कमळाची पानं/बिनशेवटाची गोष्ट

विकिस्रोत कडून

बिनशेवटाची गोष्ट


वर वर चढत होतो तशी हवा गार होत
होती, पण झाडांच्या दाट पानांतून उन्हाची
तिरीपसद्धा न लागता माझं अंग घामानं
निथळत होतं. चढण्याच्या श्रमाने श्वास
जोराने चालला होता. त्याच्या आवाजाने न्
माझ्या हृदयाच्या धडधडीने माझे कान भरून
गेले होते.

माधव पुढे धीम्या चालीने चालला होता.
नेहमीसारखा. मी धापा टाकीत थांबले की
तो थांबायचा, मी पुन्हा चालायला लागले
की तोही चालायला लागायचा. बिनबोलता.
बोलायचं होतं ते डोंगराच्या पायथ्याशी
बोलून झालं होतं.

"अगं, पण पायीच का म्हणून चढायचंय
तुला?"

मी बोलले नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर न
सांगता त्याला कळायला हवं होतं.

मग तोच म्हणाला, "पंधरा वर्षांपूर्वी
तुम्ही इथे आला होता तेव्हा मोटारीचा
रस्ता नव्हताच वरपर्यंत. पण आता एक एवढा
छातीवर चढ चढायचं कारण आहे का काही? त्यातून तुझी प्रकृती ही अशी असताना तर नाहीच नाही."
 मी सरळ उत्तर दिलंच नाही. म्हणाले, "तुला हवं असलं तर तू नि वसू मोटारने जा. मी पायी येणार आहे."
 मग अर्थातच आम्ही पायी निघालो. माधवचं एक चांगलं आहे. रागावला म्हणजे सरळसरळ रागावणार, रागावून झालं म्हणजे सोडून देणार. 'उगीच तुझ्या हट्टामुळे माझे बघ कसे हाल होताहेत!' असा मार्टरचा आव आणणार नाही. अर्थात हाल होत असले तर माझेच होत होते, पण कधीकधी स्वत: हाल सहन करण्यापेक्षा दुसऱ्याचे बघणं जास्त कठीण असतं हीही गोष्ट खरी.
 त्या वेळी तिचा पाय पडलेल्या ठिकाणी आता माझा पाय पडेल कदाचित, अशी एक कल्पना मी माधवला बोलून दाखवली नाही. तो लगेच 'स्टॅटिस्टिकल प्रॉबेबिलिटी' वगैरे काढून त्या गोष्टीची अशक्यता मला पटवून द्यायला लागला असता. कदाचित ती मला पटलीही असती. म्हणूनच मी त्याला काही बोलले नाही. काही कल्पना तर्कशास्त्राच्या कसाला न लावणंच शहाणपणाचं असतं.
 पण ही जंगलातली पाऊलवाट. झाडासारखं झाड. काही ओळखीचं वाटत नव्हतं. आणि वाट तरी तीच असेल कशावरून? नदीच्या प्रवाहासारखी तीही बदलणार. शिवाय त्या वेळची माती पावसाने, वाऱ्याने, आता धुपून गेलेली असणार. खरं म्हणजे सगळंच बदललं होतं किंवा मला आठवत तरी नव्हतं. मरकारा तसं लहानसंच गाव. पण आम्ही उतरलो होतो ते घर, वरखाली जाणारे रस्ते-काही म्हटल्या काही ओळखत नव्हतं. डोळे बांधून एकदम मला कुणी इथे आणून सोडलं असतं तर कधी न पाहिलेल्या ठिकाणी आले आहे असंच वाटलं असतं.
 मागे आलो होतो तेव्हा आठवड्याच्या बाजारातून जंगलातल्या कुरुबांनी गोळा करून आणलेला बाटल्याच्या बाटल्या मध विकत आणून इडल्यांबरोबर फस्त करीत होतो, बाकी सगळी तोंडीलावणी तिखट लागायची म्हणून. कुरुंजीच्या फुलांच्या वासाचा मध. काल दोनतीन दुकानांत विचारून पाहिलं. कुरुंजीच्या वासाचा मध? हे टूरिस्ट लोक नादिष्टच असतात. काहीच्या काहीच मागतात... दुकानदारांनी माना हलवल्या.
