कविता गजाआडच्या/प्रस्तावना

विकिस्रोत कडून
प्रस्तावना


 एकविसाव्या शतकात प्रवेश करीत असताना मराठी मध्ये स्त्रियांची साहित्य निर्मिती ही नवलाईची बाब राहिलेली नाही. कविता तर मराठीच्या जन्माच्या आधी पासून प्राकृत-अपभ्रंशापासून स्त्रिया रचित आल्या आहेत. गात आल्या आहेत.
 मराठीतील आदिकवी मुकुंदराज- ज्ञानदेवांच्या ओवीच्या आधीपासून महाराष्ट्रातली तान्ही बाळं आई, आजीच्या ओव्या ऐकत मोठी झाली आहेत. पाठोपाठ संतसज्जनांच्या भक्तीमेळ्यातील अभंग-ओवीला जन्मापासून मुक्तपणे स्त्रियांनी मनी-मुखी घोळविले आहे. मुक्ता-जना बाईंनी ज्ञानदेव-नामदेवाबरोबर निर्मिती केली आहे. 'तंत कवींची शाहिरी सोडता त्याच्या आगेमागेच्या सर्व तऱ्हेच्या कवितानिर्मितीत स्त्रीचा सहभाग मोठा आहे.
 लावणीतील उघड्या शृगांराच्या वर्णनाची अमर्यादा घरंदाज स्त्री कवयित्रींनी न करणे स्वाभाविकच होते. उघड उघड रणातला हिंसाचार आणि हार-जितीची उग्रता ही तिच्या पिंडाला मानवणारी नसल्याने तिने पोवाडे गायिले नाहीत. पण भक्तीचे आणि प्रपंचातल्या हर्ष विमर्शांचे 'पवाड' मात्र मुक्तपणे गायिले आहेत. पांडित्य मिरवणे आणि त्यासाठी संस्कृतप्रचुर भाषेच्या अनवट वाटा तुडवणे हे तिच्या 'प्रकृती'ला न मानवणारे आणि तशी संधी उपलब्ध न होऊ देणे हे ही त्या काळी स्वाभाविकच ठरले. एरव्ही मात्र स्त्री ची कविता मराठीच्या वाहणीसह सतत वाहत आली. सर्व वळणा-वाकणातून जात आली. अक्षरे लिहायची मुभा नव्हती तेव्हा पिढ्यान् पिढ्या मौखिक-वारशाने प्रवाहित झाली. अक्षरे शिकण्याची मुभा आणि संधी मिळाली तेव्हापासून बाईची कविताही साक्षर झाली आणि छपाईच्या कलेसोबत छापलीही जाऊ लागली. कवितेबरोबरच गद्याचा प्रपंचही 'साक्षर' स्त्री ने संधीनुसार प्रारंभापासूनच उभा केला आहे.
 एकोणीसाव्या शतकातल्या इंग्रजोत्तर बदलत्या मनुबरोबर स्त्री शिक्षणाची संकल्पनाही बदलली- नवे शिक्षण घेऊन स्त्री साक्षर झालीच पण नव्या युगाच्या विचारातून तिच्या आविष्काराला नवे धुमारेही फुटले. प्रारंभीच्या काळातील नवजागृत उदारमतवादी पुरुषांनी बाईला अक्षरओळखी बरोबरच उंबरठ्याबाहेरच्या जगाची ओळख करून देण्यात पुढाकार घेतला. तिच्या शतकानुशतकांच्या एका लहान बिंदूत अडकलेल्या मन-बुद्धीचा परीघ विस्तृत करण्यासाठी सर्व परींनी सहकार्य केले. त्याचाच परिणाम म्हणून स्त्री अक्षरातून अधिक व्यक्त होऊ लागली. कवितेबरोबरच निबंध, कथा, पुढे कादंबरी, आत्मकथन, प्रवासवर्णने आणि क्वचित नाटकातूनही आपला साहित्य प्रपंच विस्तारीत राहिली.
 एकोणीसाव्या शतकाअखेरी नुकतीच साक्षर होऊन बिचकन बिचकत पांढऱ्यावर काळे करणाऱ्या स्त्रीने विसाव्या शतकात मात्र आपल्या प्रतिभेच्या पंखांच्या कवेत खूप मोठे आकाश घेतले. आपल्या कर्तृत्वासाठी झगडत, संघर्ष करीत पुरुष मदतीच्या अपेक्षेवर अवलंबून न राहता आपला अवकाश स्वयंसिद्धपणे शोधीत राहिली. आपले स्त्रीत्व म्हणजे दुय्यमत्व नव्हे या भानातून संपूर्णपणे माणसाच्या हक्कासाठी आग्रही होऊ लागली आणि त्यासाठी अक्षरांचे अवकाश धुंडाळू लागली.
