. टिळकांना राजमान्यता शून्य! नव्हे, शून्याच्याहि खाली; पण ती उणीव लोकप्रियतेने पूर्ण भरून निघाली होती. पुढे पुढे लोक त्यांना परमेश्वरच मानीत. पैशाच्या दृष्टीने पाहतां आरंभी त्यांना सुस्थिति नव्हती तरी उत्तर काळीं ती चांगलीच मिळाली होती. आगरकरांना यांतलें कांहीहि लाभले नाही. जन्मापासून दारिद्र्य त्यांच्या राशीस होतें. त्याने त्यांची पाठ शेवटपर्यंत कधीहि सोडली नाही. देव-धर्म, श्रुति स्मृति यांशी त्यांनी वैर धरल्यामुळे त्यांना लोकप्रियता कधीच मिळणे शक्य नव्हतें, आणि टिळकांइतकेंच ते इंग्रज सरकारला शत्रु लेखीत असल्यामुळे राजमान्यतेचें सुखहि त्यांना कधी प्राप्त झालें नाही. अशा स्थितीत भरल्या जगांत पूर्ण एकाकीपणें, आपल्या विवेकाने सांगितलेल्या सत्यासाठी अविरत, अविश्रांत, झुंजत राहणारे आगरकरांसारखे. धीरपुरुष जगांत दुर्मिळच असतात.
लेखनशैली
 आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सर्व गुणविशेष त्यांच्या लेखनांत पदोपदीं. दिसून येतात. त्यांची लेखनशैली याच गुणविशेषांनी नटलेली आहे. अत्यंत प्रबल असा आत्मप्रत्यय त्यांच्या ठायीं असल्यामुळे त्यांचीं विधानें ठाम, निश्चित व निःसंदिग्ध अशी असतात. त्यांत साशंकता, डळमळ, किंवा चाचरेपणा कधीहि दिसणार नाही. ठामपणाचा, निश्चयाचा हा गुण केसरीच्या त्रिमूर्तीपैकी प्रत्येक मूर्तीच्या लेखनांत आढळतो. कारण तिघांची अहंवृत्ति सारखीच तेजस्वी होती. आपण जगाला शिकविण्यासाठीच जन्माला आलों आहों, असा आत्मिक हुंकार यांपैकी प्रत्येकाच्या ठायी होता. त्यामुळे त्यांच्या निबंधांना उपनिषत्कर्त्या ऋषीचें तेज प्राप्त झालेलें आहे. या तिघांचे निबंध म्हणजे महाराष्ट्राचीं व भारताचीं उपनिषदेंच आहेत. हे तिघेहि तत्त्ववेत्ते निबंधकार होते. त्यांनी आपल्या लेखणीने महाराष्ट्रांत नवी सृष्टि निर्माण केली. ती सृष्टि निर्माण करण्याइतकी प्रज्ञा, इतकी सर्जनशक्ति, आणि इतकें वाणीचें प्रभुत्व त्यांच्या ठायीं निश्चित होतें. त्यामुळे उपनिषत्कर्त्या ऋषींच्या वाणींत जो दृढपणा, निश्चितपणा, आणि जोम दृष्टीस पडतो तोच यांच्या वाणींतहि प्रत्ययास येतो. "सचेतन व अचेतन सृष्टीचा दास मी नाही, तर तिला दास करण्याचा अधिकार मला आहे, असा विचार मनुष्याच्या अंतःकरणांत वागूं लागला म्हणजे त्याच्या खऱ्या सुधारणेस प्रारंभ होतो." "म्हणून कोणी तरी अस्तित्वांत असलेल्या लोकमतांतील दोषस्थले दाखविण्याचें व समाजांतील बहुतेक लोकांना अप्रिय, परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचें काम करण्यास तयार झालेच पाहिजे. असें करण्यास लागणारें धैर्य ज्या समाजांतील कांही व्यक्तींच्या सुद्धा अंगी नसेल त्या समाजांनी वर डोके काढण्याची आशा कधीहि धरूं नये." "मुसलमान लोकांनी येथे अनेक शतकें राज्य केलें, पण त्यांच्या दीर्घकालीन अमलाने आम्ही जितके डबघाईस आलो नाही तितके या शतसांवत्सरिक ब्रिटिश अमलाने आलों आहों. अशा तऱ्हेची सिद्धान्तवाक्यें आगरकरांच्या निबंधांत सर्वत्र आढळतात. त्यांतूनच त्यांचा आत्मप्रत्यय स्पष्ट दिसून येतो.
