कमळाची पानं/वळणं

विकिस्रोत कडून

वळणं


जगदीश आणि मी मूर्खासारखे भांडलो.
म्हणजे भांडण हेच मुळात मूर्खपणाचं असतं
असं नव्हे. गरज भासली तर किंवा
भांडण्यातून काही निष्पन्न होणार असलं तर
भांडावं, पण आमच्या संबंधात भांडण बसत
नव्हतं. तेव्हा तसं पाहता ते निरर्थक होतं.

बऱ्याच वर्षांपूर्वी आमचा समझोता झाला
होता. त्यानंतर पहिल्यापहिल्याने आम्ही
अगदी तोलूनमापून अन् शिष्टाचाराच्या
कल्पनांना घट्ट धरून वागत होतो. म्हणजे
आहे ही परिस्थिती कायमची म्हणून
स्वीकारीत नव्हतो, ह्यातून काही पर्याय
निघेल अशी आशा बाळगून होतो. मग
हळूहळू ह्याचं रूपांतर एका खेळीमेळीच्या,
मैत्रीच्या संबंधात झालं. ह्याचाच अर्थ आमचं
जे काय नातं होतं ते संपलं, तुटलं असं
आम्ही मान्य केलं आणि आता इतक्या
वर्षांनी एकदम हे भांडण झालं.

त्या दिवशी सकाळी लॅबमध्ये आल्याआल्याच
त्यानं भेटायला बोलावलंय म्हणून निरोप
मिळाला. त्याच्या ऑफिसात गेले तेव्हा तो
तोंडभर हसून म्हणाला, 'प्रवासाच्या
तयारीला लाग.'

 म्हणजे माझा प्रबंध इंटरनॅशनल असोसिएशन फॉर अप्लाइड न्यूट्रिशनच्या वार्षिक सभेच्या वेळी वाचण्यासाठी निवडला गेला तर! तो निवडला तर आमची इन्स्टिट्यूट माझा न्यूयॉर्कला जाणायेण्याचा खर्च देईल असं जगदीशनं कबूल केलं होतं. मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, 'आणखीही एक बातमी आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाअिड न्यूट्रिशननं तुला सहा महिन्यांसाठी गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावलंय. अर्थात ते तुझा जाण्यायेण्याचा खर्च देणार आहेत. म्हणजे तुझा कॉन्फरन्सला जाण्यायेण्याचा खर्चही आपल्यावर पडणार नाही.'
 मी काही प्रतिक्रिया व्यक्त न करता मुद्दाम सावकाश खाली बसले. त्याच्या बातमीचं मी आडपडदा न ठेवता स्वागत करीत नाहीये हे त्याला माझ्या वागण्यावरून कळेलच हे गृहीत धरून.
 'मग कळवू ना त्यांना?' तो म्हणाला.
 मी जे म्हणणार होते ते सावकाश, टप्प्याटप्प्यानं किंवा आडवळणान सांगण्याची शक्यताच नव्हती.
 मी म्हटलं, 'मला नाही जाता यायचं.'
 'जाता यायचं नाही म्हणजे काय?'
 'म्हणजे जाता... यायचं... नाही.' मी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हटल.
 'मग प्रबंध पाठवलास कशाला?' त्याचा आवाज एकदम चढला. तुला तुझं अप्लाइड न्युट्रिशनच्या क्षेत्रातलं स्थान माहीत आहे. तुझा प्रबंध बहुतेक निवडला जाईल ह्याची तुला कल्पना असलीच पाहिजे.'
 'त्या वेळी ह्या लेक्चररशिपबद्दल माहीत नव्हतं मला. कॉन्फरन्सला वेगळं अन् सहा महिने तिकडंच राहणं वेगळं.'
 मी फक्त कॉन्फरन्सला जाते असं मी म्हणू शकत नव्हते. कारण तिकिटाच्या खर्चाचा भुर्दंड त्याला पडला असता नि ती रक्कम थोडीथोडकी नव्हती. ती खर्च करण्याचं समर्थन तो वरिष्ठांकडे करू शकला नसता.
 त्याचा अजून विश्वास बसत नव्हता. 'तू खरोखरच जाणार नाहीस सांगू पहात्येयस?'
 'हो. आय ॲम सॉरी!'
