Jump to content

कमळाची पानं/रोमा

विकिस्रोत कडून

रोमा


ह्या रोमानं माझं कुतूहल जागं केलं होतं
ह्यात काही शंका नव्हती. नेहमीचा साचा
वेगळाच असतो. माझा मुलगा किंवा
मुलगी 'तिकडे' असते असं सांगणाऱ्यानं
त्याबद्दल कितीही आज काल त्यात
काही विशेष नाही असा सूर काढला तरी
त्याच्या आवाजातलं कौतुक लपत नाही.
तुम्ही तिला/त्याला जाऊन भेटा असं
सांगण्यात हेतू दोन असतात.
एक म्हणजे आपल्या मुलाचं परदेशातलं
वैभव इतरांनी बघावं, त्यानं दिपून जावं ही
इच्छा. दुसरा म्हणजे तिथे थाटलेला संसार
हा नवरा किंवा बायकोपासून तो साड्या,
. लोणची-पापडांपर्यन्त इंपोर्टेड
असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याचा त्याला
हातभार लागण्याची गरज.

तेव्हा मी रोमला जातेय असं कळल्यावर
आपल्या तिथं असलेल्या भाचीला भेटायला
सांगायला जेव्हा बिवलकर आले तेव्हा मी
'बघेन जमलं तर' असं शक्य तितक्या
निरुत्साहानं म्हटलं. ते म्हणाले, 'कसही
करून वेळ काढा.' स्वर अजीजीचा होता.
जराशा आश्चर्याने मी त्यांच्याकडे पाहिले
 आणि मग त्यांनी दिलेलं पत्त्याचं चिठुरडं डोळ्यांखालून घातलं. वाटलं, हा योगायोग जरा अतीच झाला. मी विचारलं 'ती तिथे जन्मलेली वगैरे आहे की काय?'
 'छे हो, तीच तर गंमत आहे. तिथे जाऊन राहीपर्यंत तिचा रोमशी काडीइतकाही संबंध नव्हता.'
 'काय करते तिथे?'
 'तिचा नवरा तिथे असतो.'
 एफेओ, वकिलात, बहुराष्ट्रीय कंपनी असं काहीतरी मनात आणून मी म्हटलं, 'कसली नोकरी आहे?'
 'आहे कसल्याशा डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये.'
 'म्हणजे?'
 'त्याचं असं आहे तो आपल्या इकडला नाही.' आपल्या इकडला असता तर डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये कशी नोकरी केली असती असं त्यांनी ध्वनित केलं.
 'असं? इटालियन आहे की काय?'
 तो आहे अमेरिकन. पण त्यांची गाठ पडली इथंच पुण्यात.'
 एव्हाना सावधपणा गुंडाळून ठेवून मी त्यांची गोष्ट औत्सुक्यानं ऐकायला लागले होते.
 ते म्हणाले, 'तो काही वर्षांपूर्वी पुण्याला आला होता. पेशवेकालीन पुणे की अशा काहीतरी विषयावर अभ्यास करीत होता. रोमाचे वडील त्याला मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या घरी रोमाची न् त्याची ओळख झाली मग ती त्याला पुणं दाखवायच्या निमित्ताने त्याच्या बरोबर हिंडली. तो त्यांच्या घरीही येऊन जाऊन असे. पण ही स्वारी रोमाच्या प्रेमात पडलीय म्हणून काही कुणाला पत्ताही लागला नाही.'
 'रोमालासुद्धा?'
 ती चवदा-पंधरा वर्षांची होती त्यावेळी. तिला काय पोरीला?'
 चवदा-पंधरा वर्षांच्या मुलींबद्दलच्या त्यांच्या कल्पनेला धक्का न देता मी विचारलं, 'बरं मग?'
 'मग वर्षभरानं हा परत गेला. पण रोमाचा नि त्याचा नियमित पत्रव्यवहार चालू होता. इथे सगळे आपले तिचा पेनफ्रेंड म्हणून त्याच्याकडे पाहात होते. पण पत्रापत्रीतनंच त्यांचं जमलं असलं पाहिजे. रोमानं काही सुगावा लागू दिला नाही कुणाला. विरोध होईल अशी कल्पना असली पाहिजे तिला. तीन-चार वर्षांनी जेव्हा तो परत आला न् तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. हे लग्न व्हावं असं कुणालाच वाटत नव्हतं.
