Jump to content

कमळाची पानं/एका प्रवासाची सांगता

विकिस्रोत कडून

एका प्रवासाची सांगता


त्याला वाटलं, "वा: किती सुंदर!”
एका मोठ्या शिळेला टेकून ती बसली होती.
त्या अंतरावरून त्याला दिसले ते फक्त तिचे
भडक रंगाचे कपडे आणि त्या काळ्या फत्तरावर
विसावलेलं तिचं कोमल शरीर. तेवढंच पुरे
होतं. त्याच्या सकाळच्या भटकंतीला त्या
दृश्यानं एकदम अर्थ प्राप्त करून दिला होता.

सकाळभर त्या भग्न अवशेषांमधून तो
हिंडत होता. प्रथम त्या सगळ्याचा
प्रचंड आवाका पाहून तो स्तिमित झाला.
पण हळुहळू त्या काळ्या शिळांचं त्याच्यावर
दडपण यायला लागलं. जराशा अंतरावर
उभं राहिलं, की नैसर्गिक फत्तर कुठला
आणि माणसाने निर्माण केलेली वास्तू
कुठली हे कळेनासं होई. मग त्याला
आपण एखाद्या विज्ञानकथेतल्या
काल्पनिक प्रदेशात वावरत
असल्यासारखं वाटायला लागलं. सहाशे
वर्षांपूर्वी इथे हाडामासाची माणसं आपलं
जीवन व्यतीत करीत होती. हे एक
भरभराटीला आलेलं संपन्न राज्य होतं. आता
इथे फक्त पुरातत्व खात्याने लावलेल्या
पाट्या आहेत. हजारो लोक पायपीट करून
कोरड्या डोळ्यांनी आणि मनाने हे सगळं बघतात आणि परत घरी गेल्यावर भेटेल त्याला सांगतात, "मी हम्पी पाहिलं. खरंच बघण्यासारखं आहे हं." कुणी तरी असंच सांगितलं म्हणून एका ठिकाणचं काम उरकून परतताना रस्ता वाकडा करून तो इथं आला होता.
 तो सडा होता म्हणून म्हणा किंवा इतरजण अंगाबाहेर टाकायचे म्हणून म्हणा. ऑफिसची बाहेरगावची कामं बरेचदा त्याच्या अंगावर पडायची. त्यालाही ते आवडायचं. प्रवास, नवी ठिकाणं, नवी माणसं आणि अधूनमधून असं एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देणं. पण हे भग्न अवशेष बघून बघून त्याला उदास आणि कोंडल्यासारखं वाटायला लागलं आणि एकदम ती बाई बघून त्याच्या मनावरचं मळभ विखुरलं गेलं. कदाचित ती ज्या तऱ्हेनं त्या पाषाणाला टेकून बसली होती, जणू ती तिथलीच होती आणि कामानं थकून क्षणभर टेकली होती, त्यामुळे असेल, पण एकदम त्याच्या डोळ्यांसमोर एक जिवंत शहर उभं राहिलं. आपल्या कामासाठी किंवा मनोरंजनासाठी लगबगीने इकडे तिकडे जाणाऱ्या, गंभीर चर्चा करणाऱ्या किंवा रिकामटेकडेपणी गप्पा मारणाऱ्या नागरिकांनी गजबजलेलं.