 ह्या जंगलातून आम्ही चालत होतो, तेव्हा घेतलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर कुरुंजीच्या वासाने नाकपुड्या भरून जात होत्या. नाकाने वास घेतला की जिभेवर मधाचा वास रेंगाळायचा. आता कितीही श्वास ओढला तरी तो वास येत नव्हता. कुरुंजीची सगळी झाडंच तोडली की काय कुणी? शेवटी डोंगर उतरुन येणाऱ्या एकाला विचारलं तर तो म्हणाला, "दर सात वर्षांतून एकदाच फुलते कुरुंजी."
 -म्हणजे ह्या वर्षी नाहीच.
 माझ्या पोटात एकदम खड्डा पडल्यासारखं झालं. का? त्या वेळी होतं तसंच्या तसंच सगळं पुन्हा अनुभवायचं म्हणून का मी इथे आले? पण तुकडे सांधून चित्र जुळवायला सगळे तुकडे तरी कुठे माझ्या हातात होते? घडतात त्या वेळी आपल्या लेखी ज्यांना महत्त्व असतं अशाच गोष्टी नंतर आपल्याला आठवतात. त्या वेळच्या कूर्गच्या प्रवासात नेमकं काय काय केलं, कुठे कुठे गेलो, काय पाहिलं- काही आठवत नव्हतं मला. आठवत होता तो फक्त लाल मातीवर पडलेला गुलमोहराच्या फुलांचा लालचुटूक सडा. कुरुंजीच्या फुलांचा धुंद करणारा वास. जंगलातली हिरवी शांतता. त्या वेळच्या माझ्या मनोवृत्तीला स्पर्श करणाऱ्या गोष्टी. माझं नेहमी असंच. स्वत:च्या बाहेर मी जाऊ शकत नाही म्हणून वाटणारा अपराधीपणा का बोचला?
 पण आईबाप नि मुलं ह्यांच्या संबंधात हा अपराधीपणा अभिप्रेतच असतं. तिथं संबंध तोडणारं, टाकून जाणारं मूल असतं. मी तिचं शेवटच मूल. तिच्या-माझ्यात एक खास जवळीक होती. मला वाटायचं, आता माझं लग्न झालं की तिला फार एकटं वाटणार. मग लग्न झालं. मी माझ्या संसारात सुखावले. दिवसन् दिवस तिची आठवणही यायची नाही, आणि मग एकदम आली आठवण म्हणजे असंच कुठेतरी खुपायचं. ती गेली तेव्हा वाटलं, फार उशीर झाला. तिला काही द्यायचं राहिलं असलं तर आता राहूनच जाणार. तिनं सुद्धा अगदी हुलकावणी दिली. निरोप घ्यायलाही सवड दिली नाही.-मग इथं काय मी तिचा निरोप घ्यायला आले? नाही, खरं तर तसंही नाही. निरोप कधीच घेऊन झाला. ती नसणं अंगवळणी पडलं तेव्हा.
 मी त्या मागल्या वेळी होते त्यापेक्षा वसू फारच लहान आहे. ती डोंगर चढताना पुढे पळे, मागे येई, पुन्हा पुढे जाई. कुत्र्यासारखी. ती आमच्या दुपटीने चालत असली पाहिजे. मधेच मागे येऊन विचारलंन,
 "आई, किती राहिलंय अजून?"
 "आता थोडंच असेल. दमलीस का?"
 वेगाने श्वास घेण्यासाठी स्फुरलेल्या नाकपुड्या आणखीनच फुगवून जोरजोरात मान हलवली.
