कमळाची पानं/संवाद

विकिस्रोत कडून

संवाद

"हेमंत आणि माधवीबद्दल ऐकलंस का?"
जेवायला बसता बसता तिनं विचारलं.
ही वेळ तिची आवडती. दिवसभर दोघांनी
दोन ठिकाणी घालवल्यावर संध्याकाळी एकत्र
बसून सावकाश जेवण जेवत दिवसात काय
घडलं, कोण काय विशेष म्हणालं,कुठली
सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली ह्याचा
उहापोह व्हायचा. तसा फार गंभीरपणे नाही.
कारण बाहेरच्या जगातल्या घटना थोड्याफार
अलिप्तपणे शेरे मारण्यासाठी असतात,मनावर
घेण्यासाठी नव्हे, अशी त्यांची भूमिका होती.
विषय काहीही असो- घाटातल्या वळणावरनं
दरीत कोसळलेली एस.टी., कुणा मित्रानं
केलेली विजोड बायको किंवा आसाममधली
स्फोटक परिस्थिती - त्याचा परामर्श
घेण्याच्या पद्धतीतून त्या दोघांच्यातला सुसंवाद
फक्त स्पष्ट व्हायचा

"ऐकलं ना,' तो म्हणाला. "हेमा भेटला
होता."

"इथं आला होता?"
"मुद्दाम मला भेटायलाच आला होतासं
दिसलं."
"मग काय म्हणत होता?"
 "फारसं काही म्हणण्याच्या मन:स्थितीत नव्हताच."
 "फार वाईट गोष्ट झाली, नाही?"
 "हो ना. माणसं स्वत:च्या आयुष्याचं काय करून घेतात! माझा तर विश्वासच बसेना पहिल्यांदा. वाटलं. मस्करी करतोय. पण मग हे प्रकरण वेगळंच दिसलं."
 तिला एकदम जाणवलं, की गोष्ट नुसती वाईटच नव्हे, फार भयानक झाली. तशी तिच्या माहितीतली अनेक लग्नं मोडली होती किंवा कुठल्या क्षणी मोडणार अशा अवस्थेत लंगडत वाटचाल करीत होती. त्यात दु:ख करण्यासारखं तिला काही सापडलं नव्हतं. पण माधवी आणि हेमाचं लग्न मोडणं म्हणजे शाश्वत मानल्या गेलेल्या तत्त्वाने एकदम आपण सापेक्ष असल्याचं उघड करण्यासारखं होतं. त्यांच्यासारख्यांच्या जवळ येण्यात दोन माणसांच्या केवळ बेरजेपेक्षा जास्त काहीतरी असतं, जे त्यांच्या दूर होण्यानं नष्ट होतं.
 ती तिरीमिरीने म्हणाली, "असं व्हायला नको होतं."
 "झालंय तर खरं आता."
 काही वेळ न बोलता त्यांचे घासामागून घास जात होते. मग मेल्यावर दुखवट्याला आलेली माणसं जशी काहीतरी बोलायचं म्हणून प्रश्न विचारतात तसं त्यानं विचारलं. "तुला कसं कळलं?"
 "कॉमनरूममध्ये मिसेस घाटे सांगत होत्या. माधवी इथंच एका मैत्रिणीच्या खोलीवर राहिलीय. ती मैत्रीण मिसेस घाट्यांची कुणी लागते म्हणे"
 "छान!" तो म्हणाला. "म्हणजे ही बातमी जगभर पसरायला काही वेळ लागायला नको. काय पण मैत्रीण!"
 "ही बातमी गुप्त राहिली काय नि पसरली काय, त्यामुळे फरक होणार आहे?"
 "कदाचित हे सगळं पेल्यातलं वादळसुद्धा ठरेल. पण एकदा गोष्ट षटकर्णी झाली म्हणजे त्यांची परत दिलजमाई होण्यातला तो एक अडथळाच ठरणार."
 तिनं मान हलवली. "मला नाही वाटत त्यांची दिलजमाई होईल म्हणून."
 "तू तरी निराशावादीच आहेस. कशावरून होणार नाही? थोडे दिवस लांब राहिली की एकमेकांवाचून करमायचं नाही त्यांना."
 ती मान हलवतच राहिली. "तुला हेमा काय म्हणाला मला माहीत नाही, पण माधवीला भेटल्यावर मला नाही वाटत ते पुन्हा एकत्र येतील म्हणून."
 "तू माधवीला भेटलीस?" त्याने आश्चर्याने विचारलं.