 त्या बाईला दृष्टीच्या टप्प्यात ठेवून तो खाली बसला. कोण असेल ती? अशी एकटीच का बसली असेल? त्याला जवळून कुणी बायका माहीत नव्हत्या म्हणून की काय, त्याचं विचारविश्व खूपसं बायकांनी व्यापलेलं होतं. कुठेही सहज संपर्कात येणाऱ्या बायकांबद्दल तो स्वप्नरंजन करी. त्यात त्या नेहमीच त्याला या ना त्या प्रकाराने वश होत. खऱ्या आयुष्यात मात्र एखादीचं पेन खाली पडलं नि ते त्यानं उचलून दिल्यावर ती मुरकत त्याला थॅंक्यू म्हणाली किंवा एखादी वेंधळेपणाने त्याच्यावर येऊन धडकली, असं कधी घडलं नाही. कधी कधी त्याला इच्छा व्हायची, की गर्दीचा फायदा घेऊन एखादीला निसटता स्पर्श करावा. त्यानं इतर पुरुषांना असं करताना पाहिलं होतं. बहुतेक स्त्रिया मागे वळून एक जळजळीत कटाक्ष टाकायच्या. पण त्याला ते कधी करवलं नाही. त्याच्या मनाचा अडसर होताच. शिवाय एखादीनं चारचौघात तमाशा केला तर काय घ्या ही भीतीही. व्यावसायिक आयुष्यात तसा त्याचा अनेक जणींशी संबंध यायचा. मुख्यतः त्याच्या ऑफिसात काम करणाऱ्या. त्यांच्या पैकी कुणाशीच जवळीक साधणं त्याला कधी जमलं नव्हतं. त्या बिनधास्तपणे त्याच्याशी चेष्टामस्करी करायच्या. थोडासा चावटपणासुद्धा. पण तो जाणून होता की त्यांच्या अशा वागण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्याला निरुपद्रवी असं लेबल चिकटवलं होतं. तो त्यांच्याभोवती कसकसली दिवास्वप्नं गुंफतो हे जर त्यांनी त्याच्या मनात डोकावून पाहिलं असतं, तर त्या त्याच्या जवळपास फिरकल्या नसत्या, या विचारानं त्याची करमणूक होई.
 त्याचे विवाहित मित्र जेव्हा त्याला म्हणायचे, "नशीबवान आहेस लेका तु. सापळ्यातनं सुटलास." तेव्हा आपण खरोखरच नशीबवान असल्यासारखं तो स्मितहास्य करी. पण वस्तुस्थिती अशी होती, की त्याचं अविवाहित राहणं हे त्याच्या नियंत्रणापलीकडच्या परिस्थितीने घडवून आणलं होतं. त्याचे आई-वडील तो शाळेत असतानाच वारले होते. त्यानंतर त्याला पाळलं पोसलं ते एका लांबच्या काका-काकूंनी, केवळ आपद्ध़र्म म्हणून. तसं त्यांनी त्याचा छळ केला किंवा त्याला अर्धपोटी ठेवलं असं नाही. त्याचा चांगला सांभाळ केला. पण तो मोठा झाल्यावर त्याच्यासाठी मुली बघून त्याचं लग्न करून देण्यापर्यंत आपलं त्याच्याविषयीचं कर्तव्य आहे असं त्यांनी मानलं नाही. आता आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर जवळजवळ चाळिशीला पोहोचल्यावर कदाचित लग्नाचं जमलंही असतं; पण त्यासाठी खटपट करणं, चार ठिकाणी शब्द टाकणं, मुली बघणं हे त्याच्यानं झालं नसतं. आता एकटं राहण्याची सवय इतकी अंगवळणी पडली होती. की एका सर्वस्वी अनोळखी व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनाची भागीदार करून घ्यायच्या कल्पनेची त्याला धास्ती वाटत होती.
 तो विचारात एवढा गढला होता, की ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा तो गोंधळला. खरं म्हणजे ती जागची उठलेली त्यानं पाहिली होती. पण ती आपल्या दिशेने येतेय याची जाणीव त्याला झाली नव्हती. तो तिच्याकडे पाहून किंचितसा हसला. 'हॅलो' म्हणून तिनं ओठ विलग केले, पण ते हसल्यासारखं दिसलंच नाही. ती परदेशी गोऱ्या कातडीची बाई आहे हे पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलं. तिच्या चेहऱ्याची त्वचा इतकी कोरडी दिसत होती, की तिला बोट लावलं तर तडा जाईल असं वाटत होतं. तिच्या मूळच्या लालसर आता धूळकटलेल्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्याभोवती विखुरल्या होत्या. तिचे डोळे हिरवे होते. नितळ हिरवे. पण नेहमी हिरव्या डोळ्यात जी चमक असते ती त्यात नव्हती. ते तेजहीन, भावहीन होते.
