Jump to content

कमळाची पानं/अनुरूप

विकिस्रोत कडून

अनुरूप


सहचराच्या निवडीसाठी तसं म्हटलं तर
असंख्य पर्याय उपलब्ध असायला हवेत, पण
प्रत्यक्षात त्यांची संख्या फार मर्यादित होते.

अनुजाला, उदाहरणार्थ, तीनच पर्याय होते.
एक म्हणजे लग्न न करणं. तिला लग्न
करावंसंच न वाटण्याजोगं काही कारण
नव्हतं. दुसरा म्हणजे मामाने आणलेल्या
स्थळाला मुकाट स्वीकारणे, कारण बाप किंवा
इस्टेट नसल्यामुळे तिची बाजू लंगडी होती.
पण हा पर्याय तिला स्वीकारार्ह वाटत
नव्हता. तिच्या अपेक्षा माफक होत्या,
पण मामानं आणलेलं दुसरं स्थळ सुद्धा
त्या पुऱ्या करणार नाही अशी तिची खात्री
झाली होती. तसा तो माणूस
दिसायबिसायला बरा होता, शिकलेला होता,
कायम नसली तरी नोकरी होती. त्याच्या
बरोबर त्याचे दोन मित्र आले होते तेच
काहीबाही बोलत होते, प्रश्न विचारीत
होते.तो खाली बघत होता पण ते
बुजरेपणापोटी नव्हतं हे मधून एकदम तो वर
बघून थेट तिच्या नजरेला नजर द्यायचा
त्यावरून तिला कळलं होतं. त्याच्या त्या
बघण्यात तिला काही तरी खुपलं होतं.
आधी मुळात त्याचे आई-वडील-चुलते बघून गेल्यावर त्याला तिला बघायला यायचंच असलं तर एकट्याने येऊन तिच्याशी बोलायला हवं होतं. मित्रांना घेऊन येऊन त्यांच्या आड लपायचं काही कारण नव्हतं.
 तिची आई म्हणाली, "काहीतरी खुसपटं काढू नको. मला तर मुलगा बरा वाटला."
 "मला नाही आवडला."
 "हात टेकले बाई तुझ्यापुढे. आता दोन स्थळं नाकारल्यावर भाऊ आणखी स्थळं तरी आणणाराय का?"
 "नकोच आहेत आणायला."
 "का? जन्मभर कुंवारीच राहाणार आहेस?"
 "आई मी रणजितशी लग्न करणार आहे."
 आई एकदम ओरडली, "काय म्हणालीस? शुद्धीवर आहेस का? त्याची जात काय, आपली जात काय, तो कशाला तुझ्याशी लग्न करील?"
 तिला हसू आलं, “आई, त्यानं मला विचारलंय. मी काही आपल्या मनानं ठरवलं नाही त्याच्याशी लग्न करायचं."
 तिनं नव्यानंच मिळालेला पर्याय तडकाफडकी स्वीकारायचं ठरवलं.
 रणजित नि तिची गाठ अपघाताने पडली. बाकी सगळी हार्डवेअरची दुकानं बंद असताना चारी काढायला बोलावलेले गडी अवचित हजर झाल्यामुळे त्याला तातडीने काही जादा सामानाची गरज लागली तेव्हा कुणीतरी त्याला ह्या दुकानाबद्दल सांगितलं. काउंटरवर तिला बघून तो म्हणाला, "दुसरं कोणी नाहीये का?"
 "दुसरं कोण?"
 "म्हणजे वडील वगैरे."
 "दुकान मीच चालवते. काय हवंय सांगा ना." ती हसली.
 "मदतीला कुणी नाही?"
 "आहे ना गडी. मागल्या बाजूला सामान ठेवायला गेलाय. येईल आत्ता"
 शेवटी गडी यायच्या आतच त्यानं घमेली, खोरी, टिकाव पहार असं काय काय निवडलं. गडी आला, त्याने वजन करून दिलं. बिल देऊन तो बाहेर पडताना तिनं सांगितलं, "पुन्हा काही लागलं तर येत जा आमच्या दुकानात."
 तो म्हणाला, "कधीपासून इथे दुकान आहे तुमचं?"
 "झाली पाच-सहा वर्षं."
 "मी कधी पाह्यलंच नव्हतं."
 ती नुसतीच हसली. त्याला तिचं हसणं एकदम आवडलं. काही हातचं न राखता तोंड भरून ती हसायची. इतर मुली कशा ओठ जेमतेम विलग करून किंवा त्यांना जराशी मुरड घालून अर्धवट हसतात. आणि त्याच वेळी डोळ्यांच्या कोपऱ्यांतून तुमच्याकडे पाहात असतात, त्यांच्या हसण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो ते जोखत. तसं हिचं नव्हतं. ती हसायची म्हणजे हसायची. तिला हसावंसं वाटतं म्हणून. तुमच्याकडे बघून हसावंसं वाटतं म्हणून. त्याच्या बदल्यात तुमच्याकडून अपेक्षा फक्त तसल्याच एका मोकळ्या स्मिताची. ती तुमच्या डोळ्यांत कौतुक, अभिलाषा असं काही शोधत नसे. अर्थात हार्डवेअर स्टोअरच्या काउंटरमागे उभे राहून असले नखरे शक्यच नव्हते, पण तरी त्याला तिचं अप्रूप वाटलं. कॉलेजच्या दिवसांत त्याला भेटायच्या त्या मुलींपेक्षा वेगळंच पाणी होतं हे.