 'का?'
 'म्हणजे केवळ तो एक परदेशी म्हणून नव्हे. तो तिला कोणत्याही बाबतीत अनुरूप नव्हता म्हणून. तिचा बाप प्रसिद्ध इतिहाससंशोधक, आई शिक्षणतज्ञ, भाऊ हार्टस्पेशालिस्ट, स्वत: रोमा सुन्दर, हुशार, एसस्सीला पहिल्या पन्नासात आली. पुढे सायन्स टॅलंट स्कॉलरशिप मिळवून बी. एस्सी. करीत होती. तिच्याबद्दल फार अपेक्षा होत्या सगळ्यांच्या. काही म्हणून अशक्य नव्हतंच तिला. तिच्या मानाने तो अगदीच सामान्य माणूस. शिक्षण मध्येच सोडलेला. काही महत्त्वाकांक्षा म्हणून नाही, स्थैर्य नाही. नुसता इकडून तिकडे भटकणारा. काय तिला त्याच्यात दिसलं काही समजत नाही. मी तर म्हटलं पोरगी गोऱ्या कातडीला भुलली.'
 'रोमला कुठे नोकरी शोधायला गेला?'
 'काय सगळंच अजब. म्हणे त्याच्या आईचं आजोळ इटलीतलं आहे. त्या लोकांना भेटायला म्हणून गेला. आवडलं रोम की राहिला तिथेच. ह्या अमेरिकनांना कुठे काही पाळंमुळं नसतातच. भटके निव्वळ.'
 'मग रोमा काय करत्येय आता?'
 'काही नाही. इथल्या सगळ्यांनी सांगितलं की तिथे शिक्षण तरी चालू ठेव. शिकलेलं सगळं वाया घालवू नको. पण पालथ्या घड्यावर पाणी. शास्त्रीय संशोधन करणार होती म्हणे ती.' त्यांनी पुस्ती जोडली, शेवटी बायका त्या बायकाच. एक नवरा मिळाला की ह्यांच्या आयुष्याच सार्थक झालं. मग जन्मभर काही न करता घरी बसायचं लायसेन्स मिळतं ह्यांना.'
 असल्या विधानांना विरोध करण्यात अर्थ नसतो म्हणून मी काहीच बोलले नाही. त्यांनीही मुद्याची गोष्ट सांगून रोमापुराण आटपलं. मुद्दा असा की रोमाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना फारशी कल्पना नव्हती. ती पत्रं लिहायची पण तोटकी. तेव्हा मी तिला जाऊन भेट्रन आले आणि आयविटनेस रिपोर्ट दिला तर त्यांना हवा होता.
 'आम्हाला सगळ्यांना तिची जरा काळजी वाटते,' ते म्हणाले. 'तिचा नवरा हा असला. नोकरी ही धर, ती धर, आज आहे, उद्या नाही. बरं दुकानातल्या सेल्समनला असा किती पगार मिळत असणार? आणि पोरगी मानी आहे. आपल्याला काही उणं आहे असं आपल्या तोंडानं सांगायची नाही. कळलं तरी इथून काय मदत करणार म्हणा. पण निदान तुम्ही तिला भेटून आला तर तेवढंच बरं वाटेल.'
 मला जरा राग आला. असं सांगितलं म्हणजे नाही म्हणणं अवघड जाणार हे त्यांना पक्कं माहीत होतं. पण माझ्याकडे असलेल्या अत्यंत मर्यादित वेळातला काही ह्या कामाला द्यायची हमी घेणं माझ्या जिवावर आलं होतं.
 मी म्हटलं, 'जमलं तर भेटेन. आधी मी तिथं फक्त ४-५ दिवस आहे. त्यातून अनोळखी शहर. आपल्याला भाषा येत नाही. तेव्हा पत्ता बित्ता शोधून काढणं-'
  'हवं तर तुम्हाला एअरपोर्टवर भेटायला कळवतो तिला.'