 'न जाण्यासाठी योग्य कारण असेलच तुला?'
 'आहे, पण ते तुला योग्य वाटणार नाही.'

 आणि मग इतकी वर्ष लांबणीवर पडलेलं भांडण आम्ही भांडलो. मी त्याला सांगितलं की सहा महिने बिछूला एकट्याला सोडून मला जाता येणार नाही. त्याची मेडिकल कॉलेजची शेवटची टर्म होती. शिवाय दुसरीकडे कुठं त्याची सोय होण्यासारखी नव्हती.
 'अन्, तू विमेन्स लिबबद्दल गप्पा माराव्यास,' जगदीश म्हणाला. 'पुरुष असल्या क्षुल्लक कारणासाठी आपली करिअर कधीच धोक्यात घालणार नाही.'
 'कारण पुरूष आपल्या करिअरवर आंधळ्या एकनिष्ठेनं प्रेम करतात. त्यांना काही सारासार विचारच नसतो.'
 'तुझं तुझ्या मुलावरचं प्रेम इतकं आंधळं आहे की सारासार विचार वगैरेबद्दल बोलायचा तुला काही हक्कच नाही. तुझं बोलणं ऐकून कुणाला वाटायचंही नाही की बिछू तेवीस वर्षांचा पुरुष आहे. तो स्वत:ची काळजी घ्यायला पूर्णपणे समर्थ आहे. अर्थात तसा तू त्याला चान्स दिलास तर.' थोडं थांबून तो म्हणाला, 'तू त्याला असं लहान मुलासारखं वागवून त्याचं नुकसान करतेस असं नाही का तुला वाटत?'
 'मी त्याच्याबद्दल तुझा सल्ला विचारला नव्हता. आणि ह्या एका निरर्थक कॉन्फरन्सला न गेल्यामुळे माझी करिअर धोक्यात येईल असं तू म्हणू शकत नाहीस-'
 'तुला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत त्या निरर्थक असायच्याच.'
 'ओरडू नको.' मी म्हटलं.
 'मला हवं असलं तर ओरडेन. मी काय करावं न काय नाही हे सांगण्याचा तुला काही एक अधिकार नाही. ह्या प्रकाराबद्दल मी तुला नोकरीवरून काढू शकेन, माहीत आहे? आणि ही नाही तर दुसऱ्या छप्पन नोकऱ्या मिळतील असं म्हणू नको. अशी नोकरी तुला शंभर वर्षं शोधून सापडायची नाही.'
 त्याचं म्हणणं खरं होतं. ह्या नोकरीत अगदी मला हवं ते काम माझ्या मनाप्रमाणं करण्याची संधी मिळत होती. तीही त्याच्या सारख्याच्या हाताखाली. माझी संशोधनातली पात्रता ओळखून कारभारविषयक कामाचा बाजा माझ्यावर शक्य तितका कमी टाकणारा, माझ्या कामात ढवळाढवळ न करणारा माणूस मला दुसरीकडे कुठं भेटणार होता? तरीसुद्धा हे त्यानं बालून दाखवलेलं, मला वादात हरवण्यासाठी वापरलेलं मला आवडलं नाही. मी म्हटलं. 'मला ब्लॅकमेल करतोयस का?' त्याच्या कपाळावरच्या फुगलेल्या शिरा एकदम खाली बसल्या. डोळ्यांतल्या रागाची जागा वेदनेनं घेतली. आम्ही बिनबोलता एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे स्पर्श करण्याच्या अनिवार गरजेनं आमचे हात टेबलावर एकत्र आले, गुंफले गेले. आमची शरीरं पूर्वी ह्याहून कितीतरी जवळ आलेली होती, पण त्या जवळिकीपेक्षाही ह्या स्पर्शात काहीतरी जास्त उत्कट होतं.
 'आयॅम सॉरी!' तो म्हणाला. त्याचा आवाज एकदम थंड, तिऱ्हाइताचा होता. 'तुला जे पटतं ते कर. पण आत्ता नक्की काय ते ठरवू नको.' त्यानं आपला हात सोडवून घेऊन त्याचा तळवा माझ्याकडे करून धरला. 'अंहं. आत्ता आणखी काही बोलूच नको, आणि मलाही मागून पश्चाताप होईल असं बोलायला लावू नको. दोनतीन दिवस विचार कर आणि सोमवारी तुझं काय ठरतंय ते मला कळव.'
 हे थांबायला सांगणं केवळ औपचारिक होतं हे त्याच्या आवाजावरून मला कळलं. तरी पण मी नुसतीच मान हालवली नि तिथून निघून गेले.
 मी जाणार नाही असं म्हणताना तो रागावणार ह्याची मी अपेक्षा केलीच होती. तरी पण त्याच्या रागाच्या तीव्रतेनं मी हबकले. इतकं रागावण्याएवढं त्याला अजून माझ्याबद्दल काही वाटतं म्हणून सुखावलेही. पण त्याच्यामागोमाग रागावलेही. एकप्रकारे त्याच्या ह्या वाटण्याची तो माझ्यावर जबाबदारी टाकीत होता आणि असली जबाबदारी मला नको होती.
 माझ्या रागावर मन स्थिरावून त्याच्या वेदनेला मी विसरू पाहात होते आज मी त्याच्या डोळ्यांत जे पाहिलं ते आठ वर्षांपूर्वी पाहिलं होतं, जेव्हा त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं आणि मी नाही म्हणाले तेव्हा. मी त्याच्यावर प्रेम करीत होते म्हणून नाही म्हणणं मला फार अवघड वाटलं होतं. पण काहीच निर्णय न घेता दिवसामागून दिवस ढकलत कायमची काही मी राहू शकणार नव्हते, निर्णय घ्यायला हवाच होता आणि तो बिछूच्या बाजूनं व्हायला पाहिजे हेही माझ्या लेखी उघड होतं. समजा, मी जगदीशला होकार देऊन टाकला असता न् मग त्याचं न् बिछूचं पटलं नसतं तर बिछूवर मोठा अन्याय झाला असता. मी त्याची आईबाप दोन्ही होते. ज्या वयात त्याला माझी सगळ्यात गरज होती त्या वयात त्याच्या-माझ्यात भिंत उभी राहिली असती. आणि मग चुकीच्या निर्णयाबद्दल स्वत:ला जन्मभर दोष देत राहण्यापलीकडे दुसरं काहीच माझ्या हातात राहिलं नसतं. तेव्हा अगदी विचार करूनच मी निर्णय घेतला. जगदीशचं मी काही लागत नव्हते. तेव्हाही नाही नि आताही नाही.
 संध्याकाळी लॅबमधून येते तो बिछू घरी आलेलाच होता. त्याच्याबरोबर एक मुलगी होती. ह्यात तसं काही विशेष नव्हतं. तो बरेचदा आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आणायचा. तसं करायला त्याला संकोच वाटू नये अशी मी पहिल्यापासून खबरदारी घेतली होती.
 बिछूनं आमची ओळख करून दिली न् आम्ही एकमेकींना नमस्कार केला. बसण्याबोलण्याचा माझा मूड नव्हता म्हणून मी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण कसल्यातरी सूक्ष्म जाणिवेनं मी एकदम बिछूकडे पाहिलं. तो जरा चिंतायुक्त नजरेनं माझ्या रिॲक्शनचं निरीक्षण करीत होता. म्हणजे ही 'ती' मुलगी होती तर, जिच्याबद्दल मी अनेकदा विचार केला होता, पण जिला अजून काही रंगरूप बहाल केलं नव्हतं ती. आता त्या बाह्यरेखेत तपशील भरले गेले. नाव : सरिता, हल्ली जरा फॅशनेबल असलेलं. चेहरा : सुरेख पण व्यक्तिमत्त्वशून्य. हो, मी लगाम खेचला. नुसतं सुरेख म्हण, आणखी वर्णनात्मक विशेषणं घालण्याची जरूर नाही.
 मी तिच्याकडे नीट पाहून घेतलं. तोकडं पोलकं आणि बेंबीच्या खाली नसलेली साडी. ह्यांच्यामध्ये बरीचशी पाठ, कंबर नि त्याखालची डौलदार वळणं दिसत होती. खांद्याइतके लांब केस मोकळेच होते. डोळे अशा तऱ्हेने मेकअप केले होते की ते तिरकस दिसावे. ओठांवर पांढुरकी तकाकी होती. सगळं मिळून रूप काही वाईट दिसत नव्हतं. पण हे सगळं करायला किती वेळ लागत असला पाहिजे? स्वत:ची सौंदर्यसाधना करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असा काही उद्योग तिला नव्हता म्हणायचा! पुन्हा मी लगाम खेचला. अजून ओळखही झाली नसताना तिच्यावर असली टीका करायचं मला काही कारण नव्हतं.
 मी म्हटलं, 'बिछु, थोडी कॉफी कर ना आपल्या सगळ्यांसाठी.' सरितेच्या बाकदार भुवया- त्यांचा आकार नैसर्गिक असणं शक्यच नव्हतं- थोड्या वर उचलल्या गेल्या. ती लाडिकपणे म्हणाली, 'मी करते की', आणि बिछूच्या पाठोपाठ स्वैपाकघरात निघून गेली. बाई असताना घरातल्या पुरुषानं स्वैपाकघरात काम करायचं? छी:! ह्या प्रतिक्रियेची तिच्याकडून अपेक्षा करूनच मी बिछूला कॉफी करायला सांगितलं होतं. बाईचं काम, पुरुषाचं काम असल्या मानवनिर्मित विभागणीला मी नि बिछू नेहमी हसत असू. पुरुषानं घरकाम करण्यात काही लाज नाही असं मी त्याला लहानपणापासून शिकवलं होतं.
 कॉफी होत होती तोवर मी तोंड धुवायला आत गेले. सरितेशेजारी मी थकलेली, विस्कटलेली दिसत असले पाहिजे असं मला वाटलं. माझ्या थकव्यात दिवसभर केलेल्या कामाचा वाटा तर होताच, पण जगदीशच्यात नि माझ्यात निर्माण झालेल्या तणावाचाही होता. इतके दिवस संथपणे वाहात असलेला प्रवाह एकाएकी खालपासून ढवळून निघाला होता. मी खूप पाणी मारून तोंड धुतलं. तोंड पुसल्यापुसल्या माझी त्रेचाळीस वर्षांची कातडी सुकून ओढल्यासारखी दिसायला लागली. मी तोंडाला थोडं कोल्ड क्रीम चोळलं, केस विंचरले, साडी बदलायचा विचार केला आणि मग माझं मलाच हसू आलं. मी सरितेशी स्पर्धा करावी? तिच्यात नाही असं माझ्यात खूप काही होतं. फक्त तारुण्य आणि सौंदर्य सोडून. पण एक असं वय असतं कि तेव्हा पुरुषाला ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या वाटतात. किंवा कदाचित कोणत्याही वयात वाटत असतील. कदाचित जगदीशलाही मी आता नको असेन. त्याचं प्रेम मी एके काळी जशी होते त्याच्या आठवणीवर असेल माझ्यावर नसेलच.
 कॉफी तयार आहे म्हणून बिछूनं हाक मारली. खोलीतनं बाहेर पडायच्या आत मी सरितेला म्हणताना ऐकलं, 'लहानपणी दिलेली नावं मुलांना मोठेपणीही चिकटू देणं हा शुद्ध अन्याय आहे.' म्हणजे तिच्याकडून लढाईला तोंड लागलं होतं.
 त्याचं खरं नाव विश्वास. पण तो लहान असताना कुणी विचारलंं की सांगे बिछू, आणि तेच प्रचलित झालं. बिछू हे बेबी, बाळ त्यांच्यासारखं मूर्ख टोपणनाव आहे असं मला कधी वाटलं नाही. बिछूचा पोरपणा, मोकळेपणा, मनात येईल ते पटकन बोलण्याचा, करण्याचा स्वभाव ह्या सगळ्याला नेमकं शोभतं असं मला नेहमीच वाटत असे.
 मी बिनबोलता कॉफी प्यायला सुरुवात केली. जराशा अस्वस्थ शांततेत बिछू आणि सरिता गप्पा मारायला लागले. तिच्या कॉलेजातली निवडणूक, कुठल्यातरी सिनेमातलं व्हिलनचं काम, भारतानं जिंकलेली क्रिकेटची टेस्ट असल्या क्षुल्लक गोष्टींत खरंच कुणी रस घेऊ शकतं?
 'कुठल्या वर्षाला आहेस?' मी तिला विचारलं.
 'थर्ड इयर बी. ए. ला.'
 'कोणता विषय?'
 'इकॉनॉमिक्स.'
 'वा:, पुढं काय करणार आहेस?'
 बिछू चटकन म्हणाला, 'आधी बी. ए. होऊ दे. मग पुढचं पुढं.'
 'पण काहीतरी ठरवलं असशील ना तू?' मी तिलाच पुन्हा विचारलं.
 'खरं म्हणजे मी तसा फारसा विचार केला नाही त्याबद्दल,' ती म्हणाली.
 बिछू हसत म्हणाला, 'सगळेचजण काही हायस्कूलमध्ये असल्यापासून सबंध आयुष्य प्लॅन करून ठेवीत नाहीत. आणि प्रत्येकाला अगदी करिअरच हवी असते असं नाही.'
 'म्हणजे प्रत्येकीला असंच तुला म्हणायचंय ना?' मी म्हटलं.
 'हो. म्हणजे काय आहे, स्त्रीपुरुषांची समानता वगैरे तत्त्वत: मला पटतं. पण त्यांचे आयुष्यातले रोल्स वेगळे असतात हे आपण नाकारू शकत नाही. घरकाम करून मुलांना सांभाळणारी बाई नोकरी करणारीइतकंच उपयुक्त काम करीत असते.'
 'खरं आहे.'मी म्हटलं.
 बिछू हे सगळं इतक्या चपखलपणे मांडत होता की त्यानं माझ्याशी सामना म्हणून ते आधीपासून पाठ करून ठेवलं असलं पाहिजे, किंवा त्याच्या विचारांत संपूर्ण परिवर्तन झालं असलं पाहिजे.
 लग्न करायचंच होतं तर दुसरी कोणी- ह्या वेळी मी फारच जोरानं लगाम खेचला. लग्न करायचंच होतं तर. तर म्हणजे काय? कदाचित तो लग्न करणारच नाही अशी शक्यता मी मनात बाळगली होती का? अर्थातच नाही. मी रागानं स्वत:लाच म्हटलं. बायकांचं आपल्या सुनांशी न पटणं ह्या विषयाचा मी मानसशास्त्राच्या आधारे सहजपणे उहापोह करीत असे. त्या वेळी अर्थातच 'मी त्यातली नाही' हे अध्याहृत असे. मग शेवटी मी त्यातलीच का?
 नाही. ती त्याला साजेशी असती तर-
 पण ही आत्मवंचना आहे. ती सर्व दृष्टींनी परिपूर्ण असती तरी मी सुखासुखी त्याला तिच्या हवाली केलं नसतं. आत्तासुद्धा मला समाधान एवढंच वाटतंय् की कधीतरी पुढं बिछूला पटेल की आपली आई आपल्या बायकोपेक्षा श्रेष्ठ दर्जाची स्त्री आहे. तो कदाचित असं कबूल करणार नाही, पण मनातल्या मनात त्याला हे पटल्याशिवाय राहणार नाही.
 माझी खात्री होती की मी इतर आयांसारखी नाही. मी काही फक्त बिछू साठी जगत नाही. तेव्हा तो लग्न करायला निघाला की मी त्याला आनंदानं आशीर्वाद देईन. स्वत:ला अभेद्य समजत असल्यामुळे मी स्वत:च्या बचावासाठी तटबंदी उभारण्याची तजवीज केली नव्हती. त्यामुळं आता हल्ला झाल्यावर त्याला तोंड द्यायला सर्वस्वी असमर्थ ठरले होते.
 सरिता उठली. म्हणाली, 'मला जायला पाहिजे आता.' बिछू म्हणाला, 'बराच उशीर झालाय गं. मी तुला होस्टेलवर पोचवायला येतो. चल.'
 साडेसातच झाले होते. पण ती 'स्त्री' होती. नाजूक, असहाय्य, संरक्षणाचा गरज असलेली. त्यानं सहजपणे आपला हात तिच्या कमरेभोवती लपेटला, आणि एकदम डोक्यात शिरलं की ह्या दोघांचं हे बऱ्याच दिवसांचं नातं आहे. ती एकमेकांशी किती सहजपणे, न संकोचता वागत-बोलत होती. मला राग आला. बिछूनं ही अशी लपवाछपवी का केली? करण्याची त्याला गरज का भासली?
 तिच्या उघड्या कमरेवरचा त्याचा हात माझ्या डोळ्यांसमोरून हालेना. त्यांचे एकमेकांशी किती जवळचे संबंध होते? तिच्या सहवासात त्याच्या शरीराला एक नवीच भूक जाणवून तिचं समाधानही होत होतं का?
 एक खोल वेदना जाणवली. तृप्त होण्याची सवय लागते, मनाला तशाच शरीरालाही. बिछूचा बाप गेल्यानंतर मी रात्रीमागून रात्री जागून काढत होते. जाणीव होती ती फक्त आता परत जे कधी मिळणार नाही त्याकरता आक्रंदून उठायची त्याची. ह्या यातनेनं आपल्या अनेक भुजांनी विळखा घातलल्या अवस्थेत मनात येऊ नये तो विचार यायचा. दोघांपैकी एकाचं मरण माझ्या नशिबी होतंच, तर मरणारा बिछू का नव्हता? बिछू आत्ता ज्या वयाचा आहे तेवढी होते मी तेव्हा.... म्हणून काय झालं, मी आता स्वत:ला विचारलं, मी गमावलं होतं-तेही काही त्याच्या चुकीमुळं नव्हे-ते त्याला मिळू नये अशी क्षुद्र इच्छा मी करते आहे?
 आणि जगदीशचं काय, मी पुन्हा प्रश्न केला. पुरुषाच्या सहवासाने पुन्हा सर्वार्थानं जागी होऊ शकते हे पटल्यावरही मी स्वत:ला जाणूनबुजून भुकेलंच राहू दिलं, त्याचं काय?
 ते काही चालायचं नाही, मी स्वत:ला बजावलं. मी जर बिछूकरता कशाचा त्याग केला असला तर तो स्वेच्छेनं. त्यानं सांगितलं म्हणून नाही मग जे मुळात स्वत:च्या समाधानासाठी केलं त्याबद्दल विचार करताना परतफेड कृतज्ञता असल्या दुष्ट शब्दांचा आश्रय कां घेत्येय मी?
 रात्री जेवताना बिछूनं विचारलं, 'कशी काय वाटली तुला सरिता?'
 एव्हाना मी तटबंदी उभारून ठेवलेली होती. मी म्हटलं, 'छान आहे.' बस, एवढंच! असल्या लढाईतले डावपेच मी शिकत होते.
 'मी तिच्याशी लग्न करणार आहे असं सांगितलं तर तू काय म्हणशील?'
 मला एकदम चकित करणारी बातमी सांगण्याच्या आविर्भावात त्यानं विचारलं.
 'मी म्हणेन की थोडा थांब. जिच्याबद्दल आदर वाटू शकेल अशी मुलगी आहे अशी खात्री कर, आणि मग खुशाल तिच्याशी लग्न कर.'
 'आमची ओळख काही आजची नाहीये. खात्री होण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही.' जरा थांबून माझ्याकडे न बघता तो म्हणाला, 'मला माहीत आहे तिला काही महत्त्वाकांक्षा नाही हे तुला आवडलेलं नाही. पण प्रत्येकजण काही तुझ्याइतकं बुद्धिमान नसतं. आणि शेवटी आमचं एकमेकांवर पुरेसं प्रेम आहे की नाही ह्याला महत्त्व आहे, अितर कशाला नाही.'
 मी काहीच बोलले नाही. दोन-चार घास खाऊन तो म्हणाला, 'आम्हांला शक्य तितक्या लवकर लग्न करायचंय.'
 'शक्य तितकं म्हणजे किती लवकर?' मी विचारलं.
 'डिसेंबरमध्ये. तेव्हा तिचे आई-वडील इकडे येणार आहेत. ते आफ्रिकेत असतात.'
 'पण तुझं अजून शिक्षण संपायचंय. ते संपेपर्यंत तरी थांबायला काय हरकत आहे?'
 'असं आहे, एकदा सगळं ठरवल्यानंतर मग थांबण्यात तरी काय अर्थ आहे?'
 एक अर्थ असा, की शिक्षण संपवून मिळवायला लागल्यावर त्याला बायको पोसता येईल. त्यांना दोघांनाही मी पोसावं-कदाचित आणखी कित्येक वर्ष-अशी अपेक्षा करण्याइतका बिछू बेजबाबदार आहे? स्वत:च्या पायांवर उभं राहायला येईपर्यंतसुद्धा थांबवत नाही इतका अगतिक बनला आहे?
 पण हे सगळं रागारागानं बोलून दाखवण्याचं समाधान मला लाभणार नव्हतं. ते माझ्या नव्या डावपेचात बसलं नसतं. असले डावपेच आमच्या दोघांच्या नात्यात कधीच आले नव्हते. ते आता आमच्या नात्याचा आवश्यक भाग बनणार होते. वर्षानुवर्षं स्थिर असलेलं नातं त्यात तिसऱ्या एकाचा प्रवेश होऊन इतकं बदलू शकतं?
 या दोघांसाठी मी नोकरी करायची, घर चालवायचं, आणि मनातलं खरं काहीही न दाखवता सदैव एक मख्ख मुखवटा घालून वावरायचं ही कल्पना असह्य होती. तिच्यावरच मन रेंगाळत होतं म्हणून माझा मला राग आला पण मी त्या मनावर ताबा मिळवू शकत नव्हते.
 मी बिछूला म्हटलं, 'तसा थांबण्यात काही अर्थ नाही म्हणा! फक्त डिसेंबरमध्ये मी इथं नाही आहे.'
 'नाही आहेस म्हणजे काय?' त्याच्या आवाजाचा एकदम स्फोट झाला. तो ऐकून मला बरं वाटलं. खरं म्हणजे ह्या कॉन्फरन्सबद्दल त्याच्याजवळ बोलले होते, पण आता पुन्हा सांगितलं.
 'अस्सं,' तो म्हणाला. काय प्रतिक्रिया दाखवायची ते त्याला कळत नव्हतं.
 मग मीच म्हटलं, 'तशी मी इथं असण्याची काही गरज नाही ना?'
 'तसं म्हटलं तर नाही,' तो जरा नाराजीनं म्हणाला. मी स्वत:शीच हसले. मनात आलेलं ताबडतोब बोलून टाकलं, पळवाट ठेवली नाही हे किती चांगलं केलं. माझ्यातलं जे सगळ्यात हीन, सगळ्यात क्षुद्र, त्याला सामोरं जाणं मला अशक्य होतं, आणि ते टाळण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे पळून जाणं.
 सोमवारपर्यंत न थांबता दुसऱ्या दिवशीच जगदीशला सांगायला गेले तर तो न्यूयॉर्कला पाठवायच्या पत्राचा मसुदा तयार करीत होता. त्यानं लिहिलं होतं की प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मी कॉन्फरन्सला हजर राहू शकतं नव्हते पण तो हजर राहणारच होता, आणि माझ्या संशोधनाशी त्याचा चांगला परिचय असल्यामुळं त्यांची हरकत नसल्यास तो माझा प्रबंध सादर करू शकेल.
 'तू जायचं ठरवलं होतंस हे ठाऊक नव्हतं मला,' मी म्हटलं. पण खरं म्हणजे ठाऊक असायला पाहिजे होतं. त्याचा संताप हा नुसता थिओरेटिकल नव्हता, एक फार मोठी निराशा झालेल्या माणसाचा संताप होता हे मला कळायला पाहिजे होतं. कारण मी ज्याला प्रेम म्हणते ते माझं दुसऱ्याशी असलेलं नातं सांगत नाही, फक्त माझ्या भावनेचं वर्णन करतं, स्वत:भोवती मला घोटाळवतं. ज्याच्यावर प्रेम असल्याचा मी दावा करते त्याच्याबाबतीत मग मी जास्त संवेदनाक्षम बनण्याऐवजी कमीच बनते.
 त्यानं शांतपणे विचारलं, 'आता ठाऊक झालंय तर तुला निर्णय बदलायचाय का?'
 मी मान हालवली. त्याचा ताठ झालेला चेहरा एकदम सैल पडला मी नजर खाली फिरवली. माझ्या डोळ्यांत वाचण्यासारखं काही असलं तर ते त्यानं वाचू नये म्हणून. मी फक्त पळून जात होते. कुठं आणि कसं थांबायचं हे त्याच्यावर अवलंबून असेलही कदाचित. पण आतापुरता तरी मला आशा करायचा किंवा त्याला करू द्यायचा हक्क नव्हता, कारण माझा निर्णय त्याच्या गरजेसाठी घेतला गेला नव्हता.

स्त्री मार्च १९७७