कमळाची पानं/कावळीचं घरटं

विकिस्रोत कडून

कावळीचं घरटं


तिच्या पत्रामुळे सबंध संध्याकाळ वाईट
जाऊ नये म्हणून रागिणीने ते उचलून
ठेवलं. बेत असा, की त्या क्षणापर्यंत आपण
विसरलोच होतो असा आव आणून झोपायला
जाताना मुलांच्या हातात ते पत्र ठेवायचं.
धरमने अर्थातच ते बैठकीच्या खोलीतल्या
छोट्या टेबलावर ॲश-ट्रेला टेकवून असं ठेवलं
होतं, की खोलीत येणाऱ्याला ते आल्या
आल्या दिसावं. तिनं ते उचलून काही
मासिकांच्या खाली खुपसून ठेवलं.

धरम बागेतनं आत आला नि म्हणाला
"क्रान्तीचं पत्र कुठंय?"

"मी तिकडे उचलून ठेवलंय."

"ते का?" धरमच्या आवाजातनं आश्चर्य
ओथंबत होतं.

त्याचा स्वभाव फारच सरळ आहे का फारच
वाकड्यात शिरणारा आहे ह्याबद्दल बरेचदा
विचार करूनही तिला नक्की उत्तर सापडलं
नव्हतं.

ती म्हणाली, "कारण आल्या आल्या
त्यांनी पत्र फोडलं की संध्याकाळभर बोलायला
तोच विषय होणार."
 "मग त्यात काय झालं? त्यांची आईच आहे ना ती?"
 काही वेळ काहीच न बोलता ती भाजी परतत राहिली. शेवटी तिच्या उत्तराची वाट पाहत तो अजून उभाच आहे असं पाहून ती चिडून म्हणाली, "केवळ त्यांना जन्म देण्यापलीकडे आई म्हणवून घेण्यासारखं काय केलंय तिनं?"
 धरम जरासा खिन्नपणे हसून म्हणाला, "आई म्हणवून घ्यायला फक्त मुलांना जन्म देण्याचीच गरज असते."
 "मला हिणवतोस?"
 "रागिणी, ह्याबद्दल मी तुला कधी दोष दिलाय?"
 ती ओशाळून म्हणाली, "नाही, खरंच नाही दिलास. कधी कधी मला असं वाटतं, की तुला नि:संतान ठेवल्याबद्दल तू माझ्यावर ओरडावंस, त्रागा करावास."
 "तसं केलं तर तुला बरं वाटेल?"
 "वाटेलही कदाचित."
 "मग ते पत्र-"
 "मी त्याबद्दल चर्चा करणार नाहीये धरम आणि मुलं आल्या आल्या त्यांना ते पत्र द्यायचं असलं तर तू देऊ शकतोस. मी काही तुला थांबवू शकत नाही. फक्त तू तसं करू नको म्हणून विनंती करू शकते."
 त्यानं तिच्याकडं बराच वेळ नुसतं पाहिलं नि तो स्वैपाकघरातनं निघून गेला. मनावरचं ओझं दूर झाल्यासारखी रागिणी कसलं तरी गाणं गुणगुणत पुन्हा कामाला लागली.
 तिचं गुणगुणणं सहन न होऊन तो पुन्हा बाहेर गेला. कशासाठी गुणगुणते ही! दूरचा विचारच न करता तात्कालिक गोष्टींत आनंद मानून तृप्त आयुष्य जगण्याची हातोटी हा गुण आहे की दोष?