 'नको नको, तशी काही गरज नाही.' मी घाईघाईनं म्हणाले, 'तिला कशाला उगीच त्रास? मी सवड काढून तिला भेटेन, तुम्ही काळजी करू नका.'
 शेवटी असं जवळजवळ कबूल केल्यावर सुटका झाली. तिच्यासाठी सामान न्यायचं मात्र मी साफ नाकारलं, कारण अजूनही तिला भेटण्याचा माझा फारसा इरादा नव्हता. पण हातात गाइडबुक आणि नकाशा घेऊन प्रेक्षणीय स्थळं शोधत रोममध्ये हिंडत असताना माझा नकाशा चुकला आणि मी नेमकी रोमाच्या रस्त्यावर उपटले. मग मात्र मी म्हटलं ह्यात काही तरी दैवी इच्छा वगैरे प्रकार दिसतो आहे. बघू या तरी ही रोमा कोण आहे कशी आहे.
 रस्त्याचं नाव जरी गोंडस असलं तरी तो भाग फारसा पॉश दिसत नव्हता. अस्वच्छ रस्ते, जुनाट इमारती, मध्यमवर्गीयांच्या खिशांना परवडतील अशी हॉटेलं, झगमगीत न दिसणारी दुकानं, बाल्कन्यांत कपडे वाळत घातले होते. रस्त्यात मळकी मुलं खेळत होती. मला हव्या असलेल्या बिल्डिंगच्या दारात एक बाई लठ्ठ गालांचं मूल कडेवर घेऊन उभी होती. समोर एकजण हेल काढीत त्या मुलांचं कौतुक करीत होती.
 बिल्डिंग मध्ये लिफ्ट नव्हतीच. तीन जिने चढून रोमाच्या फ्लॅटपर्यंत पोचले. दार उघडलं ती मुलगी भारतीयच आहे असं काही छातीठोकपणे सांगता आलं नसतं. रंग सावळा असला तरी इटालियनांत खपून जाण्याइतका. केस खांद्यापर्यंत कापलेले. मोकळेच. पेहराव विटकी घट्ट बसणारी ब्ल्यू जीन आणि टीशर्ट. पायांत बारीक वाद्यांचे रोप-सोल्ड सँडल्स. युरोपात इकडे तिकडे कुठेही दिसणाऱ्या तरुण मुलींसारखी दिसत होती.
 तिनं माझ्याकडे पाहून घेतलं. गोडसं हसली नि म्हणाली, 'या ना, आत या.'
 मी जराशी गोंधळले. म्हटलं, 'तुम्हाला माहीत होतं मी येणारय म्हणून?
  'नाही.'
 "मग?'
 'देशापासून इतकं लांब आलं की कोणीही भारतीय माणूस आपलंच वाटत.
 मी तिच्यामागोमाग आत गेले. 'माफ करा हं. सगळं अगदीच अस्ताव्यस्त आहे. म्हणून ती भराभर खोली आवरायला लागली. इकडेतिकडे विखुरलली पुस्तकं नि मासिकं टेबलावर गठ्ठे करून ठेवली. बैठकीच्या कव्हरच्या सुरकुत्या साफ केल्या. उशा नीट मांडून ठेवल्या. खुर्चीशेजारी जमिनीवर ठेवलेली कपबशी उचलून आत नेली. 'आणि मला अहोजाहो करू नका बाई. अगदी मिडलएज्ड झाल्यासारखं वाटतं.' ती हसली.
 मी स्वत:ची ओळख करून दिली आणि म्हणाले, 'तुझ्या मामांनी पत्ता दिला तुझा. आम्ही एकाच ऑफिसात असतो. मी म्हटलं आत्ता घरी सापडशील की नाही, पण ह्या बाजूला आले होते म्हणून चान्स घेतला.'
 'खरं म्हणजे मी नसतेच यावेळी घरी. पण आज माझं सुदैव ' शेवटचा तास नव्हता.'
 'काही शिकतेस वाटतं?'