 हळूहळू मोटारचा रस्ता दिसायला लागला. मग कडेने उभ्या राहिलेल्या मोटारी, मग माणसं. शेवटी एक वळण घेतलं न् समोर कावेरीचा उगम. एक लहानसं सिमेंटकाँक्रीटने बंदिस्त केलेलं कुंड. तिथं फुलं वाहणारी भाविक चेहऱ्याची माणसं. जिनं डोंगराच्या सुळक्यावरून नाट्यमय उडी फेकावी ती ह्या खळग्यातून बुडबुडत कशी निघेल?
 कुंडाशी बसून एक दागिन्यांनी लगडलेली, हिरवं नेसलेली नववधू पूजा करीत होती. पूजा करता करता, काही अंतरावर तिच्या नवऱ्याने धरलेल्या कॅमेऱ्याच्या डोळ्यात पाहून हसत होती. वर्षांनुवर्षांनी ते फोटो कौतुकाने दाखवीत तो तिला म्हणणार आहे, "आठवतं तुला?"
 माझ्याकडे फोटो नाहीत. तिनं तिच्या भ्रमंतीत देश पालथा घातला, पण ती कधी कॅमेरा घेऊन प्रवासाला जायची नाही. चिडून म्हणायची, "ह्या कॅमेरावाल्यांना कॅमेऱ्यातून जगाकडे पाहायची इतकी सवय होते की ते स्वत:च्या डोळ्यांतून जग पाहायलाच विसरतात!" पण स्वत:च्या डोळ्यांतून पाहिलेलं विसरलं तर? 'विसरलं तर विसरलं', ती म्हणाली असती. जे आपसुख आठवणीत राहील ते खरं.
 मग मी इथे आठवणी मुद्दाम उकरून काढायला कशाला आले? ही बोच दुखवणं काट्याची बोच दुखण्यासारखं अर्धवट सुखद नसतं.
 कुंडाभोवतालच्या गजबजाटापासून जरा लांबच आम्ही बसलो. माझ्या धापा थांबल्या होत्या. माझ्या कानांत घुमणारा त्यांचा आवाज बंद होऊन भोवतालची शांतता ऐकायला यायला लागली होती.
 वसू म्हणाली, "आई, असलाच का कावेरीचा उगम?"
 "नाही गं, खरा उगम पलीकडे कडा दिसतो ना, त्यातून असणार. हे आपलं पूजेपुरतं."
 नेहमी वापरात नसलेलं सगळं ज्या अडगळीच्या खोलीत आपण टाकून देतो, तिथं वर्षानुवर्ष पडून राहिलेले शब्द योग्य संदर्भ मिळाल्याबरोबर उसळी मारून माझ्या जिभेवर आले होते. अगदी हेच मी तिला विचारलं होतं नि हेच उत्तर तिनं दिलं होतं.
 मला तिचा राग आला. का स्वत:च्या शरीराने मर्यादित केलेल्या सूक्ष्म विश्वात बंदिस्त होऊन राहत नाही माणूस? तो स्वत:चा विस्तार करतो, आपण वाढलो की आपलं सुख वाढेल ह्या कल्पनेनं. पण तो वाढवीत असतो ती वेदनेची शक्यता. फक्त स्वत:च्याच नव्हे, इतरांच्यासुद्धा- जे त्याच्या कौतुकाने वाढवलेल्या पसाऱ्याच्या आत सामावतात त्यांच्या. काय अधिकार आहे त्याला हे करण्याचा?
 वसू माझ्यासमोर बसली होती. हडकुळ्या गुडघ्यावर कोपर अन तळव्यावर हनुवटी टेकून. फार वेळ स्वस्थ बसल्यामुळे चुळबूळ करायला लागली होती. मी उठले रे उठले की ती गलोलीतून सुटलेल्या गोट्यासारखी उताराला लागणार होती. पण पुन्हा इथंच येणार होती. वीसपंचवीस वर्षांनी, पाय ओढत, धापा टाकीत.
 तिच्या आजच्या स्वच्छ चेहऱ्यात मला वेदनेनं गढूळलेले डोळे दिसले.
 रागाच्या झटक्यात मी उठले न म्हटलं, "चला, निघू या परत जायला."


पूर्व प्रसिध्दि :
सत्यकथा सप्टेंबर १९७७