 स्त्रियांसाठी केलेले विवेकी पुरुषांचे प्रयत्न आणि सहकार्य, पुढे स्त्रीने त्यांना दिलेली बरोबरीची साथ, त्यातून स्त्री विषयक कायदे बदलून ते अधिक हितकर करवून घेण्यासाठी झालेल्या चळवळी आणि प्रत्यक्ष लाभ; विज्ञानाच्या नवशोधांमुळे प्राप्त झालेल्या सुविधा यातून विसावे शतक संपताना स्त्रीनेही आपल्या आत्मसामर्थ्याचा अनुभव घेतला. जुनी कोंडी काहीशी फुटली तरी नवे खाच-खळगेही निर्माण होत गेले. पण शिक्षण आणि वैज्ञानिक सोयींनी वाढलेली सपंर्क सुलभता जगभराच्या स्त्रियांमध्ये एक भगिनीभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. स्त्री म्हणून असलेल्या सर्वांच्या समान सुख-दुःखांची देवाण घेवाण झालीच. क्वचित गाठीभेटीही झाल्या आणि त्यातून स्त्री विषयक विविधांगी विचार समस्यांचा गंभीरपणे- सखोल अभ्यास स्त्रिया करू लागल्या.
 या सर्वांतून विस्तारलेल्या तिच्या विचार भावनांचे क्षितिज अक्षरबद्ध होऊ लागले. प्रतिभावतींच्या साहित्यातून ते. अनेक परीनी व्यक्त होऊ लागले.
 विसावे शतक संपताना आंतरराष्ट्रीय महिला मुक्तिवर्ष (१९७५) आणि नंतर दशक जगभर साजरे झाले आणि एकविसाव्या शतकात प्रवेश करताना महिला सक्षमीकरण वर्ष साजरे करण्यापर्यंत मजल मारली.
 स्त्रीचे माणूसपण केवळ शब्दातून मान्य होऊन भागणार नाही तर तिचे सर्वांगी लादलेले खरे-खोटे अ-बलस्व झटकले जावे, तिला सर्वांगी सक्षमत्व यावे हा हेतू !
 वर्ष साजरे झाले की, हेतू लगेच साध्य होत नाही हे खरे! पण निदान जनमान्यतने प्रारंभ होती. हे महत्वाचे!
 अशा या संधिकालात महिला सबलीकरण वर्षाची सांगता होत असताना डॉ. शैला लोहिया यांचा 'कविता गजाआडच्या' हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. हे विशेष लक्षणीय आहे.
 डॉ. शैला लोहिया या मराठवाड्यातल्या आंबाजोगाई या काहीशा आडवळणावरच्या गावात राहून गेली सुमारे दोन तपे स्त्रियांसाठी आणि सर्वार्थान उपेक्षित अशा समाजघटकांसाठी विविधांगी कार्य करणाऱ्या. राष्ट्रसेवादलाच्या संस्कारांच्या मुशीतून घडलेल्या कार्यकर्त्या, आपल्या कामासंबंधी सतत अभ्यास करीत, मनन-चिंतन करीत त्याविषयी लेखन करणाऱ्या लेखिका, जीवनातले उग्र, भीषण, करूण, खंबीर वास्तवातले अनुभव घेत आपली मुळातली संवेदनशीलता अधिक जाणकारीने कविताबद्ध करणाऱ्या कवयित्री आणि माणूसवेड्या. हसत मुख, अखंड मैत्रभाव मुरलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जाणकारांना, महाराष्ट्रातल्या स्त्री चळवळीला परिचित आहेत.