 'सेक्रेटेरिअल कोर्स घेतलाय. इटालियन भाषाही शिकत्येय. तशी बोलता- बिलता येते. पण नोकरी मिळवण्याच्या दृष्टीनं पुष्कळच चांगली यायला पाहिजे नाही का?'
 तिनं आपल्या चिमुकल्या स्वैपाकघरातनं कॉफी करून आणली. फ्लॅट एवढाच दिसत होता. झोपाय-बसायची खोली नि स्वैपाक घर. सामानही बेताचंच आणि स्वस्तातलं. सेकंडहँड घेतल्यासारखं दिसत होतं.
 'इथल्या लोकांना तुझ्या नावाची गंमत वाटत असेल नाही? मी विचारलं
 'हो ना, आणि टोनी त्यांना काय वाट्टेल ते सांगतो. कधी म्हणतो रोममध्ये राहायचं ठरवलं मग त्याच नावाची बायको नको का? तेव्हा दिली जाहिरात. कधी म्हणतो मी हिच्या प्रेमात पडलो तेव्हाच ठरवलं की हिच्याशी लग्न करायचं तर रोममध्येच रहायला पाहिजे. ती हसतहसत पुढं म्हणाली 'इथं येईपर्यंत ह्या शहराचं इटालियन नाव रोमा आहे हे ठाऊकच नव्हतं मला.'
 ती मराठी बोलत होती ते अगदी न अडखळता, पण उच्चार जरा चमत्कारिक, एखाद्या परक्या माणसाने करावेत तसे. मराठी बोलताना चेहऱ्याचे कुठले स्नायू वापरावेत ते विसरल्यासारखे.
 'केक घ्याना.' तिनं बशी पुढे केली. 'कोपऱ्यावर एक लहानशी बेकरी आहे. तिथे एक दिवसाचा शिळा माल खूप स्वस्त मिळतो. मी घेऊन येते अधूनमधून, आम्हाला दोघांनाही गोड खायला फार आवडतं.' पुन्हा ती हसला. पण अवघडलेपणा लपविण्यासाठी हसत होतीसं वाटलं नाही. ऊठसूट हसायची सवयच असली पाहिजे तिला.
 'टोनी काय करतो हल्ली?' मी केकचा घास घेत विचारलं.
 एका डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये नोकरीला आहे सध्या. पण पुढेमागे स्वत:च लहानसं दुकान काढायचा बेत आहे आमचा. हिंदी मालाचं. कापडं, चपला, चार कपडे, हँडिक्राफ्टस. इथे टूरिस्ट लोक खूप येतात. त्यामुळे चांगला खप होईल. टूरिस्ट लोक हे आपल्यापेक्षा वेगळ्याच जातीचे कुणी असतात. ते पैसा उधळायला येतात, तो पैसा त्यांच्याकडून उजळ माथ्यानं काढून घेण्याचे मार्ग फक्त आपण शोधायला पाहिजेत, असं अस्सल नेटिवाच्या थाटात ती हे बोलली. मग म्हणाली, पण त्याला भांडवल खूप लागेल. तेव्हा सध्या तरी ते फक्त स्वप्नच आहे.' तिच्या स्वप्नाचं स्वरूप, आणि ते बरेच दिवस स्वप्नच राहणार ह्याचं वैषम्य नसणं. दोन्हींची मला गंमत वाटली. तरुण असताना काटकसरीनं राहून पै-पैसा साठवणं आणि कुठल्यातरी स्वप्नाच्या पूर्तीसाठी जगणं ह्यात जरूर मजा असते, पण ते स्वप्न झगडून मिळवण्याच्या लायकीचं असलं पाहिजे.
 मग सध्या शिक्षण वगैरे सोडूनच दिलंयस वाटतं?'
  'तसंच म्हणायला हरकत नाही.'
 का बरं? मनात आणलंस तर इथेसुध्दा चालू ठेवता येईल.'
 'येईल म्हणा, पण खरं म्हणजे मलाच कंटाळा आलाय. आई-दादांना फार वाईट वाटतं मी शिक्षण सोडल्याबद्दल. पण शिक्षणालाच काय सोनं लागलंय?'
