कमळाची पानं/शिळी कढी आणि राष्ट्रवाद

विकिस्रोत कडून

शिळी कढी आणि राष्ट्रवाद


मैत्री ह्या विषयावर काही तात्त्विक चिंतन
करण्याची गरज मला कधीच भासली नव्हती
लहानपणापासून कितीतरी मैत्र्या जमल्या,
तुटल्या, फिरून नवीन जमल्या. त्या प्रक्रियेत
जाणूनबुजून काही केलेलं नसायचं. आता प्रौढ
वयात शेतातल्या वस्तीवर राहात असल्यामुळे
मैत्रीची शक्यता नसणं खळखळ न करता
स्वीकारलं कारण मुळात मी बुजरी आणि
एकलकोंडी होतेच. शिवाय मैत्रीची गरज असेल
ती सहचरामुळे आणि पुढे मुलीमुळे
भागवली गेली.

विमलशी झालेली मैत्री अशाच
बनत्या-बिगडत्या मैत्र्यांपैकी एक, तरी वेगळी.
एक तर ते चॉकलेटच्या चांद्या आणि
मोरपिसांची देवघेव, वर्गातल्या इतर मुलींच्या
चहाड्या, आपले आईबाप आणि शिक्षकांविरुध्द
कैफियती ह्यांवर आधारित शाळकरी मैत्र्यांच्या
पुढली पायरी होती. आणि दुसरं म्हणजे
ती तशी बरेच दिवस टिकली. आमच्यात
भौगोलिक अंतर पडून सुध्दा. पण तरी तिला
भेटल्याला किंवा तिच्याशी काही संपर्क
साधल्याला उणीपुरी तीस वर्षे होऊन गेली.
आणि आता भूतकाळातून वर्तमानकाळात
उडी मारून ती एकदम लिहिते आहे, मी दोन-तीन आठवड्यांसाठी भारतात येते आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटायची इच्छा आहे. तुझी भेट होऊ शकेल का?
 मला तिच्याबद्दल वाटणारं कुतूहल तिच्या नावापासून सुरू झालं. 'विमल'चं 'विमला' झालं की ते बंकिमचंद्री नायिकेचं नाव वाटायचं. ती ओघवत्या कॉन्व्हेंटी उच्चारांचं इंग्रजी बोलायची. त्या काळात इंग्रजी वाचनात गती प्राप्त झाल्यामुळे मी रिबेका, जेन एयर, वदरिंग हाइटस अशा रोमँटिक कादंबऱ्यांचा फडशा पाडीत होते. त्यांच्यातल्या वेगळ्याच वातावरणाने माझा कब्जा घेतला होता. आणि त्यांची भाषा चक्क दैनंदिन व्यवहारात वापरणारी व्यक्ती भेटल्यामुळे मी अगदी भारावून गेले. त्यात मग ती फ्रॉक घालायची, सुंदर नाही पण स्मार्ट दिसायची, आत्मविश्वासाने बोलायची.
 साडी नेसलेली, पाठीवर शेपटा सोडलेली, लाजरी-बुजरी मी मला तिच्यासमोर अगदी बावळट-गबाळी वाटायची. आत्ता कुठे कॉलेजच्या वयाची झाल्यावर मी माझ्या आई-बाबांशी थोड्याफार बरोबरीच्या नात्यानं बोलायला लागले होते. त्या तुलनेत विमलाला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा मला फारच हेवा वाटला (ते सुध्दा बहाल केलेले नसून परिस्थितीमुळे मिळालेले होते हे मला पुढे कळले). तिचं घर लोणावळ्याला होतं आणि ती कॉलेजसाठी लोकलने ये-जा करायची. तास इतक्या वाजता संपला, मग तुला घरी यायला इतका उशीर का झाला, असं तिला कुणी विचारू शकत नव्हतं. हे सगळं पुरं नव्हतं म्हणून की काय, इंजिनियरिंग कॉलेजातल्या एका मुलाशी तिचं प्रेमप्रकरण होतं.
 ती ज्या कॉलेजात होती तिथे तिला हवा तो विषय मिळत नव्हता म्हणून तिसऱ्या वर्षात आमच्या कॉलेजात दाखल झाली. मीही बी.ए.ला मानसशास्त्र घेतल्यामुळे तिची-माझी गाठ पडली आणि मग मैत्री झाली, अगदी गाढ. आम्ही सारख्या बरोबर असायचो. वर्गात, ऑफ तासाला लायब्ररीत किंवा बागेत किंवा कँटीनमध्ये कॉफी घ्यायला. क्वचित माझ्या आग्रहावरून शनिवारी रात्री आमच्याकडे यायची. तो वीकेण्ड म्हणजे सणच असे. रविवारी सकाळी भटकाभटकी, कधी पोहणं, कधी एखादी लहानसहान खरेदी करायला जाणं अणि अखंड गप्पा.