 ऐन तरुणवयात राष्ट्रसेवादलाच्या आणि घरातील माता-पित्यांच्या जनसेवेच्या संस्कारात वावरत असतानाच एका ध्येयवादी तरुणाची साथ जन्मभरासाठी स्वीकारली आणि उभयतांनी रूढ प्रपंच 'नेटका' करीतच आपले 'मानवलोक' आणि 'मनस्विनी' हे उंबऱ्याबाहेरचे विस्तृत प्रपंचही स्वतंत्रपणे परंतु परस्परांना संवादी राहत विस्तारले आहेत. सात सुरांनी आपआपल्या सुरांचे स्वतंत्र अस्तित्व राखीत सुमधूर मेळ असलेल्या सतारीसारखी उभयतांची कार्ये आणि व्यक्तिमत्त्चे स्वायत्त आणि तरीही सुसंवादी राहिली हा सगळ्यात विलोभनीय आणि उल्लेखनीय भाग आहे.
 विवाहानंतर प्रपंचातली सगळी कर्तव्ये करीतच आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शैलाताईंनी दीर्घकाळ महाविद्यालयीन अध्यापक म्हणून कामही केले. नुकत्याच त्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्या आहेत आणि जणू दुसऱ्या तारुण्यात पदार्पण करून नव्या उत्साहाने कार्यमग्न होत आहेत.
 ह्या सगळ्या उपद्व्यापात त्यांची कविताही सतत त्यांच्या सोबत राहिली. ग्रामीण-अर्धग्रामीण भागातल्या स्त्रियांना त्यांच्या अनंतप्रकारच्या अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी हात देताना, थकून अगतिक झालेल्या माय-बहिणींमध्ये उमेदीची पेरणी करताना, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी निरनिराळे उद्योग उभे करताना, त्यांना केवळ 'देहस्विनी' पणात जखडून टाकणाया मानसिकतेचे आतले-बाहेरचे. मनातले-जनातले बंध खंबीरपणे पण हळुवार हातांनी सोडवून त्यांना 'मनस्विनी' म्हणून आपल्या पायावर उभ्या करताना, बाईच्या जातीचे अनेक बरे वाईट अनुभव शैलाताईंचे संवेदनशील मन टिपत आले आहे. आपले स्वतःचे आयुष्य सुस्थितीत आणि सुरक्षित असले तरी समाजातल्या एकूण स्त्रियांची कोंडी आणि घुसमट त्यांना अस्वस्थ करीत राहिली. त्या उपेक्षितांची वेदना शैलाताईंनी सहवेदना म्हणून अनुभवली. त्यांची 'मनस्विनी' म्हणून घडण होत असतानाचे खंबीर बळही अनुभवले अशा व्यापक स्त्री सहानुभवातून शैलाताईंची कविता जन्माला आली आहे.
 तरीही ती कडवट झाली नाही. जीवनातले, निसर्गातले कोवळेपण, हळुवारपण, प्रसन्न सर्जनाचे उन्मेषही त्यांच्या कवितेने निर्मळपणे टिपले आहेत. अशा जागा अर्थातच कमी आहेत कारण त्या जागा बाईच्या जीवनातच कमी असाव्यात. एरव्ही चारी अंगांनी दृश्य -अदृश्य गजांची बंदिस्तीच बाईभोवती फार! म्हणून या कविता 'कविता गजाआडच्या' आहेत. पण बंधनाबाहेरचे आकाश पाहू इच्छिणाऱ्या आहेत. बंदिस्ती उखडून टाकण्यासाठी धडपडणाऱ्या आहेत. अगतीकतेतूनही नवी वाट शोधू पाहणाऱ्या आहेत.
 स्त्रीचं मातीपण त्यांच्या कवितेचा गाभा आहे. माती हा आधार जगण्याचा तरी उपेक्षित, माती हा सर्जनाचा गर्भ तरी उपेक्षित, माती हा जीवनातल्या रंग-गंधाचा मूलकंद तरी उपेक्षित. तरीही माती, आपल्या मातीपणाला घट्ट चिकटून आहे. बाई आपल्या बाईपणाची उपेक्षा झटकूनही बाईपणाचं सर्जकतेचं सामर्थ्य ओळखून ताठ मानेने उभी राहू पाहणारी आहे.