 शिक्षणाला सोनं लागलंय असं नाही, पण आयुष्यात काहीतरी कर्तृत्व दाखवावं असं नाही वाटत तुला?'
 'फक्त शास्त्रीय संशोधन म्हणजेच कर्तृत्व होऊ शकतं का? कर्तृत्व निरनिराळ्या अनेक क्षेत्रांत असू शकेल.'
 मी उपरोधाने म्हणणार होते - हो, दुकान चालविण्यात देखील. पण असं बोलण्याचा अधिकार मला नव्हता.
 'मी आईदादांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते समजून घ्यायला तयार नाहीत.' तिनं छोटासा सुस्कारा टाकला.
 ह्यात समजून काय घ्यायचं होतं? ज्या मार्गाने मोठ्या दिमाखात चाल केली तो चांगला सरळ मार्ग सोडून हिनं असलं प्रवाहपतित आयुष्य स्वीकारायला तिच्या आईवडिलांना पटेल असं कोणतं कारण असू शकणार?
 मी म्हटलं. 'पण तुझी एवढी चांगली करियर होती. त्याच्यावर एकदम पाणी सोडताना तुला वाईट नाही का वाटलं?'
 'करियर म्हणजे काय मावशी? कुठेही अगदी विचार करून मला अमक्याचीच आवड आहे म्हणून ते करायचंय असं म्हणून निवड केलीच नव्हती. कुणीतरी ढकलल्यासारखं एक विशिष्ट प्रवाहातनं वाहात होते एवढंच. माझ्या व इतरही अनेकजण काही कारणाशिवाय त्याच प्रवाहातनं वाहात होते एवढंच. माझी बुद्धी जरा तल्लख म्हणून केवळ माझ्या वाहाण्याला करियर म्हणायचं का? खरं म्हणजे ज्यावेळी लोक माझ्या करियरबद्दल कौतुकानं बोलत होते, माझ्या भविष्यकाळाबद्दल उंच उंच अपेक्षा करीत होते, त्यावेळी मला मात्र डेड एंडला येऊन पोचल्यासारखं वाटत होतं.'
 रोमा आत्तापर्यन्तचा खेळकरपणा सोडून गंभीरपणानं बोलत होती,पण तिच्या बोलण्यात तीव्रता नव्हती. आपली बाजू पटवण्याचा आग्रह नव्हता.फक्त आपली बाजू मांडायला मिळाल्याचं समाधान होतं. खरं म्हणजे तिचं वय बावीस-तेवीसच असलं तरी तिचा पोषाख, तिचं किंचित बाळसेदार शरीर, घाईगडबडीची, चपळ हालचाल ह्या सगळ्यांमुळे ती वाटत होती एखाद्या शाळकरी मुलीसारखी. म्हणून ती जे बोलत होती ते कुठून तरी उसनं घेऊन घोकल्यासारखं वाटत होतं, तिला आतून पटल्यासारखं वाटत नव्हतं.
 मी विचारलं, 'हे असं तुला कधीपासून वाटत होतं?'
 'खरं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. टोनीनं मला विचाराप्रमाणं वागण्याचं धैर्य दिलं. तो भेटला नसता तर मी धरल्या वाटेनं चालत राहिले असते झापडं बांधल्यासारखी.'
 म्हणजे मला वाटलं होतं ते बरोबर होतं. ती त्याची गॅलाटिया होती.
 मी म्हटलं, 'पण तो तुला भेटला त्यावेळी विद्यार्थीच होता ना? मग शिकणं वगैरे सगळं निरर्थक वाटत होतं तर ते त्यानं सोडून का नाही दिलं?'
 ती हसली. 'तो असाच नावापुरता विद्यार्थी होता. प्रवासाचा चान्स मिळतोय म्हणून त्याने एका मराठीच्या कोर्ससाठी नाव नोंदवलं. तो जो प्रबंध लिहीत होता तो त्या कोर्सचा आवश्यक भाग म्हणून. त्यात त्याला काही विशेष इंटरेस्ट होता म्हणून नव्हे.'
 'हे तुला त्यानं त्यावेळीच सांगितलं?'