बुद्धीला आवाहन
 पण असा पुरेपूर आत्मप्रत्यय असला तरी आपलीं वचनें आपलीं विधानें लोकांनी प्रमाण मानावी, असा चुकून सुद्धा विचार आगरकरांच्या मनांत आला नाही. साधार, सप्रमाण, तर्कशुद्ध प्रतिपादन करून लोकांच्या बुद्धीला आवाहन करावें, त्या बुद्धीला पटवून द्यावें हेंच धोरण आगरकरांचें होतें. लो. टिळकांची हीच वृत्ति होती. प्राचीन धर्माचें प्रतिपादन आता पाश्चात्त्य पद्धतीने केलें पाहिजे, जुन्या काळच्या मन्वादि धर्मशास्त्रकारांप्रमाणे नुसतीं विधानें करून भागणार नाही, असें त्यांनी गीतारहस्यांत मुद्दाम सांगितलें आहे. आगरकरांची हीच पद्धति होती. हिंदुस्थानचा अधःपात, आमचे भ्रांत सामाजिक विचार, घातक रूढि यांमुळे झाला आहे व पाश्चात्त्य सुधारणांचा अंगीकार केल्यावांचून आमचा निभाव लागणार. नाही हें 'सुधारकाच्या' पहिल्या अंकांतच त्यांनी सांगितलें आहे. तेथे त्यांनी तर्कनिष्ठ पद्धतीचाच अवलंब केला आहे. समाजांतील भिन्न वर्गांत विषमता वाढत गेली तर त्याचे भयंकर परिणाम होतील, हें तरुण सुशिक्षितांस पटवून देतांना त्यांनी इतिहासांतील विपुल प्रमाणें दिली आहेत. इंग्रजी राज्याची उलट बाजू आगरकर दाखवूं लागले की, त्यांच्या प्रतिपादनशैलीचे सर्व गुण प्रकट होतात. रेल्वे-कंपन्यांचा कारभार, अफूचा व्यापार, इंग्रजांनी साम्राज्यविस्तारासाठी केलेली युद्धे, त्यांपायी भारतीयांची झालेली अन्नान्नदशा यांविषयी आगरकरांनी केलेलें कोणतेंहि विवेचन काढून पाहा. इतिहास, अर्थशास्त्र, राजनीति इत्यादि शास्त्रांतील अचूक आधार, अचूक प्रमाणे देऊन आपलें प्रतिपादन भक्कम पायांवर उभे करण्याची त्यांनी कोशिस केली आहे, असेंच दिसून येईल.
व्याजोक्ति
 उपरोध, उपहास, व्याजोक्ति, वक्रोक्ति हा कांही आगरकरांच्या लेखणीचा प्रधान गुण नव्हे. तें लेणें विष्णुशास्त्री यांच्या लेखणीचें आहे; पण अंध, जीर्ण, नादान अशा हिंदु समाजाबद्दलचा संताप अनावर झाला की, आगरकरांच्या लेखणीला तितकीच उपरोधाची धार चढू लागते व तिचा तिखटपणा तसाच तीव्र होतो. बालविवाहास कायद्याने बंदी केली तर आई-बापांच्या स्वातंत्र्याला बाध येईल, असा मुद्दा कोणी मांडीत. त्याबद्दल लिहितांना आगरकर म्हणतात, "वाहवा! हें आई- बापांचें स्वातंत्र्य, हा त्यांचा अधिकार! पोटच्या पोरीचें कुंकूं पुसण्याचा अधिकार, मुलाच्या बायकोस नापितापुढे बसविण्याचा अधिकार! सुशिक्षित म्हणविणाऱ्यांनी या हक्कासाठी आक्रोश करावा या विस्मयजनक देखाव्याची कल्पना करणें देखील कठीण आहे!" जुन्या धर्मशास्त्रकारांचा अभिमान बाळगणे, त्यांना संभाळून घेणें, हें टिळकांचें धोरण; तर जेथे संधि मिळेल तेथे त्यांच्यावर प्रहार करणें ही आगरकरांची वृत्ति. डोंगरीच्या तुरुंगाचें वर्णन करतांना ते म्हणतात, "तुरुंगांत बायको आली म्हणजे तिचे केस कापतात व कांकणें पिचवितात. तरी तुरुंगाचे कडक कायदे अपराधी बायकांची डोकी केवळ संन्याशाचे असोले गोटेच होऊं देत नाहीत. निरपराधी बायकांस तसली विद्रूपता आणणें हें आमच्या सदय महर्षीच्या धर्माकडे सोपविले आहे.