"न्हात्याधुत्या मातीचा
शिनगार साजिंदा
सावळीया रूपाले
भुलला वो गोईदा !!.....

किंवा

"न्हात्याधुत्या मातीचे
भाळ कोनी गोंदले
नादावले आभाळ
काठावर झुकले ॥"

अशा अलवारपणाने बाईची आणि मातीची गर्जनशीलवा त्यांच्या कवितेत येते ('संग')
 स्त्रीचे हे प्राकृतिक रूप जीवनाच्या धकाधकीत जेव्हा मातीमोल होते. तिचे फुलणेबहरणे धर्माच्या, संस्कृतीच्या, मर्यादेच्या नावाखाली खुरटवून टाकले जाते, तेव्हा कवयित्री सात्त्विक उद्वेगावे म्हणते,

"किती वर्षे अजून
खुरट्या पानांचे उत्सव.... आणि
मातीत हाराकिरी करणाऱ्या
रामाच्या सीतेचं कौतुक ?...."
    (कविता माझ्या तुझ्या)

 'सीता' ही आदिम भू देवता! नांगरलेसी भूमी ! तिने पीक-पाणी देऊन जीवन समृद्ध करावं म्हणून कोणे एके काळी 'सीतायज्ञ' -कृषिजीवनातील सुफलीकरण विधी होत असे, असे म्हणतात. पण काळाच्या ओघात भूमी आणि भूमीरूपा नारी केवळ 'नांगरून', 'ओरबाडून' 'उत्पादन करण्याचे साधन' एवढाच उद्देश राहिला. सीते ची स्वतंत्र सर्जक अस्मिता उच्छेदून केवळ 'रामा' च्या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या अहंतृप्ती पुरुषार्थाचे साधन एवढीच सीतेची किंमत राहिली. अखिल मानवजातीसमोर असा अहंयुक्त 'राम' आणि अशी अगतिक 'सीता' हेच आदर्श ठेवले गेले. ही प्रतिके एकुणच स्त्री-पुरुष जीवनातील संवादी समपातळीवरील विलोभनीय नर-नारी जीवनातील संवाद संपवणारी ठरली. स्त्रीच्या जीवनाची परवड या व्यवस्थेने केली. याचे लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या शैलाताईंना फार चांगले भान असल्याने असेल पण स्त्रीच्या स्थिति-गतीचा मागोवा घेताना राम-सीतेच्या मिथकाचा पुनः पुन्हा उल्लेख त्यांच्या कवितेत येतो. रामाने सीतेची केलेली उपेक्षा हा समस्त पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्री जीवनाच्या केलेल्या अधिक्षेपाचा वस्तुपाठ या संस्कृतीने आदर्श मानला. तेव्हापासून 'रामायण' संपले आणि 'सीतायन' सुरू झाले, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. अगदी भारतीय परंपरेतील जात्यावर दळण दळणाऱ्या अनक्षर स्त्रीला सुद्धा रामाने सीतेची केलेली अवहेलना आणि उपेक्षा सहन झाली नाही. व्यथा आणि सात्विक संताप अशा संमित्र भावनातून जात्यावरच्या अनेक ओव्यातून येथील स्त्री मनाने राम-सीतेचे मूल्यमापन करताना सीतेला झुकते माप दिले आहे. त्याच जाते संस्कृतीतील कवयित्रीचा वारसा नवयुगातल्या कवयित्री शैलाताईंनी पुढे नेला आहे.

"काळ्या मातीच्या देहाचा
झुरे काठोकाठ प्राण
सीताईच्या शपथांनी
आजवेरी उरे त्राण......"
   (उगवाईच्या दारीचा)

अशा उद्गारांतून माती-सीता आणि तिची बाईपणाशी असलेली सनातन बांधीलकी व्यक्त होते.