 आईचं नि तिचं खूप छान जमायचं. माझ्या इतर कुणी मैत्रिणी आल्या तर त्या माझ्या आईशी जेवढ्यास तेवढं बोलायच्या, जरा बुजूनच राहायच्या. विमला मात्र एखाद्या वेळी आई स्वैपाकघरात असली तर जाऊन तिथे ठाण मांडून गप्पा मारायची. आमच्याकडे स्वैपाकाला बाई होती पण एखाद्या वेळी काहीतरी खास करून बघायची आईला हौस होती. विमल आईनं केलेला कुठलाही पदार्थ नावाजून खायची. फारसा चांगला झाला नसला तरी. आई म्हणायची, "नाही तर माझी मुलं. कधी चांगलं म्हणतील तर शपथ." माझा भाऊ म्हणायचा, "आम्ही हात मारून खाल्लं म्हणजे ते कौतुकच ना. आणि ती परकी आहे म्हणून बोलून दाखवते. तिच्या आईला ती असं म्हणते का ते विचार." विमला नुसतीच हसायची आणि आई म्हणायची, "पण ती परकी नाहीयेच मुळी." विमला आमच्या घरी किती सहजपणे वावरायची, बोलायची त्याचं मला फार कौतुक वाटे. ती म्हणायची, "तू फार सुदैवी आहेस. आई शिकलेली, तेव्हा तू शिकणार हे गृहीतच धरलं गेलं." विमलाला प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागला. "एम्. ए.चं तर विचारूच नको. अजूनही रोज त्याबद्दल कुरकूर चालते. इतकं शिकण्याची गरज आईलाच काय पण वडलांना सुद्धा कळत नाही. तिच्या मते मी आता लग्न करावं. तिनं स्थळं आणायलाही सुरुवात केलीय. सत्यशीलबद्दल तिला माहीत नाही, नाही तर तिनं माझं पुण्याला येणं बंदच केलं असतं." "का? तिला पसंत नाही?" "तो आमच्या जातीचा नाही. मुळात पंजाबी सुद्धा नाही. पण अगदी महत्त्वाचा आक्षेप म्हणजे असलं प्रेमातबिमात पडून लग्न करणं तिला पटत नाही." "मग तू काय करणार?" "बघू आधी एम्. ए. तर होऊ दे. काही तरी मार्ग निघेल."
 एकदा मी तिच्या घरी गेले होते. तिची आई एक प्रचंड बाई होती. उंच पण जाडजूड. त्यांच्या घरचा सगळा स्वैपाक तुपात असे नि त्यासाठी ती चार गॅलन डबे भरभरून अस्सल तूप पंजाबहून मागवीत असे. माझा तिच्याशी फारसा संवाद साधला नाही कारण तिला इंग्रजी येत नव्हतं आणि मला हिंदी. पण तिच्या आणि विमलाच्या फार काही गप्पा वगैरे चालल्या नव्हत्या. तिचे वडीलही, जेवायला दुपारी आले तेव्हा फारसं काही बोलले नाहीत. मी तर खालमानेनंच वावरत होते आणि गप्प गप्प राहतात होते. विमला आमच्याकडे कशी घरातलीच एक असल्यासारखी वावरायची आणि मी काही बोलतही नव्हते ह्याची मला लाज वाटत होती. परत जाताना विमलाची आई मला म्हणाली. "पुन्हा जरूर ये हं." विमलाला ती म्हणाली, "तुझी मैत्रीण फार लाजरी आहे."
 पुन्हा कधी तिच्या घरी मला जायचा प्रसंग आला नाही. एम्. ए.ची परीक्षा संपली. तिच्या आईवडिलांना कुठून तरी सत्यशीलबद्दल सुगावा लागला. तिला छेडल्यावर तिनं ते कबूल केलं, आणि मोठा स्फोट झाला. तिच्या आईला हार्ट अटॅक आला. वडिलांनी विमलाला घरात डांबून ठेवलं, आणि दोन महिन्यांनी, 'त्या'ला भेटणार नाही अशा कबुलीवर रिझल्ट घ्यायला तिला पुण्याला येऊ दिलं. काय करावं ते तिला समजत नव्हतं. पण सत्यशीलशी लग्न करायचं नक्कीच असलं तर परत घरी जाणं ही घोडचूक ठरेल असं तिला मनोमन वाटत होतं. मी म्हटलं, "तू माझ्या घरी चल. आईशी बोल. ती काहीतरी मार्ग काढील."
 आईनं तिला विचारलं, "सत्यशीलची तुला खात्री आहे का? तशीच वेळ आली तर तो तुझ्याशी लगेच लग्न करील का? तो नाही म्हणाला तर तू दोन डगरींच्या मधे पडशील. नाही तर असं कर. त्याला घेऊन ये मला भेटायला."
 "पण मी आत्ता लग्न केलं आणि आईला काही झालं तर मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही."
 "तिला हार्ट अटॅक आला म्हणजे नेमकं काय झालं?"
 "एकदम छातीत दुखायला लागलं म्हणाली. डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी औषधं लिहून दिली. विश्रांती घ्या म्हणाले."
 "एवढंच? हॉस्पिटलमधे सुद्धा नेलं नाही? काही चाचण्या वगैर केल्या नाहीत? मग तो हार्ट अटॅक नव्हताच मुळी. काही होणार नाही तुझ्या आईला. मुलांना आपल्या मनासारखं वागायला लावायसाठी युक्त्या असतात ह्या."
 विमलाचं लग्न आमच्या घरी झालं. सत्यशीलची आई आणि बहीण मुंबईहून आल्या (वडिलांचा संबंध नव्हता कारण त्यांनी ह्या बायकोला सोडून दिलं होतं) त्यांनी घाईघाईने खरेदी केलेली साडी, दोन दागिने विमलाच्या अंगावर घातले. कुठून तरी एक भटजी बोलावला.
 बायकांच्या मैत्रीला लग्नाचा शाप असतो. ती आणि सत्यशील मुंबईला गेले, तिथून त्याला कलकत्त्याच्या एका कंपनीत नोकरी मिळाली तिकडे. वर्षातनं एकदा एकमेकींना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या त्यावेळी एकमेकींच्या आयुष्यातल्या घडामोडी कळत गेल्या. पुढे ती अमेरिकेला गेली आणि आमच्यातला उरलासुरला धागा तुटला. मला नाही वाटत आमच्यातल्या कुणी त्याबद्दल अश्रू ढाळले म्हणून. आणि आता एकदम हे पत्र.
 "मी भारतात येते आहे. मुख्यत: जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायला. तुझी भेट झाली तर आनंद होईल. तशी शक्यता असेल तर खालील नंबरावर फोन करून माझ्या भावाकडे निरोप ठेव,"
 तेच गोलगोल अक्षर, त्याच लकबी दशकांपूर्वीच्या. पत्र बघून एकदम ती डोळ्यांसमोर उभी राहिली. गोरी, ठेंगण्यातच जमा होणारी, मुरुमं असलेले गोबरे गाल. जरासा बसका आवाज, अखंड बडबड आणि त्यात मधूनच स्वल्पविरामासारखं हसणं. खूप आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या कँटीनमधे कॉफी पीत ऑफ तास काढणं, भटकणं, आमच्या गच्चीवर चांदण्यात बसून तासन्-तास चाललेल्या गप्पा. लग्नाच्या दिवशी जाताना मला मिठी मारून म्हणाली, "तुला जाणीव सुद्धा नाही इतकं काही तू मला दिलंयस. मला विसरू नको." मी रडत रडत म्हणाले होते, "मी कसली विसरतेय? आता तूच मला विसरशील."
 काही वर्ष कॉलेजात लेक्चरर म्हणून काम करून केंद्र सरकारच्या प्रज्ञाशोध प्रकल्पात तिला नोकरी मिळाली होती. त्यावेळी एकदा पुण्याला आलेली असताना ती आईला भेटायला आली. योगायोगाने त्याचवेळी मी आईकडे होते तेव्हा विमलाची आणि माझी भेट झाली. खुशीत दिसली. आपल्या कामाबद्दल उत्साहाने बोलत होती. पण घाईतच होती. मी म्हटलं "पुन्हा पुण्याला आलीस तर आणखी एखादा दिवस खर्चून माझ्याकडे ये ना. जरा निवांत भेटू-बोलू." तिनं नक्की यायचं कबूल केलं, पण भेट कधी झाली नाही. खरं म्हणजे मी तशी अपेक्षाही केली नाही. कारण जी झाली त्या भेटीत, विशिष्ट परिस्थितीत जुळलेलं आमचं नातं विरून गेलेलं मला जाणवलं होतं. आम्ही आमच्या भिन्न मार्गांनी बरीच वाटचाल केली होती. ते मार्ग जाता एकमेकांना छेदण्याची फारशी शक्यता उरली नव्हती. त्यातून ती अमेरिकेत स्थायिक झाली असं कळल्यावर तर उरलासुरला धागा तुटलाच. तो आता इतका काळ गेल्यानंतर पुन्हा सांधण्याचा प्रयत्न ती करीत होती?
 तिच्या भावाकडे ठेवलेल्या निरोपानुसार तिने मला फोन केला. आवाज तसाच उच्चारही तसेच. उच्चारावर अमेरिकन छाप अजिबात नाही.
 "तुझ्याकडे नेमकं कसं यायचं ते सांग."
 "पुण्याला उतरलीस की स्टेशनवरून बस स्टँडवर जा. तिथून जवळच आहे."
 "बस? ते बसबिस मला नाही जमायचं."
 "का? रोज हजारो माणसं बसने प्रवास करतात. चौकशी खिडकीशी चौकशी कर म्हणजे कुठली बस घ्यायची ते सांगतील."
 "मला मराठी सुद्धा येत नाही."
 "हिंदी तर येतं ना? का तेही विसरलीस!"
 "बरं, ठीक आहे. तुझ्याकडे किती दिवस राहण्याचा बेत करू? ते कळल म्हणजे मला पुढचा कार्यक्रम ठरवता येईल."
 "विमला, तुला जितके दिवस राहावंसं वाटेल तितके दिवस राहा. किती ते तू ठरवायचंयस."
 फोन खाली ठेवतेय तो पुन्हा वाजला. तिचा भाऊ.
 "त्या बसच्या झंगटात कशाला अडकवत्येयस तिला?"
 मला जरासा रागच आला. मी म्हटलं. "मग टॅक्सी करून येऊ दे. स्टेशनजवळच टॅक्सी भाड्याने मिळतात."
 "एखादा नेहमीचा टॅक्सीवाला आहे का तुमचा? म्हणजे ओळखीचा असला तर बरं. अगदीच अनोळखी टॅक्सीवाल्याबरोबर एकटीनं प्रवास करायचा म्हणजे-"
 "ओळखीचा वगैरे कुणी नाही. आम्ही बसने प्रवास करतो." मनात म्हटलं, बिचारी किती धोके पत्करून मला भेटायला येतेय. पण मग माझ्या तुटकपणाची लाज वाटली. शेवटी आमच्या इथलीच एक ओळखीची टॅक्सी तिच्यासाठी पाठवायचं ठरलं, की जिचा ड्रायव्हर तिच्यावर बलात्कारही करणार नाही आणि दरोडाही टाकणार नाही अशी माझी खात्री होती.
 तिला पाहिल्यावर मी म्हटलं, "विमला, तू अगदी होतीस तशीच आहेस. जरा जाड झालीयस, पण बाकी फारसा फरक नाही."
 ती मनापासून हसली आणि म्हणाली, "माझं वय इतकं आहे ह्यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. फारफार तर पन्नाशीची समजतात सगळे मला." ती ज्या अभिमानाने हे म्हणाली त्याने मी चपापले. तिला स्वतःच्या दिसण्याबद्दल कधी घमेंड नसे. तशी ती दिसायला फार सुंदर वगैरे नव्हतीच, पण तिचं व्यक्तिमत्व, नीटनेटके शोभून दिसणारे कपडे, ह्यांमुळे आकर्षक दिसायची. पण स्वत:च्या रूपाबद्दल कधी बोलत नसे. आता मात्र ती माझ्याकडे होती तेवढया अवधीत तिने आपल्या वयाबद्दल लोकांची अशी फसगत होते ते आवर्जून सांगितलं. माझ्या मुलीची एक थियरी मी तिला सांगितली नाही, की आयुष्यभर हळूहळू लठ्ठ होत गेलं की म्हातारं दिसत नाही, कारण कातडीखालची चरबी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या इस्तरी केल्याप्रमाणे साफ करते!