 "हो, गेले होते मुद्दाम- काय प्रकार आहे ते तिच्याकडून ऐकावं म्हणून."
 "मग आधी कशी बोलली नाहीस? काय म्हणत होती माधवी?"
 "म्हणाली, आत्ता हिंमत आहे तोवरच हे करायला पाहिजे. मग सवयीची गुलाम बनले म्हणजे व्हायचं नाही, आणि आयुष्यभर स्वत:शी प्रतारणा केल्याची टोचणी लागून राहील."
 "बाप रे! अगदी नाटकातला डायलॉगच टाकलान म्हणायचा! साध्या सोप्या भाषेत ह्याचा अर्थ काय ते समजावून सांग बघू मला."
 तिला त्याचा चेष्टेचा स्वर आवडला नाही. ती म्हणाली,
 "त्यात समजावून सांगण्यासारखं काय आहे? इतका काही निर्बुद्ध नाहीयेस."
 जरासा ओशाळून तो म्हणाला, "तसं नाही गं. पण एकदम तडकाफडकी हेमाला सोडून जाण्याचा निर्णय घेण्यासारखं काय घडलं?
 "हा तडकाफडकी निर्णय नव्हताच."
 "म्हणजे इतके दिवस प्रेमाचं नाटक बेमालूमपणे वठवताना ती लग्न मोडायचा विचार करीत होती?"
 "ते नाटक होतं असं कसं तू म्हणतोस? तिचं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे."
 "जिचं त्याच्यावर प्रेम आहे ती त्याला सोडून कशाला देईल?"
 "काही गोष्टी प्रेमाच्या पलीकडच्या असतात."
 "उदाहरणार्थ"
 "उदाहरणार्थ, एक संपूर्ण माणूस म्हणून जगण्याची संधी. ती तिला जो नाकारतो त्याच्याबरोबर नुसत्या प्रेमाखातर ती कशी राहू शकेल?"
 "नुसतं प्रेम? नुसतं प्रेम?"
 "ओरडू नको आणि प्रेमाची महती वगैरेवर लेक्चर देण्याचाही आव आणू नको."
 त्यानं मान हलवली- 'मी कधी कुणाला लेक्चरं दिलीयत' असा चेहरा करून. ते पाहून तिला एकदम हसूच आलं आणि ठसका लागला. त्यानं तिच्या पाठीत धपाटे घातले. मग ती पाणी प्यायली. त्याच्या नको तिथं विनोद करण्याच्या सवयीला आपण हसून उत्तेजन द्यायला नको होतं असं तिला वाटलं. ती खाली मान घालून जेवायला लागली, पण जेवणात तिला रस वाटेना.
 तो म्हणाला, "हं. नुसत्या प्रेमाबद्दल बोलत होतो आपण."
 "बोलून संपलं होतं."
 "संपलं होतं?"
 "हो."
 "मग मला मुद्दाच कळला नाही तू काय म्हणालीस त्याचा."
 "जाऊ दे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्या कळायलाच पाहिजेत असं नाही."
 "राहिलं."
 पुन्हा थोड्या वेळाने तो म्हणाला, "मग आणखी काय म्हणत होती माधवी?"
 "काय म्हणणार? रडत होती!" ती वैतागून म्हणाली.
 "तिला रडायला काय झालं? हा निर्णय तिनंच घेतलाय ना?"
 "पण म्हणून वाईट वाटायचं राहत नाही ना?"
 "अरेच्या! इतकं वाईट वाटत असलं तर हेमाकडे परत जायला कुणी नाही म्हटलंय का तिला? आपल्या बोटावर हातोडा मारून घ्यायचा नि मग 'ओय ओय' करीत बसायचं ह्याला काय अर्थ आहे?"
 एक सूक्ष्म अप्रिय संवेदना तिला जाणवली. ती म्हणाली, "असं म्हणता येणार नाही तुला."
 "मग कसं म्हणता येईल?" त्याने हसत हसत विचारलं.
 "नवराबायकोत बेबनाव झाला की त्यांतल्या एकालाच कसं जबाबदार धरता येईल?' ती तावातावाने म्हणाली.
 "एरवी मीही असंच म्हटलं असतं गं," तिला जरा चुचकारत तो म्हणाला, "पण इथं मला अगदी सरळ मामला दिसतोय. काही कारण नसताना माधवीनं हेमाला सोडलं आहे."
 "कारण नसताना कसं सोडील? ती काय वेडीबिडी आहे का?"