"सीतामाईच्या रामानं | दिला घालूनिया धडा ।
घरीदारीच्या रामानं । तंतोतंत गिरविला ||
फाटलेल्या पदरानी । कसे झाकू लहू-कुश ।
टाकलेल्या सीताईची । हरविली भुई कूस ॥

सोनियाच्या भावलीला । राम तुम्ही दिला मान ॥
हाडामासांची वाईल । तिचं तुडविलं मन ।
तवापासून संपेना । साता जल्माचं दळनं ।
शेजीबाई आता पाह । नव्या रामाचं सपन ||"
   (साता जल्माचं दळन)

ही सगळीच कविता नव्या-जुन्या अवघ्या स्त्रीमनाचं 'सीतायन' आहे
 अगदी बिजींगच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला जातानाही भवभूतीच्या सीतेच्या व्यथेची कथाच आठवते पण आताची सीता मात्र तेव्हासारखी अंधपणाने रामनाम जपत राहणार नसल्याची ग्वाही देते आणि हे भान आणून देण्याला कारणीभूत झालेल्या रावणाचे आभार मानते. हा उपरोध बोचक आणि मार्मिक आहे.
 पुरुषकेंद्री आणि पुरुषी 'अहं' चा संहारक उद्दामपणा घेऊन आलेले तथाकथित वैज्ञानिक शोधांचे उपयोग पुन्हा स्त्रीची प्राकृतिक निर्भर सर्जकता उच्छेदून टाकण्याकडे वाटचाल करीत आहेत. क्लोनिंगद्वारे पुनर्संभवाच्या द्वारे जणु स्त्रीचे अस्तित्व खुडून टाकले जाण्याची शक्यता असेलेले उग्र भीपण भाकितही पुन्हा- 'मातीत... रामपत्नी सीताईसारखे...!" या शब्दातूनच व्यक्त होते ( चैतन्याचे सैंधवी झाड)
 'सीते' ची अशी विविधांगांनी दर्शन घेताना कवयित्रीचा चिवट आणि युयुत्सु आशावाद "पुन्हा जन्माला येतेय सीता ..." मधून कणखरपणे व्यक्त होतो.
 वाल्मिकी आणि भवभूती यांच्या दमित सीतेपेक्षा कवयित्रीला व्यास महर्षीनी द्रौपदीसाठी योजिलेल्या 'अग्निशिखा, भाविनी आणि मनस्विनी' अशा विशेषणांनी युक्त सीतेची भविष्यात प्रतीक्षा आहे, नव्हे तशी ती येईल अशी खात्री आहे.

".... आणि... दगडी वृंदावनाचे चिरं फोडून
पुन्हा एकदा जन्माला येतेय
'भूमिकन्या' सीता
नवे रामायण लिहिण्यासाठी....."
   (पुन्हा जन्माला येतेय सीता..)

 राम-सीतेच्या मिथकाचा असा पुन:पुन्हा आधार घेत आज 'गजाआड' असलेल्या स्त्रीचे आशादायक भविष्य शैलाताईंच्या कवितेतून व्यक्त होते.
 ओवी हा मराठीतील जणू आदिछंद ! येथील स्त्रीचा सहज छंद ! मुक्त छंद, गझल अशा आधुनिक छंदातून आधीची अधिक ओढ असल्याचे जाणवते. तसेच सर्वसामान्य श्रमकरी ग्रामीण स्त्रीच्या हर्ष-शोकांची, व्यथा-वेदनेची अभिव्यक्तीही अगदी सहज स्वाभाविकपणे मराठवाड्यातल्या ग्रामीण बोलीतून होते. बोली ग्रामीण असली तरी जाणीव आणि अभिव्यक्ती मात्र नवीन आहे.