 इतक्या वर्षांच्या खंडानंतर सुद्धा आमच्यात काही अवघडलेपण जाणवलं नाही. उलट तिच्या आयुष्यातल्या माझ्या दृष्टीने मोकळ्या जागा भरायला ती उत्सुक होती. मुख्य म्हणजे तिनं देश सोडून परदेशात स्थायिक व्हायचं का ठरवलं ह्या बद्दल मला कुतूहल होतं.
 ती म्हणाली, "खरं म्हणजे त्याला कारण सत्यशील होता असं म्हटलं तरी चालेल."
 "तुमची फारकत झाल्याचं मी उडत उडत ऐकलं होतं. काय झालं एकदम?"
 "मी पुण्याला तुला भेटले होते ना, त्यानंतर मला ही फेलोशिप मिळाली. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनेच अर्ज केला होता, तरी मी फारशी आशा ठेवली नव्हती. पण मिळाली, अर्थातच मी ती स्वीकारली कारण ही संधी गमावणं शक्यच नव्हतं. सुरुवातीला दोन वर्ष, मग दोन वर्षं वाढवून मिळणार होती. दरवर्षी एक महिना सुट्टी आणि येण्याजाण्याचा खर्च. आयुष्यात मिळालेली सर्वात मोठी संधी, पण तीच माझं लग्न मोडायला कारण झाली. मी सत्यशीलपासून इतके दिवस दूर राहिले ह्याचं निमित्त झालं. त्याच्या कंपनीने दुबईत कंत्राटं घेतली होती तेव्हा मी महिनेनमहिने एकटी राहात असे. त्यावेळी तर मुलं लहान होती आणि सगळ्या जबाबदाऱ्या एकटीनं संभाळणं मला खूप कठीण जात असे. नेमकं काय आणि कसं झालं ते काही मला कळलं नाही, पण तो दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला. तो माझ्यापासून लपवीतच होता, पण मुलांनी मला सांगितलं. मग मी त्याला सरळच विचारलं तेव्हा तो म्हणाला हो, मला घटस्फोट पाहिजे आहे. नाही तरी तुला आता आपल्या संसारात काही रस उरलाच नाहीये. जे घडत होतं त्याची जबाबदारी तो माझ्यावरच ढकलू पहात होता. पुढे कधी कधी विचार करताना मला वाटलं की ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली होती. माझं परदेशी जाणं हे नुसतं निमित्त झालं. एकदा नातं तुटलं की का, कसं ह्याचा उहापोह करून काहीच हाती लागत नाही. त्याच्यापाशी भीक मागायची नाही असं मी ठरवलं आणि तडकाफडकी चालती झाले. परत न येण्याचा निश्चय करून."
 "पण का? तो तू ह्या देशात राहण्याचं एकुलतं एक कारण होतं का?"
 "तसं नाही. तरी पण त्याचं घर सोडून द्यायचं तर कुठे जाणार इथपासून प्रश्न होता. आणि तसं माझी फेलोशिप सुरू असेपर्यंत मी फक्त त्याला आणि मुलांना भेटण्यासाठी येत असे. तेव्हा तोपर्यंत तरी येण्यात काही अर्थ नव्हता."
 "तुझ्या माहेरच्यांचं काय?
 "खरं म्हणजे त्यांच्या आधाराने मला राहायचं नव्हतं. तसा आमचा समेट झाला होता, आणि मी दोन-तीनदा भेटूनही गेले होते त्यांना. तरी अशा परिस्थितीत त्यांनी मला काय ऐकवलं असतं मला माहीत होतं. ते मला अपमानास्पद वाटलं असतं. मला गरज होती ती भावनिक आधाराची, आणि तो ते देऊ शकले नसते. झालं ते काही वाईट झालं नाही. पण तो सुरुवातीचा काळ मला फार खडतर गेला. नशिबाची गोष्ट म्हणजे फेलोशिप संपण्याच्या काळात मला एक नोकरीची ऑफर मिळाली."
 ह्यात नशिबाचा भाग फारसा नव्हता हे न कळण्याइतकी ती भोळी होती असं मला वाटलं नसतं. मुळात एका कॉन्फरन्समधे भेटलेल्या एका प्रोफेसरने सुचवल्यावरून तिने फेलोशिपसाठी अर्ज केला होता. आणि तिकडे शिकणाऱ्या, संशोधन करणाऱ्या चांगल्या विद्यार्थ्यांना हेरून नोकऱ्या देऊ करायच्या हा अमेरिकनांचा कावा सर्वश्रुत आहे. हे सगळं तिला माहीत नव्हतं ह्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण तिने आपल्या आयुष्यातल्या घटनांची एक विशिष्ट संगती लावली होती जी तिला सर्वात जास्त स्वीकार्य वाटत होती.
 "मला लागलेली नोकरी सरकारच्या शिक्षण खात्यात होती, त्यामुळे माझ्या नागरिकत्वाचा मार्ग सुकर झाला. मग मी मुलांनाही बोलावून घेतलं. आता ते दोघे तिथेच आहेत."
 "तुला कधीच हा निर्णय घेतल्याचा पश्चाताप झाला नाही?"
 "छे:, मिनिटभर सुद्धा नाही. तू काहीही म्हण, But that's the land of opportunity. मी कोण-कुठली, पण केवळ गुणवत्तेच्या आधारावर मला तिथे ज्या संधी मिळत गेल्या तशा इथे काही मिळाल्या नसत्या."
 "असं का म्हणतेस? इथेही तुला चांगल्या संधी मिळत गेल्याच की. त्यातूनच तुला ही फेलोशिप मिळाली."
 ती काही बोलली नाही. नुसते खांदे उडवलेन. खरं म्हणजे ती तिच्या वैयक्तिक समस्येपासून पळून जाऊन तिकडे स्थायिक झाली होती. पण त्या देशाची सर्व बाबतींत भलावण करून तिला आपल्या निर्णयाचं समर्थन करण्याची गरज का भासत होती? तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून सत्यशीलवर प्रेम केलं होतं. घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी लग्न केलं होतं. त्या लग्नाचा असा शेवट होईल हे स्वीकारायलाच तिचं मन तयार नव्हतं. अशा स्थितीत तिनं परत इकडे न येण्याचा निर्णय घेतला. एवढं पुरे होतं.
 एक दिवस मी तिला विचारलं, "तुला इकडची कधी चरचरून आठवण येत नाही? इथली तुझी माणसं, आयुष्य, सांस्कृतिक बंध?"
 "खरंच नाही. मी काही तरी महत्त्वाचं गमावलंय असं मला कधीच वाटलं नाही."
 तिच्याबद्दल ज्या गोष्टींचं आकर्षण वाटून मी तिच्याकडे ओढली गेले, त्या गोष्टींमुळे खरं म्हणजे जे काही गमावण्यासारखं होतं ते तिनं आधीच गमावलं होतं असं तर नव्हतं? पण मग तिला कुणाचीच आणि कशाचीच आठवण येत नव्हती तर इतक्या वर्षांनंतर ती इथे परत कशाला आली होती, आणि जुन्या मित्र-मैत्रिणींना - ज्यांना ती गेल्या तीसेक वर्षांत भेटली नव्हती आणि बहुतेक पुन्हा कधीच भेटणार नव्हती - भेटून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न का करीत होती?
 भेटल्याभेटल्या मी जेव्हा तिला म्हटलं, "विमला, you really are a voice from the past," तेव्हा ती म्हणाली होती, "नाही, तसं म्हणू नको. आपल्या भेटीचा भूतकाळाशी संबंध जोडू नको. आपण आत्ता इथे भेटतो आहोत." पण भूतकाळात संबंध नसता तर ती आत्ता भेटायला आलीच असती कशाला? की तिला हेच सांगायचं होतं की तो काळ, ती परिस्थिती आणि त्या आम्ही हे सगळं आता बदललं होतं? एखाद्या नात्यात सातत्य राहिलं नसलं की ते परत प्रस्थापित होऊ शकत नाही. मग ते एक नवंच नात निर्माण होतं. पण असं नवं नातं ह्या वयात, पुन्हा कधी भेटण्याची शक्यता नसताना ती का जोडू पहात होती? त्या जुन्या प्रेमाखातरच ना? पण नव्यानं नातं जोडायचं तर आम्ही दोघीही पूर्वीच्या राहिलो नव्हतो. त्या काळी ज्या गोष्टींनी मला आकर्षित केलं होतं त्यांना माझ्या लेखी काही अर्थ राहिला नव्हता. ह्या क्षणी आम्ही प्रथमच एकत्र आलो असतो तर एकमेकींबद्दल मैत्री करण्याइतकं आकर्षण वाटलं असतं आम्हाला? माझ्या तर मनात तिच्याबद्दल जराशी अढीच निर्माण झाली होती. भारतात आयुष्याची पहिली तीस-पस्तीस वर्षे घालवलेल्या बाईने साधं मुंबईहून दोनशे किलोमीटर प्रवास करून यायचं ह्या गोष्टीचा केवढा बाऊ केला होता. कबूल आहे, अडचणी, संकटं येऊ शकतात. पण अमेरिकेत काहीच होऊ शकत नाही? अगदी कबूल की ह्या देशाबद्दल टीका करण्यासारखं खूप काही आहे. पण तिला आवडलेलं, तिच्या आठवणीत घर करून राहिलेलं असं काहीच नव्हतं? तिचं दत्तक देशाबद्दलचं प्रेम मी समजू शकत होते. तिचं लग्न मोडल्याचा मोठाच धक्का तिला बसला होता. तो पचवून इथे येऊन स्वत:साठी नवं आयुष्य उभारण्याची जिद्द हरवलेल्या तिला ह्या नव्या देशाने नोकरी, आधार, नवं आयुष्य दिलं होतं. पण म्हणून जो देश निम्मं-अर्धं आयुष्य होईपर्यंत तिचा होता त्याविषयीची तिची भावना घाण-गर्दी-गरिबी-बेशिस्त ह्यांपलिकडे पोचू नये?