 'हो. तो भारतात आला तो काही एक कल्पना घेऊन. पण त्याला जे हवं होतं ते तिथे मिळणार नाही असं त्याला वाटलं म्हणून तो परत गेला. पण तिथही त्याचं मन रमेना. मग तो अशाच एका ग्रुपबरोबर युरोपात आला.'
 'आणि तो जे शोधीत होता ते त्याला इथे मिळालं?'
 'अगदी असंच काही नाही, पण रोम शहर त्याला आवडलं, म्हणून काही वर्षे तरी इथे राहायचं असं त्यानं ठरवलं.'
 'मग ह्यात तू कुठे आलीस?'
 'खरं म्हणजे पत्रांतूनच आमचं लग्नाचं पक्कं झालं होतं. पण मी त्याच्या मागं लागले होते की तू येऊन आईदादांना भेट.'
 'सगळं रीतसर करायचं होतं वाटतं तुला?'
 ती मनापासून हसली. 'तसं नव्हे, पण मला वाटलं, तो प्रत्यक्ष आला, भेटला म्हणजे तो अगदीच कुणीतरी उपरा आहे असं त्यांना वाटायचं नाही.'
 'त्यांच्या माहितीचाच होता ना तो?'
 'तसा होता, पण आमची पत्रांतून कुठपर्यंत मजल गेलीय ह्याची कल्पना नव्हती. मी सांगितलं असतं की मी रोमला जात्येय टोनीशी लग्न करायला तर त्यांना धक्काच बसला असता.'
 'नाहीतरी बसलाच असेल की.'
 'तरी इतका नाही. अर्थात मी हे लग्न करू नये म्हणून माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण माझा निश्चय झालेला होता. मग शेवटी दिली संमती.'
 'काय ग, टोनी तुला प्रथम भेटला तेव्हा तुला त्याच्याबद्दल काय वाटलं होतं?'
 तिनं जरा विचार केला. 'खूप आवडला होता, आणि आणखीही काही वाटलं होतं. त्याच्यासारखं कुणी मला कधी भेटलंच नव्हतं.'
 'त्यावेळी लग्नाबद्दल तुमचं काही बोलणं झालं होतं?'
 ती हसली. 'त्यानं जाण्यापूर्वी सांगून ठेवलं होतं की मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण तू अजून खूप लहान आहेस तेव्हा मी तुला विचारायला काही वर्ष थांबणार आहे.'
 हा टोनी भयानक धूर्त होता. एका बुद्धिमान आणि संस्कारक्षम मनावर त्यानं पकड घेतली आणि सवडीनं ती पकड घट्ट करीत आपल्याला हवी तशी बायको घडवली. शिवाय तिचे आईबाप परवानगी देणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे ती कायद्याने वयात येईपर्यंत आपला इरादा जाहीर केला नाही. आणि ही भोळी मुलगी जगाचा काही अनुभव यायच्या आतच स्वत:ला बंधनात टाकून मोकळी झाली.
 थोड्या वेळाने मी जायला उठले तशी ती म्हणाली, 'एवढ्यात निघालात? जेवूनच जा ना आता.'
 'नको आता उशीर झालाय.'
 ,'असं काय? थांबा ना. टोनी पण भेटेल आणि मलाही तुमच्याशी आणखी गप्पा करता येतील. खूप दिवसांनी मराठी बोलायला मिळालं म्हणून खूप आनंद झालाय मला.'
 'टोनीला मराठी येतं ना?'
 तिनं ओठ मुरडले. 'काय चार मोडकीतोडकी वाक्यं बोलण्यापुरतं येत होतं तेही आता विसरलाय. इथे आधी आम्हाला इटालियन शिकायचंय ना, तर एकमेकांशी कटाक्षाने इटालियनच बोलतो आम्ही. मग थांबता ना?' तिने पुन्हा मुद्याचा प्रश्न विचारला.
 टोनीला बघण्याचं कुतूहल होतंच, आणि तिचा गोड आग्रहही मोडवेना, म्हटलं, 'बरं थांबते.'
 'ओ वंडरफुल,' ती टाळी वाजवून म्हणाली, 'मला जरा बाजार करायचा येता माझ्याबरोबर? की थांबता इथेच?'