 "एवढी चिडतेस कशाला? काही नवीन कारण नाही असं म्हणायचंय मला. हेमा जिथं राहतो ते अगदी लहानसं खेडं आहे. तिथं तिला तिची वकिली चालवता यायची नाही. म्हणजेच तिचं त्या क्षेत्रातल शिक्षण अनुभव वाया जाणार. ह्या सगळ्या गोष्टी तिला लग्राआधीच माहीत होत्या. होत्या की नाही?"
 "हो."
 "मग आता त्याच कारणासाठी लग्न मोडणं हा आडमुठेपणा नाही का?"
 पोळीच्या तुकड्यात भाजी गुंडाळून तोंडात टाकीत ती म्हणाली, "तू ह्या सगळ्याचा अगदी एकांगी विचार करतोयस."
 "मग दुसरं अंग काय ते ऐकू द्या तरी."
 "जाऊ दे. आपण कशाला त्यावर वाद घालायचा?"
 "तरी पण?"
 जरा वेळ ती काहीच बोलली नाही. मग तो आपल्या उत्तराची वाट पाहतोय असं पाहून म्हणाली, "वरवर पाहिलं तर तुझं म्हणणं काही चूक नाही. पण तिच्या वागण्याचं इतकं साधं समीकरण मांडता येणार नाही. लग्न झालं तेव्हा ती हेमाच्या कार्याने, त्याच्या आदर्शवादाने प्रभावित झाली होती. तिला वाटलं, की कुठल्या तरी नेहमीच्या चाकोरीतून जाण्यापेक्षा ह्या कामात वेगळाच आनंद मिळू शकेल. पण तिची कल्पना होती तसं काहीच घडलं नाही. हेमासारखं शेती आणि त्याच्याशी संबंधित विषयांत तिला काहीच शिक्षण नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला तरी त्याच्या कामाला पूरक कामं करणं, एवढीच भूमिका तिच्या वाट्याला आली. तिची कल्पना होती की हळूहळू शिकत आपण स्वतंत्रपणे काम करू शकू. पण तिथल्या लोकांच्या दृष्टिकोनामुळे ते शक्य झालं नाही. त्यांच्या दृष्टीने तिला फक्त बायको ह्याखेरीज वेगळी किंमत नव्हती. तेव्हा काही वर्षं झाली तरी पत्रव्यवहार पाहणं, अर्ज लिहून देणं, हेमाचं कार्य बघायला येणाऱ्या पाहुण्यांची देखभाल करणं एवढीच कामं ती करीत राहिली. त्यात रचनात्मक काहातरी करण्याचं समाधान तिला मिळणं शक्य नव्हतं."
 "तेच म्हणतोय मी. ह्या ना त्या स्वरूपात पन्नासदा या तक्रारी तिच्याकडून ऐकल्यायत."
 "पन्नासदा बोलून दाखवल्या तरी गोष्टी डाचायच्या थांबत नाहीत ना?"
 "थांबायला पाहिजेत. तीच तीच तक्रार उगाळीत माणूस जगू शकत नाही. त्याबद्दल काहीतरी तडजोड करायला पाहिजे."
 "तडजोड तिनंच का म्हणून करायची?"
 "मी कुठं तसं म्हटलं? त्यानं करावी हवी तर."
 "हे तू ज्या सुरात म्हणालास त्यावरनं तुला असं मुळीच वाटत नाही हे ऐकणाऱ्याला कळतंच. कोणत्याच पुरुषाला वाटत नाही."
 तिच्या तोंडून असं बाहेर पडलं न् मग तिला वाटलं. आपण असं बोलायला नको होतं. माणसांची लिंगभेदावर आधारित वर्गवारी करायची नाही असा त्यांच्यातला अलिखित करार होता.
 ती म्हणाली, "म्हणजे मी तुलाच दोष देतेय असं नाही. आपल्या समाजव्यवस्थेचाच तो दोष आहे. कितीही पुरोगामी पुरुष झाला तरी लग्नात तडजोड करायची ती बायकोनंच, असं धरून चालतो."
 पहिल्यांदा बोललेलं सावरून घ्यायला जे बोललो ते जरा जादाच ठासून बोललो असं तिला वाटलं.
 ती म्हणाली, " भाजी घे ना आणखी."
 "नको आणखी."
 "हे रे काय! वादातला राग जेवणावर कसला काढायचा?"
 "कमाल आहे. कोण म्हणतंय मी जेवणावर राग काढतोय?"
 "नाही तर काय! एरवी कारल्याची भाजी असली की दुसऱ्यांदा वाढून घेतल्याखेरीज तुझं जेवण होत नाही."