 अनुजाच्या वडिलांचं लोहारकामाचं वर्कशॉप होतं. त्यांच्या बापाची आणि आज्याची कुशल कारागीर म्हणून ख्याती होती. संस्थानच्या दिवसांत घोड्यांना नाल मारायची त्यांची खासियत होती. पंचक्रोशीतून बैलगाडीच्या धावा बसवायला, शेतीची हत्यारं बनवायला, शेवटायला शेतकरी त्यांच्याकडे येत. अनुजाच्या वडिलांनी तर काम खूप वाढलं म्हणून एक वर्कशॉपच थाटलं, चार-पाच कामगार ठेवले. सगळं उत्तम चाललेलं असताना एकाएकी त्यांना हार्ट अटॅक आला आणि चालत्या गाड्याला खीळ बसायची पाळी आली. आजारात खर्च खूप झाला, डोक्यावर कर्ज झालं. अनुजा कामगारांच्या मदतीने जिद्दीने काम चालवीत होती. संसाराला तेवढाच आधार होता. वडील घरी आल्यावर त्यांना पूर्वीसारखं काम झेपणार नव्हतं. अनुजा म्हणाली, "बाबा, तुम्ही नुसतं बसून देखरेख करा, मी सगळं बघते." पण त्यांना ते पटत नव्हतं शेवटी बराच विचार करून त्यांनी वर्कशॉप विकलं आणि एक हार्डवेअरचं दुकान टाकलं. त्यात सुद्धा अनुजाच्या मदतीची गरज होतीच. तिला कॉलेज सोडावं लागलं म्हणून त्यांना वाईट वाटत होतं, पण इलाजच नव्हता. मुलगा लहान होता. तो हाताशी येईपर्यंत बरीच वर्षं जायची होती. दुकान चांगलं चालायला लागलं आणि आपली तब्येत जरा सुधारली की तिला परत कॉलेजला पाठवू असं त्यांनी ठरवलं. पण दुकानाचा जम बसून बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागेस्तोवर दुसरा हार्ट अटॅक येऊन ते गेले. आता घरदार सावरायला अनुजा एकटीच होती.
 तिच्याबद्दल आपण पुन्हा पुन्हा विचार करतोय हे रणजितच्या लक्षात आलं. पण का ते त्याला कळेना. तसं तिच्यात काहीच खास नव्हतं. ठेंगणा, किंचित स्थूलपणाकडे झुकणारा बांधा, साधीशी साडी नीटनेटकी नेसलेली, अंगभर ब्लाउज, पाठीवर एक वेणी, रंग नितळ गव्हाळ होता, पण नाकीडोळी विशेष नीटस होती असंही नाही. पण हे थेट तुमच्या डोळ्यांत बघून हसणं मात्र लोभावणारं. आणखी म्हणजे तिच्या डोळ्यांत एक आत्मविश्वासाची, थोडीशी बेडरपणाची चमक होती. ह्या मुलीला आयुष्य सहसा हरवू शकणार नाही असं बघणाऱ्याला वाटावं अशी.
 पावशेर खिळे, नाही तर एक काढणी, बाहेरगावी पाठवायच्या भाजीच्या पोत्यांवर नाव रंगवण्यासाठी रंगाचा छोटा डबा असल्या फुटकळ वस्तू घेण्यासाठी रणजित जेव्हा दुकानात खेटे घालू लागला तेव्हा अनुजा जरा सावध झाली. सुंदर किंवा त्याहीपेक्षा स्मार्ट, नखरेल नसल्यामुळे कॉलेजात मुलांनी मारलेल्या शिट्या, अश्लील शेरे, ओळख करून घेण्यासाठी शोधलेले बहाणे असल्या गोष्टींना तिला तोंड द्यावं लागलं नव्हतं. इतर मुली अर्धवट रोषाने अर्धवट कौतुकाने असा काही अनुभव सांगायच्या तेव्हा ती धरून चालायची की ती असले अनुभव येणाऱ्यांतली नव्हती. त्याबद्दल तिला खंतही नव्हती. कॉलेजात मुलांबद्दल ती फारसा विचारही करीत नसे. भविष्याविषयी विचार करताना अभ्यास, चांगले मार्क, बी.ए., कदाचित पुढे बी.एड. आणि शिक्षिकेची नोकरी इथपर्यंत तिची मजल जायची. क्वचित लग्न-संसार ह्यांबद्दल तिच्या मनात विचार येत. आपला नवरा होणारा पुरुष कसा असेल किंवा कसा असावा ह्याची फारशी स्पष्ट कल्पना तिला नव्हती. तरी पण आपल्या आई-वडिलांचं आहे त्यापेक्षा त्याचं आपलं नातं वेगळं, जास्त जवळचं, जास्त मैत्रीचं असावं असं तिला वाटे. त्या दोघांत फारसा संवाद नव्हता. त्यातून कधी कधी तिचे वडील दारू प्यायचे, आईशी भांडायचे, क्वचित मारायचे सुद्धा. नवऱ्यानं बायकोशी असंच वागायचं असतं आणि तिनं ते मुकाट सहन करून घ्यायचं असतं हे ती स्वीकारू शकत नव्हती.
 रणजित दुकानात यायचा, काही बाही खरेदी करायचा, चार गप्पा मारायचा इथपर्यंत तिला आक्षेप घ्यायला काही जागा नव्हती. पण एक दिवस ती दुकान बंद करून घरी जायला निघाली तर तो कोपऱ्यावर उभा होता. चल, तुला घरी सोडतो म्हणाला. ती म्हणाली नको, जवळ तर आहे, मी रोज जातेच का चालत. मग तो मोटारसायकल तिथेच सोडून तिच्या बरोबर निघाला. तिचा जीव कानकोंडा झाला कुणी बघेल म्हणून. तो बोलत होता, तिला काही विचारीत होता, पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच लागेना. नजर भिरभिरत होती ओळखीचं कुणी दिसतंय का म्हणून. शेवटी ती म्हणाली, जा आता तुम्ही, आमचं घर जवळच आहे. तो म्हणाला, तू इतकी घाबरतेस का? कोण काय म्हणणार आहे? ती म्हणाली, तुमची गोष्ट वेगळी आहे. मला समाजाची, कोण काय म्हणेल ह्याची काळजी करावी लागते.