 बागेत काही काम करण्याइतकं दिसत नव्हतं म्हणून तो नुसताच फाटकाशी उभा राहिला. त्याला वाटलं, हे हळूहळू अंधारात जाणारं गुलाबी आकाश. त्वचेला सुखावणारी दमट-गार हवा, डोक्यात भिनणारा रातराणीचा वास, हे एवढंच फक्त आयुष्यात असायला हवं होतं. पण ह्या सगळ्या संवेदनांना बोथट करणारी ती दुसरी जाणीव बोचकारे काढीतच राहायची. वर्तमानपत्रं मुकी होती तरी कानावर येणाऱ्या सगळ्याच बातम्या अफवा म्हणून उडवून लावता येत नव्हत्या. आणि त्याहूनही भयानक होती ती स्वत:च्या नाकर्तेपणाची जाणीव. कितीही आत्मसमर्थन केलं तरी तिच्यापासून बचाव करता येत नव्हता. खरं म्हणजे समर्थन नव्हतंच. मुलंबाळं, इतर जबाबदाऱ्या, नाजुक प्रकृती काहीच नव्हतं. विक्रम आणि शमाला सबब म्हणून पुढे करण्याचा ढोंगीपणा त्याच्यापाशी नव्हता. सहवासाने थोडीफार जवळीक उत्पन्न झाली होती एवढच. सर्वस्वी आपली मुलं म्हणून त्याने त्यांचा स्वीकार केला नव्हता.
 त्याने फार पूर्वीच आपल्याला मूल होणार नाही ही कल्पना स्वीकारला होती. रागिणीने कधीच स्वीकारली नव्हती. ह्या देशात नको तितकी मुल जन्मत असताना माझ्याच वाट्याला त्यांतलं एकसुद्धा का येऊ नये, असा ज्याला उत्तर नाही असा प्रश्न ती विचारायची. कुणीतरी दत्तक घेण्याबदल बोललं तेव्हा दुसऱ्या कुणाला तरी नको असलेलं मूल मी माझं म्हणून वाढवावं असा तिरकस प्रश्न तिनं उपस्थित केला होता. असं असूनही विक्रम आणि शमामध्ये तिनं इतकं पूर्णपणे गुंतून जाणं ह्यात एक मोठा उपरोध आहे हे तिला जाणवत नव्हतं. ह्याचं कारण असंही असेल, की ह्या बाबतीत अनपेक्षित घटनांचा भाग किती आणि तिने बुद्ध्या घेतलेल्या निर्णयाचा भाग किती हे तिचं तिलाच सांगता आलं नसतं.
 सुरुवात झाली क्रांती त्यांच्या शेजारच्या बंगल्यात आऊट-हाऊसमध्ये राहायला आली तेव्हा. बंगला होता एका उद्योजकाचा. तिथे राहायला आल्या आल्या त्याचा मुलगा काही असाध्य आजाराने मेला. तेव्हापासून तो बंदच करून ठेवलेला होता. आधी काही वर्षं आऊट-हाऊसमध्ये एक चौकीदार असे. पुढे बंगल्यातलं सगळं सामान, फर्निचर हलवलं आणि मग चौकीदाराला रजा दिली गेली. बंगला विकला नाही की भाड्यानं दिला नाही. तसाच पडून होता मग एक दिवस क्रांती आऊट-हाऊस मध्ये राहायला आली.
 रागिणी म्हणाली, "विधवा आहे बिचारी."
 "तू गेली होतीस वाटतं तिच्याकडे?' धरमनं विचारलं.
 "हो. दु:खात दिसते. फारसे काही बोलत नाही स्वत:बद्दल- कुठून आली, तिचा नवरा काय करीत होता, कशानं गेला. मीही काही फारस विचारलं नाही. उगीच कशाला जखमेवरची खपली काढा?"
 परत एक दिवस ती म्हणाली, "खरंच विधवा आहे की दुसरीच काही भानगड आहे कुणास ठाऊक!"
 धरम म्हणाला, "आपल्याला काय करायचंय त्याच्याशी?"
 "जवळचं कुणीच नसेल तिला?"
 "असेल कुणी."
 "कुणाचा तरी आधार असता तर तरूण विधवा दोन लहान मुलांना घेऊन अगदी एकटी कशाला राहील? काहीतरी गोम आहे ह्यात. आणि काही तरी लपवण्याजोगं असल्याखेरीज इतकं गप्प कोण राहील? ही अगदी काही म्हणजे काही आपणहून बोलत नाही. फक्त विचारल्या प्रश्नाला उत्तर देते. तेसुद्धा मोजक्या शब्दांत."