 "भूक नसते एखाद्या दिवशी. भात कर इकडे."
 त्याच्या तुटकपणाचा तिला राग आला. तो काही बोलेल म्हणून तिनं वाट पाहिली पण तो न बोलता जोरजोराने भात कालवीत राहिला. भात कालवताना त्याचा हात तळव्यासकट खरकटा व्हायचा. मग तो हात ताटाच्या कडेला पुसून जेवायला लागायचा. पहिल्यापहिल्यांदा तिला ह्या सवयीची शिसारी यायची. एकदा ती त्याला म्हणालीसद्धा. "भात कालवताना सबंध हात भरवायची काय गरज असते? असा नुसता बोटांनी कालवायचा. "तो प्रयत्नसुध्दा न करता म्हणाला होता, "आपल्याला नाही बुवा जमत ते." हळूहळू ती त्या बाबतीत दुर्लक्ष करायला शिकली होती.
 ती म्हणाली, "मी जे बोलते ते उत्तर देण्याच्या लायकीचं वाटत नाही तुला?"
 "तू प्रश्न विचारला नव्हतास, विधान केलं होतंस.'
 "तरी पण त्याच्यावर मत प्रदर्शित करण्याची गरज नव्हती!"
 "मी जे मत प्रदर्शित केलं असतं ते तुला आवडलं नसतं. उगीच कशाला भांडणाला तोंड लावायचं?"
 ती एकदम स्तब्ध झाली. तिला वाटलं, माणूस ज्यांच्याशी संघर्ष टाळतो त्यांना तो आपल्या बरोबरीचं मानीत नाही.
 माधवी म्हणाली होती, "पुरुष म्हणे शांतताप्रिय असतो. म्हणजे काय, बायकोशी भांडायला त्याला आवडत नाही. एक तर कदाचित आपली बाजू पडेल अशी त्याला भीती वाटते, आणि दुसरं तर तिच्या बाबतीतलं काहीच त्याला भांडण्याइतक्या महत्त्वाचं वाटत नाही."
 तो उठून हात धुवायला गेला तशी ती भांडी आवरायला लागली. तो आपल्याला मदत तर करीतच नाही, पण आपलं होईपर्यंत थांबतही नाही ह्याचं तिला बऱ्याच दिवसांनी वैषम्य वाटलं. हे मी त्याला कधी बोलून का नाही दाखवलं? हेच एवढं नाही-इतर अनेक गोष्टी. स्वयंपाकाची बाई न आल्यास स्वयंपाक करणं, त्याने अस्ताव्यस्त टाकलेल्या कपड्यांच्या मुकाट्याने घड्या घालून ठेवणं, त्याने टूथपेस्टची नवी ट्यूब वापरायला काढली की जुनी पिरगाळून त्यातली उरलेली पेस्ट वापरणं, ही सगळी कामं मी का अंगवळणी पाडून घेतली? आता तो म्हणेल की इतकी वर्षं तू जे जे विनातक्रार स्वीकारलंस त्याच्याबद्दल तक्रार करायचा तुला काही अधिकार नाही.
 सगळं आवरल्यावर उरलेल्या दुधाला विरजण लावून ती बाहेर पायरीवर जाऊन बसली. तो आतल्या खोलीत वाचीत असलेल्या वर्तमानपत्राची सळसळ तिला ऐकू येत होती. माधवी आणखी म्हणाली होती, "कबूल करायला सगळ्यात कठीण जातं ते म्हणजे, माणसाची पारख किती चुकते आपली. आपलं सगळ्यात जवळचं माणूस आणि ते फार उशीर होईपर्यंत आपल्याला खरंखुरं कळतच नाही. "फार उशीर म्हणजे किती? तो झालाय हे कळतं कधी? भीतीनं ती एकाएकी थरारली. तिला वाटलं मरोत ते माधवी आणि हेमंत. त्यांचं काय होतंय ह्याच्याशी मला काय कर्तव्य आहे?
 "एकटी काय करत्येयस इथं?" म्हणत तो बाहेर आला. आपण नेहमीप्रमाणे आत न बसता एकट्याच इथं येऊन बसलो हे त्याच्या लक्षात आलं ह्याचंच तिला बरं वाटलं. ती त्याच्याजवळ सरकून अगदी त्याला बिलगून बसली. तिला वाटलं, आपल्या दोघांच्या बाहेरच्या जगाशी आपल्याला कशाला काय देणं-घेणं पाहिजे?
 तो एकदम म्हणाला, "काहीही म्हण तू. पण माधवीनं हे काही बरं नाही केलं."