 हे नियमित व्हायला लागल्यावर मात्र ती विचार करायला लागली. ह्याला माझ्याकडून काय पाहिजे आहे? तिची मैत्रीण शिल्पा म्हणाली, "अशा माणसाला दुसरं काय पाहिजे असतं?"
 "नाही ग, तो तसा वाटत नाही."
 "अनू, भोळेपणा तरी किती करशील? गावात चार माणसं त्याच्याबद्दल काय बोलतात ते ऐक जरा. कॉलेजात असल्यापासून पोरींना फिरवायची सवयच आहे त्याची."
 "तसं काय ग, एखादा जरा मोकळ्या स्वभावाचा असला, एखाद्या मुलीशी नुसता बोलला तरी त्याच्याबद्दल वावड्या उठतात. माझ्याशी त्याचं वागणं आहे त्यात तक्रारीला कुठेच जागा नाही. कधी त्यानं मुद्दाम सलगी करायचा प्रयत्न केला नाही की चुकून झाला असं दाखवून स्पर्श केला नाही. मी घरापासून पुष्कळ अंतरावर त्याला माघारी फिरायला लावते तर तो मुकाट जातो."
 "पण मग हवंय काय त्याला? नुसती तुझी कंपनी?"
 ह्या प्रश्नाचं उत्तर तिला लवकरच मिळालं. तो म्हणाला, "रविवारी दुकान बंद असतं तेव्हा संध्याकाळी हरणाच्या माळावर भेटशील का?"
 तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि काहीच न बोलता खाली मान घालून चालत राहिली.
 "काय? भेटशील?"
 "कशाला?"
 "काही बोलायचंय तुझ्याशी."
 "तिच्या तोंडावर आलं होतं, मग आत्ता बोला की, पण तोच पुन्हा म्हणाला, 'आपण किती थोडा वेळ भेटतो, तेवढ्यात बोलता येणार नाही. प्लीज."
 "ठीक आहे."
 त्या दिवशी ती बाहेर पडली शिल्पाकडे जाते म्हणून.
 आई म्हणाली, "आज काय विशेष?"
 "विशेष काही नाही, कॉलेज सोडल्यापासून ती फारशी भेटतच नाही ना, म्हणून अधूनमधून जायचं गप्पा मारायला."
 आईने तिच्याकडे जरा रोखूनच पाहिलं पण ती न थांबता सायकल काढून गेली तशीच. इतके दिवस रणजित आपल्याला भेटतो हे काही ना काही स्वरूपात आईच्या कानावर गेलंच असलं पाहिजे. लहान गावात काही लपून राहू शकत नाही. नाही तरी तिला लपवाछपवी करायची घृणा होती. तेव्हा असं भेटत राहणं बास असं तिनं त्याला सांगायचं ठरवलं होतं. तो तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं काही सांगणार ह्याची तिला कल्पना आली होता. त्याशिवाय मुद्दाम असं भेटायला बोलावण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. तो असं म्हणाला तर आपली प्रतिक्रिया काय असावी ह्याचाही तिनं खूप विचार केला. आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिला त्याच्याबद्दल काहीतरी आकर्षण वाटत होतं.
 तरीसुद्धा त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे ती ठरवू शकली नाही. शिवाय प्रेमाबिमाचं बोलला तरी पुढे काय? प्रेमाची परिणती दुसऱ्या कशात व्हायची असते? पण त्या वाटेवर इतके अडथळे होते की ती त्याचा विचारच करु शकत नव्हती. शेवटी ह्या नात्यात काही भविष्य नाही, ते इथेच तोडून टाकलेलं बरं असं त्याला सांगायचं तिनं ठरवलं. आणि मग त्यानं एकदमच तिला "तू माझ्याशी लग्न करशील का?" असं विचारलं तेव्हा ती स्तब्ध झाली.
 "काही बोलत का नाहीस? तुला आवडलं नाही का मी असं विचारण?
 "तसं नाही."
 "मग बोल की. तुझं उत्तर 'नाही' असलं तरी सांग."
 "तसं नाही." आपण पुन्हा तेच बोललो असं जाणवून ती जराशी हसला "तुम्ही एकदमच बाँब टाकला. मला विचार करायला वेळ द्या. तुम्ही तरी पुरेसा विचार केलात का?"
 "अनुजा, मी पुष्कळ विचार केलाय. मला तू फार आवडतेस. तुझं दिसण, बोलणं, वागणं सगळंच मला आवडतं. मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते दुसच्या कुणाबद्दल कधी वाटलेलं नाही."
 त्यानं तिला प्रथमच नावाने हाक मारल्याने तिच्या अंगावर रोमांच उठले. तो जे म्हणत होता त्याने ती सुखावली होती. तरी ती म्हणाली, "तेवढं पुरे आहे का लग्न करायला? तुम्ही घरच्यांशी बोलला का? ते माझ्यासारखी खालच्या जातीची मुलगी सून म्हणून स्वीकारतील का?"
 "मला कल्पना आहे त्यांचा विरोध होईल म्हणून, पण माझा निश्चय आहे म्हटल्यावर त्यांना स्वीकारावंच लागेल."
 "तुम्ही आधी त्यांच्याशी बोला, मग आपण ठरवू काय ते."
 "बोलेन ग आता. पण तुझी पसंती विचारायच्या आधीच कसं बोलणार? मग तुला मान्य आहे असं धरायचं ना?"
 "हो."
 "मग मी तुला एक सांगतो त्यांची संमती मिळो न मिळो, माझा विचार पक्का आहे."
 "मलाही आईला विचारावं लागेल."
 "ती नाही म्हणाली तर?"
 "तरी काही फरक पडणार नाही. पण मलाच विचार करायला वेळ द्या."
