कमळाची पानं/वांझोटी

विकिस्रोत कडून

वांझोटी


'कोंचा राक्-सस हिच्या पोटी येनारे कुनास
ठावं?' चुलीकडून राधेच्या सासूचा आवाज
तिच्या कानापर्यंत येत होता.

राधेनं खाटेवर पडल्यापडल्या कूस बदलली
सगळं आंग जडशीळ झालं होतं. हलवत
नव्हतं. पण सारखं एकाच अवस्थेत झोपलं
की पायाला मुंग्या यायच्या. त्या दोघी
बायका स्वैपाकघरात कुजबुजत होत्या;
मध्येच एखादा जहरी शब्द राधेला ऐकू
जाईल इतक्या मोठ्यानं बोलत होत्या. त्या
म्हाताऱ्यांची ती बडबड आणि अन्नाचा तो
वास तिला असह्य होत होता. आपल्याला
विशेषत: मेथीच्या वासानं मळमळतं हे
सांगितल्यावर अर्थातच घरामध्ये सर्वात
जास्त वेळा मेथी शिजायला लागली होती.

श्रीपती तिला म्हणाला होता, ' तू आईकडं
जाऊन राहिलीस तर बरं होईल.'

'मला बाई भ्या वाटतं. त्या दुस्वास करतात
माझा,' राधानं टाळायचा प्रयत्न केला होता.

'अग आता नाही वागणार तुझ्याशी ती तशी.
चांगली वागेल.' श्रीपती हसत म्हणाला होता,
'काही झालं तरी तिच्या नातवाची आई होणार तू आता. आणि इथं मी कामाला गेल्यावर तू एकटीच असतेस. तिकडे तुला जरा सोबतही होईल.'
 शेवटी तिनं 'हो' म्हटलं. श्रीपतीचं म्हणणंही बरोबरच होतं. श्रीपतीची आई आणि आत्या चडफडत का होईना तिचे डोहाळे पुरवत होत्या. तिच्या इच्छा अपुऱ्या राह्यल्या तर मूल वेडंवाकडं जन्मायचं म्हणून सगळ्या इच्छा पुऱ्या होत होत्या- मग ती देवळात जाण्याची असो किंवा एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची, त्यांना भागच पडायचं ते. आणि राधेचं लक्ष नाही असं वाटून त्या बाया जेव्हा तिच्याकडं बघून बोटं मोडायच्या तेव्हा तर तिला फारच गंमत वाटायची.
 श्रीपती एकदा मध्येच घाईगडबडीने येऊन 'तिच्याकडं लक्ष द्या.' म्हणून आईला सांगून गेला. आणि तो गेल्यागेल्या इकडे राधेच्या सासूचा तळतळाट सुरू झाला. 'लक्ष द्ये म्हनं. कुनाला सांगतुयास तू काय करायचं ते. हिची काळजी घ्येऊ? मंग आतापातुर हिच्या कामाबिगर दुसरं काय केलंया का म्या?'
 'राधा स्वत:शीच हसली. इतके दिवस कस्पटासारखं वागवलं गेल्याचा हा तिचा सूडच होता.
 जेव्हा नऊ महिने उलटले तेव्हा सासूनं विचारलं, 'तू मोजल्येस ना बरूबर?'
 'हां.'
 'हां आता काई बायांना लागत्यात नऊ महिने आन् नऊ दिस.'
 'आन त्यातनं पह्यलंच हाये. लागतो येखादीला उशीर' श्रीपतीची आत्या म्हणाली, काही दिवसांनी परत श्रीपतीच्या आईनं विचारलं, 'अग तू निच्चीत बरूबर मोजल्ये हायेस ना?'
 'व्हय वं. पौषात पाळी चुकली-'
 बऱ्याच वेळा मोजती गिनती झाल्यावर राधाला कबूल करायला लागलं की दहावा महिना संपत आलाय. मग सुईणीला बोलावलं गेलं. तिनं राधाचं पोट चार ठिकाणी चाचपलं आणि म्हणाली, 'येळ हाये अजून.'