 अनाहूत एखाद्या नव्या शेजारणीशी ओळख करून घ्यायला जायचं आणि मग ती आपल्याला हव्या तशा एखाद्या साच्यात बसत नाही म्हणून तिच्यावर 'जगावेगळी', 'चमत्कारिक' असा शिक्का मारायचा- हे सगळंच धरमला अनाकलनीय होतं.
 एक दिवस धरम ऑफिसातनं परत आला तर बागेत रागिणीबरोबर दोन मुलं.
 ती म्हणाली, "ती शेजारी राहायला आलेली बाई आहे ना, क्रांती, तिची मुलं. धरम तुला ठाऊक आहे, तिला कामाला जायचं असलं की ती मुलांना खोलीत ठेवून खोलीला कुलूप घालून बाहेर जाते. ती म्हणते, मुलं सांभाळील असं कुणी तिला माहीत नाही, आणि विक्रम पुरेसा मोठा आहे. तो म्हणे शमाला सांभाळू शकतो."
 "सांभाळीत असेल."
 "साडेपाच वर्षांचा मुलगा?"
 "त्याला काय हरकत आहे?"
 "धरम, तू सगळ्या बाबतींत इतका थंड कसा? इतक्या लहान मुलांना तासन्-तास एकटं एका खोलीत कोंडून ठेवणं हे तुला भयंकर वाटत नाही?"
 "हे बघ रागिणी, मला काय वाटतं ही गोष्ट अलाहिदा आहे. हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. आपण त्यात नाक खुपसायचं कारणच काय?"
 "ही काम तरी कसलं करते कुणास ठाऊक!"
 "ती आपणहून सांगत नाही ना? मग तुला काय करायचंय त्याच्याशी?"
 "नोकरी म्हणावी तर वेळीअवेळी कधीही जाते-येते. इतकी अनियमित नोकरी कुठली असणार?"
 "रागिणी-"
 रागिणी नाक खुपसत राहिली. क्रांतीने अधनंमधनं मुलांना आपल्याकडे सोडून जावं असा प्रस्ताव तिने भीतभीतच मांडला. क्रांती बेफिकीरपणे म्हणाली, "ठीक आहे." मुलं रागिणीकडे राहिली काय किंवा खोलीत बसली काय, तिला त्यात काही फरक वाटत नव्हता. ती बाहेर जाताना किल्ली रागिणीकडे ठेवून जायची. मुलांना आपणहून तिनं कधी रागिणीकडे आणलं नाही आणि रागिणीकडून परत नेलं नाही. खोलीचं दार उघडं दिसलं की मुलं परत जायची.
 "धरम. ही किती शांत आणि समजूतदार आहेत! नाहीतर ह्यांच्या वयाची मुलं किती दंगा करतात! बिचारी बालपण हरवल्यासारखी वागतात."
 अगदी परक्या घरी नव्यानंच आलेली म्हटली तरी त्यांचं इतकं मुकाट बसून राहणं धरमलासुद्धा विचित्र वाटायचं. रागिणी त्यांना खाऊ द्यायची गोष्टी सांगायची, चित्रं दाखवायची, त्यांच्याशी खेळ खेळायची; आणि सगळे सोपस्कार ती मुलं अलिप्तपणे करून घ्यायची. आई घरी आल्यावर सुगावा लागला की ती जे काय चाललं असेल ते अर्धवट टाकून चालायला लागायची. मग रागिणीला हिरमुसल्या चेहऱ्याने सावकाश ठोकळे, बाहुल्या रंगवायची पुस्तकं, खडू-सगळं आवरून ठेवताना पाहिलं की धरमला वाटायचं, तिला म्हणावं, बाई ग, जे तुझं नाही त्यात तू मन गुंतवू नको. पण त्यांच्यानं ते झालं नाही. त्याला वाटे, ज्या गोष्टी मला स्पष्ट दिसतात त्या तिला दिसत नाहीत हे कसं शक्य आहे?
 फक्त एकदाच ती कळवळून म्हणाली होती, 'धरम, मी त्याच इतकं करते, माझ्याबद्दल त्यांना काहीच का वाटत नसेल?" आणि धरमनं उत्तर दिलं होतं, "असं कसं होईल? काहीतरी वाटत असलंच पाहिजे."