 शिल्पा म्हणाली, "चक्क त्यानं तुला लग्नाबद्दल विचारलं?"
 "मग काय सांगतेय?"
 "विश्वास बसायला कठीण जातंय. तर तू काय ठरवलंस?"
 "तुला काय वाटतं?"
 "प्रश्न माझ्या वाटण्याचा नाही, तुझ्या वाटण्याचा आहे."
 "सगळं फार कठीण जाणार आहे हे दिसतंच आहे. पण आणलेल्या कुणाशीही लग्न केलं तरी बाईपढे समस्या असतातच. मग कुणीतरी आणलेल्या ओळखदेख नसलेल्या स्थळाशी लग्न करण्यापेक्षा हे काय वाईट आहे?"
 अनुजाच्या आईने, एकदा पहिला धक्का पचवल्यावर मग फारसा विरोध केला नाही. तिला दोनच शंका होत्या. एक म्हणजे त्याच्या घरचे तिला कसं वागवतील ही. आणि दुसरी म्हणजे खर्चाबद्दल. त्यांच्या ऐपतीप्रमाणे खर्च करायला, हुंडा द्यायला आपल्याला कसं जमेल?
 "आई तू त्याची काळजी करू नको. रणजित म्हणाले ते तुला खर्चात पाडणार नाहीत."
 "बघ बाई, पुष्कळजण आधी असं म्हणतात, मग आयत्या वेळी मागण्या करायला लागतात आईबापांच्या मागे लपून."
 "तसं केलं तर मी शेवटच्या क्षणी सुद्धा लग्न मोडू शकते."
 "असं तू आत्ता म्हणतेयस."
 अनुजा हसायला लागली. "तुझा माझ्यावर एवढा विश्वास नाही? आई, खिंडीत गाठून अडवणूक करणाऱ्याशी मी लग्न करणार नाही."
 अनुजाच्या आईची संमती मिळाली, पण रणजितला मात्र धक्का बसला. दादा आणि वहिनी थोडाफार विरोध करणारच हे तो धरूनच चालला होता, पण शेवटी ते त्याच्या मनासारखं करतील अशी त्याला खात्री होती. आईवडिलांच्या मागे लाडाकोडाने वाढवलेला धाकटा भाऊ, त्याला कशालाच कुणी नाही म्हणालं नव्हतं. पण आता मात्र तो मर्यादा सोडीत होता. दादांनी त्याला निक्षूनच सांगितलं, ह्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकणार नाही. हिच्याशी लग्न करायचं तर तुझं तू बघ. आम्ही लग्न करून देणार नाही. त्यानं परोपरीने सांगितलं, "तुम्ही तिला एकदा भेटा तरी."
 "कशाला? जिच्याशी काही संबंध ठेवायचा नाही तिला भेटायचं कशाला?"
 रणजितला स्वत:च्या मर्जीनुसार आयुष्य जगायची इतकी सवय झाली होती की आपल्या निर्णयाला इतक्या अटीतटीने विरोध होईल ह्याची कल्पना आली नाही. त्याच्या भावाला वाटलं होतं की इतक्या सक्त विरोधानंतर तो बहुधा पड खाईल. पण ह्याउलट रणजित बिथरून आणखीच हट्टाला पेटला. अनुजानं पाहिलं की तो काहीही झालं तरी माघार घेणार नाही असं म्हणत होता तरी तो अस्वस्थ होता.
 ती म्हणाली, "रणजित, घरच्यांच्या मर्जीविरूद्ध केलेलं लग्न निभावून नेता येईल की नाही ह्याची तुम्हाला शंका वाटत असली तर मी समजू शकते." तर तो तिच्यावरच भडकला. "तुला काय वाटतं मी इतका कमकुवत आहे? म्हणजे तुला मी नीट समजलोच नाही म्हण. तुलाच भीती वाटत का?"
 "मला कशाची भीती वाटायची? मी तुम्हाला कशाही परिस्थितीत साथ द्यायला तयार आहे."
 "झालं तर मग."
 लग्न रजिस्ट्रारच्या कचेरीत झालं. देणं नाही, घेणं नाही, धार्मिक विधी नाहीत, जेवणावळी नाहीत. एकमेकांच्या गळ्यात हार घालून रजिस्टर सह्या. वहिनीने गपचूप कुणाच्या हाती पाठवून दिलेले मंगळसूत्र त्यानं तिच्या गळ्यात बांधले. सोहळ्यासाठी हजर होते फक्त तिचे आई-भाऊ, शिल्पा, रणजितचे दोन मित्र. अनुजाला हे सगळं आवडून गेलं. तिच्या मनात आलं, सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं असतं तर असं छान आटोपशीर झालं नसतं.
  भाड्याच्या छोट्याशा घरात त्यांनी संसार थाटला. अनुजाला वाटलं हे किती छान झालं. तसं पाहिलं तर त्याच्या दादांनी उपकारच केले म्हणायचे. त्यांच्या घरात नांदायचं म्हणजे माझी काय गत झाली असती कुणास ठाऊक. इथे आमचे आम्ही मुख्यत्यार आहोत. पण हे ती रणजितला म्हणाली नाही. कुठेतरी तिला वाटत होतं की त्याला ते आवडणार नाही. तो धरून चालला होता की आज ना उद्या दादा-वहिनी हे लग्न स्वीकारतील आणि मग आपण परत घरी जाऊ. अनुजाला तसं वाटत नव्हतं कारण प्रश्न फक्त त्यानं त्यांच्या इच्छेविरूद्ध लग्न केलं ह्याचा नव्हता. पण ह्या विषयावर स्पष्ट बोलणं शक्य नव्हतं. त्याचं कुटुंब हा त्या दोघांच्या नात्यातला दुखरा कोपरा राहाणार होता."
 एक दिवस तिनं विचारलं, "मी पुन्हा कॉलेजात जाऊ का?"