 'चल येते. तुला पिशव्या धरायला मदत.'
 तिचं बाजार करणंही बघण्यासारखं होतं. जिथे एक दिवसाच्या शिळ्या केक्स स्वस्त मिळतात ती बेकरी तिनं मला दाखवली. मग कुठल्या दुकानात इतर कुठल्या वस्तू स्वस्त मिळतात. कुठला खाटिक तिच्या प्रेमात पडल्यामुळे तिला निवडक कट्स देतो, सकाळी सकाळीच मळेकरी स्वत:च्या मळ्यातला माल विकायला आणतात, तिथनं भावाबद्दल भारतातल्या सारखीच घासाघीस करून स्वस्तात ताजी भाजी आणि फळं कशी मिळतात ते सगळं तिनं मला ऐकवलं.
 मी त्यांच्यासाठी खाऊ म्हणून चॉकलेटस् घेतली. पर्समधून पैसे काढताना गाइड दिसलं तशी आठवण झाली म्हणून विचारलं, "हो खरंच. ॲपियन वे पहायला कसं जायचं कल्पना आहे तुला? दोन-चार जणांना विचारलं, पण कुठली बस, ती नक्की कुठून निघते काही पत्ता लागला नाही.'
 'काही कल्पना नाही बाई,' ती म्हणाली. 'कुठेशी आहे ॲपियन वे?'
 'म्हणजे तू पाहिला नाहीस?'
 'नाही.'
 'हा रोमन साम्राज्यातला पहिला रस्ता. बावीसशे वर्षांपूर्वी बांधलेला. माहीत होतं तुला?'
 तिनं मान हलवली.
 'इतर तरी काही पाह्यलंस का? रोमन फोरम, कॉलोसियम वगैरे?'
 'तसं नीटपणे पाहायला वेळच झाला नाही अजून.' तिचा स्वर ओशाळलेला वगैरे नव्हता.
 ही कार्यक्षम मुलगी गृहोपयोगी जिनसा कुठे स्वस्त आणि चांगल्या मिळतात याविषयी मन लावून संशोधन करते आणि इतिहासाच्या एका महान आणि थरारक पर्वाच्या खुणा अवतीभवती विखुरलेल्या असताना त्या जाऊन पाहाण्याचेही कष्ट घेत नाही हा प्रकार मला आकलनच होईना. जणू ती राहात असलेलं शहर रोम होतं हा केवळ एक योगायोग होता.'
 टोनीला भेटून माझी निराशा झाली. मी त्याला खलनायकाचा रोल दिला होता. पण तो धोरणी, कावेबाज असाही वाटला नाही. आणि कुणी एकदम याच्या प्रेमात पडावं इतका लोभसही वाटला नाही. जरा मंदच वाटला. चटकन् हसून बोलून अनौपचारिक खेळीमेळीने वागू शकत नव्हता. तिच्या सारखा. एकंदर माझ्या भेटीविषयी तो फारसा खूष दिसला नाही. रोमाला तिच्या जगापासून शक्य तितक्या लांब ठेवण्यावर त्यांच्या सहजीवनाचं यश पलबून आहे असं जर त्याला वाटत असलं तर हे साहजिकच होतं. काहीही असो, आम्ही दोघं एकमेकांना फारसे आवडलो नाही हे उघड होतं. मग रोमाही गप्प गप्प झाली.
 जेवणानंतर मी फार वेळ थांबले नाही. रोमानेही मग थांबण्याचा आग्रह केला नाही. टोनीला भेटलेच नसते तर बरं झालं असतं असं मला वाटत होतं. दुपारी दिसलेली रोमा नाहीशी होऊन आता वेगळीच रोमा साकार झाली होती. जराशी उदास, विझल्यासारखी. दुपारचा दुवा तुटला होता. तो सांधावासं एकदम वाटलं. मी विचारलं, 'उद्या येशील माझ्याबरोबर साइटसीइंगला?' ती म्हणाली. 'आवडलं असतं यायला, पण उद्या मला मुळीच वेळ होणार नाही. टोनीला हे आवडणार नाही म्हणून ती असं म्हणाली की काय ते कळायला मार्ग नव्हता.