 महिन्यांमागून महिने जात राहिले. रागिणी लादल्या गेलेल्या निष्काम भावाने त्या मुलांचे करीत राहिली. धरम स्वत:ला विचारीत राहिला, "ह्या सगळ्याचा शेवट कसा? कुठे?"
 सगळ्याचा शेवट झाला क्रांती नक्की काय करते ते त्यांना कळलं त्या दिवशी आणि हा शेवट म्हणजे एक सुरुवात ठरली. बरेच शेवट ठरतात तशी.
 पोलिसांची गाडी येऊन क्रांतीला अटक करून घेऊन गेली. खरं म्हणजे अटक म्हटलं की एक कायदेशीर कृती अभिप्रेत असते. इथे नुसते पोलिस येऊन क्रांतीला उचलून घेऊन गेले.
 धरम म्हणाला, "म्हणजे क्रांतीचं नाव सार्थ होतं तर."
 रागिणी म्हणाली, "कसली पाषाणहृदयी बाई! शेवटपर्यंत मुलांना सांभाळशील का, असे शब्द काही तिच्या तोंडातून निघाले नाहीत. मीच म्हटलं, काही काळजी करू नको, मुलं माझ्याकडे राहतील म्हणून."
 "प्रस्थापित सरकारविरुद्ध बंड करणाऱ्यांना पाषाणहृदयीच व्हावं लागतं लहानसहान व्यक्तिगत बाबींसाठी जर ते भावविवश व्हायला लागले त्यांचा मार्ग त्यांना सोडूनच द्यावा लागेल."
 "मुलं ही लहानसहान बाब आहे?"
 "त्यांच्या लेखी आहे.”
 "मग त्यांना मुलं होण्याचा हक्क नसावा."
 "हे कुणी ठरवायचं रागिणी? समाजात अशा वाटण्या होतात का, अमक्यांनी मुलं वाढावायची, तमक्यांनी क्रांती करायची, अशी?"
 "मग क्रांती करून तुरुंगात जाणाऱ्यांची मुलं कुणी वाढवायची?"
  तुझ्यामाझ्यासारख्या पुढचामागचा विचार करून सुरक्षित आयुष्य जगणाऱ्यांनी."
 त्याच्या स्वरातल्या उपरोधाने तिला नांगी मारल्यासारखं झालं. ती उसळून म्हणाली, "सुरक्षित आयुष्य जगण्याची एवढी लाज वाटते तर तूही क्रांतीसारखा तुरुंगात का जात नाहीस?"
 पुष्कळ वर्षे गेली आणि क्रांती कधीतरी सुटून येण्याची आशा मावळायला लागली. न्यायलयासमोर उभंही न केलं जाता तुरुंगात खितपत पडलेल्या हजारो जणातली तीही एक. महिन्यातून एक पत्र पाठवायची तिला परवानगी असे, पण त्यातून ती जिवंत आहे ह्यापलीकडे काहीच बातमी कळत नसे.क्वचित शिक्षा भोगून सुटून जाणारा गुन्हेगार किंवा लाचेला बधलेला कुणी जेलर ह्यांच्याकरवी एखादं खरं पत्र यायचं.
 रागिणीच्या मनात क्रांतीची प्रतिमा खूप पुसट झाली होती. प्रथम प्रथम ती कटाक्षाने ही क्रांतीची मुलं आहेत. मी त्यांना नुसती संभाळतेय. असं स्वतःला बजावीत असे. पण फारच दिवस गेले तेव्हा ह्या खबरदारीची गरज वाटेनाशी झाली. क्रमाक्रमाने तिने इतके दिवस निषिद्ध ठरवलेल्या विचारांची चव घ्यायला सुरुवात केली. आता कुठली क्रांती परत येतेय! आणि आलीच तर आता तिच्यात आणि मुलांच्यात कसले बंध राहणार आहेत? तिनं ज्यांना या वर्षांपूर्वी सोडलं ती ही मुलं नाहीतच. ही दोन वेगळी माणसं आहेत वेगळ्या संस्कारांतून निर्माण झालेली, परकी.