 ह्या ठिकाणी पोचल्यावर मी स्वत:ला जरासं खडसावलं. ती एक अमेरिकन बाई आहे आणि ती माझ्याकडे चार दिवस पाहुणी म्हणून आलीय. बस्स इतकंच. का म्हणून मी क्षुल्लक बाबींचं एवढ अवडंबर माजवत्येय! पण का ते मला माहीत होतं. ती अवचित माझ्या आयुष्यात परत येतेय म्हटल्यावर मी काही अपेक्षा ठेवून तिला भेटत होते आणि त्या पुऱ्या होत नाहीत म्हणून माझी निराशा होत होती. इथे ती एका खूप प्रतिष्ठा असलेल्या युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका होती. नंतर भारत सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या प्रज्ञाशोध प्रकल्पात एक वरिष्ठ अधिकारी होती. त्याचे काम करत असतानाच ती मला भेटली होती तेव्हा त्याबद्दल खूप उत्साहाने बोलत होती. त्या मानाने ती तिथे करीत असलेल्या कामात काही फारसं आव्हान नव्हतं. इथल्या शक्यता लक्षात घेता, तिचं तिथलं आयुष्य क्षुद्र वाटत होतं. मग म्हणून काय झालं, मी पुन्हा एकदा स्वत:ला खडसावलं. सर्वांनी काहीतरी महत्कार्य करीत अर्थगर्भ आयुष्यंच जगली पाहिजेत असा कुणी नियम केलाय! तिचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं, कुठे जगायचं हा तिचा प्रश्न आहे. तिनं इतक्या सहजपणे घेतलेला कायमचं राहण्याचा निर्णय मला डाचण्याचं काही कारण नव्हतं. आणि असा निर्णय घेतल्यावर तो देश सर्वस्वी आपला मानून त्याच्यावर प्रेम कर नुसतं साहजिकच नव्हे, तर शहाणपणाचंही नव्हतं का?
 एवढं सगळं चर्वितचर्वण केल्यावर मला जरा हलकं वाटलं. तरी अजून विमला आत्ता ह्या देशात आणि माझ्याकडे का आलीय ह्याचं उत्तर मिळत नव्हतं. ते पुढल्या काही दिवसांत मिळालं. तिला तिथे खूप एकटं वाटत होतं. इतकी वर्षे नोकरी, मुलं, घरकाम ह्या सगळ्यात कशी गेली कळलंच नाही पण आता कसला आधारच उरला नाही असं तिचं झालं होतं. मुलं लांब होती. त्याच्या आयुष्यात आता तिला काही स्थान नव्हतं. वर्षांतन एकदा भेट अधून मधून फोन, इतकंच.
 "पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्यांची आयुष्यं उत्तम घडवायची संधी मी त्यांना देऊ शकले ह्यात मला आनंद आहे."
 पुन्हा तेच. त्यांची आयुष्यं इथे तितक्या चांगल्या तऱ्हेने घडू शकली नसती अशी तिची खात्री होती. अर्थात इथे राहिली काय किंवा तिथे, काय फरक पडला असता? ती इथे असती तरी बहुतेक तिची मुलं अमेरिकेत जाऊन राहिली असती. शेवटी तिच्या एकटेपणावर मुलं किंवा नवरा हा उतारा नव्हताच. नसतोच."