 "कशाला?"
 "बाबा आजारी पडले तेव्हा कॉलेज सुटलं ते सुटलं. एकच वर्ष राहिलं होतं. तेवढं पुरं केलं तर बी.ए. तरी पदरात पडेल."
 "बी.ए. पदरात घेऊन काय करणार?"
 "अमुकच करणार असं नाही. फक्त डिग्री पुरी केल्याचं समाधान आणि नाही तरी तुम्ही दिवसभर बाहेर असता तेव्हा मला काय उद्योग असतो? मी अभ्यास तरी करीन त्या वेळात."
 "तुला हवं तर कर की. माझं काही म्हणणं नाही."
 "फी-पुस्तकांचा खर्च होईल."
 "त्याची तू काळजी करू नको."
 "सकाळीच तास असतात, तेव्हा घरकामाची आबाळ व्हायची नाही."
 तो हसला. "कर म्हटलं ना, मग एवढं का रामायण रचतेयस? मला आपलं वाटलं पदरात बी.ए. ऐवजी एखादं मूल बरं."
 ती पण हसली. "ह्याऐवजी ते कशाला? दोन्ही होऊ देत की."
 तिच्या मनात होतं कदाचित बी.ए. झाल्यावर पुढे काही शिकता येईल, एखादी नोकरी करता येईल. नुसतं घरकाम, स्वैपाक, मूल ह्यांत काही सबंध आयुष्य घालवायचं नाही.
 एक दिवस कॉलेजात जादा तास होते म्हणून ती दुपारी परत गेली होती. परत यायला जरा उशीर झाला म्हणून ती घाईघाईने स्वैपाकाला लागली. रणजितलाही यायला नेहमीपेक्षा उशीर झाला. तो आला आणि तिच्याकडे न डोकावता सरळ आतल्या खोलीत निघून गेला. नेहमी आला की मागून येऊन तिला कवेत घ्यायचं, तिच्या पोलक्याच्या गळ्याच्या वरच्या उघड्या पाठीचा मुका घायचा, तिच्या ढुंगणावर चापट मारायची, कमीत कमी "अनू, मी आलोय ग," म्हणून आवाज द्यायचा असं काहीतरी केल्याशिवाय तो आत जात नसे. आज काय बिनसलंय म्हणून ती त्याच्या मागोमाग गेली. तो कपडे बदलत होता. त्याच्याजवळ गेल्याबरोबर ती म्हणाली, "तुम्ही दारू पिऊन आलायत."
 तो एकदम उसळून म्हणाला, "हो. चोरी आहे का प्यायची मला?"
 "मी कुठे असं म्हटलं? तुम्हालाच तसं वाटतंय, नाही तर तुम्ही तोंड लपवून का आत आला? आणि मी दारू प्यायलात म्हटल्यावर एकदम चिडलात का?"
 "कारण तुझा स्वर असा होता की मी काही तरी गुन्हा केला."
 ती जरा वेळ काहीच बोलली नाही. तो अधूनमधून दारू पितो हे तिला माहीत होतं, पण अशा तऱ्हेनं इतकी पिऊन तो कधी आला नव्हता. ती शक्य तितक्या शांतपणे म्हणाली, "रणजित. घरातल्या पुरुषाने दारू पिणं मला काही नवीन नाही. माझे बाबा पीत होते. आईला अधूनमधून मारीत पण होते. तुम्ही मला मारणार का? म्हणजे अगदी परंपरागत नवराबायकोचं चित्र पुरं होईल."
 ती परत स्वैपाकघरात गेली. मनात कढावर कढ येत होते पण तिनं ते डोळ्यांवाटे वाहू दिले नाहीत. बाकी कशाहीपेक्षा, आपल्या लग्नाचं तारू ह्या सनातन खडकावर आपटावं ह्याचा तिला फार अपमान वाटत होता. जेवण नि:शब्दच झालं. आवराआवर करून ती गेली तेव्हा तो बिछान्यावर पडला होता. ती काही न बोलता त्याच्या शेजारी पडली तशी त्याने एकदम वळून तिला घट्ट मिठीत घेतलं. म्हणाला, "अनू, मला माफ कर. पुन्हा असं होणार नाही." मग मात्र तिचा बांध फुटला. त्याला बिलगून ती स्कुंदून स्फुंदून रडायला लागली. "मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुम्ही असं केलं तर मी कुणाकडे पहायचं?" रडण्याचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, "आज काही झालं का?"
 "काही नाही. व्हायचंय काय?" तिनं पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा सगळं बाहेर आलं. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतावर गेला तेव्हा तिथल्या मुकादमाने त्याला त्याच्या भावाचा निरोप सांगितला. भावाने त्याला ह्यापुढे शेतीची कामं पहायला, शेतावर यायला सुद्धा बंदी केली होती.
 तो तिरमिरीने भावाकडे गेला. "दादा हा काय प्रकार आहे?"
 "मग, तुला काय वाटलं तू आपल्या घराण्याची अब्रू घालवावीस आणि आम्ही ते मुकाट खपवून घ्यावं?"
 त्याचा माझा शेतावर जाण्याशी काय संबंध येतो? आणि लग्न झाल्यावर इतक दिवस जातच होतो की मी. काय बिघडलं त्यानं? आता एकदमच का तुमचं माथं फिरलं?"
 "मी गावाला गेलो होतो. तुला एवढं बजावल्यावर मला वाटलं तू आपणच सगळा संबंध तोडशील आमच्याशी. पण तू निलाजरा निघालास."
 हा दादा, तोंड सांभाळून बोला. माझी लाज काढायचं कारण नाही. जमीन जशी तुमची आहे तशी माझीही आहे. मला तिथं जायची बंदी करायची असली तर मला माझ्या वाटणीची जमीन द्या."