 नजर लागू नाही म्हणून राधा पहिल्यांदा आपल्याला जपायची. पण आता तिचं ओटीपोट जवळपासच्या लोकांच्या कुत्सित नजरांचा, टोमण्यांचा विषय बनला. पहिल्यापहिल्यांदा सगळे म्हणत की तिचं पोट इतकं मोठं झालं म्हणजे तिला मुलगाच होणार. पण आता ती जवळ आली की बायांची कुजबूज एकदम थांबायची. त्या तिची नजर चुकवायच्या. तिनं बाहेर जाणंच सोडलं शेवटी. पण घरात अखंड पुटपुटणाऱ्या सासूचा त्रास तिला वाचवता येईना. हे पुटपुटणं असह्य होऊन शेवटी ती सासूवर ओरडली,
 'तुम्हीच करणी केली माज्या पोरावर. देवा रे, मी हितं आल्येच नस्ते तर बरं झालं अस्तं.'
 'कूटं गेली अस्तीस ग सटवे? हां?' तिची सासू तिच्यासमोर उभी ठाकली. दोन पायांत अंतर, हात कमरेवर आणि भांडायला मोठी मजा येत असल्यासारख्या फुलारणाऱ्या नाकपुड्या. 'सांग की मला कुटं गेली अस्तीस त्ये? तुला कुटं घर हाय? आगं हुंडा न घेता केलीया तुला. छप्पनजणी तयार हुत्या. पन तुज्या चुलत्यानं फशीवलं माज्या शिरपतीला, आन् लगीन लावून दिलं.'
 'होऽऽ फसवलं म्हनं. काय बोळ्यानं दूध पीत व्हतं का तवा त्ये? चांगलं नीट बगूनबिगून केलीय माला.'
 'बगीतलीय म्हनं. आगं त्वांड बग सोताचं, आन् आईबापानं बगायच्या अगुदर नवऱ्यानं पोरगी पाह्यली आसं कंदी झालंय का? तुजी आन् तुझ्या चूलताचुलतीची पत काय हाय दिसतंयाच की आता. लाजशरम बी वाटंना जाली त्या चांडाळाला.'
 'अवो त्ये चांडाळ तर तुमचेच चुलतभाव हायेत' राधा फिस्सकन हसली 'चुलतभाव? त्यो कसला चुलतभाव? माज्या गळ्यात असलं लोढनं बांधनारा चुलतभाव न्हाईच माजा. वैरी हाय.' मग जरा ताळ्यावर येऊन ती म्हणाली, 'पन त्येची बी काय चूक हाये? ही तुज्यावानी बिना आयबापाची पोर जलमभर कोन पोसनार?'
 'तुमच्या जिभेला हाड हाय का न्हाय? माजं वडील जितं हायेत अजून. आन तुमी मला बिनमायेबापाची म्हंता?' राधाला खच्च झालं होतं.
 'हूं. जितं हायेत म्हनं. दिसभर खाटंवर पडून ऱ्हायचं बंडगुळावानी म्हंजी का जितं हायती? तेंचा काय उपेग हाय का कुनाला?'
 आता मात्र राधेला गप्प बसावं लागलं. तिची आई फार पूर्वीच वारली होती आणि काहीही काम न करता जगण्याच्या कलेत बाप अगदी निपुण होता. तो त्याचा पोरगा आणि पोराची कजाग बायको यांच्याकडे राहात होता.
 राधेला वाटायचं की त्या हृदयाच्या जागी मोठा दगडच असलेल्या आपल्या वैनीच्या घरी राहाण्यापेक्षा सासूकडे राह्यलेलं किंवा मेलेलं बरं.
 श्रीपतीच्या आत्याचं वेगळंच होतं. तिची रीतच टेढी. ती रंगवून रंगवून काही गोष्टी सांगत राहायची.