 दर पत्रातून क्रांती परत यायची, मग मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, औत्सुक्य ओढ पाहिली की रागिणीला स्वत:शी कबूल करावं लागायचं, की हा आविष्कार काही वेगळाच आहे. ही मुलं आपल्याशी कितीही मायेनं वागली तरी तिच्याबद्दल त्यांना जे वाटतं ते आपल्याबद्दल कधीच वाटलं नाही, कदाचित वाटणार नाही. पण थोड्या दिवसांनी पुन्हा क्रांती विसरून जायची आणि रागिणी स्वत:शी म्हणायची, शेवटी मी इथं आहे आणि ती नाहीये. तिच्याबद्दल त्याना जे वाटतं ते हाडामांसाच्या बाईबद्दल वाटत नाही, एका अमूर्त कल्पनेबद्दल वाटतं.
 जेवण झाकून ठेवून रागिणी बाहेर आली. धरम अजून फाटकाशी होता. त्याच्याशेजारी जाऊन ती उभी राहिली. आता सूर्यास्ताचे अगदी शेवटचे रंगसुद्धा मावळून आकाश काळं झालं होतं. झाडांतून अधनंमधनं शेजारच्या घरांच्या उजळलेल्या खिडक्या दिसत होत्या-सुरक्षित घरट्यातून सावधपणे बाहेरच्या अंधाराकडे बघणाऱ्या डोळ्यांसारख्या. रस्त्याच्या दिव्यांभोवती असंख्य किडे पिंगा घालीत होते. सकाळी प्रत्येक दिव्याखाली मेलेल्या किड्यांचा खच दिसणार होता.
 "हे का आत्महत्या करतात अशी?" रागिणी म्हणाली.
 "अं?"
 "किडे"
 धरमला हसू फुटलं. "त्यांचं आयुष्यच तेवढं असतं." त्याने तिला वेढून जवळ ओढलं. पुष्कळ दिवसांत त्याला ती त्याच्या इतकी जवळ आलेली आठवत नव्हती. एकदम एक तयार कुटुंब पदरात पडल्यामुळे असेल, पण त्याला विक्रम आणि शमाचा बाप ही भूमिका समरसून पार पाडणं जमलं नव्हतं. तो रागिणीच्या ह्या नव्या आयुष्याच्या परिघावरच राहिला होता.
 "मुलांना उशीर झालाय आजसुद्धा," रागिणी म्हणाली.
 सुरुवातीला रागिणी विचारायची; "का रे, आज एवढा उशीर?" मुलं सबबी सांगायची. आज काय टेनिस, उद्या वक्तृत्वस्पर्धा, परवा कुणी मित्रानी दिलेली पार्टी. जेव्हा रागिणीला उमजलं की ठरवून दिल्यासारखी ही ओठावर येणारी उत्तरे म्हणजे खरी कारणं नव्हेत. तेव्हा तिने त्यांना छेडणं बंद केलं. मग क्रांतीचं काय झालं ते आठवून ती व्याकूळ व्हायची. सुरेख उभारलेलं आयुष्य आपल्या हातांनी ती का फेकून देतायत ते तिला कळेना.
 रागिणी शहारली ते धरमच्या हाताला जाणवलं. तिच्या अंगावर उठलेला शहारा पावसाळी रात्रीच्या गारठ्यामळे उठला नव्हता हे त्याला कळलं. त्याला वाटलं, तिनं आपल्याला म्हणावं, धरम, मला भीती वाटते रे. मग आपण तिला जे घडणारं आहे त्याची अटळता, तिच्या धडपडीची निष्फळता पटवून देऊ. पण ती काही बोलली नाही. त्याच्या मनात आलं, ह्या मुलांचं जे व्हायचंय ते त्यांनी स्वत:च्या हाताने ओढवून घेतलेलं असणार आहे. फक्त त्यांनी आपल्याला गोत्यात आणलं नाही म्हणजे मिळवली.
 कोपऱ्यावरनं दोन सायकली वळल्या आणि रागिणीने सोडलेल्या नि:श्वासाबरोबर तिचं ताठरलेलं अंग एकदम सैलावलं. मुलं फाटकाशी पोचली तोवर "किती रे हा उशीर!" असे सवयीने ओठापर्यंत आलेले शब्द परतवून ती म्हणाली, "दिवे नाहीच ना घेतलेत अजून?"