 "वाटणी? कसली वाटणी?"
 "वडलोपार्जित जमीन आहे. त्यातली निम्मी माझी आहे."
 "अरे जा निम्मीवाला. तुला पाऊल ठेवण्यायेवढा तुकडाही मिळणार नाही."
 "कोर्टात दावा लावीन."
 "लाव, लाव. मला कोर्टाची भीती घालतो? एक मात्र ध्यानात ठेव. कोर्टात गेलास तर आत्ता तुला पैसे देतोय त्यातली फुटकी कवडीसद्धा दिसणार नाही. मग मरशील उपाशी. पैसे पाहिजे असले तर गुमान इथून जा आणि पुन्हा तोंड दाखवायला येऊ नको."
 सगळं ऐकल्यावर ती म्हणाली, "म्हणजे आपला सगळा खर्च त्यांच्या पैशावर चालतोय?"
 "त्यांच्या पैशांवर म्हणू नको. ते पैसे देतात म्हणजे काही उपकार नाही करीत. त्या पैशावर हक्क आहे माझा."
 "हक्क असला तरी देणारे तेच आहेत ना? कशाला जगायचं आपण त्यांनी दिलेल्या पैशावर? आपण काहीही करून स्वत:च पोट भरू शकू."
 "काहीही म्हणजे काय? मी आता नोकरी शोधत हिंडू?"
 "काय हरकत आहे?"
 "काय हरकत आहे ते तुला कळत नसलं तर मी समजावून सांगू शकत नाही."
 "ठीक आहे. मी करीन नोकरी. त्याला तर तुमची हरकत नाही ना?"
 तिनं कॉलेज सोडलं. एका खाजगी संस्थेत तिला कारकुनाची नोकरी मिळाली. अर्धवेळ आणि तुटपुंज्या पण तिचा स्वाभिमान जपण्याइतपत पगाराची. मग तिला एक कल्पना सुचली. त्यांच्या घराला पुढे लहानशी पडवीसारखी जागा होती, तिथे एक दुकान थाटलं. उधारीवर एक बैठं कपाट, वह्या, पेन्सिली, कंपासबॉक्स, बॉलपेनं आणि रिफिल आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळ्या, बिस्किटं असं सामान आणलं. जवळच एक शाळा होती त्यातली मुलं त्यांच्या घरावरून ये-जा करायची. तिला वाटलं रणजितचा वेळ जाईल आणि थोडी कमाईही होईल.
 रणजित म्हणाला, "वेड लागलंय का तुला? मी दुकानच्या गल्ल्यावर बसणार नाही."
 "का? कमीपणा वाटतो त्यात? काम करून पोट भरण्यात कसला कमीपणा? आणि मी दुकानातल्या गल्ल्यावर बसत होते की. मग माझ्याशी लग्न कस केलंत?"
 "तुझी गोष्ट वेगळी होती. तुला दुसरा काही मार्ग नव्हता."
 "मग आत्तातरी कुठे मार्ग आहे. कुणी तरी घातलेल्या भिकेवर जगण्यापेक्षा मी कसलंही काम करीन."
 "मी दादांकडून जे घेतो ती भीक नाहीये. माझ्या हक्काचं आहे."
 "पुन्हा तेच. त्यांनी पैसे द्यायचं थांबवलं तर तुम्ही काय करू शकणार आहात?"
 "का म्हणून थांबवतील?"
 तुमची कोंडी करण्यासाठी असं तिच्या तोंडावर आलं होतं पण ते ती बोलली नाही. ती फक्त म्हणाली, "आयुष्यभर असंच परावलंबी राहायचं का आपण?"
 "आयुष्याच्या गोष्टी करू नकोस. परिस्थिती काही कायम अशीच राहाणार नाही."
 "स्वप्नं पाहाताय तुम्ही."
 फावल्या वेळात तीच दुकान चालवायची. मनात म्हणाली, निदान 'माझ्या बायकोनं गल्ल्यावर बसायचं नाही' असं तरी ते म्हणत नाहीत.
 रणजितचं पिणं वाढतच होतं. एक दिवस ती त्याला म्हणाली, "तुम्हाला शेतीतली माहिती आहे तर तुम्ही जमीन खंडानं घेऊन शेती का करीत नाही?"
 "आम्ही इथे पिढ्यान्-पिढ्या मोठे जमीनदार आहोत. मी खंडानं जमीन घ्यायची म्हणजे माझी पत काय राहिली?
 "उलटं लोक मानतील तुम्हाला."
 "अनू, तू काय बोलतेस तुला कळत नाही. ज्या गोष्टी समजत नाहीत त्यांत तू पडू नको."
 कधी तिला वाटायचं, मी तरी कशासाठी ही धडपड करतेय? असल्या जगण्यात काही अर्थ आहे का? एखादवेळी कधी तरी मध्यरात्री जागा होऊन तो पहायचा की ती रडतेय. मग तो तिला मिठीत घेऊन तिची समजूत घालायचा आणि पुन्हा दारूला न शिवायची शपथ घ्यायचा, पण तो ती शपथ पाळणार नाही हे तिलाही माहीत होतं नि त्यालाही.
 एक दिवस शिल्पा तिच्याकडे आली. "ये शिलू, किती दिवसांत भेटली नाहीस. कधी आलीस माहेरी? लग्न मानवलेलं दिसतंय तुला. किती छान दिसत्येयस."
 चहा घेता घेता शिल्पा म्हणाली, "तू का अशी ओढल्यासारखी दिसतेस? अनू, रडतेस तू? काय झालं? गेल्या वेळी भेटलीस तेव्हा आनंदात दिसलीस."
 "आनंदाला ग्रहण लागायला काही वेळ लागत नाही."
 "पण झालं तरी काय?"
 अनुजाने तिला सगळं सांगितलं. म्हणाली, "काय करावं कळेनासंच झालंय मला."
 "तू त्याला व्यसनमुक्ती केंद्रात का नाही घेऊन जात?"
 "आधी त्यांनी यायला पाहिजे. आणि समजा व्यसन सुटलं तरी पुढे काय! धंदा-नोकरी काही करायचंच नाही म्हटलं की पुन्हा ते त्याच मार्गाने जाणार."
 "प्रयत्न तर करून बघ. कदाचित तिथे वेगळ्या माणसांत जाऊन त्याला काही वेगळा दृष्टिकोन मिळेल. मी त्या केंद्राचा फोन नंबर काढून तुला देते. तू त्यांच्याशी बोलून दिवस ठरव."
 मुख्य अडसर होता तो म्हणजे आपल्याला व्यसन आहे आणि ते सोडायची गरज आहे हेच कबूल करायला रणजित तयार होईना. तो म्हणे मी अधनंमधनं थोडी दारू प्यायलो तर कुणाचं काय वाईट होतंय?
 "अधूनमधून नाही, जवळ जवळ रोज पिता आणि त्यामुळे आपलं दोघांचंही वाईट होतंय."
 "काय वाईट होतंय? मी काय तुला वाईट वागवतो का मारहाण करतो?"
 "मारहाण करणं म्हणजेच वाईट वागवणं का? जरा विचार करा, रणजित. लग्न झाल्यानंतरचे दिवस आणि आत्ता ह्यात तुम्हाला काहीच फरक जाणवत नाही? आपण एकत्र फिरायला जात होतो, चेष्टामस्करी करीत, रेंगाळत जेवत होतो, रात्री उशीरापर्यंत गप्पा मारीत होतो. आता एखादं काम उरकल्यासारखं जेवण करून तुम्ही लगेच झोपायला जाता. मी आवराआवर करून येते तो तुम्ही गाढ झोपेत असता. फिरायला तर आपण किती दिवसांत गेलो नाही.
 "तू घरी कुठे असतेस?"
 "मी रोज तुम्ही यायच्या आत घरी आलेली असते."
 "मग कुणी ना कुणी दुकानात आलेलं असतं."
 "बास? एवढंच?"
 "म्हणायचंय काय तुला? लग्नानंतरचे हनीमूनचे दिवस जन्मभर टिकतात का?"
 लग्नानंतर ३-४ दिवस तो रानात गेला नव्हता, आणि तिनं का म्हणून विचारलं तेव्हा म्हणाला होता, आपला हनीमून नाही का?
 आता ती म्हणाली, "तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही, कारण तुम्ही मुद्दाम वेड पांघरताय. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते अशा तऱ्हेनं जगणं मला अशक्य आहे. हे असंच चालू राहिलं तर तुम्हाला सोडून जाणं एवढा एकच मार्ग मला आहे."
 "का म्हणून सोडून जाणार? तुझं माझ्यावर प्रेम नाही?"
 "खूप प्रेम आहे. म्हणूनच तुमचं वागणं आणि त्यामुळे आपल्या नात्याचं जे होतंय ते सहन करणं मला शक्य नाही. तुमच्याशी लग्न करण्यात मी फार मोठी चूक केली. ती आता निस्तरली पाहिजे."
 "चूक केली असं कसं म्हणतेस?"
 "सरळ आहे. माझ्याशी लग्न केल्यामुळे तुमचं सुरळित चाललेलं आयुष्य विस्कटलं. ते परत रुळावर आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला तुम्ही तयार नाही. तुम्ही तुमच्या चौकटीतून बाहेर पडायलाच मागत नाही. काहीही करण्याच्या आड तुमचं खानदान येतं. मग काही उद्योग नाही म्हणून तुम्ही दारू पिता आणि आपल्या घराची सुख-शांती घालवून बसता. ह्यातून मार्ग एकच आहे. तो म्हणजे माझ्यापासून फारकत घेऊन तुम्ही घरी जायचं. तुमचे दादा आनंदानं तुमचं स्वागत करतील."
 "आणि तू काय करणार?"
 "तो मग तुमचा प्रश्न उरणार नाही."
 त्यानं बराच वेळ तिच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला, "तू खरंच म्हणतेयस ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. का म्हणतेयस तेही मला कळत नाही. पण मी तुला सोडून जायचं हा कसलाच मार्ग होऊ शकत नाही. मी तुला सोडणार नाही. मला तू हवीयस."
 शेवटी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात जायचं कबूल केलं. त्यांनी तिला दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली. मधल्या काळात त्याच्या पिण्याला काही धरबंधच राहिला नाही. कधी कधी त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध रहायची नाही. तिने काही म्हटलं की त्यांची भांडणं जुंपायची. शेवटी ज्या दिवशी जायचं त्या दिवशी सकाळी तिने त्याला पुन्हा पुन्हा आठवण केली. "आज संध्याकाळी बसने जायचंय आपल्याला. सकाळी लवकर वेळ दिलीय ती हुकू द्यायची नाही." तो जरा वैतागून म्हणाला, "अग कितीदा सांगशील? येतो म्हटलं ना?"
 पण तो आलाच नाही. बसची वेळ हुकली, जेवणाची वेळ सुद्धा टळून गेल्यावर रात्री उशिरा तो आला.
 "ए. रडतेस कशाला? कुणी मेलंबिलंय की काय?"
 "तुम्ही कबूल केलं होतं. का आला नाही?"
 "माझी मर्जी. आणि असल्या कसल्या केंद्रात मला न्यायचे बेत रचू नको. मी येणार नाही. आयला, येवढं सुद्धा स्वातंत्र्य नाही आम्हाला? तू बस म्हटलं की बसायचं, ऊठ म्हटलं की उठायचं असलाच नवरा पायजे होता तर माझ्याशी लग्न कशाला केलं?