 ती उठलेली त्यानं पाहिली. ती त्याच्या दगडावर, त्याच्या शेजारी बसली तेव्हा त्याचं हृदय एकदम धडधडलं. बसमध्ये वगैरे सोडून एखाद्या अनोळखी बाईनं येऊन शेजारी बसणं हा त्याला नवा अनुभव होता. तिनं आपल्या सुकलेल्या, चिरकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि ती म्हणाली, "तुम्ही मला मदत कराल का?'
 ती अगदी हळू, कुजबुजल्यासारखं बोलत होती, दोन हातांवरही कुणाला ऐकू येऊ नये असं.
 तो म्हणाला, "कसली मदत?"
 "मला थोडे पैसे हवे होते. उसने. माझे पैसे चोरीला गेले."
 ती अजून तशीच क्षीण आवाजात बोलत होती. त्याच्या लक्षात आलं, की तिची बोलण्याची पद्धत तशी होती, असं नसून तिचा आवाज फुटतच नव्हता. ती दिसतही होती अशक्तपणामुळे ग्लानी आल्यासारखी.
 त्यानं विचारलं, "माझ्याबरोबर येतेस का? इथे पैसे नाहीत माझ्याकडे, हॉटेलमध्ये ठेवलेत."
 ती उभी राहिल्याबरोबर तिचा झोक जायला लागला. त्यानं तिला सावरलं. आणि त्याची टॅक्सी उभी होती तिकडं नेलं. त्याने उघड्या धरलेल्या दारातून ती काही न बोलता टॅक्सीत चढली. त्याच्यामागे बेदरकारपणा होता की ती कसला विचार करण्याच्या पलीकडे गेली होती ते त्याला कळलं नाही.
 हॉटेलच्या लॉबीतून तिला नेताना त्याला वाटतं होतं, की मॅनेजर काही आक्षेप घेईल. पण त्याने खोलीची किल्ली दिली नि तो पुन्हा जाडजूड वहीत नाक खुपसून बसला. खोलीत गेल्यावर त्याने तिला विचारलं, "तुला भूक लागलीय?" तिनं मानेनं हो म्हटलं. त्यानं कॉफी, उपमा मागवला. ट्रे आल्यावर त्यानं कॉफी ओतली ती तिनं घटाघट पिऊन टाकली. उमपा मात्र सावकाश, गिळायला कष्ट होत असल्यासारखी खात होती. तो त्याच्या कॉफीचे घोट घेत एका हाताने माशा मारीत तिच्याकडे पाहात होता. तिच्या जबड्याच्या स्नायूची नाजूक हालचाल होत होती आणि चेहऱ्याच्या कातडीखालचं निळसर रक्तवाहिन्यांचं जाळं अस्पष्ट दिसत होतं. हडकुळे हात, गलिच्छ नखं, फिकट ओठ, मळलेला लुंगी- कुडता, या सगळ्यामुळेच त्याला तिच्याशी जवळीक वाटली. चकचकीत, सुळसुळीत अशा बायकांना तो बिचकायचा.
 तिनं उपमा खाऊन झाल्यावर आणखी एक कप कॉफी घेतली आणि खाली वाकून लुंगीला तोंड पुसलं. मग वर बघून ती त्याच्याकडे पाहन हसली. तिचे दात खूप लहान होते आणि हसताना तिच्या हिरड्या दिसत होत्या पण यावेळी तिच्या हसण्यात जरा जास्त जीव होता आणि ते हसणं तिच्या डोळ्यांतही उमटलं. त्याला वाटलं, तशी छान आहे ही दिसायला.
तो म्हणाला, "आता सांग तुझे पैसे कसे चोरीला गेले ते."
  "मी झोपले होते तेव्हा माझ्या बॅगेतनं गेले."
 "पोलिसांकडे तक्रार वगैरे केलीस का?"
 "त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण मी एका धर्मशाळेत राहिले होते. सकाळी पैसे गेल्याचं समजलं तेव्हा तिथं दुसरं कुणीच नव्हतं."