 शमा हसत म्हणाली, "रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड पुरेसा असतो ग."
 "कायदा तसं मानत नाही. एक दिवस पोलिसानं पकडलं म्हणजे समजेल."
 "कोणी नाही पकडत. सगळे असेच बिनदिव्याचे जातात."
 "बरं, चला आता लवकर. हातपाय धुऊन जेवायलाच या लगेच."
 मुलांनी पानं घेतली. पाणी वाढलं. जेवण टेबलावर आणून वाढलं. रागिणीच्या मनात अनेकदा येई तसं आलं, ही किती चांगली वागतात. अति चांगली? परक्यासारखी? कदाचित माझी मुलं असती तर घरी आल्यावर पुस्तकं अस्ताव्यस्त फेकून आयती टेबलाशी येऊन बसली असती, कामाला बोट लावल नसतं. माझ्याकडून सतरांदा ओरडून घेतलं असतं.
 विक्रम आणि शमा भुकेनं, मनापासून जेवत होती. एकदा विक्रम म्हणाला ,"आमची आई म्हणायची की अन्न समोर असलं की पोटभर खाऊन घ्यावं. पुढलं जेवण कधी कठे मिळेल कुणाला माहीत.
 रागिणीला वाटलं. इतकी वर्ष माझ्या घरी राहूनही त्यांना भविष्यकाळाबद्दल इतकी असुरक्षितता वाटते?
 जेवणं झाल्यावर बैठकीच्या खोलीत गप्पा मारता मारता शमा टेबलावरच्या मासिकांशी चाळा करीत होती. तेव्हा तिला पत्र सापडलं.
 "आईचं पत्र! कधी आलं?" ती म्हणाली.
 "अरे हो," रागिणी म्हणाली. "मी विसरलेच होते. आजच आलं. मी तिथे आवराआवर करताना चुकून मासिकाखाली गेलं असणार." आपण पत्र तिथं ठेवलंय हे रागिणी विसरून गेली होती.
 शमानं ह्यावर काही न बोलता मुकाट्याने पत्र फोडून वाचलं आणि विक्रमच्या हातात दिलं. त्यानं वाचून ताबडतोब ते फाडून त्याच्या बारीक बारीक चिंध्या केल्या.
 "काय म्हणत्येय आई तुमची?" रागिणीनं विचारलं.
 तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता विक्रम म्हणाला, "हे पत्र नक्की आजच आलं?"
 "हो रे. इतका विश्वास नाही का माझ्यावर?"
 "बऱ्याच दिवसांपूर्वी पाठवलेलं आहे, म्हणून विचारलं. आणि पोस्टाचा शिक्का नाहीये त्याच्यावर. कुणीतरी आणून दिलं ना?"
 "हो."
 "कुणी?"
 "मला काय माहीत? होता कुणी माणूस."
 "कसा दिसत होता?"
 "होता चार माणसांसारखा." रागिणीला जरासा राग यायला लागला होता. एका पत्राबद्दल एवढं चर्वितचर्वण कशासाठी व्हावं?
 "घंटा वाजली म्हणून दार उघडलं तर तो दारासमोर उभा होता पत्र हातात देऊन चालता झाला. मी धड बघितलंही नाही त्याच्याकडे."
 "हे एक महिन्यापूर्वी लिहिलेलं आहे." विक्रम म्हणाला.
 "जाऊ दे ना विक्रम," शमा म्हणाली. "तिनं ज्याच्याजवळ दिलं तो विसरला असेल, किंवा त्याला इथपर्यंत पोचायला वेळ लागला असेल.
 "इतका वेळ?"
 रागिणी म्हणाली, "तुला काय म्हणायचंय ते सरळ सांग ना."
 "रागिणी!" धरम इतक्या वेळानंतर एकदम बोलला, इशारेवजा एकच शब्द.
 "तू ह्यात पडू नको धरम. विक्रम, तुला काय म्हणायचंय? की ते पत्र आधीच आलं होतं आणि मी तुमच्यापासून लपवून ठेवलं?"