 "चूक केली म्हटलं ना. आता ती दुरुस्त करते." ती उठून स्वैपाकघराकडे चालायला लागली.
 "काय करणारेस?"
 "स्वत:ला पेटवून घेते. म्हणजे तुम्हीही सुटाल नि मीही."
 "घे. घे. तेवढी कटकट तरी मिटेल माझ्यामागची. माझ्यासारख्याशी लग्न केलं ते केलं, निभावून न्यायची सुद्धा अक्कल नाही."
 तो धरून चालला होता की ती स्वैपाक करायला गेली. तिची किंकाळी ऐकून तो धावतच आत गेला.
 हॉस्पिटलमधे ती शुद्धीवर आली तेव्हा पोलिसांनी तिचा जबाब घेतला. तिनं सांगितलं त्या दिवशी लाइट गेली होती. स्टोमधे रॉकेल भरताना सांडलेलं कंदिलाच्या उजेडात मला दिसलं नाही. स्टो पेटवायला लागले तशी सांडलेल्या रॉकेलने पेट घेतला. उठेस्तवर साडी पेटली. तिथे दुसरं कुणी नव्हतं. ते बाहेरच्या खोलीत होते. रणजितच्या भावाच्या दबदब्यामुळे पोलिसांनी त्याला काही त्रास दिला नाही. अनुजाच्या आईने मात्र येऊन त्याच्यावर आरोप करीत रडून आरडून गोंधळ घातला तेव्हा डॉक्टरांनी तिला बळाने बाहेर काढलं.
 रणजित अनुजाजवळ बसून होता. तो म्हणाला, "अनू, हे काय केलंस तू? इतकी रागवलीस माझ्यावर? रागावू नको. तू बरी झालीस ना, की आपण तुझ्या त्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊ. नक्की. मी वचन देतो तुला."
 डॉक्टर म्हणाले, "त्यांच्याशी जास्त बोलू नका. त्यांना त्रास होतो." पण अनुजाला त्याचं बोलणं ऐकू येतंय की नाही तेही त्याला कळत नव्हतं. ती डोळे मिटून गप्प पडली होती. अधूनमधून वेदनेनं कण्हत होती.
 शिल्पाला कळल्यावर ती धावत आली. अनुजानं रणजितला चहा पिऊन काही तरी खाऊन यायला पाठवलं.
 शिल्पा म्हणाली, "अनू, असं कसं झालं?"
 "जे झालं ते माझ्याच हातनं."
 "पण का तू असं केलंस? त्याला कारण तोच आहे ना? त्याच्याशी पटत नसलं तर त्याला सोडून द्यायचंस. स्वत:चा जीव द्यायला निघालीस? तू इतकी जिद्दीची नि असं कसं केलंस?"
 "शिलू, मी त्यांना नुसती अद्दल घडवणार होते."
 "म्हणून तू अंगावर रॉकेल ओतून घेतलंस?"
 "तसं नाही ग. मी नुसतं फरशीवर रॉकेल ओतलं थोडंसं. अर्धवट उजेडात त्याचा ओघळ माझ्या पायापर्यंत आलेला दिसलाच नाही मला. काडी टाकली तर आग थेट माझ्यापर्यंत आली. आणि काय होतंय ते कळायच्या आत नायलॉनची साडी पेटली."
 "कुणाला अद्दल घडवलीस ही? जरा विचार तरी करायचा होतास."
 अनुजा बोलून दमली होती. ग्लानीने तिचे डोळे मिटत होते. शिल्पा म्हणाली, "झालं ते झालं. तू धीर सोडू नको. बरी होशील तू ह्यातनं." अनुजा फक्त क्षीणपणे हसली.
 ती मेली तेव्हा रणजित तिच्या जवळ होता. डॉक्टर त्याला म्हणाले, "सगळं संपलंय रणजितभाऊ. पुढची तयारी करा."
 "काही तरी काय सांगताय डॉक्टर? ही काय चांगली जिवंत आहे. बघतेय माझ्याकडे." आपला हात तिच्या डोक्यावर ठेवून तो हलक्या आवाजात तिच्याशी काहीबाही बोलत राहिला.
 डॉक्टरांनी त्याच्या भावाला निरोप पाठवला. त्यांनी येऊन रणजितला घरी नेलं. अनुजाच्या भावाला पैसे देऊन अंत्यविधी उरकायला सांगितलं. रणजितनं अंत्यविधीला जायला मागितलं नाही. मागितलं असतं तरी दादांनी त्याला पाठवलं नसतं.
 दादा-वहिनी त्याला कशाबद्दल काही बोलले नाहीत. त्याचं सांत्वनही केलं नाही. त्यांना वाटलं काही दिवस गेले की तो रुळावर येईल. मग त्याचं लग्न करून देऊ. सगळं काही सुरळित होईल. हे मधले दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखे विसरून जाऊ.
 पण रणजित दारूची संगत सोडायला तयार नव्हता. तो बाहेर जायचा आपल्या पायानी पण बहुतेक वेळा जवळजवळ बेशुद्धीत त्याला कुणीतरी घरी आणून सोडायचं. भावाचं रागावणं, वहिनीचं समजावणं कशानंच काही फरक पडला नाही. शेवटी लिव्हरच्या दुखण्याने त्याला हॉस्पिटलमध्ये टाकलं, त्यातून तो वाचू शकला नाही.
 अनुजाची आई म्हणाली. "माझ्या सोन्यासारख्या पोरीला त्यानं मारून टाकली, त्याची काही तरी शिक्षा त्याला मिळायला हवीच होती." तिचं म्हणणं बरोबर होतं.
 रणजितची वहिनी म्हणाली, "आमचे भावोजी किती चांगले होते हो. त्या पोरीनं त्यांना भुरळ घातली न् त्यांचं सारं आयुष्य नासवलं."
 तिचंही बरोबर होतं.


अंतर्नाद मार्च २००७