 "तू धर्मशाळेत राहिली होतीस?"
 "त्याला काय झालं?"
 "धर्मशाळा कसल्या घाणेरड्या असतात."
  तिनं खांदे उडवले. "मला नाही त्याचं एवढं काही वाटत."
 "तू अमेरिकन आहेस ना? तुझ्या देशात तर सगळं स्वच्छ, चकाचक असतं. मग तू असं कसं म्हणतेस?"
 "आम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टींचं अवडंबर माजवतो."
 "स्वच्छता चुकीची आहे?"
 "तसं नाही. स्वच्छता ठीक आहे, पण एक मर्यादेपर्यंत. त्याच कर्मकांड करून ठेवलं, की तुम्ही तुमचं सगळं लक्ष त्याच्याकडेच देता. इतर महान गोष्टींकडे लक्ष द्यायला मग तुम्हाला फुरसत होत नाही."
 त्याच्या मनात आलं, कदाचित हिची आई स्वच्छतेच्या नादापायी आपली आबाळ करते असं हिला वाटलं असेल. पण तो तसं काही म्हणाला नाही फक्त जरा पडेलपणे म्हणाला, "मी याबद्दल अशा तऱ्हेनं विचार केलाच नव्हता."
 ती तीव्रतेने म्हणाली "तेच तर चुकतं. बहुतेक लोक विचार करत नाहीत. एखादी गोष्ट परंपरेनं चालत आलीय ना, मग ती योग्यच असली पाहिजे, असं म्हणून तशीच करीत राहतात मग स्वच्छ, शिक्षित, श्रीमंत सगळ बनण्याची धडपड करता करता त्यांची दमछाक होते. नि मग चांगल माणूस म्हणून समाधानाने जगायला ते विसरतात."
 त्याला तिची गंमत वाटली. एखाद्या शाळकरी मुलाच्या निबंधासारखं ती बोलत होती. पण तरी जीव तोडून बोलत होती. कुठेतरी स्वत:च्या आयुष्यात अनुभवलेल्या वेदनेचा निचरा करीत होती. त्याच्या मनात आलं, मी कशा तऱ्हेचा माणूस आहे असं हिला वाटतं? पण तिच्या विचारांत त्याला थाराच नव्हता.
 तो म्हणाला, "तुझे सगळेच पैसे गेले?"
 "हो."
  "तू एकटीच प्रवास करत्येयस?"
 "मी एका ग्रुपबरोबर इथे आले. काही दिवस आम्ही एकत्र हिंडलोफिरलो, पण शेवटी ज्याने त्याने आपल्या मार्गानं जायचं ठरवलं. पण त्यांच्याकडून मला मदत मिळाली नसतीच. तुमच्याकडे मागायला खरं म्हणजे लाज वाटते मला. मी कोण, कुठली? माझ्यावर का म्हणून विश्वास टाकावा तुम्ही? पण मी नक्की पैसे परत करीन तुमचे. मी वडिलांना लिहिलंय, पण त्यांनी पाठवलेले पैसे यायला वेळ लागेल. ते आले, की लगेच मी परत करीन तुमचे. मला तुमचा पत्ता तेवढा द्या."
 डोकं न उचलता तिनं नुसते डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या लांब सरळ पापण्या जवळजवळ तिच्या भुवयांना टेकल्या. त्याला थोडसं हसू आलं कारण तिचा चेहरा लहान मुलासारखा पारदर्शी होता. त्यातून तिचा खोटेपणा लपू शकत नव्हता. तिचे पैसे खरंच चोरीला गेलेही असतील. तिच्यासारखी माणसं पैसे, सुरक्षितता याबद्दल पूर्णपणे बेफिकीर असू शकतात. पण तिचे वडील तिला पैसे पाठवणार आणि ती ते परत करणार यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
 "मी तुला फारसे पैसे देऊ शकणार नाही."
 "जेवढे देता येतील तेवढे द्या. मला अगदी थोडे पैसे खूप दिवस पुरतात."