 'ती सीताबायची प्वार न्हवं का सा वर्साची जाली तरी आजून रांगत बी न्हाई. पहिलं प्वार उशीरान् झालं का असंच काय तरी व्हतं.'
 राधा तेवीस वर्षांची होती आणि तिचं लग्न होऊन सात वर्ष झाली होती. आत्याला सारखी सांगावीशी वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे,
 'एका बाईचं प्वार पोटात इतकं वाढलं की शेवटी प्वार कापावं लागलं आन् बाळ-बाळंतीन दोघंबी म्येले म्हनं.'
 श्रीपती मुंबईहून आला तेव्हा सगळ्यात त्याच्या नजरेला जाणवलेली गोष्ट म्हणजे हडकलेली, फिकुटलेली राधा अन् तिचं वाढलेलं पोट. तिला धड हलताही येत नव्हतं.
 'तुम्ही तिला सोनगावला डॉक्टरकडे का नाही नेलं?'
 'सुईण बलावली व्हती.'
 'त्या अडाणी बाईला काय कळतं का?'
 'तू अस्शील मोटा हापसर पोलिसात मंबईला-' आई संतापून बोलायला लागली, 'ह्ये बघ, तू मला अक्कल शिकवू नगं. नस्लं हुईत तर जा घिऊन तिला. हितं कुनाला न्हायी ती झगझग हवीये? आन् येवढं काय जालं धुसमुसायला? जगामधी काय कुनाला प्वारं हुईत न्हायीतका काय?'
 श्रीपती जरा शरमला. पण बायको ऐकत असताना तो आईला वरचढ होऊ देणार नव्हता.
 'बस्स झालं. फार बडबड करतीस तू आई. मी तालुक्याला जातोय टॅक्सी आणायला तिला बसनं जाणं नाही सोसायचं. आणि तुही तयारी कर यायची. दवाखान्यात कणीतरी हवंच तिलाही.'
  हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं ऐकून श्रीपतीला काळजाचा ठोकाच चुकल्यासारखा वाटला.
 'म्हणजे तिच्या पोटात पोरच नाहीये?'
 नाही. तो एक ट्यूमर आहे. म्हणजे एक गाठ झालीय तिच्या पोटात.'
 'पण सगळे तर म्हणाले की...'
 डॉक्टरांच्या नजरेत कीव होती.
 'तुम्ही लोक सगळे सारखेच. चांगल्या डॉक्टरला दाखवली असतीत तर हे तूम्हाला आधीच कळलं असतं. ट्यूमर काढून टाकता आला असता आणि इतके दिवस तिला हे सगळं सहन करावं लागलं नसतं.'
 'मग आता काय करायला पाहिजे?'
 'आता ऑपरेशनच केलं पाहिजे. आणि तेही शक्य तितक्या लवकर.'
 'तुम्ही कराल ना डॉक्टर?'
 'हो. पण पैसे बरेच लागतील. त्यापेक्षा असं करा, तिला सरकारी दवाखान्यातच ॲडमिट करा म्हणजे...'
 'पैशाची काळजी नका करू डॉक्टर.' श्रीपती थोडा रागावून बोलला. त्याला अजून नक्की काय झालंय ते समजलंच नव्हतं.
 त्यानं जेव्हा राधेला हे सांगितलं, तेव्हा तिला कायकाय वाटून गेलं हे तिच तिलाच माहीत. ती रडरड रडली. पण श्रीपती स्वत:च इतका हबकून गेला होता की तिचं सांत्वन कसं करायचं त्याला समजतच नव्हतं. डॉक्टराच्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राधाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तेव्हाही त्याला सारखं वाटत होतं की डॉक्टरांची काहीतरी चूक झालेली असणार.
 ऑपरेशन संपेपर्यंत त्यानं स्वत:ची अशी ठाम समजूत करून घेतली हाेती की सगळं ठीक होईल. पोटात मूलच असणार, पण ते नेहमीसारखं जन्मू शकत नसल्यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं असणार. त्यानं अशा गोष्टी पूर्वी ऐकल्या होत्या.