 मी म्हटलं, "तिथे मित्र-मैत्रिणी असतील की तुझ्या.”
 "आहेत ग तशी. तिथली माणसं खूप प्रेमानं वागतात. मदत करायला सुद्धा खूप तत्पर असतात. इथल्यापेक्षा सुद्धा जास्त. तरी पण तरुणपणी केलेल्या मैत्रीइतकी जवळीक होऊच शकत नाही नंतरच्या मैत्रीत."
 मला तिची गंमत वाटली. त्या देशाशी सर्वार्थाने समरस झालेल्या, एवढंच नव्हे तर तिथे जाऊन आपलं भलंच झालं असं मानणाऱ्या तिला शेवटी ही सांस्कृतिक दरी ओलांडता येत नव्हती. नाही तर वयाचा मैत्रीशी काय संबंध असतो? पण तिला हे कसं समजत नव्हतं की आमच्यातही आता काही समान धागा उरला नव्हता? मी हायस्कूलमध्ये असताना एक पेन-फ्रेंड ही टूम निघाली होती. कुणीतरी कुठकुठले पत्ते दिले होते. आम्ही मुली उत्साहाने पत्रं लिहीत होतो. मला एक स्कॉटिश मैत्रीण मिळाली होती. एकमेकींच्या शाळा, शिक्षण, शहराचं वर्णन, कुटुंबाच्या फोटोंची अदलाबदल इतकं झाल्यावर पुढे काय? संवाद थोपला. विमलाचं आणि माझं तसंच नव्हतं का? एकमेकींच्या अपरिचित, अज्ञात आयुष्यात डोकावून पहात रहाणं हा संवादाचा पाया होऊ शकत नाही.
 ती जायच्या आदल्या दिवशी, तिला फार पूर्वी आवडायच्या म्हणून, आणि हा पदार्थ अजूनही अमेरिकेत मिळत नसावा म्हणून, पुरणपोळ्या केल्या होत्या. ती म्हणाली, "तु माझे इतके लाड केलेयस की इथनं जाऊच नयेसं वाटतं."
 "मग राहा की इथेच."
 "माझा सगळा कार्यक्रम आखलेला आहे. परतीचं बुकिंगसुद्धा झालंय."
 "तसं नाही, कायम इथेच येऊन राहाण्याबद्दल बोलतेय मी. आम्ही तुला एक तुकडा देतो जमिनीचा. घर बांध आणि राहा इथे."
 तिच्या डोळ्यांत पाणी आलं. "किती सहजपणे तू एक नवं आयुष्य देऊ केलंस मला. पण ते आता शक्य नाही. इथल्या धकाधकीत मी टिकू शकणार नाही." मग म्हणाली, "तुझे आभार मानणं म्हणजे उद्धटपणा होईल, पण हे आठ दिवस मी विसरू शकणार नाही. आयुष्यात प्रथमच माहेरी येणं म्हणजे काय ह्याचा मला अनुभव आला. आता मी तुला सोडणार नाही. आपण पत्रातनं भेटत राहू."
 मला तिची कणव येत होती, पण ज्या अनाम ओढीनं ती इथे आली तिला मी प्रतिसाद देऊ शकत नव्हते. मी फक्त म्हटलं, "तुझं पत्र आलं की त्याला मी उत्तर लिहीन."
 जाताना पुन्हा तिनं डोळ्यातनं पाणी काढलं. हळवेपणानं भारलेलं वातावरण सैलावण्याकरता मी हसत हसत म्हटलं, "तु परत गेलीस म्हणजे तेवढं तुमच्या सरकारला सांग आमच्या किनाऱ्यावर अणुभट्टीतला कचरा टाकू नका म्हणून. आजच्या पेपरात पाह्यलंस का तू?"
 ती एकदम फटकन म्हणाली, "मी कशाला सांगू? तो कचरा टाकायला कुठे तरी जागा लागतेच. इथे टाकायला नको असेल तर ते थांबवणं तुमच्या सरकारचं काम आहे."
 तिनं गेल्या गेल्या पत्र टाकलंन, पण मी तिला उत्तर लिहू शकले नाही. माझी मैत्रीभावना अनेक गोष्टींवर मात करू शकली असती, पण अणुकचऱ्यावर नाही. किंवा त्याबद्दल तिच्या भूमिकेवर नाही, असं म्हणता येईल.


स्रग्धरा दिवाळी २००४