 "धर्मशाळांत राहून आणि उपास काढून?"
 ती नुसतीच हसली. त्यानं कोटाच्या आतल्या खिशातून पैशाचं पाकीट काढलं. त्याचा खोटेपणा तिच्या लक्षात आला असलाच पाहिजे. त्यानं विचार केला, माझ्या जे मनात आहे, ते करायला ही एवढीच वेळ आहे. तिला पैसे देताना तिच्याभोवती सहज सहज म्हणून बाहू लपेटून तिला मिठीत घेतलं तर काय होईल? ती दूर लोटून देईल? मिठीत तिच्या शरीराचा स्पर्श कसा वाटेल? ती खूप काटकुळी होती. कुडत्याखाली तिच्या खांद्याची हाडं उठून दिसत होती. तिचे स्तन इतके किरकोळ होते, की त्यांचा उठाव कपड्यांतून फारसा दिसतही नव्हता. तिला कुठेच काही गोलाई नव्हती आणि तरीसुद्धा तिच्यात स्त्रीत्वाचं आव्हान होतं.
 क्षणभर तो अडखळला. दुसऱ्या क्षणी त्याच्या हातातले पैसे जणू जादूने तिच्या हातात गेले. ती ते घेऊन उभी राहिली होती, त्याचे आभार मानीत होती आणि खोलीबाहेर जात होती. आणि हे सगळं होईपर्यंत तो जागच्या जागी खिळल्यासारखा उभा होता.
 तो स्वत:शी जरा खिन्नपणे हसला. जाऊ दे. असं करणं मला जमलं नसतं, पचलं नसतं. मग हातची संधी घालवली म्हणून चुटपुट लावून कशाला घ्यायची?
 संध्याकाळी तो पुन्हा एकदा जुन्या शहराच्या अवशेषांत हिंडायला गेला. आता त्याला ते जास्त जवळचे वाटले. त्याला वाटलं, कदाचित मी गेल्या जन्मी इथे एखादा सरदार अंमलदार असतो आणि ती माझ्या मनात भरली असती तर तिला माझ्याकडे घेऊन यायला मी माझ्या सेवकांना फर्मावलं असतं.
 ती दिसेल असा विचारही त्याला शिवला नव्हता.
 तेव्हा ती दिसल्यावर तो एकदम दचकला. तिला आपण दिसू नये म्हणून चटकन दोन पावलं मागे सरून तो एका खांबाच्या आडोशाने उभा राहिला. तिच्या शेजारी एक पुरुष झोपला होता. ती त्याला चमच्याने काही तरी भरवीत होती. तो खूपच आजारी दिसत होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि डोळे खोल गेले होते. त्यांच्याजवळ त्यांच तुटपुंजं सामान पडलं होतं म्हणजे त्यांनी इथेच मुक्काम केलेला दिसत होता. तिचं त्या पुरुषावर लक्ष इतकं केंद्रित झालं होतं, की ती आजुबाजूच जग विसरली होती. एकदा त्याला वाटलं, की पुढे होऊन त्यांची चौकशी करावी, पण कुठे त्या लफड्यात पडा म्हणून त्याने काढता पाय घेतला.
 हॉटेलात परत आल्यावरसद्धा तो त्यांच्याबद्दल विचार करीत होता. का ही तरुण मुलं असं करतात? चांगलं घरदार, सुखसोयी, सुबत्ता सोडून ती गरिबी, आजार, घाण यांच्याशी मुकाबला करायला या देशात कशाला येतात? काय मिळतं त्यांना त्यातून? चित्तशुद्धी? आत्मिक समाधान? ते शरीराला क्लेश देऊनच मिळतं का? एकपुती रडे न् सातपुडी रडे असलाच मामला होता. त्याला कुणी अमेरिकेत नोकरी देऊ केली असती, तर तो एका पायावर गेला असता आणि त्यांचं तिथल्या आयुष्यात राम वाटत नाही म्हणून इथे येणं हाही एक प्रकारचा भोंदूपणा असतो. खरं दैन्य त्यांनी अनुभवलेलं नसतं म्हणूनच ते असलं साहस करायला तयार होतात त्यांना पुरेपुर माहिती असतं, की ज्याच्याकडे आपण पाठ फिरवली ते तिथंच आहे आणि ज्या क्षणी आपण परत जाऊ त्या क्षणी आपण पुन्हा त्याचा अंश बनू शकतो.