 मी जायच्या दिवशी ती मला एअरपोर्टवर भेटायला आली. एक लहानसं पार्सल माझ्या हातात ठेवून म्हणाली, 'छोटी छोटी प्रेझेन्टस् आहेत आई, दादा वगैरेंच्यासाठी. न्याल ना?'
 'हो जरूर.'
 'पाहिजे तर पार्सल फोडून आतल्या वस्तू सुट्या न्या म्हणजे कस्टम्सचा त्रास होणार नाही.'
 मग काही बोलण्यासारखं सापडेना. आम्ही शेजारी शेजारी बसून लोकांची जा ये. बघत होतो. ती तिथं आली हे टोनीला माहीत होतं की नाही ह्याची मी चौकशी केली नाही.
 ती म्हणाली, 'मामाला सांगा माझं छान चाललंय, मी मजेत आहे म्हणून' बिवलकरांनी मला हेर म्हणून पाठवलं होतं. आणि ही तिकडे जाऊन काम रिपोर्ट द्यायचा ते पढवीत होती.
 मी म्हटलं, 'जरूर सांगेन.' मग न राहवून विचारलं, 'एकटीच आलीस?
 'नाही. टोनीला दुपारी वेळ असतो. त्यानं स्कूटरवरून आणलंन्.'
 'मग तो आत नाही आला?'
 'बाहेरच थांबलाय.'
 'पण का?'
 एकदम ती खळखळून हसली. नाहीतरी तो उदास गंभीर मुखवटा तिच्या चेहऱ्यावर नीट बसत नव्हताच. 'म्हणाला, मी आपला बाहेरच थांबतो. पुन्हा काल रात्रीसारखं नको.' थोडं थांबून ती म्हणाली, 'तुम्हाला तो काही फारसा आवडला नाही, खरं ना?' 'आम्ही फार वेळ भेटलो कुठे होतो त्याच्याबद्दल मत बनवायला?'
 तिनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फक्त म्हणाली, 'तो जरा लाजरा नि अबोल आहे, त्यामुळे पहिल्या भेटीत कुणावर चांगलं इंप्रेशन पडत नाही त्याचं.' तिचा स्वर माझी समजूत घातल्यासारखा होता, लहान मूल जसं स्वत:ची निराशा झाली असताना दुसऱ्याचीच समजूत घातल्याचा आव आणतं तसा.
 मी डिपार्चर लाउंजमध्ये जायला उठले तेव्हा तिने हसून हात हलवून मला निरोप दिला. वळून प्लॅटफॉर्म हील्सवर सराईतपणे चालत झपाझपा ती बाहेरच्या दाराकडे निघाली. स्वयंचलित दारातून नाहीशा होणाऱ्या तिच्या आकृतीकडे पाहाता पाहाता एकदम मला वाटलं की ही चाल खरंच मजेत, आनंदात असलेल्या माणसाची आहे. रोमा ही एक एकसंध मुलगी आहे.
 मला माझंच हसू आलं. शब्दकोडं सोडवताना कधीकधी होतं तसंच हे झालं. एखादं कोडं अगदी सोपं वाटतं. शब्द भराभर सुचत जातात आणि मी ते घाईघाईने त्या लहान लहान चौकोनांतून भरत जाते. आणि मग एकदम एक असा शब्द येतो की तो त्याच्या आसपासच्या शब्दांत बसतच नाही. तो चुकला असावा म्हणून खूप विचार करकरूनसुद्धा त्याला पर्याय सापडत नाही. शेवटी नाइलाजाने तो बरोबर आहे असं कबूल करावं लागतं नि बाकीचे सोपे सोपे म्हणून सहजपणे भरलेले शब्द अर्थातच चुकीचे म्हणून खोडून टाकावे लागतात.
 मग एअरइंडियाच्या बादशहाच्या पोटात शिरून सीटबेल्ट आवळताना स्वतःला बजावलं, आता पुण्याला पोचलं की पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम जाऊन शनवारवाडा पाहायचा.

महाराष्ट टाईम्स
१२ नोव्हेंबर १९७८