 "तशी शक्यता आहे."
 "पुष्कळ दिवस पत्र तुमच्यापासून लपवून ठेवून मग तुम्हाला देण्यात काय स्वारस्य आहे? त्याऐवजी मी ते फेकूनच दिलं नसतं का? निदान सहज तुमच्या हातात पडेल असं तरी ठेवलं नसतं. मी अतिशय दुष्ट आहे असं आपण धरून चाललो तरी मी इतकी मूर्ख आहे असं तुला का वाटलं?"
 शमा म्हणाली, "विक्रम, पुरे झालं. सोडून दे."
 विक्रमने थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं आणि शेवटी म्हणाला, "ठीक आहे. सॉरी, मावशी."
 "नाही, एवढ्यावर संपलं नाहीये." रागिणी म्हणाली. "विक्रम, तुला वाटतं तितकी नाही तरी थोडी मूर्ख आहेच मी, आणि मतलबीही. पत्र आजच आलं हे खरं आहे. पण ते सहज दिसेलसं न ठेवता मुद्दाम मासिकाखाली मी लपवून ठेवलं हेही खरं आहे. तुम्ही आल्या आल्या ते तुमच्या नजरेला पडायला नको होतं मला."
 "का?" विक्रम म्हणाला.
 "कारण तिचं पत्र हातात पडलं की तुम्हांला दुसरं काही सुचत नाही. जेवणावर सुद्धा लक्ष नसतं तुमचं."
 "मग त्यात काय बिघडलं? तुला तिचा मत्सर वाटतो?"
 "हो, वाटतो. जिच्यावर तुमची इतकी भक्ती आहे तिनं तुमच्यासाठी काय केलंय? कधी चांगलंचुंगलं करून खायला घातलंय? तुमच्या अंगावर धड कपडा आहे की नाही बघितलंय? कधी तुमच्यापाशी बसून काही शिकवलंय? वाचून दाखवलंय? कधी खेळलीय ती तुमच्याबरोबर? तुम्ही जेमतेम कळण्याइतपत मोठी होता तेव्हा तुम्हांला घरात कोंडून ठेवून ती तासन्-तास बाहेर जायची. तुम्हांला भीती वाटेल, काही अपघात होईल ह्याचीही कदर करायची नाही. आई म्हणवून घेण्याचा अधिकार ज्यामुळे पोचावा अशी एक तरी गोष्ट तिनं केलीय?"
 विक्रम म्हणाला, "तसं सर्वमान्य चाकोरीबद्ध निकष लावून पाहिलं तर तिने आमच्यासाठी काही केलं नाही हे कबूल केलं पाहिजे."
 त्याच्या नुसत्याच मिशी फुटलेल्या ओठांवर तुच्छतादर्शक स्मित होतं.
 धरम काकुळतीने म्हणाला. "रागिणी. जाऊ दे ना. कशाला तु हा वाद काढत्येयस?"
 "कधी तरी काढायला हवाच होता धरम. तू आता मला रोखू नको. सर्वमान्य चाकोरीबद्ध कल्पनांप्रमाणे आईनं मुलांसाठी जे जे करायला हवं, जे सगळं मी ह्यांच्यासाठी करत आले. ते निरर्थक, नगण्य आहे का?"
 शमा म्हणाली, "योग्य भूमिकेतून केलं तर नगण्य नाहीच."
 "मग मी अयोग्य भूमिकेतून केलं असं तुला म्हणायचंय का?"
 "तसंच नाही."
 "चाचरतेस कशाला? सरळ बोल की," विक्रम म्हणाला. "जी योग्य भूमिकेतून करीत असेल तिला ते बोलून दाखवायची गरज भासणार नाही. ती त्याच्या बदल्यात कृतज्ञतेची अपेक्षा करणार नाही, कारण ती जे करते ते तिला त्यातून काही तरी मिळतं म्हणून करते."
 "तुमच्यासाठी मी जे काही केलं असेल त्यातून मला काय मिळालं?"
