केशवसुत मेले?

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

जगतास जागवायाला केशवसुत गाउनि गेले !

इंग्लंद भूमि शेलेची माहेर जडाचें बनले,
सन्देश गूढ जे त्याचे तैसेच मानसीं जिरले,
तपोवना मानवतेच्या या बघतां मानस हंसले!

देवाचे हेतु न पुरले,
अर्धेच कार्य जे उरले,
ते येथे करुनी गेले,
अवतरुनी फिरुनी शेले ! केशवसुत गाउनि गेले!

एकेका शब्दें भरले काव्याचे अद्भुत पेले !
ज्यांसाठीं मानव झटले, ते सुधाकुंभ भरलेले–
वाग्देवी वरुनी टाकी केशवसुतहृदयी झेले!

अनुभवुनि निजानंदाने
मग त्यांचे के ले गाणे,
श्वासाच्या कारंज्याने
चहुंकडे उधळुनी दिधले! केशवसुत गाउनि गेले !

हे तुषार पडतां अंगी बिंदूंचे सिंधू झाले!
निजलेल्या जागृति आली, हो ताजें जें थकलेले!
मरणासचि आले मरणें, मग केले त्यानें काळे!

तों शब्द मुक्याला सुचले !
गूढास रूप सापडले !
स्वच्छंद अचेतन हाले !
नश्वर ते ईश्वर केले ! केशवसुत गाऊनि गेले !

भेदभाव विलया गेला, सूक्ष्मात स्थूल मिळाले !
गगनाचे फाटुनि पडदे दिसलें जें त्यापलिकडले !
मरणाचे मूळच तुटले, जन्माचे नाते सुटले !

वस्तुंत वस्तुपण भरलें,
जीवंत जीवही झाले,
आत्म्यास आत्मपद आले,
ब्रह्मही ब्रह्मसे ठरले ! केशवसुत गाऊनि गेले !

कळले की ‘आम्ही कोण !, ‘हरपले श्रेय ‘ सापडलें;
आत्मा हो ‘वेडापीर’, सृष्टीत ‘ भृंग ‘ सा रंगे;
मारुनिया ‘गोंफण’ काळा निज ‘निशाण’ नभिं फडकविंले !

ऐकताच विजयि ‘तुतारी’
हो चिरंजीव ‘म्हातारी’
मग वाजविताच ‘सतारी’
सर्वत्र ‘झपूर्झा ‘ झाले ! केशवसुत गाउनि गेले !

या स्थितीत त्या ब्रह्माची ब्रह्माशीं मिळणी घडली,
जे चिरंतनाच्यासाठी सांगता तयाची झाली.
परि जनता वेडी कुठली, ” केशवसुत मेले ” वदली !

परि जन्ममरण हे वारे
कल्पनाच नाचवि सारे !
मूर्खानों ! रडता का रे,
की ”केशवसुत ते मेले ! ” केशवसुत गाउनि गेले !

जे एकाठायी होते, ते सर्वांठायीं भरले;
सर्वांच्या हृदयीं भरले सर्वांच्या जीवी भिनले;
विश्व स्थिर ज्यांनी केले का वदता तेच निमाले?

लीलेनें त्यांनी गातां
ही सजीव केली जडता,
अणुरेणूंमधुनी आतां
निघतील तयांचे चेले ! केशवसुत गाउनि गेले !

सर्व ठायि सर्वही काळी सर्वांनी त्यास पहावें,
पाहतां पाहतां वाटे डोळयांनी ज्यास गिळावें,
तो विषय होई मरणाचा जन बोले काय करावें ?

जे चकव्यावाचुनि चकले,
जरि ते कुणि कांहीं भकले,
तरि ‘गोविंदाग्रज’ बोले
केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले !


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg