कमळाची पानं/तणावे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

तणावे


विश्वजित तिच्याकडे जाब मागायला येणार
अशी तिची अपेक्षा होतीच, पण तरी
त्याला पाहून तिला राग आला.
ती नुकतीच ऑफिसमधून आली होती.
आता कॉफीची किटली आणि वर्तमानपत्र
घेऊन तासभर आरामात पाय पसरून
बसायचा तिचा बेत होता. एकटेपणातही
एक लज्जत असते हे तिला प्रथमच कळत
होतं. त्यातून विश्वजित नुसताच तिला
भेटायला, तिच्याशी गप्पा मारायला आला
असता तर तिची काही हरकत नव्हती. पण
आल्या आल्या दारातच त्याने प्रश्नांची फैर
झाडली. 'हा काय प्रकार चाललाय?
तू अशी कशी एकदम चारूला सोडून
आलीस? तुझी त्याच्याबद्दल काही
जबाबदारी आहे की नाही?'

ती म्हणाली, 'आधी आत येऊन स्वस्थपणे
बैस बघू तू. धडाधडा यायचं न् माझ्यावर
प्रश्नांची सरबत्ती करायची ही काय
वागण्याची रीत झाली?"

"त्या प्रश्नांची उत्तरं मिळायचा हक्क आहे
मला."
हनुवटीचा आक्रमक कोन, अरुंद कपाळाच्या
मधे उभी आठी, विस्फारलेल्या डोळ्यांतली
 रागाची चमक. शत्रूच्या हृदयात भीतीनं
 धडकी भरावी म्हणून योद्धा रणशिंग, शंख ह्यांचा उपयोग करतो तसा विश्वजित वाद घालताना ह्या हत्यारांचा उपयोग करायचा.
 ती म्हणाली, 'कसला हक्क? मी तुझं काय लागते? चारूला प्रश्न विचारु दे, मग मी देईन त्यांची उत्तरं.'
 हे नेहमीचंच होतं. बोलता बोलता ती दोघं चटकन भांडणाच्या काठावर येऊन ठेपायची. माघार बहुतेक तोच घ्यायचा. तसाच आताही ताे एकदम आवेश जाऊन सपाट झालेल्या स्वरात म्हणाला, 'चारू विचारणार नाही तुला माहीत आहे.'
 'माहीत आहे,' ती म्हणाली. 'कॉफी घेणार का तू?'
 'तू बोलणार आहेस का? सगळं नीट स्पष्ट करणार आहेस का?'
 क्षणभर तिला नाही म्हणायचा मोह झाला. मग तो रागारागान निघून गेला असता आणि टोचणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या आठवणी उकरून काढणं टळलं असतं. पण कधीतरी हे करायचंच होतं. आत्मसमर्थनाचाही निकड वाटत होती आणि ते फक्त विश्वजित जवळच करणं शक्य होतं. तिच्या आईने 'हे असं व्हायचंच होतं' असा पवित्रा घेतल्यावर ती आईशी फारस काही बोललीच नव्हती.
 ती म्हणाली, 'हो बाबा, बोलेन. सगळं सांगेन. पण आधी मला काहीतरी खाऊ पिऊ दे. मी ही आत्ता तुझ्यापुढंच घरी येत्येय.'
 'खरं म्हणजे तुला नोकरी करण्याची काय गरज आहे?'
 'मृण्मयचं नि माझं पोट भरण्यासाठी.'
 'चारू तुला लागतील तेवढे पैसे आनंदानं देईल.'
 ती काहीच बोलली नाही. विश्वजितचं म्हणणं बरोबर होतं. चारूनं ती मागेल तितके पैसे तिला दिले असते. कर्ज काढून द्यावे लागले असते तरी किंबहुना तिनं काही मागितलं नाही म्हणूनच तो दुखावला गेला असला पाहिजे. म्हणूनच तिला काही मागायचं नव्हतं. असल्या क्षुल्लक कृत्यांनी त्याच्या 'मी'ला टेकू देण्यात तिला काही स्वारस्य नव्हतं.
 विश्वजितनंच मग विचारलं, 'खरच, मृण्मय आहे कुठं?'
 'इथं काहीतरी सोय होईपर्यंत आईकडे ठेवलाय त्याला.'
 तिनं कॉफी किटलीत ओतून स्टो बंद केला. कपबशा, फराळाचं, सगळं खोलीतल्या एकुलत्या एक लहानशा टेबलावर मांडलं आणि कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली, 'खायला घे ना काहीतरी.'
 त्यानं मान हलवली नि एकाग्रतेनं कॉफी प्यायला सुरुवात केली. त्या कळाहीन भाड्याच्या खोलीचा मजीदपणा, घाणेरड्या झालेल्या भिंती, बंद दारातूनही जाणवणारा कॉरिडॉरमधल्या मोरीचा वास ह्या सगळ्यांची नव्यानंच त्याच्या दृष्टीतून जाणीव होऊन ती उदास झाली. तिला वाटलं, कदाचित मला आता ह्या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल.
 तिचा पहिला कप संपून ती दुसरा ओतीपर्यंत तो थांबला, आणि मग आपला कप ठामपणे बशीत ठेवीत म्हणाला, 'हं बोल आता. हे सगळं काय चाललंय? चारूला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे अशा वेळी तू त्याला सोडून कशी आलीस? त्याची काय अवस्था आहे ह्याची तुला कल्पना आहे?'
 औपरोधिक स्वरात तिनं विचारलं. 'म्हणजे चारूला कधीतरी माझी कमी गरज लागणार आहे आणि त्या वेळी मी त्याला सोडलं तर चालेल असं म्हणायचंय का तुला?'
 'माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नको.'
 तिनं एक लांब सुस्कारा सोडला.'खरं म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी न सांगताच कळायला हवी होती तुला. पण जाणूनबुजून डोळे मिटून घेतलेल्याला बघायला कसं लावणार? ठीक आहे. तुला माझ्या तोंडूनच ऐकायचंय तर सगळं पाहिल्यापासून ऐक- सगळं सुरळीत चालल्यासारखं वाटत होतं तेव्हापासून.

० ० ०

 चारू तिच्या आयुष्यात आला म्हणण्यापेक्षा घडला म्हणायला पाहिजे. तो तिला एका शेतकी प्रदर्शनात भेटला. प्रदर्शन तिच्या कामावरून घरी जायच्या रस्त्यावर होतं. घरी जाऊन तरी काय करायचंय म्हणून वेळ घालवायला ती आत शिरली. हरित ॲग्रोएजन्सीज नावाच्या कंपनीच्या स्टॉलची मांडणी रंगयोजना एकदम डोळ्यात भरली म्हणून त्यात डोकावली. चारू 'या' असं हसतमुखानं तिचं स्वागत करून तिचं इकडंतिकडं बघून होईपर्यंत आदबशीरपणे बाजूला उभा राहिला.
 खरं म्हणजे काही बघण्यात तिला रस नव्हता पण तिनं स्टॉलची पाहाणी करण्यात योग्य वाटेल इतका वेळ घालवला आणि शेवटी विचारलं, तुमची कंपनी ही कीटकनाशकं तयार करते का?'
 ह्या क्षेत्राविषयी थोडीफार माहिती असणाऱ्याला तिचा प्रश्न मूर्ख आहे हे कळलं असतं. पण त्यानं तसं न दर्शवता गंभीरपणे तिला विशद करून सांगितलं, 'नाही. कीटकनाशकं बहुतेक परदेशी कंपन्याच करतात. आम्ही फक्त त्यांची एजन्सी घेऊन ती विकतो. ही इकडे पाकिटं आहेत ना, ती आम्ही तयार करतो. ह्यात पिकांना लागणारी सूक्ष्मद्रव्यं असतात.'
 तिचं सगळं लक्ष त्याच्या दाट मऊ तपकिरी छटा चमकत असलेल्या केसांकडे, उंच कपाळाकडे, सरळ नाकाकडे, पातळ पण रुंद जिवणीकडे, गव्हाळ रंगाकडे होतं. त्याला वाटलं ती एकाग्रतेनं ऐकतेय म्हणून तो खूप काही सांगत गेला. शेवटी इतर कुणी माणसं त्याच्या स्टॉलवर आली तेव्हा त्यांच्याकडं तो वळला आणि ती बाहेर पडली.
 ती खरं म्हणजे स्वप्नांच्या ढगांवर तरंगणारी मुलगी नव्हती. पहिल्यापासून उमजून होती की त्याच्यासारख्यानं मान वळवून बघावं अशी ती नव्हती. तरी पण तो मनातनं जाईना. त्याचं रूप, लहान मुलासारखं चटकन तोंडभर फुलणारं हसू, त्याचा उत्साह पुन:पुन्हा आठवून ती व्याकुळ झाली. शेवटी काही विशिष्ट आशा न बाळगता, केवळ त्याला पाहायला, जमलं तर भेटायला म्हणून ती पुन्हा त्या प्रदर्शनात गेली.
 सरळ आत जायचं धैर्य काही तिला झालं नाही. स्टॉलच्या कनातीच्या दारातून दिसणार नाही अशा बेतानं ती बाहेरच घुटमळली. थोड्या वेळात तो आला आणि आपलं एक गारद करणारं आर्जवी हास्य तिच्या दिशेने फेकून म्हणाला, 'हॅलो. तुम्ही परवा प्रदर्शनाला आला होता नं?'
 तिनं हो म्हणून मान हलवली. आपण ह्याच्या मागं आलोयत हे कळलं असेल का ह्याला? कळलं असणारच. त्याला सवयच असली पाहिजे मुली मागे लागण्याची.
 तो म्हणाला, 'चहा घ्यायला येणार का? बोलून बोलून माझा घसा दुखायला लागलाय.'
 आणि मग जी स्वप्नं पाहायला ती धजली नव्हती ती क्रमाक्रमानं प्रत्यक्षात आली.
  तिची आई म्हणाली, 'असला आगापिछा नसलेला माणूस लफंगा निघायचा हो.'
 ती म्हणाली, 'पण लफंगेपणा कशासाठी तरी करतात ना? माझ्याकडून त्याला काय मिळणार?'
 आई म्हणाली, 'तेही खरंच म्हणा, पण आपलं आईबाप, भाऊ-बहिणी अशी सगळी माणसं असली म्हणजे बरं असतं. तुला वाटत असेल, बरं झालं, भांडायला सासू-नणंदा नाहीत म्हणून. पण कुटुंबाचा आधार असतो.'
 'त्याला सगळी माणसं नाहीत म्हणून कुणी सांगितलं तुला? सगळी आहेत. फक्त तो त्यांच्याशी संबंध ठेवीत नाही.'
 'तेच तर. मग अडीअडचणीला कोण उपयोगी यायचं तुमच्या?'
 'कोणी नकोय यायला. आमचं आम्ही पाहून घेऊ.'

० ० ०

 ती विश्वजितला म्हणाली, 'पण खरं म्हणजे आईबाबांचा विरोध फारच गुळमुळीत आणि केवळ कर्तव्य म्हणून केलेला. तसं पसंत न पडण्यासारखं चारूत काही नव्हतं आणि शेवटी माझं मी लग्न ठरवून हुंड्याविना करत्येय ह्याचं त्याना बरंच वाटत होतं. तेव्हा त्यांनी फार ताणून न धरता संमती दिली.'
 'आज सिनिकल मूड का?'
  'सिनिकल नव्हे, वास्तववादी.'
 'म्हणजे तेच ते. वास्तवाकडे भ्रमाचे चष्मे न लावता सरळ पाहाणाऱ्यालाच साधारणपणे सिनिकल म्हटलं जातं.'
 'तसं का म्हणेनास.'
 'बरं, पुढं.'
 'पुढं काय, गोष्ट सांगतेय का मी तुला?'
 'अशी माझी कल्पना होती.'
 ती हसली. 'पुढं राजाराणीचं लग्न झालं.'
 'गोष्ट म्हटली की राजाराणीच कशाला लागतात?'
 'आपल्या सगळ्यांच्यात सरंजामशाही खोल कुठंतरी मुरलेली आहे म्हणून.'
 'ठीक. तर राजाराणीचं लग्न झालं.'
 'लग्नानंतर काय असतं?'

० ० ०
 ते हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले आणि इतके दिवस ज्या ठामपणान तिनं पावलं टाकली होती ती एकदम डळमळल्यासारखं तिला वाटलं. हॉटेलच्या लहानशा खोलीत ती दोघंच, आणि बाहेर अंधारात बुडलेलं अनोळखी जग. आता आपलं संपूर्ण भवितव्य आपण ह्या माणसाच्या हातात सोपवलं आहे, आपल्या मनाचं, शरीराचं हा काय वाटेल ते करू शकतो, आपण त्याला मज्जाव करायला असमर्थ आहोत, अशी एक अगतिकतेची जाणीव तिला झाली. मी इतकी दुबळी नाही की नको असलेल्या आक्रमणाविरुद्ध झगडू शकणार नाही, हे एकीकडून कळत होतं. तरी पण भोवतालच्या वातावरणातून शोषून घेतलेल्या पारंपारिक स्त्रीत्वाच्या कल्पना कुठंतरी मूळ धरून बसलेल्या होत्या. काय बोलावं, काय करावं हे कळत नव्हतं. घसा कोरडा पडला होता. शेवटी ती दिवा घालवून आपल्या बिछान्यावर गुडघ्याभोवती हात गुंडाळून स्तब्ध बसली.'
 चारू मग तिच्याजवळ आला. त्यानं तिला मिठीत घेतलं, आवेगानं नव्हे, हळुवारपणे आणि तशाच हळुवार, किंचित दुखावलेल्या आवाजात तो म्हणाला 'विभा, माझ्यावर नेहमी माया करीत राहा. राहाशील ना? मला तुझ्या प्रेमाची फार गरज आहे गं. माझ्यावर आतापर्यंत कुणी प्रेम केलंच नाही, मला कुणी समजून घेतलंच नाही. तू घेशील ना?'<बर> विभाचं हृदय भरून आलं. तिनं त्याला आवेगानं जवळ ओढलं.
० ० ०

 विभा म्हणाली, 'आम्ही परत आलो. नि मला कळलं की चारूशी लग्न म्हणजे तुझ्याशी गाठ. सासूसासरे नसले तरी त्यांची उणीव भरून काढायला तू समर्थ होतास.'
 'मी काय सासुरवास केला गं तुला?'
 'तसा उघडपणे नाही, पण तू ज्या काकदृष्टीनं माझ्या संसाराची पाहाणी केलीस ती हेच दर्शवत नव्हती? चारूला बऱ्या बोलानं नीट सांभाळ, नाहीतर मला जाब द्यावा लागेल असा निरोप माझ्यापर्यंत पोचेल असं वागत होतास तू. मान हलवू नको. त्यावेळी तुझी सारवासारव ऐकून घेतली मी, पण मी म्हणतेय ते खरं नसतं तर मग आज तरी तू इथे कशाला आलायस?'

० ० ०
 ते परत आल्यावर थोड्याच दिवसांनी विश्वजित त्यांच्याकडे राहायला आला होता. एक दिवस न राहून तिनं त्याला विचारलं, 'मग काय, उतरले का मी परीक्षेत?'
 'परीक्षा?'
 'त्यासाठीच आला होतास ना तू, मी चारूला योग्य बायको आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायला?'
 तो जरासा वरमला. 'तसं नाही गं? मी कोण तुझी परीक्षा घेणार?'
 'ते मला काय माहीत? पण परीक्षकाच्या नजरेनं माझी तपासणी करतोयस एवढ मला कळतंय. तुझी बरीच निराशा झाली असेल नाही?'
 'का?'
 'तुझ्या मित्रापेक्षा मी रंगानं, रूपानं डावी आहे म्हणून.'
 'रंगरूपाशी माझं काही देणंघेणं नाही.'
 'मग कशाशी आहे?' तिचा स्वर तीव्र झाला.
 'चारू आनंदात आहे ना, एवढीच खात्री करून घ्यायची होती मला.'
 'आनंदात नसेल अशी भीती वाटली होती तुला? माझी ओळखसुद्धा व्हायच्या आधी?'
 'तू प्रत्येक गोष्टीचा वाकडा अर्थ काढतेस. कसं सांगू तुला? विभा, चारूच्या वाट्याला आतापर्यंत इतकं दुःख इतकी उपेक्षा आलीय की लग्राच्या बाबतीत चूक करून तो स्वत:ला पोळून घेईल अशी धाकधूक वाटत होती. जाऊदे मी आणखी काही बोलत नाही. मी जे म्हणेन त्याचा तुला राग येणार आहे. फक्त एवढंच सांगतो, चारूला एवढं आनंदात पाहून फार बरं वाटलं.'
 त्यानं अस म्हटलं त्याचाही विभाला राग आलाच. जणू त्यानं तिला शिफारसपत्र दिलं होतं. तिला वाटलं, ह्याच्या लेखी मी चारूला सुखी करू शकते हेच माझ्या अस्तित्वाचं समर्थन. पण तिनं वाद वाढवला नाही.
 ती म्हणाली, 'कसलं दु:ख होतं चारूला?'
 'ते त्याला विचार.'
 'तो त्याच्या भूतकाळाबद्दल काही फारसं बोलायला तयार नसतो.'
 'बोलेल पुढेमागे.'
 'तू सांग की पण.'
 'नको. त्याची गोष्ट त्यालाच सांगूदे.'
 विश्वजितशी आपली लढाई झाली आणि ती आपण सगळ्याच आघाड्यांवर हरलो असं तिला वाटत राहिलं.
 एक दिवस तिनं चारूजवळ त्याच्या कुटुंबाचा विषय काढला. गप्पांच्या ओघात सहज विचारल्याच्या आविर्भावात तिनं विचारलं, 'तुझे आईवडील असतात कुठे सध्या?'
 तो एकदम तुटकपणे म्हणाला, 'मला आईबाप नाहीत.'
 'असं कसं होईल?'
 'जे होते त्यांनी आईबाप म्हणवून घ्यायचा हक्क गमावला आहे.
 'पण झालं काय असं?'
 त्यानं उत्तर दिलं नाही. तिनं जास्त आग्रह धरला नाही, कारण तो एकदम अस्वस्थ, ताणलेला वाटला. पुन्हा ह्याबद्दल बोलणं झालं नाही, पण कशाची तरी संगती लागत नाही. काहीतरी कुठंतरी चुकतंय अशी जाणीव तिला होत राहिली. ठीक आहे, नसेल आईबापांशी पटत, पण त्या नात्यावर असा एकदम पडदा टाकायचं काय कारण? त्याच्याविषयी काही बोलायचंच नाकारायचं ह्याचा काय अर्थ? असे प्रश्न विचारून तिनं स्वतःला बजावलं की हा वेडेपणा आहे. मिळत असलेल्या सुखाचा उपभोग घ्यायचा सोडून कसल्यातरी काल्पनिक काळजीचं सावट त्याच्यावर पाडायचे नसते उद्योग कुणी सांगितलेत?
 मग बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक बोच निर्माण करणारा प्रसंग घडेपर्यंत तिच्या आयुष्याचा प्रवाह अडथळ्याविना वाहात होता. त्या दिवशी चारू ऑफिसातनं तणतणत घरी आला.
 'हे लोक असा क्षुद्रपणा का करतात मला समजत नाही.
 'काय झालं?'
 'अकाउंटंटनं माझं एक व्हाऊचर पास केलं नाही.'
 'का?'
 'माझी सही नव्हती त्याच्यावर.'
 'मग घेता आली नाही का?'
 'मी ऑफिसात नव्हतो. दुसऱ्या कुणाला तरी पैसे घेऊन ठेवायला सांगितलं होतं. परत आलो तर पैसे नव्हतेच. कॅश द्यायची वेळ संपली होती. चौकशी केली तर हे कळलं. मी म्हटलं मागनं सही घेतली असती तर चाललं नसतं का? तर अकाउंटंट म्हणतो, राहिली असती किंवा तुम्ही केली नसती तर जोखीम आमच्यावर आहे. उद्या ऑडिटरने खडे फोडले म्हणजे साहेब आम्हालाच जबाबदार धरणार. मी म्हटलं, पण मी सही केली नसती असं वाटलं तरी कसं तुम्हाला? तर म्हणतो, कुणाचं काय सांगावं?'
 हे सांगतानाही चारूला इतका राग आला होता की त्याच्या कपाळावरच्या शिरा थाडथाड उडत होत्या.
 विभा म्हणाली, 'जाऊ दे, चारू, सोडून दे. काही माणसं असतात अशी.'
 रात्री चारू नीट जेवला नाही आणि कितीतरी वेळ येरझारा घालीत होता. तो अजून ऑफिसमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल उद्विग्न आहे असं कळल्यावर विभाला जरा आश्चर्य वाटलं. ती तो प्रकार विसरून गेली होती. शेवटी तिनं त्याला बळेच झोपायला लावलं. ती म्हणाली, 'चारू, इतक्या क्षुल्लक गोष्टीबद्दल किती मन:स्ताप करून घेशील?'
 'गोष्ट क्षुल्लक असेल, पण त्यामागची वृत्ती केवळ माझी अडवणूक करण्याची आहे.'
 तिच्या मिठीत त्याचं अंग ताठरलेलं तिला जाणवलं. ती म्हणाली, 'आता त्याबद्दल बोलू नको, विचारसुद्धा नको.'
 मग सवयीनं माहीत झालेल्या त्याच्या शरीराच्या संवेदनाक्षम भागांवर आपल्या हळूवार बोटांनी किमया करीत करीत तिनं त्याला सैलावलं. एक सुस्कारा सोडून तिच्याभोवती हात लपेटून तो झोपल्यावर कितीतरी वेळ ती छताकडे बघत स्वतःच्या भुतांशी झगडत होती.
 पुढं ही नित्याचीच गोष्ट झाली. कुठं टूरवर जाताना घेतलल्या ॲडव्हान्सचा हिशेब लवकर दिला गेला नाही म्हणून त्याला फैलावर घेतलं गेलं होतं, पुन्हा असं झालं तर ॲडव्हान्सची सबंध रक्कम त्याच्या पुढच्या पगारातून कापून घेतली जाईल अशी वॉर्निंग देण्यात आली होती.
 विभा समजुतीच्या स्वरात म्हणाली, 'अरे पण तूच ना मला सांगितलंस सगळेजण कसे ॲडव्हान्स घेऊन त्याचा हिशेब देत नाहीत आणि त्याबद्दल सदा ओरड चालू असते?'
 हो, पण इतरांना आणि मॅनेजरच्या लेव्हलच्या माणसाला एकाच फूटपट्टीनं माजून चालेल? उद्या एम. डी. ला हिशेब मागतील की!'
 तक्रारी वाढायला लागल्या. प्रत्येक बंद दारामागे आपल्याविरूद्ध कट शिजतोय असं चारूला वाटायला लागलं. कळस झाला त्याच्यानंतर लागलेल्या ज्युनियर माणसाला वर बढती दिली त्या दिवशी.
 तुला वाटतं मी विनाकारण चिरचिर करतो. पण हा माझा धडधडीत अपमान आहे हे तू कबूल करशील की नाही?'
 'चारू, विनाकारण असं मी कधी म्हणाले? कारण असतंच. फक्त ते कारण आणि तू त्यावरून स्वत:ला त्रास करून घेतोस तो ह्यात काहीतरी प्रमाण नको का? स्वसंरक्षण असं काही असतं की नाही?'
 'मग तुझं म्हणणं काय की मी हे सगळे अपमान पचवून शांतपणे काम करीत रहावं? ते मला शक्य होणार नाही. मी नोकरी मनापासून करतो इतरांसारखं वर एक, मनात एक असं माझ्यानं होत नाही.'
 'मग तू काय करणार? तुला ही नोकरी सोडायचीय का?
 'आणि खायचं काय?'
 'मी पुन्हा नोकरी करीन.'
 'तशी गरज पडणार नाही. तू घाबरू नको. मी आहे तोवर तुला पोट भरण्यासाठी काम करावं लागणार नाही.'
 'आणि हौसेसाठी?'
 'तो तुझ्या इच्छेचा प्रश्न आहे, पण तू नोकरी न करणं मला जास्त आवडेल.'
० ० ०

 विभा म्हणाली, 'लग्न झाल्यावर चारूनं नोकरी सोड असं सुचवलं तेव्हा मी सोडली. तशी नोकरी जराशी घरगुती स्वरूपाचीच होती, एका लायब्ररीत. पगारही बेताचाच होता. तेव्हा नोकरी सोडायला विशेष काही वाटलं नाही. पण चारूनं स्पष्ट मी नोकरी न करणं त्याला आवडेल असं म्हटल्यावर मी जरा हबकलेच.'
 'का?' विश्वजितनं विचारलं.
 कारण प्रत्यक्ष जरी नोकरी केली नाही तरी वाटलं तर करण्याचा हक्क मी धरून चालत होते. चारू असं म्हणून तो हक्क काढून घेतोय असं मला वाटलं. खरं म्हणजे त्या वेळी मी तेवढ्यावर सोडून द्यायला नको होतं. त्याच्याशी वाद घालून हा प्रश्न तडीला न्यायला पाहिजे होता. पण एखादं माणूस हळवं असलं की त्याच्याशी वाद टाळण्याची प्रवृत्ती होते. शिवाय नोकरीबद्दल तेव्हाच आग्रह न धरण्याचं आणखीही एक कारण होतं.'

० ० ०
 चारूला दुसरी नोकरी लागली नि विभानं त्याला आपल्याला दिवस गेल्याचं सांगितलं.
 तो म्हणाला, 'असं कसं झालं? आपण तर इतक्यात मूल नको म्हणून ठरवलं होतं.'
 'सगळी काळजी घेतली तरी अपघात नावाचा प्रकार असतो', ती हसत म्हणाली.
 तिचं न् चारूचं मुलाबद्दल बोलणं झालं होतं. तेव्हा तो म्हणाला होता, 'इतक्यात काय घाई आहे? अजून खूप दिवस मला तू नि तुला मी असं राहायचंय मला. तुला कोणाबरोबर शेअर करायचं नाहीये.'
 तरी तिची खात्री होती की मूल शक्यतेच्या पातळीवरून प्रत्यक्षात उतरलं की चारूला आनंद होणारच.
 पण तो म्हणाला, 'मग आता?'
 'आता काय? मूल होऊ द्यायचं अर्थातच. आपलं लग्न झालेलं आहे. तुला चांगली मोठ्या पगाराची नोकरी आहे. मूल होऊ न द्यायचं कारण आहे का काही?'
 तिचा स्वर जरा तिखटच आला तेव्हा चारू अजीजीनं म्हणाला, 'नाराज होऊ नकोस, विभा. मला आनंद झाला नाही असं नाही, पण मूल होणार म्हटल्यावर एकदम मोठी जबाबदारी पडते. ती पेलता येईल ना ह्याबद्दल शंका वाटते. एकदम दडपण आल्यासारखं होतं. नाहीतरी बायका जितक्या सहजतेनं मातृत्व स्विकारतात तितक्या सहजतेनं पुरुष पितृत्व स्वीकारू शकत नाहीत, नाही का?'
 चारूची नवी नोकरी एका मोठ्या खाजगी पोल्ट्रीत सेल-अँड-परचेस मॅनेजर म्हणून होती. पोल्ट्रीचा मालक एक सरदारजी होता.
 चारू म्हणाला, 'काहीही म्हण तू, पण उत्तर हिंदुस्थानी लोक दिलदार नि मोकळे असतात. त्यांना गुणांचं, श्रमाचं चीज असतं. आपल्या महाराष्ट्रीयांसारखे ते खत्रुड, मत्सरी, क्षुद्र नसतात.'
 विभा म्हणाली, 'तुझी सामान्य विधानं जाऊ देत. नोकरी आवडलीय ना तुला, मग तेवढं बास.'
 होऊ घातलेल्या मुलाबद्दल मात्र चारू काहीच बोलत नसे. फक्त बरंच मोठं डिपॉझिट भरून एक दोन बेडरूम्सचा फ्लॅट मात्र त्यानं घेतला.
 विभाला वाटे, चारूनं आपल्या बदलत्या शरीराची काही दखल घ्यावी, त्याबद्दल काही बोलावं, विचारावं, गर्भाची वाढ कशी होते ह्याबद्दल कुतूहल दाखवावं, क्वचित चेष्टाही करावी. पण ह्या विषयावर तो संपूर्ण मुका होता. तिनं ह्या गोष्टींची माहिती देणारं एक पुस्तक आणलं होतं ते इकडे तिकडे त्याच्या हाती येईल असं मुद्दाम ठेवलं पण त्यानं त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं.
 पाच महिने गेल्यानंतर डॉक्टरांनी गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येताहेत असं सांगितलं तेव्हा ती मुळापासून थरारली. आपल्या शरीरात एक नवा जीव वाढतोय ह्याचा तिला खराखुरा साक्षात्कार झाला. ती घरी येऊन चारूला म्हणाली, 'चारू, आपल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू यायला लागलेत.'
 'असं?'
  'ऐकायचेत तुला? हे बघ, इथे कान लाव आणि अगदी गप्प राहा. श्वाससुध्दा रोखून धर. मग बघ ऐकू येतात का'
 'राहू दे विभा, मी आज त्या मूडमध्ये नाही. पुन्हा कधीतरी.'
 ह्यात मूड काय असायचाय असं ती विचारणार होती, पण तो खरंच दमलेला आणि कसल्यातरी तणावाखाली असलेला दिसत होता. तिला वाटलं, त्याला स्वत:च्या कटकटी असतीलच. आणि वर मीही मला ज्याचं कौतुक वाटतं अशा सर्व लहानसहान गोष्टींबद्दल त्याचा उत्साह ओसंडून जायला पाहिजे अशी मागणी करायला लागले तर त्यानं बिचाऱ्यानं ती कुठवर पुरवावी?
 त्याच्या सुंदर दाट केसांतून बोटं फिरवीत तिनं विचारलं, 'काय झालं चारू!'
 'कुठं काय?'
 'बरं नाही का तुला? कुणी काही लागेलसं बोललं का?'
 तो एकदम तिच्या कुशीत शिरत म्हणाला 'विभा. काही विचारू नको मला. फक्त जवळ घे. अगदी घट्ट धरून ठेव. मला कधी दूर लोटू नको गं.मी ते सहन करू शकणार नाही.'
 तिचं मन त्याच्याविषयी अपार करुणेनं भरून आलं. ती म्हणाली, 'अरे वेड्या, मी कशी तुला सोडून जाईन?'
 मग कितीतरी वेळ, त्याचा श्वासोच्छवास सावकाश आणि नियमित येईपर्यंत ती त्याला थोपटत, कुरवाळत राहिली. तिच्या पोटातल्या जिवानं बारीकशी उसळी मारून तिला आपलं अस्तित्व जाणवून दिलं तेव्हा तिला आपलं अंग अवघडल्याचीही जाणीव झाली. तिनं अलगद चारूला बाजूला सारून कूस बदलली आणि मनातली एक अस्पष्टशी सल दडपून टाकीत झोपण्याचा प्रयत्न केला.
 विभाचं बाळंतपण सिझेरियननं करावं लागलं. ती शुद्धीवर आली तेव्हा चारू तिच्या शेजारी होता. तोच इतका पांढराफटक आणि ओढल्यासारखा दिसत होता की तिनं त्याची चेष्टा केली, 'चारू, ऑपरेशन तुझं झालं नाही, माझं झालंय.'
 'चेष्टा करू नको गं.' तो कळवळून म्हणाला. 'मला केवढी काळजी लागली होती.'
 'अरे त्यात काय एवढं? हल्ली दर बाळंतपण सिझेरियननं होतं.'
 'म्हणून काही त्यातला धोका कमी होत नाही. हे आता आपलं शेवटचंच मूल हं.'
 'ते बघू मग.'
 विश्वजित तिला भेटायला आला. त्याला ती म्हणाली, 'चारूला सगळी काळजी माझीच, मृण्मयकडे बघतही नाही तो. काही इंटरेस्टच दाखवीत नाही त्याच्यात. जसं काही मूल माझं एकटीचंच आहे.'
 विश्वजित हसायला लागला. 'तुझं काहीतरीच. तू स्वत:ला नशीबवान समजलं पाहिजेस खरं म्हणजे. इतर नवऱ्यांना फक्त त्यांच्या मुलांतच इंटरेस्ट असतो-विशेषतः मुलग्यात. बायका म्हणजे फक्त मुलांना जन्मवणारी गर्भाशयं.
 'पण मुलात काहीतरी इंटरेस्ट दाखवायला नको का?'
 'अगं दाखवील हळूहळू. त्याला जरा रंगरूप येऊ दे. आत्ता तो नुसता मासाचा गोळा तर आहे.'
 ह्याच मासाच्या गोळ्याला आल्या आल्या उचलून घेऊन विश्वजितनं त्याचं कौतुक केलं होतं. त्याचं नाक अगदी हुबेहूब कुणासारखं आहे, त्यानं कुणाचा रंग घेतलाय वगैरे मूर्ख चर्चाही केली होती.
 विश्रांतीसाठी विभानं महिनाभर आईकडं जाऊन राह्यचं ठरलं. चारू तिकडे तिला भेटायला गेला नाही. विभानंही त्याला मुद्दाम बोलावलं नाही. त्याची आठवण येत होती तरीही एकप्रकारे मोकळं मोकळं वाटत होतं, आईपणाचा शुद्ध आस्वाद घेता येत होता. महिन्याभरानं तो तिला न्यायला आला तेव्हा मात्र ती त्यांच्यापासून किती दिवस दूर राहिली ते तिला एकदम जाणवलं. आपलं शरीर त्याच्या स्पर्शाविना अतृप्त, शुष्क आहे असं वाटायला लागलं. त्याच्याकडे नुसतं बघूनच ती रोमांचित झाली. पण तो विमनस्क होता.
 ती म्हणाली, 'किती बारीक झालायस चारू. खाण्यापिण्याचे हाल करून घेतले असशील ना मी नसताना?'
 आपण नसलो की त्याची आबाळ होते, आपण त्याच्या अस्तित्वाला आवश्यक आहोत हा विचार तिला सुखावून गेला.
 घरी आल्या-आल्या त्याच्या मिठीत शिरून इतक्या सगळ्या दिवसांचा उपास सोडायचं स्वप्न ती रंगवत होती, पण घराच्या अवकळेनं तिचा विरस केला. सगळीकडे बोटभर धूळ, छताला जळमटं, स्वैपाकघरात खरकटी भांडी, मोरीत कपड्यांचा ढीग, बिछाना अस्ताव्यस्त, चादरी चुरगळलेल्या, मळलेल्या.
 ती म्हणाली, 'चारू, हे काय? कामवाली बाई येत नव्हती का?'
 'तिची न् माझी वेळ जमायची नाही. मग मी तिचा नाद सोडून दिला.
 'किल्ली द्यायचीस तिच्याजवळ.'
 'नाही दिली खरी. म्हटलं ती कितपत विश्वासू आहे कुणास ठाऊक.'
 ह्यानंतर वाद घालण्यात अर्थच नव्हता. ती पदर खोचून साफसफाईला लागली. तिनं चारूकडे मदत मागितली नाही, त्यानं ती देऊ केली नाही. इकडे तिकडे अपराध्यासारखा बिनबोलता वावरत होता, त्यानं विभा जास्तजास्तच चिडत होती. ताण वाढत चालला होता.
० ० ०

 विभा म्हणाली, 'त्या दिवशीच्या स्फोटापासून तू वाचवलंस. तू आलास त्या वेळी आला नसतास तर काय झालं असतं ते सांगणं कठीण आहे. कदाचित आज जे घडलंय ते त्या वेळीच घडलं असतं. ते घडलं ह्याबद्दल तुला दुवा द्यावा की शिव्या द्याव्या मला कळत नाही.'
 'शिव्या का म्हणून?'
 'कारण हा मधला जो काळ गेला तो निरर्थकच ठरला.'
 विश्वजितनं आल्या आल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तो कामाला लागला.
 'विभा. तुझ्याकडे उंच झाडू नाही का ही कोळिष्टकं काढायला?'
 'एक फडकं दे ना धूळ झटकायला.'
 'मृण्मय रडतोय बघ. तू जा बघू त्याच्याकडं. मी आवरतो ती भांडी.'
 चारू त्यांच्यात नव्हताच. निस्तेज नजर शून्यात लावून तो बसला होता.विश्वजितनं त्याला हाताला धरून खुर्चीवर आणून बसवलं. जेवण वाढल्यावर, पण तो फारसं न जेवता उठला, काही बोलला नाही, आणि जाऊन झोपला.
 मग विभा म्हणाली, 'हं. बोल.'
 'काय बोलू?' विश्वजित म्हणाला.
 'हेच, जे चारूच्या समर्थनार्थ तू बोलणार होतास ते.'
 'समर्थन करण्याचा प्रश्न नाही, विभा.'
 'म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराचं काही समर्थन होऊ शकत नाही असं तुला म्हणायचंय का? मग माझं तुझं एकमत आहे.'
 'आवाज चढवू नको, शांत हो.'
 तू मला शांत व्हायला सांगतोस विश्वजित? मी महिना दीड महिन्यानंतर घरी येते, तर ह्या उकिरड्यानं माझं स्वागत केलं जातं. मी नसताना चारूनं हवं तसं राहावं, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण मी घरी येणार तेव्हां घर जरा स्वच्छ, प्रसन्न दिसेल अशी तजवीज करायला नको होती? मी सगळं केलंच ना? मग त्याला करायला काय हरकत होती? मी करताना मला मदत सुद्धा केली नाहीन, अलिप्तपणे बाजूला बसून होता. हे घर, हा संसार काय माझा एकटीचा आहे? की पोटाला मिळवलं म्हणजे आपली जबाबदारी पार पडली, मग बाकी सगळं विभानं सांभाळावं असं वाटतं त्याला?'
  बोलता बोलता संतापाचे अश्रू तिच्या डोळ्यांत उभे राहिले. काही न बोलता विश्वजितनं तिला जवळ ओढली. त्याच्या स्पर्शानं तिचे सगळेच बांध फुटले नि ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. तिचे हुंदके थांबेपर्यंत तो तिला थोपटीत राहिला. शेवटी ती त्याच्यापासून लांब झाल्यावर त्यानं आपला रुमाल तिच्या पुढं केला.
 ती म्हणाली, 'काही नको, आहे माझा पदर.'
 त्याला हसू आलं. तशी ती पुन्हा धूमसायला लागली नि धुमसता धुमसता त्याच्या बरोबर हसायला लागली. म्हणाली, 'माझा इकडं जीव जातोय नि तुला हसायला फावतंय.'
 हसणं थांबवून एकदम गंभीरपणे तो म्हणाला, 'जीव तुझा नाही जात,चारूचा जातोय.'
 ती चमकून म्हणाली, 'म्हणजे?'
 तेच तर मी तूला सांगायला बघतोय तू फुरसत दिलीस तर. चारूला काहितरी झालंय. गेले आठ दिवस तो कामावर गेला नाही. त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला तर त्याला दारसुद्धा उघडलं नाही. बाहेरच्या बाहेरच त्याची बोळवण केलीन. बरं नाही म्हणाला. तुला कळवायचं का म्हणून मित्रानं विचारलं तर नको म्हणाला. शेवटी त्या मित्रानं मला पत्र लिहिलं. पत्र मिळाल्याबरोबर मी आलो.
 'पण म्हणजे झालंय तरी काय त्याला? अन् मला काही बोलला का नाही? मला ह्या विचित्र वागण्याचा अर्थच कळत नाहीये.'
 ' तो आता तू त्यालाच विचार. बरं, येऊ मी? आता तू आलीयस, आता मला काही काळजी नाही.'
 'विश्वजित, ह्या सगळ्यात तू काहीतरी हातचं राखून ठेवतोयस अस वाटतंय मला.'
 'ठेवलं असलं तरी ते मग सांगेन. आता उशीर झालाय.'
 'एवढ्या रात्री तू कुठं जातोस? इथंच झोप.'
 'नको मी लॉजवर जाईन.'
 'विश्वजित, मला एकटी सोडू नको.'
 'घाबरू नको विभा, तसं घाबरण्यासारखं काही नाही. सकाळी येतोच मी, आणि चारूवर रागराग करू नकोस.'
 'मी चारूशी कसं वागायचं हे तू मला सांगू नको.'
 चारू अजून झोपला नव्हता. विभानं विचारलं, 'चारू तुला बरं नाही का? काय होतंय?'
 'मला काही समजत नाही.'
 'म्हणजे काय? डोकं दुखतंय की पोट दुखतंय की ताप आलाय की आणखी काही?'
 'तसं सांगता येत नाही, पण कसंतरी अस्वस्थ वाटतंय.'
 'मग डॉक्टरला दाखवलंस का?'
 'नाही.'
 'का नाही? स्वत:च्या प्रकृतीची हेळसांड करण्यात पुरुषार्थ वाटतो का तुला?'
 'रागावू नको विभा.'
 'चारू, हे काय? रडू नको. रागावले नाही रे मी, रागावेन कशी?' तिनं त्याला जवळ घेतलं.
 रात्रीतून चारूला ताप भरला. सकाळी विश्वजित येतो तो चारू तापानं फणफणत होता. धड निदान होईना आणि चार-पाच दिवस झाले तरी ताप उतरेना म्हणून टायफॉइड ठरवून ट्रीटमेंट द्यायला सुरुवात झाली.
 विश्वजित तिथंच राहिला, सावलीसारखा तिच्या अवतीभवती वावरला. हाक मारली तर मदतीचा हात पुढं करायचा, हाक मारीपर्यंत आपल्या अस्तित्वाचं तिच्यावर आक्रमण होऊ द्यायचा नाही. त्याच्या समजूतदारपणाचाच तिला राग यायला लागला.
 एक दिवस तिनं त्याला चिडून विचारलं, 'तुला काही कामधंदा नाही का?'
 तो शांतपणे म्हणाला, 'मी रजा काढलीय. विभा, तू थोडी विश्रांती का नाही घेत? मी आहे इथं काही लागलं तर बघायला. इतक्या दिवसांची धावपळ, जागरण, सगळ्यानं तू थकून गेली असशील.'
 'तू नाही वाटतं थकलास?'
 'थोडासा. पण तुला विश्रांतीची जास्त गरज आहे.'
 ती एकदम ओरडली, 'तू तुझा शांतपणा ढालीसारखा पुढं करतोस. तुला कधीतरी रागवावं, ओरडावं आदळआपट करावी अशी खुमखुमी येत नाही का? तुझं असलं वागणं इतरांना किती अळणी वाटतं ह्याची कल्पना आहे तुला?'
 तो अगदी हलक्या, जवळजवळ ऐकू येणार नाही अशा आवाजात पुटपुटला, 'सॉरी.'
 'सॉरी? अरे मी तुला काय म्हणत्येय ऐकलंस का तू? आणि पुन्हा तूच सॉरी म्हणतोस?'
 तो उठून उभा राहिला तशी आवाज एकदम खालच्या पट्टीत आणीत ती म्हणाली, 'कुठं चाललास?'
 बाहेर जाऊन येतो जरा. माझं इथं असणं तुला तापदायक होतंय. तुला ताप द्यायची माझी इच्छा नाही.'
 त्याला खांदे धरून गदागदा हलवावं असं तिला वाटलं. ती म्हणाली. ताप कसला? तुला कसं काही कळत नाही? थांब, जाऊ नको. मी कॉफी करते, मग आपण हे संभाषण पुन्हा सुरू करू- सुसंस्कृत लोकांसारखं. चारूच्या आयुष्यातली काय जी मिस्टरी आहे ती तू सांगच एकदा मला.'

० ० ०
 विश्वजितनं सांगितलेली हकिगत अत्यंत विचित्र होती. चारूचा बाप ईस्ट आफ्रिकेत व्यापारी होता. चारू बऱ्याच लहानपणापासून शिक्षणासाठी मुंबईला त्याच्या काकाकडे असे. त्याची काकू फार पैशाची लोभी आणि चमत्कारिक बाई होती. बाप त्याच्या नावानं भरपूर पैसे पाठवायचा. आणखी मागितले असते तरी ते त्यानं हसत पाठवले असते. पण त्यातला पैसा वाचवून स्वत:ची भर करायची म्हणून ती बाई चारूला अक्षरश: अर्धपोटी ठेवायची, जुनेपाने कपडे घालायला द्यायची. त्याच्यासाठी पाठवलेले नवे कपडे आपल्या मुलांच्या अंगात घालायची. कधी आजारी पडला तर त्याला धड औषधपाणीही करायची नाही. त्यानं घरी पत्र लिहिण्यासाठी एयरलेटर मागितलं तर ते महाग असत म्हणून द्यायची नाही आणि त्याच्या घरून आलेली पत्रं त्याच्या हातात पडू द्यायची नाही. काका तिचा कारस्थानीपणा न कळण्याइतका भोळा तरी होता किंवा तिला हातभार लावण्याइतका दुष्ट तरी होता.
 चारू प्रथमच जेव्हा सुट्टीसाठी परत गेला तेव्हा आपल्याला पुन्हा काकाकडे पाठवू नये म्हणून त्यानं जंगजंग पछाडलं, पण आईबापांनी त्याला दाद दिली नाही. त्यांना वाटलं ह्याची कल्पनाशक्ती जरा ओव्हरटाइम काम करते. असेल काकू थोडी रागीट, फटकळ स्वभावाची. पण त्याला उपाशी कशी ठेवेल, तसा चारू लहानपणापासून कल्पनाविलासात रमणारा आणि खऱ्याखोट्यात फार काटेकोरपणे फरक न करणारा होता, तेव्हा त्याचं सांगणं त्यांनी हसण्यावारी घालवलं.
 शेवटी तो म्हणाला, 'तुमचं माझ्यावर प्रेमच नाही म्हणून तुम्ही माझे हाल होतील अशा ठिकाणी मला पाठवता. दादावर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही त्याला आपल्यापाशी ठेवून घेता.'
 त्याचा थोरला भाऊ पोलिओनं अपंग झालेला होता. पण हे कारण चारूला पटलं नाही. शेवटपर्यंत आपल्याला परत पाठवू नये म्हणून त्यानं आईबाबांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले, पण त्याच्या रडारडीचा झाला असला तर उलटाच परिणाम झाला.
 त्याचा बाप म्हणाला, मुलाच्या जातीला इतकं हळवं असून कसं चालेल जरा घट्ट व्हायला शिकलं पाहिजे. पुढं मोठा झालास म्हणजे कळेल आईबाबांनी केलं ते आपल्या चांगल्यासाठीच म्हणून.
 पण चारूला हे पटलं नाही. त्यानं आईबापांशी कायमचा संबंध तोडून टाकला. आफ्रिकेतली परिस्थिती अस्थिर झाल्यावर ते परत हिंदुस्थानात राहायला आले. पण तो त्यांना भेटायला गेला नाही.
 'आज ते कुठं आहेत ते त्याला किंवा तो कुठं आहे ते त्यांना ठाऊक तरी आहे की नाही मला शंका आहे.' विश्वजित म्हणाला.
 बऱ्याच वेळाच्या स्तब्धतेचा भंग करीत विभा म्हणाली, 'खरंच का रे त्याची काकू अशी असेल?'
 'तुझाही विश्वास बसत नाही?'
 एखादी बाई एका लहान मुलाशी विनाकरण इतका दुष्टपणा करील हे विश्वास ठेवायला कठीण आहे.'
 'मग एका चवदा-पंधरा वर्षांच्या मुलानं हे सगळं नाटकच रचलं आणि स्वार्थापायी आईबापांचा आधार कायमचा तोडून एकटेपण पत्करलं ह्यावर विश्वास ठेवायला जास्त सोपं जाईल का?'
 'अर्थातच नाही. रागावू नको.'
 काही वेळापूर्वी मी रागावत नाही म्हणून तू तक्रार करीत होतीस.'
 'वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस.'
 'नव्हतीस का करीत?'
 'माझ्या तक्रारीचा तसा अर्थ नव्हता. बरं, आता एक सांग मला. तुझ्यात नि, चारूच्यात काय देणंघेणं आहे? तुला का त्याच्याबद्दल इतकं वाटतं?
 'त्याचा काका म्हणजे माझा बाप.'
 'ओ माय गॉड.'
  'हं.'
 बराच वेळ ही माहिती पचवून झाल्यावर ती म्हणाली, 'हे तू मला अगोदरच सांगायला पाहिजे होतंस.'
 'त्यानं काय फरक पडला असता?'
 'ते कुणास ठाऊक पण तू फसवाफसवी केलीस.'
 'मी तुला सांगितलेल्यातलं एक अक्षरही खोटं नाही, शपथेवर सांगतो.'
 'खोटं दोन तऱ्हांनी सांगता येतं, एक म्हणजे सत्याचा विपर्यास करून दुसरं म्हणजे काहीतरी महत्त्वाची माहिती हातची राखून.'
० ० ०

 समर्थन करण्याचा प्रश्न नाही असं तू म्हणाला होतास, पण ही तुझी गोष्ट मी चारूच्या वागण्याचं समर्थन म्हणून स्वीकारावी असाच तुझा हेतू होता,' विभा म्हणाली. 'हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रकार होता.
 'असं कसं तू म्हणू शकतेस?'
 'नाही तर काय? चारूनं आतापर्यंत पुष्कळ भोगलंय, आता तू त्याला आणखी दु:ख देऊ नको असं तू मला अप्रत्यक्षपणे सांगत नव्हतास का?'
 'समजा असलो तरी त्यात गैर काय होतं?'
 'गैर होतं असं तुला वाटत नाही हे उघड आहे, कारण आज पुन्हा तीच भूमिका घेऊन तू माझ्याकडे आला आहेस.'

० ० ०

 चारू हिंडताफिरता झाला, कामावर जायला लागला आणि त्याच्या सरदारजीशी कुरबुरी सुरू झाल्या. इन्क्युबेटर्स विकत घ्यायचे होते. एका कंपनीच्या मालाचा दर्जा जरा कमी होता, शिवाय किमती जास्त होत्या. त्यांनी सरदारजीला आणि चारूला रोख कमिशन देऊ केलं होतं. चारूनं दुसऱ्या कंपनीला ऑर्डर दिली. सरदारजीनं त्याचा निर्णय उचलून धरला नाही.
 चारू म्हणाला, 'पण सर, त्यांच्या किमतीही जास्त आहेत.'
 'मूर्ख आहेस. ते जेवढे पैसे कॅशमध्ये आपल्याकडे वळते करणार ते वजा घातले तर किमती जास्त नव्हत्या ना?'
 'नाही, दुसऱ्या कंपनीइतक्याच होत्या.'
 'मग त्यांच्याकडून माल घेऊन काय फरक पडला?'
 "फरक एवढाच की आपल्याला त्याच किमतीत जास्त चांगली क्वॉलिटी मिळतेय, आणि पुन्हा सगळा व्यवहार खुला नि प्रामाणिक राहतोय.'
 'तू इतका बावळट असशील असं मला वाटलं नव्हतं.' क्वॉलिटी म्हणजे काय थोडं फिनिशिंग वगैरे कमी दर्जाचं आहे एवढंच ना? ती मामुली बाब आहे. पण त्या कंपनीकडून माल घेण्यात आपल्याला बरीच मोठी रक्कम मिळतेय हे तू विसरू नकोस. हिशेबात मिळालेल्या रकमेच्या दुप्पट किंमत गैरहिशेबी रकमेची असते. पुन्हा बिलावर जास्त किंमत लागल्याचा फायदा टॅक्समध्ये मिळतो. म्हणजे तुझ्या त्या प्रामाणिक व्यवहारापेक्षा सगळ्या तऱ्हेनं ह्यात जास्त फायदे होतात.'
 चारूनं स्वत:ला मिळणारं कमिशन लाथाडलं ह्यात सरदारजीला प्रामाणिकपणापेक्षा मूर्खपणाच दिसला. सगळ्यात कळस म्हणजे त्यानं चारूला दिलेली ऑर्डर फोन करून कॅन्सल करायला लावली. हा चारूला फार मोठा अपमान वाटला.
 मग एकदा ट्रकमध्ये भरण्यासाठी कोंबडी खत ढीग करून ठेवीत होते त्यात मुद्दाम माती नि खडे मिसळताहेत असं चारूला दिसलं. त्यानं मुकादमाला हटकलं तर मुकादम गुर्मीत म्हणाला, 'सगळं बड्या साहेबांच्या हुकमानं होतंय, त्यांना काय ते विचारा.'
 सरदारजी म्हणाला, 'अरे यार, हा बिझिनेस आहे. हे खताचं गिऱ्हाईक म्हणजे मोठी पार्टी आहे. त्यांची ऑर्डर हातातून जाऊ द्यायची नाही म्हणून खूप कमी कोटेशन दिलं. दिलेल्या कोटेशनमध्ये माल पुरवणं अर्थातच परवडणार नाही. मग काय करणार?'
 'म्हणून काय धडधडीत माती न खडे मिसळायचे?'
 'फक्त ठराविक प्रमाणात. नाहीतरी केजेसमधलं खत गोळा करताना त्यात खालची माती, खडे थोडे येतातच. ह्यात थोडे जास्त. कुणाला कळणाराय? इतर सगळे ह्याच क्वॉलिटीचं खत देतात. त्यात आपणच लबाडी करतोय असं नाही.'
 चारूला पटलं नाही.एक तर आपल्या पाठीमागे जाऊन सरदारजीने मुकादमाला डायरेक्ट ऑर्डर्स दिल्या ह्याचा त्याला राग आला. म्हणजे मुकादम त्याची काय पत्रास ठेवणार? आणि दुसरं असले लांडीलबाडीचे व्यवहार स्टाफच्या संगनमताने केले म्हणजे स्टाफकडे आपली काय पत उरली
 असंच काही काही होत राहिलं आणि चारूचं मन नोकरीतनं उडालं. तो खिन्न, उदास झाला. त्याचं जेवण कमी झालं. तो घरी आला की फारसं न बोलता नुसता बसून राहायचा.
 'चारू तुला काही होतंय का?'
 'काही नाही. कुठं काय?'
 असा नुसता बसून का राहतोस?'
 'काय करू मग?'
 'काहीतरी वाच, माझ्याशी बोल, मृण्मयशी खेळ.'
 असं तिनं म्हटलं की तो उठून बाहेर जायचा नि उशीरापर्यंत परत यायचाच नाही. त्याला नीट झोप लागायची नाही आणि सकाळी उठून कामावर जायचीही शक्ती नसल्यासारखं वाटायला लागलं. शेवटी त्याला कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या अशा वागण्याला खास कारण होतं हे ऐकून एकप्रकारे विभाला बरं वाटलं. डॉक्टरांनी त्याला बरेच दिवस विश्रांती घायला सांगितलं, काही दिवस तर अंथरुणावरून उठायचीही बंदी केली. तिला वाटलं चारू या अनपेक्षितपणे उदभवलेल्या आजारानं आणि डॉक्टरांनी घातलेल्या बंधनांनी आणखीच खंतावेल. पण त्या मानानं तो उल्हसित राहिला.

० ० ०

 विभा बराच वेळ गप्प राहिली तेव्हा विश्वजित म्हणाला, 'मग पुढं ?'
 'पुढं काय? संपली गोष्ट.'
 'ही जरा अपुरी आणि मधेच तोडल्यासारखी वाटते, नाही? एखाद्या मासिकात वगैरे आली असती तर काय बेकार शेवट आहे असं म्हटलं असतं.'
 ती म्हणाली, 'त्याचं काय आहे, तुला ती एका राजाच्या (पुन्हा राजा आलाच) कोठाराची गोष्ट माहीताय ना? एक चिमणी आली, एक दाणा घेऊन भुर्र उडून गेली. एवढं सांगितलं म्हणजे बाकीची गोष्ट तुम्हाला समजल्यात जमा आहे. पुन:पुन्हा तेच तेच सांगण्यात काही हशील नाही, नाही का?'
 तो गंभीरपणानं म्हणाला, 'तू निसटून जायला बघत्येयस, पण मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय हलणार नाहीये.'
 'मग राहा इथंच. शेजारी कुचकुच करायला लागले की माझी इज्जत राखण्यासाठी तू माझा नवरा आहेस असं सांगावं लागेल मला.'
 'ही चेष्टेची वेळ नाही, विभा.'
 'गेल्या काही वर्षात चेष्टेची वेळ नव्हतीच कधी.'
 तिच्या विधानाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तो म्हणाला, 'तुझ्याच म्हणण्याप्रमाणे, परिस्थितीत काही बदल झाला नाही. मग तुझ्यात का झाला?'
 'परिस्थितीत झाला नाही म्हणूनच.'
 'कोड्यात बोलू नको, सरळ काय ते सांग.'
 'तू इतका मद्दड आहेस की जे सरळ सोपं आहे ते तुला कोड्यासारखं वाटतंय. तू माझं आणि चारूचं आयुष्य तिसऱ्या माणसाला जितक्या जवळून पाहाता येईल तितक्या जवळून पाह्यलं आहेस. तुला चारू जितका माहीत आहे तितकीच मी माहीत झाले आहे. तुला असं वाटतं का की कोठारातलं धान्य संपेपर्यंत चिमणीची गोष्ट चालूच राहू शकेल म्हणून? समजा नातं सुरुवातीला अगदी हवंसं वाटलं म्हणून मी पत्करलं असलं तरी हळूहळू बदलत जाईल अशी अपेक्षा विचित्र आणि जगावेगळी आहे असं तू म्हणू शकशील का? जेव्हा जेव्हा आपला ह्याबद्दल काहीही वाद झाला तेव्हा तुझा मुख्य भर एकाच मुद्यावर होता- चारूला तुझी गरज आहे. ती आहे म्हणूनच तर मी इतकी वर्षं त्याला चिकटून राहिले, अशा आशेवर की ती गरज हळूहळू कमी होत जाईल. चारूला माझी गरज आहे ती लहान मुलाची आईची गरज आहे. पण मुलाची निकोप वाढ झाली की त्याची गरज कमी होत जाते. मूल जर जन्मभर मूलच राहिलं, त्याची वाढच होऊ शकली नाही, तर त्याची गरज कधी संपणारच नाही. त्याच्या आईला कायम त्याच्या गरजेचं गुलाम होऊन राहावं लागेल.'
 'मुलाच्या बाबतीत विशिष्ट परिस्थितीत आया अशी गुलामगिरी पत्करतातच ना? मग चारूसाठी तू ते का करू नयेस?'
 'कारण तो माझा मुलगा नाही. नवरा आहे. त्याच्या जशा गरजा आहेत तशा माझ्याही आहेत. तो त्या पुऱ्या करू शकत नाही एवढंच नव्हे तर माझ्या काही गरजा असू शकतील ह्याची तो दखलही घेत नाही. तुला माहीताय विश्वजित, मला वाटायचं की चारू कमकुवत आहे, त्याला माझा आधार हवा पण क्रमाक्रमानं माझ्या लक्षात आलं की कमकुवत माणसंच खरी आक्रमक असतात, कारण ती इतरांकडून त्यांना हवं त्याची मागणी करतात आणि आपल्या कमकुवतपणाचंच हत्यार करून आपली मागणी पूरी करून घेतात. मला जेव्हा प्रथम कळलं की चारू ह्या माणसापर्यंत अजूनपर्यंत माझ्याखेरीज कुणीच पोचू शकलं नाही आणि मीच फक्त त्याला सुखी करू शकते, तेव्हा ही मला माझ्या सामर्थ्याची जाणीव वाटली. पण मी एकटीच त्याला सुखी करू शकते ह्याचा अर्थ मी ते केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी माझी सगळी शक्ती खरचायला पाहिजे असा होता हे मला बरंच उशिरा कळलं.
 'आईचं म्हणणं तिला अभिप्रेत नसलेल्या एका वेगळ्या अर्थानं खरं होतं. माणूस वेगवेगळ्या नात्यांत विभागला गेला की त्याच्या निरनिराळ्या गरजा निरनिराळी माणसं पुऱ्या करू शकतात. तो एकाच बिंदूपाशी एकवटला की त्या बिंदूला तो लेसर किरणांप्रमाणे जाळून टाकू शकतो.
 'त्या बिंदूची जर जळायची तयारी असली तर त्यालाही हरकत नाही. पण माझी तशी तयारी नाही. मला इतर नात्यांतूनही जगायचं आहे. चारूनं माझा इतका संपूर्ण ताबा घेऊ पाहिला की मृण्मयची आई व्हायला सुद्धा मी उरायची नाही.'
 'म्हणजे तू चारूला मृण्मयसाठी सोडलंस का?'
 ती जरा खिन्नपणे हसली. 'चारूसाठी समर्थनं शोधण्यात तू इतकी शक्ती खर्च केलीस, आता माझ्या बाबतीत तेच करू नको. मी चारूला सोडलं ह्याच एकुलतं एक नि सरळसरळ कारण म्हणजे मला त्याच्या बरोबर राहणं अशक्य झालं. मला शेवटी कबूल करावं लागलं की जी स्थिती मी विकृत आणि तात्पुरती म्हणून स्वीकारायला तयार होते तीच चारू सर्वस्वी नॉर्मल समजत होता. तेव्हा त्यातनं सुटका होण्याची शक्यताच नव्हती. तुला आठवतं विश्वजित, चारू आजारी असताना किती समाधानी असायचा? तक्रार नाही, चिडचिड नाही, अस्वस्थपणा नाही. मला त्याचं कौतुक वाटायचं की जे सोसणं नशिबी आलंय ते हा किती आनंदानं सोसतोय. मी असते तर आजारपणामुळं पडण्याऱ्या बंधनाविरुद्ध चडफडले असते, कुढले असते. तो मुक्तपणे इकडेतिकडे जाऊ शकतो म्हणून त्याच्यावर चिडले असते. पण मी जसजशी ह्याबद्दल विचार करायला लागले तसतसं मला वाटायला लागलं की आजारपणाविषयी माझी प्रतिक्रिया हीच नॉर्मल जीवनाभिमुख प्रतिक्रिया आहे. आणि चारूची प्रतिक्रिया विकृत आहे.'
 'हे त्याच्या वागण्याचं तुझं स्पष्टीकरण मात्र विकृत आहे.'
 'असं तुला वाटत असलं तर मी तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात अर्थच नाहीये.'
 ती बराच वेळ गप्प राहिली तेव्हा तो म्हणाला, 'आऍम सॉरी.'
 तरी ती काही बोलली नाही. शेवटी तो म्हणाला, 'विभा, मी क्षमा मागितली तुझी.'
 'ठीक आहे, मागितलीस, आता तू जाऊ शकतोस.'
 'विभा-'
 'हे सबंध संभाषण म्हणजे वेळेचा अपव्यय होता. तसं होणार हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. निदान आता आलंय तर आणखी वेळ फुकट घालवण्यात अर्थ नाही, नाही का? चारूबद्दलच्या तुझ्या प्रेमामुळे म्हण, अपराधीपणाच्या भावनेमुळं म्हण, तू तो खरा जसा आहे तसा पहायला तयार होणं शक्य नाही.'
 'विभा प्लीज. मी एकदम विचार न करता तसं म्हटलं. ती एक क्षणिक प्रतिक्रिया म्हणून सोडून दे. तुला जे सांगायचंय ते सगळं मला ऐकायचंय.'
 तिनं एक लहानसा सुस्कारा सोडला 'आपल्याला ज्याला तोंड देता येत नाही अशा परिस्थितीपासून सुटका ह्या दृष्टीनं चारू त्याच्या आजारपणाकडं पाहात होता. आजारी माणसाकडून कोणी कसली अपेक्षा करीत नाही, उलट त्याची प्रत्येक अपेक्षा त्याच्याकडून वदवूनसुद्धा न घेता पुरी करतात.'