 जेव्हा डॉक्टरांनी त्याला बोलावलं. तेव्हा तो आत गेला. डॉक्टर त्याच्यासाठीच थांबले होते. त्याला राधा कुठेच दिसली नाही. पण डॉक्टर मात्र कशाकडे तरी कौतुकानं बोट दाखवत होते.
 'ते पाहिलंस का? आम्ही बाहेर काढलं ते तुझ्या बायकोच्या पोटातून काळजी करू नको. आता ठीक आहे ती.'
 टेबलावर एका जर्मनच्या ताटलीमध्ये तो गोळा होता. खाटकाच्या दुकानात आणलेलं काही तरी असावं तसा तो दिसत होता. श्रीपती त्या गुलाबी-जांभळ्या गोळ्याकडं सुन्नपणे बघताना जमिनीला खिळला होता. अजून त्यात प्राण असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारी त्याचं वजन आणि परीघ सांगणारं एक कार्ड ठेवलं होतं. जणू काही एखाद्या भाजीपाल्या प्रदर्शनातला कंदच होता तो!
 हेऽऽहे राधेच्या पोटात? आपल्या बायकोच्या पोटात? नाही नाही शक्य नाही. कोणी तरी क्रूर गंमत करतंय ही. त्याच्या मेंदूमध्ये सणाण् कळा येत होत्या.
 राधा हॉस्पिटलमधून घरी आली, पण तिची ताकद भरून यायलाच बरेच दिवस लागले. ती म्हातारी दिसू लागली-वाळलेली आणि गळणारे केस. ती सारखी रडायची आणि श्रीपतीला विनवायची, 'मला मंबईला घिऊन चला वं.'
 'तू बरी झाल्यावर नेईन.
 'म्या थकडं गेल्यावरच बरी व्हईन वंऽऽ'
 'पण बरी होईपर्यंत तुझ्याकडे पाह्यला आहे कोण तिकडं?'
 'पण तुमी मला सोडून जाऊ नगासा. तुमी निघून गेल्यावर सासूबाई ठार मारतील मला.'
 'गाढवासारखं बोलू नकोस. तिनं इतके दिवस तुझी काळजी नाही घेतली? आणि आताही ती नसती तर काय हाल झाले असते तुझे!'
 जाण्याच्या आधी त्यानं तिला सांगितलं, 'लवकर बरी हो. आई आता म्हातारी झालीय आणि तुझं काम करताकरता दमायला होतं तिला. तू तिला आता कामाला हात लावायला हवा. उलट कामात भर घालतेयस तू.'
 'अवं माझा असा रागराग करू नका वं. मी बायकू हाय तुमची.' तिचा स्वर आर्त असला श्रीपतीनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
 श्रीपती गेल्यावर आई पुटपुटली, 'बायकू म्हनं, नवऱ्याला येक प्वार बी देता येईना, आन म्हनं बायकू. वांझ कुठली!'
 रडूनरडून राधाचे डोळे आटले. तिला वाटलं, माझं आता कुणीच उरलेलं नाही. आता माझी मलाच मी. तिनं ठरवलं की बरं व्हायची वाट बघायची नाही आणि पुढच्या वेळी सासूनं जेव्हा तिच्या पुढ्यात पेज ठेवली, तेव्हा तिनं ती ताटली बाजूला ढकलली, 'मला भाकरी द्या. मला लवकर बरं व्हायचंय.'
 सासूनं तिला भाकरी दिली, पण कुत्सित हसत म्हणाली, 'आता काय बी उपेग नाही त्येचा. तुला कुठून आलंय प्वार व्हायला.'
  खचकन डोळ्यात आलेलं पाणी आवरत राधा म्हणाली,
 'हे खोटंं हाय. कशानं वंं आसंं वंगाळ बोलता तुमी?'
 'जाऽजा. आगं डाक्टरला इचार की. त्यानंच सांगितलंय तुला आता प्वार व्हायचं नाही म्हनून. शिरपतीला काय बी उपेग न्हाई तुजा.'