 तिचं हृदय क्षणभर थांबलंच. मग वेगाने धडधडायला लागलं. एखादं जगन्मान्य तत्त्व सांगितल्यासारख्या कोरड्या आवाजात ती म्हणाली, "जे झालं ते बरं असेल, वाईट असेल, पण त्याला ती दोघं सारखीच जबाबदार आहेत."
 "सारखी जबाबदार कशी असतील? तो काही तिला सोडून गेला नाहीये आणि त्यानं तिला हाकलून पण दिलं नाहीय."
 "जवळजवळ दिलंय असंच म्हणायला पाहिजे. त्यानं तिला काही पर्यायच ठेवला नाही. एकदा तिथं राहणं तिला शक्य नाही म्हटल्यावर तिन इथं राहून वकिली केली तर चालेल, असं कबूल करायला हरकत होती त्याला? तो काही समजून घ्यायला तयारच नव्हता. 'निघून गेलीस तर तुझं-माझं नातं संपलं' असा पवित्रा त्यानं घेतल्यावर ती दुसरं काय करू शकणार?
 "तो का म्हणून तयार असेल?" एकदम हमरीतुमरीवर येऊन त्यानं विचारलं. परिस्थिती कुठल्याही तऱ्हेनं बदलली नसताना त्यानं हा बदल का मान्य करावा?"
 "परिस्थिती बदलली नाही असं कसं म्हणतोस? अमूक तऱ्हेचं आयुष्य आपण जगू शकत नाही असं कळून चुकणं हा परिस्थितीतला बदलच नव्हे का? हे कळल्यावर तिनं मन मारून तसंच जन्मभर रखडत रहावं अशी अपेक्षा असंस्कृत आणि निर्बुद्ध आहे. त्यामुळे तिला सुख लागणार नाहीच, पण त्याला तरी कसं लागेल?"
 "सर्वस्वी आपल्या मनासारखं वागणं म्हणजे सुख, अशी जर माधवीची कल्पना असली तर मग तिनं केलं ते ठीकच केलं."
 "त्याचीही तीच कल्पना नाही का?" त्याच्या उपरोधाने चिडून जाऊन तिनं विचारलं, "सगळं मला हवं तसं कर नाही तर तुझा माझा संबंध तुटला."
 "त्याला हवं तसं नाही, सुरुवातीला तिनं कबूल केलं तसं."
 "पुन्हा तेच. एकदा घेतलेल्या निर्णयाला काय वाटेल ते झालं अखंड चिकटून राहिलं पाहिजे हा कुठला न्याय?"
 "त्यांचं आजचं जे नातं आहे ते त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच ना? मग तो निर्णय फिरवणं म्हणजे ते नातं तोडून टाकणं नव्हे का?"
 तिला वाटलं, पोहायच्या तलावाच्या काठच्या घसरगुंडीवरून ओल्या अंगानं घसरतोय आपण. वेग वाढत चाललाय आणि आता कुठल्याही क्षणी पटकन पाण्यात पडणार आपण. ती म्हणाली, "नवराबायकोचं नातं असल्या क्षुल्लक गोष्टींवर अवलंबून नसलं पाहिजे. कुठल्याही बदलाला तोंड देऊ शकत नाही ते नातं ताठर, स्थिर, वाढू न शकणारंच असणार."
 "तत्त्वज्ञानात शिरू नको."
  "हे तत्त्वज्ञान नाही, कॉमनसेन्स आहे. तुझं जर खरं असलं तर मग नवऱ्याची बदली झाली आणि बायकोला मुलांच्या शिक्षणासाठी तिथंच राहावं लागलं तर त्यांचं नातं तुटायला पाहिजे."
 "वेड घेऊन पेडगावला जात्येयस."
 "तुला निरुत्तर करणारा मुद्दा मांडला की मी वेडी!"
 "हं! तू मला निरुत्तर करणार!"
 ती एकदम गप्प बसली. ढगाआडूनसुद्धा चंद्राचा प्रकाश जाणवत होता. वाऱ्याच्या झुळकीबरोबर पारिजातकाचा मंद वास आला. ठराविक, अतिवापराने गुळगुळीत झालेली प्रतीकं कशाची?
 "आत चल." तो म्हणाला. "डास चावायला लागलेत." तो उठला. त्यानं पुढं केलेला हात दुर्लक्षून ती म्हणाली, "तू जा, मला अजून झोप आली नाही. मी इथंच बसणाराय जरा."


स्त्री ऑगस्ट १९८३