 'तुला म्हणायचंय काय? की चारू ही दुखणी मुद्दाम ओढवून घेत होता?'
 'अगदी तसंच नाही, पण त्याच्या नोकरीतले क्रायसेस, मृण्मयच्या जन्माच्या वेळच त्याचं वागणं, त्याची आजारपणं, ह्या सगळ्यांचा एक साचा बनून गेला होता असं नाही का तुला कधी वाटलं? आणि शेवटी त्याचं सारखं नोकऱ्या सोडणंही विचित्रच नव्हतं का?'
 'पण नोकऱ्या सोडण्याची त्यानं दिलेली कारणं योग्य वाटण्यासारखी नव्हती का?'
 'तसं मलाही प्रथम वाटलं. पण अशा प्रसंगांना दहानं गुणलं की ह्या सबंध प्रक्रियेत काहीतरी चुकतंय असं वाटत नाही का? शेवटी ज्यात हेवेदावे, लाचलुचपत, क्षुद्रपणा, भ्रष्टाचार अजिबात नाहीत असं जग फक्त आपल्या कल्पनेतच अस्तित्वात असू शकतं. खरं जग आपल्याला जसं भेटतं तसं स्वीकारावं लागतं.'
 'म्हणजे आदर्शवादाला तुझ्या जगात काही स्थान नाही का?'
 'जरूर आहे. पण तुमचा आदर्शवाद तुम्हाला जगाशी कोणत्याही तऱ्हेची तडजोड स्वीकारू देत नसला, तर ती तडजोड लाथाडण्याचे परिणाम हसत भोगण्याइतका कणखरपणा तरी तुमच्यात हवा. तो नसेल तर तुमच्या आदर्शवादाला काही अर्थ राहात नाही. असा आदर्शवाद म्हणजे व्यवहारातल्या टक्याटोणप्यांपासून स्वत:ला बचावण्यासाठी वापरलेली नुसती ढाल ठरते. चारूच्या बाबतीत तेच झालं. त्याचा आदर्शवाद म्हणजे फक्त एक पळवाट होती.'
 'बरं, क्षणभर आपण गृहीत धरू की चारू ह्या जगात राहायला अयोग्य आहे, अपंग आहे. हे तू त्याला सोडून द्यायला पुरेसं कारण कसं होतं?'
 'तो अपंग आहे एवढंच नव्हे तर तो मलाही अपंग करू पाहातो. त्याचं कुठल्याच नोकरीत जमत नाही तर त्यानं मला नोकरी करू द्यावी. मग तिथं 'पुरुषी अहंकार का आड यावा? त्यानं घरी राहावं, मृण्मयला सांभाळावं. जो एका बाबतीत जगावेगळा व्हायला बघतो त्यानं इतरही बाबतीत व्हायला का कचरावं?'
 विश्वजितनं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तेव्हा ती म्हणाली, 'त्याचं कारण म्हणजे चारूला परिस्थिती होती तशीच कायम ठेवायची होती. तिच्यावर तोडगा काढायची इच्छाच नव्हती आणि ह्यातच विकृती होती त्याची. लहान मुलाप्रमाणे तो ठोकर खाऊन आला की मी त्याच्या जखमेवर फुंकर घालावी मलमपट्टी लावावी, अशी अपेक्षा होती. पण त्याचवेळी ही मागणी पुरी करणारी आई मुलाच्या दृष्टीनं जशी अधिकारस्थानी असते, तशी मी नसावी अशीही त्याची अपेक्षा होती. पोटासाठी त्याच्यावर अवलंबून असलेल्या, फक्त गृहिणी म्हणून जगणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेतून मी त्याची अस्मिता जपावी असंही त्याला वाटे.'
 'ह्यात तुझी काही जबाबदारी असू शकेल असं तुला वाटत नाही,का? कदाचित चारूला तुझ्याकडून जे जे हवं ते तू देत गेलीस म्हणून ह्या विशिष्ट दिशेनं तो गेला असेल. तू त्याच्या आयुष्यात आली नसतीस तर कदाचित वेगळ्या दिशेनं गेला असता.'
 'विश्वजित, जबाबदारी मानली म्हणून तर मी इतके दिवस त्याला चिकटून राहिले. पण मी त्याच्याजवळ राहून कुठलाच प्रश्न सुटत नाही, उलट गुंता वाढतच जातोय असं पाहूनच मी हा निर्णय घेतला आणि शेवटी माझी तरी कुचंबणा मी कुठवर आणि कशाच्या जिवावर सहन करायची? गेले कित्येक महिने घर म्हणजे माझा तुरुंग झाला होता. बाहेर गेले तर चारू मिनिटा-मिनिटाचा हिशेब विचारायचा. घरी असले की स्वत: जवळून हलू द्यायचा नाही. घरकाम, मृण्मयचं सगळं, तो बाहेर गेला किंवा झोपला की घाईघाईनं मला आवरून घ्यावं लागायचं. तो आजारी असला की मग आमच्यातलं नातं केवळ नर्स-पेशंट एवढंच राहायचं. तो माझा नवरा तर राह्यचा नाहीच पण मित्रही राहात नसे. हे सगळंच मग मला असह्य झालं तर तू मला दोष देऊ शकतोस?'
 त्यानं मोठा सुस्कारा सोडून मान हलवली. मग तो म्हणाला, 'ठीक आहे. तुझ्या दृष्टीनं तू जे केलंयस ते बरोबर केलंयस असं मानलं तरी चारूचं आता काय होणार हा प्रश्न राहातोच.'
 'त्या प्रश्नाचं कोण उत्तर देऊ शकणार? काठी मोडून पडल्यावर लंगडत खुरडत का होईना चालण्याचा त्यानं प्रयत्न केला तर तो तरेल.'
 'आणि तरला नाही तर?'
 'तर काय वाटेल ते होईल. तशा शक्यता पुष्कळ आहेत.' ती थंड आवाजात म्हणाली.
 'तू इतकी निर्दय होऊ शकतेस? तुला त्याची काही दया येत नाही?'
 'केवळ दयेच्या नात्यानं एकत्र बांधली गेलेली दोन माणसं एकमेकांचं कधीच भलं करू शकत नाहीत, विश्वजित.'
 'चारूचं काही बरंवाईट झालं तर तुझं मन तुला खाणार नाही?'
 'जरूर खाईल, पण एका असह्य झालेल्या बंधनातून सुटण्याची तेवढी किंमत द्यायला मी तयार आहे.'
 तो कडवटपणे हसला. 'तू ज्ञानी आहेस. तुझ्याकडं सगळ्याच प्रश्नांना अगदी चपखल उत्तरं आहेत.'
 तिनं त्याच्याकडं बराच वेळ नुसतं पाहिलं आणि मग एकदम निश्चय करून ती म्हणाली, 'एक सोडून सगळ्या.'
 'आश्चर्य आहे. एखाद्या प्रश्नाचं तुलाही उत्तर सापडत नाही तर.'
 त्याला तसंच तिखट प्रत्युत्तर देण्याची उर्मी तिनं दाबून ठेवली.
 ती म्हणाली, 'विश्वजित, एकदा चारू आजारी असताना तू आमच्याकडे राहायला आला होतास. तेव्हा एका रात्री मी तुझ्याकडं आले होते. आठवते तुला ती रात्र?'
 तो जरासा आश्चर्यानं म्हणाला. 'आठवते. मी एकदम जागा झालो. तू माझ्या शेजारी झोपली होतीस. बेभान झाली होतीस. आवेगानं मला मिठीत घेऊन माझं चुंबन घ्यायला बघत होतीस.'
 'तू एकदम उठून बसलास, जोरानं मला दूर लोटलंस आणि म्हणालास, 'हे काय विभा?'
 'मग तू स्फुंदून स्फुंदून रडायला लागलीस आणि म्हणालीस, चारू, असं दूर लोटू नको रे मला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तू अर्धवट झोपेत, किंवा कसल्यातरी भ्रमात आहेस.'
 'मग तू मला जवळ घेऊन माझी समजूत घातलीस. म्हणालास, विभा जागी हो, रडू नको.'
 'तू भानावर आलीस आणि शरमून म्हणालीस, मला क्षमा कर, विश्वजित. मी म्हटलं, त्यात क्षमा करण्यासारखं काही नाही, विभा. तू खूप तणावाखाली आहेस, दमली आहेस, तू काय करत्येयस ह्याचं तुला भान नव्हतं. पण तू आत्ता ही आठवण का काढते आहेस?'
 'मी जर तुला सांगितलं की मी काय करत्येय ह्याचं मला संपूर्ण भान होतं, तर?'
 विश्वजित काही बोलला नाही.
 'हाच माझा अनुत्तरित प्रश्न आहे. मी त्यावेळी झोपेत नव्हते, भ्रमात नव्हते, पूर्ण शुद्धीत होते, आणि तू 'तू' आहेस ह्याची मला स्वच्छ जाणीव होती हे तुला माहीत असतं तर तू काय केलं असतंस?'
 त्यानं खाली घातलेली मान वर करून तिच्याकडं पाहिलं नाही. आता मृदू स्वरात तो म्हणाला, 'ते मला माहीत होतं, विभा.'


स्त्री नोव्हेंबर १९८१