तरीही त्याला त्या मुलीचा राग आला नाही. तिनं आपला बकरा बनवला याबद्दल त्याच्या मनात काही कडवटपणा नव्हता आणि एकूण झालं ते बरंच झालं, असं त्याला वाटलं. तिनं त्याला झिडकारलं असतं, तर तो अपमान तो सहन करू शकला नसता आणि समजा स्वीकारलं असतं तर? हा प्रश्न अनुत्तरित राहिला तेच बरं झालं.
 रात्री त्यानं हॉटेलचं बिल भरलं. पेटी भरून ठेवली. गदमदत होतं म्हणून पंखा लावला. चला, उद्या घरी, तो जरा अनुत्साहानेच स्वत:शी म्हणाला. पण त्याला झोप येईना. त्याचे विचार थांबेनात. आता माझ्या तरी आयुष्यात असा काय मोठा अर्थ आहे? पण म्हणून मी काही हे सगळं सोडून दुसरीकडे कुठे धाव घेत नाही. की मला तेवढी हिम्मत नाही म्हणून मी आपला आहे त्याला चिकटून बसतो? पण हिम्मत असली, तरी मला जे हवं ते दुसरीकडे तरी गवसेलच याची हमी काय? प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलंय ते आयुष्य प्रामाणिकपणे जगावं. त्यातच शहाणपणा आहे.
 सकाळी दारावर टकटक झाली तेव्हा तो दचकून उठला. दार उघडलं तो कालची मुलगी समोर उभी. ती चटकन खोलीत शिरली. त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. हे सगळे लोक असलेच. बांडगुळं नुसती. आता काही झालं तरा मी तिला एक पैसाही देणार नाही. तिचा मित्र मरत असला तरी.
 "कशाला आलीस आता?"
 "मी काल तुमच्याशी खोटं बोलले त्याबद्दल तुमची माफी मागायला. पैसे चोरीला गेले हे खरं. पण माझे वडील काही मला पैसे पाठवणार नाहीत. जरी मी मागितले तरी आणि मी मागणारच नाही. तेव्हा मी तुमचे पैसे परत करू शकणार नाही."
 "ते मी पैसे दिले तेव्हा मला माहीत होतं." तो कोरड्या स्वरात म्हणाला, "मी पत्ता दिला नाही यावरून ते तुला कळायला हवं होतं."
 "खरंच की," ती वरमून म्हणाली. हे खरंच तिच्या डोक्यात आलं नव्हतं?
 "मग आणखी कशाकरता? पुन्हा पैसे मागायला?"
 "नाही." थोडं थांबून ती म्हणाली, "मला कुणाकडून काही फुकट घ्यायला आवडत नाही."
 "मग?"
 "मी कालच थांबले असते पण मला जायची घाई होती."
 "तू काय म्हणत्येयस मला काही समजत नाही."
 त्याच्या डोळ्याला डोळा देत ती म्हणाली, "तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात काय हवं ते मला कळलं होतं."
 त्याला एकदम हसू आलं. हे एखाद्या फार्सिकल नाटकातल्या सेटसारखं झालं. दुय्यम दर्जाच्या हॉटेलची खोली, शंभर रुपयांच्या बदल्यात आत्मसमर्पण करायला आलेली ती आणि तो. तो काय? वखवखलेला? असं खरंच तिला त्याच्या डोळ्यांत दिसलं होतं? त्याचं हसू मावळलं. त्यानं तिला पाठीवर थोपटलं आणि तो म्हणाला. "तुझा काही तरी गैरसमज झालाय. जा आता, सुखानं जा, मलाही निघायला पाहिजे. माझी गाडीची वेळ होत आलीय."


स्रग्धरा नोव्हेंबर १९९९