"माये माझिये दाराची
कड़ी कोनी उकलली'
सेये उजेडाची रेघ
घुसळून आत आली
(सये उजेडची रेघ)
किंवा
"पन आज
माझ्या चुलीतून झालाय
नवा सुर्ब्य
मला बी कळलया
की दुसऱ्याच्या काळजावर
फुंकरल्या बिगर
माझ्या दुःखाचं गठुडं मला फेकता येनार नाय "
    (मी एक बाई)

 शैलाताई संस्थाचालक, संघटक. कार्यकर्त्या आहेत. त्यामुळेच असेल त्यांच्या काही कविता समूहगीतात्मक आहेत. तरीही त्यात प्रचारकी आवेशापेक्षा संवेदनशील कवी पणच प्रकर्षाने दिसते. उदा. 'निर्धार', 'गझल माझ्या मुक्तिची' किंवा त्यांनीच अनेक शिबिरात गाऊन सर्वपरिचित झालेली 'मी वो कोन्या नसीबाची' ही आणि अशा काही कविता !
 या कवितेतूनही 'मी माझ्या नशीबाची।' म्हणणाऱ्या एका पारंपारिक लोककथेतील बंडखोर मुलीचा उद्गार आठवतो. ही बंडखोरी पूर्वापार बाईच्या रक्तात असल्याचे त्या जणू सुचवतात आणि त्याच वेळी नवभान अल्याने अधिक परखडपणे स्वतःचा स्वंतत्रपणा जपू पाहणारी स्त्रीही आपल्या समोर उभी करतात. मरणानंतरही बाईचं पुरुषसापेक्षत्त्व तिला ही व्यवस्था सोडू देत नाही. ती साठवण मेली तर सौभाग्यलेण्यांचं लोढणं तिच्यावर लादून पुढच्या जन्माच्या वायद्याशी तिला बांधलं जातं, तिच्या भाग्याचा हेवा केला जातो. मग ह्या जन्मी तिची किती का ससेहोलपट होईना. पुरुष वर्चस्व तिला मरणानंतरही मोकळे होऊ देत नाही. एकीकडे आत्मा हा निराकार , निर्गुण ,निर्लेप आहे असे म्हणायचे आणि मरणानंतरही देहाभोवतीच सगळे सोपस्कार करायचे या विरोधाचे अत्यंत आर्त आणि तरीही उपरोधपूर्ण वर्णन कवयित्री 'दोन सवाल' (कै. अनामिकेचे) मधून करते.

"आत्मा चालला उपासी।
दूर दूरच्या गावाले |
माय मातीच्या कानात ।
दोन सवाल पुशीले ॥"

 निर्गुणी, निराकार, द्वंदातीत असे वर्णन केलेला आत्मा मुक्त झाला खरे तर तो स्त्री-पुरुष यांच्या आतीत-पलीकडे गेला. अशावेळी

"कुन्या जातीचा पालव
आता डुईवर सांग?"

 हा पहिला सवाल आणि दुसरां सवाल

"कुंकवाचं देनं-घेन ।
काया मन्याचा वायदा
परदेसी पराईण
तिले कोनाचा कायदा ?"


 मृत्युनंतरही स्त्रीला पुरुषसापेक्षतेशी बांधून ठेवणाऱ्या दुनियेचे कायदे बदलण्यासाठी आपल्या सर्व मर्यादांच्या गजाबाहेर झेपवू पाहणाऱ्या स्त्रीमनाची अभिव्यक्ती करणाऱ्या या 'कविता गजाआडच्या ' एका चळवळीतून आलेलल्या नवभानाचा आविष्कार आहे. एक परीने स्त्री चळवळीतून घडलेल्या संवेदनशील कविमनाचा हा प्रातिनिधिक आविष्कार आहे आणि तरीही शैलाताईंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे लेणे घेऊन आलेला आहे.
 त्यांच्या या कवितेच्या पुस्तकरूपाने होणाऱ्या आविष्काराला माझ्या चार अक्षरांचा टेकू आवश्यक नव्हता- पण सईच्या प्रेमळ आग्रहाला डावलता आले नाही. तिच्या कवितेला आणि तिला उदंड शुभेच्छा हेच या चार अक्षरांचं खरं उद्दिष्ट.

डॉ.तारा भवाळकर