 'काय मनाला यील ते बोलतायसा तुमी,' राधा स्वत:ला सावरत होती.
 अचानक अनोळखी माणसांची घरातली वर्दळ वाढली. लोकांची बोलणी व्हायला लागली. तिला विश्वासात न घेता बरंच काही शिजू लागलं. तेव्हा तिला घाबरल्यासारखं झालं.
 'तुमी असं नाय करू शकनार. तुमाला तुरुंगात टाकतील.' तिनं निकराचा प्रयत्न केला, श्रीपतीचं दुसरं लग्न टाळण्यासाठी.
 'अगं ये ऽ जा गं तुरुंगवाली. माजा शिरपा पोलिसात हाये म्हन्ल.'
 'तुमी म्हन्ला म्हनून त्ये न्हाई लगीन करायचे लगीच.'
 'अगं बघशीलच रंडके कोन लगीन करतं ते. आन् तू त्वांड बंद ठेव. नाहीतं म्याच ठार मारीन तुला. मग शिरपतीला येवस्थेशीर दुसरं लगीन करता यील.'
 श्रीपती खरंच लग्नाला तयार झाला. आणि राधानं घर सोडलं. घरच्यांनीही तिची फारशी फिकीर केली नाही. ती तालुक्याला, सोनगावला गेली आणि शेतावर राबून आयुष्य कंठायला लागली.
 ती दररोज वस्तीवरच्या भैरोबाच्या देवळात जायची. श्रीपतीला आणि आपल्या सासूला देवानं शिक्षा द्यावी म्हणून नवस बोलायची, कौल लावायची.
 वस्तीवर ती म्हणजे सगळ्यांच्या करमणुकीचा विषय झाली होती. थोडीशी कुणी सुरुवात करून देताच ती आपल्या आयुष्याच्या कर्मकहाणीचं नाटक वर्णन करू लागायची. तिचा बोलताना उफाळून येणारा संताप आणि शेलक्या शिव्यांची पेरणी यामुळे आजूबाजूच्या लोकांचा वेळ मजेत जायचा. ते तिला 'वेडी' म्हणायचे आणि चिडवत राहायचे.
 'शिरपती इतं आला तर तू काय करशील ग त्याचं? त्याचं टुकड भाकरीबरूबर खाशील का?'
 'त्याला खाल्लं तर ईख भिनल माज्या आंगात.'
 'मंग काय करशील तू? बैलाच्या चाबकानं फोड़न काढशील का गं?'
 'तुमी त्येला घिऊन तर या हिकडं. मंग बगा मी काय करत्ये त्ये.'
 सुरुवातीला तिला असं काही बोलल्यावर बरं वाटायचं. पण लोकांकडून फक्त जरा हसायला मिळावं म्हणून वापरलं जाण्याचाही तिला कंटाळा येऊ लागला. तिनं त्या प्रकाराबद्दल उघडपणे बोलायचं सोडून दिलं.
 वरवर संथ दिसणारा तिचा आयुष्यक्रम सुरू होता. पण तिच्या मनातला त्वेष, संताप, द्वेष आता मोकळी वाट नसल्यानं कोंडून राहायला लागला त्यामुळे तो अधिकाधिकच उग्र रूप धारण करायला लागला.
 आणि अचानक एक दिवस श्रीपती तिच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. तो झोपडीत आला आणि थोडा वेळ काय बोलावं तेच कळेना. शेवटी ती म्हणाली,
 'तुमी ठीक हात ना?'
 'हो बरा आहे. पण तुझी तब्येत तेवढी बरी दिसत नाही गं.' त्यानं तिला खिजवलं.