उपमा-दृष्टान्त
 कल्पनाशक्तीचा खेळ आगरकरांच्या लेखनांत फारसा दिसून येत नाही. तरी मधून मधून कांही उपमा- दृष्टान्तादि रम्य अलंकार त्यांच्या निबंधांतून दृष्टीस पडतात व तेवढाच विरंगुळा वाटतो. पाश्चात्य विद्येला त्यांनी दुर्बिणीची उपमा दिली आहे ती अत्यंत समर्पक आहे. दुर्बिणींतून आकाशस्थ गृहगोलांचें, तारकांचें सम्यक् स्वरूप कळतें तसें नुसत्या दृष्टीने कळत नाही. त्याचप्रमाणे मनुष्यसुधारणेची दूरची, भविष्यकाळची दिशा पाश्चात्त्य विद्यारूप दुर्बिणींतून जशी सम्यक् आकळतां येईल तशी त्या विद्येच्या अभावी येणार नाही. स्वतःच्या अंगीं मुळीच कर्तृत्व नसतांना दर पावलास पूर्वजांचें गुणगान करणाच्या जीर्णवादी लोकांना त्यांनी पराक्रमी पुरुषाच्या बहुभाष विधवेची उपमा दिली आहे. पतिनिधनामुळे नवीन संतान होण्याची तिला आशा नसते. त्यामुळे आमचे पुरुष असे होते, तसे होते असे नुसतें गुणगान ती करीत बसते. तसेच हे लोक स्वतःच्या हातून पराक्रम होईल हो आशा त्यांना नसते. म्हणून मग ते पूर्वजांची स्तोत्रं गात बसतात.
प्रौढ भाषा
 आगरकरांची भाषा प्रौढ व संस्कृतप्रचुर आहे. केव्हा केव्हा तिची संस्कृत- प्रचुरता जास्तच जाणवते हें खरें पण तें अपवादात्मक प्रसंगी. आणि तशी झाली तरी त्यांच्या अंतरीचा भावार्थ, त्यांचा आवेश, त्यांची तळमळ, प्रतिपक्षाविषयी त्यांच्या मनांत असलेली चीड, त्यांचा संताप, त्यांचा स्वाभिमान त्यांची सहृयता हे सर्व भाव उत्तम प्रकट व्हावें असा ओघ तिला आलेला असतो. त्यांची वाक्यें अनेक वेळा दीर्घ व पल्लेदार झालेली दिसतात. केव्हा केव्हा तीं चौदा-पंधरा ओळींपर्यंत पसरतात. तरीहि अर्थौघ कोठे कुंठित झाला, असें वाटत नाही. त्या ओघाच्या वेगामुळे प्रसन्नता कोठे गढूळली आहे, असें होत नाही. त्यांचा संताप अनावर झाला आहे, आवेश तीव्र झाला आहे आणि विचारांचा ओघ आता पर्वताचे कडे भेदून जाणार आहे, असें वाटून मनाला आनंदच होतो.
 'सुधारका'वर अनेक आपत्ति आल्या, लोकांनी त्याच्यावर दारुण आघात केले. तेव्हा आता 'सुधारक' बंद पडणार, असें कोणी म्हणूं लागले, तर त्यांना आगरकर निर्भयपर्णे बजावीत की, "टाकांतून अर्थबोधक अक्षरें काढण्याचें सामर्थ्यं असेल व ती वाचण्यास निदान एक तरी इसम तयार असेल तोंपर्यंत समाजाला भिऊन स्वस्थ बसण्याचें स्त्रैणकर्म 'सुधारका'ला स्पर्श करू शकणार नाही."
 आगरकरांच्या सर्वं व्यक्तिमत्त्वाचा आशय या वाक्यांत समावलेला आहे या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्कारामुळे मराठी भाषा समृद्ध, संपन्न झाली, तिला एक आगळें तेज व सौंदर्य प्राप्त झालें आणि 'सुधारका'च्या पहिल्या अंकांत आगरकरांनी थोर समाजसुधारकांविषयी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून प्रकट झालेल्या त्यांच्या चारित्र्यामुळे, त्यांच्या वर्तनामुळे, जगाचें हित व त्यांच्या जन्माची सार्थकता झाली.