 "तुला मूल हवं होतं आणि तुझी ती कधी न भागलेली भूक तू आमच्याकरवी शमवीत होतीस."
 इतका दुष्टपणा! रागिणीला दु:खापेक्षा आश्चर्य जास्त वाटलं. ती म्हणाली, "म्हणजे क्रांतीनं अणि तुम्ही माझ्यावर उपकार केलेत."
 "नाही. उपकार कुणीच कुणावर केले नाहीत. प्रत्येकानं आपल्याला जे करणं भाग होतं ते केलं, एवढंच."
 "क्रांतीनं जे केलं ते करणं तिला भाग होतं हे मला नाही पटत."
 "काही गरजा परिस्थितीजन्य असतात, काही स्वभावजन्य. तिनं केलं ते करणं तिला दोन्ही कारणांसाठी भाग होतं. आपल्या देशात आज जी परिस्थिती आहे ती सहन करून जगत राहणं तिला शक्य नव्हतं."
 "पण म्हणून अगदी लहान वयात तुम्हांला वाऱ्यावर सोडून देणं समर्थनीय होतं? तुमच्याबद्दल तिची काहीच जबाबदारी नव्हती?"
 "अर्थातच होती. त्यामुळेच तिला असं वाटलं, की आहे ह्या वातावरणात मुलांना वाढवणं योग्य नाही. ते बदलण्यासाठी धडपड केली पाहिजे." रागिणीकडे पाहात विक्रम एकदम त्वेषाने म्हणाला, "तुला असं वाटतं का, आम्हाला सोडताना तिला काहीच यातना झाल्या नसतील? तिनं जे केलं त्याला असामान्य धैर्य लागलं असलं पाहिजे."
 "पण तिचं हे असामान्य धैर्य अनाठायीच होतं. त्याचा उपयोग झाला? आज दहा वर्षांहून जास्त काळ ती नि तिच्या सारखे कैक खितपत पडलेत. त्यांची आयुष्ये बरबाद झाली- पण त्यामुळे परिस्थितीत काही बदल झालाय का?"
 "तो मुद्दा नाही,' विक्रम म्हणाला. "फरक कधीतरी पडेल. कदाचित खूप दिवस पडणारही नाही. पण त्याचा अर्थ आहे ही परिस्थिती मुकाट्याने स्वीकारायची असा होत नाही. त्याविरुद्ध लढलंच पाहिजे. परिस्थिती बदलेपर्यंत लढा दिलाच पाहिजे."
 "त्याची काहीही किंमत द्यावी लागली तरी?"
 "अर्थात. ती किंमत माझ्या आईसारखे काहीजण मोजायला तयार असतात म्हणून इतरांचं भवितव्य बदलण्याची काही तरी शक्यता आहे. सगळेचजण आपल्या गुबगुबीत संसाराला जपत जगायला लागले तर हुकुमशहांना फारच आनंद होईल."
 उजव्या पायाचा चवडा जमिनीवर मागेपुढे घासत होता- आपल्याच स्वतंत्र बुद्धीने हलत असल्यासारखा, त्याच्याकडे रागिणी बघत होती. तिला वाटलं, आपलं डोकं जोरानं आपटलंय. ही बधिरता गेली की संवेदना हळूहळू परत येईल बहुतेक.
 धरमला वाटलं, जाऊन तिला आपल्या मिठीत घ्यावं. म्हणावं, की हे एक दुःस्वप्न होतं, ते विसरून जा. ते पडण्यापूर्वी आपण जिथं होतो तिथं परत जाऊ या. पण त्याला तिच्या जवळ जाण्याचा, तिला स्पर्श करण्याचा धीर झाला नाही.
 बऱ्याच वेळाने त्याने फक्त तिला हलकेच हाक मारली, “रागिणी-". तिनं मान उचलून वर पाहिलं. विक्रम आणि शमा खोलीत नाहीत हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. मग ती धरमकडे पाहून मंद हसली नि म्हणाली, "त्याच असं आहे धरम, कधी फासे उलटे पण पडतात. जो जुगार खेळतो त्याला ही शक्यता धरून चालावंच लागतं."

स्त्री नोव्हेंबर १९८३