 तिला माहित होतं की उन्हानं तिचा चेहरा रापला होता. अंग सुरकुतलं होतं. डोळे विवरासारखे झाले होते. त्याचा टोमणा तिला बोचला. अजूनही तरूण, देखण्या दिसणाऱ्या, टेचात राहणाऱ्या श्रीपतीकडे असूयेने बघत ती म्हणाली, 'चांगली भली हाये की मी. काय बी न्हाई झालं मला. कस्ली धाड भरली न्हाई. आन सासूबाई कशा हायेत आता?'
 'बरी आहे.'
 'बऱ्या हायेत? मी तर ऐकलं व्हतं का मरायला टेकल्यात आन् तुमची बायकू त्यांचं सगळं करते म्हून.'
 क्षणभर काहीच न बोलता एकदम ती बोलली 'बिच्चारी पोर. कशी जगत असंल?. त्या थेरडीच्या जाचापेक्षा हितं शेतात मजुरी केलेली परवडंल मला.'
 'हे असल काहीतरी बोलायचं होतं म्हणून बोलावलंस का मला?'
 'म्या? म्या कुटं बलीवलं तुमाला?'
 'पण मला तर निरोप मिळाला की.... मला काय तुझी तहान नव्हती लागली तेव्हा.... मी निघालो बघ हाऽऽ.'
 'आता कुठे त्या दोघांच्याभोवती जमलेल्या गर्दीनं तिला भानावर आणलं आणि ती समजायचं ते समजली. पण गर्दीकडे बघून काही बोलण्याआधी तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. 'थांबा. आताऽ आता तुमी आलाच हात तर दाखिवते तुमाला.' तिनं आवाज उंचावला आणि हाक मारली, 'म्हाद्या, एऽऽ म्हाद्या, हिकडं ये.'
 जवळच्याच मातीत खेळत असलेला एक बारका पोरगा तिच्यापाशी येऊन उभा राहिला, अंगठा चोखत श्रीपतीकडे बघायला लागला.
 'हा कोण?' श्रीपतीने विचारलं.
 'माजा ल्योक.'
 श्रीपती कुत्सित हसला, 'कुठल्या उकिरड्यावरनं उचलून आणलंस गं?'
 'आनायला कशाला पाह्यजे? माज्या पोटचा हाये तो.'
 'काही लाज आहे का तुला, अग ये ऽ...'
 'मला? मला कशाला लाज पायजे? जवा एखाद्या बाईचा नवराच मरद नसंल, तिला सांभाळण्याइतका, तवा तिनं करावं काय? आन् चांगला हाय की म्हादू याची कसली लाज? आन...'
 तिचं बोलणं मध्येच तोडून श्रीपती संतापानं ओरडायलाच लागला_
 'रंडके! लाजमोडे! कुणाचा आहे हा मुलगा?'
 ती आणखीनच कुत्सित हसत म्हणाली, 'तुमचा तर न्हाई. अगदी नक्कीच न्हाई.'
 'गप्प बस. बोलू नकोस पुढं.' संतापानं श्रीपतीच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते.
 'का? मला कुणाचं भ्या हाये? आरं शिरपती. पुना कदी लगीन करणार हायेस आता तू? आरं कितीदा लगीन केल्यावर कळणाराय तुला की हांडगा तू हायेस. प्वार मला झालंय.'
 शरमेनं काळाठिक्कर पडलेला श्रीपती इकडंतिकडं न बघता चालायला लागला. तरी ती मागनं ओरडलीच, 'तू ऽ तू बाप त्या गोळ्याचा. मांसाच्या गोळ्याचा. ऐकतुयास न्हवं? निस्ता गोळा! ना हात ना पाय!'
 श्रीपती एव्हाना लांब पोहोचला होता. पण तिचा चढलेला पारा अजून उतरला नव्हता. झोपडीसमोर जमलेल्या माणसांवर ती कडाडली,
 'चालते व्हा हितनं. शरम नाय वाटत? हितं तमाशा चाललाय?'
 म्हादूचा हात तिने घट्ट धरला आणि तरातरा झोपडीत जाऊन धाडकन दार लावून टाकलं.


तात्पर्य मार्च १९८०
अनुवाद : चंदा निंबकर